Sunday, 24 April 2011

दुनिया झुकती है........दहा एक महिन्यांपूर्वीची गोष्ट. आम्ही फ्रॅंकफर्टहून लुफ्तान्साच्या फ्लाईटने बंगलोरला येत होतो. माझ्या शेजारच्या सीटवर म्युनिकहून आलेली एक जर्मन बाई बसलेली होती. मी तिला सहज विचारलं की तुम्ही भारतात कुठे आणि कशासाठी चाललायत? तर तिने दिलेलं उत्तर ऐकून मला धक्काच बसला. ती पुट्ट्पूर्तीला चाललेली होती. सत्य साईबाबांच्या ८५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने जगातील वेगेवेगळ्या भाषांमध्ये त्यांची प्रार्थना गाण्याच्या आंतरराष्ट्रीय समुहातील ती एक होती. तिथे जाऊन महिनाभर राहून ते लोक त्या प्रार्थनांचा सराव करणार होते. म्युनिक मध्येच काय संपूर्ण जगभरात त्यांचे भक्तगण पसरलेले आहेत. मला खूपच आश्चर्य वाटलं. तसं पुट्टपूर्तीला सत्य साईबाबांनी विविध सेवा कार्य काढलेली आहेत, त्यांचे भक्तगण सर्वदूर पसरलेले आहेत असं ऐकीवात होतं आज प्रत्यक्ष पहायला मिळालं. 
मी जेव्हा पुण्याच्या ज्ञान प्रबोधिनीत शिकवत होते तेव्हाची गोष्ट. एकदा अध्यापक कक्षात एक साडी नेसलेली आणि प्रचंड लांबलचक असं कपाळभर कुंकु लावलेली एक व्यक्ती आलेली पाहीली. सोलापूर ज्ञान प्रबोधिनीची कार्यकर्ती होती. पण एकूण अवतारावरून तर असंच वाटत होतं की कुठल्यातरी आश्रमातून आलेली किंवा चाललेली आहे. मी नंतर चौकशी केली तेव्हा समजलं की ती पुट्टपूर्तीला कायमची रहायला चाललेली होती. मला तेव्हा सुद्धा अधिक आश्चर्य वाटलं होतं.
महाविद्यालयात द्वितीय वर्षाला असताना मी महिन्याच्या सुट्टीत मी इगतपुरीला विपश्यना शिबीरासाठी गेले होते. दहा दिवसाचं शिबीर संपवून आल्यावर वर्तमानपत्रात एक ठळक बातमी पाहिली होती. सत्य साई बाबांवर त्यांच्याच दोन भक्तांनी गोळ्या झाडून प्राणघातक हल्ला केला. गोळ्या झाडणार याची कल्पना आल्यावर बाबांनी तिथून पळ काढला आणि थोडक्यात बचावले. नुकतंच विपश्यना शिबिरात प्रवाचानात ऐकलं होतं की आपल्या मनात प्रेम असेल तर अगदी वाघासारख्या  हिंस्त्र पशुच देखील मत परिवर्तन आपण करू शकतो. मग मला प्रश्न पडला की सत्य साई बाबां सारखे चमत्कार करणारे अध्यात्मिक गुरू आणि त्यांचेच शिष्य असलेले ते हल्लेखोर मग बाबांच्या मनातील प्रेमाचा त्यांच्यावर प्रभाव कसा नाही पडला? असो. 
या हल्ल्यांच्या घटनेच्याही आधी काही वर्षांपूर्वी इंडीया टुडेच्या मुखपृष्टावर सत्य साईबाबांचा मोठा फोटो आणि ते हातातून घड्याळ काढतायत असा काहीसा फोटो पाहील्याचं आठवतंय. मी त्यावेळी बरीच लहान असल्याने इंग्रजी फारसं समजत नव्हतं पण चित्रं मात्रं खूप इंटरेस्टिंग असायची.  

पहिल्यापासूनच माझी देवावर किंवा परामात्मा या स्म्काल्पनेवर श्रद्धा आहे. पण मी अशा हातातून घड्याळे किंवा सोन्याच्या अंगठ्या, साखळ्या, अंगारे काढणार्या बुवांवर कधीच विश्वास ठेवला नाही. प्रत्येक माणसात देवत्व आहे हे सत्य साईबबांचं म्हणणं खरं असलं तरी मला मनापासून अशा एखाद्या व्यक्तीच्या भजनी लागणं कधी जमलंच नाही. मला प्रत्येकवेळी काही मूलभूत प्रश्न पडतात. १) जर सत्य साई बाबा हे शिर्डीच्या साईबाबांचा अवतार आहेत तर मग ते असे चमत्कार दाखवून इतकी सम्पत्ती कशी काय गोळा करू शकतात? कारण शिर्डीच्या साईबाबांनी चमत्कार दाखवले आणि लोकांना त्याचा प्रत्यय आला पण त्यांनी कधीच हातातून भौतिक गोष्टी काढल्यानाहीत. नरेंद्र दाभोळकर किंवा जादूगार रघुवीर यांना सुद्धा हातचलाखी दाखवून हातातून घड्याळ, सोन्याची साखळी, अंगारा, कुंकू काढता येतात. मग हीच त्यांची आध्यात्मिक शक्ती कशी? 
२) स्वत:च्या मनातील प्रेमाने त्यांनी त्यांच्यावर हल्ला करणार्या भक्तांच्या मनात प्रेम का नाही भरले? मग त्यांच्यावर हल्ला झालाच कसा? 
३) चमत्कारांनी जर इतरांची दुखणी बरी केली तर मग स्वत:चं आजारपण का नाही बरे करू शकले? 
सत्य साईबाबांनी नंतरच्या काळात निर्माण केलेली सेवा कार्ये हे एक उल्लेखनीय कार्य नक्कीच आहे. पण मग त्याच बरोबर भोंदू पणा करून लोकांना फसवणे कितपत योग्य आहे? अगदी मोठमोठे राजकीय नेते , मोठमोठे उद्योगपती (की ज्यातील 95% हून अधिक भ्रष्टाचारी आहेत) असे सर्वच जन बाबांचे भक्त. मग या लोकांच्या भ्रष्ट मानसिकतेत का नाही फरक पडत? मग सत्य साई बाबांनी आपल्या हातातून सोन्याच्या साखळ्या काढून देशावरील कर्जाचा बोजा का नाही कमी केला?
माणसाला मानसिक आधार म्हणून परमेश्वर, देव अशा संकल्पना लागतात. परमेश्वर, त्याचं  अस्तित्त्व हे मी सुद्धा मान्य करते पण त्या श्रद्धेत डोळसपणा  आहे. उगाचच एखाद्याच्या मागे जनता धावतेय म्हणून आपणही धावा असं करू नये. जग जितकं आधुनिक बनत चालंय तितकीच या बुवाबाबांच्या भजनी लागलेल्यांची संख्या भरमसाठ वाढते आहे. सामान्य जनतेचं जाउदेत लोक शास्त्रज्ञ म्हणून काम करतात पण नवस बोलायला शिर्डीला जातात. हा काय प्रकार आहे मला सुद्धा समजलेलं नाही. मग त्या शास्त्रीय ज्ञानाला काय अर्थ? म्हणतात ना दुनिया झुकती है.....झुकाने वाला चाहिये 

Sunday, 17 April 2011

भारताची उर्जेची गरज: रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस!!

