Thursday 25 November 2010

पुन्हा एकदा "ऐ मेरे वतन के लोगों"!!

दिवाळीच्या सुट्टीत वाचण्यात आलेल्या पुस्तकांत एक पुस्तक श्रीमती विनीता कामटे यांचं "टू द लास्ट बुलेट" हे एक. ते वाचल्यानंतर पुन्हा एकदा सगळं २६/११ डोळ्यांसमोर उभं राहीलं. २७ नोव्हेंबरला सकाळी साडे सहा वाजता नेहमीच्या सवयी प्रमाणे चहा पीतांना आज तक चॅनल लॅपटॉपवर लावला. एक महिनाभर मालेगाव बॉंब स्फोट तपासा संदर्भात दरवेळी काही ना काही ब्रेकींग न्यूज शीळी आणि खर्‍या अर्थाने ब्रोकन होईपर्यंत आजतक वर दाखवत असत. त्यामुळे हेमंत करकरेंचा चेहरा एकदम ओळखीचा झाला होता. त्यांच्याच नावाची ब्रेकींग न्यूज होती. न्यूज सारखी हलती असल्याने आणि ढॅण ढॅण पार्श्वसंगीतामुळे माझं लक्ष सर्व प्रथम जॅकेट घालतानाचा करकरेंचा शॉट दाखवत होते त्यावरच गेले. मग पुढचा शॉट हॉटेल ताजचा की जिथे गोळ्यांचे आवाज आणि कॅमेर्‍यांच्या आडव्या फ्रेम्स. काही आकलन करण्याचा प्रयत्न चालू असतानाच ढॅण ढॅण मधून मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्याची बातमी ऐकायला आली आणि पाठोपाठ हेमंत करकरे आणि अजुन दोन पोलीस अधिकारी, तसेच काही पोलीस शिपाई शहीद झाल्याची बातमी! तेवढ्यात सी एस टी रेल्वे स्थानकाचा शॉट. रक्ताची थारोळी आणि कण्हण्याचे आवाज. पहिले घरी फोन करून बातमीच्या सत्यासत्यतेची शहानीशा करून घेतली, मुंबईतील ओळखीचे आणि नातेवाईक यांना फोन करून पुन्हा खात्रीकरून घेतली. त्यातच बातमी आली की एक अतिरेकी जीवंत पकडला गेलाय आणि त्याचा साथीदार मारला गेलाय. मग त्याच दोघांनी सी एस टी मध्ये कसा अंदाधुंद गोळीबार केला त्याची सीसी टीव्ही फुटेजेस दाखवणं चालू. युद्धभूमी कशी असते, काश्मीरमधील लोक नक्की कशा परिस्थितीला सामोरे जात असतील याचा ट्रेलरच बघायला मिळत होता......न्यूज चॅनल वाल्यांच्या कृपेने (?).   
येवढे उत्तम क्षमता आणि शौर्य असलेले पोलीस अधिकारी अचानकपणे हल्ल्याच्या सुरूवातीलाच एकत्रितपणे एकाच ठीकाणी मारले जातात हेच मूळात अतिशय अस्वस्थ करून टाकणारं होतं. मुंबई पोलीस आयुक्तांकडून चित्रं असंच रंगवलं गेलं की हे तिघेही त्यांच्या स्वत:च्या हलगर्जीपणामुळे मारले गेले. पण त्या रात्री कामा हॉस्पीटलच्या गल्लीत नेमकं काय झालं हे विनीता कामटे यांनी पुराव्यांसहित दिलं आहे. खरी चूक ही कंट्रोलरूम मध्ये बसलेल्या राकेश मारीया यांची आहे. आता त्यांनी तसं का केलं याला कोणीच उत्तर देत नाहीये. उलटपक्षी राकेश मारीयांना मामला थंडावल्यानंतर बढतीच दिली गेली. का? कशासाठी? तर २६/११ च्या अतिशय महत्त्वपूर्ण हल्ल्याच्यावेळी स्वत: कंट्रोलरूममध्ये सुरक्षीत बसून, अतिशय शूरपणाने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता परिस्थिती हाताळायला निघालेले ते बेडर अधिकारी आणि त्यांच्या हाताखालचे शिपाई यांना अतिशय चुकीची माहीती पुरवणे, तसेच जख्मी अधिकार्‍यांना, शिपायांना कोणतीही मदत वेळेवर न पोहोचवणे हे सगळं केल्यामुळेच त्यांना ही बढती दिली गेली. हेमंत करकरेयांनी घातलेलं बुलेटप्रुफ(?) जॅकेट अतिशय तत्पर असण्याचा लौकिक असलेल्या मुंबई पोलीसांकडून अचानक गायब होतं? आणि त्या क्रूरकर्मा कसाबला फाशीची शिक्षा होऊन सुद्धा त्याला अजुनही फाशी दिली गेली नाही. कदाचित अजुन एका अपहरण नाट्याची वाट बघणार म्हणजे एका बरोबर एक फ्री या स्कीमने अफजल गुरू बरोबर कसाब फ्री किंवा कसाब बरोबर अफजल गुरू फ्री. 
