Friday, 8 April 2011

कोंबडा आरवला आता उजाडलं तर ठीक नाहीतर.....


परवापासून इंडीया अगेन्स्ट करप्शन या चळवळीने जोर धरला आणि बघता बघता समर्थकांचा २ लाखाचा टप्पा पूर्ण केला. अण्णांना सर्व देशभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला. मी सुद्धा अण्णांना सायबर पाठींबा जाहीर केला आणि इतरांनी तसे करावे यासाठी प्रयत्नही केले. पण......आता कुणी म्हणतील की हीला चांगलं बघवत नाही किंवा संशयीच वृत्ती जास्त. काय करणार, स्वामी विवेकानंद वाचल्यापासून कोणतीही गोष्ट जशीच्या तशी स्विकारू नये, बुद्धीच्या जोरावर तावून सुलाखून घ्यावी हेच शिकले. त्यामुळे कोणतीही गोष्ट एका बाजूने चालू असताना याला दुसरी कोणती बाजू असेल काय आणि का हे तपासण्याची सवयच लागलेली आहे. तर आपण आजच्या अण्णा हजारे प्रकरणाच्या सांगते कडे वळूया. 

आता हेच बघा ना, २-जी पासून आदर्श, गुलमोहर आणि कित्येक अशी भ्रष्टाचाराची प्रकरणं उघडकीस येऊन किती तरी काळ लोटला. रामदेवबाबांनी त्या विरूद्ध आंदोलनही छेडलं होतं. पण गंमत अशी की तेव्हा अण्णा हजारें सकट कोणाच्याच प्राधान्यक्रमावर भ्रष्टाचार विरोध नव्हता. त्यामुळे कोणीच (आपण सायबर वाल्यांनी सुद्धा) रामदेवबाबांना पाठींबा जाहीर केला नाही. सगळेच झोपले होते. आता अचानक गुढीपाडव्यापासून अण्णा हजारे उपोषणाला बसले आणि सगळे खडबडुन जागे झाले.
मग मला सांगा की रामदेवबाबांनी जेव्हा एक महिन्यापूर्वी भ्रष्टाचारा विरोधात रणशिंग फुंकलं होतं तेव्हा अण्णा हजारे आणि कोणाचेच प्राधान्यक्रम भ्रष्टाचार विरोध हे नव्हते का? आदर्श सकट भ्रष्टाचाराची सगळी प्रकरणे उघडकीस येऊन बराच काळ लोटलाय. रामदेवबाबांनी चालू केलेली चळवळ चुकीची होती म्हणून त्यांना पाठींबा दिला नाही असं म्हणायचंय का तुम्हाला? तेव्हा अण्णा हजारे कुठे होते? त्यांची प्रतिक्रीया कुठेच दिसली नाही. आता एकदम ..........म्हणून जरा शंका आली. आपल्या देशात काहीही होईल....सांगता येत नाही.
मला तर असं वाटतंय की हा सगळा कॉंग्रेसचाच बनाव आहे. रामदेवबाबांना मागे टाकण्यासाठी. रामदेवबाबा आणि बाकी सगळे पटणे महाकठीण. त्यातल्यात्यात अण्णा बरे......