बरेच महिने झाले कोकणात जैतापूर प्रकल्प व्हावा की न व्हावा हा विषय उपयुक्त चर्चा न होता फक्त राजकीय कलगी-तुर्‍यांनी रंगलेला आहे. जपानमधील भूकंपाने फुकुशीमा (जगातील सगळ्यात मोठी अणुभट्टी) अणुभट्टीला पोहोचलेला धोका आणि त्यामुळे जैतापूर प्रकल्पाच्या चर्चेला मिळालेला एक वेगळा आयाम. अणुप्रकल्पाच्या बाजूने कंठशोष करणारे अणुशास्त्रज्ञ, सत्ताधारी आणि स्थानीक राजकीय नेते तर प्रकल्पाच्या विरोधात बोलणारे पर्यावरण प्रेमी, विरोधी पक्ष तसेच ज्यांची शेती यात संपादन केली जातेय असे  आणि इतर स्थानिक यांची प्रतिक्रीया आणि एकूण चर्चा पाहता मूळ मुद्द्याला फारसा कोणी हात घालत नाहीये असंच वाटतं. सत्ताधारी आणि अणुशास्त्रज्ञांकडून असं चित्रं निर्माण केलं गेलंय की जैतापूर प्रकल्पाला विरोध म्हणजे विकासाला विरोध. पण प्रकल्पाच्या मूळ गरजे विषयी काहीच भाष्य नाहीये.
आता अगदी आपल्या डोळ्यासमोर असलेलं उदाहरण जे सोयीस्कररित्या विसरलं जातंय: गुजरात मधील प्रत्येक गावात चोवीस तास वीजपुरवठा आहे. तिथे कोणताही अणुउर्जेचा प्रकल्प आणून बसवलेला नाहीये. अणुउर्जा नसल्याने तिथल्या विकासाला खीळ बसलेली नाही. जर आपण बघितलं तर तिथे वायू उर्जा आणि सौर उर्जा यांचा अधिक वापर केला गेला आहे. त्याचप्रमाणे जी वीज पारंपारीक उर्जा स्त्रोतांतून मिळते आहे म्हणजे कोळश्याचा वापर करून तिचा अधिकाधीक सदुपयोग केलेला आढळतो. मुख्य म्हणजे गुजरात मधली वीज चोरी ९५% थांबलेली आहे. आपल्याकडे निसर्गाला अपाय न करता अशाप्रकारे उपल्ब्ध उर्जेचा अधिक वापर करून घेणं का जमत नाहीये? खाली विविध उर्जा स्त्रोतांसंदर्भात काही माहीती आणि मतं मांडते आहे.

अणुउर्जा

एकूणच जागतिक पातळीवर अणुउर्जेचा वापर आणि उर्जेची गरज भागवण्याचं प्रमाण पाहता अणुउर्जेच्या वापराची टक्केवारी ६ ते ८ % च्या वर जात नाही. त्याउलट अणुउर्जा प्रकल्पांना येणारा खर्च, त्यांच्या सुरक्षेसाठी येणारा खर्च (सुरक्षा अपुरीच असणार), त्यातून निघणार्‍या न्युक्लीअर वेस्टचं प्रमाण, त्याचे स्थानीक जनजीवनावर होणारे अपायकारक परिणाम बघता अणुउर्जा प्रकल्प भारतासारख्या देशाला आतबट्ट्याचा व्यवहार ठरेल.
बायोमास उर्जा: ब्राझील सारखं आपल्या देशात बायोमास म्हणजे ऊसापासून इथेनॉल मिळवुन त्याचा वापर इंधन म्हणून करणं अतिशय चुकीचं ठरेल. कारण ऊसासारखं पीक घेण्यासाठी लागणारं पाण्याचं प्रमाण, त्याला लागणारी मेहनत (यात ऊसकामगारांचे ही प्रश्न आलेच) तसेच त्याने कमी होत जाणारा जमीनीचा कस हे सगळं पाहता आपण गाड्या चालवण्यासाठी शेतीचं किंवा पिण्याचं पाणी वापरण्यासारखं असेल. आपली आर्थिक व्यवस्था काहीप्रमाणात साखरेवर अवलंबुन आहे आणि आपन उत्तम प्रतिची साखर निर्यात करतो. जर ऊसाच्या मळीचा वापर साखर तयार करण्यासाठी न करता इथेनॉल तयार करण्यासाठी केला तर आपल्या अर्थव्यवस्थेवरही त्याचा भयंकर परिणाम होईल.

कोळशापासूनची उर्जा: आपल्याकडे पारंपारीक उर्जास स्त्रोत आहे तो कोळशापासून उर्जा निर्मीतीचा. त्यामुळे ठीकठीकाणी कोळशाच्या खाणी आपल्याला आढळतात. कोळशाच्या खाणींमधुन कोळसा उपसोन काढणं तब्येतीला खूपच हानीकारक आहे. आज मितीला भारतात कोळशाच्या खाणींमध्ये काम करणार्‍या कामगारांमध्ये १५ वर्षांखालील मुलांचं प्रमाण प्रचंड आहे. आपल्याच बांधवांच्या आयुष्यात प्रकाश आणण्यासाठी ही मुलं दिवस-रात्र काम करून आपल्या जीवाची पर्वा न करता स्वत:च्या आयुष्यात अंधार  आणत असतात. याचाही विचार गांभिर्याने व्हायला हवा.

