Showing posts with label तत्त्वज्ञान. Show all posts
Showing posts with label तत्त्वज्ञान. Show all posts

Thursday, 21 October 2010

मुक्त होणे...

छायाचित्र महाजालावरून साभार
(खालील उतारा श्री जे कृष्णमुर्ती यांच्या "टु बी फ्री" या इंग्रजी उतार्‍याचे भाषांतर आहे. मागे खूप वर्षांपूर्वी मी कन्याकुमारी येथे विवेकानंद केंद्राच्या मुख्य कार्यालयात गेले असताना तिथेच काच फलकात मला हा इंग्रजी उतारा दिसला. तो वाचल्यावर मला एकदम खूप काही गवसल्यासारखं वाटलं आणि मी तो माझ्या डायरीत लिहून घेतला. आजही मला अस्वस्थ वाटत असेल तर मी ताबडतोब हा उतारा वाचते आणि मन शांत होतं. असं काय आहे या उतार्‍यात? वाटलं तुम्हा सगळ्यांबरोबर शेअर करावं. म्हणून हे भाषांतर करते आहे.)
*********************************************************************************
मुक्त (फ्री) होण्यासाठी आपल्याला आपल्याच आत असणार्‍या सगळ्या परावलंबित्वावर (डीपेन्डन्सी) मात करावी लागेल. जर आपल्याला हेच समजलं नाही की आपण असे इतरांवर अवलंबुन का आहोत तर आपण आपल्या परावलंबित्वावर मात करू शकणार नाही. आपल्या मुक्तीचा मार्ग हा आपण परावलंबी (डीपेन्डट) का आहोत हे समजलं तरच उघडेल नाहीतर आपण कधीच मुक्त होऊ शकणार नाही. पण मुक्ती म्हणजे काही फक्त एक प्रतिक्रीया नाही. पण प्रतिक्रीया म्हणजे काय? जर मी काही तुम्हाला लागेल असं बोललो म्हणजे तुम्हाला नावं ठेवली तर तुम्ही माझ्यावर चिडाल. हे चिडणं म्हणजे प्रतिक्रीया की जी परावलंबित्वातुन जन्मलेली आहे. स्वातंत्र्य (इंडीपेन्डन्स) ही अजुन एक प्रतिक्रीया झाली. पण मुक्ती ही काही प्रतिक्रीया नाही. म्हणूनच जोपर्यंत आपल्याला प्रतिक्रीया म्हणजे नक्की काय हे समजत नाही आपण त्यावर मात करत नाही तोपर्यंत आपण कधीच मुक्त होणार नाही.
     एखाद्यावर प्रेम करणं म्हणजे नक्की काय हे माहीतेय? एखाद्या झाडावर प्रेम करणं किंवा एखाद्या पाळीव प्राण्यावर प्रेम करणं किंवा एखाद्या पक्ष्यावर प्रेम करणं म्हणजे नक्की काय हे माहीतेय? जरी ते झाड तुम्हाला सावली, फळं असं काहीच देणार नसलं तरी ते तुमच्यावर अवलंबुन नसलं तरी सुद्धा तुम्ही त्या झाडाची, त्या पाळीव प्राण्याची किंवा पक्ष्याची तुम्ही काळजी घेता, त्याला खाऊ-पिऊ घालता, त्याची नीगा राखता. यालाच प्रेम असं म्हणतात. आपण असं निरपेक्ष प्रेम कधीच करत नाही. आपल्यापैकी कित्येकांना हे असं प्रेम म्हणजे नक्की काय हेच माहीत नसतं. कारण आपलं प्रेम हे मुख्यत: राग, लोभ, मोह, मद, मत्सर, भिती यांच्याशी निगडीत असतं. यामुळेच आपण आपल्या आतून प्रेम करून घेण्यावर पराकोटीचे अवलंबुन असतो. आपण फक्त प्रेम करून तिथेच सोडून देत नाही पण परतफेडीची अपेक्षा करतो आणि या अपेक्षेमुळेच आपण परावलंबी बनतो.
      म्हणून मुक्ती आणि प्रेम हे हातातहात घालून जातात. प्रेम ही काही प्रतिक्रीया नाही. जर तुम्ही माझ्यावर प्रेम करता म्हणून मी तुमच्यावर प्रेम केलं तर तो एक केवळ व्यापार होईल, एक अशे गोष्ट की जी बाजारात खरेदी केली जाते. ते प्रेम नव्हे. प्रेम करणं म्हणजे त्याबदल्यात काही मागणं नव्हे. अगदी असं वाटणं सुद्धा चुकीचं आहे की तुम्ही काहीतरी देता आहात. अशाच प्रकारच्या निरपेक्ष प्रेमाला मुक्ती जाणून घेता येते. पण आपल्याला यासाठी शिक्षण मिळतच नाही. आपल्याला गणित, रसायनशास्र, भूगोल, इतिहास याचं शिक्षण मिळतं आणि तिथेच ते थांबतं देखिल. कारण तुमच्या पालकांची काळजी ही फक्त तुम्हाला चांगली नोकरी मिळणे आणि तुम्ही आयुष्यात यशस्वी होणे यासाठीच असते. जर त्यांच्याकडे पैसा असेल तर ते तुम्हाला परदेशात पाठवतील, पण सगळ्या जगासारखाच त्यांचाही हेतू हाच असतो की तुम्ही श्रीमंत बनावं, तुम्हाला समाजात एक मानाचं स्थान असावं; जेवढं वर तुम्ही जाल तेवढे जास्त तुम्ही इतरांच्या दु:खासाठी कारण बनता. कारण त्याठिकाणी पोहोचण्यासाठी तुम्हाला इतरांशी स्पर्धा करावी लागते, अगदी निर्दयी व्हावं लागतं. पालक आपल्या पाल्यांना शाळांमध्ये पाठवतात की जिथे महत्त्वाकांक्षा आणि स्पर्धा आहे पण प्रेम आजीबात नाही. आणि म्हणूनच आपल्यासारखा समाज सतत संघर्षात आणि गोंधळलेल्या अवस्थेत जातो आहे. म्हणूनच आपल्या देशातील राजकिय नेते मंडळी, न्यायमूर्ती आणि तथाकथित आदरणीय विद्वान जरी सतत शांततेच्या गप्पा करत असले तरी त्या शब्दाला फारसा अर्थ प्राप्त होत नाही.
 **************************************************************************
 


