Sunday, 16 January 2011

पुणं तिथं सगळंच उणं!!

मी जेव्हा जेव्हा पुण्याला जाते तेव्हा तेव्हा मला रीक्षाचा वापर करावाच लागतो. कारण पुण्यात बंगलोर किंवा मुंबई सारखी लोकल ट्रान्सपोर्ट सेवा नाही. आता पुणे स्टेशन ते आमचं घर हे अंतर गेली अनेक वर्षे किलोमीटर मध्ये एकसारखंच आहे. किंबहुना आता मार्केट यार्ड कडून पुणे स्टेशनकडे रस्ता अतिक्रमणं हटवून मोकळा आणि मोठा केल्याने लागणारा वेळ पूर्वीच्या तुलनेत पाच मिनीटांनी कमी झाला आहे. पण दरवेळी रीक्षाच्या मीटर मध्ये याच किलोमीटरचं प्रमाण नेहमी वाढतं असतं. रेल्वे स्टेशनमधुन बाहेर आलेला प्रत्येक माणूस हा पुण्यात पहिल्यांदाच पाऊल ठेवतो आहे अशाच थाटात पुण्यातील रीक्षावाले वागत असतात. एकतर पहिल्यांदा मीटरप्रमाणे जायला कोणी तयार नसतं. डायरेक्ट ९० रूपये मागून मोकळे होतात. मीटरप्रमाणे (अगदी भाडेवाढ गृहीत धरली तरी) ३६ रूपयाच्या वर भाडं होत नाही. मग एखादा मीटरप्रमाणे जायला तयार झालाच तर माझ्या बरोबर अश्वमित्रला (गोर्‍या फॉरीनरला) बघुन आम्ही रीक्षात बसतानाच मीटरचा कान चार-पाच वेळा पिळून मीटर फास्ट करून ठेवतात. मला अजुनही हे मीटरचा कान पीळण्यामागचं गौडबंगाल समजलेलं नाहीये. मी तर सरळ एकदा रीक्षावाल्यांना म्हणाले की आहो तुमचा मीटर फास्ट आहे. रीक्षाच्या भाड्यांमध्ये जरी वाध होत असली तरी आमच्या घरापासूनचं स्टेशनचं अंतर गेली अनेक वर्षे बदलेलं नाहीये. त्यामुळे मीटर मध्ये येणारे किलोमीटर रीडींग तर सारखंच असायला हवं. तरी त्या रीक्षावाल्याने मान्य केलं नाही. मग एकदा मी एका रीक्षावाल्याला पोलीस चौकी जवळ आल्यावर म्हंटलं, "चला आपण रीक्षा पोलीस चौकीत नेऊयात. तुमच्या रीक्षाचा मीटर फास्ट आहे." झालं रीक्षावाला एकदम नरमाईत, "कशाला ताई? तुमच्या हिशोबाने किती होतात ते सांगा. मग माझ्या मीटरप्रमाणे कीती होतात ते बघु आणि मग ठरवू किती पैसे घ्यायचे ते." आता इतरांना प्रश्न पडला असेल की जर रीक्षाच्या अशा भानगडी आहेत हे माहीती आहे तर रीक्षाने जायचं कशाला? पण पुण्यात पीएमपीच्या बसेसची सेवा भयंकर या कॅटेगरीत मोडणारी आहे. बस अतिशय जुन्या, अस्वच्छ, प्रवाशांना बसायलाच जेमतेम जागा तर त्यात परगावहून आलेल्या लोकांना सामान ठेवायला स्वतंत्र अशी जागेची सोय नाही, बसची असलेली कमी संख्या, कमी वारंवारीता त्यामुळे प्रत्येक रूटवर प्रचंड गर्दी. यासगळ्यातच लांबचा प्रवास करून आलेल्या व्यक्तींना कधी एकदा पटकन घरी पोहोचतोय असं होतं म्हणून सद्य स्थितीत बस घेणं शक्यच नाहीये.
पुण्यात एकूणच शासनकर्ते, पीएमपीएम वाले आणि रीक्षावाले यांची इतकी छान भट्टी जमली आहे. शासनाने दर पंधरा दिवसांनी पेट्रोल दरात आडीच ते तीन रूपयांनी वाढ करायची. त्यामुळे सगळेच भाव गगनाला भिडतात. कारण पेट्रोल-डिझेल शिवाय साधा भाजीपाला सुद्धा वाहून आणला जात नाही. मग याच महागाईच्या नावाखाली पेट्रोल दरवाढ झाली की पुण्यातील रीक्षावाले बेसीक फेअर वाढवण्याची मागणी करतात. बरं या रीक्षावाल्यांमध्ये प्रामाणिकपणा फारच कमी आढळतो. भाडेवाढ करतानाच इलेक्ट्रॉनीक मीटर बसवण्याची सक्ती केली आहे पण इलेक्ट्रॉनीक मीटर या लोकांना बसवायचा नसतो. पुणे स्टेशनला एशीयाड बस स्टॅंड्च्या बाहेर प्रीपेड रीक्षाचा एकच काऊंटर आहे आणि बहुतांशवेळा तो बंदच असतो. ९०% रीक्षावाले भाडे दर्शवणारं कार्ड दाखवत नाहीत. मनाला येईल ती रक्कम झालेलं भाडं म्हणून सांगतात. मग आपण कार्ड बघायला मागीतलं की ४-५ रूपयाचा फरक दिसतोच. एकदा तर पुण्यात रीक्षाचं बेसीक भाडं वाढून पुन्हा कमी झालं होतं. तर हे रीक्षावाले स्वत:च्या सोयीप्रमाणे आधीचं भाडेवाढ असलेलं कार्ड दाखवून पैसे घ्यायचे. नेहमी पुण्यात रीक्षाने प्रवास करणार्‍याला हा फरक समजू शकतो पण दर काही महिन्यांनी येणार्‍याला हा फरक समजत नाही. पुण्यातील ९०% रीक्षाचालक प्रचंड उद्धट आहेत. खरंतर रीक्षा चालवण्यासाठी म्हणून तुम्ही रस्त्यावर आणलीत की कितीही अंतरा पर्यंतचं भाडं असू देत (जवळ किंवा लांब) रीक्षावाल्यांनी प्रवाशाला नाही म्हणायचं नाही असा कायदाच आहे. पुण्यातील रीक्षावाले हमखास हा नीयम धाब्यावर बसवतात. संपूर्ण देशात पुण्यातील पेट्रोलचे दर हे सर्वात जास्त आहेत.
