Monday, 27 August 2012

शेवग्याच्या पानांची भाजी किंवा वरण!

साहित्य: शेवग्याची कोवळी/थोडी जून पाने. (प्रमाण आपल्या चवीनुसार), शिजवलेली तूरडाळ किंवा भिजवलेली मूग डाळ, चवी प्रमाणे हिरव्या मिरच्या, फोडणीचे साहित्य, मीठ चवी प्रमाणे, एक चमचा साखर, एक चमचा गोडा मसाला.


शेवग्याची पाने डहाळीत असलेली.
 शिजवलेली तुरीची डाळ
 कृती: शेवग्याची डहाळी झाडावरून काढावी किंवा विकत आणावी. त्याची पाने व्यवस्थीत सुटी करून घ्यावीत आणि स्वच्छ पाण्यात १-२ वेळा व्यवस्थीत धुवून घ्यावी.
व्यवस्थीत सुटी करून आणि धुवून घेतलेली शेवग्याची पाने

पानांच्या प्रमाणात १ ते १.५ वाटी तूरडाळ शिजवून घ्यावी. (मूग डाळ असेल तर भिजवून घ्यावी). तेलाची फोडणी करून त्यात आवश्यक तेवढ्या प्रमाणात मोहरी, हिंग, हळद टाकून हिरव्या मिरच्यांचे तुकडे, शिजवलेली तूर डाळ किंवा भिजवलेली मूग डाळ आणि शेवग्याची पाने घालावीत.
फोडणीत टाकलेली डाळ आणि शेवग्याची पाने

शेवग्याच्या पानांचे तूरडाळीतले वरण

चवी पुरते मीठ, साखर, गोडा मसाला टाकून मिश्रण छान हलवावे आणि झाकण लावून वाफवायला ठेवावे. ५-७ मिनीटांनी गॅस बंद करून शेवग्याच्या पानांची भाजी किंवा वरण खायला घ्यावे. डाळीचं प्रमाण जास्त असेल तर शेवग्याच्या पानांचं वरण तयार होईल आणि शेवग्याच्या पानांचं प्रमाण जास्त असेल तर भाजी होईल. हिरव्या मिरच्या आणि हिरवी पानं अशी जरी गल्लत होईल असे वाटले तरी हिरव्या मिरच्यांची चव फक्कड लागते. ही भाजी किंवा वरण भात, पोळी, भाकरी यांपैकी कशाही बरोबर खाता येते.

पौष्टिक मूल्य: शेवग्याच्या पानांत लोहाचे प्रमाण भरपूर असते. पानांना थोडा कडवटपणा असला तरी चव छान लागते.

Saturday, 11 August 2012

१ एप्रिल २००५: (भाग २) शिकलेले धडे!!

http://www.wolfson.cam.ac.uk/sites/default/files/imported/tour/bredon/bredon_house.png

१ एप्रिल २००५ - (भाग १) एक एप्रिल फुल!