ज्या तुकाराम ओंबाळेंनी स्वत:च्या छातीवर आणि अंगावर कसाबच्या गोळ्यांचा वर्षाव झेलत कसाबला पकडून ठेवलं केवळ लाठीच्या जोरावर. ........केवढी मोठी शौर्याची गोष्ट. त्या कसाबला ताबडतोब फाशीची शिक्षा अंमलात आणूनच तुकाराम ओंबाळे आणि बाकीचे शहीद अधिकारी आणि एन एस जी जवान यांना खरा न्याय मिळेल. पण सगळीच पोपटपंची चालू आहे. मेजर उन्नीकृष्णन संदर्भात अतिशय अपमानकारक असा उल्लेख  केलेल्या केरळच्या मुख्यमंत्र्यांचं विधान संतापजनक असलं तरी अजुनही ते केरळच्या मुख्यमंत्री पदावर आहेत. अशी विसंगती का? चोर सोडून सन्याशाला फाशी का? आपल्याकडच्या राजकारण्यांना हे कधी उमजणार? त्यांच्या स्वत:च्या घरात घुसून अतिरेक्यांनी त्यांना गोळ्या घालायला हव्यात म्हणजेच कदाचित जाग आली तर येईल. देशहित हेच सर्वप्रथम बाकी सगळं दुय्यम असं कधी होणार? आपण कमीत कमी या शहीदांच्या शौर्याची आठवण ठेवायला हवी आणि लगोलग कसाब, अफजल गुरू यांना फाशीची अंमलबजावणी केली जावी यासाठी सरकारवर दबाव टाकला जावा. एकवेळ दगडाला पाझर फुटेल, वाळू रगडल्यावर तेलही गळेल पण या राजकारणी लोकांचा भ्रष्टाचार आणि अल्पसंख्यांकांचं लांगूनचालन कधीच संपणार नाही असंच वाटतंय.
असा काही हल्ला झाला की सगळे अगदी आपापली भूमिका ठरवून दिल्यासारखे वागतात. अतिरेकी हल्ला झाला की राजकारणी "आम्ही हे सहन करणार नाही" च्या आरोळ्या उत्तर-पश्चिमेकडे बघून ठोकतात, तर संधीसाधू राजकारणी यासाठी हिंदूत्त्ववादी संघटनाच कशा जबाबदार आहेत याचा राग आळवतात. अतिशय थंड जनता आपल्या असमर्थतेचं प्रदर्शन ठीकठीकाणी मेणबत्त्या लावून करते......मग या मेणबत्ती लगाव कार्यक्रमात अगदी मोठमोठे बॉलीवुडचे तारे, उद्योगपती सहभागी होतात. ज्यांनी जीवन मृत्युचा थरार अनुभवलेला असतो ते सामान्य नागरीक आपापल्या रोजीरोटीच्या मागे लागतात.  हे म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यावर काही वर्षं पंधरा ऑगस्ट पांढरे शुभ्र किंवा खादीचे कपडे घालून तिरंगा हातात घेवून प्रभात फेर्‍या काढत निघणं, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर  प्रत्येक स्वातंत्र्य दिनाला ब्रिटीशांवर आगपाखड करून मोकळं व्हायचं, नंतर हळू हळू चौकांत रांगोळ्या आणि मोठा ध्वनीवर्धकांचा संच बडवणं, पुढे पुढे तर पंधरा ऑगस्ट म्हणजे प्रजासत्ताक दिन आणि सव्वीस जानेवारी म्हणजे स्वातंत्र्य दिन अशी दिवसांची आदलाबदल करणं....या स्वतंत्र भारताच्या प्रजेने आपल्याच सत्तेत (??) अजून एक-दोन सुट्ट्या उपभोगणं.........असंच काहीसं वाटतं.
सत्तापिपासू, भ्रष्ट राजकारणी; मदांध आणि पैशासाठी हपापलेले उद्योगपती विविध अधिकारी, तळहातावर प्राण ठेवून सीमेवर घुसखोर आणि सीमेच्या आत अतिरेक्यांशी लढणारे सामान्य जवान; स्वत:तच मशगुल असलेली जनता. खूप अस्वस्थ वाटतं. पूर्वी लता मंगेशकरांचं "ऐ मेरे वतन के लोगों" गाणं कुठुनही ऐकायला आलं की डोळ्यात पाणी उभं रहात असे. छाती एका वेगळ्याच अभिमानाने भरून येत असे. आता डोळ्यात पाणी उभं रहातं पण छातीत भिती आणि काळजी यांचं एक विचित्र मिश्रण असलेली भावना असते.  पुन्हा एकदा "ऐ मेरे वतन के लोगों" या गीताने काळजाला हात घालण्याची वेळ आली आहे. आहे का कोणी असं की जो/जी हे करू शकेल?
या सगळ्या निराशावादी पार्श्वभूमीवर शहीद तुकाराम ओंबाळे यांच्या कन्येने आणि कुटुंबीयांनी दाखवलेले दातृत्त्व थोर आहे. खालील बातमी वाचल्यावर उर अभिमानाने भरून आला. यातून भूखंडंचे श्रीखंड खाणार्‍या आणि सत्तेची मलई चाटणार्‍या राजकारणी लोकांना काही शिकता येईल?