पुण्यात दुचाकींची संख्या सर्वाधिक असण्यालागचं कारणही हेच आहे. ज्यांच्याकडे चारचाकी आहे अशांना प्रत्येक ठीकाणी चारचाकी घेऊन जाणं शक्य नसतं. पुण्यातील रस्ते हे पादचार्‍यांना आजीबात अनुकुल नाहीत. पदपथांवर एकतर पथारी पसरून विक्रेत्यांनी अतिक्रमण केलेलं असतं नाहीतर दुचाकीस्वार दुचाकी चालवताना आढळतात. पुण्यात म्हणे दोन वर्षांपूर्वी कुठलेतरी गेम्स झाले त्यावेळी प्रचंड खर्च करून पुण्याचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला होता. बीआरटी प्रकरण तर औरच आहे. बीआरटी असलेल्या कोणत्याही रस्त्यावर आपण गेलो तर प्रचंड विनोदी चित्र पहायला मिळतं. सायकल ट्रॅक मध्ये चारचाकी गाड्यांनी पार्कींग केलेलं असतं. सायकल्स्वार स्वत:ची सायकल आणि जीव दोन्ही सांभाळत दुचाकी आणि चारचाकी यांच्या ताफ्यातून वाट काढत असतात. दुचाकीस्वार पदपथांवरून दुचाकी चालवत असतात. बीआरटी मार्गावरून केवळ पीएमपी आणि बीआरटीच्याच बस न धावता इतर वाहने सुद्धा धावत असतात. यासगळ्या वाहत्या रस्त्यांवर रस्ता क्रॉसकरणे म्हणजे एक मोठं दिव्यच आहे.
म्हणजे एकूणच पुण्याच्या सर्व पायाभूत सुविधांचा शक्यतेवढा बट्याबोळ करून ठेवून "पुणं तिथं काय उणं" च्या ऐवजी "पुणं तिथं सगळंच उणं" अशी उक्ती प्रचलीत करण्याचा प्रघात चालू झाला आहे.
पुण्याची अशी स्थिती का आहे याचा जर आपण विचार केला तर लक्षात येईल की पुण्यात अतिशय अयोग्य आणि कमकुवत राजकीय प्रतिनीधी आहेत. अयोग्य याअर्थी की ते पुण्याच्या विकासाचा, पुण्यातील नागरीकांचा विचार करत नाहीत आणि कमकुवत याअर्थी की भ्रष्ट राजकारण्यांना खाली खेचण्याची ताकद अस्लेल्या नेतृत्त्वाचा सर्वच राजकीय पक्षांमध्ये अभाव. पुण्यात कॉंग्रेस सोडलं तर इतर राजकीय पक्षांमध्ये नेतृत्त्वाचा अभाव आहे. कॉंग्रेसचे नेतृत्त्व म्हणजे गेली बरीच वर्षे निवडुन येणारे भ्रष्ट खासदार आणि राष्ट्रकुल सकट क्रिडा क्षेत्रातील इतर घोटाळ्यांचे सर्वेसर्वा सुरेश कलमाडी. इतका भ्रष्टाचार करूनही ही व्यक्ती पुण्यातून निवडुन येण्यामागे पुण्यातील निष्क्रीय राजकीय पक्षांचे लोक तसेच पुण्यातील मतदान न करणारे, स्वत:च्याच आयुष्यात मशगुल असलेले मध्यमवर्गीय-उच्चमध्यमवर्गीय लोक जबाबदार आहेत. सर्वच राजकीय पक्षांत तसेच प्रशासकीय अधिकार्‍यांत भविष्यवेध आणि नियोजन याचा प्रचंड अभाव आहे. एक रस्ता महापालीकेने नविन बनवला असेल तर तीसर्‍याच दिवशी ड्रेनेज लाईन साठी म्हणून किंवा टेलीफोन लाईनच्या दुरूस्तीसाठी म्हणून नविन तयार केलेला रस्ता खणला जातो. रस्ता खणण्याचं या लोकांना माहीती. मग नंतर तो नीट एकसारखा करून दुरूस्त करणं म्हणजे काय असतं ते ह्या लोकांना आजतागायत माहीती नाही. पुण्यात आज कोणत्याही पक्षाकडे असं नेतृत्त्व नाहीये की ज्या व्यक्तीकडे, त्या व्यक्तीच्या चारीएत्र्याकडे तसेच काम करण्याच्या क्षमतेकडे बघुन लोक  त्यांना मतदान करतील. कॉंग्रे-राष्ट्रवादी केवळ भ्रष्टाचार आणि गुंडगीरीच्या बळावर सत्तेत येत आहेत. शिवसेना आणि मनसे एकमेकांच्या लाथाळ्यात आणि एकमेकांना शह-काटशह देण्यात गुंतलेले आहेत. भाजपामध्ये राष्ट्रीयस्तरावर नेत्यांमध्ये चालू असलेल्या वादामुळे स्थानीक नेतृत्त्व निवड आणि क्षमता वाढ याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. मग आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी जरी पंतप्रधान पदाचे उमेद्वार म्हणून प्रोजेक्ट केले तरी काहीही उपयोग होणार नाही. एक व्यक्ती निस्पृह असून चालत नाही. त्या व्यक्तीच्या आजूबाजूचे लोकही त्या व्यक्तीला साथ देणारे लागतात. गुजरात मध्ये नरेंद्र मोदींनी जो करीष्मा करून दाखवला आहे तो इतर ठीकाणी दाखवणं खरंच शक्य आहे.......सध्याच्या स्थितीमध्ये?

