Thursday, 30 September 2010

अजि सोन्याचा दिनु!!गेली कित्येक वर्षे रखडलेला अयोध्या वादग्रस्त भूमीचा निकाल रामाच्या बाजूने लागला आणि अखेर तो सोन्याचा दिवस उजाडलाच! बर्‍याच वर्षांपूर्वी मी अयोध्येत गेले असतानाचा काळ, रामलल्लाची बाहेर एका तंबुत चाललेली पूजा सगळं सगळं आठवलं. स्वत:चं पावित्र्य सिद्ध करण्यासाठी सीतामाईला जशी अग्निपरीक्षा द्यावी लागली तशीच कठोर परीक्षा रामलल्लाला स्वत:च्या जन्मभूमीचं अस्तित्त्व सिद्ध करण्यासाठी द्यावी लागली. अयोध्या-साकेत ही दोन जुळी शहरं, जुन्या काळातील. अयोध्येतील रामायण कालातील पाऊलखुणांमुळे आक्रमक त्याचं नाव नाही बदलू शकले. पण साकेतचं नाव मात्रं फैजाबाद ठेवलं गेलं आणि ते आजही तसंच आहे. आपण कधी जर अयोध्ये मध्ये गेलात तर फैजाबादला जरूर भेट द्यावीच लागते. कारण ते जिल्ह्याचं ठीकाण आहे. तिथे सगळीकडे दुकानांवर तुम्हाला साकेत हे नाव प्रकर्षाने दिसेल आणि मग लक्षात येईल साकेत या नावाचं रहस्य.....फैजाबाद या नावाखाली दडपलं गेलेलं. जरी बाबराने तिथलं श्रीरामजन्मभूमीचं मंदीर तोडून मुस्लीम धर्माच्या विरूद्ध पद्धतीने घाईघाईत डोंब उभे केले पण मूळ बांधकामाचे काही पॅटर्न्स तसेच ठेवले. उदा. घुमटांच्या कमानींवर कमळाच्या फुलांची नक्षी, डोंबांच्या पुढील भागात असलेली पुष्करणी. त्यामुळेच मुस्लीम धर्मिय लोक तिथे कधीच नमाज पढत नसत. कारण ती मशीद आहे हेच त्यांना मान्य नव्हतं. त्यामुळे ती वास्तू तशीच भकास पडून राहीली.
    भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर अयोध्येतील लोकांच्या मनात आलं की आता रामलल्ला पुन्हा तिथे प्रस्थापित झाला पाहीजे. रामायणात अयोध्या पण अयोध्येत राम नाही हे कसं शक्य आहे. म्हणून साधारण १९४८ साली २२, २३ डिसेंबरच्या सुमारास काही महंतांनी गुपचुप रामलल्लाची मूर्ती तिथे प्रस्थापित केली. पण त्यांना रामलल्लाच्या मूर्तीची पूजा अर्चा करण्याची परवानगी नाकारली. त्यामुळे जवळ जवळ १९८९ पर्यंत राम लल्ला कुलुपात बंद होते आणि महंत लोक बाहेरच्या जागेत त्यांची पूजा करत असत. शहाबानो प्रकरणी जेव्हा राजीव गांधी सरकारने मुस्लीम पर्सनल लॉ च्या कायद्यातच सुधारणा करून मुस्लीम समाजाची मने जिंकायचा (मतांसाठी) प्रयत्न केला त्यावेळी हिंदू महासभा, विश्वहिंदू परीषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी यांच्या जागरूकते मुळे राजीव गांधी सरकारला हिंदूंना सुद्धा खुष करण्याची जाणीव झाली. म्हणून त्यांनी अयोध्येतील रामलल्लाला बंधन मुक्त केलं. हिंदूंना तिथे आत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेण्याची आणि त्याची तिन्ही त्रिकाळ पूजा करण्याची परवानगी देण्यात आली. पण हेच सय्यद बुखारी सारख्या धर्मांध मुल्लाला मानवलं नाही.....की ज्याने शहाबानो प्रकरणात सरकारला कायदा बदलण्यास भाग पाडलं होतं. सुन्नी वक्फ बोर्डाला हाताशी धरून विरोध करायला सुरूवात केली. बरं हा मुल्ला दिल्लीच्या जामा मशीदीत बसून अयोध्येतील मशीद नसलेल्या वास्तू मध्ये लोकांनी नमाज पढायला जावे असे तेथिल मुस्लीमांना सांगत होता. त्यांना चिथावत होता. एकीकडे १९९० साली हिंदू महासभेने आणि विश्वहिंदूने रामजन्मभूमीच्या ठीकाणी प्रभुरामाचे मंदीर बांधायचा संकल्प केला आणि वादाला ठीणगी पडली.
    त्यावेळी केंद्रात पी व्ही नरसिंहराव यांचे सरकार होते तर उत्तर प्रदेशात मुलायम सिंगांचे. १९९० च्या नोव्हेंबर अंताला अयोध्येत कारसेवा करण्याचा संकल्प सोडला गेला. खरंतर कारसेवा हा शब्द नसून "करसेवा" हा खरा शब्द आहे. शिख गुरूद्वारांमध्ये ही संकल्पना मूलत: अस्तित्त्वात आहे. हाताने (कराने) केलेली सेवा ती करसेवा. मग बांधकाम, स्वयंपाक करणे अशा विविध प्रकारच्या सेवा या करसेवेत येतात. हिंदू महासभा, विश्वहिंदू परीषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा यांनी प्रभुरामाचे मंदीर बांधण्यासाठी अशीच करसेवा करण्याचं ठरवलं आणि तसं तरूणांना आवाहनही करण्यात आलं. पण प्रत्यक्ष करसेवेच्या दिवशी म्हणजे २९ आणि ३० नोव्हेंबर १९९० या दिवशी मुस्लीम व्होट बॅंक वाचवण्यासाठी उप्र मधील मुलायम सिंह सरकारने करसेवकांवर अक्षरश: बंदुकीच्या गोळ्यांचा वर्षाव केला. कित्येक हजार करसेवक जखमी झाले शेकडो करसेवकांना आपले प्राण गमवावे लागले. झालेला नरसंहार दडपण्यासाठी रेल्वेच्या मालगाड्या मृत आणि अत्यवस्थ करसेवकांच्या गाड्या भरून कुठेतरी पाठवण्यात आल्या. त्या दिवसां नंतर अनेक लोकांना आपली करसेवेला गेलेली मुलं परत दिसलीच नाहीत. यात विशेषत: उत्तर प्रदेश, पंजाब आणि राजस्थान मधील करसेवक होते. हा प्रकार खूपच संतापजनक होता. पंजाब मध्ये जलियानवाला बागेत जनरल डायरने ज्याप्रकारे हत्याकांड घडवले त्याच प्रकारे मुलायम सिंगने करसेवकांवर गोळीबार करवला होता. हिंदू लोकां मध्ये संतापाची प्रचंड लाट पसरली. त्यातच उत्तर प्रदेशात निवडणुका होवून मुलायम सिंगाच्या पार्टीचा दारूण पराभव झाला. उत्तर प्रदेशात भाजपाचं सरकार आलं आणि कल्याणसिंह मुख्यमंत्री झाले. दर्म्यान अयोध्येतील हत्याकांडावर प्रसारमाध्यमे आणि केंद्रसरकार सुद्धा आश्चर्यकारकरित्या गप्प राहीले. याचा राग हिंदूंच्या मनात सलत होताच. पुन्हा डिसेंबर १९९२ मध्ये ६ तारखेला करसेवा करण्याचे निश्चित करण्यात आले. लाखो हिंदूंना देशाच्या विविध भागांतून अयोध्येत गोळा केले गेले. त्यामध्ये सर्व वयोगटातील स्त्री-पुरूष होते. ह्यावेळी कल्याण सिंह सरकारने पोलीसांना आदेश दिलेले होते की काहीही झालं तरी लाठी हल्ला सुद्धा करायचा नाही. आणि अखेर ६ डिसेंबरला अनेक वर्षांचं ठसठसणारं गळू फुटलं. म्हणजे करसेवकांना आपल्यावर होत असलेला अन्याय सहन झाला नाही. प्रभुरामचंद्राचं त्याच्याच जन्मभूमीत मंदीर नाही आणि कोण परकिय आक्रमक बाबर त्याच्या नावाच्या इमारतीचं, त्याकाळी हिंदूंच्या झालेल्या अपमानाचं, त्यांच्या अस्मितेची लक्तरं करणार्‍या इमारतीचं दर्शन त्यांना राम लल्लाच्या दर्शनाच्या वेळी घ्यावं लागत होतं. त्यामुळे अखेर ६ डिसेंबर १९९२ साली त्या इमारतीचे तीनही घुमट कोसळले (पाडले) आणि त्याबरोबर रामलल्ला मुक्त झाले. मशीद नसलेल्या जागेचा उल्लेख पंतप्रधानांनी बाबरी मशीद असा केल्याने आणि प्रसार माध्यमांनी प्रचंड उत्साहाने अतिरंजीत बातम्या दिल्याने थोड्याच काळात सगळीकडे दंगली उसळल्या.  महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये सर्वाधिक दंगली झाल्या. नंतर होतच राहील्या.