एकूणच एखादी जबरदस्त वाईट घटना घडून गेल्यानंतर आता यापेक्षा अधिक वाईट काय होऊ शकतं? असा विचार मनात येतो. मी दुसर्‍याच दिवशी सावरले. कॉलेजमधील रूममधे परत आल्यावर आणि माझ्या जर्मन ब्लॉकमेट बरोबर पब मधे गप्पा मारल्यावर मला माझ्या रूममधे पुन्हा सिक्युअर वाटायला लागलं. माझ्या कॉलेजने मला खूप मदत केली. शनिवारी ताबडतोब मी माझं कॉलेज कार्ड, युनीव्हर्सीटी कार्ड याला अर्ज केले. मला कॉलेजने पुन्हा भारतात फिल्डवर्क साठी जायला पैसे उपल्ब्ध करून दिले. आता मला टेन्शन नव्हतं पण निर्माण झालेली परीस्थिती पटकन आपल्या कंट्रोलमधे आणण्यासाठी काय करता येईल याचा विचार करत होतेच. मला शक्य तितक्या लवकर भारतात परत जाऊन माझं फिल्डवर्क चालू करायचं होतं आणि डेटा कलेक्षन संपवून परत येऊन थिसीसचं काम चालू करायचं होतं.
इकडे भारतात माझ्या बहिणीच्या घरी कन्फ्युजन झालं. त्यांनी शेजार्‍यांकडून किल्ली घेऊन माझ्या कपाटात आणि इतर ठिकाणी पासपोर्ट-व्हिसाच्या कॉपीज शोधायला सुरूवात केली. पण ज्या फाईल मधे त्यागोष्टी ठेवलेल्या होत्या ती फाईल काही त्यांना सापडली नाही. वडिल गोव्याहून रात्रीच पुण्याला यायला निघाले होते. ते रविवारी पुण्यात पोहोचले. त्यांचा बालमित्र पूर्वी इंग्लंड मधे रहात असे. आता तो अमेरिकेत असतो. त्यांनी त्याच्याशी ई-मेल द्वारे संपर्क केला. नशिबाने त्याचा रिप्लयही लगेच आला आणि त्यात त्याने त्याचे साडूच लंडनला इंडियन एम्बसी मधे अ‍ॅम्बेसॅटर असल्याचे सांगीतले. ते नेमके युरोप टूर वर जाणार होते. त्यामुळे ते लंडन मधे आहेत की नाहीत याची खात्री फोन वरून करून घ्यायला सांगीतली. रविवा्री रात्री मला त्यांचा फोन नंबर मिळाला. सकाळी साडे सहाच्या सुमारास मी त्यांच्याकडे फोन लावला. नेमका त्यांच्या पत्नीने उचलला. मी माझी ओळख आणि काम सांगीतल्यावर त्यांनी मला सकाळी ८ वाजता लंडनला इंडियन एम्बसी मधे पोचायला सांगीतलं. तिथला टोकनचा काऊंटर आठ वाजता चालू होतो आणि १० वाजता टोकन देणं बंद करतात. त्यांनी मला टोकन घेऊन रांगेत उभं राहून फॉर्म भरायला सांगीतला. ते ऑफिसमधे ११ वाजेपर्यंत पोहोचतील असे सांगीतले.
Passport application office, London http://www.hobotraveler.com/129londonbridge02/0069.JPG
फोन ठेवल्यावर मी तडक रेल्वे स्टेशन गाठून लंडनच्या ट्रेनमधे बसले. फास्ट ट्रेन पकडल्याने ४५ मिनीटात लंडन. त्यावेळी पहिल्यांदाच मी एकटी लंडनला चालले होते. त्यांनी फोनवर दिलेल्या डायरेक्षन्स प्रमाणे इंडियन एम्बसीच्या ऑफीस मधे पावणे आठला पोहोचले. टोकन घेण्याच्या काऊंटरवर पावणे आठवाजताच भली मोठी रांग होती. कुणाचा पासपोर्ट हरवला तर कुणाला पासपोर्ट रिन्यु करायचा तर कुणाला व्हिसाला अर्ज करायचाय. टोकन घेतल्यावर साधारण ९.