थर्मल उर्जा: कित्येक टन लाकूड जाळून जी उर्जा मिळते ती थर्मल एनर्जी. यासाठी आपली सुंदर हिरवीगार जंगलं प्रचंड प्रमाणात तोडली जात आहेत. ज्याप्रमाणात जंगलतोड होते आहे त्याप्रमाणात वृक्षलागवड होत नाहीये. जंगल तोडीमुळे पर्यावरणाची अपरीमित हानी होते आहे त्याविषयी गांभिर्यानं विचार करायला हवा.
तेल आणि नैसर्गिक वायू पासून मिळणारी उर्जा: आपल्याकडे आता थोडेफार तेलाचे साठे तयार होत आहेत पण आपली गरज कित्येकपटीने वाढते आहे. त्यामुळे आपल्याला आपली तेलाची गरज भागवण्यासाठी आखाती देशांकडून तेल विकत घ्यावं लागतंय. एकूणच तेलाच्या जागतिक राजकारणामुळे तेलाचे भाव गगनाला भिडत आहेत. आपल्याकडील सगळं परकीय चलन केवळ तेल खरेदी करण्यात खर्ची पडतंय. यामुळे आपल्याकडचे तेलाचे भाव आणि पर्यायाने महागाई प्रचंड वाढली आहे. आपल्या देशातील अव्यवस्था आणि असलेले रीसोर्सेस व्यव्स्थीत न वापरणे त्याउलट त्याचं शोषण होत असल्याने आपल्याकडे शहरी भागात प्रदुषणाचा प्रश्न आवासून उभा आहे. 


जरी जागतीक टक्केवारी असं सांगत असली की भारतात हवेत कार्बन सोडण्याचं प्रमाण हे अमेरिका, कॅनडा, युरोप आणि चीन यादेशांच्या तुलनेत खूपच कमी असलं तरी आपण आपली लोकसंख्याही लक्षात घ्यायला हवी. त्याचप्रमाणे आपल्याकडील उद्योगांचे प्रमाणही त्यांच्याकडील उद्योगांच्या तुलनेत कमीच आहे. पण आपण वेळीच जागे झालो नाही तर वाढत्या उद्योगांबरोबर आपण आपल्या पर्यावरणाचा र्‍हास करून आपली कबर खणू.
कोळशापासून बनवलेल्या उर्जेमुळे, कोळशाच्या खाणीत काम करणार्‍या कामगारांकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. बायोमासच्या वापरामुळे सुद्धा प्रचंड सामाजिक आणि कृषीप्रधानतेमुळे आर्थिक प्रश्नांना सामोरं जावं लागेल. अणुउर्जा, लाकूड आणि तेलापासून मिळणार्‍या उर्जेमुळे पर्यावरणाचा प्रचंड र्‍हास होतोय, प्रदुषण वाढतंय. याला भारतासाठी एकच पर्याय आहे तो म्हणजे रिन्युएबल उर्जा स्त्रोत वापरणं. म्हणजेच निसर्गाच्या चक्रातून उर्जा घेऊन ती वापरून परत निसर्गालाच परत करणे (म्हणजे निसर्गाचा र्‍हासही होणार नाही).

वायू उर्जा

आपल्याकडे वारा वाहण्याचं प्रमाण प्रचंड आहे. जिथे जिथे सपाट भूप्रदेश आहे तिथे तिथे वायू उर्जेचे प्रकल्प उभारून तिथली स्थानिक विजेची गरज भागवली जाऊ शकते. असे अधिकाधिक प्रकल्प उभारणे गरजेचे आहे. त्यातून वीज निर्मिती होतच राहते आणि प्रदुषणही होत नाही.
पाण्यापासून उर्जा
आपल्याकडे डोंगराळ भागात (विशेषत: हिमालय, अरूणाचल प्रदेश, नागालॅन्ड, मणीपूर, मेघालय, मिझोराम) प्रचंड प्रमाणात पाण्याचे साठे आहेत. या पाण्याच्या साठ्यांमुळे वर्षांतून दोनदा  उत्तरपूर्वेतील राज्यांत, आसाम, बिहार आणि प. बंगाल मध्ये पूर येतात आणि सगळं पाणी वाया जातं. बरं मालमत्ता आणि मनुष्यहानी होते ती वेगळीच. दूर दृष्टीने विचार केला तर हे पाणी हायडल पॉवर च्या माध्यमातून वापरलं जाऊ शकतं. जर यापाण्याचा पुरेपुर उपयोग केला तर संपूर्ण भारताला वर्षंभर पुरून इतर शेजारील देशांना निर्यात करता येईल इतकी वीज निर्माण या पाण्यापासून होऊ शकते. जर व्यवस्थीत नियोजन करून, अतिशय टिकाऊ अशी हायडल पॉवर स्टेशन्स बांधायला हवीत, जेणे करून उत्तर भारत, पूर्व भारत आणि मध्य-पश्चिम भारत यांची वीजेची गरज व्यवस्थीत भागवली जाईल. स्थानीक नैसर्गिक आव्हानांना लक्षात घेऊन इनोव्हेटीव्ह सोल्युशन्स तयार करायला हवीत. यामुळे पर्यावरणाचा र्‍हास होणार नाही आणि पूरांमुळे दरवर्षी होणारं नुकसान वाचेल. अविकसित भाग विकसीत व्हायला मदत होईल.
टायडल एनर्जी आणि समुद्राच्या पाण्यापासून उर्जा निर्मिती

वारंवार येणार्‍या त्सुनामी लाटांमुळे आपल्याला आता समुद्राच्या लाटांची शक्ती चांगलीच माहीती झाली आहे. याच लाटांच्या शक्तीचा उपयोग समुद्राच्या तळाशी टर्बाईन्स लावून ती फिरवुन उर्जा निर्मीतीसाठी केला जाऊ शकतो. आपल्या देशाला नशीबने अर्ध्याअधिक भागाला समुद्र किनारा लाभलेला आहे. तिथे आपल्या हद्दीत जर समुद्रीलाटांपासून वीज निर्मिती करण्याचे प्रकल्प उभे केले तर समुद्री जीवनाचाही र्‍हास न होता उत्तम प्रकारे वीज निर्मिती होईल.