Sunday 21 November 2010

विक्रम - घोटाळ्यांचे आणि निर्लज्जपणाचे!!

राष्ट्रकुल खेळांतील भ्रष्टाचाराची नांदी झाली आणि जणूकाही सगळ्या विक्रमी घोटाळ्यांचा बांध फुटला आणि सगळे सरकारी पोतड्या सोडून पटापटा बाहेर पडले. आता एक बाहेर पडल्याचा परिणाम म्हणून बाकीचे बाहेर आले की ते सहजच बाहेर पडले हा एक संशोधनाचा मुद्दा असू शकतो. पण अशा संशयास वाव आहे. कलमाडी राष्ट्रकुल मधे येवढे घोटाळे करूनही सध्या चीनमध्ये भरलेल्या एशियाडमध्ये भारताचं प्रतिनिधीत्त्व करत आहेत यातच सगळं आलं. मग ती कारवाई वगैरे बघुहो. काय घाई आहे. कदाचित कलमाडींवर कारवाई करणार असं सांगतानाच दबक्या आवाजात त्यांच्या कानात ही देखिल कुजबुज गेली असण्याची शक्यता आहे....की "कलमाडी तुम्ही निश्चिंत असा. आहो तुम्ही येवढं खाल्लंय तर किमान तोंड देखलेपणाकरता तरी आम्हाला तुम्हाला दूर ठेवलंच पाहीजे. तुम्ही निवांत चीन मधील एशियाड मध्ये तुमच्या (आणि आमच्या) मनी भोजनाची बोली लावा. इकडे आम्ही एकसे एक विक्रमी घोटाळ्यांचे बॉम्बगोळे टाकतो. आहो जनतेची स्मरण शक्ती इतकी वाईट आहे की आपल्याला काळजीचं कारणच नाही. आपण एकसे एक विक्रमी घोटाळ्यांच्या आवाजाने लोकांचे कान बधीर आणि डोळे दीपवून टाकू. म्हणजे जनतेची तसेच विरोधी पक्षांची अवस्था कोणत्या घोटाळ्याचा निषेध करू आणि कोणाला खरंच दोषी मानू अशी संभ्रमित होईल. मग आम्ही मि क्लीनना व्हॅक्युम क्लीनर सहित पाचारण करू.......पक्षाला क्लीन करण्यासाठी. तोपर्यंत जनता अवेळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नासाडीमुळे निर्माण झालेल्या तसेच मा कृषीमंत्र्यांनी वेळीच साठेबाजांना विविध विधानं करून आगाऊ सूचना दिल्यामुळे निर्माण झालेल्या महागाईचा विचार करत जीवनाचं रहाटगाडगं ओढायला सुरूवात करेल. कोणाला येवढा वेळ आहे लक्षात ठेवायला आणि जाब विचारायला?" झाले कलमाडी या कानमंत्राने एकदम सुखावले आणि बिनधास्तपणे चीनला पुढची बोली लावण्यासाठी गेले.
इकडे आदर्शचं भूत कोणी बाहेर काढलं हे अगदीच ओळखता येतंय. पण ती व्यक्ती हे विसरली की आपण शेखचिल्लीपणा करायला जातो आहोत. पण म्याडमचा वरदहस्त इतका जबरदस्त आहे की लगेच.....शूर आम्ही सरदार (म्याडमचे) आम्हाला काय कुणाची भिती? म्हणूनच येवढा २६/११ चा हल्ला झाल्यावर लोकांना दाखवण्यासाठी जरी त्यांना राजीनामा द्यावा लागला तरी पुनर्वसन योजनेआंतर्गत त्यांना केंद्रीय मंत्रीपद बहाल केले गेले.
