Friday, 6 December 2013

रन फॉर युनीटी!

गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेद्वार श्री नरेंद्र मोदी यांनी जगातील सगळ्यात उंच असा पुतळा केवडिया येथील सरदार पटेल धरण (नर्मदा धरण) च्या परिसरात उभारण्याची घोषणा केली काय आणि सहा महिन्यांत त्याची कोनशीला देखिल रोवली गेली. इतक्या वर्षांत भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या विषयी कधीच कुठेच काहीच बातमी दिसली नाही पण यावर्षी त्यांच्या जयंतीच्या दिवशीच स्टॅच्यु ऑफ युनीटी ची कोनशीला रोवल्यामुळे सगळ्या पैसे चारलेल्या वृत्तवाहिन्यांनी नरेंद्र मोदींनी वल्लभ भाई पटेलांना कसं हायजॅक केलेलं आहे हे सांगण्यासाठी तरी किमान वल्लभ भाई पटेलां विषयी काहीतरी माहिती दाखवली. असो. त्यानंतर अनेक विचारवंत (की विचारजंत) लोकांनी असल्या पैशाच्या अपव्ययाची गरजच काय? देशामधे इतका मोठा पुतळा उभारण्यात पैसा वाया घालवण्यापेक्षा ते पैसे गोरगरीबांच्या उद्धारासाठी, देशापुढील इतर महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी का नाही वापरत, हे सगळं राजकारण आहे इ. इ. प्रतिक्रीया देण्यास सुरूवात केली. बरोबरच आहे इतकी वर्षे षंढ लोकांनी शासन केल्यामुळे ह्या लोकांमधे राष्ट्रीय अस्मिता वगैरे काही प्रकार नाहीच आहे.
पर्वाच लोकसत्ताच्या दिवाळी अंकातील जमशेदजी टाटांवर लिहीलेला एक लेख वाचण्यात आला. जमशेदजी कसे व्हिजनरी होते आणि अनेक अडचणींतून त्यांनी काही संस्थांची उभारणी प्रचंड विरोध पत्करून धसास नेली याची माहिती आहे. जमशेदजींनी म्हैसूर मधे रेशीम उद्योग सुरू केला. त्यासाठी परदेशातून उत्तम प्रतिच्या रेशमाच्या किड्यांच्या पैदाशीसाठी रोपे आणली. त्या रोपांच्या लागवडीसाठी जमीन खरेदी केली. आज म्हैसूरचं रेशीम सर्वोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे. जमशेदजींनी अशाच प्रकारे बंगलोर मधील सुप्रसिद्ध संशोधन संस्था आय आय एस सी ची स्थापना केली. त्यावेळी लॉर्ड कर्झन ने खूप मोडते घालण्याचा प्रयत्न केला. भारता सारख्या भिकारड्या देशाला कशाला हवी संशोधन संस्था इ. तरी देखिल जमशेदजींनी आपले प्रयत्न चालूच ठेवले आणि शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश आले. याचप्रकारे त्यांनी देशात पोलाद कारखाने चालू केले. मुंबईतील गेटवे ऑफ इंडीया होण्या आधी जमशेदजींनी तेथील जमीन एक फाईव्ह स्टार हॉटेल बांधण्यासाठी ९९ वर्षांच्या कराराने भाड्याने घेतली. हॉटेल ताज ची कथा खूपच रोचक आहे. त्यावेळी अनेकांनी त्यांना वेड्यात काढले. कशाला हे भटारखान्याचे उपदव्याप हे देखिल ऐकावे लागले. पण त्यावेळी त्यांचे उत्तर एकच होते की आमच्या देशात देखिल जागतिक दर्जाचे उत्तम हॉटेल आम्ही बांधू शकतो हे सगळ्या जगाला दिसलं पाहीजे. हे सगळं त्यांनी स्वत:च्या वैयक्तीक पैशांतून केलं.  उत्तम क्वालीटीचा माल जगाच्या विविध भागांतून आणला. ज्या काळात हॉटेल ताज बांधलं गेलं त्याकाळात आपल्या देशात फरच कमी सोयी होत्या. सुधारणा, शिक्षण कशाशी खातात याचा पत्ता नव्हता. जर जमशेदजींनी स्वत:च्या द्रष्टेपणावर आणि देशाच्या अस्मितेवरील प्रेमावर विश्वास दाखवला नसता आणि टीका कारांच्या टीकांना बळी पडले असते तर ताज सारखं उत्तम क्वालीटीचं हॉटेल उभंच राहू शकलं नसतं.