आपला जुनाच माणूस. कारण अण्णा हजारे १० हून जास्त वर्षं महाराष्ट्रात भ्रष्टाचारा विरूद्ध (??) लढा देत आहेत. आणि जर त्यांच्यात खरंच इतकी ताकद असती तर महाराष्ट्रात एकही भ्रष्टाचाराचं प्रकरण होता कामा नये. त्या उलट महाराष्ट्रातील भ्रष्टाचार दिवसेंदिवस शिगेला पोहोचलाय. अण्णा हजारे कॉंग्रेसच्या हातातलं बाहुलं तर नाहीत? शरद पवारांची वेगळी ओळख करून द्यायला नको. महाराष्ट्रातील भूखंडांचं श्रीखंड गेली अनेक वर्षे चाटत आहेत. हे केंद्रीय कृषीमंत्री असल्यापासून महाराष्ट्रातच शेतकर्‍यांनी प्रचंड संख्येने आत्महत्त्या केल्यात. शरद पवार हा माणूस काही इतक्या नाजूक कातडीचा नाही की अण्णा हजारेंनी आरोप करायला आणि त्यांनी लगेच खुर्ची सोडून द्यायला. नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय.
दिल्लीतच पाणी मुरतंय. तुम्ही मारल्या सारखं करा आणि आम्ही रडल्यासारखं करतो. असंच काहीसं नाटक दिल्लीत चालू होतं. असं असतं तर इतर कुणालाच त्यांनी (त्यांच्या गुंड कार्यकर्त्यांनी) आजूबाजूला फिरकु दिलं नाही. रामदेवबाबांनी जेव्हा आंदोलन छेडलं तेव्हा अण्णा कुठे होते? आपल्याकडे इतरांचं अनुकरण करण्याची इतकी वाईट फॅशन आहे ना. अनुकरण करणं चांगलं पण ते समजुन केलं तर. ट्युनिशीयात जे झालं ते उस्फूर्तपणे झालं. माझ्याकडे फर्स्ट हॅन्ड इन्फरमेशन आहे. पण इजिप्त आणि लिबियात जाणून बुजुन अमेरिकेने सगळं घडवुन आणलं आहे. हे सुद्धा कालांतराने विकीलिक्स मधून बाहेर येईलच. ट्युनिशीयात झालं आणि इजिप्त मध्ये झालं (की घडवलं गेलं) म्हणजे लगेच भारतात पण असं काहीतरी होऊ शकतं हे दाखवण्याची एक खुमखुमीच लोकांमध्ये पसरलेली होती. त्याचाच परिणाम म्हणजे फेसबुक इत्यादी सोशल नेटवर्कींगचा उपयोग केला गेला. सगळेच अण्णा अण्णा म्हणतायत मग आपणही म्हणूया.....आपण का मागे रहा. आणि मग सगळं पसरत गेलंय. जर हे आंदोलन खरंच असेल तर सर्व भ्रष्टाचार्‍यांना शिक्षा लवकरात लवकर झाली पाहीजे. नरेंद्र मोदी उपोषणाला नाही बसले. कृती करून दाखवली. गुजरातमध्ये भ्रष्टाचार तुलनेने शून्यावर आला आहे.
अगदी खरंय, कोंबडा आरवला ....मग तो कोणाचा का असेना.......उजाडलं तर ठीकच. पण आपल्याकडे म्हण आहे नं, झोपलेल्याला जागे करता येते, झोपेचं सोंग घेतलेल्याला नव्हे. आपल्याकडे जनतेची स्मृती इतकी वाईट आहे की सगळ्या गोष्टी लगेच विसरून जातात. भावना अशा प्रकारे चेतवणं तसं सोपं काम आहे त्या तशाच तेवत ठेवणं आणि प्रत्यक्ष बदल घडवुन आणणं महामुश्कील. ज्यांना सीबीआय सारख्या संघटनेला स्वत:च्या खिशात घालता येतं त्यांना लोकपाल अध्यक्षपदी असणार्‍या निवृत्त न्यायाधीशांना खिशात घालणं कितीसं अवघड आहे?
म्हणूनच म्हणावसं वाटतंय: आता कोंबडा तर आरवला ......उजाडलं तर ठीकच .....नाही तर??


