Wednesday, 23 March 2011

कथा!!


नेहमीप्रमाणे ससा आणि कासवाची शर्यत चालू होते. नेहमीप्रमाणेच ससा टिवल्या-बावल्या करत शर्यतीत पुढे पुढे पळत राहतो. वाटेत अनेक प्रलोभनांना बळी पडून मजा करत राहतो. कासव नेहमीप्रमाणेच हळूहळू पण स्थिर गतीने चालत पुढे पुढे सरकतं. वाटेत आलेल्या प्रलोभनांकडे जराही लक्ष न देता कासव शर्यतीच्या शेवटाकडे चालतच राहतं. या गोष्टीत ससा झोपत नाही पण मजा करत असतो. आणि शेवटी शर्यतीचा शेवटचा टप्पा दिसू लागताच, हळूहळू चालणार्‍या कासवाच्या डोक्यावर बसून शर्यत कासवाच्या आधीच पूर्ण करतो. १९८३ साली प्रदर्शित झालेल्या सई परांजपे दिगदर्शित "कथा" या चित्रपटाची ही सुरूवत. पूर्ण सिनेमा हा दोन मित्रांच्या गोष्टीवर आधारित आहे. गोष्ट घडते ती मुंबईतील एका सामान्य चाळीत. सई परांजपे यांनी दिग्दर्शित केलेल्या काही उत्तम चित्रपटांपैकी एक चित्रपट असा याचा लओकीक नक्कीच आहे. सई परांजप्यांचं ससा-कासवाच्या कथेच्या रूपानं संपूर्ण चित्रपटाची कथा सुरूवातीलाच दाखवणं धोक्याचं असलं तरी खूप छान झालंय. म्हणजे त्यांनी या रूपकात्मक कथेचा अगदी पुरेपुर वापर करून घेतला आहे. राजाराम आपटे अतिशय सालस आणि सज्जन मुलगा असतो. ज्या दिवशी त्याला ऑफीसमध्ये कायम केलं जातं त्याच दिवशी त्याचा कॉलेज मधला वासू नावाचा एक मित्र त्याच्याकडे रहायला येतो. मग सुरू होते मुंबईतल्या चाळीतील धमाल. राजारामच्या शेजारीच एक संध्या सबनीस नावाची सुंदर मुलगी रहात असते की जिच्यावर राजारामचं खूप प्रेम असतं. पण ते प्रेम एकतर्फीच असतं कारण संध्याला राजाराम गरज लागली की हवा असतो पण लग्नासाठी तिला तो आवडत नाही करण त्याचं शामळू व्यक्तीमत्त्व. राजारामचा मित्र वासू आल्यापासून सगळ्यांवर छाप पाडतो. त्याच्या बोलघेवडेपणाचा तसेच इतरांची खोटी स्तुती करतानाच संध्या देखिल त्याच्यामध्ये गुंतत जाते. आता वासू संध्यात खरंच गुंततो की आणखी काही यासाठी "कथा" हा चित्रपट जरूर बघा. यु-ट्युब वर त्याच्या लिंक्स आहेत.
सई परांजप्यांनी यातून एक मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे की सध्याच्या कलियुगात चांगल्या आणि सचोटीने वागणार्‍या लोकांना कधीच जिंकता येत नाही पण हेच जर तुमच्या कडे बोलघेवडेपणा असेल, इतरांना फसवण्याचं काळीज असेल तर तुम्ही यशस्वी होतात. या चित्रपटाद्वारे ८० च्या दशकातील चाळवाल्या मुंबईचं दर्शन घडतं. त्यात सई परांजपे यांनी अगदी एका डबेवाल्याला सुद्धा घेतलं आहे. सकाळी थोडाच वेळ येणारे पाणी आणि पहाटे पहाटे दुधाच्या बाटलीतून दूधकेंद्रावरून दूध आणणे सगळं सगळं दाखवलंय. सिनेमा दिग्दर्शित करण्याची सई परांजपे यांचं कौशल्य अफलातूनच आहे. सई परांजपे यांचा या चित्रपटामागील हेतू जरी वरील ससा कासवाची गोष्ट सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा असला तरी मला वाटतं की यातून अनेक इतर बोध घेता येतील. माणसाने चांगलं असावं पण आपल्या चांगूलपणाचा कुणाला गैरफायदा घेऊ न देणे हे सुद्धा अत्यावश्यक आहे. यशस्वि होण्यासाठी अ‍ॅसर्टीव्ह असायला लागतं. त्यासाठी आपला चांगला स्वभाव बदलण्याची गरज नाही. नविन पीढीतील मुलांना हा चित्रपट माहीती असणं जरा अवघडच. पण एक जरूर पहावा असा चित्रपट. सुरूवातीलाच "कथा" ची यु-ट्युब ची भाग-१ ची लिंक दिली आहे. तिथुनच पुढे इतरही भाग सापडतील.