Saturday, 11 September 2010

माझ्या अमेरिकेतील भगीनी आणि बंधुंनो..........

 (छायाचित्र महाजालावरून साभार)
अकरा सप्टेंबर आलं की मला नेहमी स्वामी विवेकानंदांनी १८९३ साली शिकागो येथील सर्वधर्म परिषदेत उद्गारलेले "माझ्या अमेरिकेतील भगीनी आणि बंधुंनो.........."  हे उद्गार आठवतात. त्याच बरोबर याच अमेरिकेतील बंधु भगीनींवर "विश्वबंधुत्त्व दिनाच्या दिवशीच" २००१ साली झालेला भीषण हल्ला सुद्धा आठवतो. सगळं जगच विरोधाभासाने भरलेलं आहे. आता हेच बघा ना एखाद्या भिकारणीचं नाव लक्ष्मी तर एखाद्या चकण्या मुलीचं नाव सुनयना. जिथे लिहीलेलं असतं  "येथे थुंकु नका" तिथल्याच भिंतींवर पानाच्या पिचकार्‍यांनी रंग भरलेले असतात. शिवाजी महाराजांच्या किंवा महात्मा गांधींच्या नावाखाली त्यांच्या शिकवणुकीच्या बरोबर विरूद्ध वर्तन करायचं. कलीयुग आहे........पण स्वामी विवेकानंदांना मात्र भारत सार्‍या जगाला अध्यात्माचं ज्ञान देईल याची खात्री वाटत होती......म्हणून तर त्यांनी भविष्यच वर्तवलं होतं की "भारत हा एक दिवस जगतगुरू होणार आणि सार्‍या विश्वाला बंधुत्त्व, अध्यात्म शिकवणार". तसं आपल्या भारतीय संस्कृतीत अध्यात्म इतर जगाच्या तुलनेत मुरलेलं आहे. म्हणूनच इथे निर्वासीतांना आसराही मिळतो आणि शरण आलेल्याला अभय. हे स्वामी विवेकानंदांचे शिकागोच्या भाषणातील उद्गारांमधील काही शब्द आहेत. आज त्याप्रसंगाला ११७ वर्षं पूर्ण झाली म्हणून मनात विचार आला की स्वामी विवेकानंदांनीच वेळोवेळी त्यांच्या पत्रांतून आपल्या शिष्यांना लिहीलेल्या काही निवडक विचारांचं संकलनच प्रसिद्ध करूया. म्हणून ही प्रस्तावना!
(खालील विचार हे स्वामी विवेकानंदांचे असून "विवेकानंदांची पत्रे" या पुस्तकातील मी काढलेल्या टिपणांवर आधारित आहे.)
 १) भगिनी निवेदिता यांना: माझें ध्येय कांही थोड्याशा शब्दांत मांडले जाऊ शकते. मानवाला त्याच्या ठिकाणी वास करणार्‍या ईश्वरत्त्वाचा उपदेश देणे आणि जीवनांतील प्रत्येक कार्यांत हे ईश्वरत्त्व कसे प्रकट करावे यासंबंधीचा मार्ग दाखवून देणे हेच माझे ध्येय आहे.
२) जगातील सर्व दु:खांचे कारण म्हणजे अज्ञान होय. जो आत्मत्याग करेल तोच जगाला प्रकाश देईल. पृथ्वीवरील सर्वांत पराक्रमी आणि सर्वश्रेष्ठ लोकांना आत्मबलिदान करावेच लागेल.
३) अंत:करणात अनंत प्रेम आणि दया असलेले शेकडो बुद्ध आज हवे आहेत.
४) धर्म हे निर्जीव विडंबनाच्या रूपाचे बनले आहेत. जगाला आज चारित्र्याची नितांत गरज आहे.
५) संपूर्ण आयुष्य म्हणजे एक स्वप्न मालिका आहे. जाणीवपूर्वक ही स्वप्ने पहावीत इतकीच माझी आकांक्षा आहे.