या स्टॅचू ऑफ युनीटी कडे मी या दृष्टिने बघते आहे. श्री नरेंद्र मोदी हे एक द्रष्टे आहेत. माझी अजुन एक सूचना आहे की हा पुतळा नुसताच उभा न करता त्याचा उपयोग प्रेक्षणीय स्थळ म्हणून तर होईलच पण आपल्या पश्चिमेकडील सागरी हद्दींवर लक्ष ठेवण्यासाठी त्याचा उपयोग एक वॉचटॉवर म्हणूनही केला जाऊ शकतो. अजुन १० वर्षांनी हाच स्टॅचू भारताची क्षमता दाखवून देईल. नरेंद्र मोदींच्या या पुतळ्यासाठी गावागावातून थोडं थोडं लोखंड/पोलाद जमा करण्याची कल्पना तर अफलातून आहे. त्यामुळे देशातील सर्वांना....अगदी सामान्यातील सामान्याला हा पुतळा आपला वाटेल. ही संकल्पना मा. एकनाथजी रानडे यांनी कन्याकुमारीचे रॉक मेमोरीअल उभं करताना वापरली होती. त्यामुळे इतक्या वर्षांनंतरही ज्या ज्या लोकांनी अगदी १ रूपया देणगी दिली होती त्यांना देखिल रॉक मेमोरीअल आपलं वाटंतं आणि ते आवर्जून कन्याकुमारीला भेट देतात. ही संकल्पना मूळ स्वामी विवेकानंदांची आहे. त्यांना अमेरिकेतील शिकागो धर्म परिषदेसाठी लगणारे पैसे त्यांनी सामान्य जनते कडून देखिल १ पैशाच्या देणगीतून गोळा केले. याचा अर्थ त्यांना त्यावेळचे संस्थानिक पैसे देत नव्हते असा नव्हे. त्याचं कारण सांगतांना त्यांनी सांगीतलं की मी माझ्या देशातील हिंदूंचा प्रतिनिधी म्हणून जात आहे ना की देशातील संस्थानिकांचा प्रतिनिधी म्हणून. केवढा मोठा विचार स्वामी विवेकानंदांनी केला होता त्यावेळच्या मरगळ आलेल्या समाजात थोडे चैतन्य आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला होता.
१५ डिसेंबरला होणारी ही रन फॉर युनीटी हा सुद्धा असाच काहीसा प्रकार आहे. समाजाला एकूणच नैराश्याने घेरलेलं आहे. या रन फॉर युनीटीचा हेतू सांगतानाच त्यांनी सांगीतलंय की चांगलं शासन मिळवणे हा आपला अधिकार आहे आणि त्यासाठी सगळे भेद विसरून आपल्या देशाच्या अस्मितेसाठी सर्वांनी एकत्र दोन किमी पळूया. एकाच वेळी इतक्या मोठ्या देशात इतक्या मोठ्या प्रमाणात लाखो लोक पळतील हा एक जागतिक विक्रम ठरेल. त्यातून देशाची एकता दिसून येईल की जी सध्याची गरज आहे. आपणच ठरवा काहीही व्हिजन नसलेल्या आणि भ्रष्टाचार, देशद्रोह यात आकंठ बुडालेल्या कॉंग्रेसच्या अपप्रचाराकडे लक्ष द्यायचं की नरेंद्र मोदींसारख्या द्र्ष्ट्या नेत्याची देशाच्या अस्मितेसाठी घातलेली साद ऐकायची. चला मग सगळ्या देशप्रेमी आणि देशाच्या अस्मितेच्या रक्षणासा पाठींबा दर्शविणार्‍यांनी १५ डिसेंबरला आपापल्या शहरात रन फॉर युनीटी मधे सहभागी होऊया आणि देशाच्या उज्वल भवितव्याची पायाभरणी करूया. चला तर मग सहभागी होण्यासाठी या लिंकवर टिचकी मारून रजिस्ट्रेशन करा.