Sunday, 20 March 2011

ऑपरेशन लिबीया (ऑपरेशन ऑईल) - अमेरिकेची पारंपारिक धूळफेक!!

आजच अमेरिकन आणि नाटो फौजांनी लिबीयावर "मानवी हक्क संरक्षणाचे" कारण दाखवून हल्ले चालू केलेत. पण Prof Michel Chossudovsky  प्रमाणे मलाही असंच वाटतंय की हे "ऑपरेशन लिबीया" नसून "ऑपरेशन ऑईल" आहे. असं वाटण्यासाठी भरपूर पुरावे उपल्ब्ध आहेत. अमेरिकादी पाश्चिमात्य देशांनी नेहमीप्रमाणेच (जसं ९० च्या दशकात युगोस्लाव्हियात केलं तसं) जगाच्या डोळ्यात धूळफेक करून लिबीयात गडाफी विरोधकांना सर्व प्रकारची मदत देऊ केली आणि त्याला आंतर्गत बंडखोरीचे स्वरूप देऊन, आता "मानवी हक्क संरक्षणाच्या" नावाखाली लिबियाचा (परिणामी लिबीयामधील तेल स्त्रोतांचा) घास घ्यायला सुरूवात केली आहे.
लिबीयाच्या सध्याच्या आक्रमणाचं विश्लेषण बघण्याआधी थोडी पार्श्चभूमी बघूयात. खालील पाय चार्ट मध्ये सर्व जगातील तेल साठ्यांचे टक्केवारीत प्रमाण दिलेले आहे. 
मध्य पूर्वेतील तेलसाठ्यांचं प्रमाण सर्वात अधिक म्हणजे ५६% आहे. त्या खालोखाल अफ्रिकन देशांमध्ये आहेत. एकूणच मुस्लीम देशांमध्ये (साउदी अरेबिया, इराक, इराण, कुवेत, युएई, कतार, येमेन, लिबीया, इजिप्त, नायजेरिया, अल्जेरिया, कझाकस्तान, अझरबाइजान, मलेशिया, इंडोनेशिया, ब्रुनेई इ.) जागतिक साठ्यांच्या तुलनेत सगळ्यात जास्त म्हणजे ६६.२ ते ७५.९% तेलाचे साठे आहेत. याआधी वेगवेगळ्या कारणांनी अमेरिकादी राष्ट्रांनी ७०% मुस्लीम देशांतील तेलसाठ्यांवर नियंत्रण ठेवलं आहे. आता उरलेत अफ्रिकेतील देश. या देशांमध्ये तेल साठ्यांबरोबरच नैसर्गिक वायू आणि युरेनिअम यांचे साठे सुद्धा प्रचंड प्रमाणात आहेत. खालील तक्ता अफ्रिकेतील तेल साठ्यांच्या प्रमाणाची माहीती देतो.
आता लिबीयाला टार्गेट करण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे तिथले तेल साठे आणि लिबीयाचं अफ्रिका खंडातील स्थान. शेजारील ट्युनिशीया आणि इजिप्त मध्ये झालेली क्रांती आणि लिबीयात घडवुन आणलेली बंडखोरी यात जमीन अस्मानाचा फरक आहे. लिबीया या देशाचा मुख्य आर्थिक स्त्रोत म्हणजे तिथले तेलसाठे की जे एकट्या अमेरिकेतील तेल साठ्यांच्या तुलनेत दुप्पट आहेत. लिबीया अफ्रिका खंडात एक महत्त्वाच्या स्थानावर आहे. शेजारील ट्युनिशीया आणि इजिप्त मध्ये नुकत्याच झालेल्या क्रांतीमुळे तिथून अमेरिकेला सढळ हाताने सहकार्य मिळू शकतं.एकदा का लिबीया हातात आला की अमेरिकादी देशांचा अफ्रिकेतील मुक्त वावर प्रशस्त होईल.
खाली अफ्रिकेचा नकाशा दिला आहे. त्यातील देशांची नावं पाहता एक लक्षात येतं की हे सगळे देश विकसनशील किंवा अविकसित या दोनच प्रकारात मोडतात. याचाच परिणाम असा की अफ्रिकेत एकूणच नैसर्गिक साधन संपत्ती विपुल प्रमाणात आहे. म्हणजेच विकासाच्या नावाखाली तिथल्या नैसर्गिक साधन सामुग्रीचं शोषण झालेलं नाही. अफ्रिकेतील जे देश विविध युरोपिय देशांच्या अधिपत्याखाली होते त्या देशांमध्ये (ज्या ठीकाणी नैसर्गिक साधन संपत्ती खूप आढळलेली नाही) आधीच विविध प्रकारचा अजैविक कचरा   डंप केलेला आहे की ज्यावर प्रक्रिया करता येणार नाही आणि ज्याच्या अस्तित्त्वामुळे केवळ पर्यावरणच नाही तर मनुष्य़ जीवनाला सुद्धा हानी पोहोचू शकते.  