Friday 22 June 2012

सडबरी सायन्स सेंटर भेट - भाग १

नाकतोडा
सडबरी सायन्स सेंटर हे कॅनडातील (उत्तर अमेरिकेतील) विशेष अशा नैसर्गिक घटना, प्राणी, पक्षी तसेच हवामान यांची शैक्षणिक दृष्ट्या शास्त्रीय माहीती देणारे केंद्र आहे.  या सायन्स सेंटर मधे प्लॅनेटोरीयम, ४डी फिल्म (वाईल्ड फायर्स), बॉडी शो (मानवी शरीरातील विविध अवयवांचे प्रदर्शन व माहीती), टोरनॅडो चक्रीवादळाचा माहीतीपट, फुलपाखरांचा विभाग, विविध नाकतोडे-झुरळं यांचा विभाग, कॅनडातील विविध प्राणी-पक्षी यांचं संग्रहालय, लहान मुलांसाठी दैनंदिन घटनांमागील शास्त्र उलगडून दाखवणारे वैज्ञानीक प्रयोग आणि मोठ्या तळ्याच्या काठावर असलेला बीच अशी बीच आकर्षणे आहेत. पहिल्या भागात सडबरी सायन्स सेंटर मधील प्राणी-पक्षी विभाग, कीटक अणि पुलपाखरांचा विभाग यांची माहीती लिहीते आहे.

रॅटल स्नेक
सडबरी सायन्स सेंटर मधे जे प्राणी ठेवलेले आहेत त्यांना कोणत्या ना कोणत्या नैसर्गिक संकटातून वाचवलेलं आहे किंवा जे प्राणी अनाथ झाले/होते अशांना वाचवलेलं आहे आणि त्यांची अतिशय छान काळजी घेतली जाते. तिथे फिरत असताना एका काचेच्या भागात आम्हाला विशिष्ट रंगाचा एक बेडूक एका झुडुपाच्या फांदीवर जाऊन बसलेला दिसला आणि तसाच अजुन एक बेडूक खालच्या बाजूला पाठीवर पडलेला दिसला. पाठीवर पडलेल्या बेडकाचे चारही पाय आणि पोट विशिष्ट पद्धतीने हलत होते. आम्हाला शंका आली की त्या बेडकाला काहीतरी झालंय म्हणून आम्ही तिथल्या व्हॉलेंटीअरला बोलावलं. ती ताबडतोब आली आणि अतिशय प्रेमाने तिने त्या बेडकाला सरळ केलं. ती म्हणाली की ही बेडकी खूप म्हातारी झाली आहे आणि मधून मधून ती अशी झाडावरून खाली पडत असते. मग आमची वाट बघते तिला सरळ करण्यासाठी. आमचं लक्षं वेधून घेण्यासाठी मग ती अशी हातपाय हलवत असते. मला एकूणच ते सगळं फारच गोंडस वाटलं. बेडकासारख्या प्राण्याची इतकी छान काळजी घेण्यासाठी त्याप्राण्याबद्धल प्रेम असणं अत्यंत आवश्यक आहे. एका मोठ्या नाकतोड्याची माहीती दे्ताना देखील हेच प्रेम आम्हाला पहायला मिळालं.  विविध प्रकारची मोठमोठाली झुरळं देखिल पहायला मिळाली.
रोझी स्कंक
 रॅटल स्नेक हा विशिष्ट प्रकारचा (शेपटीच्या सहाय्याने आवाज करणारा) विषारी साप उत्तर अमेरिकेत सापडतो. त्याच्या अंगावर लालसर करडे असे पट्टे असतात. आपल्याकडे हा साप आढळत नाही.  या प्राण्यांना-पक्षांना-कीटकांना त्यांच्या नैसर्गिक वातावरणाशी साधर्म्य असलेलं वातावरण, तापमान उपलब्ध करून दिलं जातं. कॅनडात स्कंक नावाचा एक प्राणी असतो. त्याच्या हालचाली मुंगुसा सारख्या दिसतात पण तो प्राणी अगदी कु्त्र्या-माजरांसारखा भावना व्यक्त करतो. स्वसंरक्षणासाठी त्याच्याकडे निसर्गाने एक देणगी दिलेली आहे. 
रोझी स्कंक
त्याला एका विशिष्ट प्रकारचा गंध फवारण्याची ताकद दिलेली आहे. तो गंध इतका वाईट असतो की आपल्याला तो सहन होत नाही. सायन्स सेंटर मधे रोझी नावाच्या एका स्कंक ला आम्ही भेटलो. तिची संपूर्ण काळजी सायन्स सेंटर मधे घेतली जात असल्याने तिच्या दुर्गंध फवारता येणार्‍या ग्लॅंड्स काढलेल्या होत्या. रोझी इतकी छान पाळीव कुत्र्याप्रमाणे माणसांत मिसळलेली होती. 
बीव्हर लॉज मधे पाणी पीताना बीव्हर

