Tuesday 14 December 2010

२-जी स्पेक्ट्रम आणि २६/११ एक कनेक्शन!!

 २-जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात कोणी किती हजार किंवा लाख कोटी रूपये खाल्ले याची मोजदाद फक्त त्या पैसे खाणार्‍यांनाच माहीती. पण एकूणच वर्तमानपत्रात ज्या उलट-सुलट बातम्या येत आहेत, तसेच विविध नेत्यांची अगदी वेळ ठरवून दिल्यासारखी वादग्रस्त वक्तव्य येत आहेत त्यावरून तर माझा हाच कयास आहे की २-जी स्पेक्ट्रम घोटाळा आणि २६/११ चा हल्ला यात नक्की काहीतरी कनेक्शन आहे. कसं ते बघुयात.
२-जी स्पेक्ट्रम घोटाळा हा नक्की काय आणि कशामुळे झाला ते समजून घेणं क्रमप्राप्त आहे. माझ्या अल्प बुद्धीनुसार मला समजलेलं २-जी घोटाळ्याचं सोप्या भाषेतील स्वरूप म्हणजे सरकार तर्फे कोणतंही काम जेव्हा एखाद्याला द्यायचं असेल तर टेंडर म्हणजेच निविदा मागवल्या जातात. २-जी स्पेक्ट्रम म्हणजे आपल्या देशात मोबाईलच्या प्रचंड वाढलेल्या वापरामुळे उपल्ब्ध स्पेक्ट्रम (बॅंडविड्थ) अपूरी पडत होती. म्हणून दुसर्‍या जनरेशनची म्हणजेच अधिक बॅंडविड्थ मोबाईल कंपन्यांना देऊ करणे म्हणजे २-जी स्पेक्ट्रम देणे. आता हे अशा पद्धतीने होतं की ज्या कंपन्या अशी बॅंडविड्थ पुरवतात त्यांना अधिक क्षमतेचे भले मोठे टॉवर्स उभे करावे लागतात. त्यासाठीच सरकार त्यांच्या कडून पैसे घेते (एक गठ्ठा). मग त्या कंपन्या भारतातील मोबाईल कंपन्यांना ती बॅंडविड्थ विकतात. भारतीय मोबाईल कंपन्या अधिकाधिक वेगवान कनेक्शन पुरवून ते लोकांकडून वसूल करतात. सरकार ज्यांच्याकडून पैसे घेते या कंपन्या मुख्यत: विदेशी आहेत. आता २-जी स्पेक्ट्रम च्या बाबतीत सरकारने निविदा मागवायच्या होत्या पण स्पेक्ट्रमची किंमत आधीच्याच भावाने अत्यंत कमी दर घेऊन विकली गेली. निविदा तर काढलीच नाही पण जो पहिला आपलं बजेट समोर ठेवेल त्याला ते दराची कोणतीही चौकशी न कराता दाखवलेल्या दराने विकलं गेलं. त्यानंतर थोड्याच दिवसात लक्षात आलं की त्या कंपन्यांनी आजचा दर न लावल्याने सरकारचं काही लाख कोटींचं नुकसान झालं. कारण त्यांनी आणि भारतातील मोबाईल कंपन्यांनी यात प्रचंड पैसा कमावला. आता ह्या असल्या आतबट्ट्याच्या व्यवहारासाठी (जेव्हा चोर पकडला गेला तेव्हा) फक्त माजी केंद्रीय मंत्री एकटेच जबाबदार कसे? ते त्याच खात्यात मंत्री होते म्हणून त्यांची मान अडकलेली, सोडवणं अशक्य. म्हणून ते बळीचा बकरा झाले. बाकीच्यांचं काय? 