लिबीयाचे शेजारी देश चाड आणि सुदान हे अजुनही तेल साठे आणि नैसर्गिक वायू, युरेनिअम यांच्या दृष्टीने अतिशय योग्य असे आहेत. म्हणजे फारसा कुणी तिथे अजुन हात मारलेला नाही. आपण जर लिबीया, इजिप्त, ट्युनीशिया, चाड, सुदान यांचं अफ्रिकेतील स्थान बघितलं तर युरोपातील देशांशी जोडणार्‍या तेल आणि नैसर्गिक वायूच्या वाहिन्या या देशांतून भूमध्यसमुद्रामार्गे टाकता येतील की जे सगळ्या युरोपिय राष्ट्रांना सोयीचं आहे. जर अमेरिकन कंपन्यांनी तिथले तेल आणि नैसर्गिक वायूसाठे ताब्यात घेतले तर अमेरिकेला युरोपिय राष्ट्रांवर देखिल नियंत्रण ठेवायला मदत होईल. अफगाणीस्तानात तेल साठे नसतानाही अमेरिकेने जो खेळ खेळला तो केवळ कझाकस्तान वगैरे स्लाव्हिक पण इस्लामिक देशांमधुन भूमध्यसमुद्रापर्यंत तेलवाहिन्या टाकण्यासाठीच. तसेच अफगाणीस्तान आणि पाकीस्तानचं स्थान हे राजकीय दृष्ट्या खूपच स्ट्रॅटेजीक आहे. त्यामुळे साम्यवादी शक्ती चीन आणि रशिया यांना शह देता आला. आता याचे दुष्परीणाम इस्लामिक दहशतवाद वाढण्यात झाला....पण त्याची फिकीर अमेरिकेनं कधीच केलेली नाही. कारण स्वत:चं वर्च्यस्व टिकवण्यासाठी हे देश कोणत्याही थराला जाऊन राजकारण करतात. त्यात विकसित आणि विकसनशील देश भरडले गेले तरी यांना काही सोयरसूतक नाही.
लिबीयावरील कारवाई ही ठरवुन केलेली आहे. गेले कित्येक महिने अमेरिकन हवाई दल व नौदल लिबीयाच्या आसपास भूमध्य समुद्रात तळ ठोकून आहेत. त्यांनीच लिबीयामधील गडाफी विरोधक बंडखोरांना पैसा आणि हत्त्यारे पुरवली आहेत. ट्युनिशीया आणि इजिप्त मधील क्रांती लिबीयात सुद्धा पोहोचली असं भासवण्यात आलं. प्रत्यक्षात लिबीयातील बंडखोरांनी पूर्वीच्या राजाचा झेंडा दाखवायला सुरूवात केली तेव्हाच लक्षात येत होतं की ही बंडखोरी अमेरिका पुरस्कृत आहे ते. कदाचित ट्युनिशीया आणि इजिप्त मधील क्रांती हे याच "ऑपरेशन लिबीया (ऑपरेशन ऑईल) चाच एक भाग होत्या हे कालांतराने बाहेरही येईल. गडाफी पासून लिबीयातील जनतेच्या सुरक्षेसाठी अमेरिका लिबीयावर बॉम्ब फेक करणार हे काही समजत नाही. यातून लिबीयातील नागरीकांना सुरक्षीतता कशी मिळेल? गडाफीला खाली खेचल्यावर लिबीयाचं नेतृत्त्व कोणाकडे असेल? अमेरिकेने जर लिबीयात इराक आणि अफगाणीस्तान सारखी परिस्थीती निर्माण केली तर अमेरिकेला लिबीया सोडणं अवघड जाईल. मग पुन्हा इराक आणि अफगाणीस्तान मध्ये जशा फौजा ठेवल्या आहेत तशाच लिबीयात पण ठेवणार का? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत राहतात. आतापर्यंत जेवढी म्हणून युद्ध झाली ती सगळी या तेलामुळेच झाली आहेत. हे तेल अजुन किती देशांचा घास घेणार आहे कोण जाणे?