    या सगळ्याच्या मागे पाकीस्तानचे हस्तक असलेल्या दहशतवादी संघटना होत्या हे आता जाहीर आहे. गंमत म्हणजे आपण जर प्रतिभा रानडे यांचं "पाकीस्तान अस्मितेच्या शोधात" हे पुस्तक वाचलं तर याचं मूळ पाकीस्तानातच आहे हे लक्षात येतं. पाकीस्तान निर्मिती झाल्यावर जाणून बुजुन पाकीस्तानचा खोटा इतिहास लिहीण्याचं काम चालू झालं. त्यात बाबराचा उल्लेख अत्यंत मानाने घेतला गेलेला आहे. पाकीस्तान मध्ये कायमच हिंदू विरोधी आणि भारत विरोधी कारवायांना पाठींबा आणि खतपाणीच मिळालं आहे. याचाच परिपाक म्हणजे काश्मीर मधील हिंदू वरील वाढते हल्ले आणि काश्मीर मधील दहशतवाद.  खरंतर ६ डिसेंबरला फक्त एक वादग्रस्त इमारत जमीनदोस्त झाली होती (मशीद नाही) आणि एकही मुस्लीम मारला गेला नव्हता तरी बांग्लादेशात, पाकीस्तानात बरीच मंदीरे जाळली अनेक हिंदूंना मारलं. ह्या सगळ्याची माहीती तस्लीमा नसरीन यांच्या लज्जा या कादंबरीत वाचायला मिळते. पाकीस्तान पुरस्कृत हा दहशतवाद काश्मीरपर्यंत सीमीत होता तो एकदम मुंबईत पसरला दाउद इब्राहीम या अंडरवर्ल्ड डॉनच्या रूपाने. पुढच्या घटना सर्वांनाच माहीत असतील. प्रयत्न पूर्वक अयोध्यावाद चिघळवत ठेवला गेला. यात भाजपा सारख्या हिंदूत्त्ववादी पक्षांचा सुद्धा काहीप्रमाणात दोष आहे. पण त्यांनाच फक्त दोष देवून उपयोग नाही कारण विशिष्ट धर्माचं लांगूलचालन करून सत्ता मिळवायचा खेळ कॉंग्रेस फार आधीपासून खेळत आहे. ज्यांना १९४७ नंतरच्या भारतीय राजकारणातील घडामोडींचं ज्ञान आहे त्यांना ते सहज लक्षात येईल. पण भाजपा काय किंवा रास्वसं काय यांनी गोध्रा सारख्या भयंकर हत्याकांडाची आणि त्यानंतरच्या गुजरात मधील दंगलींची अपेक्षाच केली नव्हती.जर आपण एम व्ही कामत आणि कालिंदी रणधेरी लिखित "नरेंद्र मोदी :आर्कीटेक्ट ऑफ मॉडर्न  स्टेट" हे पुस्तक वाचलंत तर दोन आयोगांपैकी एका आयोगाच्या रीपोर्ट मध्ये हे स्पष्ट होतं की गोध्रा मध्ये १९९२ नंतर सीमा ओलांडून अनेक पाकीस्तानी लोक अनधिकृतरित्या आलेले होते, त्यांचे पाकीस्तानातील दहशतवादी संघटनांशी संबंध होते. गोध्राला साबरमती एक्स्प्रेसचा (जी अयोध्येहून येत होती) एस ६ डबा जाळण्याचा प्रकार हा पूर्व नियोजित कट होता. प्लॅटफॉर्मवरच्या फेरीवाल्याशी झालेल्या बाचाबाचीचं निमित्त दाखवलं गेलं पण जर हे पूर्व नियोजित नव्हतं तर संपूर्ण डबा जाळण्यास ज्या मात्रेत पेट्रोल लागतं तेव्ह्ढं अचानक कुठुन आलं? तिथला पोलीस अधिकारी उप्र मधील मुस्लीम होता आणि त्या घटनेच्या एकच दिवस आधी त्यानं महीन्याभराची सुट्टी मागून उप्र मधील गावी पलायन केलें होतं.त्यानंतर च्या दंगलींचं भडक कव्हरेज सगळ्या वाहीन्यांनी दाखवल्याने दंगलींमध्ये अजुनच भर पडली. आपल्या बरखा दत्त बाईंचं आतताई रीपोर्टींग तर सगळ्यांच्या परिचयाचं आहेच. नरंद्र मोदींना खूनी, मुस्लीम द्वेषी अशी बिरूदावली जोडली गेली. त्यांना बदनाम करण्याचा चंगच बांधला. पण आज त्याच गुजरात मध्ये नरेंद्र मोदींनी जी शांतता प्रस्थापित केली आहे, गुजरातची जी प्रगती केली आहे त्यावर हे सगळे एकदम चिडी चुप. असो.
    आज घडीला (२६/११, २३/१२, १२/३, गोध्रा, गुजरात दंगली) असे सगळे अनुभव घेतल्यावर दोन्ही धर्मांचे लोक शहाणे झालेत. सरकारने सुद्धा सावधानता बाळगली आणि मुख्य म्हणजे प्रसारमाध्यमांना काबूत ठेवलंय (नाहीतर असं काही असलं की त्यांना खूप चेव चढतो आणि मोकाट सुटलेल्या जनावरासारखे रीपोर्टींग करत फिरत असतात). त्यामूळे सगळीकडे या निकाला नंतर शांतता आहे. लोकांना पाकीस्तानचा अंतस्थ हेतू समजलेला आहे त्यामुळे कदाचित लोकांनीच आपणहून ठरवलं असणार की शांतता राखली पाहीजे. हा सुद्धा एक सोन्याचा दिवसच म्हंटला पाहीजे. पण ह्या सोन्याच्या दिवसाला गालबोट लागणार नाही याची खबरदारी घेणं आता आपल्याच हातात आहे. हा निकाल काही एका धर्माच्या बाजूने लागलेला नाही. पण हिंदूंना एक समाधान की रामजन्मभूमीचं अस्तित्त्व मान्य केलं गेलं. हे ही नसे थोडके. कालांतराने अर्जदार पुन्हा सर्वोच्च न्यायालयात अपिल करतील तेव्हा सुद्धा कदाचित असाच तणाव वातावरणात असेल. राहून राहून हेच वाटतं की बाबराने अनेक वर्षांपूर्वी आक्रमण करून प्रभुश्रीरामाचं मंदीर तोडणं आणि २३/१२ ला पाकीस्तानी दहशतवाद्यांनी भारतीय संसदेवर हल्ला करणं, तसेच २६/११ ला मुंबईवर हल्ला करणं ह्या मध्ये साम्य एकच, हे सगळे आपल्या राष्ट्रीय अस्मितेवरचे हल्ले आहेत. कारण यांमध्ये आक्रमणकर्ते हे परकीय होते आणि त्यांची मानसिकता दहशत पसरवणे हीच होती. मग प्रभुश्रीरामाच्या जन्मभुमीच्या जागेवर आक्रमक बाबराचं स्मारक उभं करायचं (की जो पाकीस्तानचा राष्ट्रपुरूष म्हणून खोट्या इतिहासात मानला जातो) म्हणजे अफजल गुरूच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी न करणं आणि कसाबला जावई म्हणून वागवत तुरूंगात ठेवणं आहे. मला आनंद याच गोष्टीचा होतो की आलाहाबाद उच्च न्यायालयाने आपल्या राष्ट्रीयअस्मितेचा विचार केला आणि निर्णय दिला. आता लवकर अफजल गुरू आणि कसाब यांच्या फाशी्च्या शिक्षेची अंमलबजावणी करण्याची बुद्धी आपल्या न्यायव्यवस्थेला लवकर मिळो हीच प्रभुरामचंद्राच्या चरणी प्रार्थना.
    काही जणांना घडल्या गोष्टीं मध्ये काहीच रस उरलेला नाही, आजच्या मटा मध्ये तर चक्क एका कारसेवकाचे पश्चाताप दग्ध असे पत्रं ही छापून आले आहे, खूप काळ गेल्याने अनेकांना अयोध्यावाद काय आहे हेच माहीती नाही तर काही जणांना एकदम भारतातील भ्रष्टाचार, महागाई, दारिद्र्य, शेतकरी अत्महत्त्या, रस्त्यांवरील खड्डे, झपाट्याने पसरत चाललेली रोगराई यांसारखे मुद्दे अचानक महत्त्वाचे वाटू लागले आणि या वादापेक्षा याच मुद्द्यांकडे लक्ष द्यावे असाही प्रचार केला गेला. मला असं वाटतं की हे सगळे मुद्दे हे घरचे मुद्दे आहेत आणि अयोध्या वाद हा परकिय आक्रमणाशी निगडीत असून राष्ट्रीय अस्मितेचा मुद्दा आहे. हे मुद्दे महत्त्वाचे आहेत पण अयोध्या वादाचा निकाल काहीही लागला असता तरी ह्या घरच्या मुद्द्यांवर कृती करणं हे सरकारचं काम आहे. बहुतांशी या घरातील मुद्द्यांना सरकार आणि निष्प्रभ विरोधी पक्ष जबाबदार आहेत. त्यामुळे या मुद्द्यांची आणि अयोध्या वादाची कोणी तुलना सुद्धा करू नये. दोन्ही धर्माच्या समाजातील लोकांनी तसेच देशाने त्याची जबर किंमत मोजली आहे हे श्री अन्सारी यांच्या वक्तव्या वरून दिसून येतेच. त्यामुळे हा सोन्याचा दिवस आपल्याला दिसला आहे त्याची झळाळी तशीच ठेवून पुढे पाऊल टाकायला हवे येवढीच प्रभुश्रीरामचंद्रांच्या चरणी प्रार्थना.

