Friday 23 December 2011

१०० वर्षांनंतरचं जग: भविष्यातील भौतिकशास्त्र आणि तंत्रज्ञान!!

ल्पना करा की १०० वर्षांनंतर दोन अनोळखी व्यक्ती एकमेकांसमोर अचानक आल्यावर आणि त्यांनी एकमेकांकडे पाहिल्यावर ताबडतोब एकमेकांना समोरच्या व्यक्तीबद्दलची सर्व माहिती मिळते आणि तुम्ही सुसंवाद साधू शकता. जर समोरचा माणूस जपानी भाषेत बोलत असेल आणि तुमची भाषा मराठी असेल तर तुम्हाला ती व्यक्ती जपानीत जे बोलत असेल ते मराठीत भाषांतर होऊन वाचायला किंवा ऐकायला मिळेल. नुसत्या कल्पनेने आपल्याला जिथं जायचं तिथं आपण जाऊ शकू. म्हणजे अगदी आपल्या पौराणिक कथांमधील देवांना जश्या शक्ती अवगत होत्या तशाच शक्ती आपल्याला शंभर वर्षांनंतर अवगत असतील. हे सगळं चमत्कारांमुळे शक्य होणार नसून माहिती तंत्रज्ञान आणि संगणक विज्ञानातील वाढत्या संशोधनामुळे हे सगळं शक्य होणार आहे. जिथे जिथे तीच तीच कामं असतील (उदा: कारकुनी काम, विशिष्ट गोष्टींची मोजमापं, विशिष्ट प्रकारचे कपडे शिवणे, फाईलिंग करणे इ.) तिथे तिथे स्वयंचलित संगणक (रोबो) काम करायला सुरुवात करेल. सध्या संगणकाचा आकार छोटा छोटा होत चालला आहे पण त्याची क्षमता वाढते आहे, याचाच उपयोग होऊन संगणकाच्या छोट्या चिप्स आपल्या शरीरात (मेंदूपाशी) बसवल्या जातील, काही चिप्स या डोळ्यात तर काही कानात बसवल्या जातील. मग मनात येण्याचा अवकाश त्या त्या गोष्टी घडू लागतील. शरीरात बसवलेल्या संगणकीय चिप्स या इतर वस्तूंमधील चिप्सशी जोडलेल्या असल्याने आपण फक्त मनात आणलं तर एखादी वस्तू एका जागेवरून दुसर्‍या जागेवर नेऊ शकू.


आपल्याकडे असे चष्मे असतील की ज्यात आपलं संपूर्ण ऑफिस सामावलेलं असेल. ते चष्मे डोळ्यावर चढवले की आपल्या ऑफिसमधील कामाच्या फाइल्स संगणकावर म्हणजेच आपल्या डोळ्यांसमोर दिसायला लागतील आणि आपण फक्त मनात विचार आणून ऑफिसमधले काम पूर्ण करू शकू. त्यासाठी प्रत्यक्षात कळफलक आणि माऊस घेऊन बसण्याची गरज लागणार नाही. हे सगळं शक्य होईल आंतरजालीय जोडणीमुळे. त्यावेळी ही आंतरजालीय जोडणी (इंटरनेट कनेक्टीव्हीटी) वायरलेस आणि कोणत्याही वेळी, कोणासही, कुठेही उपलब्ध असेल. उदा: जर आपण पुण्यात शनिवारवाडा पाहायला गेलो तर सगळीकडे आपल्याला उद्ध्वस्त झालेल्या जागा दिसतील. पण हेच ऑगमेंटेड रीऍलीटीचा वापर करून आपल्याला पेशवेकालीन शनिवार वाड्याचं रूपडं तसेच त्यावेळी तिथे चालू असलेल्या घटना यांचा अनुभव घेता येईल. या तंत्रज्ञानाला ऑगमेंटेड रीऍलीटी असं म्हणतात. उडत्या मोटार कार्स असतील. बोलती तसेच हुशार भिंत असेल. उदा: जर आपल्याला आपल्या घरातील भिंतीचा रंग आवडला नाही तर आपण भिंतीशी बोलून तो रंग बदलू शकू. कारण सगळीकडेच संगणकीय चिप्स असतील. प्रा काकु यांच्या म्हणण्यानुसार संगणकीय चिप्स त्यावेळी खूपच स्वस्त म्हणजे एका पेनीला एक अशी चीप की ज्यात आपण प्रचंड माहिती साठवू शकू.