बीव्हर हा कॅनडाचा राष्ट्रीय प्राणी आहे. बीव्हर हा पाण्यात बीव्हर डॅम (बंधारा) तयार करतो आणि त्या बीव्हर डॅम मधे बीव्हर लॉज (घर) बांधून राहतो. बीव्हर डॅम हा झाडांच्या ओंडक्यांपासून पाणी अडवून तयार केलेला असतो. तर बीव्हर लॉज हा लाकडाचे ओंडके (झाडांच्या फांद्या, त्यांचे खोड) आणि चिखल यांपासून बनवलेला असतो. बीव्हर लॉज मधे बीव्हर आपल्या कुटुंबासमवेत रहात असतो. 
बीव्हर लॉज
हा प्राणी उंदीर, खार यांच्या सारखा र्‍होडन प्रजातीतील आहे. त्यामुळे त्याला सारखं काहीतरी चावायला लागतं. त्याचं मुख्य खाद्य म्हणजे लाकूड आणि झाडं. बीव्हरच्या अंगावर बरेच केस असतात आणि त्याचे केस/त्वचा खूपच तेलकट असते. आपण चुकून हात लावला तर आपला हात तेलकट होतो. बीव्हरला पुढचे दोन पाय अगदी कुत्र्या-मांजरांप्रमाणे मोठे असतात की ज्यामुळे तो झाडाची खोडं, फांद्या तोडू शकतो. बीव्हरला मागे पायांऐवजी वल्ह्यासारखा पसरट असा भाग असतो की ज्याने तो पाण्यात ताकदीने पोहू शकतो.
बीव्हर लॉज मधून बीव्हर डॅममधे जाण्याचा मार्ग 

कोणत्या प्राण्याने त्याच्या बीव्हर डॅममधे आक्रमण केलं तर त्या प्राण्याला घाबरवण्यासाठीही तो या भागाचा उपयोग करतो. बीव्हर हा प्राणी अत्यंत हुशार आणि कॅनडातील हवामानाशी जुळवुन घेत तिथे जगू शकलेला प्राणी आहे. त्याची शिकार करणं खूप अवघड असतं कारण तो सहजा सहजी सापडत नाही. हिवाळ्यात कॅनडातील सर्व तळी गोठलेल्या अवस्थेत असतात त्यावेळी हा आपल्या बीव्हर लॉज मधे झोपून असतो आणि भूक लागली तर लॉजच्या खालच्या बाजूला बीव्हर डॅम मधे जाण्याची सोय असते तिथून पाण्यात (बर्फाच्या थराखालील) जाऊन लाकडाचे ओंडके खातो.
चिपमंक
हिवाळ्यात त्याचा अधिक काळ झोपेतच जातो. सडबरी सायन्स सेंटरमधे एक कृत्रीम बीव्हर डॅम आणि बीव्हर लॉज तयार केलेला दिसला. त्यात असलेला बीव्हर हा लहान असताना अनाथ झाल्यामुळे जंगलातून या सेंटर मधे आणलेला आहे. आम्ही जेव्हा त्याच्या बीव्हर लॉज पाशी पोहोचलो त्यावेळी नेमका तो उताणा पडून झोपलेला होता. झोपेतही त्याची चावण्याची हालचाल चालूच होती. तोंड उघडं असल्याने आणि चावण्याच्या हालचालीमुळे ते खूपच मजेशीर दिसत होतं.
पॉर्क्युपाईन
 असं वाटत होतं की तो काही स्वप्न पहात असावा आणि स्वप्नातील घटनांना प्रतिसाद म्हणून हालचाल करत असावा. थोड्यावेळाने उठल्यावर त्याने चक्क बीव्हर लॉज मधील पाण्यात दात घासून चूळ भरली आणि बराच वेळ पाणी पीत होता. हे सगळं पाहून आम्हाला फारच गंमत वाटली. मूस, रेनडीअर, पॉर्क्युपाईन, रकून, रेड फॉक्स, स्नोई अऊल, अपॉटेड अऊल, पोलार बेअर, ग्रीझली बेअर, चिप मंक, आर्क्टीक फॉक्स, आर्क्टीक हेअर, बेलुगा व्हेल, सी ऑटर इ. अनेक प्राणी आढळतात. त्यातले पॉर्क्युपाईन, स्नोई अऊल, स्पॉटेड अऊल हे देखील सायन्स सेंटर मधे होते. रकू्न आणि रेड फॉक्स हे प्राणी कार मधून जाताना रस्ता क्रॉस करत असलेले पाहण्यात आले. तर चिपमंक आमच्या घराच्या आजूबाजूलाच रहात होते.
बेलुगा व्हेलचा सांगाडा
चिपमंक हा प्राणी आपल्याकडच्या छोट्या खारी सारखा दिसतो आणि त्याच्या अंगावरही तशाच रेघा असतात. कॅनेडीअन खार ही गडद करड्या रंगाची, राखाडी रंगाची किंवा काळ्या रंगाची सुद्धा असते. टोरंटो मधे बागांमधे फिरताना तसेच इतर ठीकाणीही झाडीत खारी दिसल्या. मूस, रेनडीअर, पोलार बेअर, ग्रीझली बेअर वगैरे प्राणी सायन्स सेंटर मधे नव्हते. कदाचित टोरंटो मधील झू मधे ते पहायला मिळतील. बेलुगा व्हेलचा सांगाडा मात्र सायन्स सेंटर मधे ठेवलेला आढळला. हा व्हेल जगातील तीसरा मोठ्या आकाराचा आहे. दोन वर्षांपूर्वीच्या कॅनडा भेटीत व्हॅकुव्हरला युनीव्हर्सीटी ऑफ ब्रिटीश कोलंबीया मधील समुद्र कीनार्‍यावर एक सीलचे पिल्लू पाहण्यात आले होते.
सीलचे पिल्लू
विविध रंगांच्या आणि डीझाईनच्या फुलपाखरांनी भरलेला एक पूर्ण विभागच या सायन्स सेंटर मधे आहे. त्या विभागातील तापमान नियंत्रित केलेलं असतं. ती फुलपाखरं पाहून मला अरूणाचल प्रदेशात ताफ्रागांवला माझ्या क्वार्टरच्या हॉलमधे अनुभवलेला प्रसंग आठवला. एक दिवस दुपारी चारच्या सुमारास मी हॉलमधे चहा पीत बसले होते. आणि अचानक दारातून आणि खिडक्यांमधून विविध रंगांची-डीझाईन्स असलेली आणि आकारांची फुलपाखरं हॉल मधे आली. 
 बघता बघता सगळा हॉल, त्याच्या भिंती या फुलपाखरांनी भरून गेल्या. काही माझ्या अंगावर केसांवर बसली. मला एकदम मी डीझनीच्या फिल्म मधील एक पात्रं बनल्याचा भास झाला.  कारण ही असली दृष्य फक्त अशा फिल्म्स मधेच पहायला मिळतात. तो सीझन फुलपाखरांचा होता आणि नेमकी त्या दिवशी कॅटरपीलर (सुरवंट) चं फुलपाखरू होण्याचा दिवस होता. ते इतक्या प्रचंड प्रमाणात होत असतं की ती फुलपाखरं जागा मिळेल तिकडे जातात. तशीच ती माझ्या क्वार्टरच्या हॉल मधे येऊन पोहोचली होती. हा पुलपाखरांचा विभाग बघुन माझ्या त्या आठवणीला उजाळा मिळाला. एकूणच कॅनडा हा देश विविध नैसर्गिक संपत्तीने नटलेला देश आहे. त्यामुळे इथले प्राणी-पक्षी, त्यांची जीवनशैली, शारिेरीक ठेवण इत्यादींचा अभ्यास ही प्राणीशास्त्रज्ञ लोकांसाठी एक मोठी पर्वणीच आहे.