Tuesday, 21 September 2010

|| गंगा ||

(छायाचित्र महाजालावरून साभार)
निवेदन: ह्या कथेतील पात्रं आणि घटना पूर्णपणे काल्पनिक आहेत. घटना आणि पात्रांचं कोणत्याही सत्यघटनेशी किंवा पात्रांशी साम्य आढळलं तर तो निव्वळ योगायोग समजावा. (ही कथा मी पावसाळी अंकात प्रकाशित केलेली आहे. तिच इथे पुर्नप्रकाशित करत आहे.)

जेव्हा सुमीने गुवाहाटीच्या बस स्थानकावरून शिवसागर साठी बस घेतली तेंव्हा पहाटेचा गार वारा सुटला होता. जवळ जवळ वीस-एक वर्षांनी ती शिवसागरला परत जात होती. शिवसागर हे आसाम मधील एक छोटंसं शहर. तिथेच आर जे व्ही ची एक शाळा आणि आता विस्तारित ज्युनिअर कॉलेजही होते. वीस वर्षांपूर्वी तिने याच शाळेपासून तिच्या यशस्वी कारकिर्दीला सुरूवात केली होती. आजूबाजूची हिरवाई बघून तर तिच्या मनात उमटलं, "किती सुंदर आहे नाही आसाम!! नाहीतर महाराष्ट्रातील ते बोडके डोंगर. अगदीच महाराष्ट्रगीता मधील वर्णना सारखाच दगडांचा देश आहे. त्याउलट आसाम मध्ये जिथे नजर जाईल तिथे गर्द हिरवी झाडी आणि मैलोनमैल पसरलेले चहाचे मळे". जसजशी गाडी घाट रस्त्यांची वळणं घेत पुन्हा सपाट रस्त्याला लागली तेंव्हा आजूबाजूचे विस्तीर्ण असे चहाचे मळे पहात सुमीचं मन वीस वर्षं मागे गेलं.

..............(२० वर्षांपूर्वी)

आईच्या विरोधाला न जुमानता मी कशी एवढ्या लांब परप्रांतात नोकरी स्विकारली याचं नवल होतंच. आईचा विरोध असला तरी बाबांच्या ठाम पाठींब्यामुळे हे सगळं शक्य झालं हे सुध्दा तितकंच सत्य होतं. फिजीक्स मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतल्यावर आव्हानात्मक असे काहीतरी करावे अशी माझी इच्छा. तशी मी स्वतंत्र विचारांची आणि स्वत:च्या क्षमता तपासण्यातच मला जास्त रस होता. आईने माझ्या मागे लग्नाचा धोशाच लावल्याने खूपच घुसमटल्यासारखं होत होतं. या सगळ्यापासून दूर जायचं असेल तर एकच पर्याय आणि तो म्हणजे लांब कुठेतरी नोकरी शोधणे. अश्या ठिकाणी की जिथे आई आणि तिचा तो लग्नाचा धोशा सहजासहजी पोहोचणार नाही. म्हणून मग टाईम्स ऑफ इंडियात आर जे व्ही ची जाहीरात पाहीली आणि अर्ज करून मोकळी देखिल झाले. नोकरी मिळाल्याचं पत्रं हातात पडून तिथे रूजू होण्याची तारीख समजल्यावरच मी आईला सगळं सांगीतलं. अपेक्षेप्रमाणे आईने घर डोक्यावर घेतलंच. याच कारणासाठी सगळं ठरल्यावरच आईला सांगायचं असं मी ठरवलं होतं नाहीतर मला कधीच बाहेर पडता आलं नसतं. बाबांनी आईची कशीबशी समजूत काढली आणि दोन वर्षांसाठी मी आसामला जाण्यास तयार झाले. बाबांना मनातून खूप आनंद आणि थोडी धास्ती वाटत होती. कधी हॉस्टेलवर सुध्दा न राहीलेली सुमी येवढ्या लांब राहील का? तिथले लोक कसे असतील? ते सुमीशी चांगलं वागतील नं? असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात डोकावत होते. तर आईच्या मनात या प्रश्नांबरोबरच माझ्या लग्नाची चिंता ठाण मांडून बसली होती. निघायच्या आदल्याच दिवशी बाबांनी मला एक कॅमेरा भेट म्हणून दिला. आसाम खूप सुंदर आहे हे त्यांनी सुध्दा ऐकले होतेच. त्यांची फोटोग्राफीची आवड माझ्यातही उतरली होती. त्यालाच अजुन वाव देण्यासाठी बांबांची ही कृती मला खूप उत्साहवर्धक वाटली. माझ्याही मनात थोडी धाकधूक होतीच पण माझ्या निर्धारावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही आणि मी शिवसागरला जायला निघाले.

शिवसागर बस स्थानकावर मला घ्यायला शाळेतून कुशल नावाचा एक शिपाई आला होता. "स्कूल तो बाजूमें हैं, हम पैदल ही जायेगा" असं बोलून तो सामान उचलून चालायलाच लागला. त्यांचं असमीज मिश्रीत हिंदी ऐकून मला जरा विचित्रं वाटलं. खरंतर पुण्याहून मुंबई, मुंबई ते गुवाहाटी असे चार दिवस ट्रेन चा प्रवास आणि गुवाहाटी ते शिवसागर बारा तासांचा प्रवास यामुळे हा "स्कूल तो बाजूमें हैं" चा काही मिनीटांचा प्रवास माझ्या अगदी जीवावर आला होता. पण सांगते कोणाला........सगळं आपणच तर ओढवून घेतलं होतं नं! शाळा तशी छोटीशीच. टुमदार इमारती समोरच लालमातीचं भलंमोठं मैदान आ वासून पसरलेलं होतं. शाळेच्या इमारतीमधील व्हरांड्यात शोभेच्या फुलांच्या कुंड्या ठेवलेल्या दिसत होत्या. कुशलने मला एका अंधार्‍या खोलीपाशी नेलं. एक पांढरी साडी नेसलेल्या बाई एका मोठ्या टेबलच्या मागे खुर्चीमध्ये बसलेल्या होत्या. त्या खोलीतील अंधार आणि त्या बाईंचा रंग इतका सारखा होता की त्यामुळे मला त्यांची पांढरी साडी अजुनच पांढरी शुभ्र वाटली. त्यांच्या कपाळावरचा मोठ्ठा लाल कुंकवाचा टीळा आणि त्यांचे मोठे काळेभोर डोळे, तसेच अस्ताव्यस्त केस पाहून मला त्यांची जरा भीतीच वाटली. थोडंसं स्मित करून त्यांनी माझं स्वागत केलं. त्या स्मित हास्यातूनही त्यांचे पिवळसर दात डोकावत होत. खूप थकवा आल्याने आणि त्यांच्या उच्चारां मुळे क्षणभर त्या काय बोलत आहेत हेच मला समजलं नाही. त्यामुळे मी फक्त थोडसं हसूनच प्रतिसाद दिला. "यू मस्ट बी फिलिंग टायर्ड" हे त्यांचे शब्द कानात शिरले आणि मला हायसं वाटलं. त्यांनी मला चहा विचारला आणि उत्तराची वाट न पाहताच त्या खोलीच्या दारापाशी गेल्या. अचानक "गंगा, गंगा........एक गेस्ट के लिये छाय बनाओ" असं दाक्षिणात्य हिंदी वाक्यं माझ्या कानावर पडलं. हाच माझा गंगाशी .......तिला न पाहताच झालेला पहिला परिचय.