सायन्स फिक्शनच्या चित्रपटाची स्टोरी वाटतेय ना? खरंय, पण सध्या ज्या वेगाने संगणक विज्ञान, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टीफीशीअल इंटॅलीजन्स), जैवतंत्रज्ञान (बायोटेक्नॉलॉजी), सूक्ष्मजीवशास्त्र (मायक्रोबायोलॉजी) या सगळ्या शाखांतील अद्ययावत संशोधन आणि या सर्व शाखांच्या संशोधनाचा संयुक्तपणे वापर चालू झाल्यावर वरील सर्व गोष्टी अशक्य अजिबात नाहीत. हेच सर्व अतिशय सकारात्मक दृष्ट्या प्रा मिचिओ काकु आपल्याला त्यांच्या "१०० वर्षांनंतरचं जग: भविष्यातील भौतिकशास्त्र" या पुस्तकात पटवून देतात. अगदी आपल्या मलमूत्रांचे स्वयंचलित पद्धतीने (आपल्या टॉयलेट सीटमधील सॅंपल्स डायरेक्ट अ‍ॅनालाईझ केल्याने) चिकित्सा करून आपल्या शरीरात नेमक्या कोणत्या कमतरता निर्माण झाल्या आहेत आणि मग त्यासाठी आपण काय करायला हवे, आपल्याला एखादा रोग होण्याची(कर्करोग, मधुमेह) लक्षणं दिसत असतील तर त्याचेही निदान(प्रेडीक्षन) या स्वयंचलित संगणक प्रणालीद्वारे होऊन आपल्याला त्याची आगाऊ सूचना मिळू शकेल. मानवी शरीरातील वय वाढण्याची (एजींग) प्रक्रिया आपल्या शरीरातील पेशींच्या विभाजनाला तसेच ऑक्सीडेशन प्रक्रियेला नियंत्रित करून प्रलंबित किंवा पूर्णपणे थांबवता येणं शक्य आहे. पौराणिक कथांमध्ये आपण वाचतोच की देव किंवा अगदी महाभारतकालीन कौरव-पांडवादी पात्रंसुद्धा कित्येक शतकं जगत असत. काही जणांना अमरत्वही प्राप्त होऊ शकेल.


प्रा. मिचिओ काकुंनी या पुस्तकात जे काही अंदाज बांधलेले आहेत त्याला भविष्यवेध शास्त्राचा आणि सध्याच्या अद्ययावत संशोधनाचा आधार आहे. इतकं सगळं असूनही ते हे मान्य करतात की स्वयंचलित संगणक (रोबो) हे फक्त तीच तीच कामं करू शकतात. माणसातील समजशक्ती(कॉमन सेन्स),अनुभवातून येणारा शहाणपणा आणि नैसर्गिक बुद्धिमत्ता तसेच भावनांचा आविष्कार हा स्वयंचलित संगणकांत शक्य नाही. त्यामुळे जिथे जिथे या गोष्टींची आवश्यकता आहे तिथे तिथे माणसाची गरज लागणारच आहे हे सुद्धा स्पष्ट केलं आहे.


या पुस्तकासंदर्भात किंवा त्यात रंगवलेल्या भविष्यासंदर्भात पुष्कळ टीका झालेली आहे. सध्या संगणकाच्या चिप्स बनवण्यासाठी सिलीकॉन व्हॅलीमधील नेक कंपन्या कार्यरत आहेत. जसजशी संगणकीय चिप्सची क्षमता वाढते आहे तसतसं एक चीप तयार करायला लागणार्‍या शुद्ध पाण्याचं प्रमाणही वाढतं आहे. एकदा का चीप तयार केली की जे टाकाऊ पाणी उरतं ते कोणीही वापरण्यास म्हणजे अगदी झाडांना घालण्यासही अयोग्य आणि विषारी असतं. त्यानं जमिनींमधील कस संपून त्या उजाड बनतात. तयार होणारा संगणकीय कचरा ही एक मोठी डोकेदुखी झालेली आहे. सध्या प्रगत राष्ट्रांतील संगणकीय कचरा हा प्रगतिशील किंवा अप्रगत राष्ट्रांमध्ये आणून टाकला जातोय. अगदी भारतात सुद्धा डोनेशनच्या नावाखाली कमी क्षमतेचे संगणक खेड्यापाड्यांतील शाळांत पुरवले जातायत. त्यांचा उपयोग फारसा होत नसतोच. फक्त अजून तीन चार वर्ष ते तिकडे धूळ खात पडलेले असतात.


