Tuesday 11 August 2015

पीएचडी - अपेक्षा आणि वास्तव (भाग २) : पीएचडी गाईड

 पीएचडी - अपेक्षा आणि वास्तव (भाग १) : प्रस्तावना
पीएचडी चे गाईड ही एक अशी व्यक्ती असते की जिच्यामुळे त्या पीएचडी विद्यार्थ्याचं आयुष्य एकतर एकदम सुकर होतं किंवा अतिशय वाईट/अवघड होतं. पीएचडी गाईडचा रोल म्हणजे विद्यार्थी योग्य मार्गावरून जातो आहे की नाही हे पहाणे आणि गरज लागल्यास योग्य तो मार्ग दाखवणे असा असतो. पण प्रत्यक्षात परिस्थीती विविध प्रकारांनी नटलेली असते. ह्यावेळी मला जसपाल भट्टींची एक मालिका आठवते आहे की ज्यामधे एक पीएचडीचा विद्यार्थी त्या गाईडची सगळी वैयक्तिक कामं करत असतो (स्वत:च्या पीएचडीच्या अभ्यासाशिवाय). आपल्या राजधानीतील एका सुप्रसिद्ध विद्यापीठात अशा पद्धतीने पीएचडी करणारे बरेच विद्यार्थी पाहिल्याचे अनेक लोकांनी सांगीतले. काहीवेळा विद्यार्थी काहीही काम करत नाही आणि बहुतांश काम हे त्यांचे गाईडच करून देतात. अशा दोन केसेस मी ऐकल्या आहेत की ज्यांच्या गाईडने त्या त्या विद्यार्थ्याने केलेलं काम स्वत:च्या नावावर (विद्यार्थ्याचं नाव पेपरमधे न घालता) प्रसिद्ध केलें आणि त्यामुळे त्या विद्यार्थ्याला काहीच क्रेडीट मिळालं नाही. नविन प्रश्नावर सगळं नविन काम पुन्हा पहिल्यापासून करावं लागलं. काही केसेस मधे गाईडला काहीच येत नसतं आणि विद्यार्थीच मूळात हुशार असतो आणि सगळं निभावून नेतो. ह्यात कुठेही अतिशयोक्ती नाही....हे वास्तव आहे. बहुतांश पीएचडी गाईड्सची अपेक्षा अशी असते की मी जे सांगतो तेच करायचं बाकी काही करायचं नाही. पण यातून पीएचडीचा मूळ हेतूच साध्य होत नाही. कारण पीएचडी करण्यामागचा मूळ हेतू हा त्या विद्यार्थ्याला एक स्वतंत्र संशोधक बनण्याचे ट्रेनींग/अनुभव मिळणे हा आहे. एखाद्या विषयाचा ब्रेड्थ आणि डेप्थने  शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास कसा करायचा हे शिकणे आणि हे शिकताना एखाद्या प्रश्नाची आधी कधीच न मांडलेली उकल शोधून काढणे म्हणजे पीएचडी करणे. आता जर सगळंच गाईड सांगणार असेल तर विद्यार्थी स्वतंत्रपणे विचार करायला कधी शिकणार?

अनेकवेळा गाईड विद्यार्थ्याला मुद्दाम गोंधळात टाकण्यासाठी सरळ सरळ काहीच बोलत नाहीत. आजच्या मिटींगमधे जी चर्चा झाली असेल त्याचा दुसर्‍या दिवशीच्या मिटींगमधील चर्चेशी काहीही संबंध नसणे, आधीच्या मिटींग मधील ठरवलेल्या गोष्टी विसरणे आणि त्यामुळे पुढच्या मिटींगमधे सुद्धा गाडी फारशी पुढे जातच नाही. पीएचडी गाईड आणि पीएचडीचा विद्यार्थी यांचे सुर जुळणे हे खूप महत्त्वाचे असते आणि असे जुळलेले सुर खूप कमी पहायला मिळतात. गाईड हा प्रकार विद्यापीठ ठरवतं. प्रत्येक विद्यापीठाच्या पीएचडी संशोधन करण्यासाठी आणि ते मांडण्यासाठी काही विशिष्ट पद्धती असतात. त्या पद्धतींप्रमाणे सगळं चालू आहे ना, होत आहे ना हे पाहण्यासाठी विद्यापीठाने गाईड दिलेला असतो. त्याच बरोबर गाईडला त्या विषयातील आपले ज्ञान वाढविण्याची, आपली संशोधन क्षमता वापरण्याची संधी मिळते. गाईड जर वयाने तरूण आणि फारसा अनुभवी नसेल तर त्याचेही फायदे आणि तोटे असतात.