14 comments:

 1. रामदेवबाबांच्या वेळीस अण्णांनी प्रतिक्रिया नाही दिली हे लॉजिक पटलं नाही. देशात हजार वाईट गोष्टी चालू आहेत. किती गोष्टींवर प्रतिक्रिया देणार एका वेळी? त्यातच सगळा वेळ जाईल. त्यापेक्षा हाती घेतलेल्या गोष्टी संपवून योग्य वेळी प्लॅनिंग करून कृती करणे बरे. अण्णांनी तेच केलं असावं.

  ReplyDelete
 2. >> आणि जर त्यांच्यात खरंच इतकी ताकद असती तर महाराष्ट्रात एकही भ्रष्टाचाराचं प्रकरण होता कामा नये.
  स्वामी विवेकानंदांच्या तत्त्वज्ञानात खरंच एवढी ताकद होती तर भारतात (वा जगात) सगळ्यांची आध्यात्मिक प्रगती झाली पाहिजे होती - या धर्तीचं वाक्य झालं वरचं.

  ReplyDelete
 3. स्वामी विवेकानंदांच्या तत्त्वज्ञानात ताकद आहे फक्त लोकांनी ते त्या धारणेनं वाचलं पाहीजे. आध्यात्मिक प्रगती आणि भ्रष्टाचार निर्मूलन या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. अण्णा हजारेंनी भ्रष्टाचार विरोधी आंदोलन चालू करणे आणि स्वामी विवेकानंदांचं तत्त्वज्ञान यांची तुलनाच होऊ शकत नाही. आज लोक जे इतका जल्लोष करत आहेत अण्णा हजारेंमुळे विजय झाला इ. इ. काही विजय वगैरे नाही. नेहमीप्रमाणेच जनतेला मूर्ख बनवलंय या राजकारण्यांनी. महाराष्ट्रात जी धूळफेक चालू आहे तीच आता देशपातळीवर. अण्णा हजारे तरी कुठे स्वच्छ आहेत? हे कॉंग्रेसवाल्यांना चांगलंच माहीती आहे. अण्णा आणि कॉंग्रेस यांचं कनेक्षन गेली अनेक वर्ष आहे.

  अध्यात्मिक प्रगतीसाठी वैयक्तीक इच्छाशक्तीची तसेच गुरूंच्या मार्गदर्शनाची गरज असते. भ्रष्टाचार निर्मूलनासाठी वैयक्तीक निग्रहाचीच गरज असते. म्हणजे मी लाच देणार नाही आणि घेणारही नाही. कोणी उपोषणं करून जर भ्रष्टाचार निर्मूलन होणार असेल तर महाराष्ट्र आत्तापर्यंत अतिप्रगत असायला हवा होता. महाराष्ट्राच्या प्रगतीचा वेग भ्रष्टाचाराच्या प्रगतीत इतका उंच गेलाय. त्यासाठी माझं वरील वाक्य होतं.

  ReplyDelete
 4. आण्णा हजारे यांनी माहितीचा अधिकार आणला म्हणूनच आज हे प्रचंड घोटाळे उघडकीस आलेत हे मान्य करावेच लेगेल. आज आण्णा यशस्वी झालेत . RTI कायदा आला पण उघड झालेल्या घोटाळ्यावर दंड शिक्षा करणारी यंत्रणा आता लोकपाल विधायाका मुळे निर्माण होईल. विवेकानंद यांचे तत्वज्ञान न रुजण्यास जसे विवेकानंद यांना दोष देता येत नही तसाच भ्रष्ट्राचार नष्ट झाला नही म्हणुन आण्णा दोष देता येणार नही. या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या नाहीत. तत्वज्ञान आणि व्यवहार एव्हढाच फरक आहे. आणि आण्णा दोष देण्या आधि त्यांच्या बद्दक शंका घेण्या आधि आपण भ्रष्ट्राचारा विरुद्ध काय कृती केली हे तपासले पाहिजे. मुलाच्या शाळा प्रवेशा पासून आपण भ्रष्ट्र वागतो. कमी नावाजलेल्या शाळेत मुलाला डोनेशन शिवाय प्रवेश मिळत असून ही आपण डोनेशन घेणाऱ्या शाळेत प्रवेश गेतो. आपल्या समाजाच्या जीवन जगण्याच्या खुळचट कल्पना आहेत त्या बदलणे आवश्यक आहे. उगीच आपल्याला जमले नही म्हणुन आण्णाच्या चारित्र्यावर शंका घेणे सोप्पे आहे. पण कार्य करणे अवघड आहे. तेथे रामच पाहिजे रावणाचा नाश करण्यास .धोबी ने फक्त शंकाच घ्यावी .

  ReplyDelete
 5. great Philosophy by THANTHANPAL i am strongly Agree with you...!!