कारगीलमध्ये शहीद झालेल्या वीरांच्या विधवांसाठी देण्यात येणार्‍या घरांच्या जागेवर चक्क राजकीय तसेच लष्करातील अधिकारी सगळेच मिळून डल्ला मारतात. भ्रष्टाचाराचा इतका कडेलोट की नेव्हीची जागा असली तरी त्यांच्याकडून ना-हरकतीचं पत्रं मिळालंय हे खोटंच भासवून मजल्यांवर मजले इतके चढले की शेवटी नेव्हीच्या सुरक्षीततेचा धोका निर्माण झाला. किती आदर्शपणे हा सगळा घोटाळा घडवून आणला आहे नाही. कोणाच्या विरूद्ध बोलण्याची सामान्य जनतेला हिंमत नाहीच. महाराष्ट्रात भूखंडाचे श्रीखंड चापण्याची सुरूवात शरद पवार मुख्यमंत्री असल्यापासूनच चालू झालेली आहे. म्हणजे जेव्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस अस्तित्त्वात नव्हती तेव्हाची गोष्ट आहे. केंद्रीय मंत्रीपदी असताना सध्याचं लवासा प्रकरणही नारायण राण्यांमुळे दाबलं गेलंय. १८ जूनलाच मटा मध्ये एक बातमी वाचली की मुंबईत सरकारी निवासाचा लाभ घेणार्‍या आय ए एस अधिकार्‍यांनी जुहु येथे "वसुंधरा" या सहकारी हौसिंग सोसायटीत अतिशय कमी दरात चांगल्या भागातले फ्लॅट्स आपल्या पदरात पाडून घेतले आहेत. आणि त्यातील अनेक जणांनी तर स्वत: सरकारी निवास स्थानात राहून  वसुंधरा मधील फ्लॅट्स मध्ये भाडेकरू ठेवले आहेत. मध्येच टू-जी स्पेक्ट्रम घोटाळा बाहेर आला की जो भारतीय स्वातंत्र्योत्तर काळातील सगळ्यात मोठा घोटाळा आहे. कितीतरी लाख कोटी रूपयांचं शासनाचं नुकसान झालं. टू-जी स्पेक्ट्रमची विक्री करताना, निविदा मागवणे, तसेच त्यावर चर्चा घडवून आणून योग्य त्यादरात टू-जी स्पेक्ट्रम विकणं अपेक्षित होतं. पण म्हणतात ना पैशाची चटक जात नाही. माजी केंद्रीय दूरसंचार मंत्री यांनी सरळ सरळ जो पहिल्यांदा बोली लावेल त्याला अतिशय कमी किंमतीत टू-जी स्पेक्ट्रम विकले. काही वर्षांनंतर आता थ्री-जी स्पेक्ट्रमची गरज पडल्याने त्याची विक्री व्यवस्थित निविदा मागवून केली. टू-जी स्पेक्ट्रम विकल्यावर योग्य दर न घेतल्याने सरकारी तिजोरीचे नुकसान झाले.
भारतीय राजकारणी आणि नेते मंडळी यांनी तर भ्रष्टाचार, घोटाळे आणि निर्लज्जपणा यांचे प्रचंड मोठे विक्रम करण्यात गुंतले आहेत. एका मागून एक भ्रष्टाचार बाहेर येत असल्याने सामान्य जनतेला नक्की कशाचा पाठपुरावा करून दोषींवर कारवाई करावी हेच सूचत नाही. तिथंच सगळं संपतं. येवढं सगळं होउन देखिल मेरा भारत महान! "जय हो" भ्रष्टाचारी राजकीय नेत्यांचा. 