Saturday 16 June 2012

इनुकशुक!!

कॅनडातील मूळ रहिवासी रेड-इंडियन लोक. त्यांच्यातही उपजाती-जमाती आहेत की ज्या संपूर्ण कॅनडात अजुनही अत्यंत आतल्या भागात रहातात. त्यातीलच लोक म्हणजे इनु जमात. इनुकशुक म्हणजे इनु लोकांनी प्रवासात निघालेल्या लोकांना दिशा दर्शविण्यासाठी विविध आकाराच्या आणि रंगांच्या दगडांनी तयार केलेली मानवाकृती.

कॅनडात मुख्यत: सूचीपर्णी वृक्षांची जंगले, मैलोंनमैल सपाट असा गवताळ प्रदेश, रॉकी पर्वत रांगा, टुंड्रा प्रदेश आणि उत्तर ध्रूवीय प्रदेश असे भूगोलाच्या पुस्तकात आपण वाचलेले विविध प्रदेश येतात. तिथलं हवामानही खूपच तीव्र प्रकारचं असतं. हिवाळ्यात ५-६ फूट किंवा त्याहूनही अधिक बर्फ, उन्हाळ्यात प्रचंड मोठी टोरनॅडो चक्री वादळे, त्याच बरोबर येणारा पाऊस, त्याचबरोबर प्रचंड उष्ण तापमान. पृथ्वीचा आस कलता असल्याने इथे उन्हाळ्यात सूर्यकिरण खूपच सरळ पडतात. त्यामुळे अगदी ३० अंश तापमान सुद्धा उष्माघाताला कारणीभूत होऊ शकते.

अतिशय एक्स्ट्रीम हवामानामुळे अतिशय दुर्गम अशा उत्तर कॅनडाच्या भागात जर एखादी व्यक्ती किंवा गट जरी अडकला तरी त्या व्यक्तीला/गटाला मानवी मदत मिळावी आणि आपापल्या जमातींचं संरक्षण करता यावं या हेतूने या मानवाकृती सुरूवातीला इनु लोकांनी त्या ठीकठीकाणी बनवायला सुरूवात केली. वेगवेगळ्या इनुकशुकचे वेगवेगळे अर्थ आहेत. काही असे म्हणतात की एखाद्या मासेमारणार्‍या इनु माणसाने मासेमारी करण्याची चांगली जागा किंवा मासे व अन्न साठवुन ठेवल्याच्या खुणेसाठी इनुकशुक बांधायला सुरूवात केली. तर काही जण असंही म्हणतात की इनु कुटुंबाचं घर इथे जवळच आहे याची खूण म्हणून इनुकशुक बांधण्यात आले.

कारण काहीही असो पण आज कॅनडात सगळीकडे हे इनुकशुक आपल्याला बघायला मिळतात. दगडांची मानवी आकृती हात पसरून उभी असल्याच्या दृश्यामुळे इनुकशुक हा "कॅनडात आपलं स्वागत" असा संदेश देण्यासाठीही वापरला जाऊ लागला. इनुकशुक बनवण्यासाठी विविध रंगांचे आणि पसरट आयताकृती/गोल/लंबगोलीय असे दगड वापरतात. स्थानिक दगड घेतल्याने एक्स्ट्रीम हवामानात ते तरलेले असतात तसेच ते शक्यतो उंचावर बांधतात म्हणजे दूरूनही आणि कोणत्याही सीझन मधे काहीही नुक्सान न होता तग धरून रहाते.