३० च्या सुमारास कार्यालय उघडलं आणि बाहेरची टोकन घेतलेल्यांची रांग आत लागली. माझा २५-३० वा नंबर असेल. त्या असलेल्या वेळेचा फायदा घेत मी फॉर्म भरायला सुरूवात केली. तिथे नविन पासपोर्ट, ड्युप्लीकेट पासपोर्ट आणि इमर्जन्सी ट्रॅव्हल डॉक्युमेंट साठी अर्ज असे तीन पर्याय होते. मी इमर्जन्सी ट्रॅव्हल साठी अर्ज करणार होते. अर्जात विविध कागदपत्रे मागीतली होती. भारतीय नागरिकत्त्वाचा पुरावा (ड्रायव्हिंग लायसन्स, व्होटर्स आय डी, पॅन कार्ड, पासपोर्ट) माझ्याकडे यातील कोणतीही गोष्ट नव्हती. काऊंटरवर सांगीतलं की माझ्याकडे फक्त पासपोर्ट होता तो चो्रीला गेलाय. मी सांगतेय ते समजायला त्या काऊंटर वरच्या माणसाला १० मिनीटं लागली. (तरी संवाद हिंदीत चालू होता) मग त्याने मला अजुन एक छोटा फॉर्म दिला आणि सांगीतलं की यात त तुम्हाला ओळखणार्‍या, इंग्लंड मधे लॉंगटर्म व्हिसावर आलेल्या तीन भारतीय व्यक्तींची नावे, पत्ते, फोन नं, व्हिसा नंबर, पासपोर्ट नंबर लिहा आणि त्यांच्या सह्या आणा. सोबत त्यांच्या पासपोर्टच्या कॉपीज जोडा. झालं मी तर कोणालाच ओळखत नव्हते. बाबांच्या मित्राचा मुलगा लंडनच्या एका सबर्ब मधे रहायचा म्हणजे तो आणि त्याची बायको हे दोघंच. बरं एकाच घरातील लोक चालतील की नाही माहीती नव्हते. बरं हे सगळं एका  दिवसात होऊन मला अ‍ॅप्लीकेशन सबमीट करणं शक्यच नव्हतं. वेळ माझ्यासाठी प्रचंड मूल्यवान होता.
India House, London http://mw2.google.com/mw-panoramio/photos/medium/45741418.jpg
हे सगळं होईपर्यंत सकाळचे साडे अकरा वाजले होते. मग मनात विचार आला की आता शेवटचा पर्याय म्हणजे त्या अ‍ॅम्बॅसॅटरना जाऊन भेटायचं. मी त्यांच्या नावाची चौकशी केली. सगळ्यांनी मला इंडिया हाऊस कडे जायचा रस्ता सांगीतला. मी इंडिया हाऊसच्या दारात पोहोचले. तिथे प्रचंड सिक्युरीटी. सुरूवातीचे पंधरा मिनीटे सिक्युरीटी वाल्याने माझ्या चौकशीला प्रतिसादच दिला नाही. फायनली २० मिनीटानंतरही मी जात नाही हे पाहील्यावर त्याने छोटी खिडकी उघडुन मला विचारले काय काम आहे? मी ताबडतोब त्याला मला ज्यांना भेटायचंय त्यांचं नाव सांगीतलं. त्याने पुन्हा खिडकी बंद करून घेतली. १० मिनीटे पुन्हा शांतता. मग दहा मिनीटाने त्याने मला आत घेतलं. माझ्या समोर वरती फोन लावला. पुन्हा कोणाशीतरी बोलल्यावर तो म्हणाला, "बसा, तुम्हाला एक माणूस न्यायला येईल." अर्ध्या तासाने का होईना माझा इंडिया हाऊस मधे शिरकाव झाला यात समाधान मानत मी सोफ्यावर बसले. सगळीकडे भारतीय सांस्कृतीक वस्तूंचे प्रदर्शन मांडलेले दिसत होते. अतिशय आलीशान असा तो भाग होता. १५-२० मिनीटांनी एक व्यक्ती मला अ‍ॅम्बॅसॅटरच्या ऑफीसमधे घेऊन जायला आली. आम्ही दोघेही