या पुस्तकात उल्लेखलेलं तंत्रज्ञान जरी प्रगतीपथावर असलं तरी या सगळ्यासाठी लागणारा माहितीचा साठा तसेच त्यासाठी लागणारी वीज या गोष्टी वस्तुस्थितीला धरून वाटत नाहीत. प्रा काकु हे सुद्धा म्हणतात की जिथे आंतरजाल (इंटरनेट) आहे तिथे ज्ञान आणि पैसा आहे आणि जिथे आंतरजाल नाही तिथे दारिद्र्य, अज्ञान आणि दु:ख आहे. खरं तर तरीही त्यांनी रंगवलेलं चित्रं हे एका विशिष्ट प्रकारच्या जीवनशैलीला, तसेच प्रगत देशांतील परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून साकारलेलं आहे. मला नाही वाटत की ते  तंत्रज्ञान भारतासारख्या एकावेळी अनेक शतकांत जगणार्‍या देशांत सर्रास वापरात आलेले असेल. इथले प्रश्नच वेगळे आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं केवळ अद्ययावत विज्ञान तंत्रज्ञानात मिळणं अवघड आहे. इथली परिस्थिती बदलायची असेल तर या तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्याकडील एकाचवेळी अनेक शतकांत जगणार्‍या जनतेमध्ये जी दरी उत्पन्न झाली आहे ती दरी शिक्षणामुळे संपवली पाहिजे. जगण्यास आवश्यक अशा मूलभूत गोष्टी, स्वच्छता यांविषयीची जागरूकता या अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करून पोहोचवली पाहिजे. एकदा का दरी कमी होत आली की मग मानवीमूल्यांचा र्‍हास न होता प्राध्यापक काकु म्हणतात तसा अद्ययावत तंत्रज्ञानाचा जीवनमान उंचावायला आणि सुधारायला उपयोग करून घेता येईल.


सध्या तरी एक सायन्स फिक्शन म्हणूनच हे पुस्तक वाचायला हरकत नाही पण हा एक भविष्यवेध आहे. याचा अर्थ भविष्यात तंतोतंत असंच होऊ शकतं, याचं भविष्यकथन केलेलं आहे असा अर्थ काढणं चुकीचं ठरेल.या पुस्तकातील बर्‍याच गोष्टी अतिशय काल्पनिक आणि अव्यवहार्य वाटू शकतात पण तरीही विचारांना चालना देणारं पुस्तक म्हणून याकडे बघायला काहीच हरकत नाही.


पुस्तकाचं नाव: Physics of the future: How Science will Shape Human Destiny and our Daily Lives by the Year 2100 लेखक: मिचिओ काकु (थिऑरॉटीकल फिजीक्स, सिटी कॉलेज, न्युयॉर्क विश्वविद्यालय) प्रकाशक: Knopf Doubleday Publishing Group

Wednesday 21 December 2011

भारतरत्न पुरस्काराचे महाभारत!