भारतातील काही ट्रायबल भागांमधे (अतिशय इंटीरीअर भागांत) अशाप्रकारच्या दगडांच्या मानवी आकृती खूण म्हणून वापरलेलं पाहील्याचं आठवतंय. शेवटी माणसांच्या सर्व्हायवायवलच्या मूळ संकल्पना भौगोलिक भाग बदलला तरी बदलत नसतात. म्हणजे माणूस हा सगळीकडे नैसर्गिक दृष्ट्या सारखाच आहे. आपणच त्याला धर्म, रेस याची कुंपणं घालतो.

Thursday 14 June 2012

आयुष्याचा जोडीदार निवडणे: भारतीय आणि पाश्चिमात्य पद्धतीं मधील फरक!!भारतीय आणि पाश्चात्य पद्धतींमधील फरक या विषयावर भरपूर चर्चा-चर्वीचराण झालेले आहे. तरी प्रत्येकाचा अनुभव वेगळा आणि त्यानुसार विविध मुद्द्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही वेगळा असतो. म्हणूनच माझं लग्नं झाल्यापासून भारतीय आणि पाश्चिमात्य पद्धती, चालीरीती यांचा अतिशय जवळून अनुभव घेतल्याने विविध विषयांवर मन आपोआपच तुलना करत रहातं. दोघांमधील कोणत्या गोष्टी चांगल्या-सोयीच्या आणि कोणत्या गोष्टी गैरसोयीच्या याचा मनोमन उहापोह चालू असतो. लग्न जमवणे हा सगळीकडेच अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. दोन्ही देशांतील सांस्कृतिक फरकाला इथुनच अधिक सुरूवात होते. 

भारतीय पद्धतीत अजुनही अधिकांश विवाह हे ठरवुन-पाहून कांदेपोहे खाऊन होतात. तरी सध्या प्रेमविवाह, परिचयोत्तर विवाह यांचे प्रमाणही आधीच्या तुलनेत आढळते. क्वचित कुठेतरी लिव्ह-इन-रिलेशनचे झेंडे पहायला मिळतात. म्हणजे भारतीय पद्धतीत सर्वप्रकारच्या व्यक्तींना आयुष्याचा जोडीदार मिळवून देण्याची सोय आहे. आता काहीजण असतात की जे स्वखुशीने वेगळा मार्ग स्विकारतात....म्हणजे अविवाहीत राहण्याचा निर्णय घेतात. भारतीय पद्धतीमधे अशी खूप कमी लोकं सापडतील की इतक्या सार्‍या पद्धती उपल्ब्ध असूनही त्यांना आयुष्याचा जोडीदार मिळत नाही. सर्वसाधारण भारतीय जनमानसात अजुनही कुटुंब पद्धती, त्याअनुषंगाने येणार्‍या जबाबदार्‍या यांचं महत्त्व कुठेतरी आहे. कदाचित काही केसेस मधे समाजाच्या भितीने किंवा एकटं राहण्याच्या भितीने, महिलांच्या बाबतीत मुख्यत: नवर्‍यावर सर्वदृष्टिंनी अवलंबून असणे, मुलांकडे पाहून लग्नं निभावणे या आणि अशा अनेक कारणांनी लोकांचे विवाह टिकून राहण्याचं प्रमाण अजुनही अधिक आहे. मग भले जोडीदाराचा कोंडमारा होत असला तरी निमूटपणे किंवा तणतणत तो स्विकारला जातो.

पाश्चात्य पद्धतीमधे ठरवून विवाह करणे हे अनेक वर्षांपूर्वी होतं पण आता त्याचा कुठेही मागमूस नाही. एकतर प्रेम विवाह, लिव्ह-इन-रिलेशन किंवा एकटं रहाणं हे तीनच पर्याय जोडीदार निवडीच्या बाबतीत उपल्ब्ध असलेले दिसतात. तसं अधिकाधिक घटस्फोट, पुर्नविवाह, कुमारी माता किंवा सिंगल पेरेंट अशा केसेस अधिकाधिक दिसतात. प्रत्येक पद्धतीचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेतच. पाश्चात्य पद्धतीमधे कुठेही जोर-जबरदस्ती नाही. सगळं अगदी तुमच्या मनाला जे पटेल तेच करणं आणि जोडीदार नाही पटला तर अतिशय सहजगत्या तो बदलता येणे हा एक फार मोठा फायदा या पद्धतीत आहे. पण जर एखादी व्यक्ती आकर्षक नसेल, बुजरी असेल तर त्या व्यक्तीला जोडीदार मिळणे केवळ अशक्य असते. अशांचे प्रमाणही पाश्चिमात्य देशांत भरपूर आहे. एकीकडे जोडीदार बदलणं खूपच सहजगत्या स्विकारलं जातं की त्यामुळे लोकांमधे पेशन्स, एखादं नातं टिकवण्यासाठी आवश्यक गोष्टी प्रसंगी तडजोड, जोडीदाराला समजून घेण्याची प्रक्रिया, त्यादृष्टिने स्वत:मधील समज वाढवणं ह्या सगळ्या गोष्टींना काट मिळते. लोक इतके पटापट घटस्फोट घ्यायला लागले म्हणून मग पाश्चात्य देशांत कायद्यानेच घटस्फोटाची प्रक्रिया किचकट करून ठेवली. घटस्फोट झाल्यावर द्याव्या लागणार्‍या पोटगीचं/फाईनचं प्रमाण अगदी ५०% संपत्ती इतकं सुद्धा असू शकतं, म्हणूनच की काय आता अधिकाधिक लोक लिव्ह-इन-रिलेशन कडे वळतात. म्हणजे घटस्फोटाचा प्रश्न नाही आणि पोटगीचाही नाही.