थोड्याच वेळात एक बसकं नाक आणि पिचपिचे डोळे असलेली साधारण पाच फूट उंचीची गौरवर्णीय, नेटक्या अवतारातली बाई माझ्यापुढे चहा घेवून उभी राहीली. तिने त्या पांढर्‍या साडीतील बाईंना विचारले, "दिदी, ये वो नया दिदी है क्या?" एकूणच तिथल्या सगळ्यांचं हिंदी ऐकून माझी खात्रीच पटली की शाळेत असताना हिंदी भाषेवर राष्ट्रभाषा म्हणून घेतलेली मेहनत पूर्णपणे वाया जाणार. गंगाच्या बोलण्यावरून तरी असं जाणवत होतं की मी येणार हे तिथल्या सगळ्यांना माहीती होतं.

"छलो छलो अभी ये नया दिदी को उसका कमरा दिखाओ" या शब्दांनी माझी तंद्री भंग पावली. माझं सामान उचलून एव्हाना गंगा भराभर खोली बाहेर सुध्दा पडली. मी तिच्या मागे चालायला लागले. खरंतर आमच्या घरी नोकर चाकर असली भानगड नसल्याने आणि भांडी घासायला येणार्‍या बाईंना सुध्दा आदरार्थी संबोधण्याची सवय असल्याने मला गंगाला काय संबोधावे हेच लक्षात येईना.

"तो दिदी आपका घर कहॉं हैं?" या तिच्या सहज प्रश्नाने माझा गोंधळ थोडा कमी केला. तिला काही उत्तर देण्याच्या आतच आम्ही एका बर्‍यापैकी मोठ्या खोलीपाशी पोहोचलो. खोलीत दोन भिंतींच्या बाजूंना दोन शिसवी पलंग होते. खोलीत अजून एक मोठ्ठं व एक छोटं अशी दोन कपाटं, एक टेबल, एक कपड्यांचा जुन्या बंगाली चित्रपटांतून असतो तसा स्टॅंड आणि एक ड्रेसींग टेबल होतं. क्लॉथ स्टॅंड कडे पाहून तरी असंच वाटलं की त्या खोलीत अजून एकजण किंवा दोन व्यक्ती रहात असतील. हे सगळं न्याहाळत असतानाच मी गंगाला उत्तर दिलं, "मैं पुने से आयी हूं".

"दिदी आप के घरमें कौन कौन हैं?" अतिशय उत्साहात गंगाने टाकलेल्या दुसर्‍या प्रश्नावरून तिच्या बडबड्या स्वभावाचा अंदाज मला आला.

"मॉं और पिताजी" असं उत्तर देवून तिच्या पुढच्या प्रश्नाची वाट न पाहता मी सरळ फ्रेश होण्यासाठी बाथरूमकडे वळाले..

काही वेळ विश्रांती घेवून फ्रेश झाल्यावर मी शाळेच्या परिसरात फेरफटका मारायला गेले. व्हरांड्यामध्येच अजुन दोन बायका बसलेल्या दिसल्या. त्यातली एक अतिशय हाडकुळी आणि दुसरी बर्‍यापैकी बारीक होती. दोघींची तोंडं पानाने रंगलेली होती. त्या हाडकुळ्या बाईच्या कपाळाला कुंकू लावलेलं दिसत होतं तर दुसर्‍या बाईचं कपाळ रिकामंच होतं. माझ्याकडे पाहून ती हाडकुळी बाई म्हणाली, "क्या दिदी रेस्ट हो गया क्या?" आणि ती अंग घुसळवून आणि रंगलेले दात काढून हसायलाच लागली. मला जाणवत होतं की माझ्या आगमनाची वार्ता आणि प्रत्येक हालचालींची खबर सगळ्यांनाच होती. मी आपल्याच विचारांत गर्क असताना समोरून शाळेत जाण्याच्या वयाच्या दोन मुली येताना दिसल्या. त्यांच्याशी नजरानजर होत असतानाच माझ्या कानावर आलं, "ए देवी और गुड्डी ये देखो नया दिदी". दोघीही माझ्याकडे पहात म्हणाल्या, "नमस्ते दिदी".

मीही त्यांना नमस्ते केलं. घरात एकुलती एक असल्याने मला आदरार्थी संबोधन ऐकायची आणि ते सुध्दा "दिदी" सवयच नव्हती. मी त्या दोन मुलींमधली कोण देवी आणि कोण गुड्डी यांचा अंदाज बांधायला सुरूवात केली. तेव्हढ्यात त्यांच्यातील एकीनेच तो प्रश्न सोडवला.

त्या हाडकुळ्या बाईला उद्देशुन तिने बोलायला सुरूवात केली, "ओय मॉं, मोय भूख xxxxxxxx".

त्या बाईने लगेच उत्तर दिलं, "ओय देवी, xxxxxxxx.....".

माझ्या लक्षात आलं की त्या दोघींमधली जाडगेलीशी आणि तुलनेनं बुटकी मुलगी म्हणजे देवी आणि ती त्या हाडकुळ्या बाईची मुलगी होती.

तेव्हढ्यात माझ्या कानावर आलं, "ओ साधना दिदी , xxxxxxxx मॉं xxxxxxxx."

गुड्डी त्या हाडकुळ्या बाईला विचारत होती. आता माझी खात्री पटली की त्या हाडकुळ्या बाईचं नाव साधना होतं आणि गुड्डीची आई कोणीतरी दुसरीच बाई होती. देवी चेहर्‍यावरून तरी साधनादिदीची मुलगी वाटत होती. गुड्डीचे डोळे आणि कपाळ मोठ्ठं होतं. वाढत्या अंगाची असल्याने उंच वाटत होती. देवी चे केस कुरळे आणि दोन्ही गालांवर खळ्या पडायच्या. ती दिसायला चांगली असली तरी मरगळलेली वाटत होती. तिच्या चालण्यातून ते लक्षात येत होतं. याउलट गुड्डी रंगाने तशी सावळी पण स्मार्ट आणि तरतरीत दिसत होती. दोघीजणी माझ्या राहण्याच्या खोलीच्या मागच्याच बाजूला रहात होत्या. पण राहून राहून माझ्या मनात एकच प्रश्न येत होता की गुड्डी कोणाची मुलगी?

आमच्या राहण्याच्या ठिकाणीच मुख्याध्यापक बाईंच्या म्हणजेच कृष्णादिदींच्या खोलीत रोज सकाळ संध्याकाळ प्रार्थना असे आणि शाळेत राहणार्‍या सगळ्यांनी त्या दोन्ही प्रार्थनांना हजर राहण्याचा शिरस्ता होता. संध्याकाळी आम्ही सगळे (मी, गुड्डी, देवी, गंगा, साधना आणि अजुन दोन दिदी) कृष्णादिदींच्या खोलीत प्रार्थनेसाठी जमलो. कृष्णादिदी स्वत: चांगल्या गायच्या. त्यांच्या गायनाने प्रार्थनेला सुरूवात होत असे आणि मग हळूहळू एक एक करत बाकीचे सगळे काही प्रार्थना आणि भजनं गात असत. प्रार्थनेच्या वेळी माझ्या लक्षात आलं की गुड्डीचा आवाज छान होता आणि उच्चारही स्पष्ट होते. गंगा काही स्वतंत्रपणे गायली नव्हती पण सुरात मागोवा घेत होती. देवी स्वतंत्रपणे गायली पण तिचा आवाज थोडा किंनरा आणि नाकात होता. यथावकाश मला समजलं की गुड्डीचं नाव निवेदीता होतं आणि ती गंगादिदीची मुलगी होती. गंगा आणि साधना जरी आया म्हणून शाळेत काम करत असल्या तरी सगळे जण त्यांना दिदी म्हणूनच संबोधायचे. पण माझ्या मनात काही प्रश्न मात्रं ठाण मांडून बसले होते.......निवेदीता आणि गंगा मध्ये इतका जमीन आस्मानाचा फरक कसा काय?