Friday, 14 January 2011

रडीचा डाव...!!

लेखाच्या नावावरून तुम्ही ताडलंच असेल की लेख रडीच्या डावाच्या खेळावर आधारित आहे. फक्त हा रडीचा डाव लहानपणीच्या खेळातला नसून मोठ्या मोठ्यांच्या खेळातला आहे. अगदी परवाच टीव्ही वर एक जाहीरात बघीतली. "डाग चांगले असतात वाली" की ज्यामध्ये एका मुलाला (त्याची शाळेच्या गणवेषातली पॅंट खाली घसरल्याने मुलं त्याला चिडवत असतात आणि बाईंनी सस्पेंड करायची धमकी दिल्यावर तोच मुलगा आम्ही सॅक रेसची प्रॅक्टीस करत होतो असं सांगून बाजू सावरून घेतो. आणि पुढच्याच क्षणी त्याच्या वर्ग मित्रांना आपली चूक समजून ते त्याच्या मध्ये सामील होतात. काय गंमत आहे नाही. आपण लहान मुलांच्या जगात अनेक गोष्टी होताना बघतो आणि त्यावेळी ते लहान असतात म्हणून हसून सोडूनही देतो. लहान मुलं सुद्धा त्यांची झालेली भांडणं झटक्यात विसरतात आणि पुढच्या क्षणाला एक होतात. बर्‍याचवेळा आपण हे दृष्य बघतो की लहान मुलं जबरदस्त भांडतात. मग त्यावरून त्यांचे मोठे एकमेकांशी भांडतात. मोठ्यांचं भांडण तसंच रहातं पण लहान मुलं काही वेळाने भांडण विसरून एकत्र खेळायला सुरूवात करतात. मग आपण मुलांची भांडणं झाली की त्यांना असं का म्हणतो की "लहान मुलांसारखं काय वागतोयस"? खरंतर मोठी माणसंच घडलेल्या मनात धरून त्याप्रमाणे वागत असतात. लहान मुलं एकदम निरागसपणे सगळं सोडून देतात. मग हे असं का? हा प्रश्न मला नेहमीच पडतो.
आज मकर संक्रांत! सगळेच "तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला" असं म्हणतात. पण आपल्याला हे पक्क माहीती आहे की गोड गोड बोलणारे सगळेच चांगल्या हेतूने गोड बोलत नाहीत. किंबहुना आपण असं अनुभवतो की अधिक गोड बोलणारेच गळा कापतात. आपले राजकारणी नाही का, निवडणुकांसाठी मतं मागत हिंडताना एकदम गोड गोड बोलतात आणि मग एकदा का सत्तेवर आले की सर्वच बाजूंनी जनतेचे गळे कापतात.........स्वत:च्या तुंबड्या भरातात. लहान मुलांच्या खेळामध्ये अजुन एक प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे एखाद्याच्या मालकीचे खेळाचे साहित्य असेल किंवा एखाद्याच्या घरात किंवा घराच्या अंगणात सगळे खेळत असतील किंवा एखाद्याचे आई-वडील त्यातल्यात्यात पॉवरफुल्ल असतील तर तो मुलगा अथवा ती मुलगी लगेच मी सांगेन तेच व्हायला पाहीजे असं करून घेतांना दिसते. म्हणजे समजा क्रिकेट खेळत असताना साहित्य त्या मुलाच्या मालकीचं असेल तर कितीही वेळा आऊट झाला तरी जोपर्यंत त्याला बॅटींग करायची आहे तोपर्यंत तो आऊट नाही द्यायचा. लहान असताना ठीक आहे त्याचा इतरांच्या आयुष्यात फारसा फरक पडत नसतो पण हीच सवय मोठेपणीसुद्धा चालू ठेवली तर सगळ्यांनाच डोके दुखी होते.

आता थोडं स्पष्टच सांगायचं तर आपल्या भारत सरकार मधील राजकीय तसेच बाबू लोकांचं उदाहरण घेऊया. ’कॅग’ समीतीने २-जी स्पेक्ट्रमचा घोटाळा झालाय असा अहवाल दिला......(म्हणजे यात सरकारची विकेट गेली....) पण कपिल साहेब (एक दीड महिन्यानंतर) ’कॅग’चा अहवाल चुकीचा आहे म्हणून डंका पिटायला लागले. कॉंग्रेस्ने आतापर्यंत सत्तेत असताना सगळ्याच तपास यंत्रणा तसेच पोलीस यंत्रणांचा वापर असा ’रडीचा डाव’ खेळण्यासाठी करून घेतलेला आहे. १९८४ च्या दंगलींमधील आरोपींची विनाशर्त आणि विनाआरोप सुटका हे त्याचं एक ताजं उदाहरण आहे. बोफोर्स प्रकरणातील क्वात्रोचीला जामीन मिळवून देऊन देशाबाहेर पलायन करण्यास मदत करून आता पुन्हा त्याचे नाव वर आल्यावर तो निर्दोष असल्याची याचिका सीबीआय मार्फतच दाखल करणे हे दुसरे ताजे उदाहरण. आदर्श घोटाळा, राष्ट्रकुल घोटाळा, गुलमोहर घोटाळा इ सगळ्या घोटाळ्यांच्या बाबतीत तेच होणार आहे जे बोफोर्स आणि २-जी मध्ये झालंय. इथे देशाच्या आणि देशवासीयांच्या घामाच्या संपत्तीची लूट केली गेलीय. देशासाठी प्राणार्पण करणार्‍या अनेक सिनिकांच्या बलिदानाची खिल्ली उडवली जाऊन त्यांच्या कुटुंबियांची फसवणुक केली गेलीय.