यामुळे कुटुंब व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. कुटुंबाशिवाय वाढलेल्या मुला-मुलींमधे असुरक्षितता, डीप्रेशन, अशा गोष्टींचं प्रमाण अधिक आढळतं. पाश्चात्य देशांतील कॅनडा सारख्या देशांचे सरासरी वय ५५-६० आहे. म्हणजे अजुन काही वर्षांनी कॅनडा मधे फारच कमी लोकसंख्या असेल आणि त्यातील तरूणांचे प्रमाण खूपच कमी असेल. कारण कुटुंबव्यवस्थेचा बोर्‍या उडाल्याने नविन मूलं जन्माला येण्याचं प्रमाणही अत्यल्प आहे. याचा विपरीत परिणाम देशातील एकूणच क्रयशक्ती, उपल्ब्ध मनुष्यबळ यांची कमतरता डायरेक्ट देशातील जॉब्झ आणि उत्पादनक्षमता यावर होतो. याउलट सध्यातरी भारत-चीन यांसारख्या देशांचे सरासरी वय २४-२७ आहे. म्हणजेच हे देश तारूण्यात आहेत. त्यांच्याकडे क्रयशक्ती वाढवीण्यास मनुष्यबळ उपल्ब्ध आहे. गेल्या काही वर्षांत कॅनडा सारख्या देशात चीन, जपान, तैवान, कोरीया, इराण, बांग्लादेश, पाकीस्तान, भारत, श्रीलंका यांसारख्या देशांतील लोकांचं प्रमाण वाढलं आहे. अगदी न्यु-लिस्कर्ड सारख्या टुंड्रा प्रदेशापासून फक्त २५० किमी दूर असलेल्या छोट्या शहरात सबवे स्टोअर, दोन पेट्रोल पंप आणि एक सिनेमा थिएटर यांची मालकी एका भारतीय मूळाच्या पंजाबी कुटुंबाकडे आहे.

इथे कोणी कुठे स्थलांतर करावं हा मुद्दा नाही पण लग्न पद्धतींचे काय काय दूरगामी परिणाम होऊ शकतात याचा उहापोह चालू आहे. भारतामधे अजुनही कौटुंबिक हिंसा हा प्रकार भरपूर प्रमाणात आहे. मारून मुटकुन अनेकींना एखाद्या मारकुट्या नवर्‍या बरोबर रहावं लागतं. हे भारतीय लग्न जमवण्याच्या पद्धतीचे तोटे झाले.
इथे एक पद्धत चांगली आणि दुसरी वाईट असा कोणताच निष्कर्ष काढायचा नाहीये. तरी सुद्धा जर दोन्ही मधील अधिक सोयीच्या आणि चांगल्या गोष्टींचा सुवर्णमध्य काढला तर मला असं वाटतं की दोन्ही संस्कृतींचा फायदा होईल. पण असं होणं खूपच अवघड आहे. तरी जेव्हा मी पाश्चात्य जगतातील मनमोकळं वातावरण पहाते पण त्याचबरोबर अनेक जोडीदारा शिवाय जगत असलेली लोकं पहाते तेव्हा थोडं वाईट वाटतं. असं वाटतं की जर यांच्याकडे सुद्धा अशा लोकांसाठी पाहून, ठरवून, बोलणीकरून जोडीदार निवडता आला असता तर किती बरं झालं असतं!

Wednesday 13 June 2012

(अर्ध)सत्यमेव जयते!!

दिनांक सहा मे पासून प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता आमीर खान (आखा) याने (अर्ध)सत्यमेव जयते या कार्यक्रमाच्या माध्यमातून दर रविवारी ११.३० वाजता जाहीरपणे बॉम्बहल्ले चालू केलेत. त्याला दु:खी जनतेचे अश्रू आणि अतिशय मोजूनमापून वेळेत आणल्या जाणार्‍या टाळ्या यांची साथ आहे. या कार्यक्रमाची  तुलना प्रसिद्धी करताना रामायण आणि महाभारत या जनमानसात अतिशय लोकप्रिय मालिकांशी केली. तसे मला आखा चे चित्रपट त्यांच्यातील वेगळेपणासाठी आवडतात. म्हणून त्याच्या बद्धल माझं चांगलं मत होतं. होतं असंच म्हणायचं कारण (अर्ध)सत्यमेव जयते चे भाग बघून आता ते तितकंसं चांगलं राहीलेलं नाही.

सुरूवातीला मी सुद्धा या कार्यक्रमाच्या बाजूने झुकलेली होते आणि आखा व सत्यमेव जयते च्या टीमवर तोंडसूख घेणार्‍यांची कीव करत होते. पण जसजसे २-३ भाग झाले तसतसं लक्षात आलं की इथे फक्त ठरावीकच बाजू दाखवली जातेय आणि त्यासाठी दुसरी बाजू मुलाखतींदर्म्यान बाहेर आली असली तरी ती जाणीवपूर्वक एडीट केली गेलेली आहे. जाणीवपूर्वक विशिष्ट मुद्द्यांवर टाळ्यांचा कडकडाट आणि विशिष्ट मुद्द्यांवर अश्रूंचा रिमझिम पाऊस दाखवून सहानुभूती मिळवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न चालू आहे.