सौर उर्जा: सूर्य आपल्याला जीवन देतो त्याच प्रमाणे उर्जा देखिल देतो. खरं तर सूर्यामध्ये जी उर्जा निर्मिती होते ती प्रचंड प्रमाणात घडत असलेल्या हायड्रोजन बॉम्ब्सच्या स्फोटांमुळे म्हणजे एकप्रकारे ती अणु उर्जाच आहे. पण सूर्य आपल्यापासून कित्येक करोडो करोडो किलोमीटर दूर असल्याने त्य रेडीएअशन्सचा आपल्यावर विपरीत परिणाम होत नाही. इतकी योजनं दूर असूनही आपल्याला सूर्यप्रकाशातील दाहकतापण जाणवत असते. सौर उर्जेचे मोठमोठाले प्रकल्प उभारणे हे कितीही महागडे असले तरी सौर उर्जे शिवाय आपल्या देशाला तरी उत्तम पर्याय नाही. कारण वर्षातले फक्त चार महिने जेमेतेम आपल्याकडे पावसाळा असतो. त्यातून सध्या पावसाचं प्रमाण कमी होऊन उन्हाळा सगळीकडे वाढला आहे. देशात कमी पाऊस पडणारे किंवा दुष्काळी असे अनेक जिल्हे आहेत. की जिथे पाण्याअभावी आणि प्रखर सूर्यप्रकाशामुळे पिकं नाश पावतात. या येवढ्या मोठ्या प्रमाणात उपल्ब्ध सौर उर्जेचा उपयोग भारताने करून घ्यायचा नाही तर काय अमेरिका करणार आहे? अमेरिकादी युरोपीय देशात, त्याच प्रमाणे चीन मध्येही बघीतलं तर भारतात वर्षंभर जितकी सौर उर्जा उपल्ब्ध आहे तितकी कुठेच नाही. त्यामुळे त्यांना अणु उर्जा, तेल यांच्याशिवाय पर्याय नाहीये. पण आपल्याकडे निसर्गाचं वरदान भरपूर आहे. गरज आहे ती फक्त सुव्यवस्थित नियोजनाची.
या नियोजनासाठी काही उपाय:
१) सौर उर्जा प्रकल्पांसाठी अधिक पैसा लागतो पण एकदा केलेली गुंतवणुक कायमस्वरूपी असल्यासारखी असते. मोठमोठाले खर्चिक सौर उर्जांचे प्रकल्प बांधण्यापेक्षा वेगवेगळ्या ठीकाणी स्थानिक गरजेनुसार छोटी छोटी सौर उर्जेची युनीट्स उभारली तर उत्तम होईल.
 2) त्याचं आर्थिक गणितही व्यवस्थित जमवता येईल. मोठमोठ्या कंपन्यांना, उद्योगांना कारखाने उभारण्यासाठी लागणारी जमीन सबसीडीने देतानाच तिथल्या स्थानीक गरजेचा सौर उर्जा प्रकल्प उभारण्यास सांगणे. त्या प्रकल्पाचा सर्व खर्च हा ती कंपनी उचलेल. म्हणजे लागणारी सगळी उर्जा स्वखर्चाने निर्माण करता येईल. त्याचा बोजा सरकारवर पडणार नाही. 
3) मोबाईल टॉवर्स उभारण्यासाठी परवानगी देताना सुद्धा अशाच प्रकारे धोरण ठेवावे. म्हणजे अधिकाधिक खेड्यांत वीज पोहोचेल. 
4) शहरात प्रत्येकाला घर बांधताना किंवा बिल्डींग बांधताना भविष्यात लागणार्‍या विजेसाठी गरजे प्रमाणे सौर पट्ट्या बसवणे बंधनकारक करावे. मुख्यत: जे मॉल्स आणि दुकानदार रात्रंदिवस वीजेचा अपव्यय करतात त्यांना सुद्धा सौर उर्जेच्या पट्ट्या बसवणे बंधनकारक करावे. म्हणजे त्यांना सरकारी खर्चातून अत्यंत कमी वीज जास्त दराने पुरवावी. म्हणजे त्यांचा विजेचा अपव्यय कमी होईल. 
5) शहरी भागांत सगळ्या बिल्डींग्जना सौर पट्ट्या घालून घेणं अनिवार्य करावं. रस्त्यावरच्या प्रत्येक दिव्याच्या युनीट्स वर एक एक और पट्टी बसवावी. 
 6) डोंगराळ भागात जिथे हायडल पॉवर शक्य आहे तिथे ते प्रकल्प उभारावेत. सागरी किनारपट्टीच्या भागात टायडल एनर्जी प्लांट्स उभे करावेत. सपाट भूप्रदेशात आणि जिथे वार्‍याचं प्रमाण प्रचंड आहे तिथे वायू उर्जेचे प्रकल्प उभारावेत. अशा विविध प्रकारे स्थानिक उर्जेची गरज भागवावी. अगदीच इमर्जन्सी साठी कोळसा, थर्मल आणि तेल या उर्जांचा वापर करावा.
7) सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे वीज चोरी पूर्णपणे थांबवावी. 

म्हणजे आपल्या देशाची वीजेची गरज आपल्याला अणु उर्जा प्रकल्पांसारख्या अतिशय घातक प्रकल्पांशिवाय भागवता येईल. विकासालाही खिळ बसणार नाही. कारण खेडोपाड्यांत, कानाकोपर्‍यांत वीज पोहोचल्याने लोकांचं शहरात होणारं स्थलांतर कमी होईल आणि शहरांवर वाढणारा बोजा, बकालपणा, गलिच्छपणा कमी होईल. निसर्गाचा र्‍हास टळल्याने, प्रदुषण कमी झाल्याने देशातील स्वच्छ हवेचं प्रमाण द्विगुणीत होईल. आपला देश सुजलाम सुफलाम व्हायला वेळ लागायचा नाही. हे सुंदर स्वप्न साकारण्यासाठी गरज आहे ती इच्छा शक्तीची, भ्रष्टाचारमुक्त व्यवस्थेची. रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेसची.

Friday, 8 April 2011

कोंबडा आरवला आता उजाडलं तर ठीक नाहीतर.....


परवापासून इंडीया अगेन्स्ट करप्शन या चळवळीने जोर धरला आणि बघता बघता समर्थकांचा २ लाखाचा टप्पा पूर्ण केला. अण्णांना सर्व देशभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला. मी सुद्धा अण्णांना सायबर पाठींबा जाहीर केला आणि इतरांनी तसे करावे यासाठी प्रयत्नही केले. पण......आता कुणी म्हणतील की हीला चांगलं बघवत नाही किंवा संशयीच वृत्ती जास्त. काय करणार, स्वामी विवेकानंद वाचल्यापासून कोणतीही गोष्ट जशीच्या तशी स्विकारू नये, बुद्धीच्या जोरावर तावून सुलाखून घ्यावी हेच शिकले. त्यामुळे कोणतीही गोष्ट एका बाजूने चालू असताना याला दुसरी कोणती बाजू असेल काय आणि का हे तपासण्याची सवयच लागलेली आहे. तर आपण आजच्या अण्णा हजारे प्रकरणाच्या सांगते कडे वळूया. 

