Sunday 18 September 2011

चक दे इंडिया!!

महाजालावरून साभार
आमच्या शाळेत पूर्वी फुटबॉल अणि हॉकी या दोन खेळांची प्रत्येकी एक आणि दोन अशी मैदानं होती. आता होतीच म्हणायला हवं कारण गेल्या काही वर्षांत त्या मैदानांचं रूपांतर एकत्रितपणे एका क्रिकेटच्या ग्राऊंड्मध्ये झालंय. साठ-सत्तरच्या दशकातले चित्रपट पाहिले तर बॉलिवुड सिनेमांमध्येही कॉलेज तरूणांच्या हातात हॉकी-स्टीक्स दाखवून हॉकी या राष्ट्रीय खेळाला जागा दिल्याचं दिसून येतं. तसा या दशकात हॉकी वर ’चक दे इंडिया" आला आणि रसिकांना आवडलाही पण तो परिणाम तातपुरताच राहिला. हिंदीच्या पाठ्यपुस्तकात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद या नावाने धडाही होता पण त्या व्यतिरीक्त इतर कुठेही ध्यानचंदयांचं नाव झळकताना पाहिल्याचं मला तरी आठवत नाही. याने त्यांची कामगिरी छोटी होते असं नाही पण ’"रात गयी बात गयी” सारखं व्यक्ती काळाच्या पडद्या आड गेली की त्या व्यक्तीचं कर्तुत्त्व कितीही मोठं असलं तरी विसरलं जातं. तसंच काहीसं मेजर ध्यानचंद यांच्या बाबतीत झालं असं वाटतंय. मागे एकदा वर्तमानपत्रात भारतीय हॉकीचा कप्तान धनराज पिल्ले याचं नाव वाचण्यात आलं. तेव्हा भारतीय संघाने कोणत्यातरी आंतरार्ष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम फेरीत सुवर्णपदक जिंकलेलं होतं. धनराज पिल्लेसुद्धा पिंपरी-चिंचवड मधील एका झोपडपट्टीत रहात होता. मग त्याला आर्थिक मदत करण्याविषयीची आवाहनं वाचण्यात आली. त्यानंतर एकदोन वेळा दूरदर्शनवरही झळकला होता बिचारा. पण नंतर कुठेच दिसला नाही. नुकतंच भारतीय हॉकी संघातील युवराज या खेळाडूच्या बाबतीत  असंच काहीसं झालं आणि त्या निमित्ताने हे सगळं डोक्यात आलं आणि नकळत सध्याचा भारतातील धर्म-खेळ क्रिकेट आणि राष्ट्रीय खेळ हॉकी यांची तुलना सुरू झाली.  

महाजालावरून साभार
१९७० च्या शेवटी आणि १९८० च्या सुरूवातीला सुनिल गावसकर, दिलीप वेंगसरकर, गुंडप्पा विश्वनाथ आणि इतर बर्‍याच क्रिकेटपटुंमुळे भारतातील क्रिकेटने मध्यमवर्गियांच्या आयुष्यात प्रवेश केला. तोपर्यंत क्रिकेट हा खेळ तसा श्रीमंती खेळ मानला जात असे. कसोटी क्रिकेटचे सामने ५-५ दिवस चालायचे. आपली कामं सोडून ५ दिवस खेळ बघायला येणारे फक्त श्रीमंतच. त्यामुळे सामान्य जनतेमध्ये हा खेळ फारसा प्रसिद्ध नव्हता. नवाब मन्सुर अली खान पतौडी हे नाव त्यावेळी भारतीय क्रिकेटमध्ये आदराने घेतलं जायचं. साधारणपणे ८० च्या दशकात भारतात दूरदर्शन चालू झालं आणि क्रिकेट हा खेळ दूरदर्शन पाठोपाठ घरोघरी पोहोचला.  
८० च्याच दशकात क्रिकेट या खेळात "वन डे क्रिकेट" च्यारूपाने क्रांती झाली. या "वन डे क्रिकेट" मुळे क्रिकेट जगतात उलथा पालथ झाली आणि पाच दिवसांच्या तुलनेत एक दिवस खेळणं सुटसुटीत वाटल्याने सामन्यांची संख्याही वाढली, त्याला लागणारी कौशल्य  कसोटी क्रिकेटपेक्षा वेगळी होती. अधिक प्रेक्षवर्ग आणि मध्यमवर्गीय आर्थिक स्तरांतून आलेले खेळाडू पाहून सामान्य जनतेला क्रिकेट आपलं वाटू लागलं.