Friday 12 November 2010

पीपली लाईव्हजेव्हा एखाद्या चित्रपटात गोष्ट किंवा कथेची मांडणी हीच हीरो असते आणि बाकीचे काम करणारे बाजूल पडतात....तेव्हा ते खरं पडद्यामागच्या टीमचं यश असतं. पीपली लाईव्ह मध्ये आमीर खानचं दर्शन असंच होतं. पीपली लाईव्ह खरंतर तसा उशीराच पाहण्यात आला. पण चित्रपट संपल्यानंतर पहिलं वाक्य ओठांवर आलं तेच: "आमीर खान झिंदाबाद". चित्रपटाचा विषय तसा गंभीर! म्हणजे शेतकरी आत्महत्त्यांचा. संपूर्ण चित्रपट प्रचंड विनोदी अंगाने पुढे सरकत जातो. एखादा निष्णात डॉक्टर जसा पेशंटच्या घशाखाली कडू कडू औषध गोड आवरणाच्या माध्यमातून उतरवतो अगदी तसाच आमीरखानने इतका गंभीर विषय पण विनोदाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडला आहे. हीच तर प्रसिद्ध आमीरखान स्टाईल! जेवढे मला दिल चाहता है, तारे जमीन पर, थ्री इडीयट्स हे त्याचे चित्रपट आवडले होते तेव्हढाच पीपली लाईव्ह पण आवडला. चार्ली चॅपलीनच्या विनोदाला जशी दु:खाची झालर असायची, प्रत्येक विनोदी चित्रपटात काही ना काही गंभीर संदेश असायचाच तसंच आमीर खानचं आहे. प्रसारमाध्यमांचं सध्याचं अतिरेकी रिपोर्टींग आणि त्यांची समाजच्या सर्व थरांत असलेली दहशत अगदी अचूक टीपली आहे. मला तर पदोपदी दिपक चौरासिया आणि बरखा दत्त यांचीच आठवण येत होती. संधीसाधू राजकारणी, बिनडोक वार्ताहर कसे असतात त्याचप्रमाणे असवंदेनशीलता प्रसारमाध्यमांच्या प्रतिनीधींमध्ये कशी असते याचं सुयोग्य चित्रण पीपली लाईव्हमध्ये आहे. 
नथ्थु आणि बुधिया या दोन शेतकरी भावंडांची पीपली लाईव्ह ही कहाणी. त्यांचं वडिलोपार्जीत शेत बॅंकेचं कर्ज थकल्याने बॅंकेलाच विकावं लागणार असतं. त्यासाठी गवतील राजकीय नेत्याकडे जाऊन सुद्धा मदत मिळत नाहीच उलट आत्महत्त्या करून "आत्महत्त्या केलेल्या शेतकर्‍याच्या कुटुंबीयांना एक लाख रूपये शासनाकडून मिळतात" ही माहीती पुरवली जाऊन आत्महत्त्या करण्याचा सल्ला दिला जातो. जेव्हा नथ्थु आत्महत्त्या करणार ही बातमी एका स्थानिक वर्तमानपत्रात छापून येते त्यावेळी त्या वृत्तपत्रचा परवाना काढून घेतला जातो पण हीच बातमी जेव्हा इंग्रजी चॅनलचे लोक टीव्हीवर लाईव्ह दाखवतात तिथुन पुढे खर्‍या विनोदाला सुरूवात होते. नथ्थु आत्महत्त्या करतो का? तो मेल्यावर त्याच्या घरच्यांना शासनाकडून एक लाख रूपयाचा मोबदला मिळतो का? त्यातून कोणाच्या अयुष्यात किती फरक पडतो? त्यांचं वडिलोपार्जीत शेत वाचतं का? यासगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आणि आमीर खानला शाबासकी देण्यासाठी पीपली लाईव्ह हा चित्रपट नक्की पहावा. आपल्या मा (माजलेल्या) केंद्रीय आणि राज्यस्तरीय कृषीमंत्र्यांनी हा चित्रपट पाहून काय बोध घेतला हा एक संशोधनाचा मुद्दा बनु शकतो.