आता हेच बघा ना, २-जी पासून आदर्श, गुलमोहर आणि कित्येक अशी भ्रष्टाचाराची प्रकरणं उघडकीस येऊन किती तरी काळ लोटला. रामदेवबाबांनी त्या विरूद्ध आंदोलनही छेडलं होतं. पण गंमत अशी की तेव्हा अण्णा हजारें सकट कोणाच्याच प्राधान्यक्रमावर भ्रष्टाचार विरोध नव्हता. त्यामुळे कोणीच (आपण सायबर वाल्यांनी सुद्धा) रामदेवबाबांना पाठींबा जाहीर केला नाही. सगळेच झोपले होते. आता अचानक गुढीपाडव्यापासून अण्णा हजारे उपोषणाला बसले आणि सगळे खडबडुन जागे झाले.
मग मला सांगा की रामदेवबाबांनी जेव्हा एक महिन्यापूर्वी भ्रष्टाचारा विरोधात रणशिंग फुंकलं होतं तेव्हा अण्णा हजारे आणि कोणाचेच प्राधान्यक्रम भ्रष्टाचार विरोध हे नव्हते का? आदर्श सकट भ्रष्टाचाराची सगळी प्रकरणे उघडकीस येऊन बराच काळ लोटलाय. रामदेवबाबांनी चालू केलेली चळवळ चुकीची होती म्हणून त्यांना पाठींबा दिला नाही असं म्हणायचंय का तुम्हाला? तेव्हा अण्णा हजारे कुठे होते? त्यांची प्रतिक्रीया कुठेच दिसली नाही. आता एकदम ..........म्हणून जरा शंका आली. आपल्या देशात काहीही होईल....सांगता येत नाही.
मला तर असं वाटतंय की हा सगळा कॉंग्रेसचाच बनाव आहे. रामदेवबाबांना मागे टाकण्यासाठी. रामदेवबाबा आणि बाकी सगळे पटणे महाकठीण. त्यातल्यात्यात अण्णा बरे......आपला जुनाच माणूस. कारण अण्णा हजारे १० हून जास्त वर्षं महाराष्ट्रात भ्रष्टाचारा विरूद्ध (??) लढा देत आहेत. आणि जर त्यांच्यात खरंच इतकी ताकद असती तर महाराष्ट्रात एकही भ्रष्टाचाराचं प्रकरण होता कामा नये. त्या उलट महाराष्ट्रातील भ्रष्टाचार दिवसेंदिवस शिगेला पोहोचलाय. अण्णा हजारे कॉंग्रेसच्या हातातलं बाहुलं तर नाहीत? शरद पवारांची वेगळी ओळख करून द्यायला नको. महाराष्ट्रातील भूखंडांचं श्रीखंड गेली अनेक वर्षे चाटत आहेत. हे केंद्रीय कृषीमंत्री असल्यापासून महाराष्ट्रातच शेतकर्‍यांनी प्रचंड संख्येने आत्महत्त्या केल्यात. शरद पवार हा माणूस काही इतक्या नाजूक कातडीचा नाही की अण्णा हजारेंनी आरोप करायला आणि त्यांनी लगेच खुर्ची सोडून द्यायला. नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय.
दिल्लीतच पाणी मुरतंय. तुम्ही मारल्या सारखं करा आणि आम्ही रडल्यासारखं करतो. असंच काहीसं नाटक दिल्लीत चालू होतं. असं असतं तर इतर कुणालाच त्यांनी (त्यांच्या गुंड कार्यकर्त्यांनी) आजूबाजूला फिरकु दिलं नाही. रामदेवबाबांनी जेव्हा आंदोलन छेडलं तेव्हा अण्णा कुठे होते? आपल्याकडे इतरांचं अनुकरण करण्याची इतकी वाईट फॅशन आहे ना. अनुकरण करणं चांगलं पण ते समजुन केलं तर. ट्युनिशीयात जे झालं ते उस्फूर्तपणे झालं. माझ्याकडे फर्स्ट हॅन्ड इन्फरमेशन आहे. पण इजिप्त आणि लिबियात जाणून बुजुन अमेरिकेने सगळं घडवुन आणलं आहे. हे सुद्धा कालांतराने विकीलिक्स मधून बाहेर येईलच. ट्युनिशीयात झालं आणि इजिप्त मध्ये झालं (की घडवलं गेलं) म्हणजे लगेच भारतात पण असं काहीतरी होऊ शकतं हे दाखवण्याची एक खुमखुमीच लोकांमध्ये पसरलेली होती. त्याचाच परिणाम म्हणजे फेसबुक इत्यादी सोशल नेटवर्कींगचा उपयोग केला गेला. सगळेच अण्णा अण्णा म्हणतायत मग आपणही म्हणूया.....आपण का मागे रहा. आणि मग सगळं पसरत गेलंय. जर हे आंदोलन खरंच असेल तर सर्व भ्रष्टाचार्‍यांना शिक्षा लवकरात लवकर झाली पाहीजे. नरेंद्र मोदी उपोषणाला नाही बसले. कृती करून दाखवली. गुजरातमध्ये भ्रष्टाचार तुलनेने शून्यावर आला आहे.
अगदी खरंय, कोंबडा आरवला ....मग तो कोणाचा का असेना.......उजाडलं तर ठीकच. पण आपल्याकडे म्हण आहे नं, झोपलेल्याला जागे करता येते, झोपेचं सोंग घेतलेल्याला नव्हे. आपल्याकडे जनतेची स्मृती इतकी वाईट आहे की सगळ्या गोष्टी लगेच विसरून जातात. भावना अशा प्रकारे चेतवणं तसं सोपं काम आहे त्या तशाच तेवत ठेवणं आणि प्रत्यक्ष बदल घडवुन आणणं महामुश्कील. ज्यांना सीबीआय सारख्या संघटनेला स्वत:च्या खिशात घालता येतं त्यांना लोकपाल अध्यक्षपदी असणार्‍या निवृत्त न्यायाधीशांना खिशात घालणं कितीसं अवघड आहे?
म्हणूनच म्हणावसं वाटतंय: आता कोंबडा तर आरवला ......उजाडलं तर ठीकच .....नाही तर??