आता त्या २६/११ च्या हल्ल्यात सुद्धा कसाब पकडला गेला. त्याचावर खटला चालवण्यात आला. त्याच्यावरचा आरोप अनेक साक्षी-पुराव्यांनीशी सिद्ध होऊन त्याला फाशीची शिक्षा सुनावण्याचं नाटकही झालं. पण आता कोणा स्वामी असीमानंदांच्या एका साक्षीचं  (ही सुद्धा खरी आहे की नाही याबाबत काहीही ठोस पुरावा नाही) सूत गाठून २६/११ चा बाकी हल्ला पाकीस्तानी अतिरेक्यांनी केला पण करकरेंना एकट्याला हिंदू अतिरेक्यांनी कामा हॉस्पिटलच्या गल्लीत गाठून मारलं असा जावई शोध लावला जातो आहे. करकरेंना हिंदू अतिरेकी मारत असताना त्यांच्या बरोबर असलेले इतर अधिकारी श्री कामटे आणि साळसकर पहात बसले होते का? की त्यांना देखिल हिंदू अतिरेक्यांनीच मारलं असं पुढे आणलं जाणार आहे. कसाब, अफजल गुरू यांच्याबाबतीत इतकी तत्त्परता दाखवून कोणीच नार्को टेस्ट वगैरे केली नव्हती. पण मालेगावच्या संदर्भात मात्र अगदी तत्त्परतेने नार्को टेस्ट करून बेकायदेशीरपणे संशयीत म्हणून पकडलेल्यांची बदनामी करण्याचं कंत्राटच एटीएसने इलेक्ट्रॉनीक प्रसारमाध्यमांना दिलं होतं. ते त्यांनी व्यवस्थित पूर्ण केलं. सध्या स्वामी असीमानंद या व्यक्तीला हाताशी धरून प्रचंड उलट सुलट माहीती इलेक्ट्रॉनीक प्रसारमाध्यमं हिंदूदहशतवाद, हिंदूदहशतवादी या नावांखाली पुरवत आहे. हे सगळं कुठपर्यंत प्री-प्लॅन्ड आहे, ह्याची पाळंमुळं कुठं आहेत हे सगळ्यांच्या आतापर्यंत समोर आलं असेलच. तरी पुन्हा एकदा ज्यांना हे लक्षात आलं नसेल त्यांच्यासाठी स्प्ष्टपणे लिहीणं हे मी माझं कर्तव्य समजते.
१) नुकतंच वीकी-लिक्स च्या भांडा फोड मध्ये राहूल गांधीनी अमेरिकन परराष्ट्रमंत्रालयातील अधिकार्‍यांशी वार्तालापात "हिंदूदहशतवाद" हा शब्द वापरला हे उघड झालं. रडीच्या डावाप्रमाणे त्यांनीही घुमजाव केले आणि कोणताही दहशतवाद अशी मखलाशी केली.
२) २६/११ चा हल्ला झाल्या झाल्या तत्कालीन केंद्रीय मंत्री ए आर अंतुले यांनी करकरे यांच्या शहीद होण्यावरच प्रश्नचिन्ह उभं केलं होतं आणि हिंदू अतिरेक्यांनी करकरेंना मारलं असा सूरच लावला होता. त्यावेळी वातावरण प्रचंड गरम असल्याने त्यांची डाळ शिजली नाही आणि लगेचच्या निवडणुकीत त्यांना जनतेने घरी बसवलं. तरी हा सगळा एका मोठ्या षडयंत्राचा भाग आहे अशी शंका येण्यास वाव आहे. कोणते षडयंत्र ते पाहण्यासाठी आधी अजुन काही तपशील बघुयात.
३) कॉंग्रेसचे एक ज्येष्ठ नेते, दिग्वीजय सिंग यांनीही विकी लिक्सच्या भांडा फोड प्रकरणानंतर लगेचच ए आर अंतुले यांचं २००८ सालचं वक्तव्य उचलुन धरलं.
४) विरोधी पक्षांनी कॉंग्रेसनेत्यांच्या या प्रचंड भ्रष्टाचाराविषयी रणशिंग फुंकण्यास सुरूवात केली.
४) ताबडतोब (कुठुनतरी) असीमानंद प्रकरण बाहेर काढलं आणि सगळीकडे कॉंग्रेसने केलेल्या घोटाळ्यांच्या बातम्यां ऐवजी हिंदू दहशतवाद, आरएसएसचा दहशतवादी आणि राष्ट्रद्रोही संघटनांमध्ये उल्लेख चालू करणे नव्हे त्या दृष्टीने अर्व इलेक्ट्रॉनीक माध्यमांत मोहीमच चालू करणे.
५) २६/११ मधील तपासाची एक दिशा आणि श्रीमती विनीता कामटे आणि श्रीमती करकरे यांनी "त्यांच्या नवर्‍यांना कंट्रोलरूमकडून अतिरेक्यांच्या ठीकाणाविषयी चुकीची आणि अपुरी माहीती पुरवली गेल्या संदर्भातील तसेच त्यांना योग्यवेळी शक्य असूनही मदत न पुरवल्या संदर्भातील अजुनही अनुत्तरीत राहीलेल्या प्रश्नांना दिलेली पद्धतशीर बगल. कंट्रोल रूममधील तेव्हाचे पोलीस अधिकारी राकेश मारीया, तसेच त्यावेळचे पोलीस आयुक्त अनामी रॉय यांच्यावर कॉंग्रेसचा कृपाहस्त अजुनही आहे.........या दोघांच्या संदर्भातच श्रीमती विनीता कामटे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
६) अमेरिकी तपास यंत्रणांनीसुद्धा २६/११ च्या हल्ल्यातील पाकीस्तान आणि लष्करे तैय्यबाचं कनेक्षन बाहेर काढलं.
७) मुंबई पोलीसांकडूनच करकरेंचं सो-कॉल्ड बुलेट-प्रुफ जॅकेट हॉस्पीटल मधून गहाळ (गायब केलं गेलं) झालं.
८) दिग्विजय सिंग यांनी २६/११ रोजी त्यांचं आणि करकरे यांचं झालेलं दूरध्वनी संभाषण याचा पुरावा दिला (पण नक्की काय संभाषण झालं हे गुलदस्त्यातच आहे)

