Sunday, 14 August 2011

ऐ मेरे वतन के लोगों..........

आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ६५ वर्षे पूर्ण होताहेत. १९४७ पूर्वीच्या सगळ्या स्वातंत्र्य लढ्यांमध्ये स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय याविषयी जो काही विचार झाला होता त्याविचाराचा आणि सध्याच्या स्वातंत्र्याचा (स्वैराचाराचा) अर्थाअर्थी काहीही संबंध राहिलेला नाही. १९४७ नंतर स्वातंत्र्य दिन साजरा करणे म्हणजे एक राष्ट्रीय सण साजरा केला जात असे. आता चौकाचौकातून फलक लावले जातात, काही फोटो लावून त्यांच्यापुढे रांगोळी काढून फोटोंना हारतुरे घातलेले असतात. तिथेच ध्वनिक्षेपकांच्या प्रचंड भिंती लावलेल्या असतात. पहाटे पासून त्यावर जरा देशभक्तीपर गीतं लावली (सकाळी ९ पर्यंत की मग दिवसभर शिला की जवानी आणि तत्सम गाण्यांवर हिडीस नाच करायला सर्व कार्यकर्ते (??) मोकळे असतात. नोकरदार मंडळींची गोष्टच वेगळी. ऑफिसेस आणि प्रायव्हेट कंपन्या, बॅंका इथे ध्वजवंदन अनिवार्य नसते किंबहुना ते असतच नाही. त्यामुळे १५ ऑगस्ट हा आपली हक्काची सुट्टी आहे आणि त्याला जोडून जर शनि-रवि येणार असतील तर सोन्याहून पिवळं. मग यांचा तीन दिवसाच्या लॉंग विकएन्डचा कोणत्यातरी पर्यटन स्थळी खूप आधीपासूनच दौरा आखलेला असतो. आता आजचीच बातमी बघा ना......लोणावळा-खंडाळा हाऊस-फुल्ल आहेत. राहिले कोण तर विविध शाळा आणि महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थी. महाविद्यालयातही कागदोपत्री उपस्थिती अनिवार्य असली तरी यागोष्टी काटेकोरपणे पाळण्याइतकं मनुष्यबळ हवं ना. आणि विद्यार्थ्यांमध्ये तर महाविद्यालय म्हणजे सर्व अनिवार्यतांपासून सुटका अशीच व्याख्या असते. त्यामुळे एनसीसी, एनएसएस इ.इ. पथकं सोडली चार-दोन खेळांच्या टीम्स सोडल्या तर बाकी कोणी फिरकत नाही. मग आपापल्या मित्रमैत्रिणींबरोबर कुठल्यातरी गडावर किंवा एखाद्या पिकनिक स्पॉटवर जाण्याचा प्लॅन असतो. शाळेतल्या मुलांना-शिक्षकांना आणि बी एड महाविद्यालयांतील विद्यार्थी-शिक्षकांना तसेच प्राध्यापकांना यातून सुटका नसते. त्यामुळे हेच पब्लिक काय ते तिरंग्यासमोर झेंडावंदनाला उभं रहातं.