स्त्रीभ्रूण हत्त्या या विषयात दाखवल्या गेलेल्या गोष्टी सत्य असल्या तरी दाखवलेले अश्रू खूपच कृत्रीम वाटले होते. पण त्यावेळी असं वाटलं की असा कार्यक्रम आपण पहिल्यांदाच पहात आहोत म्हणून असं वाटलं असेल. फेसबुकवर एका व्यक्तीने मला हा कार्यक्रम अगदीच ओरीजीनल नाहीये तर Ask Oprah Winfrey या अमेरिकन कार्यक्रमावर आधारीत संकल्पना आहे असे सांगीतले होते. मला त्यावेळी हा कार्यक्रम नक्की काय आहे हे माहीती नव्हते. थोडी चौकशी केल्यावर समजले की Ask Oprah Winfrey या कार्यक्रमाची होस्ट Oprah Winfrey ही एक अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेली आणि लहानपणीच शारीरिक अत्याचारांना सामोरं जावं लागलेली एक स्त्री होती. Ask Oprah Winfrey या कार्य्क्रमाद्वारे लोकांना बोलतं करून त्यांच्या दु:खाविषयी चर्चा केली जायची. याच कार्यक्रमाद्वारे अतिशय प्रसिद्ध होऊन तिने आपल्या करीअरला बुस्ट दिला होता. आता या कार्यक्रमात आणि सत्यमेव जयते या कार्यक्रमात मूलभूत फरक होस्ट मधेच आहे. आखा हा चांदीचा चमचा तोंडात धरून जन्माला आलेल्यांपैकी आणि ज्या दु:खांची चर्चा करून तो आणि त्याचे सहकारी जो पैसा कमावत आहेत त्यापैकी एकाही दु:खाची झळ न बसलेला आहे. त्यामुळे ऑपराह विन्फ्री ही जशी इतरांच्या दु:खाशी स्वत:चे दु:ख जोडू शकत असे त्याप्रमाणे इथे कुठलाही भाग नाहीये.

जर आखा चे हेतू इतके स्वच्छ असते तर त्याच्या तथाकथीत रिसर्च टीमने दाखवलेल्या केसेसची दुसरी बाजूही दाखवली असती. हा कार्यक्रम फक्त विशिष्ट लोकांच्या, विशिष्ट संस्थांच्या प्रसिद्धीसाठी आखा ची प्रसिद्धी वापरून केलेला कार्यक्रम असे दुसर्‍या भागानंतर अधिक जाणवायला लागले. तिसर्‍या भागात तर चक्क त्याचा एकांगीपणा उघडपणे समोर यायला सुरूवात झाली. अशीही सध्या अनेक उदाहरणे आहेत की जी इंडीयन फॅट वेडींग करत असतील पण वधु पक्ष आणि वर पक्ष सगळा खर्च समान वाटून घेतात. अशीही अनेक लग्न होतात की जी अत्यंत कमी खर्चात केली जातात. अनेकवेळा तर विविध समाजातील लोकांचे सामूदायिक विवाह लावले जातात. पण पॉझिटीव्ह बाजू दाखवताना फक्त एका मुस्लीम संघटनेचे उदाहरण दाखवले गेले. मुस्लीम समाजात अशीही अनेक उदाहरणे आहेत की मुलीचं लग्नं करून तिला दुबईत नेऊन विकतात. भारतात येऊन पुन्हा नविन मुलीशी लग्नं करतात.

हेल्थ केअरच्या मुद्द्याआंतर्गत जे दाखवले गेले त्यात तर पक्की खात्रीच पटली की त्या कर्नल की मेजर राय यांची बाजू प्रसिद्धीस आणण्यासाठी केलेला खटाटोप. त्यासाठी आखाला काहीतरी नक्कीच मिळाले असेल. इतकं एकांगी दाखवलंय त्यात. हेल्थकेअरचा मुद्दा नक्कीच महत्त्वाचा आहे पण त्यात आपल्याकडे मेडीकल इन्शुरन्सच्या नावाखाली ज्या कंपन्या पैसा कमावतात त्याविषयी काहीच उल्लेखही नाही. हाच का यांचा परिपूर्ण रिसर्च? ऑनर किलींगच्या भागात खापच्या कार्यपद्धतीवर घणाघाती हल्ला चढवताना खाप भारतात असूनही भारतीय कायदा मानत नाही तर स्वत:चा कायदा मानते. मग इथे आखा सोयीस्कररित्या भारतीय मुस्लीम मानत असलेल्या मुस्लीम पर्सनल लॉ, वक्फ बोर्ड इ. मुस्लीम ऑर्गनायझेशन्सच्या कायद्यांबद्धल, फतव्यांबद्धल काहीच बोलत नाही. असं कसं? खापच्या कार्यप्द्धतीतील चांगल्या बाजू मुद्दामून समोर येऊ दिल्या नाहीत. असं का?