नकळतच मी गंगा-साधना आणि निवेदीता-देवी यांची मनोमन तुलना करायला सुरूवात केली. गंगा एकदम साधी आणि सरळ-भोळ्या स्वभावाची तर साधना तशी नटवी आणि वस्ताद. तिच्या बोलण्यातून आणि चेहर्‍यावरून ते जाणवत होतं. मी असंही ऐकलं होतं की दोघींनाही नवर्‍याने सोडून दिलेलं. गंगादिदीला तर मी चांगली साडी नेसून, पावडर वगैरे लावून बाहेर जाताना क्वचितच पाहीलं होतं. पण साधना मात्रं दर रविवारी नटुनथटुन बाहेर जायची. मी तर असंही ऐकलं होतं की साधना कोणा माणसाबरोबर फिरते. तसं विधवा बाईने किंवा परित्यक्तेने पुन्हा कोणाबरोबर संसार उभा करावा या मताची मी होते. पण साधनाचं वागणं थोडं खटकण्यासारखं होतं. कृष्णादिदींना सुध्दा ते आवडायचं नाही. पदरात वयात येणारी मुलगी असताना तिने आपलं वागणं आटोक्यात ठेवायला पाहीजे असं त्यांचं मत होतं. निवेदीता आर जे व्ही च्याच शाळेत म्हणजे इंग्रजी माध्यमात सहाव्या इयत्तेत शिकत होती. त्यामुळे तिच्या वागण्या बोलण्यात जाणवण्या इतपत फरक होता. देवी एका असमीज माध्यमाच्या शाळेत नवव्या इयत्तेत शिकत होती. निवेदीता तिच्या पेक्षा लहान असून सुध्दा तिचं वागणं एकदम वेगळं आणि समज जास्त होती. मला वाटलं म्हणूनच तर कृष्णादिदींनी निवेदीताला त्याच शाळेत इंग्रजी माध्यमात शिकण्याची संधी दिली असेल.

हळूहळू माझी आणि निवेदीताची गट्टी जमली. मी जरी तिला प्रत्यक्षात शिकवत नसले तरी शाळेतच रहात असल्याने तिला अभ्यासात थोडीफार मदत करत असे. त्याचप्रमाणे शाळा सुटल्यानंतर संध्याकाळच्या प्रार्थनेत दोन तास असत. त्यावेळी मी काहीतरी वाचन करत असे किंवा शाळेच्या परिसरात फिरून गंगा-साधना आणि इतर मंडळी यांच्याशी संवाद साधत असे. शाळेच्या भूतकाळाची (निवेदीताला आठवत होतं तोपर्यंतची) इथ्यंभूत माहीती मला निवेदीताशी गप्पांमधून समजत होती. कृष्णादिदींसकट इतर शिक्षक आणि बाकी सगळे यांच्या स्वभावची माहीतीही मला त्यांतून मिळत असे. निवेदीता बर्‍याचवेळी तिच्या वर्गातील गमती-जमती सांगत असे. निवेदीता आणि गंगादिदीच्या बोलण्यातून मला अजून एक गोष्ट समजली की त्यांचे कोणीतरी नातेवाईक दिब्रुगढला रहात होते आणि सुट्टीत कधी कधी त्या दोघी दिब्रुगढला जायच्या. निवेदीताला खेळाची खूप आवड होती. तिच्या म्हणण्यानुसार ती धावण्यात तरबेज होती आणि तिला अ‍ॅथलेटीक्स मध्ये अधिक रस होता. मला तर तिचे मोठे मोठे डोळेच खूप आवडायचे. नाही म्हणायला मायलेकीं मध्ये एक साम्यं होतं. गंगाला आणि निवेदीताला दोन्ही गालांवर छान खळ्या पडायच्या.

साधना थोडी कामचुकार असल्याने कृष्णादिदी तिला खूपच कमी कामं सांगत. गंगा तर त्यांचे कपडे धुण्यापासून ते कपडे वाळवून घड्या करून आणे पर्यंत सगळीच कामं करत असे. शाळेत कोणी पाहूणे आलेच तर त्यांच्या साठी चहा बनवण्याचं काम, कृष्णादिदींचं जेवण बनवणे अश्या बर्‍याच गोष्टी ती हसत मुखाने करत असे. गंगा आणि साधनाला शाळा चालू असताना मध्येच नर्सरी आणि ज्युकेजी च्या मुलांना शू-शी ला नेवून आणणे, त्यांची काळजी घेणे अशी कामे तर शाळा सुटल्यानंतर सगळ्या वर्गखोल्या झाडून, व्हरांडा झाडून-धुणे ही सुद्धा कामे असत. बर्‍याच वेळेला त्यांचे ते कष्ट पाहून माझा जीव हेलावून जायचा. वाटायचं की असं काय घडलं असेल म्हणून या दोघींच्या नवर्‍यांनी त्यांना सोडून दिलं असेल? साधनाकडे पाहून वाटायचं की तिच्या वागण्यामुळे तिच्या नवर्‍याने तिला सोडून दिलं असेल. पण गंगा चं काय? ती तर खूपच चांगली होती. आम्ही एकाच ठिकाणी फक्त वेगळ्या इमारतींमध्ये रहात असल्याने आणि साधना-देवी पेक्षा गंगा-निवेदीता बरोबर माझे सूर जुळल्याने मी बर्‍याच वेळा गंगापाशी मन मोकळं करत असे. तसंच गंगा आणि निवेदीता सुध्दा त्यांचं मन माझ्यापाशी मोकळं करत.

एक दिवस अश्याच मी आणि गंगादिदी बोलत बसलो होतो. आणि गुड्डीचा म्हणजेच निवेदीताचा विषय निघाला. मी म्हणाले, "गंगादिदी आप कितनी भाग्यवान हो की आपको गुड्डी जैसी बेटी मिली। लेकिन आपके कष्ट बहुत है। अच्छा हैं आप यहॉं स्कूल में काम करती हो। नहीं तो बाहर की दुनीया में बहुन परेशानी होती। यहॉं आपलोग सुरक्षित है। निवेदिता के पिताजी कहॉं हैं?

अश्रू भरल्या डोळ्यांनी गंगा उत्तरली, "दिदी आपको क्या बताउं? निवेदीता के पिताजी तो दिब्रुगढ में हैं। वो एक पुलिस अफसर है और बंगाली है। दिदी निवेदीता तो बंगाली है और मैं एक नेपाली।"

मला ती काय म्हणतेय हे समजायलाच थोडा वेळ लागला. कारण ते सगळं माझ्या कल्पनेच्या पलिकडील होतं. गंगा सांगत होती आणि मी सुन्न मनाने ऐकत होते.

"यहॉं आने से पहले मैं दिब्रुगढ में मेरी दिदी और जीजा के साथ रहती थी। वहीं पर मुझे गुड्डी के पिताजी मिले. उन्होंने मुझसे शादी की। लेकिन उनके घरवालों को पता नहीं था। गुड्डी के जनम के साथही वो मुझे और गुड्डी को छोडकर चले गये। अभी इन्होंने दुसरी शादी बनायी है। एक बंगाली के साथ। मैं तो नेपाली हूं लेकिन उनकी बेटी तो बंगाली हैं। निवेदीता अपने पिताजी का चेहरा लेके आयी हैं।"

गंगादिदीचे पाणावलेले डोळे  बदलले आणि तिचा चेहरा एकदम प्रसन्न झालेला दिसला.

"वो एक अच्छे घर से है, और इसलिये मुझे उसे पढाना हैं। अगर वो अपने पिताके साथ होती तो अछ्छे अंग्रेजी स्कूल में जाती। मैं उसे पुलिस अफसर बनाना चाहती हूं। इसलिये मैं ये आर जे व्ही स्कूल में आया का काम करती हूं। मैं तो पढीलिखी नहीं हूं इसलिये आया का काम ही कर सकती हूं। मुझे इतनी ही आशा है की जब निवेदीता बडी पुलिस अफसर बन जायेगी तो उसके पिताजी उसे अपना लेंगे।"

मी फक्त गंगा दिदीच्या चेहर्‍याकडे पहात होते. तिच्या चेहर्‍यावर वेगळाच तजेला दिसत होता. मला त्याक्षणी तिच्या पाया पडावसं वाटलं. मला ती नावाप्रमाणेच गंगा वाटली आणि ज्या माणसाच्या नावाने कुंकु लावलं अशा पापी माणसाचं पाप ती धूत होती. एका शाळेत आयाचं काम करून, अपार कष्ट करून आपल्या मुलीला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून धडपडत होती. आणि तरीही मुलीचं शाळेतील आडनांव "देब" म्हणजे बंगालीच लावलं होतं. एका माणसाच्या चुकीसाठी आपलं उभं आयुष्यं तिने पणाला लावलं होतं. नाहीतर एखादी साधना सारखी असती तर कधीच दुसर्‍या माणसा बरोबर लग्नं करून मोकळी झाली असती. रोज प्रार्थने नंतर कर्मयोग आणि अध्यात्माच्या गप्पा ऐकणार्‍या मला ती खरी कर्मयोगी वाटली. पुढच्या आयुष्यात निवेदीताने किती प्रगती केली हे बघायला मी तिथे नव्हते कारण मला दुसरी कडे बदलून जावं लागलं होतं. तिथून निघताना आणि नंतर सुध्दा मी अशीच प्रार्थना करत होते की या वेड्या गंगेच्या तपश्चर्येला फळ येवू दे.