Monday 1 November 2010

चला उजळून निघुयात!


ह्यावेळी दिवाळी साजरी करताना एक पणती घरात आणि मनात आपल्या अशा बांधवांसाठी लावूयात की जे काही ना काही कारणाने कोणत्याच सणाचा आनंद उपभोगू शकत नाहीत. एक पणती विश्वशांतीसाठी, एक पणती आपल्या आदिवासी भागातील बांधवांसाठी, एक पणती आपल्या देशातील रस्त्यांवर राहणार्‍या जनतेसाठी, एक पणती वृद्धाश्रमात राहणार्‍या आजी-आजोबांसाठी, एक पणती देशातील लाखो अनाथ मुलांसाठी. आपल्याला फक्त एकच पणती लावायचीय या सगळ्यांच्यासाठी.......असे एक लाख लोक जरी निघाले तरी अशा लक्ष पणत्यांनी आपलं मन उजळून निघेल. खर्‍या दिवाळीचा आनंद मिळेल! फटाके लावून पर्यावरण आणि ध्वनीप्रदूषणाबरोबरच आपण पैशांचाही अपव्यय करतो आहोत. त्यामुळे ह्यावेळी ते न करून आपण पैशाचा अपव्यय टाळू शकतो. आपल्या आजूबाजूच्या सगळ्यांना दिवाळीच्या आनंदात सहभागी करून घेऊयात. चला उजळून निघुयात!

उत्सव हा दिपावलीचा।
पावित्र्य अन मांगल्याच॥
स्मरून नाते मैत्रीचे।
मनी प्रेमभाव जपण्याच॥

उत्सवात दिपावलीच्या।
सारं काही आठवत॥
ज्योतीत पणतीच्या पाहताना।
नजरेत बालपण उभं राहत॥

त्या सार्‍या आठवणी।
दाटून आल्या या क्षणी॥
शब्दांतून अवतरल्या।
कवितेच्या रूपानी॥

समस्त वाचक आणि ब्लॉगर्सना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
ही दिपावली आपल्या सगळ्यांना सुख, आरोग्य आणि समृद्धी देवो!

(या कवितेची पहिली दोन कडवी कुठेतरी वाचली होती. त्याला शेवटचं कडवं मी जोडलंय.)