  ReplyDelete
 6. १. लोक विवाकानंदांचं तत्त्वज्ञान आत्मसात करून आध्यात्मिक बनत नाहीत हा विवेकानंदांच्या तत्त्वज्ञानाचा दोष नाही असं मी म्हणाले होते.
  २. अण्णा हजारेंच्या उपोषणामुळे सरकार मागे हटते आहे. त्यांचे ऐकते आहे असे जे चित्र निर्माण केले जात आहे ती एक मोठी धुळफेक आहे. त्यामुळे त्याअनुषंगाने अण्णांचे उपोषण आणि भ्रष्टाचार निर्मूलन किंवा राजकारणी सुधार याचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाहीये. इतकंच माझं म्हणणं आहे.
  ३. मी स्वत: कधीही लाच दिलेली नाही किंवा घेतलेली नाही.
  ४. माझ्याकडे (किंबहुना माझ्या सारखे अनेक सापडतील) माझी कामं सोडून उपोषण करण्यास आणि कोणा राजकारण्याच्या पाठीमागे लागण्यास सध्यातरी वेळ नाही. नाहीतर माझ्याच कुटुंबावर उपासमारीची आणि देशोधडीला लागण्याची वेळ येईल. हा निराशावाद नाही तर सत्य परिस्थिती आहे.
  ५. समाजासाठी मी काय काम केलंय किंवा काय करत होते याची कल्पना मला आहे. त्याची जाहीरात बाजी करण्याची मला गरज वाटत नाही.
  ६. विवेकानंदांनी तत्त्वज्ञान मांडलं आणि स्वत: त्याचा प्रसार करायला सुरूवात केली म्हणजे सगळं जग आध्यात्मिक बनत नाही हे जितकं खरं आहे तितकंच अण्णा काय किंवा अगदी महात्मा गांधी काय त्यांनी उपोषणाला सुरूवात केली म्हणजे राजकारणी घाबरून भ्रष्टाचार सोडतील आणि स्वच्छ होतील किंवा सर्व भ्रष्टाचार्‍यांना शिक्षा होईल असेही नाही. त्यामुळे लोकांनी उगाचच राईचा पर्वत करू नये. त्यामुळे अण्णा हजारे काय किंवा इतर काय इतके ताकदवान नक्कीच नाहीत की विधेयकाच्या मसुद्द्याला योग्य त्या प्रकारे बदलु शकतील. अगदी अत्ताच्या उपोषणात सुद्धा सरकारने त्यांची एकच मागणी मान्य केलीय ती म्हणजे लोकपाल विधेयक दुरूस्त करून संसदेच्या दोन्ही सभागृहात मांडलं जाईल. प्रत्यक्ष विधेयक मसुदा तयार झाला की कळेल शासनाने काय केलंय ते.
  ७. लोकपाल विधेयक तयार करणार्‍या समीती मध्येच जर भ्रष्ट लोक असतील तर त्यांनाच स्वत: विरूद्ध अ‍ॅक्षन घेण्यासाठी मसुदा तयार करायला सांगणं म्हणजे चोराला स्वत:च्या चोरीचा न्यायनिवाडा करायला पाचारण करण्यासारखं आहे. हे जनतेला समजत नाहीये. जनता आपली अण्णांचा विजय झाला, लोकशाहीचा विजय झाला म्हणून नाचतेय. त्यातल्या निम्म्यांना हे सुद्धा माहीत नाही की नक्की मागण्या काय होत्या आणि कोणत्या मान्य झाल्या ते.

  ReplyDelete
 7. अपर्णा मला तुझे काही मुद्दे अजिबात म्हणजे अजिबात पटले नाही. एक म्हणजे रामदेवबाबा इतके दुधखुळे आहेत का की त्यांना हा कॉंग्रेसचा बनाव आहे हे समजू नये? तसे असते तर त्यांनी अण्णा हजारेंना पाठींबा दिलाच नसता. रामदेवबाबा खूप दिवसापासून लोकामध्ये ...भ्रष्टाचाराच्या असंतोषाबद्दल ठिणगी फुलवत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून आज इतके सगळे लोक अण्णांच्या पाठीमागे उभे राहिले आहेत असे नाही का तुला वाटत? अण्णा हजारेंनी आर टी आय अँक्ट साठी पण उपोषण केले होते, त्या उपोषणाचा फायदा झालाच न? आजकाल लोक आर टी आय चा उपयोग करतात असा मला तरी वाटतंय. आता राहिला प्रश्न शरद पवारचा. तर शरद पवार हा पक्का राजकारणी आहे, काय माहित पुढे त्याला यातून काहीतरी फायदा करून घ्यायचा असेल म्हणूनही त्याने लगेच राजीनामा दिला....