Tuesday, 5 April 2011

डब डब डब २०११


डब डब डब म्हणजेच WWW. सर टिम बर्नर्स ली यांनी आंतर्जाल म्हणजेच ज्याला आपण वर्ल्ड वाईड वेब म्हणतो ते शोधून काढलं आणि त्यानंतर याच आंतर्जालाच्या अधिकाधिक सदुपयोगासाठी, जगातील विविध संशोधकांना त्यात  सहभागी करून घेण्यासाठी म्हणून टिम बर्नर्स ली आणि त्यांच्या इतर सहकार्‍यांनी डब डब डब आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स चालू केली. ह्या वर्षी या कॉन्फरन्सला २० वर्षं पूर्ण झाली. गेल्या १९ वर्षांत जगाच्या पाठीवरील अनेक लहान-मोठ्या देशांत ह्या कॉन्फरन्सचं आयोजन झालं. लवकरच या कॉन्फरन्स मध्ये इंडस्ट्री आणि ऍकॅडेमिया यांचं एक सुरेख कॉम्बो तयार झालं. २००३ पासूनच या कॉन्फरन्सच्या भारतातील आयोजनासाठी, ट्रीपल आय टी (बंगलोर आणि हैद्राबाद), आय आय टी मुंबई आणि भारतातील इतर निवडक तंत्रशिक्षण संस्था, बोली लावून होत्या. ह्या कॉन्फरन्सचं यजमानपद देण्यासाठी नेमके कोणते निकष लावले जातात ह्याची कल्पना नाही पण या यजमानपदाने सलग दोन वेळा हुलकावणी दिल्यावर तिसर्‍यांदा हैद्राबाद येथे २०११ साली ही कॉन्फरन्स आयोजित करण्यासाठी परवानगी मिळाली. तसं आपल्या भारतात अशा जागतिक कीर्तीच्या कॉन्फरन्सेस होणं हेच खूप अपरूप असतं. कारण अधिकाधिक भारतीय विद्यार्थ्यांना यात सहभागी होता येतं. तसे आय आय टी मधील विद्यार्थ्यांनी/संशोधकांनी  या कॉन्फरन्स मध्ये आपापले पेपर्स या आधीही वाचले असतील पण एखादा पेपर वाचणे हा अनुभव वेगळा आणि अशी कॉन्फरन्स आयोजित करणे हा अनुभव वेगळा. त्या दृष्टीने तसेच भारतासारख्या ७०% जनता खेड्यात राहणार्‍या विकसनशील देशांत या महाजालचा उपयोग विकास अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कसा करता येईल म्हणजेच "सगळ्यांसाठी वेब" ही थीम केंद्रस्थानी ठेवून ही कॉन्फरन्स २०११ साली भारतात आयोजित करण्याला खूप महत्त्व आहे. वेब टेक्नॉलॉजीशी संबंधीत अतिशय महत्त्वाचे असलेले विषय या कॉन्फरन्स मध्ये अभ्यासले जातात. आंतर्जाल म्हंटलं की त्याचा दुरूपयोग आणि मग ओघनेच त्याची सुरक्षा, त्यातील प्रायव्हसी जपणे हे ओघाने आलेच. वेब टेक्नॉलॉजीचा सर्च सिस्टीम्स आणि त्याची ऍप्लीकेशन्स हा एक अविभाज्य भाग. याच आंतर्जालावर अनेक प्रकारची माहीती विविध स्वरूपांत साठवलेली असते. त्या माहीतीचं सुयोग्य संकलन, त्याचा सुयोग्य वापर करण्यासाठी त्याची क्रमवारिता लावणे (रॅंकींग), स्ट्रक्चर्ड डेटा आणि अन्स्ट्रक्चर्ड डेटा यांना जोडणे, त्याचप्रमाणे यासगळ्याचा वापर करणारे म्हणजे आपण (युजर्स), आपल्याला त्याच अधिकाधिक वैयक्तीक दृष्ट्या (पर्सनलाईझ्ड) वापर कसा करता येईल, वेब टेक्नॉलॉजीचा मोबाईल सिस्टीम्स मधला वापर, सोशल नेटवर्कींग, त्यातून मिळणारी समजाच्या तसेच व्यक्तींच्या वर्तना विषयीची माहीती, त्याचा भविष्यात करून घेता येण्यासारखा उपयोग, मॉनेटायझेशन यांसारखे विषय जसे यात हाताळले गेले तसेच सीमॅन्टीक वेब टेक्नॉलॉजी की ज्याला वेब ३.० असे म्हणतात की जी भविष्यातील वेब टेक्नॉलॉजी कशी असेल आणि विकसनशील देशांसाठी वेब टेक्नॉलॉजी असे सुद्धा विषय चर्चिले गेले. एकूणच कोणत्याही ज्ञान शाखेतील माहीतीच्या विस्फोटामुळे त्या त्या शाखांची व्याप्तीही प्रचंड वाढली आहे त्यामुळे .....देता किती घेशील दो कराने........अशीच अवस्था होते. यामुळेच कॉन्फरन्स मधील संशोधनाविषयी या लेखात मी फारसं काही लिहीलेलं नाही. आवश्यक तिथे थोडीशी ओळख मात्र दिलेली आहे. 
जानेवारीत कॉन्फरन्सची वेबसाईट चाळत असताना एका महत्त्वाच्या गोष्टीने लक्ष वेधले आणि ते म्हणजे फेलोशीप्स. कॉन्फरन्सला जाण्यासाठी गुगलने पी एच डी किंवा मास्टर्स करणार्‍या मुली/स्त्रिया यांच्यासाठी फेलोशीप ठेवली होती. त्यासाठी मी अर्ज केला. १५ दिवसांनी मला ती फेलोशिप मिळल्याचं पत्र आलं आणि माझं डब्ल्यु ३ कॉन्फरन्सला जायचं नक्की झालं. कॉन्फरन्स रजिस्ट्रेशन फी, टू स्टार मध्ये राहण्याची सोय आणि जाण्यायेण्याचं विमान प्रवास असं सगळं त्या फेलोशिप मध्ये होतं. पी एच डी करताना अशा उत्तम कॉन्फरन्स अटेंड करणं, विविध कॉन्फरन्सेस मध्ये पेपर प्रेझेंट करणं हा अनुभव खूप महत्त्वाचा मानला जातो. त्या विषयातलं तसेच त्या क्षेत्रातलं ज्ञान अद्ययावत आणि वृद्धिंगत होण्यासाठी तसेच त्या क्षेत्रातील जगभरातील संशोधकांना भेटता येणं, त्यांच्याशी संपर्क प्रस्थापीत करणं यासाठी हे अनुभव खूप मोलाचे असतात.  