इकडे वाढत्या प्रेक्षक संख्येने आणि उपग्रह वाहिन्यांमुळे दूरदर्शन प्रक्षेपणात झालेल्या अमूलाग्र क्रांतीने तसेच वन-डे मुळे क्रिकेट फिव्हर "इट क्रिकेट, स्लीप क्रिकेट, ड्रिंक क्रिकेट इ. इ." पासून आता हे क्रिकेट वेडाचं लोण गल्ली-बोळ आणि झोपडपट्ट्यांमध्येही पोहोचलं आहे. ग्लोबलायझेशन मुळे जाहीरात कंपन्यांचं फावलं आणि त्यांनी क्रिकेटच्या खेळाडूंसाठी मोठमोठ्या प्रमाणात अनुदानं आणि बक्षिसं द्यायला सुरूवात केली. देशातल्या चलाख राजकारण्यांनी काळाची पावलं वेळीच ओळखून बीसीसीआय सारखी खासगी संस्था उभी केली की जी आता भारतीय क्रिकेटची सर्वेसर्वा झाली आहे आणि भ्रष्टाचार-काळापैसा यांचं आगारही. पूर्वी आपल्याकडे फुटबॉलला किंवा हॉकीला अशी डिमांड असायची. अजुनही आपण बंगाल आणि ईशान्य भारतातील राज्यांत गेलो तर भर पावसात, चिखलात अनेक मुलं फुटबॉल खेळताना दिसतील.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्यामुळे मिळणारे पैसे आणि त्याशिवाय युवक-युवतींकडून मिळणार्‍या उस्फूर्त प्रतिसादाचं ग्लॅमर अनेक तरूणांना क्रिकेटकडे आकर्षित करून घ्यायला लागलं. सगळ्यांच्या गळ्यातील ताईत सचिन तेंडूलकरचा उदयही ८० च्या दशकात शेवटी शेवटी झाला आहे. त्याच्या नंतर कित्येक आले आणि गेले, भारतीय क्रिकेट संघाने आपल्या पर्फॉर्मन्सचा लंबक नेहमीच एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत हलता ठेवला पण सचिन तेंडूलकरच्या सातत्याला सलामच ठोकायला हवा. प्रत्येक घरातील आई-वडिलांना आपला बाळ्या सचिन तेंडूलकर बनण्याची स्वप्नं पडतात आणि त्यासाठी बाळ्याने शाळेत जायला सुरूवात केली की पेन्सिलच्या ऐवजी क्रिकेटची बॅट त्याला अधिक समर्थपणे कशी पेलता येईल याकडे लक्ष पुरवलं जातं. बॉलिवुडच्या सिनेनिर्मात्यांनीही या गंगेत "लगान" द्वारे आपले हात धुऊन घेतले. याच कालावधीत पेप्सी आणि कोक यांसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनीही क्रिकेटबरोबरच आपलंही बस्तान भारतात बसवलं. कदाचित पेप्सी आणि कोकच्या बाटल्यांमुळे भारतीय तरूणांच्या भावना फक्त क्रिकेटसाठीच उचंबळतात किंवा क्रिकेटसाठी उंचबळणार्‍या भावनांमुळे पेप्सी, कोकलाही भारतीय तरूणांच्या मनात जागा मिळाली...असंही असेल.

संगणक आणि आंतर्जालिय क्रांतीमुळे एकूणच संपूर्ण जगाचा वेग वाढल्याने २०-२० क्रिकेटची संकल्पना आली, की ज्यामध्ये प्रत्येक संघाने प्रत्येकी २० षटकं टाकायची. तीन तासात निकाल जाहिर. हे म्हणजे क्रिकेट वेड्यांच्या देशात तीन तासाच्या बॉलीवुड सिनेमापेक्षा कमी ग्लॅमरस आणि व्यवसाय खेचणारं नव्हतं. म्हणूनच की काय विविध जाहिरात कंपन्या, भारतातील मोठमोठे इंडस्ट्रीयालीस्ट तसेच काही बॉलीवुड स्टार्स यांनी एकत्र येऊन विविध व्यावसायिक संघांची उभारणी केली आणि जगभरातील क्रिकेटपटुंना भरपूर पैसे देऊन आपल्या संघासाठी खरेदी करून त्यांची कडबोळी टीम आय पी एल सारख्या स्पर्धांत खेळवायला सुरूवात केली. गेल्या ३-४ वर्षांत आय पी ल च्या माध्यमातून या सगळ्यांनी खोर्‍याने पैसा मिळवला आहे. तरूणांना मूर्खासारखं वेडं करणारा आणि पैशासाठी देशापेक्षा वैयक्तिक खेळ महत्त्वाचा हा मंत्र देणारा आय पी एल हंगाम म्हणजे भारतातील विविध श्रीमंत लोकांचा विविध क्रिकेटपटुंवर लावलेल्या पैशाचा जुगार. मग यात अनेकांनी आपल्या काळ्या पैशाची धवल-गंगा करण्याच्या प्रक्रियेत नाहून घेतलं. क्रेकेटमधील भ्रष्टाचाराचं दुसरं मोठं केंद्र तयार झालं. बी सी सी आय काय किंवा आय पी एल काय सगळेच एका माळेचे मणी त्यामुळे या दरोडेखोरांना बेड्या कोण घालणार? ज्यांच्या हातात सत्ता त्यांचेच प्रतिनिधी या संघटनांच्या चालक पदावर असल्याने या वळूंना वेसण घालणं अशक्य होऊन बसलंय.