काही अंतर जीना आणि काही अंतर लिफ्टने गेलो. मग १-२ खोल्यांमधून जाऊन आम्ही अ‍ॅम्बॅसॅटरच्या केबीनमधे पोहोचलो. सगळं अगदी भूलभुलैया सारखंच भासत होतं. तिथे केबीन मधे जाण्याआधी दोन वेळा आणि खाली दोन वेळा माझं थरो चेकींग झालं हे वेगळं सांगायला नकोच. ते मूळचे पुण्याचेच सदाशिव पेठेत राहणारे. त्यांना सगळी हकीकत सांगीतली. सगळं ऐकल्यानंतर ते लगेच म्हणाले तू जे सांगीतलंस त्यावरून हे स्पष्टच होतंय की पर्सची चोरी पासपोर्ट साठी झालेली आहे. अर्ज केला तरी इमर्जन्सी ट्रॅव्हल डॉक्युमेंट मिळायला १०-१२ दिवस लागतील असं त्यांनी सांगीतलं. मी म्हणाले पण मला तर तेवढा वेळ नाही. मला ३-४ दिवसात (म्हणजे बुधवार-गुरूवारी) ते मिळालं पाहीजे. म्हणजे शुक्रवारी मला भारतात परत जाता येईल. ते म्हणाले अशक्यच आहे तरी आपण विचारून बघु. मग त्यांनी पुन्हा पासपोर्ट डिव्हीजनला फोन लावला. तिथे नागपूरचे एक कुलकर्णी म्हणून होते. त्यांच्याशी ते काहीतरी बोलले आणि मग मला अ‍ॅप्लीकेशन सबमीट करायला सांगीतलं. ते तीन लोकांचे पत्ते, नावं इ. गोष्टींसाठी तिथल्याच तीघांचा उपयोग करून घेतला. फक्त त्यांनी मला पुढच्यावेळी येतना फोटो आय डी असलेलं कॉलेजचं, डिपार्टमेंटचं सर्टीफिकीट आणायला सांगीतलं. बुधवारी दुपारपर्यंत इमर्जन्सी ट्रॅव्हल डॉक्युमेंट मिळेल असा प्रयत्न करतो. तुम्ही शुक्रवारचं तिकीट काढा.
अ‍ॅप्लीकेशन सबमीट करून संध्याकाळी ६ वाजता मी केंब्रीजला परत आले. माझ्या मनावरचं ओझं निम्म्याने कमी झालं. दुसर्‍याच दिवशी कॉलेजमधून मला शुक्रवरचं तिकीट बुक करून दिलं. कॉलेज कार्ड, युनीव्हर्सीटी कार्ड, लायब्ररी कार्ड सगळ्या गोष्टी (ड्युप्लीकेट) मिळाल्या. जोडीला डिपार्टमेंट मधून माझा फोटो असलेलं, मी तिथे काय करते आहे आणि भारतात कशासाठी जाते आहे मला एक महिन्यात परत येणं कसं आवश्यक आहे इ. मजकूर असलेलं पत्रं लिहून घेतलं. तशाच मजकूराचं माझा फोटो असलेलं पत्रं कॉलेजकडूनही घेतलं. मंगळवारी माझ्याकडे इमर्जन्सी ट्रॅव्हल डॉक्युमेंट शिवाय इतर सर्व गोष्टी होत्या. बुधवारी ते हातात आलं की मी भारतात जायला तयार असणार होते. मनावरचं ओझं ७५% कमी झालं. बुधवारी मी आणि माझी एक मैत्रिण ठरल्याप्रमाणे इंडिया हाऊस मधे गेलो. ह्यावेळी आम्हाला तिथे लगेचच प्रवेश मिळाला. त्यांना हवी असलेली माझा फोटो आय डी असलेली कॉलेज आणि डिपार्टमेंटची पत्रे, माझ्या युनीव्हर्सीटी कार्दची झेरॉक्स इ. दिल्यावर चक्र वेगात फिरली. चार वाजता माझ्या हातात ते डॉक्युमेंट होतं. ते डॉक्युमेंट मला त्यांच्या केबीन मधेच मिळालं. इथपर्यंत गोष्टी सुरळीत झाल्या. पण भारतात परत गेल्यावर मला पहिले डयुप्लीकेट पासपोर्ट साठी इमर्जन्सी मधे अर्ज करायचा होता आणि पासपोर्ट