  मला तर खूप म्हणजे खूपच शंका आहे की भारतात एक तरी माणूस भ्रष्टाचार न करता जगू शकतो आहे का? अगदी आपल्या सारख्या सामान्य माणसाचे उदाहरण घे, ड्रायविंग लायसन्स काढताना बरेच लोक एजंट कडे जातात, तो देखील भ्रष्टाचारच आहे न.. कुठलीहि जमीन घेताना काळे पैसे दिल्या शिवाय जमिनीचे व्यवहार होतच नाहीत. आता रामदेवबाबा, अण्णा हजारे, श्री श्री रविशंकर याचे कितीतरी ठिकाणी आश्रम आहेत, तेथील जमिनीचे व्यवहार काळे पैसे दिल्याशिवाय झाले असतील? मला शंका आहे.

  थोडक्यात मला वाटतंय की सगळी सिस्टीम धुतल्याशिवाय भ्रष्टाचार थांबणार नाही. कदाचित या आंदोलनाने ते सध्या होईल. ती सिस्टीम धुवायला अजून बरीच वर्ष (कदाचित पिढ्या) जावी लागतील असं मला तरी वाटतंय.

  ReplyDelete
 8. रामदेवबाबा दुधखुळे नक्कीच नाहीत. त्यांना भ्रष्टाचार निर्मूलन खरंच करायचंय म्हणून तर त्यांनी अण्णा हजारेंना पाठींबा दिलाय.
  माझं म्हणणं उलट होतं जेव्हा रामदेवबाबांनी भ्रष्टाचाराविरूद्ध एल्गार पुकारला तेव्हा अण्णा कुठे होते? रामदेवबाबांनी उपोषण केलं नाही पण त्यांनी विविध राज्यांत जाऊन रॅलीज काढल्या. उपोषणाला तुम्ही अतिशय ऑरगनाइझ्ड म्हणता आणि रॅली काढणं म्हणजे नियोजन नाही?
  आर टी ओ वाल्यांनीच एजंट्सना परवानगी दिलेली आहे कारण ज्यांच्याकडे वेळ कमी असतो त्यांना पूर्ण पद्धत समजुन घेऊन तिथे थांबून सगळं करणं शक्य नसतं अशांनी एजंटला पैसे देऊन त्यांच्याकडून काम करून घेणे ही एक सर्वमान्य पद्धत आहे. मी सुद्धा एजंट कडून करून घेतलं पण आर टी ओ च्या पोलीसा समोर त्यांची परीक्षा दिली होती. त्या एजंटला पैसे प्रोसेस मध्ये मदत करण्यासाठी दिले होते. अगदी आता प्रायव्हेट बॅंकां मध्ये सुद्धा एजंट्स लागू केले आहेत. ते एजंट्स तुमचे सर्व व्यवहार बघतात. ते बॅंकेने ऑप्रुव्ह केलेले एजंट्स असतात.
  भ्रष्टाचार आपल्याकडे नसानसात भिनला आहे हे खरंय. आणि सिस्टीम स्वच्छ करायला लागणार हे नक्की. खरं तर देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी गांधीजींचं मत होतं की देश उभारण्यासाठी सर्वप्रथम लोकांचं चारित्र्य घडवा, खेड्यात सुधारणा घडवा. याउलट नेहरूंचं म्हणणं होतं की चारित्र्य काय कधीही घडवता येईल. पण देश उभारण्यासाठी आधी कारखाने मोठमोठे उद्योग आणि उच्च शिक्षण असं आणलं पाहीजे. आपण नेहरूंच्या धोरणाचे परिणाम भोगत आहोत. सिस्टीमच्या मूळापर्यंत भ्रष्टाचार रूजला आहे. (वरील मजकुर मी हार्वर्डच्या एम फिल च्या डेझर्टेशन मध्ये वाचला होता. डेझर्टेशनचा विषय होता "ई-गव्हर्नन्स इन हैद्राबाद अ‍ॅन्ड इट्स इफेक्ट ऑन करप्शन".

  ReplyDelete
 9. अपर्णा, मी तुझ्या मताशी पूर्ण सहमत आहे, ज्यांनी अण्णांना ओळ्खले नाही ते काहीही म्हणोत. खरेतर अण्णा या आन्दोलनाचे मुखवटा होते, मेंदु वेगळाच होता.