सध्याची एकूणच सामाजिक आणि राजकिय परिस्थीती बघता १९४७ साली स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी महात्मा गांधींनी खालील दोन गोष्टी सांगीतल्या होत्या. एक म्हणजे स्वातंत्र्य उपभोगणार्‍या समाजाचे चारित्र्य घडवायला हवे आणि दुसरं म्हणजे कॉंग्रेस विसर्जित करायला हवी. या सांगीतलेल्या दोन गोष्टी किती आवश्यक होत्या याची ्सध्याची परिस्थीती पाहून खात्रीच पटते. या दोन गोष्टींवरून  नेहरू आणि त्यांच्यात मतभेद झाले आणि नेहरूंनी महात्मा गांधींचं न ऐकता स्वत:च निर्णय घेऊन स्वतंत्र भारताला दिशा दिली. सुभाषबाबू, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा परस्पर काटा काढून नेहरूंनी त्यांना एकही मत मिळालेलं नसताना वल्लभभाई पटेलांकडून कॉंग्रेसचं अध्यक्षपद हिरावून घेतलं आणि स्वत:च पंतप्रधान सुद्धा झाले. १९४८ साली महात्मा गांधी गेले. त्यामुले नेहरूंना थांबवणारं कोणीच नव्हतं. मग त्यांना हवं तसं त्यांनी देशाला वळवायला सुरूवात केली. आपल्या देशातील मूलभूत शेती व्यवसाय, तसेच विविध खेडेगावांतील तसेच शहरांतील कुटीरोद्योग, प्राथमिक शिक्षण यांसारख्या पायाभूत गोष्टींच्या विकासाकडे दुर्लक्ष केलं. मोठमोठे कारखाने शहरांच्या आसपास उभे राहिले आणि त्याच्या आसपास कारखान्यात काम करणार्‍या खेडेगावातून आपली शेती आणि पारंपारिक कुटेरोद्योग सोडून आलेल्या गरीब कामगारांच्या वस्त्या देखिल उभ्या राहिल्या. पैसेवाल्यांसाठी उच्चशिक्षण संस्था उभ्या राहिल्या. समाजातील दरी अजुनच वाढत गेली. प्राथमिक शिक्षण योग्य त्या दर्जाचं न मिळाल्यामुळे गरीब कुटुंबातील तसेच खेडेगावातील मुलांना सुरूवातीला संधी न मिळून ते मागेच पडत गेले. यासगळ्याबरोबरच राजकिय पुढारी आणि राजकारणी लोक यांच्यामध्ये भ्रष्टाचार करून पैसे कमावण्याची सवय लागली. पुढल्या निवडणुकीत जिंकुन येण्यासाठी आवश्यक पैसा उभा करण्या मध्येच निवडुन आल्यावर नेतेमंडळी व्यग्र असायला लागली. आता तर भ्रष्टाचारांची संख्या आणि प्रमाण हे गगनाला भिडलं आहे. शासकीय यंत्रणांचा वापर सहजपणे विरोधकांना शह देण्यास केला जातो. सत्याग्रहाची आंदोलनं ब्रिटीशसरकारच्यापेक्षाही लाजिरवाण्यापद्धतीनं दडपली जातात. जो कोणी भ्रष्टाचारा विरोधात किंवा शासनाच्या विरोधात बोलेल त्यालाच भ्र्ष्टाचारी म्हणून पकडलं जातंय. जनता झोपलेली किंवा मूकी-बहिरी झालेली आहे.
यापार्श्वभूमीवर देशाच्या बॉर्डरवर सैनिक प्राणपणाने आपल्या देशाचं रक्षणकरत ठामपणे उभे आहेत. कित्येकांनी देशाच्या सुरक्षेसाठी आपल्या जीवाचं बलिदान केलेलं आहे......करत आहेत. तरी राजकारणी लोकांना याची काहीही किंमत नाही. संसदेमध्ये स्वत: न करत असलेल्या कामाचा मोबदला तिप्पटीने वाढवायचा आणि सैन्यातील लोकांची पगारवाढ रोखून धरायची. स्वत: भ्रष्टाचाराची कोटीच्या कोटी उड्डाणं करून सामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटायचं. आज जरी देशाची एकाबाजूला प्रगती होताना दिसत असली तरी भ्रष्टाचार, महागाई, बॉम्बस्फोट, दहशतवाद्यांचे सशस्त्र हल्ले, गरीब-श्रीमंत यांतील दरी यांचं प्रमाणहीप्रमाण खूपच वाढलेलं आहे. हेच अपेक्षित होतं का आपल्या क्रांतिकारकांना? यासाठीच का त्यांनी बलिदान दिलं होतं? हे जे काही चालू आहे ते खरंच स्वातंत्र्य आहे की स्वैराचार? आपण स्वातंत्र्याची ६५ वर्षं साजरी करतोय की स्वैराचाराची??
पूर्वी १९६२ च्या भारत-चीन युद्धानंतर गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेलं "ए मेरे वतन के लोगों,........"  ऐकताना नेहरूंच्या डोळ्यांतही अश्रू उभं राहिल्याचं ऐकीवात आहे. आता नुसतं ए मेरे वतन के लोगों ऐकू आलं तरी पुढच्या ओळी कानात आदळत असतात त्या अशा:
ए मेरे वतन के लोगों,
कितने गुंगे और बहरे हो।
इतना भ्र्ष्टाचार होनेपर भी,
तुम सारे इतने चुप क्यों हो?
तुम अपनेही आप में,
इतने मशगुल कैसे हो?