हातात आल्यावर ब्रिटीश व्हिसा. माझी सत्वपरीक्षा भारतात चालू होणार होती. त्यांनी मला हे सांगीतले की मुंबई एअर पोर्टवर कस्टम्स वाले हे इमर्जन्सी ट्रॅव्हल डॉक्युमेंट तुझ्याकडून काढून घेतील. त्यांनी ते पासपोर्ट ऑफिसला पाठवणं अपेक्षीत असतं. त डॉक्युमेंट कस्टम्स मधून पुणे पासपोर्ट ऑफिसमधे ताबडतोब पाठवून देण्याची विनंती कर/खात्री करून घे. त एकदा झालं की मग तुझं काम पटापट होईल. सल्ला खूपच मोलाचा होता पण ते कामही तितकं सोप्पं नव्हतं. पण मी देखिल पूर्ण तयारीनिशी निघाले होते.
http://2.bp.blogspot.com/-dMZS8AkG1HA/TzxhVtHZTGI/AAAAAAAAAzY/vZw1cIvRMt4/s1600/Mumbai-international-airport.jpg
मुंबई विमानतळावर उतरल्यावर कस्टम्स वाल्यांनी माझं ते डॉक्युमेंट काढून घेतलं. मी लगेचच माझी ओळख करून देऊन त्यांच्या ऑफिसरच्या केबिनमधे जाण्याची परवानगी मागीतली/विनंती केली. त्या ऑफिसरने मला अर्ज द्यायला सांगीतला. ताबडतोब अर्ज लिहीला आणि आवश्यक ती सगळी कागदपत्रे जोडली. त्यांना इतकं देखिल म्हणाले की तुम्ही ते कुरीअरने पाठवा कुरीअरचे पैसे मी भरते. पण त्यांनी ऐकलं नाही आणि पोस्टात पाठवून दिलं. एप्रिल महिना त्यामुळे पहिल्या २ आठवड्यात गुढी पाडवा, आंबेडकर जयंती इ. अशा चार सुट्ट्या आलेल्या होत्या. पुण्यात पोहोचल्यावर सोमवारी पासपोर्ट ऑफिस गाठले. खरं तर मी तिथे कुणालाच ओळखत नव्हते त्यामुळे गोष्टी सोप्या नव्हत्या. कसा कुणास ठाऊक मला तिथे देखिल आतमधे प्रवेश मिळाला. तिथल्या ऑफिसरला थोडक्यात घडलेला प्रकार सांगीतला आणि मला इमर्जन्सी मधे पासपोर्टला अर्ज करायचाय हे देखिल सांगीतलं. माझं फिल्ड वर्कही चालू आहे त्यामुळे मला तिथेही जायचं असल्याने सारखं यायला जमायचं नाही हे देखिल सांगीतलं. ते ऑफिसर म्हणाले की जो पर्यंत ते इमर्जन्सी ट्रॅव्हल डॉक्युमेंट आमच्याकडे पोहोचत नाही तोपर्यंत आम्ही तुमचा अर्ज प्रोसेस करू शकत नाही. नेमक्या सुट्ट्यांमुळे ते पोहोचलेलं नव्हतं. मग त्याला काय वाटलं कोण जाणे त्याने मला स्वत:चा मोबाईल नंबर दिला आणि फोन वरून डॉक्युमेंट पोहोचलं की नाही याची चौकशी करायला सांगीतली.
http://static.indianexpress.com/m-images/Tue%20Dec%2020%202011,%2002:59%20hrs/M_Id_255795_Passport_Seva_Kendras.jpg
एकीकडे माझं फिल्ड वर्क चालू होतं. डेट्स चुकल्या नव्हत्या कारण मी सुरूवातीलाच एक आठवडा बफर ठेवलेला होता. इमर्जन्सी ट्रॅव्हल डॉक्युमेंट आठ-दहा दिवसांनी तिथे पोहोचलं. शब्द दिल्याप्रमाणे त्याने दोन दिवसांत अर्ज प्रोसेस केला फक्त मला सांगीतलं की पोलीस कमीशनरांकडून व्हेरीफिकेशनचं सर्टीफिकीट आणा. नेमके माझ्या आत्ते बहिणीचे मिस्टर पोलीस कमीशनरांचे लिगल अ‍ॅडव्हायझर होते. त्यांच्या