दरम्यान भारताच्या राष्ट्रीय खेळाचं, हॉकीचं काय झालं? भारतीय हॉकीला आंतर्गत राजकारणाचं ग्रहण लागायला ८० च्या दशकातच सुरूवात झाली. हॉकीच्या संघांत मुख्यत: बरेचसे शीख लोक आणि आर्मीत असलेले लोक दिसायचे. साधारणपणे ८० च्या दशकात राजकीय समीकरणं बदलणार्‍या काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्या देशात घडल्या. एक म्हणजे पंजाब मधील वाढलेला खलिस्तानवाद आणि त्यामुळे झालेली इंदिरा गांधींची हत्त्या....पाठोपाठ आलेला शिख विरोध. त्यामुळे अनेक शिख कुटुंब परदेशात स्थायिक झाली. दुसरं म्हणजे पंजाब मधील दहशतवाद संपुष्टात आला आणि काश्मीर मधील अतिरेकी कारवायांमुळे अशांत झालेला काश्मिर. त्यामुळेच आता आर्मी्ला सुद्धा कायम अतिरेकी हल्ल्यांपासून, घूसखोरांपासून वाचवण्यासाठी सारखं सतर्क रहावं लागतं. तसंच हॉकी या खेळात फारसं ग्लॅमर नसल्याने कदाचित आर्मीमधील लोक हॉकी खेळायला आता येत नसावेत. एकूणच यासगळ्याचा परिणाम भारतीय हॉकीच्या खेळावर झाला असण्याची शक्यता आहे. कारणं काहीही असोत पण भारतीय हॉकीला.......भारताच्या राष्ट्रीय खेळाला ग्रहण लागलंय हे नक्की. आजही अमेरिका किंवा कॅनडात बघितलं तर लोक अनुक्रमे बेसबॉल आणि आईस हॉकी साठी वेडे असतात. का? कारण ते त्यांचे राष्ट्रीय खेळ आहेत. पण आपल्याकडे हॉकी साठी तशाच उचंबळलेल्या भावना दिसून येत नाहीत.

हॉकीचे सोनेरी दिवस संपले आहेत याचंच हे द्योतक होतं. कारण हॉकीला कुणी वाली (अनुदान देणारे, जाहिराती देणारे) नव्हता. पद्धतशीरपणे हॉकीसाठीची अनुदानं हळूहळू कमी केली गेली. लॉर्ड मेकॉलेने जसं स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या गुरूकुल पद्धतीचे शिक्षण बंद पाडण्यासाठी गुरूकुलांना मिळणारे आर्थिक सहाय्य जसं काढून घेतलं तसंच काहीसं हॉकीच्या बाबतीत केलं गेलंय. हॉकी इंडियावर एकतर खेळाडू किंवा ज्यांना भारतीय राजकारणात फारशी किंमत नाही असे राजकिय नेते प्रमुख म्हणून नेमले जाऊ लागले. मग आपोआपच केंद्र सरकारकडून मिळणारं अनुदानही कमी होत गेलं. मधेच वर्तमानपत्रात बातमी वाचली की ४-५ वर्षांपूर्वी झालेल्या एका आंतर्राष्ट्रीय हॉकीच्या स्पर्धा रजिस्ट्रेशनचे काही लाख रूपये केंद्रिय क्रिडामंत्रालयाने हॉकी इंडियाला दिलेच नाहीयेत आणि एकीकडे कॉमनवेल्थ गेम ची वेल्थ कॉमनली लुटून कलमाडी सारखे तिहार मध्ये सुद्धा गेलेत. किती हा विरोधाभास.......ते ही आपल्या राष्ट्रीय खेळाला?