कॉन्फरन्स २८ मार्च पासून चालू होणार असल्याने २७ तारखेलाच फ्लाईटने संध्याकाळी हैद्राबादला पोहोचले. इन्फोसीस गेस्ट हाऊस मध्ये सगळ्या फेलोशिप होल्डर्सची राहण्याची सोय केली होती. माझ्या रूम मध्ये राज्यक्रांतीमुळे नुकत्याच प्रकाश झोतात आलेल्या ट्युनिशीयाहून आलेली एक संशोधक होती. तिच्या बरोबर झालेल्या गप्पांवर  एक स्वतंत्र लेख लिहेनच.  सुरूवातीला म्हणजे २८ आणि २९ मार्च या दिवशी विविध विषयांवर कार्यशाळा आणि ट्युटोरियल्स होत्या. मला ही पद्धत आवडली. कारण त्यामध्ये इन्फॉर्मल कम्युनिकेशनला भरपूर वाव होता. तसेच विविध विषयांतले तज्ज्ञमंडळी तीथे असल्याने त्यांच्याशी मनमोकळी चर्चा करणं, त्यांची ओळख करून घेणं याला भरपूर वाव मिळाला. ३० मार्चला आपले माजी राष्ट्रपती रॉकेट सायन्टीस्ट डॉ ए पी जे अब्दुलकलाम उद्घाटन करण्यासाठी आले होते.  कॉन्फर्न्स उद्घाटनाची सुरूवात जपानमधील त्सुनामी मध्ये बळी गेलेल्या नागरिकांना श्रध्द्दांजली वाहून झाली. अब्दुल कलामांसारखी भविष्यवेधी व्यक्ती "सर्वांसाठी वेब" या थीमवरील कॉन्फरन्सचं उद्घाटन करायला मिळणं हा सुद्धा एक दुग्ध-शर्करा योगच म्हणायचा. वेब टेक्नॉलॉजीचा भारतात प्रसार होताना भारतीय संस्कृती जपून, स्थानिक लोकांच्या गरजांनुरूप त्या तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल यासंदर्भात डॉ. कलाम यांनी आपले विचार मांडले. याच विषयावरील विविध पॅनेल डीस्कशन्स मधुन याहू, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट यासारख्या मोठमोठ्या कंपन्या नक्की कोणतं संशोधन करतायत, काय काय नविन आणू पहात आहेत यावरही चर्चा झाली. विविध सोशल नेटवर्क साईट्सचा एकूणच मानवी आणि सामाजिक वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी उत्तम उपयोग करता येऊ शकतो आणि तसा तो करणं चालू आहे असंही याचर्चां मधून बाहेर आलं. माणसाची सामाजीकरणाची गरज भागवण्यासाठी तयार झालेल्या या सोशल नेटवर्कींग साईट्स हळूहळू ज्ञान संपादन, माहीतीची देवाणघेवाण याबरोबरच समाजातील राजकीय भान कसे जागृत करतेय याचीही जाणीव करून गेले. त्याअनुषंगाने विविध देशांतील इंटरनेट सेवा पाहीजे तेव्हा बंद करण्याच्या तेथील शासकीय कायद्यांचा जागतिक पातळीवर, युनो मध्ये पुनर्विचार व्हावा असाही विचार या चर्चांमध्ये व्यक्त करण्यात आला. एकूणच भारतातील दूरदर्शनचा प्रचंड वापर पाहता मायक्रोसॉफ्टने भारतातील खेडोपाड्यात जिथे इंटरनेट कनेक्टीव्हीटी मिळत नाही तिथे वेबवर उपल्ब्ध असलेले शैक्षणिक साहित्य एका हार्ड डीस्क मध्ये साठवुन टीव्हीच्या माध्यमातून घराघरात पोहोचवण्यासाठी सर्वसामान्यांना परवडेल असं सॉफ्टवेअर तयार केलं आहे त्याचीही माहीती दाखवण्यात आली. 
कॉन्फरन्सचं उद्घाटन झाल्या दिवसापासून दिवसभर विविध ठीकाणी संशोधन पेपर्स्चं वाचन, विविध ऍप्लीकेशन्सचे डेमोज आणि पोस्टर प्रेझेंटेशन्स चालू होती. पाच दिवस नुसता सगळी्कडे ज्ञान यज्ञच चालू होता. जगभरातील संशोधकांचा आपण केलेल्या संशोधनाविषयी सांगण्यात, त्याची माहीती इतर तज्ज्ञ तसेच आमच्या सारख्या नवख्या व्यक्तींसमोर मांडण्यात कस लागत होता. विविध प्रश्न विचारले जात होते आणि त्यांची तेवढीच समर्पक उत्तरंही दिली जात होती. अशातच एका मोठ्या हॉल मध्ये विविध कंपन्यांनी आपापले स्टॉल्स प्रदर्शनासाठी लावलेले होते. यातच गुगल आणि याहू या दोन कंपन्यांनी तर सगळ्या तरूण संशोधकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी तीन दिवस विविध स्पर्धा ठेवल्या होत्या. त्या स्पर्धेतील विजेत्यांसाठीतेवढीच आकर्षक बक्षीसंही ठेवली होती. गुगलने दहा वेब लिंक्स दिल्या होत्या. स्पर्धकांनी आपला इ-मेल आयडी वापरून स्पर्धेत सहभागी व्हायचं. प्रत्येक लिंक साठी गुगल सर्च इंजीन वापरून कमीतकमी की-वर्डस किंवा वर्ड स्ट्रींग्ज वापरून ती वेब लिंक क्रमवारीत अर्वात वर आणण्याचा प्रयत्न करायचा. स्कोअर ४०० पासून चालू होत असे. सगळ्यात कमी स्कोअर ज्याचा होईल त्याला बक्षीस. या सगळ्याला फक्त सहा मिनीटे वेळ होता. तीनही दिवशी ३-४ लोकांमध्ये टाय ब्रेकर करायला लागलं. बक्षीस म्हणून आयपॅड देण्यात आला. एका दिवशी प्रत्येक स्पर्धक एकदाच खेळू शकत होता. पण आपल्या कडच्या हुशार स्पर्धकांनी गटागटाने, वेगवेगळे आय डी वापरून बरेच वेळा स्पर्धा खेळली. टाय ब्रेक मध्ये मात्र खूपच कस