अपंग मुलांचा मुद्दा असलेल्या भागात चक्क हिंदू धर्माच्या कर्म या संकल्पनेचीच खिल्ली उडवली. अपंगत्त्व हे पूर्वकर्माचं फळ असतं अशी अंधश्रद्धा असेल काही लोकांमधे पण मलानाही वाटत की अधिकाधिक जनता असं मानते. एका दृष्टिने पाहीलं तर जन्मजात अपंगत्त्व हे कशामुळे येतं याचा अभ्यास केला तर अधिकाधिक कारणं ही लोकांना गरोदर बाईची काळजी नीट न घेतल्याने, तिला नीट पोषक असा आहार न मिळाल्याने, बाळंत होताना काही चूक होऊन बाळाच्या नाजूक शरीराला दुखापत होणे, किंवा पोलीओचे डोस न देणे अशी मेडीकल कारणंच सापडतात. आता लोकांमधे यासगळ्याची जागरूकता निर्माण करणे अशा अंगाने विचार या कार्यक्रमात यायला हवा होता. पण हे मुद्दे स्पर्शिले सुद्धा गेले नाहीत. एम-आर आणि सीपी च्या केसेस तर दाखवल्याच नाहीत. अशा मुलांसाठी काम करणार्‍या अनेक संस्था आहेत त्यांचीही माहीती दाखवली असती तर काही पॉझिटीव्ह दाखवलं असं वाटलं असतं.

आता अजुन सात बॉम्ब्स पडायचे आहेत. आधीच्या पाच भागांतील एकूणच एकांगी हाताळणीमुळे पहिल्या भागापेक्षा या कार्यक्रमाचा प्रेक्षकवर्ग कमी झालेला आहे याची खात्रीच आहे. म्हणूनच या कार्यक्रमाचं नाव (अर्ध)सत्यमेव जयते असंच असायला हवं.

Tuesday 12 June 2012

भेट एका संगीतकाराची!

माझी संगीतातील रूची पाहून आयलीन (जी मला ऑटो-हार्प शिकवते आहे) आम्हाला कोबाल्ट मधे राहणार्‍या स्टीव्ह स्मीथ या संगीतकार व्यक्तीकडे घेऊन गेली.

त्याचं विशेष म्हणजे तो अधिकाधिक तंतुवाद्ये (सतार सुद्धा), ताल वाद्ये वाजवू शकतो तसेच इलेक्ट्रॉनीक्स फॉर्म मधील सर्वप्रकारचे संगीत तयार करतो. स्टीव्ह स्मीथ हा मुळात व्यापारी माणूस. जगाच्या विविध भागांत भटकंती तिथली संस्कृती (संगीत, कपडे, तत्त्वज्ञान) कॅनडात आणून विकणारा व्यापारी. या भटकंतीतच त्याला उत्खननाचे वेड लागले. बाली द्वीप, कॅनडा, अमेरिका, तिबेट, तैवान, कोरीया, चीन यांसारख्या देशांतून उत्खनन करून मिळालेल्या विविध प्रकारच्या खडकांना तासून स्टोन्स बनवून त्याचे दागिने विक्री करणे, त्या खडकांमधून विविध आकार तयार करून शोभेच्या वस्तू म्हणून विक्री करणे, या देशांतील आणलेले कपडे इ. ची विक्री करणे हा त्याचा एक व्यवसाय.
 लहानपणापासूनच घरात संगीताचे वातावरण असल्याने संगीतात आवड आणि गती होती. हेच त्यानं मनापासून जोपासलं. त्याच्याकडे असलेल्या आणि त्याला येत असलेल्या अधिकाधिक वाद्यांचं शिक्षण त्याने स्वत:च स्वत:ला शिकवून घेतलं. एखाद्या वाद्याची एखादी धुन किंवा तुकडा शिकायचा आणि त्याच्यात स्वत:च्या सृजनशीलतेची भर घालत नवनविन संगीताचे तुकडे (त्याला इंग्रजीत इम्प्रोव्हायझेशन असं म्हणतात) तयार करायचे ही त्याची आवड.

त्याची पहिली बायको एक म्युझीक थेरपीस्ट होती. त्याच्याकडे तिबेटीयन झांजा होत्या की ज्यांच्या उपयोग भुकेलेली भूते घालवण्यासाठी होतो असे त्याने सांगीतले. तिबेटीयन घंटा, आसाम मधून आणलेली विविध त्रिज्या असलेल्या गोलीय आकारांची, विविध जाडींची, विविध खोलींची कास्य धातू मधे तयार केलेली भांडी आणी यासगळ्यांच्या कडांना लाकडाची काठी गोलगोल फिरवून त्या स्पर्शाने निघणारे विविध आवाज याचं प्रात्यक्षीकच त्यानं दाखवलं.

ही सर्व वाद्ये म्युझीक थेरपी, रेकी आणि प्राणीक हिलींग वगैरेसाठी तो अजुनही वापरतो. त्याच्या घराचा एकही कोपरा किंवा भिंत रिकामी सापडणार नाही. सगळीकडे कापडी चित्रं आणि विविध वाद्ये लटकवलेली आहेत. स्टीव्ह स्वत: जरी जन्माने ख्रिस्ती असला तरी त्याला बुद्धीझम, कन्फुशिअनीझम यांसारख्या तत्वज्ञानांचे वेड आहे. कपडे आणि दागिने विक्री हा त्याचा फक्त उन्हाळ्यातील व्यवसाय आहे. आता मुख्य व्यवसाय म्हणून तो संगीताचे धडे देतो.