६) प्रलय म्हणजे कार्याचे कारणांत विलीन होत जाणे होय आणि सृष्टी म्हणजे कारणांतून कार्य प्रकट होत जाणे होय.
७) वस्तुत: नातेवाईक म्हणजे माणसाच्या प्रगतीच्या मार्गांतील भयंकर अडथळेच असतात. असे असून देखील लग्न करून लोक नवी नाती जोडण्याच्या फंदात पडतात याचे खरोखरच नवल वाटते.
८) प्रत्येकाने आपापला उद्धार करून घ्यावा. सर्व बाबतीत स्वाधीनता असणे म्हणजेच मुक्तीच्या रोखाने प्रगती होणे. हाच खरा पुरूषार्थ होय. शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक स्वाधीनता प्राप्त करून घेण्याच्या दिशेने स्वत: प्रगती करणे आणि इतरांनाही तशी प्रगती करून घेण्यास साह्य करणे हाच परम पूरूषार्थ होय.
९) अनुभवानेच आपण सर्व शिकत जातो. दुर्दैव एवढेच की या ज्ञानाचा उपयोग मात्र या जगात करता येत नाही; कारण ज्या क्षणी आपण शिकून तयार झालो असे आपल्याला वाटते त्याच क्षणी जगाच्या या रंगभूमीवरून आपल्याला अदृष्य व्हावे लागते आणि हीच खरी माया आहे.
१०) या जगात दोन प्रकारचे लोक आढळतात. पहिल्या प्रकारचे लोक खंबीर मनाचे, शांत, निसर्गापुढे मान तुकविणारे व कल्पनेच्या आहारी फारसे न जाणारे, परंतु चांगले, सज्जन, दयाळू व मधुर स्वभावाचे असतात. जग हे अशा लोकांसाठीच आहे. हे लोक सुखी होण्यासाठी जन्माला आलेले असतात. याच्या उलट दुसर्‍या प्रकारचे लोक अत्यंत संवेदनक्षम मनाचे असतात, ते कल्पनाप्रधान असतात व त्यांच्या भावना अतिशय तीव्र असतात. हे लोक एका क्षणात आकाशांत भरारी मारतील, तर दुसर्‍या क्षणी एकदम खाली येतील. या लोकांच्या नशिबी सुख नसते. पहिल्या प्रकारच्या लोकांचे आयुष्य साधारणपणे सुखाच्या सम पातळीवरून जात असते, तर दुसर्‍या प्रकारच्या लोकांच्या जीवनाचा ओघ कधीच सम नसतो; कधी कधी हे लोक अत्युच्च आनंदाचा अनुभव घेतात तर दुसर्‍याच क्षणी ते दु:खी होताना दिसतात. परंतु आपण ज्यांना असाधारण प्रतिभाशाली म्हणतो अशा व्यक्ती ह्या लोकांमधूनच उद्भवतात हे मात्र सत्य आहे. ’असाधारण प्रतिभा असणे म्हणजे एक तर्‍हेचा वेडेपणा’ या सध्याच्या प्रचलित सिद्धांतात काही सत्यांश आहे यात शंकाच नाही.
आता उपर्युक्त प्रकारात मोडणार्‍या लोकांना जर खरोखरच मोठे व्हायचे असेल तर त्यांनी अगदी शेवट पर्यंत लढत राहीले पाहीजे, संघर्षासाठी मैदान नेहमी मोकळे ठेवले पाहीजे. त्यांच्या पाठीशी कोणतेही व्यवधान असता कामा नये. विवाह नको, संतान नको; स्वत:च्या डोळ्यांसमोर ठेवलेल्या आदर्शांशिवाय दुसर्‍या कोणत्याही वस्तूबद्धल अनावश्यक आकर्षणही अशा व्यक्तीने ठेवता कामा नये; स्वत:च्या आदर्शासाठी जगण्याची व प्रसंगी प्राणाहुती देण्याचीही तिने तयारी ठेवणे आवश्यक आहे.