Friday, 4 October 2013

राजा ओयादिपौस

Oedipus and the Sphinx,
Gustave Moreau, 1864
oil on canvas
Metropolitan Museum of Art, NY
काल पु. ल. देशपांड्यांनी लिहीलेलं (बंगाली भाषांतरित) राजा ओयदिपौस हे वाचनात आलं. मूळात ही कथा आहे ग्रीक मायथॉलॉजी मधली आणि अतिशय प्रभावीपणे मांडलेली आहे. शेवटपर्यंत वाचकाला खिळवून ठेवणारी कथा आहे. कदाचित फार कमी लोकांना ही कथा माहिती असेल. म्हणून कथेबद्धल थोडं  सगळ्यांबरोबर शेअर करावं असं वाटलं म्हणून हा खटाटोप.
***********************************************************************************************
प्राचीन ग्रीस मधे थेबाई नगरीवर सत्वशील राजा ओयदिपौस गेली काही वर्षे सुखाने राज्य करीत होता. पण अचानक त्याच्या राज्यावर एका महामारीचं संकट उभं राहातं. सगळेकडे हाहाकार उडालेला असतो आणि प्रजा मदतीच्या आशेने राजा ओयदिपौसच्या दाराशी आलेली असते. प्रजेला आशा असते की ज्या राजाने त्यांच्या नगरीचं भयंकर अशा स्फिंक्स राक्षसीणीपासून रक्षण केलं तोच राजा ह्या संकटावरही सहज मात करेल. प्रजेला या संकटातून वाचविण्यासाठी काय उपाय योजता येईल हे शोधण्यासाठी त्याने आपला मेव्हणा क्रेयॉन याला अपोल्लोन देवतेच्या प्यूथीय मंदिरात तिथल्या मांत्रिकाचा विचार घेण्यासाठी पाठवलेलं असतं. क्रेयॉन बातमी घेऊन येतो की या थेबाई नगरीच्या आधीचे राजे लाइयस यांच्या खुन्यामुळे ही महामारी पसरली आहे. ओयदिपौसने ज्यावेळी स्फिंक्स राक्षसीणीच्या कोड्यांची उत्तरे स्वत:च्या बुद्धिच्या जोरावर देऊन तिला हरवलं आणि थेबाई नगरीत प्रवेश केला त्यावेळी नुकतंच राजा लाइयसचं निधन झालेलं होतं. त्यामुळे त्याला त्याच्या विषयी फारशी माहीती नव्हती. प्रजाजनांनी ओयदिपौसला उस्फुर्तपणे राज्यावर बसवलं होतं आणि कालांतराने ओयदिपौसने राजा लाइयसच्या विधवा राणीशी, राणी योकास्तेशी, विवाह केलेला असतो. त्यामुळे राजा लाइयस नक्की कशाने मेला याची त्याला कल्पना नसते. क्रेऑन कडूनच समजतं की राजाची हत्या ते डेल्फॉयच्या तिर्थयात्रेला गेले असताना काही लुटारूंनी केली. खुन्याला शोधून काढून त्याला नक्कीच शासन करेन असं राजा ओयदिपौस जाहीर करतो. लाइयस राजाच्या खुना संदर्भात अधिक माहीती गोळा करण्याच्या हेतूने ओयदिपौस अंध गुरू तायरेशस या महात्म्याला बोलावणे धाडतो. गुरू तायरेशस अंध असले तरी त्यांच्या प्रज्ञाचक्षुंनी भूत-वर्तमान-भविष्य असं सगळं काही दिसतं. तायरेशस सुरूवातीला सत्य सांगण्याचं नाकारतात पण जेव्हा राजा त्यांना सत्य कथनासाठी भरीस घालतो तेव्हा त्यांना ते सांगावेच लागते. तायरेशस लाइयसच्या खुन्याविषयी सांगण्या ऐवजी राजा ओयदिपौसचं भविष्य कथन करतो की ज्यात राजाला अतिशय वाईट परिस्थीतीत ही नगरी, हे राज्य सोडून जावं लागणार असतं. सुरूवातीला ओयदिपौसला वाटतं की त्याला पदच्युत करण्यासाठी क्रेयॉननेच हा डाव रचला आहे आणि तो तसं जाहीरपणे बोलूनही दाखवतो. क्रेयॉन पूर्ण शक्ती आणि बुद्धीनीशी राजाचा हा आरोप खोडून काढतो. राज प्रासादातला आरडाओरडा ऐकून राणे योकास्ते बाहेर येते आणि घडलेल्या घटनेची चौकशी करते. तायरेशसची भविष्यवाणे ऐकल्यावर ती राजाला तिच्या आयुष्यातील पूर्वानुभवाचा हवाला देऊन तायरेशसच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायला सांगते. सगळ्या घटनांची शहानिशा करत असताना ओयदिपौसच्या समोर त्याच्या आयुष्यातील एक भयंकर सत्य प्रकट होते. हळूहळू हे स्पष्ट होत जाते की ओयदिपौस हाच राजा लाइयस आणि राणी योकास्ते यांचा मुलगा असतो. राजा लाइयसची हत्या ओयदिपौस कडूनच अनावधानने झालेली असते आणि त्याच अज्ञानात त्याने राणे योकास्तेशी विवाह केलेला असतो. सत्य समजल्यावर राणी योकास्ते गळफास घेऊन आत्महत्त्या करते आणि ओयदिपौस स्वत:चे डोळे फोडून घेतो. राज्याचा कारभार आणि आपल्या मुलांचे भवितव्य क्रेयॉनच्या हाती सोपवून तो स्वत: राज्यातून निघून जातो. ओयादिपौस त्याच्या जीवनातील हे रहस्य कसं उलगडतो आणि त्याचा शेवट कसा होतो ही फार रंजक आणि प्रभावी कथा आहे. पुढे अनेक वर्षे निर्वासितासारखी काढल्यावर तो अथेन्स नगरीत येतो आणि तिथेच एका अरण्यात रहातो. इच्छा असूनही तो थेबाईला परत जात नाही आणि त्याचा शेवट अथेन्स मधेच होतो. जो राजा ओयदिपौस थेबाईसाठी शाप ठरला तोच अथेन्स साठी एक पवित्र वरदान ठरतो. ग्रीक नाटककार सॉफक्लीझ याने ओयदिपौस २ हे नाटक लोहून त्याची पुढची कथा पूर्ण केली आहे. याच कथेवरून सिग्मंड फ्रॉईड या मानसशास्त्रज्ञाने त्याचा "ईडीपस कॉम्प्लेक्स" हा विचार मांडला.