त्याचा ग्लोबटोन नावाचा यु-ट्युबवर चॅनल आहे. तिथे तुम्हाला गिटार, बॅन्जो, तबला, सतार, अनेक इलेक्ट्रॉनीक वाद्ये यांची इम्प्रोव्हायझेशन्स पहायला आणि ऐकायला मिळतील. त्याच्याकडे सगळी अत्याधुनिक इलेक्ट्रॉनीक, संगणकीय प्रणाली असलेली साधने आहेत की ज्यांच्या आधारे तो विविध वाद्यांचे, संगीतांचे मिश्रण करू शकतो. आपल्या विद्यार्थ्यांना संगीत शिकवताना त्याचा मुख्य भर हा विद्यार्थ्यांना एखाद्या वाद्याचं ज्ञान आत्मसात करायला शिकवणे आणि त्यातून स्वत:चं म्युझिक तयार करायला शिकवणे यावरच असतो. ज्यांना त्याच्या संगीताविषयी अधिक रूची वाटत असेल त्यांनी त्याच्या ग्लोबटोन या यु-ट्युब चॅनलवर जाऊन बघावे.मला अशा भन्नाट लोकांचं फारच कौतुक वाटतं.

Monday 11 June 2012

पॅन केक रेसीपी!!

पॅन केक्स बद्धल मी नुसतेच ऐकले होते. फारफारतर एखाद्या हॉलीवुडपटात ओझरते पाहीले असतील. पण इथे सासरी आल्यावर असं समजलं की पॅन केक्स हा पदार्थ साधारणत: आपल्याकडील पोहे, उपमा, थालीपीठाच्या धर्तीवर अतिशय मुख्य आणि प्रसिद्ध पदार्थ आहे. पहिल्यांदा आले तेव्हा कमी वेळ असल्याने पॅन केक्स शिकण्याचा योग आला नव्हता पण ह्यावेळी मी ठरवलं होतं की शक्य झाल्यास पॅन केक्स शिकायचे. सासर्‍यांना सांगीतल्यावर ते पॅन केक शिकवायला एका पायावर तयार झाले. उत्साहाने पॅन केक्सचे तयार पीठही आणले. आपल्याकडे गिट्स, एम टी आर या ब्रॅंड्सची जशी विविध पदार्थांची तयार पिठे मिळतात तशीच इथे पॅनकेक्सची तयार पीठे मिळतात. दूध पावडर मिक्स केलेलं आणि न केलेलं अशी दोन प्रकारची पीठे मिळतात. आम्ही दूध नसलेलं पीठ आणलं. हे पीठ घरी सुद्धा तयार करता येतं. गव्हाच्या पीठात चवीनुसार मीठ, साखर, थोडंसं यीस्ट असे जिन्नस टाकून कोरडं पीठ तयार करता येतं. प्रत्येकाच्या आवडीनुसार अंड, दूध वगैरे गोष्टी नंतर टाकता येतात.
आम्ही फक्त पाणी टाकून कोरड्या पीठाचं ओलं पीठ तयार करून घेतलं. पीठात गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घेतली. ओलं पीठ अधिक सारखं होण्यासाठी हलक्या हाताने फेटून घेतलं तरी चालतं. पॅन केक्स बनवण्यासाठी शक्यतो सगळीकडून सारखी उष्णता लागेल असे भांडे असावे. पॅन केक्स तयार करण्यासाठी विजेवर चालणारा स्वतंत्र पॅनही मिळतो. पॅन केक्सचा पॅन साधारण २५० ते २७० तापमानावर ठेवावा.
पॅनवर थोडेसे ऑलिव्ह तेल टाकावे म्हणजे केक्स बनवण्यासाठी टाकलेले ओले पीठ पॅनला चिकटून बसत नाही. आपल्याकडे ऑलिव्ह तेल नसेल तर आपल्या नेहमीच्या वापरातील तेल टाकलं तरी चालेल. हळूहळू तापलेल्या पॅनवर ओले पीठ अशा अंदाजाने टाकावे की त्याचे ११ मिमी जाडीचे गोल आकार तयार होतील. असे साधारण चार केक्स टाकावेत. दोन मिनीटांत त्या गोलाकार चकत्यांवर भोकं दिसायला लागली की केक्स उलटावेत.
दोन्ही बाजूंनी साधारण गुलाबीसर झालेले केक्स एकेक करून एखाद्या डिश मधे काढून घ्यावेत. लोक आपापल्या आवडीप्रमाणे त्यावर विविधप्रकारची टॉपींग्ज टाकतात. कॅनडात मुख्यत: मेपल सिरप, मध आणि त्यांवर ब्लॅक बेरी, रेड बेरी, चेरी यांसारखी फळे टाकण्याची पद्धत आहे. 
सोबतच्या चित्रातील ब्लू बेरी असलेले पॅनकेक्स अधिक जाडीचे आहेत कारण त्यात अंड आणि दूध हे दोनही जिन्नस घातलेले आहेत की ज्यामुळे केक्स अजुन फुलतात.  काहीजण स्पायसी पॅनकेक्स सुद्धा बनवतात. ही माझी पहिलीच वेळ असल्याने अतिशय साधे पॅनकेक्स बनवले होते. या पॅन केक्सवर सर्वप्रथम थोडं बटर लावून घेतलं आणि मग त्यावर मेपल सिरप टाकलं.  आहाहा.............काय सुंदर चव लागली म्हणून सांगू.