आजकालच्या तरूण रक्तांनी वेगळाच प्रश्न उपस्थित करायला सुरूवात केलीय. भारतात हॉकी फारशी खेळली जात नाही, हॉकीचे सामने झाले तरी कोणाला माहिती नसतं आणि ह्याउलट क्रिकेटसाठी सर्वदेश वेडा झालेला असतो इतका की आम्ही सचिन तेंडूलकरला क्रिकेटचा देव ही उपाधी सुद्धा देऊन टाकली आहे. मग क्रिकेटच का नाही भारताचा राष्ट्रीय खेळ नाही. हॉकीच का? प्रश्न विचार करायला लावणारा म्हणून थोडा शोध घेतला तर धक्कादायक गोष्ट समोर आली. "हॉकी या खेळात भारताला एकूण ८ सुवर्ण पदकं मिळाली आहेत. सन १९२८ ते १९५६ हा हॉकीचा सुवर्णकाळ होता की जेव्हा भारताने सातत्याने ऑलिंपिक्स मध्ये ६ सुवर्णपदकं पटकावली. या सुवर्णकाळात भारताने २४ ऑलिंपिक सामने खेळले आणि एकूण १७८ गोल्स करत (७.४३ गोल प्रत्येक सामन्यात) २४ च्या २४ सामने जिंकले. त्यानंतरची दोन सुवर्णपदकं १९६४ साली तसेच १९८० साली झालेल्या ऑलिंपिक्स मध्ये मिळवलीत. १९८० पर्यंत इतका सुंदर पर्फॉर्मन्स असताना एकदम हॉकीला काय झालं? दूरदर्शन मधील क्रांतीचा उपयोग सर्वच खेळांना व्हायला हवा होता मग तो तसा का झाला नाही? केवळ क्रिकेटच्या खेळामध्येच क्रांती का झाली (वन डे, २०-२०) आणि त्याचंच स्वरूप का बदललं गेलं? क्रिकेट हा इंग्लंडचा राष्ट्रीय खेळ आहे. आंतरराष्टीय क्रिकेट मध्ये खेळणारे सर्वच देश हे ब्रिटीशांनी अनेक वर्षे राज्य केलेले आहेत. असं का? ऑलिंपिक्स मध्ये अजुनही क्रिकेट या खेळाचा समावेश का नाही? ऑलिंपिक्स मध्ये ज्या देशांचे सुवर्ण पदक तालिकेत वर्च्यस्व असते असे चीन, अमेरिका, जपान, कोरिया, इंडोनेशिया सारखे देश क्रिकेट मधे का नाहीत? या प्रश्नांची उत्तरं मला अधिक भंडावून सोडतात. प्रश्न उरला क्रिकेटला भारताचा राष्टीय खेळ करण्याचा: तर भारतीय हॉकी संघांसारखी सारखी सातत्यपूर्ण सुवर्ण कामगिरी भारतीय क्रिकेटने अत्तापर्यंत कधिच केलेली नाही. अगदी मार्चच्या शेवटी विश्वचषक जिंकणारे भारतीय क्रिकेटचे विर चारच महिन्यांनंतर इंग्लंडमध्ये माती खातात. विश्वविजेत्याला साजेशी कामगिरी सोडाच पण जागतिक क्रमवारीतही सर्वच प्रकारच्या क्रिकेट मध्ये घसरण करून घेतात. यांना जगज्जेते कसं म्हणणार? बरं क्रिकेट हा खेळ १०-१२ देश खेळतात. १०-१२ देश म्हणजे संपूर्ण विश्व कसं काय होतं? मग हे विश्वविजेते कसे काय या प्रश्नाचं उत्तर (आम्ही विश्वविजेते म्हणण्यास पात्र नाही) भारतीय संघानेच आपल्या नजिकच्या कामगिरीने दिलं आहे. फक्त पॉप्युलॅरीटीच्या जोरावर एखाद्या खेळाला राष्ट्रीय खेळ कसा म्हणणार? खरं तर भारता मध्ये हॉकीच्या दुर्दशेला आणि क्रिकेटच्या अतिरेकाला नक्की कोण जबाबदार आहे याचा पद्धतशीर अभ्यासच व्हायला हवा. मला तर याची बिजं ग्लोबलायझेशन, आर्थिक राजकारण, आणि भ्र्ष्टाचाराच्या संधी यातच दिसताहेत. हॉकी हा भारताचा (नावापुरताच) राष्ट्रीय खेळ राहील याची पुरेपूर तजविज करून थेवलेली आहे. या परिस्थीतीला आपण बदलणार नाहीतर कोण? चला पुन्हा एकदा हॉकीला सुवर्णसिंहासनावर बसवुयात आणि क्रिकेटच्या जुगार्‍यांपासून देशातील युवकांना वाचवूयात. चक दे इंडिया!!