Wednesday, 9 March 2011

उर्जावाद-धर्मवाद-दहशतवाद: एक अपशकुनी त्रिकोण!!

१८ व्या शतकातील यंत्रवादाची जागा १९ व्या शतकात साम्राज्यवाद आणि उर्जावादाने घेतली. या उर्जावादातीलच शह-काटशहाचं राजकारण करत २० व्या शतकात साम्राज्यवादी तसेच साम्यवादी शक्तींनी धर्मवादाचा भस्मासूर निर्माण केला. २१ व्या शतकाच्या अगदी तोंडाशीच या धर्मवादाने दहशतवादाला जन्माला घातलं. ह्या सगळ्या राजकारणाचा उलगडा आपल्याला लोकसत्ताचे नविन संपादक श्री गिरीश कुबेर यांच्या "हा तेल नावाचा इतिहास आहे", "एका तेलियाने" आणि "अधर्मयुद्ध" या ट्रायलॉजीमध्ये होतो. श्री गिरीश कुबेर यांची अभ्यासपूर्ण आणि वाचनीय अशी लेखन शैली आपल्याला त्या सगळ्या इतिहासात ओढत नेते आणि त्याचं वर्तमानात चालू असलेल्या घटनांशी असलेला सहसंबंध उलगडून दाखवते. सगळ्याच मानवताप्रेमी, देशप्रेमी, अभ्यासू वृत्तीच्या वाचकमित्रांकडे संग्राह्य असावीत अशी ही तीन पुस्तकं.