भारतरत्न, हिंदूस्थानातील एक सर्वोच्च नागरी पुरस्कार! भारतरत्न अशा व्यक्तीला दिला जातो की ज्याने मानवतेसाठी, समाजासाठी उच्चकोटीची तसेच भरगच्च कामगीरी केलेली आहे. सुरूवातीला हा पुरस्कार देशासाठी भरीव कामगीरी केलेल्या व्यक्तींना दिला जात असे. पण आता हा पुरस्कार कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तीला दिला जातो त्यासाठी ती व्यक्ती भारतीय नागरीक असण्याचंही कारण नाही आणि त्या व्यक्तीने भारतीय समाजासाठी विशेष केलेलं असण्याचीही आवश्यकता नाही. ह्या पुरस्काराची घोषणा भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्र पसाद यांनी २ जानेवारी १९५४ ला केली. सुरूवातीला हा पुरस्कार केवळ जीवंत असलेल्या व्यक्तींनाच देण्यात यावा अशी तरतूद होती पण जानेवारी १९५५ मधे त्यात सुधारणा घडवली गेली आणि हा पुरस्कार मरणोत्तर देण्यासही सुरूवात झाली.
अत्तापर्यंत हा पुरस्कार एकूण ४१ व्यक्तींना देण्यात आलेला आहे. त्याची यादी विकीपीडीया इथे उपलब्ध आहे. त्यातील दोन व्यक्ती खान अब्दुल गफारखान (सरहद्द गांधी) आणि नेल्सन मंडेला भारतीय नागरीक नाहीत. हा पुरस्कार देण्यासाठी नक्की कोणते निकष लावले जातात याचे जाहीर प्रकाशन फारसे उपलब्ध नाही. अत्तापर्यंत जे काही बाहेर आले आहे त्यावरून असेच वाटते की विशिष्ठ क्षेत्रातील व्यक्ती------जिवंत अथवा मृत आणि त्यांनी केलेली कामगीरी इतकेच निकष दिसतात. आपण जर यादी नीट पाहीली तर अधिकाधिक वेळा पुरस्कार प्राप्त व्यक्ती ह्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी निगडीत, राजकीय व्यक्ती तसेच कॉंग्रेसशी संबंधीत आहेत. उदा. राजीव गांधींनी अशी कोणती भरीव कामगीरी भारत देशासाठी किंवा मानवतेसाठी किंवा समाजासाठी केलेली आहे या प्रश्नाचं उत्तर शोधूनही सापडणार नाही. हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या व्यक्ती कला क्षेत्र (सुब्बालक्ष्मी, सत्यजीत रे, पं भिमसेन जोशी, लता मंगेशकर, पं रविशंकर, शहनाई सम्राट बिस्मील्ला खान, एम जी रामचंद्रन), सामाजिक कार्य (विनोबा भावे, धोंडो केशव कर्वे, मदर टेरेसा, नेल्सन मंडेला) तसेच विद्वान-शास्त्रज्ञ (सी व्ही रामन, ए पी जे अब्दुल कलाम, अमर्त्य सेन, डॉ आंबेडकर, पांडुरंग वामन काणे, झाकीर हुसेन, विश्वेश्वरैय्या), उद्योजक (जे आर डी टाटा) यांची नावं आहेत. एम जी रामचंद्रन यांनी मानवतेसाठी आणि समाजासाठी नक्की काय भरीव कामगीरी केलेली आहे हे समजत नाही. राजकीय क्षेत्रातील अनेक नावं अशी आहेत की त्यांच्या भरीव (??) कामगीरी बद्धल प्रश्न पडतात.
यात अजुन एक महत्त्वाचा मुद्दा राहून जातोय आणि तो म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना दिलेलं मरणोत्तर भारतरत्न काढून घेणे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वपूर्ण कामगीरी कोणीच नाकारू शकत नाही. म्हणजे अगदी जवाहरलाल नेहरूंच्या पेक्षाही भरीव कामगीरी नेताजींची आहे. पण केवळ त्यांच्या मृत्युचं सर्टीफिकीट नाही म्हणून त्यांना भारतरत्न हा पुरस्कार मरणोत्तर दिला जाता कामा नये असे म्हणून दिलेला पुरस्कार नाकारण्यात आला. आता एक गंमत बघा की हेच कॉंग्रेस सरकार सार्‍या जगाला ओरडून सांगत असतं की सुभाषचंद्र बोस जिवंत नाहीत.....