Thursday 1 September 2011

गौरी-गणपती!!

महाजालावरून साभार
घरी पूर्वी पाच-सात दिवसांचे गौरी-गणपती असायचे. काय मजा आणि आनंदसोहळा असायचा तेव्हा!! गणपतींची सकाळ-संध्याकाळ आरती होत असे. मन आणि घर दोन्हीही प्रसन्नतेने भरून जायचं. घरी आठ-दहा दिवस आधीपासूनच गौरी-गणपतींची चाहूल लागायची. मग आजी-आजोबा रहायला येत असत. गौरी बसवण्यासाठी धान्याचे गोल डबे रंगवले जायचे. गौरींचे पितळी मुखवटे चिंच आणि रांगोळीने घासून चकचकीत केल्यावर त्यांचे नाक, डोळे, भुवया, ओठ सगळं रंगवताना खूप छान वाटायचं. मग गौरींसाठी नवीन साड्या-दागिने यांची खरेदी व्हायची. गौरी-गणपतींची आरास तयार व्हायची.  

गणपती बसल्यावर दोनच दिवसांनी रात्री उशीरा पर्यंत जागून गौरींच्या डब्यांत धान्य भरून, डब्यांना गौरींची धडं लावून त्यांना साड्या नेसवायच्या. गौरींच्या आरासीसाठी  घरातली एक खास जागा (शक्यतो बैठकीच्या खोलीतील) रिकामी केली जायची, सगळं घर चमचमत्या झिरमिळ्या आणि विविध रंगांच्या विजेच्या छोट्या दिव्यांच्या माळांनी प्रकाशमान होउन जायचं. पाच-सात दिवस गौरी-गणपती असेपर्यंत घरात आवडते पाहुणेच आल्याची भावना असायची.  दिवस-रात्र घर जागं असायचं. संपूर्ण घर अत्तर-उदबत्त्या यांच्या सुगंधाने भरून आणि भारून जायचं. 

आमची आई इतर वेळची (श्रावणी शुक्रवार, चैत्रगौर इ.) हळदी-कुंकू करायची नाही पण महालक्षमीचं हळदी-कुंकू न चुकता करत असे. गौरींच्या हळदी-कुंकवाला अगदी समोरच रहाणार्‍या ख्रिश्चन आणि मुस्लीम घरातील बायकांना सुद्धा बोलावलं जायचं. तेव्हा शेजारी टॉमी नावाचा कुत्रा असायचा की जो आमच्याकडेच जास्त असायचा. मग लाडू-करंज्या यांसारख्या फराळाच्या पदार्थांच्या वासाने तो सुद्धा गौरींचे दर्शन आत येऊन किमान एकवेळा तरी घेउन जायचा. 

तिसर्‍या दिवशी गौरी-गणपतींच्या जाण्याचे वेध लागायचे. मग सकाळीच आई हरभर्‍याची डाळ भिजत ठेवायची. संध्याकाळी विसर्जनाच्या प्रसादाला लिंबाची वाटलेली डाळ आणि पंचखाद्याची खिरापत असा बेत असायचा. गौरी-गणपतींच्या बरोबर शिदोरी म्हणून दही-पोहे आणि पंचाखाद्याचे कानवले दिले जायचे.  गणपती विसर्जन तर तळ्यावर होत असे पण गौरी विसर्जन म्हणजे फक्त मुखवटे हलवले जात. गौरींना आवाहन करून गौरी स्थानापन्न झाल्यावर जे तेज आणि जो जिवंतपणा त्या पितळी मुखवट्यात असायचा, तेच तेज मुखवटे हलवल्यावर गायब व्हायचं आणि गौरी विसर्जन झाल्याचे संकेत मिळायचे. अशावेळी डोळे भरून येत असत.
गौरी असतांना सगळं वातावरणच भारलेलं असे. ते पाच-सात दिवस घरातच मंदिर तयार होत असे. आता आई गेल्यापासून गौरी आणणं बंद केलंय आणि गणपतीही फक्त दीड दिवसासाठी आणतो. गणपती असेपर्यंत सकाळ-संध्याकाळ आरती प्रसाद असतो, विसर्जनाच्या दिवशी लिंबाची डाळही असते.....दही-पोहे आणि कानवले यांची शिदोरीही असते पण घराचं मंदिर होणं थांबलंय. त्या मंदिराच्या आता फक्त आठवणी आहेत.