.................................................


सगळा वीस वर्षांपूर्वीचा चित्रपट सुमीच्या नजरेसमोरून अगदी कालच घडल्यासारखा सरकला. एव्हाना बस शिवसागरला पोहोचली होती. सुमी एक नविन मुख्याध्यापिका म्हणून त्या शाळेत पुन्हा जात होती. ह्यावेळी तिला जवळच्या जवळच गाडी पाठवली होती. पण सुमीने "स्कूल तो नजदीक हैं" असं म्हणत चालायला सुरूवात देखिल केली. तिचं सामान घेवून गाडी परत शाळेकडे निघाली. सुमीची पावलं शाळेकडे झपझप चालत होती तर मन मात्र गंगादिदी कडे धाव घेत होतं. तिच्या पवित्र अश्या मार्गाच्या पाउलखुणा धुंडाळत. सुमीचे कान आसुसले होते गुड्डीच्या यशाची कथा ऐकण्यासाठी.........कारण तेच तर गंगेच्या तपश्चर्येचं, आराधनेचं फळ होतं.

Friday, 17 September 2010

अमृता तेही पैजा जिंके अशी ही माझी माय मराठी..........

  (छायाचित्र महाजालावरून साभार)
आजच पहाटे सुधीर फडक्यांचं अपूर्ण आत्मचरित्रं "जगाच्या पाठीवर" वाचून पूर्ण झालं आणि अपर्णा वेलणकर भावानुवादित "शांताराम" वाचायला सुरूवात केली. कोणतही पुस्तक वाचताना अगदी प्रस्तावनेपासून ते परिशिष्टाच्या पानांपर्यंत सगळं पूर्ण वाचल्या शिवाय पुस्तक पूर्ण वाचल्याचं समाधान मला मिळतच नाही. याच सवयीने मी शांताराम च्या मुखपृष्ठ, पार्श्वपृष्ठ यांपासून सुरूवात केली (शांता्रामची कहाणी या दोनही पानांवर थोडक्यात दिली आहे). ग्रेगरी डेव्हीड रॉबर्ट्स या ऑस्ट्रेलियन लेखकाची "शांताराम" ही आयुष्याचं सत्य  अतिशय उत्कट पणे सांगणारी भावपूर्ण कादंबरी की जिच्यामुळे मुंबई आणि मुंबईतील आयुष्य आज पाश्चात्य जगतात पॉप्युलर आहे. सहा सात वर्षांपूर्वी ही कादंबरी इंग्रजी मध्ये सर्वप्रथम प्रकाशीत झाल्यावर सहाच महिन्यांच्या आत मुंबईकडे येणारा पर्यटक वर्ग झपाट्याने बदलला. धारावी सारख्या संपूर्ण अशिया खंडातील सगळ्यात मोठ्या झोपडपट्टीला एका पर्यटन केंद्राचे स्वरूप प्राप्त झाले आणि धारावी दर्शनच्या दोन दिवसाच्या पॅकेज टुर्स पाश्चात्य पर्यटकां मध्ये अत्यंत लोकप्रिय झाल्या त्या याच कादंबरी मुळे. अतिशयोक्ती नाही पण मुंबईच्या कुलाबा भागात बर्‍याच वेळा शांताराम मध्ये संदर्भ असलेल्या अनेक ठिकाणांचा शोध घेत (हातात शांताराम घेवून) असलेले पर्यटक दृष्टीस पडत असत. या कादंबरीची कथाच खूप भावपूर्ण आणि आयुअष्याच्या अनुभवांनी ओथंबलेली आहे. एखादं रोपटं आपल्या मूळ जागेतून उपटून टाकल्यावर त्याला एखाद्या दलदलीच्या ठीकाणी रूजण्यास वाव मिळावा आणि मग ते फोफवावं असंच काहीसं ग्रेगरी डेव्हीड रॉबर्टस आणि मुंबई यांचं नातं. हे नातं तर मला आधीच माहीती होतं. पण अपर्णा वेलणकर अनुवादित "शांताराम" वाचायला सुरूवात केली आणि श्री रॉबर्टस यांच्या मराठी भाषे विषयीच्या भावना आणि त्यासुद्धा महाराष्ट्राची राजधानी मुंबईत राहून निर्माण झालेल्या आहेत हे पाहून भरून आलं. श्री रॉबर्ट्स यांच्या भावना अपर्णा वेलणकर यांनी इतक्या समर्थपणे पोहोचवल्या आहेत की त्यांनी मला ही पोस्ट लिहायला भाग पाडलं. आतापर्यंत आपल्या महाराष्ट्राच्या अत्यंत लाडक्या ज्ञानेश्वर माऊलींनी मराठीची गोडवी "अमृतातेही पैजा जिंके........" अशा शब्दांत वर्णन केलेली वाचली होती. श्री सुरेश भट यांनी त्याची महती मराठी अभिमान गीता मधून साकारली. हे दोघेही आपलेच, महाराष्ट्रातच जन्मलेले पण एखाद्या परदेशी माणसाने मराठीची गोडवी गावी, तिच्या प्रत्येक बाजाला संगिताच्या विविध पैलूंची उपमा द्यावी हे माझ्यासाठी तरी नविनच आणि सध्याच्या "महाराष्ट्रात मुंबई पण मुंबईत मराठी नाही" या पार्श्वभूमीवर खूपच आशादायक आणि अभिमानास्पद वाटली म्हणून हा लेख. कॉपी राईटचं पान मला खुणावत असल्याने मी काही मजकूर इथे देवू शकत नाही. जर मला मेहता पब्लिशिंग किंवा अपर्णा वेलणकर यांची परवानगी मिळाली असती तर काही भाग इथे जसाच्या तसा टाकला असता. पण कॉपी राईट चा भंग न कराता आवश्यक तेवढा भाग माझ्या लेखाच्या संदर्भासाठी खाली देत आहे
"भारतात पऊल ठेवल्याक्षणी माझ्या कानावर पडलेली पहीली स्थानिक भाषा होती मराठी. त्या डौलदार भाषेमध्ये गुंफलेल्या लयीने पहिल्या भेटीतच एक अजब गारूड घातलं. मुंबईत रूजता रूजता मराठी ऐकत राहिलो आणि शिकलो."    अत्यंत साधेपणाने मराठी विषयीची ओढ यात व्यक्त झाली आहे.  सार्‍याच भारतीय भाषा अत्यंत सुस्वर. त्यात मराठीचा गोडवा काकणभर वरचढच. माझ्या वैराण, नीरस आयुष्यात मराठीने पहिल्या प्रेमाचा पाऊस आणला. त्या कृतज्ञतेपोटी मी मराठी शिकलो........आणि बघता बघता या रूणुझुणुत्या भाषेच्या प्रेमात पडलो."   ह्या वाक्यांतून मुंबईत वर्षांनुवर्षे राहणार्‍या आणि ज्यांना मुंबईने जीवन दिलं आहे, स्वत:ची अशी ओळख दिली आहे त्यांनी खूप काही शिकण्यासारखं आहे. " प्रत्येक शब्दाच्या मुळाशी एकेक गाणं पुरलेलं असावं; इतकं अंगभूत, अत्युत्कट सुरेलपण हा महाराष्ट्राच्या मराठीचा प्राण! ही गाणी मला आजही हाका घालतात. मुंबईत असलो की त्या सवयीच्या सुरेल लकेरी चोहोबाजूंनी अखंड ऐकू येतात."   ह्यातील प्रत्येक शब्द न शब्द श्री रॉबर्ट्स यांचं मराठी विषयी, मराठीच्या विविधते विषयी असलेलं प्रेमच व्यक्त करतंय. यातून पुणेकर, मुंबईकर, नागपूरकर, नाशिककर, कोल्हापूरकर, सातारकर, सांगलीकर, सोलापूरकर, लातूरकर, औरंगाबादकर इ. इ. मराठी बांधवांनी आपापला मराठीचा बाज जपत आपल्या माय मराठी विषयी आत्मियता बाळगावी ना की कोणती भाषा किती शुद्ध आणि चांगली यावरून काथ्याकूट करावा. येवढं जरी या पुस्तकाने साधलं तरी ते या पुस्तकाचं महाराष्ट्राच्या दृष्टीकोनातून १००% यश असेल यात शंकाच नाही.