याच तीन पुस्तकांना पूरक अशी माहीती म्हणजे त्यावेळी अफगाणिस्तानात कशी परिस्थीती होती याची तपशीलवार माहीती आपल्याला श्रीमती प्रतिभा रानडे यांच्या "अफगाण डायरी काल आणि आज" या अभ्यासपूर्ण तसेच प्रत्यक्ष अनुभवसिद्ध पुस्तकातून होते. या पुस्तकातून आपल्याला तालीबान हा दुसर्‍या महायुद्धानंतर रशियाविरोधी शीत युद्धात अमेरिकेनेच निर्माण केलेला भस्मासूर असल्याचे स्पष्टीकरणही मिळते. मध्य-पूर्वेच्या देशांतील एकूणच इतिहास समजून त्यांच्या वर्तमानाशी अमेरिकादी पाश्चात्य देशच कसे कारणीभूत आहेत हे सुद्धा लक्षात येते. आवर्जून आपल्या संग्रही असावं असं अजुन एक पुस्तक.

जेव्हा धर्मवाद जन्माला आला त्याचाच एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे "पाकीस्तानची निर्मिती". मध्यपूर्वेकडील कोणत्याही मुस्लीम देशातील लोकांना विचारलं तर ते सर्वप्रथम आपण नक्की कोणत्या वंशाचे आहोत हे आणि मगच आपण मुस्लीम असल्याचे सांगतात. उदाहरणार्थ: अफगाणीस्तानातील लोक स्वत:ला अफगाणी म्हणवतात, इराण मधील लोक स्वत:ला इराणी म्हणवतात, इजिप्त मधली लोकं इजिप्शीअन आहेत असं म्हणवून घेतात. त्यामुळे त्यांचं अस्तित्त्व हे त्या त्या भौगोलिक भागाच्या पूर्व संस्कृतीशी अधिक जोडलं गेलेलं आहे. पाकीस्तानची निर्मितीच मुळात इस्लामच्या नावाखाली झाली आहे. ज्या भौगोलिक संस्कृतीशी (भारतीय) त्यांची खरी नाळ जोडलेली आहे त्याचा ते स्विकार करत नाहीत. त्यामुळे पाकिस्तान हे इस्लामिक धर्मांधता आणि अधुनिक प्रगती याच्या कात्रीत सापड्लं आहे. त्यामुळे याच धर्मांधतेने पाकीस्तानात अनेक दहशतवादी हल्ले होत आहेत, पाकीस्तानातील धर्मांध लोक जगात इतरत्र दहशतवाद पसरवत आहेत, दहशतवादी हल्ले करत आहेत. यामुळे पाकीस्तानातील सामान्य जनतेचे हाल होत आहेत. पण पाकीस्तान निर्मितीनंतर आत्तापर्यंत विविध राज्यकर्त्यांनी, लष्करशहांनी पाकीस्तानला स्वत:ची अशी ओळख देण्याचा प्रयत्न केला पण अजुनही पाकीस्तानची ओळख एक दहशतवादी देश, दहशतवाद्यांना मदत करणारा, दहशतवादी तयार करणारा देश अशीच निर्माण झाली आहे. या प्रगतीशील जगात एकूणच पाकीस्तानच्या स्वओळखीच्या मध्ये धर्मांधता, टोकाचं इस्लामिकरण येत आहे. जर पाकीस्तानने कट्टर धर्मवाद सोडला तर त्यांना स्वत:ची अशी ओळखच उरत नाही. श्रीमती प्रतिभा रानडे यांनी "पाकीस्तान अस्मितेच्या शोधात" आणि "फाळणी ते फाळणी" या दोन पुस्तकांतून छान मांडणी केली आहे. एकूणच जगाच्या पाठीवर सध्या जो काही अनागोंदी कारभार माजला आहे त्याचा इतिहासातील अनेक घटनांशी सुसंगती लागण्यासाठी, त्यांच्यातील सहसंबंध उलगडण्यासाठी, ही सहा पुस्तकं लागोपाठ वाचावीत.