Monday, 19 April 2010

कालापव्यय - एक साक्षात्कार!!

ग्रंथालयाच्या भिंतीवरील घड्याळाच्या टोल्यांनी मला दचकुनच जाग आली. तशीच अर्धवट झोपेतच धपडत उठताना मी घड्याळाचे एकूण चार टोले ऐकले. खिडकीतून बाहेर पाहिल्यावर खूप अंधारलेलं वातावरण दिसलं आणि त्याच खिडकीतून दिसणार्‍या घड्याळात चार वाजलेले दिसले. युनिव्हर्सीटी लायब्ररी ऑक्टोबर पासूनच पाच वाजता बंद व्हायला सुरूवात झालेली त्यामुळे लक्षात आलं की आज आपलं लायब्ररीत जायचं राहून गेलं. एकदम पॉलने दिलेली पहिल्या निबंधाच्या पहिल्या ड्राफ्टची डेड लाईन आठवली. मणामणाचं ओझं एकदम माझ्या डोक्यावर कोणीतरी ठेवतंय असा भास झाला. मी तशीच मटकन बेड वर बसले. मला लक्षात आलं की आज गुरूवार (तो ही संपलेला) शुक्रवारची डेड लाईन आणि माझा ड्राफ्ट तयार नव्हता. मी गुरूवारी युनीव्हर्सीटी लायब्ररीतून काही इंटरनॅशनल जर्नल्स रेफर करायची आणि मग तो ड्राफ्ट लिहायचा असं ठरवलं होतं. काल, म्हणजे बुधवारी साराची रिसर्च मेथडॉलॉजीची लेक्चर्स एकदम हेवी झाल्या सारखी वाटली त्यामुळे रूम वर आल्यावर थोडंस दूध पिऊन पलंगावर पडले......कधी झोप लागली कळलंच नाही. काल रात्री झोपलेली मी डायरेक्ट आज संध्याकाळीच उठत होते. माझ्या आयुष्यातील एक दिवस वाया गेला होता. एरवी भारतात असताना काय मी असे कितीक दिवस वाया घालवले असतील पण हा दिवस खूप महत्वाचा होता. का? कारण मी एका जागतिक कीर्तीच्या (पहिल्या दोन क्रमांकां मध्ये असलेल्या केंब्रीज युनीव्हर्सीटी मध्ये शिकत होते आणि तिथे गेल्यावर दिवसा दिवसाचं महत्व तिथल्या कामाच्या प्रेशर मुळे कळायला सुरूवात झाली होती.)