बरोबर जाऊन त्यांचं व्हेरीफिकेशन मिळालं आणि तीन दिवसांनी पासपोर्ट कुरीअरने माझ्या हातात. पासपोर्ट हातात आल्या बरोबर मी ब्रिटीश व्हिसा साठी अर्ज केला. तीन दिवसांत व्हिसा देखिल मिळाला. आणि माझ्या परतीच्या प्रवासाच्या एक आठवडा आधी माझ्या हातात पासपोर्ट, व्हिसा आणि माझं फिल्ड वर्कचं काम असं सगळं तयार होतं. या सगळ्या काळात मला किती तत्परतेने सगळे डिसीजन्स घ्यावे लागले आणि तया तीन आठवड्यात माझ्या डोळ्याला डोळा नव्हता. सगळं हातात आल्यावर मी निवांत झोपले. यात माझ्या एकूणच कम्युनिकेशन स्किल्स, डिसीजन मेकींग अ‍ॅबीलीटी, गोष्टी फेस करण्याची ताकद, माझा पेशन्स इ. सगळ्याच गोष्टींचा कस लागला होता. त्यातून नशिबाने आणि ज्या सगळ्यांनी मला सहकार्य केलं त्यासगळ्यांमुळे एकाही पैशाची लाच न देता कायदेशीरपणे सगळ्या गोष्टी पूर्ण करून झालेल्या प्रसंगातून तावून सुलाखून बाहेर पडले. ह्या सगळ्या घटनेतून आणि त निस्तरण्याच्या अनुभवातून मी आयुष्यातील फार मोठे धडे शिकले. १) प्रवासाला जाताना हॅन्ड बॅग पेक्षा गळ्यात तिरकी अडकवता येईल किंवा खांद्यावर टाकता येईल अशी एक सॅकच घ्यावी जेणेकरून दोन्ही हात मोकळे राहतील. २) पैसे विभागून ठेवावेत. ३) आपल्याकडे असलेल्या सामानाची यादी करून त्याची एक-एक कॉपी तसेच पासपोर्ट, व्हिसाची एक-एक कॉपी प्रत्येक बॅग मधे, आणि घरी पटकन सापडेल अशा ठीकाणी ठेवावी. ४) ट्रॅव्हल इन्शुरन्स कायम काढावा ५) प्रवास करताना कोणताही प्रसंग आला तरी तिर्‍हाईत व्यक्तीला उदा: टॅक्सी ड्रायव्हर आपले प्लॅन्स आजीबात सांगू नयेत. ६) कोणताही प्रसंग उद्भवला तरी डोकं शांत ठेवून परिस्थीती कशी हाताळता येईल याचा वस्तुनिष्ठपणे विचार करावा. ७) आपल्या कम्युनिकेशन मधे पारदर्शीपणा ठेवावा आणि जे काही सत्य असेल ते सांगून टाकावे. घाबरून जाऊ नये. ८) टेन्शन घेतल्याने प्रश्न सुटत नसून अधिक गुंतागुंतीचे होत जातात.
या प्रसंगामुळे आणि तो हाताळताना आलेल्या अनुभवांनी मला भरपूर समृद्ध केलं आणि माझा कोणत्याही परिस्थीतीला सामोरे जाण्याचा आत्मविश्वास वाढवला. माझी एकूणच इंटर्नॅशनल प्रवासाची भिती पूर्णपणे गेली. फरक इतका पडला की माझा थिसीस सबमीट केल्यावर आमची (मी व बाबा) २ आठवड्यांची स्वित्झर्लंड, पॅरीस, लंडन ही ट्रिप हॉटेल बुकींग, विमान प्रवास, ट्रेन बुकींग, तिथले पासेस इ. सगळं प्लॅनींग मी केलं. अत्तापर्यंत सगळी शासकीय कामे (पासपोर्ट, व्हिसा, नवर्‍याचे फॉरीन रजीस्ट्रेशन, पी आय ओ कार्ड, पॅन कार्ड) ही मी स्वत: केलेली आहेत कोणत्याही एजंट शिवाय. या सगळ्या प्रोसेस मधे आपल्याला थोडा वेळ खर्च करायला लागतो पण एकदाच. कारण आपण ते करताना जी माहिती घेतलेली असते ती पुढच्या कामांसाठी उपयोगी पडतेच.