मला संशय येत असलेलं षडयंत्र:

गुजरात मधील गोध्रा प्रकरण आणि दंगलींनंतर नरेंद्र मोदींची "मौत का सौदागर" अशी कुप्रसिद्धी करूनही काहीही फरक पडला नाही कारण "कर नाही त्याला डर कशाला" हेच बाहेर आलं. गुजरात मधील आतापर्यंतच्या शांततापूर्ण वातावरणाने, आर्थिक प्रगतीच्या घोडदौडीने तसेच नरेंद्र मोदींनी पुन्ह:पुन्हा मुख्यमंत्री म्हणून निवडून येणे यामुळे सिद्ध झालंच आहे.
संपूर्ण भारतभर विशेषत: हिंदू मंदिरांमधील बॉंब स्फोटांमध्ये सीमी आणि मुस्लीम लोकांचीच नावं बाहेर येत असल्याने कॉंग्रेसला आपल्या मतपेटीवरचा ताबा सुटेल की काय अशी भिती वाटू लागली. त्यामुळे त्यांनी सीमीच्याच लोकांच्या मदतीने समझौता एक्सप्रेस, हैद्राबाद मधील मशीद आणि मालेगाव स्फोट ह्यामध्ये हिंदू संघटनांच्या तसेच लष्करातील काही सोयीच्या नसलेल्या अधिकार्‍यांना गुंतवण्याचा कट रचला. त्याच बरोबर २६/११ चा कटही रचला गेला. काही मोजक्याच लोकांना याची माहीती असणार. २६/११ चे अतिरेकी हे गुजरात हद्दीतून आले म्हणून गुजरात सरकारच्या सुरक्षा क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उमटवण्याचाही यात कट होता. खर्‍या अर्थाने धर्मनिरपेक्ष करकरे यांनी जेव्हा मालेगाव बॉम्ब स्फोटाची सूत्रे हाती घेतली तेव्हा त्यांनाही हे काम हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केलं असेच पुरावे पुढे करण्यात आले. मग त्या सगळ्यांच्या बेकायदेशीर नार्को टेस्ट्स आणि त्याचे बेकायदेशीरपणे इलेक्ट्रॉनीक प्रसारमाध्यमांमधून प्रक्षेपण केले जात होते. करकरेंवर "वरून" तशाप्रकारचा दबाव येत होता. त्यांनी मला हिंदू संघटनाम्पासून धोका आहे असं वक्तव्य करण्याचाही दबाव येत होता. श्रीमती कविता करकरे यांनीच स्पष्ट केलं की श्री करकरे यांना हिंदू संघटनांकडून धोका आहे असं आजीबात वाटत नव्हतं. असं जर असतं तरे ही बाब त्यांनी स्वत:च्या पत्नीशी एकदा तरी उघड केली असती. त्याच सुमारास अधिक खोलवरच्या तपासात यात यासगळ्यांना गोवले गेल्याचं करकरेंच्या लक्षात आलं असेल. त्यांनी तसा कॉन्फीडेन्शीअल रीपोर्ट वरीष्ठांपर्यंत पोहोचवला असेल. याच संदर्भात करकरे यांनी कदाचित दिग्विजय सिंग यांना २६/११ ला फोन लावला असेल. यासगळ्यात अनामी रॉय आणि राकेश मारीया काहीही करत नसल्याचेच त्यांच्या निदर्शनास आणून द्यायचे असेल. त्याच दरम्यान २६/११ हल्ला झाला. यासगळ्यांना आयतीच संधी मिळाली करकरे, कामटे आणि साळसकर या तिघांचाही काटा काढण्याची. कामटे हे अतिशय कर्तव्य तत्त्पर आणि निधड्या छातीचे अधिकारी होते. साळस्कर तर शार्प शूटर असल्याने तसेच त्यांनी अनेक एनकाऊंटर्स केल्याने ते गुंड आणि पोलीस अधिकार्‍यांचं लक्ष असणार. 
म्हणूनच करकरेंना निकृष्ट दर्जाचं "बुलेट-प्रुफ" (??) जॅकेट घालायला दिलं गेलं. पूर्व भागातील अधिकारी कामटे यांना मुद्दामहून दक्षिण मुंबईत तातडीने करकरे यांच्या बरोबर राहण्यासाठी बोलावून घेण्यात आलं. साळस्करांना त्या दोघांच्या मदतीला पाठवलंय असं दाखवण्यात आलं. तिघंही एकाच जीप मधून सीएसटी कडे जात असताना मध्येच कंट्रोलरूमकडून अतिरेकी कामा हॉस्पीटलकडे पळाल्याची आणि तिथे गोळीबारात एक पोलीस इन्स्पेक्टर जखमी झाल्याची माहीती दिली जाते. पण अतिरेकी नक्की कुठे आहेत याची माहीती नंतर या तिघांपासून पद्धतशीरपणे लपवली जाते. हे तिघेही नेमके अतिरेकी ज्या गल्लीत मुक्त संचार करत होते त्याच गल्लीत जातात. (काही स्थानीक नागरीकांनी अतिरेकी कामा हॉस्पीटलच्या मागच्या गल्लीत फिरत असल्याची सूचना हे तिघे अधिकारी तिथे पोहोचण्याआधी पोलीस कंट्रोलरूमला दिली असल्याचे पुरावे आहेत.) तिथेच या तिघांवर अतिरेकी हल्ला होतो आणि त्यात तिघेही जबर जखमी होतात. हे सगळं एका पोलीस चौकीपासून अवघ्या