मला काहीच सुचत नव्हतं. तेव्हड्यात शेजारच्या रूमचा दरवाजा उघडल्याचा आवाज झाला, ममता (माझी शेजारीण की जी फिजीक्स च्या कॅव्हेंडीश लॅब मध्ये पी एच डी करत होती) रूम वर आल्याचं लक्षात आलं. सध्या हिवाळ्यात सगळं लवकर बंद होत असल्याने ती सुध्दा संध्याकाळी चारच्या सुमारास परत येत असे. माझ्या जीवाची अजुनच घालमेल चालू झाली. अस्वस्थता दूर करण्यासाठी कोणाशी तरी बोलणं आवश्यक होतं. मैत्रिणींना फोन करायचा तर श्रीलक्ष्मी आणि मानसी दोघीही डिपार्ट्मेंट्मध्ये जाणार होत्या आणि उशीरा येणार होत्या त्यामुळे त्या कॉलेज मध्ये असण्याची शक्यता नव्हती. भारतातून कोणी चुकून ऑनलाईन असेल तर त्यांच्याशी बोलता येईल म्हणून मी चटकन लॅपटॉप चालू केला. सुदैवाने प्रिया ऑनलाईन दिसली. शक्यतो ती ऑफीस मध्ये असताना ऑनलाईनच असते म्हणजे साधारण पणे दुपारच्या वेळी. पण आज ही येवढ्या रात्री ऑनलाईन कशी हाच पहिला प्रश्न मी तिला विचारला. तर ती म्हणाली अगं मी ऑफीस मध्येच आहे आणि रात्र नाही तर दुपारचे पावणे दोन झालेत. मी लॅपटॉपच्या घड्याळात बघीतलं तर खरंच तो दुपारचे पावणे दोन दाखवत होता. (रूमच्या समोरच मोठ्ठं वॉल क्लॉक असल्याने मी लॅपटॉप मध्ये मी जाणूनबुजून भारतीय वेळ ठेवलेली होती) मी लगेचच खिडकीतून बाहेर पुन्हा घड्याळात पाहिलं तर सव्वा आठ वाजलेले दिसले आणि माझा जीव भांड्यात पडला. मग पाच मिनीटं प्रियाशी गप्पा मारून लॅपटॉप बंद केला आणि उत्साहाने आवरायला सुरूवात केली. मला दुप्पट उत्साह आला होता कारण माझ्या आयुष्यातील एक दिवस मला परत मिळाला होता. अत्यंत महत्वाचा दिवस!

तर झालं असं की युके, तसेच युरोपात हिवाळा चालू झाला की (तिथल्या हवामान आणि वातावरणामुळे) ऑक्टोबर पासूनच सगळी घड्याळे एक तास अलिकडे घेतात. हिवाळा असल्याने सूर्यप्रकाश अत्यंत कमी आणि खूप थंडी यामुळे बाहेरचं वातावरण सकाळी ७.०० वाजता सुध्दा संध्याकाळ सारखं, तसेच अतिशय डिप्रेस्ड वातावरण. सकाळचा फ्रेशनेस त्या वातावरणात नसे. मी जेव्हा अर्धवट झोपेतून उठताना चार टोले ऐकले होते ते शेवटचे चार होते. घड्याळात आठ वाजले होते पण अर्धवट झोपेत असल्याने तसेच ढगाळ, अंधारलेले वातावरण असल्याने मला ते काटे उलटया दिशेने दिसले म्हणजेच चार वाजलेले दिसले. आणि माझा गैरसमज झाला.

मला माझ्या आयुष्यातील एक मोठ्ठा साक्षात्कार झाला होता.........होय साक्षात्कारच! कारण आज पर्यंत मी खूप वेळा "टाईम इज मनी", "वेळेला खूप महत्व" "वेळेचा अपव्यय करू नये, गेलेला क्षण परत येत नसतो" इत्यादी वाचले --- ऐकले होते. पण मला आज प्रत्यक्षात त्याचे रिअलायझेशन झाले. मी वेळेची आपल्या आयुष्यातली किंमत प्रत्यक्ष अनुभवली होती. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आपल्याचसाठी कसा महत्वाचा असतो  त्याची प्रचितीच घेतली.  हे आपल्याला जो पर्यंत आपण त्या लॉस मधून जात नाही तो पर्यंत कळत नाही.हातात एखादी गोष्ट असे पर्यंत आपल्याला त्याची किंमत नसते ती हातातून निसटल्यावर कळते. परमेश्वराचे आभारच की मला फक्त डेमोच पहायला मिळाला.

Wednesday, 24 February 2010

बदल हाच कायम आहे!!