Saturday, 11 September 2010

माझ्या अमेरिकेतील भगीनी आणि बंधुंनो..........

 (छायाचित्र महाजालावरून साभार)
अकरा सप्टेंबर आलं की मला नेहमी स्वामी विवेकानंदांनी १८९३ साली शिकागो येथील सर्वधर्म परिषदेत उद्गारलेले "माझ्या अमेरिकेतील भगीनी आणि बंधुंनो.........."  हे उद्गार आठवतात. त्याच बरोबर याच अमेरिकेतील बंधु भगीनींवर "विश्वबंधुत्त्व दिनाच्या दिवशीच" २००१ साली झालेला भीषण हल्ला सुद्धा आठवतो. सगळं जगच विरोधाभासाने भरलेलं आहे. आता हेच बघा ना एखाद्या भिकारणीचं नाव लक्ष्मी तर एखाद्या चकण्या मुलीचं नाव सुनयना. जिथे लिहीलेलं असतं  "येथे थुंकु नका" तिथल्याच भिंतींवर पानाच्या पिचकार्‍यांनी रंग भरलेले असतात. शिवाजी महाराजांच्या किंवा महात्मा गांधींच्या नावाखाली त्यांच्या शिकवणुकीच्या बरोबर विरूद्ध वर्तन करायचं. कलीयुग आहे........पण स्वामी विवेकानंदांना मात्र भारत सार्‍या जगाला अध्यात्माचं ज्ञान देईल याची खात्री वाटत होती......म्हणून तर त्यांनी भविष्यच वर्तवलं होतं की "भारत हा एक दिवस जगतगुरू होणार आणि सार्‍या विश्वाला बंधुत्त्व, अध्यात्म शिकवणार". तसं आपल्या भारतीय संस्कृतीत अध्यात्म इतर जगाच्या तुलनेत मुरलेलं आहे. म्हणूनच इथे निर्वासीतांना आसराही मिळतो आणि शरण आलेल्याला अभय. हे स्वामी विवेकानंदांचे शिकागोच्या भाषणातील उद्गारांमधील काही शब्द आहेत. आज त्याप्रसंगाला ११७ वर्षं पूर्ण झाली म्हणून मनात विचार आला की स्वामी विवेकानंदांनीच वेळोवेळी त्यांच्या पत्रांतून आपल्या शिष्यांना लिहीलेल्या काही निवडक विचारांचं संकलनच प्रसिद्ध करूया. म्हणून ही प्रस्तावना!
(खालील विचार हे स्वामी विवेकानंदांचे असून "विवेकानंदांची पत्रे" या पुस्तकातील मी काढलेल्या टिपणांवर आधारित आहे.)
 १) भगिनी निवेदिता यांना: माझें ध्येय कांही थोड्याशा शब्दांत मांडले जाऊ शकते. मानवाला त्याच्या ठिकाणी वास करणार्‍या ईश्वरत्त्वाचा उपदेश देणे आणि जीवनांतील प्रत्येक कार्यांत हे ईश्वरत्त्व कसे प्रकट करावे यासंबंधीचा मार्ग दाखवून देणे हेच माझे ध्येय आहे.
२) जगातील सर्व दु:खांचे कारण म्हणजे अज्ञान होय. जो आत्मत्याग करेल तोच जगाला प्रकाश देईल. पृथ्वीवरील सर्वांत पराक्रमी आणि सर्वश्रेष्ठ लोकांना आत्मबलिदान करावेच लागेल.
३) अंत:करणात अनंत प्रेम आणि दया असलेले शेकडो बुद्ध आज हवे आहेत.
४) धर्म हे निर्जीव विडंबनाच्या रूपाचे बनले आहेत. जगाला आज चारित्र्याची नितांत गरज आहे.
५) संपूर्ण आयुष्य म्हणजे एक स्वप्न मालिका आहे. जाणीवपूर्वक ही स्वप्ने पहावीत इतकीच माझी आकांक्षा आहे.
६) प्रलय म्हणजे कार्याचे कारणांत विलीन होत जाणे होय आणि सृष्टी म्हणजे कारणांतून कार्य प्रकट होत जाणे होय.
७) वस्तुत: नातेवाईक म्हणजे माणसाच्या प्रगतीच्या मार्गांतील भयंकर अडथळेच असतात. असे असून देखील लग्न करून लोक नवी नाती जोडण्याच्या फंदात पडतात याचे खरोखरच नवल वाटते.
८) प्रत्येकाने आपापला उद्धार करून घ्यावा. सर्व बाबतीत स्वाधीनता असणे म्हणजेच मुक्तीच्या रोखाने प्रगती होणे. हाच खरा पुरूषार्थ होय. शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक स्वाधीनता प्राप्त करून घेण्याच्या दिशेने स्वत: प्रगती करणे आणि इतरांनाही तशी प्रगती करून घेण्यास साह्य करणे हाच परम पूरूषार्थ होय.
९) अनुभवानेच आपण सर्व शिकत जातो. दुर्दैव एवढेच की या ज्ञानाचा उपयोग मात्र या जगात करता येत नाही; कारण ज्या क्षणी आपण शिकून तयार झालो असे आपल्याला वाटते त्याच क्षणी जगाच्या या रंगभूमीवरून आपल्याला अदृष्य व्हावे लागते आणि हीच खरी माया आहे.
१०) या जगात दोन प्रकारचे लोक आढळतात. पहिल्या प्रकारचे लोक खंबीर मनाचे, शांत, निसर्गापुढे मान तुकविणारे व कल्पनेच्या आहारी फारसे न जाणारे, परंतु चांगले, सज्जन, दयाळू व मधुर स्वभावाचे असतात. जग हे अशा लोकांसाठीच आहे. हे लोक सुखी होण्यासाठी जन्माला आलेले असतात. याच्या उलट दुसर्‍या प्रकारचे लोक अत्यंत संवेदनक्षम मनाचे असतात, ते कल्पनाप्रधान असतात व त्यांच्या भावना अतिशय तीव्र असतात. हे लोक एका क्षणात आकाशांत भरारी मारतील, तर दुसर्‍या क्षणी एकदम खाली येतील. या लोकांच्या नशिबी सुख नसते. पहिल्या प्रकारच्या लोकांचे आयुष्य साधारणपणे सुखाच्या सम पातळीवरून जात असते, तर दुसर्‍या प्रकारच्या लोकांच्या जीवनाचा ओघ कधीच सम नसतो; कधी कधी हे लोक अत्युच्च आनंदाचा अनुभव घेतात तर दुसर्‍याच क्षणी ते दु:खी होताना दिसतात. परंतु आपण ज्यांना असाधारण प्रतिभाशाली म्हणतो अशा व्यक्ती ह्या लोकांमधूनच उद्भवतात हे मात्र सत्य आहे. ’असाधारण प्रतिभा असणे म्हणजे एक तर्‍हेचा वेडेपणा’ या सध्याच्या प्रचलित सिद्धांतात काही सत्यांश आहे यात शंकाच नाही.
आता उपर्युक्त प्रकारात मोडणार्‍या लोकांना जर खरोखरच मोठे व्हायचे असेल तर त्यांनी अगदी शेवट पर्यंत लढत राहीले पाहीजे, संघर्षासाठी मैदान नेहमी मोकळे ठेवले पाहीजे. त्यांच्या पाठीशी कोणतेही व्यवधान असता कामा नये. विवाह नको, संतान नको; स्वत:च्या डोळ्यांसमोर ठेवलेल्या आदर्शांशिवाय दुसर्‍या कोणत्याही वस्तूबद्धल अनावश्यक आकर्षणही अशा व्यक्तीने ठेवता कामा नये; स्वत:च्या आदर्शासाठी जगण्याची व प्रसंगी प्राणाहुती देण्याचीही तिने तयारी ठेवणे आवश्यक आहे.

Wednesday, 8 September 2010

गोंद्या गेला रे गेला.......