काही मिनीटांच्या अंतरावर घडलेलं आहे. त्याचवेळी एक पोलीस पेट्रोलींगची व्हॅन तिथून भरधाव वेगाने गेल्याचं प्रत्यक्ष दर्शी नागरीकांनी आपल्या साक्षीत नमूद केलं आहे. तसेच त्या हल्ल्यात जीवंत वाचलेले एकमेव पोलीस शिपाई त्यांच्या साक्षीतूनही हे सिद्ध झालेलं आहे. त्या पोलीस पेट्रोलींग व्हॉनला अतिरेक्यांच्या गोळीबाराचा आवाज सुद्धा आला नाही आणि गणवेषात रक्ताच्या थारोळ्यात पडलेले अधिकारीही दिसले नाहीत. खूप मोठं आश्चर्य आहे. का ती व्हॅन या तीनही अधिकार्‍यांना खरंच गोळ्या लागल्या आहेत की नाहीत याची खात्री करण्यासाठी आली होती? हल्ल्यानंतर तब्बल चाळीस मिनीटे ह्या जबर जखमी अधिकार्‍यांना अतिशय तत्त्पर अशा मुंबई पोलीस द्लाकडून (??) मदत मिळत नाही. साळस्कर तर हॉस्पीटल मध्ये जाईपर्यंत जीवंत होते. हे असं का घडलं याचा कुणालाही विचार करावासा वाटत नाही. इथे हिंदू अतिरेकी येतातच कुठे? मग आता करकरे यांच्या शहीद होण्याचा तपास हिंदू अतिरेक्यांनी मारलं या अंगाने करण्यात काय मतलब आहे? राकेश मारीयांनी पोलीस कंट्रोलरूम मध्ये बसून करकरे, कामटे आणि साळस्कर यांच्यावरील प्राणघातक हल्ला कंट्रोल केला असं म्हंटलं तर त्यात काय चुकीचं आहे? २६/११ च्या हल्ल्याची, तो आटोक्यात आणण्यात उशीर लागण्याची जबाबदारी राकेश मारीया यांचीही तेवढीच आहे जेवढी तत्कालीन गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची होती. यांपैकी फक्त दोघांनी राजीनामे दिले ते सुद्धा तोंडदेखल्या सारखे. नंतर त्यांचं अधिक वरच्या जबाबदारीत पुनर्वसन झालं तो भाग निराळा. राकेश मारीयांना तर चक्क बढती देण्यात आली. हे सगळं सोयीस्कररित्या कसं दडपलं जातं. काय चालू आहे हे? आणि ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रप्रेमा विषयी कोणीही शंका घेण्याची शक्यताच नाही कारण त्या संघटनेमध्ये काही मूलतत्त्ववाद असेल पण राष्ट्रप्रेम हा त्या संघटनेचा मूलभाव आहे. अशा रास्वसंघालाच राष्ट्रद्रोही ठरवून आपल्या विरोधातील, भ्रष्टाचाराच्या रस्त्यातील मोठा अडधळा दूर करण्यासाठी पाकीस्तानी अतिरेक्यांच्या मदतीने कॉंग्रेसनेच हे सगळं भलं मोठं षडयंत्र रचलं आहे. म्हणूनच राहूल गांधी थेट अमेरिकेतील अधिकार्‍यांना असं सांगू शकतात की भारताला अल-कायदा आणि लष्करे तैयब्बाच्या अतिरेक्यांपासून धोका नसून हिंदू मूलतत्त्ववादी संघटनांपासून धोका आहे. अगदी गेल्या काही वर्षांपर्यंत भारता बाहेरच आपलं वास्तव्य ठेवलेल्या या महामूर्खाला भारतीय समाज, संस्कृती आणि राजकारण याची किती समज आहे याचे पुरावे त्याने वेळोवेळी केलेल्या विविध वक्तव्यांवरून सिद्ध होतेच. त्या महामूर्खामुळेच कॉंग्रेसच्या या कटाचे पितळ उघडे पडले ते विकी लिक्सच्या भांडा फोड मुळेच. २६/११च्या महत्त्वाच्या मुद्द्यापासून रोजची जगण्याची लढाई लढण्यात व्यस्त सामान्य जनतेचं लक्ष हटवण्यासाठी त्यासगळ्या प्रकरणातच पूर्णपणे गोंधळ सदृष्य परिस्थीती निर्माण केली जात आहे. म्हणजे मग नक्की कोणावर विश्वास ठेवावा याचा गोंधळ सामान्य माणसांमध्ये चालू होतो आणि ते त्यांचं लक्ष आपल्या दैनंदिन जीवनातील कामाकडे वळवतात. यामुळेच यालोकांचं फावत चाललं आहे. पण यामुळेच ते खर्‍या देशद्रोही आणि देशविघातक शक्तींना मदत करत आहेत. राहूल गांधी म्हणतात ते खरं आहे, कॉंग्रेस आणि अल-कायदा, लष्करेतैयब्बा यांच्यात करार नक्कीच झाला असेल. कॉंग्रेसने भारत देशातील देशप्रेमी लोकांना देशद्रोही ठरवायचे आणि लष्करे तैयब्बाने मग कॉंग्रेसवाले सांगतील तोपर्यंत हल्ला करायचा नाही. त्याचप्रमाणे कॉंग्रेसने काश्मीरमधील लष्कर काढून घेऊन काश्मीर भारतापासून वेगळा करण्यास पाकीस्तानला मदत करायची. सध्या हेच तर चालू आहे.......नीट बघीतले तर सगळं स्पष्ट आहे.