आडीच वर्षांपूर्वी मी मुंबई मध्ये नोकरी साठी गेले आणि एका वर्षाच्या आंत (साधारण १० महिन्यांनी) मला बंगलोर येथे संशोधनाची संधी मिळाली. मुंबई सारख्या ठिकाणी जागा मिळणं तसं मुश्किलच. पण मला पाच महिन्यांनी (एक महिना पेईंग गेस्ट, एक महिना एका नातेवाईकांकडे, तीन महिने दुसरया नातेवाईकांकडे) एक जागा मिळाली. या सगळ्या काळात माझ्या office मधील सहकार्यांनी माझी सगळी धावपळ बघीतली होती. (म्हणजे सुरुवातीला गोरेगाव ते सांताक्रुझ -अंधेरी........प्रचंड गर्दीत आणि लोकल मध्ये लटकून, नंतर, पनवेल ते अंधेरी......दोन्ही शेवटची स्थानके म्हणून बसून प्रवास......पण जाणे-येणे मिळून तीन तास, सायन ते दादर-सांताक्रुझ-जुहु जाणे-येणे मिळून दोन तास, शेवटची जागा मुलुंड मध्ये..........म्हणजे दोन लोकल्स बदलणे......आणि हे सगळं office hours मध्ये.) माझी तर हालतच झाली होती जरी हा सगळा प्रवास पहिल्या वर्गाच्या डब्यांतून होत असला तरी. रोज परतीच्या प्रवासात परमेश्वराची प्रार्थना करत असे या सगळ्यांतून सुटका व्हावी आणि जरा कमी धावपळीच्या ठिकाणी नोकरी मिळावी. दहाव्या महिन्यांत परमेश्वराने माझी प्रार्थना ऐकली. माझ्या बंगलोरच्या संधी विषयी आणि शिफ्टिंग करण्या संबंधी सांगितल्यावर एका सहकारयाने मला एक काळजीने प्रश्न विचारला........settle कधी होणार?? मी माझ्याच भूतकाळात डोकावले...........खरंच तळपायावर चक्रं असल्या सारखं किंवा पायाला भिंगरी लावल्या सारखी मी शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने देशभर आणि परदेशात हिंडले. तरी लोकमान्य अशा व्याख्येत मी settled या प्रकारात मोडत नव्हते आणि आता सुध्धा मी त्या अर्थी settled नाही. (settled ची लोकमान्य व्याख्या म्हणजे: कायम स्वरूपाची नोकरी, कायम स्वरूपी घर इ.) पण मला तर त्यात काहिच विचीत्रं वाटत नाही. माझ्या मते settled असणे ही एक मानसिक अवस्था आहे शारिरीक किंवा भौतिक ही नाही.
या जगात सगळंच क्षणोक्षणी बदलत असतं. अगदि आपल्या शरिरातील पेशीसुधा बदलत असतात. जे आपण काही क्षणांपूर्वी असतो ते आपण काही क्षणांनंतर नसतो. हे सगळं इतकं सूक्ष्मरित्या चालू असतं की आपल्याला त्याची जाणीवसुधा होत नाही. वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयाचा............. कायमस्वरूपी असं काहिच नाही. आपल्याला त्याची जाणीव नसते इतकंच. सगळ्याच जड वस्तुंमध्ये हे जडत्व (inertia) असते. सहजासहजी आपल्या स्थितीमधील बदल कोणीच स्विकारत नाही. म्हणून मानसिक त्रास होतो. जरा बदल झाला तरी बरयाच जणांना तो आवडत नाही. मग सर्व तक्रारी (मुख्यतः शारिरीक) चालू होतात. पण हेच बदल जर मानसिक द्दृष्ट्या स्विकारले तर मन स्थिर (settle) होतं. हे काही खूप अवघड आणि आध्यात्मिक आहे असं मला तरी वाटत नाही. फक्त समजून घ्यायला पाहिजे. यामुळे आपण जीवनाचा अधिक आनंद घेवू शकतो असं मला वाटतं.
असं विंचवाचे बिरहाड पाठीवर सारखी स्थिती असली की सामानही कमी रहाते..........म्हणजे गरजे पुरते....स्वछता आणि आवराआवरी करायलाही सोपे. जास्त संग्रह नसल्याने एखादी गोष्ट काम झाल्यावर फेकून देतांना त्रास होत नाही.........किंवा गोंधळही होत नाही........की काय फेकायचे आणि काय नाही ते. आपल्याला काय वाटतं या विषयी??