Thursday, 5 September 2013

धर्मातीत श्रद्धा आणि भावना!!

 
मला अपघात झाल्याचे मी लंगडताना दिसल्यावर पहिल्या मजल्यावरील मुसलमान शेजारणीने चौकशी केली. ताबडतोब तिने मला सांगीतलं की वाईट शक्तींची दृष्टी घालवण्यासाठी जिथे अपघात झाला तिथे जाऊन काहीतरी केलं पाहीजे. मला एकदम आमच्या आईची आठवण झाली. मला अपघात तसा नविन नाही. अपघात झाला की आई मला सांगायची की अपघात झाल्या ठीकाणी जाऊन नारळ फोडून यायचा आणि मगे न बघता परतायचं. माझा तसा या गोष्टींवर खूप विश्वास नाही त्यामुळे आता मी काही हे करत नाही. ती हयात असताना तिच्या समाधानासाठी म्हणून मी ते करत असे. या मुसलमान शेजारणीचे मन मला मोडता आले नाही म्हणून मी काही बोलले नाही. पण घटनेला ४ दिवस उलटून गेल्याने ती म्हणाली आता त्या ठीकाणी जाऊन उपयोग नाही. मीच संध्याकाळी घरी येते. तशी ती तिन्ही सांजा झाल्यावर घरी आली आणि घराच्या दाराबाहेर मला पूर्वेकडे तोंड करून उभं रहायला सांगीतलं आणि माझी झाडूने दृष्ट काढली. तोच झाडू ओलांडून घरात जायला सांगीतले आणि तोंडावरून पाण्याचा हात फिरवायला सांगीतला. आमच्या घरी पूर्वी आजी (दोन्ही कडच्या) आणि आई अशा मीठ मोहरीने दृष्ट काढायच्या आणि ती ओवाळून टाकलेली मीठ-मोहरी लोखंडाच्या पळीत जाळायला ठेवली जायची. आता मीठ-मोहरी जळल्यावर घाण वास हा येणारच पण आमच्या आज्या म्हणायच्या "चांगलीच दृष्ट लागली होती हो" आणि आम्ही मंद स्मीत करत त्यांच्या त्या मायेला एन्जॉय करायचो. २०११ मधे "ड्ब डब डब २०११" या कॉन्फरन्सला हैद्राबाद ला गेले असताना तिथे एक तैवानी मुलगी भेटली. माझ्यासारखीच गुगलची फेलोशिप मिळवून आली होती. शेवटच्या दिवशी निरोप घेताना तिने मला एक कागदी चित्रविचित्र तोंडाचा सिंह दिला. तिने तो स्वत: बनवला होता. मला म्हणाली की मी असे पाच सिंह माझ्या बरोबर आणले आहेत. मला जी पाच महत्वाची वाटतील अशी लोकं भेटतील त्यांना देण्यासाठी. हा सिंह तुझ्या घराच्या हॉल मधे दाराकडे तोंड करून ठेव आणि तो तुझं दुष्ट शक्तींपासून रक्षण करेल. कथित परिणामच्या सत्यासत्यतेचा वाद घालण्यापेक्षा तिच्या माझ्याविषयीच्या भावना मला अधिक महत्त्वाच्या वाटल्या म्हणून माझ्या कडे तो सिंह अजुनही आहे आणि मी तो तिने सांगीतल्या प्रमाणे दाराकडे तोंड करून ठेवलाही आहे. आता मी कॅनडाला जाते तेव्हा तिथेही काही आप्तेष्ट भेटलेले आहेत. आम्ही प्रवासाला निघालो की त्यांच्या "टेक केअर" आणि "गळा भेटीतून" देखिल तीच माया अनुभवत असते. मुद्दा हा आहे की भावना, श्रद्धा या धर्मातीत असतात. कुणी त्याला धर्माचे लेबल लावून त्याचे भांडवल करू नये.