  अण्णांनी आर.टी.आय. कायदा आणला (हाही एक गोड गैर्समज) त्या आर.टी.आय. कार्यकर्त्यावर (महाराष्ट्रात सगळ्यात जास्त) हल्ले झाले, त्यातल्या किती कार्यकर्त्याच्या मागे अण्णा उभे राहिले? त्यातल्या कित्येकांचे मारेकरी सापडलेले नाहीत. आर.टी.आय. मुळे घोटाळे उघड झाले पण आर.टी.आय. मधुन मिळालेल्या पुरव्यांमुळे किती जणांना शिक्षा झाली? कारण शेवटी न्यायालयात घिसेपिटे (कधी कधी तर इंग्रजांच्या काळातले) कायदे आणि युक्तिवाद्च कामी येतो. या देशात पुरावे तपासायला आणि शिक्षा द्यायला इतकी न्यायालये असताना जे काम ते नाही करु शकले ते लोकपाल करील असे कसे मानावे? कारण सरकारी अधिकारयांना शिक्षा होवू नये याची चोख काळ्जी सरकार घेत असते. आर.टी.आय. कायद्यात २५ हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असताना महिती आयुक्तांनी किती अधिकाऱ्यांना तो आकारला यावर पी.एच.डी. होवू शकते.

  ReplyDelete
 10. अगदी खरंय. मला तर आठवतंय अण्णा हजारे उपोषणाची बाहुली म्हणुन अवतरतात. नंतर ज्यासाठी उपोषण केलं त्याचं नक्की काय होतं ते त्यांच्या गावीही नसतं. गेल्या वर्षीच तळेगावचे आर टी आय कार्यकर्ते श्री शेट्टी यांचा खून झाला. त्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या गुंड लोकांचा हात होता. अण्णा हजारे त्यावेळी नक्की कुठे होते? त्यानंतर श्री शेट्टी यांच्याच एका सहकार्‍यावर प्राणघातक हल्ला झाला त्यातून नशिबाने तो वाचला पण हल्ला झाला तरी अण्णा काहीच बोलले नाहीत. आर टी आय कार्यकर्त्यांवरील हल्ले म्हणजे क्षुल्लक काय? ते तर जन जन लोकपाल आणलं तरी भ्रष्टाचारी हल्ले करतच राहणार. कारण भ्रष्टाचार आपल्या नसानसात भिनलंय. ते आपणच उखडून काढू शकतो. लाच देणे-घेणे न करता. थोडा वेळ लागेल पण इच्छा शक्ती असेल तर होईल. त्याला कोणा लोकपालाची गरज नाही. आणि जरी लोकपाल आले तरी ते शिरजोर होणार नाहीत, भ्र्ष्टाचार करणार नाहीत कशावरून? शेवटी सगळ्यांचेच पाय मातीचे. अण्णांना ज्या प्रकारे महात्मा गांधी आणि रविंद्रनाथ टागोरांच्या लाईनमध्ये नेऊन बसवलं जातंय ते खरंच त्या लायकीचे आहेत का? त्यांनी ७३ व्या वर्षी उपोषण केलं ४-५ दिवस म्हणजे ते त्या लायकीचे होतात का? अण्णांना इतकं मोठं करण्याची आणि जनतेचा-लोकशाहीचा विजय झाल्याची हूल उठवण्याची काहीही गरज नाहीये.

  ReplyDelete
 11. आंदोलन खूप दिवस चालेल, उपोषण काही इतक्या लवकर मागे घेतलं जाणार नाही असा एकूण पार्श्वभूमीमुळे सामान्य माणसांचा समज झालेला दिसला, दोन्ही बाजूंचे आग्रह लक्षात घेता- आणि अचानक झाल्यासारख्या आंदोलनकर्त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या? (आयपीएलने वेग पकडण्याच्या बरोब्बर आधी?)

  ReplyDelete
 12. काँग्रेसचा डाव हे मत माझंही आहे... पण भ्रष्टाचाराविरुध्द आवाज उठवल्याच फायदा भाजप ला मिळू नये म्हणून...

  ReplyDelete
 13. प्रज्ञा शतपावलीवर स्वागत. विनायकराव आणि प्रज्ञा प्रतिक्रीयेबद्धल धन्यवाद. लोकांना हा डाव कसा समजत नाहीये ह्याचं आश्चर्यच आहे! सगळे त्या शेळ्या मेंढ्यांसारखे अण्णा अण्णा करत फिरताहेत.

  ReplyDelete
 14. kahi aaso je hot aahe chan aahe rajkarni lokan samjel tari lok roadwar utartil kahipan hou shakte

  ReplyDelete