Thursday, 13 January 2011

ऐरावत आणि शिवनेरी........(प्रांतवाद नको पण निखळ सेवा बघावी)!

 ऐरावत

आजची सकाळ मधली बातमी वाचली की कर्नाटक महामंडळाची एसटी महामंडळावर कुरघोडी आणि खूप दिवस मनात होते ते लिहावे असं वाटलं. म्हणून हा सगळा खटाटोप. कर्नाटक महामंडळाच्या वोल्व्हो सेवेला ऐरावत असे म्हणतात तर महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या सेवेला शिवनेरी म्हणतात. बेळगाव मध्ये मराठी माणसांवर अन्याय होतो, मराठी लोकांना कन्नड माध्यमातच शिक्षण घ्यावे लागते त्यांच्यावर कर्नाटक सरकार अन्याय करते वगैरे वगैरे आपण वेळोवेळी वृत्तप्त्रांमधून वाचत असतो. 
केएसआरटीसी साधी बस
मला असं वाटतं की यात कर्नाटक सरकारची चूक नसून चूक महाराष्ट्र सरकारचीच आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी भ्रष्टाचार, व्यक्तीगत हेवेदावे, एकमेकांवर कुरघोडी, शह-काट शहाचे राजकारण यातच व्यस्त आहेत. म्हणून गुजरात आणि कर्नाटक सारख्या प्रगत शेजारील राज्यांचा प्रत्येक बाबतीत त्यांना असूया वाटते. मग एखाद्या गोष्टीत खरंच टीका करण्यासारखं काहीही नसताना उगाचच कारण नसताना टीकेसाठी टीका केली जाते. आता वरील बातमी वाचल्यावर प्रथम दर्शनी असं वाटेल की केएसआरटीसी किती कुरघोडी करतंय. पण सत्य वेगळंच आहे. माझ्या दोन परस्पर विरोधी अनुभवांवरून हे सिद्ध होईलच. माझ्यासारखेच इतरांना सुद्धा अनुभव नक्कीच आले असतील.

