Thursday 16 April 2015

अगोरा: हायपेशीयाची गोष्ट!!अगोरा, म्हणजेच प्राचीन ग्रीक भाषेत जनतेच्या एकत्रिकरणाची एक सार्वजनीक जागा. हा चित्रपट ख्रिस्ताच्या मत्युनंतर ३५१ साली अलेझांड्रीया या प्राचीन इजीप्त मधील विद्यापीठीय शहरात घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे. ही गोष्ट हायपेशीया (अलेक्झांड्रीया मधील एक तत्त्वज्ञ, गणिती, आंतराळशास्त्राची अभ्यासक), तिचे विद्यार्थी, तिच्या वडिलांचे गुलाम यांच्यावर आणि एकूणच अलेक्झांड्रीयावर ख्रिस्ती मिशनरी लोकांच्या धर्मांतराच्या राजकारणाचा झालेला परिणाम यावर आधारित आहे.  हायपेशीया ही अलेझांड्रीया मधील प्लेटोच्या विचारांवर आधारित विद्यापीठात तत्त्वज्ञान आणि आंतराळशास्त्राची शिक्षीका असते की जिथे भविष्यातील नेते शिक्षण घेत असतात. तिच्या शिष्यवर्गात पेगन, ख्रिश्चन, ज्यु असे सर्वधर्मीय विद्यार्थी असतात. तिचे वडील त्या विद्यापीठाचे प्रमुख असतात आणि त्यांना तिच्यातील बुद्धीमत्तेची जाण असते. त्यामुळेच तिच्या विद्यार्थ्यांमधील सरदार पुत्राने तिला मागणी घातली तरी तिने लग्न करावं असं त्यांना वाटत नाही. कारण त्यांना त्याकाळच्या एकूणच पुरूषप्रधान सामाजिक परिस्थीतीची जाण असते आणि अशा पुरूषप्रधान वातावरणात तिला लग्नानंतर मुक्तपणे विचार करण्याची, बोलण्याची संधी देखील दिली जाणार नाही याची त्यांना खात्रीच असते.
 
त्याकाळी इजिप्त मधे जरी रोमन लोकांचं राज्य असलं तरी तिथे ग्रीक पेगन, ज्यु, ख्रिस्ती असे सर्व धर्मीय रहात असतात. त्यातच रोमन साम्राज्यामधे/ग्रीक संस्कृतीमधे विविध ठीकाणांहून जिंकून आणलेल्या लोकांना गुलाम म्हणून ठेवण्याची पद्धत होती. त्यामुळेच विद्वान आणि गुलाम, गरीब, अज्ञानी असा भेदभाव समाजात तयार झालेला होता. त्याचाच नेमका गैरफायदा ख्रिस्ती मिशनर्‍यांनी घ्यायला सुरूवात केली. गरीब, अज्ञानी, गुलाम लोकांना पेगन लोकांविरूद्ध फितवुन, पेगन लोकांच्या देवदेवतांची भर चौकात (अगोरा मधे) खिल्ली उडवुन ते त्यांना ख्रिस्ती धर्म स्विकारण्यास उद्द्युक्त करत. याची परिणती अलेक्झांड्रीया मधील विद्वान, विद्यार्थी आणि बाहेरचे धर्मांतरीत ख्रिस्ती लोक यांच्यातील संघर्षात होते. बर्‍याच संहारानंतर तेथील स्थानीक रोमन सरदार पेगन लोकांना अलेक्झांड्रीयातील ग्रंथालय सोडण्यास सांगतो आणि ख्रिस्ती लोकांना त्यात प्रवेश देण्याचे आदेश काढतो. यासगळ्या बरोबरच ग्रंथालयातील ग्रंथसंपदा नष्ट केली जाते, देवदेवतांचे पुतळे, सुंदर कोरीव काम असलेले खांब हे सगळेच नष्ट केले जातात. 

काही काळानंतर ख्रिस्ती धर्माचा प्रभाव वाढून पेगन धर्मावर बंदी आणली जाते आणि सर्वांनी फक्त ख्रिस्ती आणि ज्यु धर्म पाळावा असा फतवा काढला जातो. हायपेशीया तिच्या विश्वासू लोकांबरोबर अलेक्झांड्रीया मधेच राहून आपलं संशोधन, अभ्यास, अध्ययन, अध्यापन चालू ठेवते. काही वर्षांनंतर तिचे बरेच विद्यार्थी महत्त्वाच्या पदांवर बसतात. जसे त्या भागाचा रोमन सरदार, दुसर्‍या प्रांताचा ख्रिस्ती बिशप इ. दर्म्यान तिच्या वडिलांकडे जे गुलाम असतात त्यांना ती त्या संघर्षा नंतरच मुक्त करते. त्यातील एक देवास नावाचा गुलाम (की ज्याचं तिच्यावर खूप प्रेम असतं) ख्रिस्ती धर्म स्विकारून ख्रिस्ती लोकांच्या एका टोळीत सामील होतो की जी हाणामारी, जाळपोळ, इतरांना त्रास देणे, लोकांना मारणे ह्या असल्या गोष्टी धर्माच्या नावाखाली करत असते. 