Friday, 9 August 2013

गाजराचा केक (कॅरट लोफ: व्हिगन)

साहित्य: १/४ कप कनोला आणि ऑलिव्ह ऑईल; १(१/३) कप साखर, १ कप किसलेले गाजर, १/४ टीस्पून लवंग पावडर, १(१/३) कप थंड पाणी; १ कप मनुका/बेदाणे, १ टीस्पून दालचिनी पावडर, १ टीस्पून जायफळ, १/२ कप दाणे/बदाम/अक्रोड; २ कप गव्हाचे किंवा होल व्हिट पीठ, १ टीस्पून सोडा, १ टीस्पून बेकींग पावडर, १ टीस्पून मीठ, केक पात्राला लावण्यास 
 थोडेसे क्रिस्को शॉर्टनींग (याच्या ऐवजी तूप देखिल वापरता येते). 
कृती: एका भांड्यात दिलेलेल्या मापाप्रमाणे कनोला आणि ऑलिव्ह तेल, साखर, पाणी, किसलेले गाजर, लवंग, दालचिनी, जायफळ, बेदाणे व्यवस्थित एकत्र करून घ्यावेत. तयार झालेले मिश्रण ५ मिनीटे उकळावे आणि थंड करण्यास ठेवावे. 
दिलेल्या मापाने घेतलेल्या पिठात मीठ, सोडा, बेकींग पावडर एकत्र करून घ्यावे. वरील थंड झालेल्या मिश्रणात मीठ, सोडा आणि बेकींग पावडर घातलेले पीठ घालून मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे. तयार मिश्रणात दिलेल्या मापात आक्रोडांचे तुकडे टाकावेत. तयार झालेले मिश्रण व्यवस्थीत एकजीव करावे. केकपात्राला आतून क्रिस्को शॉर्टनींग किंवा तूप लावून केकचे बॅटर (मिश्रण) केकपत्रात भरावे. 
केकपात्र एक तासभर ओव्हन मधे ३५० डिगरी तापमानावर बेक करावे. तासाभराने केकपात्रं ओव्हन मधून बाहेर काढून केक थंड होण्याची वाट पहावी. केक थंड होत असताना तो व्यवस्थीत बेक झाला आहे की नाही याची खात्री करून घेण्यासाठी सुईसारखे अणकुचीदार टोक असणारी वस्तू त्या केक मधे घुसवून पहावी. 
व्यवस्थीत बेक झालेल्या केकचे बॅटर त्या अणकुचीदार टोकाला चिकटत नाही. जर बॅटर चिकटले तर केक नीट बेक झालेला नाही असे समजावे आणि पुन्हा थोडावेळ ओव्हन मधे केकपात्र ठेवावे.

 
व्यवस्थीत बेक झालेल्या केकच्या कडा केक थंड होत असताना केकपात्रापासून आपोआप सुटायला लागतात. अशा कडा सुटायला लागल्या की केकपात्रं उलटे करून त्याच्या तळाशी थपडा माराव्यात म्हणजे केक केकपात्रापासून व्यवस्थीत सुटून बाहेर येतो. 

यानंतर तुमचा गाजराचा केक कापून इतरंना खायला घालण्यासाठी तयार असेल. हा गाजराचा केक एकदम स्वादिष्ट आणि खुसखुशीत होतो.