त्यापाठोपाठच कॉर्पोरेट क्षेत्र आणि केंद्रात असलेले सत्ताधारी यांच्यातील दलाल (फिक्सर) नीरा राडीया आणि भारतीय उद्योग जगताचे अनभिषिक्त सम्राट रतन टाटा यांचं खासगी संभाषण बाहेर आलं. टाटांनी "राजा" यांनीच दूरसंचार मंत्री बनावे असा आग्रह का धरला याचं आपल्या सामान्य बुद्धीला उत्तर मिळत नाही. साधारण एक महिन्यापूर्वी लोकसत्तामध्ये रतन टाटांच्या फाउंडेशनने २६/११ च्या हल्ल्यातील पीडीतांना कशी मदत केली आहे याचे वर्णनच लिहून आले होते. त्यांनी केवळ ताज आणि ट्रायडंट पुन्हा एक वर्षात उभेच नाही केले तर हल्ल्यात ताजच्या ज्या कर्मचार्‍यांना प्राण गमवावे लागले किंवा जखमी व्हावे लगले अशांच्या कुटुंबियांना सढळ हाताने मदत केली आहे. ते येवढं करूनच थांबलेले नाहीत तर सी एस टी हल्ल्यात पीडीत अनेकांना सढळ हाताने मदत केली आहे. आता जागतिक मंदीच्या काळात, २६/११ च्या हल्ल्यात प्रचंड नुकसान झालेलं असताना देखिल टाटा उद्योग समूहाला इतका खर्च परवडतो तरी कसा? म्हणजेच केंद्रातील कॉंग्रेस सरकार आणि टाटांसारख्या इतर उद्योग समूह भारतीय आणि विदेशी यांच्या एखादा छुपा करार झाल्यासारखा वाटतो. म्हणूनच २-जी स्पेक्ट्रम मध्ये कॉंग्रेस सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. ठरवून राजा यांना बळीचा बकरा बनवलं. संयुक्त संसदीय समीतीच्या चौकशीची विरोधकांची मागणी फेटाळत आहेत. जर का कॉंग्रेसचे नेते यात गुंतलेले नाहीत तर जेपीसी चौकशी करण्यास विरोध का? सगळ्यांचंच बिंग फुटेल म्हणून? मग जनतेचं या मोठ्या गोष्टींपासून दुर्लक्ष होण्यासाठी उगाचच वादग्रस्त विधानं करून सगळ्यांचंच लक्ष वेगळीकडेच वेधायचा प्रयत्न करायचा. कदाचित २-जी स्पेक्ट्रमचं जहाज कधी ना कधीतरी फुटणार हे माहीत असल्यानेच त्याआधी राष्ट्रकुल घोटाळे, आदर्श, गुलमोहर इमारतींचे घोटाळे आधी बाहेर काढले. टाटा समूहाचं झालेलं नुकसान वेगळ्या प्रकारे भरून आणलं कॉंग्रेसने आणि त्याच बरोबर टाटांच्या गळ्यात दी बीगेस्ट फिलॉन्थ्रॉपीस्ट इन इंडीया अशा उपाधीची (अनौपचारिक) माळही पडली आहे. सामान्य जनता, चाकरमाने, करदाते यांचे काय? त्यांची स्थिती काही सुधारली नाही. उलट त्या क्रूरकर्मा कसाबला वाट्टेलते बोलू देण्यासाठी फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी न होता उगाचच खटल्याचा, अपिलाचा फार्स चालू आहे. आणि हे सगळं देखिल पुन्हा करदाते आणि जनसामान्य यांच्याच खिशातून.
रात्र वैर्‍याची आहे.

Saturday 11 December 2010

नाईट अ‍ॅट द म्युझीयम (भाग २)!!