एसटीचा लाल डबा
एस टी महामंडळाची सेवा केएसआरटीसीच्या तुलनेत डावीच आहे. मला नुकताच हा अनुभव आला. मुंबईहून पुण्याला येण्यासाठी आम्ही दोघे शिवनेरीच्या दादरच्या बस थांब्यावर उभे होतो. तिकीट काढल्यावर गाडी लागली. आमच्याकडे बरंच सामान होतं म्हणून मी शिवनेरीच्या पोटात सामान ठेवण्यासाठी तिथला दरवाजा शोधायला लागले. मी बंगलोरला रहात असल्याने केएसआरटीसीने (वोल्व्होने) भरपूरवेळा प्रवास केला आहे. 
शिवनेरी
त्यामुळे वोल्व्होचा ड्रायव्हर डीकीचं दार उघडून सामान आत ठेवायला प्रवाशांना मदत करतो आणि स्वत: सामानाच्या नगांवर प्रवाशांच्या तिकीटावरील क्रमांक टाकतो. इथे ड्रायव्हरचा पत्ताच नव्हता. मी डीकीचा दरवाजा कसा उघडायचा हा विचार करत असतानाच एक खाकी गणवेषातील माणूस पुढे झाला आणि त्याने डीकीचं दार उघडलं, आमचं सामान घेतलं आणि खडूने त्यावर आमचे आसन क्रमांक घातल्यावर ते नग आत ठेवले. नेहमीच्या सवयी प्रमाणे मी गाडीत चढायला सुरूवात केली तर त्या खाकी गणवेषातील माणसाने माझ्यापुढे तोंड वेण्गाडत हात पुढे केला आणि म्हणाला, "काही चाय पाणी". मला हे नविनच होतं. हे पक्कं माहीती आहे की प्रवाशांचं सामान तिकीट चेक करून व्यवस्थित डीकीत ठेवणे हे प्रत्येक वोल्व्होच्या ड्रायव्हरचं काम असतं. (कर्नाटकात आणि परदेशातही मी हेच पाहीलं आहे) त्यामुळे मी पैसे द्यायला नकार दिला कारण मला चुकीच्या प्रथा पाडायच्या नव्हत्या. 
बंगलोर मॅजेस्टीक
मी पैसे द्यायला नकार दिल्यावर त्या माणसाने चक्क मला धमकी दिली की आमच्या सामानावरचे क्रमांक पुसून टाकून ते गायब करेन. शेवटी धसक्याने मी त्याला २० रू काढून दिले. तेव्हा दात विचकत त्याने ते घेतले आणि खिशात टाकले. आमच्या नंतर अजुन एक माणूस अशाच प्रकारे लुटला गेला. मी आत गेल्यावर पाण्याची बाटली आणि वर्तमानपत्र घेतलं नसल्याने पुन्हा तिकीट खिडकीपाशी जायला म्हणून खाली उतरले. तर हा खाकी गणवेषातील माणूस प्रवासी वाट पाहताना बसतात त्या खुर्च्यांवर बसून एकाला माझ्याकडे बोट दाखवून हसत हसत सांगत होता की मी तिला कसं धमकावलं आणि तिने मला २० रू दिले. तो ज्या व्यक्तीशी बोलत होता तो आमच्या शिवनेरीचा ड्रायव्हर होता कारण त्यानंतर लगेच तो उठून मला गाडीत चढताना दिसला. मला राग आला म्हणून त्याला मी विचारलं की शिवनेरीच्या आणि केएसआरटीसीच्या सेवेत येवढा फरक कसा काय? तेव्हा तो मला म्हणतो कसा तुम्ही कशाला दिलेत पैसे. मग तर माझा राग अनावर झाला आणि मी त्या दात विचकणार्‍या माणसाची ताबडतोब तक्रार करायची ठरवली. 
स्वारगेट एसटी स्टॅंड
 प्रश्न वीस रूपयांचा नव्हता तर एसटी महामंडळाच्या रेप्युटेशनचा होता. मी तक्रार करायला जाते आहे हे जेव्हा त्या दात विचकणार्‍याच्या लक्षात आलं तेव्हा मला त्याने दहा रूपये परत केले आणि म्हणाला मी तुम्हाला दहा रूपये परत देणारच होतो पण तुम्ही लगेच गाडीत चढलात. मी जाऊन तक्रार केली. त्यांना घडलेला प्रकार सांगीतला आणि हे सुद्धा सांगीतलं की तो माणूस एसटी महामंडळाची लाज घालवतोय असं वागून. तेव्हा त्या अधिकार्‍यांनी मला सांगीतलं की तो एसटीचा कर्मचारी नाही. त्याला बोलावून समज देणार तर त्या माणसाने उरलेले दहा रूपये माझ्या हातावर ठेवले. आणि त्या अधिकार्‍याला म्हणाला यांनीच मला सामान उचलायला सांगीतलं म्हणून मी सामानाला हात लावला. आता या चालू झाल्या चोराच्या उलट्या.....
त्यानंतर आठच दिवसांनी आम्ही पुण्याहून (स्वारगेट बस स्टॅंडहून) बंगलोरला जायला कर्नाटक महामंडळाची ऐरावत धावतच गाठली. तर ड्रायव्हर आणि कंडक्टर दोघंही खाली उतरून एकाने तिकीटं तपासली आणि दुसर्‍याने सामान आपण्हून उचलून डीकीत ठेवले. (सामान ठेवताना कुठे उतरणार हे विचारायला तो विसरला नाही म्हणजे त्याप्रमाणे सामानाची जागा ठरवली) तसेच एका चिठ्ठीवर दोन बाजूंना क्रमांक चालून एक तुकडा सामानावर व्यवस्थीत बांधून एक तुकडा आमच्याकडे दिला. मला नेहमीच ऐरावत सेवा आवडते. नाहीतर शिवनेरीची सेवा..........तोंड बघा असंच म्हणावं लागतं.
कर्नाटक राज्याच्या साध्या गाड्या पण एकदम स्वच्छ आणि हवेशीर असतात. त्यांमधील आसन व्यवस्था एकदम व्यवस्थीत, सुटसुटीत तसेच वरच्या बाजूला सामान ठेवायला भरपूर मोकळी जागा असते. त्यांचे रंगही अतिशय ताजेतवाने आणि नवीन असतात. गेली अनेक वर्षे मी या गाड्या पुणे मुंबई मार्गे कर्नाटकातील अगदी शिमोगा वगैरे छोट्या शहरांपर्यंत धावतात हे सुद्धा बघीतलं आहे.  केएसआरटीसी चे बस थांबे सुद्धा अतिशय स्वच्छ आणि प्रशस्त असतात. त्या उलट एसटी च्या गाड्या प्रचंड धुळीने माखलेल्या, हवा जेमतेम, सामान ठेवायला वरच्या बाजूला अत्यंत तोकडी जागा, आसन व्यवस्था अत्यंत टुकार, गाडीच्या बाहेरून प्रवाशांचे ओकार्‍यांचे डाग तसेच वाळलेल्या अवस्थेत असतात. म्हणजे ते वास घेऊन आणि तसली अस्वच्छता बघून एखादा आजारी नसलेला आजारी पडायचा अशी अवस्था. एसटीच्या गाड्यांचा तो आदीम काळापासूनचा लाल डबा रंग कधीच बदलेला नाही. एसटीच्या बस थांब्यांची कल्पना पुण्याच्या स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन, दादरच्या शिवनेरी बस स्थानकावरून केलेली बरी.

तात्पर्य असं आहे की आपण कोणत्याही बाबतीत एसटी महामंडळ आणि कर्नाटक महामंडळाच्या गाड्यांची तुलना केली तर सर्वच बाबतीत (अगदी गाड्यांची स्वच्छता, गाड्यांची एकूण स्थिती, गाड्यां मध्ये मिळणारी सेवा) कर्नाटक महामंडळ उजवं आहे. मला नेहमी हा प्रश्न पडायचा की बंगलोरहून पुण्यासाठी अगदी मुंबई-शिर्डी पर्यंत रोज केएसआरटीसीच्या गाड्या आहेत. तशाच उलट्या दिशेला पण आहेत. हेच एस टी महामंडळाच्या का नाहीत? अगदी पुण्याहून लातूरला जाताना सुद्धा शिवनेरी पेक्षा खाजगी प्रवासी कंपन्यांचीच सेवा असते. असं का? याचा एस टी महामंडळ तसेच महाराष्ट्र सरकार यांनी विचार करायला हवा. राज्यकर्तेच भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले असताना सरकारी संस्थांकडून तरी दुसरी काय अपेक्षा ठेवणार?