ते जिवंत असणं शक्यच नाहीत असं त्यांचे नातेवाईकही मान्य करतात. मग भारतरत्न पुरस्काराच्याच वेळी यांना ते मृत नाहीत असं का वाटावं? मुख्य म्हणजे लोकांकडून मागणी होते म्हणून घटनेत दुरूस्ती करून भारतरत्न पुरस्कार देण्यात येण्याच्या यादीत खेळाडूंची वर्णी लावली गेली. पण सुभाषचंद्र बोसांवर किती अन्याय होतो आहे याचा कुणीही विचारही करत नाही. इंदिरा गांधीला १९७१ साली हा पुरस्कार देण्यात आला आणि १९७५ साली तिने लोकशाहीची पायमल्ली करून देशात आणीबाणी निर्माण केली. मग ही भारतरत्न पुरस्काराची पायमल्ली नाही काय? राजीव गांधींचं नाव बोफोर्स गैरव्यवहारांसहित स्विस बॅंकेतील काळ्या पैशासंदर्भातही आलेले आहे. मग एकूणातच काहीही कामगीरी न केलेल्या आणि भ्रष्टाचारात नाव गोवले गेलेल्या व्यक्तीचं भारतरत्न का काढून घेऊ नये?
सचिन तेंडूलकरने क्रिकेट या खेळात भव्य कामगीरी केलेली आहे. तशी ध्यानचंद यांनीही तेंडूलकर जन्माला येण्याआधी हॉकीच्या क्षेत्रात सुवर्ण कामगीरी केलेली आहे. मग केवळ सचिन तेंडूलकरसाठी (म्हणजे क्रिकेट साठी) नियम बदल केले जातात. [मी हे असं लिहीलं आहे याचा अर्थ मी सचिन तेंडूलकरची कामगीरी आजीबात महत्त्वाची नाही असं म्हणते आहे असा होत नाही.] उद्या अमिताभ बच्चनचे चाहते एकत्र येऊन त्याला भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी करतील. भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे क्रिकेटमधला नाही. त्यामुळे वयाच्या चाळीशीतच भारतीय सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला तर त्याला पुढे कोणताच भारतातील पुरस्कार स्विकारता येणार नाही. याउलट मला असं वाटतं की अत्ता त्याला हा पुरस्कार न देऊन त्याला भारतीय समाजासाठी/ मानवतेसाठी काही उत्तम करण्याची संधी मिळेल आणि त्यामुळे भविष्यात जेव्हा हा पुरस्कार त्याला दिला जाईल तेव्हा आपल्या सगळ्यांसाठीच ते अधिक अभिमानास्पद असेल.
बिस्मिल्ला खान यांना भारतरत्न पुरस्कार मिळाल्यानंतरही आयुष्यातील शेवटची काही वर्षं त्यांनी हालाखीत एका झोपडीत औषधपाण्याविना काढलेली आहेत. काय उपयोग त्या भारतरत्न पुरस्काराचा? ए पी जे अब्दुल कलाम यांच्याबाबतीतही त्यांचा अपमान होण्याचे अनेक प्रसंग घडले आहेत.
हे भारतरत्न पुरस्कार वगैरे सगळा दिखावा आहे. नागरी पुरस्कार देण्याची जी कमिटी आहे त्या कमिटीवर तसेच सत्ता कोणत्या पक्षाच्या हाती आहे त्यावर हे सगळं अवलंबून आहे. वर नमूद केल्याप्रमाणे राजीव गांधी, इंदिरा गांधी तसेच इतरही काही पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या बाबतीत जे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे तसं होऊ नये याची काळजी घेण्यासाठी भारतरत्न पुरस्कार पात्रता निवडीत वयाची अटही असावी असे वाटते. म्हणजे व्यक्तीला अधिक काळ परखून मगच हा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला जावा. मला असं वाटतं की सद्य परिस्थीतीत तसेच निकषांच्या बाबतीत पारदर्शकता असावी तसेच हा पुरस्कार मरणोत्तरच दिला जावा म्हणजे पुरस्कार प्राप्त काही विद्यमानांचा (बिस्मिल्ला खां आणि अब्दुल कलाम) जसा अपमान होतो आहे/झाला आहे तो तरी भविष्यात होणार नाही. तरच या पुरस्काराची मानदंडता राखली जाईल. नाहीतर दिवसेंदिवस त्याचे महत्त्व कमी होत राहील यात शंका नाही.