लॅरी डेली, की जो दोन वर्षांपूर्वीपर्यंत अमेरिकन नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी मध्ये सिक्युरिटी गार्ड असतो, आज डेली सर्विसेस या डायरेक्ट रिस्पॉन्स टेलिव्हिजन कंपनीचा सर्वेसर्वा झालेला असतो. या कंपनी मार्फत लॅरी त्याच्या सिक्युरीटी गार्ड असतानाच्या अनुभवांवर आधारित नाविन्यपूर्ण अशा गोष्टी बनवून विकत असे. दोन वर्षांत एक यशस्वी उद्योजक म्हणून नाव कमावण्यात आणि भरपूर पैसे कमावण्याच्या नादात, लॅरीला म्युझियम मध्ये जायला वेळच मिळालेला नसतो. एका लाईव्ह शोमध्ये त्याच्या म्युझियममधील सिक्युरिटी गार्डच्या नोकरीचा उल्लेख होतो आणि म्युझियमची तीव्रतेने आठवण झाल्याने तो तातडीने  म्युझियमला भेट द्यायला जातो. म्युझियममध्ये सिक्युरीटी गार्ड म्हणून काम करत असताना लॅरीची तिथल्या सगळ्या एक्झीबीट्सशी दोस्ती झालेली असते. तिथे गेल्यावर त्याला समजतं की म्युझियम डागडुजी आणि नाविन्यपूर्ण बदलांसाठी बंद होतं आहे आणि तिथल्या प्रदर्शनात मांडलेले लहान मोठे तसेच पूर्वीच्या विविध जातीजमातींचे पुतळे, प्राणी यांना वॉशिंग्टन येथील स्मिथोनियन इन्स्टीट्युट मध्ये हलवणार आहेत. संग्रहालयात नाविन्य आणण्यासाठी यातील बर्‍याच पुतळ्यांची जागा इंटरअ‍ॅक्टीव्ह हॉलोग्राम घेणार असल्याने अशा पुतळ्यांचं अस्तित्त्वच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे हेसुद्धा त्याला समजतं. यासगळ्यांत  इजीप्शीअन राज्यांतील फाराओह अखमेनरहाची एक सोन्याची टॅबलेट असते की जिच्यामधील जादूई शक्तीमुळे सूर्यास्तानंतर सर्व पुतळे जिवंत होऊन सकाळी सूर्योदयापर्यंत म्युझियम मध्येच जीवंतपणे वावरत असत. ती टॅबलेट आधीच्याच म्युझियममध्ये राहणार असल्याने जे पुतळे वॉशिंग्टनमधील संस्थेत हलवले जाणार ते कधीच पुन्हा जीवंत होऊ शकणार नाहीत याची त्यासगळ्यांना मोठी खंत असते. दुसर्‍या दिवशी जेव्हा हे सगळे पुतळे वॉशिंग्टनच्या स्मिथसोनिअन संस्थेत हलवले गेल्यावर लॅरीला त्यातील जेडेडीहचा फोन येतो की डेक्स्टरने अखमेनरहाची टॅबलेट चोरून आणली आणि अतिशय क्रूर म्हणून कुप्रसिद्ध असलेला फाराओह कहमुनराह (अखमेनरहाचा मोठा भाऊ) पुतळ्यांवर चाल करून आला आहे. काळजीपोटी लॅरी वॉशिंगटनला जातो आणि त्यासगळ्या पुतळ्यांना ज्या तळघरात ठेवलेलं असतं तिथे पोहोचतो. लॅरीच्या हातात टॅबलेट आल्यावर नेमका सूर्यास्त होतो आणि टॅबलेटच्या पॉवर मुळे त्याठीकाणी असलेले सगळे पुतळे जिवंत होतात. त्यातच नेपोलिअन, इव्हान टेरीबल आणि इतर दुष्टप्रवृत्तीच्या नेत्यांना सोन्याच्या टॅबलेट्च्या मदतीने जग जिंकण्याचं अमिष दाखवून फाराओह कहमुनराह लॅरीवर हल्ला करतो आणि टॅबलेट हस्तगत करतो. टॅबलेटचा आधीचा कोड वर्ड बदलेला असल्याने कहमुनराहला टॅबलेटचा उपयोग त्याची अंडवर्ल्डची सेना बाहेर काढंयासाठी होत नाही. त्यामुळे जेडेडीहला ओलीस ठेऊन लॅरीला त्याचा नवा कोडवर्ड शोधून काढण्यास सांगतो. हा कोड शोधत असताना लॅरीला एमिली एअरहार्ट, अब्राहम लिंकन, आईनस्टाईन्स, नील आर्मस्ट्रॉंग यांसारखे अनेक प्रसिद्ध व्यक्तीमत्त्व भेटतात आणि त्याला नवा कोड वर्ड शोधायला मदत करतात. एमिली एअरहार्ट लॅरीच्या मनातील मूलभूत गोंधळ नेमका पकडते आणि आपल्याला जे आवडतं, आपल्याला जे पॅशनेटली करावंसं वाटतं तेच करावं हा मंत्र नकळत देऊन जाते. नवा कोडवर्ड म्हणजे पाय या ग्रीक अक्षराची गणिती किंमत असते. जेडेडीहला वाचवण्यासाठी लॅरी ती सोन्याची टॅबलेट नव्या कोड वर्ड सकट फाराओह कहमुनराहकडे सूपूर्द करतो. फाराओह कहमुनराह आधी कबूल केल्याप्रमाणे जेडेडीहला न सोडता लॅरीलाच पकडतो. अंडरवर्ल्डची आर्मी आल्यावर नक्की काय होतं? लॅरी त्याच्या पुतळ्यांना वाचवण्यात  यशस्वी होतो का? लॅरी त्याच्या पॅशनचं काम करण्यात यशस्वि होतो का? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी नाईट इन द म्युझियम (भाग २) हा चित्रपट जरूर पहा. चित्रपटाच्या सुरूवातीपासून असं कुठेही जाणवत नाही की ह्या चित्रपट कथानकाचा पहिला भाग आधीच प्रदर्शित झाला आहे. फक्त या भागात मला एक दोन प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत की जी पहिल्या भागात असतील. पहिला म्हणजे त्या टॅबलेटचा जुना कोड वर्ड कसा बदलला? आणि अखमेनरहाची कथा की जी त्या टॅबलेटची पार्श्वभूमीपण सांगत असणार. त्यामुळे पूर्ण चित्रपट पाहील्यावर पहिला भागही किती मजेशीर असेल आणि त्या दोन प्रश्नांची उत्तरं काय असतील याची उत्सुकता लागून रहाते. नाईट इन द म्युझियम या चित्रपटाचे दोनही भाग अमेरिकन चित्रपट क्षेत्रातील साहसी विनोदी (अ‍ॅडव्हेन्चर कॉमेडी) यासदरात मोडतात. आपल्याला जे मनापासून करायला आवडतं तेच करावं म्हणजेच इंग्रजीत फॉलो युवर हार्ट)  त्याचप्रमाणे गोष्टी जुन्या झाल्या तरी त्यांचा योग्यअसा उपयोग आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कसा करता येऊ शकतो हे दोन संदेश देणारा हलका फुलका चित्रपट पाहताना जाम मजा येते.