लागत होता. स्पर्धा खूपच इंटरेस्टींग आणि गुगल सर्च संदर्भात बरंच काही शिकवणरी होती. याहू कंपनीनेही स्पर्धकांना आक्र्षीत करून घेण्यासाठी ट्रेझर हंट सारखी स्पर्धा ठेवली होती. काही प्रश्न विचारले होते तर काही वस्तू आणून दाखवायच्या होत्या. या सगळ्यालाही नॅनो आयपॉड किंवा ख्रिस्तोस पापाडीमीट्रीयु (Christos H. Papadimitriou) या गणिततज्ज्ञाने लिहीलेलं न्यु यॉर्क टाईम्सचं प्रसिद्ध गणित तज्ज्ञ बर्नार्ड रसेल याच्या आयुष्यावर आणि पॅराडॉक्सवर आधारित बेस्ट सेलर नॉव्हेल "लॉजीकॉमिक्स" (ख्रिस्तोसच्या स्वाक्षरीसहित) ठेवलं होतं. मला सुद्धा लॉजीकॉमीक्सची एक प्रत बक्षीस म्हणून मिळाली. दुसर्‍या दिवशी म्हणजे ३१ मार्चला सर टिम बर्नर्स ली यांचं Designing the Web for an Open Society या विषयावर व्याख्यान झालं. त्यांच्या व्याख्यानात मुख्यत: वेब डीझाईन करताना आपल्या समाजासाठी ओपननेस (सर्वांसाठी मोफत उपल्ब्धता), न्याय, पार्दर्शकता, जबाबदारी, सहभाग, नविन संशोधन, त्यातील शास्त्र आणि लोकशाही ह्या फीचर्सना कसं आंतर्भूत करता येईल यावर विचार मांडले.  तिसर्‍या दिवशी ख्रिस्तोस पापाडीमीट्रीयु या अमेरिकेतील बर्कले विद्यापीठातील इकॉनॉमीस्ट आणि गणिततज्ज्ञाचं Games, Algorithms and Internet या विषयावर व्याख्यान झालं. ह्या प्रो ख्रिस्तोस यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते बिल गेट्स यांचे अंडर ग्रॅज्युएट लेव्ललला ऍडव्हायझर होते. एकोणच गणितातील सिद्धांतांचा व्यवहारात, इंटरनेटमध्ये आपण कुठेकुठे वापर करू शकतो येवढं जरी विद्यार्थ्यांना सांगीतलं गेलं तरी त्यांची गणितातील रूची तसेच समज वाढण्यास नक्कीच उपयोग होईल यात शंका नाही.
विविध डेमोज आणि पोस्टर्स बघणे, काही पेपर्स ऐकणे आणि स्पर्धां मध्ये सहभागी होणे यातच विविध देशांच्या संशोधकांशी ओळख झाली. त्यातच आपल्याकडे वर्ल्ड कप सेमी फायनलचा आणि भारत-पाकीस्तान लढतीचा दुहेरी फीव्हर असल्याने ३० तारखेला संध्याकाळी ५ नंतर आम्ही मोठ्या स्क्रीनवर कॉन्फरन्सच्याच ठीकाणी मॅच पहात बसलो होतो. बर्‍याच परदेशी लोकांना क्रीकेट म्हणजे काय हे सुद्धा माहीती नव्हते. त्यामुळे मॅच पाहता पाहताच कोलोनियल राजवटीचे प्रतिक पण आता भारतात एक धर्म म्हणून उदयाला आलेल्या क्रिकेटची माहीती सांगणे हे आमचं आद्यकर्तव्य समजोन ती माहीती सांगणे देखिल चालू होते. आम्हा गुगल फेलोशिप धारकांसाठी ३० तारखेला रात्री गुगल तर्फे हॉटेल नोव्होटेलच्या लॉनवर मोठी पार्टी ठेवली होती. पार्टीत विविध गिफ्टस बरोबरच अनेक कोडी सोडवण्यासाठी ठेवली होती. पण मॅचमुळे कुणाचच फारसं पार्टीत लक्ष नव्हतं. शेवटच्या दिवशी म्हणजे एक तारखेला आम्हा गुगल फेलोजना हॉटेल नोव्होटेलमध्ये दुपारच्या जेवणाचं आमंत्रण होतं. तिथे जेवता जेवता गुगल मधल्या संशोधकांशी गप्पा असाही बेत होता. तिथे गेल्यावर समजलं की आम्ही सात जणी सीलेक्ट झालेलो होतो. त्यात आम्ही दोघी भारतीय (एक आय आय टी कानपूरची मुलगी), एक तैवानची, एक उरूग्वेची, एक स्पेनची, एक इराणी पण अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात शिकणारी आणि एक श्रीलंकन पण अमेरिकेतील एम आय टी विद्यापीठात शिकणारी होती. त्या श्रीलंकन स्कॉलरशी बोलताना लक्षात आलं की ती सर टिम बर्नर्स ली यांची एकमेव पी एच डी स्टुडंट आहे आणि सीमॅन्टीक वेब टेक्नॉलॉजीचं स्टॅंडर्ड (प्रोटोकॉल) तयार करण्याचं काम करते आहे. कॉन्फरन्सच्या पाच दिवसांत असे विलक्षण चमकुन जाण्याचे प्रसंग बरेच आले. म्हणजे याहू चे सी ई ओ श्री राघवन यांच्याशी बोलणं, डीबीपीडीया, यागो यांसारख्या डेटाबेसेस लिहीणार्‍या संशोधकांच्या बाजूला बसणे (चुकुन), त्यांच्याशी संवाद-मार्गदर्शन, सर टिम बर्नर्स ली यांच्या बरोबर उभं राहून चहा घेणं, त्यांच्याशी बोलणं, गुगल मधल्या संशोधकांच्या बाजूला बसून जेवण घेणं, त्यांच्याशी त्यांच्या संशोधन विषयी आपल्या कल्पनांविषयी चर्चा करणं यासारखे अनुभव शब्दात नाही व्यक्त करता येत. त्यासाठी अनुभवच घेतला पाहीजे. एकूणच माझा मार्च मध्यापासूनचा कालावधी दोन कॉन्फरन्सेस ऍटेंड करण्यात गेला. दोन्ही मध्ये अमेरिकेतील एमआयटी विद्यापीठातील संशोधकांचं काम पाहण्याची आणि त्यांना ऐकण्याची संधी मिळाली. मोठा ज्ञान यज्ज्ञच चालू होता. अशी संधी खूप कमी वेळा मिळते. त्यासाठी माझ्या इन्स्टीट्युट आणि फेलोशिपचेच आभार मानायला हवेत.