पेगन लोकांना पूर्णपणे काढून टाकल्यावर ख्रिस्ती मिशनरी आपला मोर्चा ज्यु लोकांकडे वळवतात आणि त्याच पद्धतीने एक तर मरा किंवा ख्रिस्ती धर्म स्विकारा अशा पद्धतीचा दबाव आणून सर्वांना धर्मांतरीत करतात. हायपेशीया ही तिथल्या राज्यसभेत सल्लागार म्हणून असते. तिच्यावर देखील ख्रिस्ती धर्म स्विकारण्याचे दडपण आणले जाते पण ती त्याचा विरोध करून पेगन राहणेच स्विकारते. या तिच्या निर्णयावर स्थानीक ख्रिस्ती बिशप "स्त्रियांनी शिकू नये, आणि शिकल्याच तर पुरूषांना शिकवु नये, त्यांना सल्ले देवू नयेत..." अशा आशयाचे बायबल मधील लेखन वाचून दाखवतो आणि तिला ख्रिस्तीधर्म विरोधी घोषीत करतो. नाईलाजास्तव तिच्या विद्यार्थ्यांना देखील हा फतवा मानावच लागतो. अखेर हायपेशीयाची अलेक्झांड्रीयातील त्याच ग्रंथालयात (की जिथे पूर्वी पेगन लोकांची देवता होती आणि ख्रिस्ती लोकांनी ती मूर्ती पाडून त्या जागी क्रॉस ठेवलेला असतो) दगडांनी ठेचून हत्या केली जाते. हायपेशीयाच्या हत्येच्या एक दिवस आधीच तिला आकाशात सूर्याभोवती पृथ्वी, गुरू, शनी हे ग्रह इलिप्टीकल ऑर्बीटमधे फिरतात याचा शोध लागलेला असतो. पण ते ज्ञान धर्मांधांनी तिच्या केलेल्या हत्येबरोबरच लुप्त होते. त्या घटनेनंतर जवळ जवळ १२०० वर्षांनी केपलर नावाच्या पाश्चात्य शास्त्रज्ञाला हाच शोध लागला. म्हणजे धर्मांधते मुळे आंतराळशास्त्राचे खूपच नुकसान झाले आणि सगळे शोध १२०० वर्षे मागे पडले. 

त्याकाळात भारतीय उपखंडात आपले लोक खूपच प्रगत होते. पण नंतर अशाच धर्मांध आक्रमणांमुळे त्यांना देखील आपला जीव आणि ज्ञान गमवावे लागले. पेगन संस्कृती रोमन साम्राज्यांतून पूर्णपणे नष्ट होण्यास त्यांच्या सामाजिक स्तरांतील फरक कारणीभूत आहे. तुलनेने आपल्याकडे जरी चातुर्वर्ण्य व्यवस्था असली तरी समाजात एकसंधपणा होता. चारही वर्णांना एकमेकांची गरज लागत असे. त्यामुळेच हिंदू धर्म पूर्णपणे नष्ट करणे ख्रिस्ती आणि मुसलमान यांना अजुनही शक्य झालेले नाही. त्याच बरोबर आपली ज्ञान परंपरा ही मौखिक आणि श्रुती/स्मृती वर आधारीत असल्याने पुढील पीढीकडे वारसा हक्काने सहजतेने त्याचे संक्रमण होत असे. त्यामुळेच त्याचे बर्‍याच प्रमाणात जतन झाले. मेकॉलेची शिक्षणपद्धती आल्यानंतर सगळंच बदललं. पुढचा शैक्षणिक इतिहास सर्व ज्ञात आहेच.  अगोरा हा चित्रपट जरूर पहावा. त्याने पूर्वीच्या रक्तरंजीत धर्मांध इतिहासाची माहिती मिळते. तसेच जागतिक इतिहासाचे अवलोकन करण्याची प्रेरणा देखील मिळते.
हा या चित्रपटाचा दुवा