(छायाचित्र महाजालावरून साभार)
श्रावण कृष्ण अष्टमी जवळ आली की सगळीकडे ’गोविंदा आला रे आला’ चे नारे ऐकायला येतात. हिंदी चित्रपटांतील दहि-हंडी संदर्भातील गाणी वाजत असतात. विविध राजकीय पक्षांची छोट्या छोट्या गल्लीबोळातली गोविंदा पथकं उंचच उंच दहि-हंडी फोडायच्या तयारीला लागतात. मग पारंपारिक दहि-हंड्यांची बोली लावणं चालू होतं तर कुणी नविन दहि-हंडीची विक्रमी बोली लावून गोविंदा पथकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो. दहि-हंडीच्या बोलीच्या प्रमाणात तिची उंची म्हणजेच थरांची संख्याही वाढवली जाते. वर्तमानपत्रांत जाहिरातींचा ओघ सुरू होतो तर आंतर्जालावर दहि-हंडीसाठी स्पेशल संकेतस्थळं सुरू होतात. प्रत्यक्ष दहि-हंडीच्या दिवशीतर सगळ्यांचा उत्साह नुसता ओसंडून वहात असतो. हंडीतील दह्याच्या म्हणजेच बक्षिसाच्या आशेवर थरावर थर चढवले जातात. एक नाही दोन नाही तर शक्य असतील तेवढ्या दहि-हंड्या फोडण्याची जणू इर्ष्या पेटलेली असते. हंडीतील बक्षीसाची रक्कम ही कायम पाच किंवा सहा अकड्यातच असते. त्यामुळे दहि-हंडी उत्सव हे एक काळ्याचा-पांढरा करण्याचं एक साधन बनलेलं आहे. फार मोठी आर्थिक उलाढाल या उत्सवात होत असल्याने या उत्सवाला एक वेगळंच आर्थिक महत्त्वही आलेलं आहे. यासगळ्यातच काही थर कोसळतात, पुन्हा उभे राहतात. पडलेले गोविंदा स्वत:ला सावरत आपल्याला काहीही झालेलं नाही या उत्साहात बक्षिसाच्या आशेनं पुढे सरकतात. त्यांचेच सहकारी गोविंदा मोठ्या काळजीनं पडलेल्यांची विचारपूस करतात तर आयोजक तू नहीं तो कोई और सही च्या थाटात पुढच्या पथकाचे स्वागत करण्यात गुंग असतात. मग दुसर्‍या दिवशीच्या बातम्यांमध्ये किती रकमेची हंडी फोडली, सगळ्यात अधिक थर कोणी आणि कुठे लावले याच बरोबर किरकोळ आणि गंभीर जखमी झालेल्या गोविंदांची संख्याही असते. मग इ-मेल द्वारे काही घटना विस्ताराने लिहून पैशाच्या रूपात सहानुभूती/मदत गोळा करण्याचे प्रयत्न होतात. नाहीतर कोणा राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये आम्ही कशी त्या "गेलेल्या" गोविंदाच्या कुटुंबाची किंवा पूर्णपणे अपंग झालेल्या गोविंदाची काळजी कशी घेणार आहोत असे जाहिर करण्यासाठी अहमहमिका लागते.
मला आठवतंय दोन वर्षांपूर्वी सुद्धा दहि-हंडी झाल्यावर एक मेल सगळीकडे फिरत होती. एक १२-१३ वर्षा्चा गोविंदा सातव्या थरावरून पडल्याने खांद्याच्या खालचा सगळा भाग लुळा झाल्याने त्याच्या हॉस्पीटलायझेशन्साठी घरच्यांना आर्थिक मदत करा इ. इ. गेल्या वर्षी दहि-हंडीत एक २० वर्षांचा गोविंदा छातीत रक्त साकळल्याने मृत्यू पावला. तो सुद्धा दोनवेळा वरच्या थरांवरून पडला होता. पण आपल्याला काही झालंय/ त्रास होतंय याकडे लक्ष द्यायला त्याला फुरसत कुठे होती? त्याच वर्तमानपत्रांत चार गोविंदा लुळे झाल्याची बातमी आहे. वर्षा-गणिक जशी थरांची आणि हंड्यांच्या बक्षिसांची रक्कम वाढते आहे तशी जखमी, लुळे झालेले, गेलेले गोविंदा यांचीही संख्या वाढतेच आहे. यासर्व तरूण मुलांमध्ये ते गोविंदा आहेत हे जरी साम्य असले तरी अजुन एक साम्य आहे ते म्हणजे सर्वच जण निम्न आर्थिक स्तरातील मराठी आहेत. इतकं सगळं अधोरेखित करण्याचं कारण एकच की दहि-हंड्यांच्या आधी आणि दहि-हंडीच्या दिवशी जी गोविंदा आला रे ची धुन वाजते तीच दोन दिवसांनंतर गोंद्या गेला रे गेला मध्ये बदलून जाते. कित्येक कुटुंब उध्वस्त होतात.
या राजकीय पुढार्‍यांचे काय जाते हंडीची उंची वाढवत रहायला. त्यांचा तर राजकीय फायदाच........एक प्रकारे हे सुद्धा शक्ती प्रदर्शनच आहे. राजकीय शक्तीचे प्रदर्शन पण या गरीब असहाय तरूणांच्या जिवावर. या दही हंड्यांची गरज काय? श्रीकृष्णाचे इतर गुण बघा की. एक मजा म्हणून छोटी दही हंडी फोडणं ठीक आहे. पण या राजकीय पुढार्‍यांचं म्हणजे आयजीच्या जीवावर बायजी उदार असाच प्रकार आहे. या सगळ्या गोविंदा पथकात एक तरी आर्थिक दृष्ट्या उत्तम स्थिती असलेला, राजकीय पुढारी गोविंदा बनलेला दिसतो का? मला तर एक आश्चर्य वाटतं की ह्या राजकारण्यांना........तथाकथित मानवी हक्क संघटनांना याचं काहीच वाटत नाही. खरंच गरीबी फार वाईट असते. त्याचप्रमाणे कमी वेळात, कमी श्रमात जास्त पैसे मिळवण्याची लालसाही चांगली नाही. कलीयुग आहे हेच खरं. वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की हे सगळं श्रीकृष्णाच्या नावाने चालू आहे.
आता असंही ऐकायला येतंय की या दहि-हंड्यांच्या थरांची तुलना परदेशातील मानवी मनोर्‍यांचे विक्रम मोडण्यासाठी केली जातेय. पण परदेशातील मानवी मनोर्‍याचे जागतिक पातळीवरील विक्रम मोडण्याची स्वप्ने दाखवताना हे सुद्धा लक्षात घेतले पाहीजे की तिथे प्रत्येक खेडाळूच्या जीवाची काळजी घेतली जाते. मनोर्‍यांच्या आजूबाजूला ठराविक अंतरापर्यंत स्प्रींगच्या गाद्या किंवा तत्सम सुरक्षा यंत्रणा सजग असते. त्या सगळ्या खेळाडुंना व्यवस्थित प्रशिक्षण दिलेले असते. कदाचित त्यांचा आरोग्य विमा पण उतरवला जात असेल. इथे तर पैशाचं आमीष दाखवून गोविंदांच्या आयुष्यांशी जुगार खेळला जातोय. या गोविंदांच्या जीवावर इतक्या लाखो रूपयांची लयलूट चालू असते पण एकालाही अशी इच्छा होत नाही की त्यांच्या सुरक्षेसाठी व्यवस्थित उपाययोजना आखल्या पाहीजेत. त्यांना व्यव्स्थित प्रशिक्षण, आरोग्य विमा आणि मानवी मनोरा करते वेळी बाजूला स्प्रींगच्या गाद्या किंवा पडलेल्यांना झेलण्यासाठी सुरक्षा जाळी या उपाय योजना तर असायलाच हव्यात. आणि बघ्यांना प्रत्यक्ष मानवी मनोर्‍यापासून ३०-५० फूट दूर उभं करायला हवं. जर एक उपनगर एक दहीहंडी असं ठेवलं तर सुरक्षा उपाय करण्यास योग्य होईल. आरोग्य विमा उतरवण्याची जबाबदारी गोविंदा पथकांना अनिवार्य हवी तर सुरक्षा पुरवण्याची हमी आयोजकांसाठी अनिवार्य हवी. हे सगळं तपासूनच पोलीसांनी दहीहंडी उत्सवाला परवानगी द्यावी.
पूर्वी नाही मुघल राजांच्या राज्यांत निव्वळ मनोरंजनासाठी कोंबडे, बैल यांच्या झुंजी लावल्या जात. त्या झुंजीतच त्यातल्याच एका कोंबड्याचा जीव गेल्याशिवाय झुंज थांबत नसे. तसंच काहीसं विकृत मनोवृत्तींचं दर्शन यासगळ्यातून होतंय. ह्या झुंजीत एकच काय अनेक गोविंदांचे बळी जातायत.......पण ही झुंज कधी थांबणार आणि कोण थांबवणार?........मनात राहून राहून एकच येतंय "गोंद्या गेला रे गेला", "गोंद्या गेला रे गेला"!!