गाईड वयाने तरूण असण्याचे फायदे असे की विद्यार्थ्याला कामाची पूर्ण मोकळीक मिळते (ईगो ईश्यू फारसा येत नाही), पीएचडीचे काम लवकर संपण्याची खात्री देता येते (कारण जितक्या पीएचडीच्या विद्यार्थ्यांना तुम्ही मार्गदर्शन कराल तितका तुमचा अ‍ॅकॅडमीक्स मधे वकुब वाढतो) पण विद्यार्थ्याला संशोधनाविषयी फारशी माहिती नसेल तर मात्र त्या विद्यार्थ्याचा बोर्‍या वाजू शकतो, संशोधनाचा, पीएचडीचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा फारसा अनुभव नसल्याने अशा तरूण, अननुभवी गाईडचा विद्यार्थ्याला फारसा उपयोग होत नाही. त्यांचे संशोधन वर्तुळात फारसे कॉन्टॅट्क्स नसतात. त्यामुळे पीएचडी मिळाल्यावर पुढे रिसर्च पोझीशन मिळवणे किंवा पोस्ट-डॉकला त्यांचा फारसा उपयोग होत नसतो.
गाईड रिसर्च फंडींग मिळविण्यात माहिर असावा लागतो. फंडींग असेल तरच संशोधन होऊ शकतं त्यामुळे कॉन्टॅक्ट्स असणं हे फार महत्त्वाचं की जे तरूण, अननुभवी गाईडला क्वचित जमतं. बर्‍याचवेळी हे गाईड लोक स्वत:कडे फंडींग असेल तर विद्यार्थ्याचा विचार न करता स्वत:ला हवा तितका वेळ संशोधनाचं काम करण्यासाठी घेतात. त्यावेळी त्यांना वेळीची फिकीर नसते. विद्यार्थ्याला सांगत राहतात की तुम्ही पीएचडीला किती वेळ घेतला हे महत्त्वाचं नाही तर काय काम केलं हे महत्त्वाचं. कामाची क्वालीटी महत्त्वाची आहेच पण तुम्हाला लागणारा वेळ देखील महत्त्वाचा आहे. क्वलीटीचं काम जास्तीत जास्त कॉन्फरन्स आणि जर्नल्स पब्लीशींग केलेलं असेल तर जास्त वेळ लागला तरी हरकत नाही. पण यापैकी काहीही न होता तुमच्या पीएचडीला वेळ लागला असेल तर ते सगळं तुमच्या रिझ्युमे मधे रिफ्लेक्ट होतं. जर एखाद्या गाईड कडचं फंडींग संपत आलेलं असेल किंवा त्याला तो विद्यार्थी नको असेल तर असे गाईड लोक त्यांच्या विद्यार्थ्यांना तुझी पीएचडी लगेच संपव आणि आता पुढच्या सहा महिन्यात तुला थिसीस सबमीट करावा लागेल असं म्हणून मागे लागतात.
यासारख्या अनेक कारणांमुळे पीएचडी गाईडचा रोल पीएचडी करण्यात महत्त्वाचा होऊन बसतो. ९५% गाईड्स ना आपल्याकडे येणार्‍या विद्यार्थ्यांनी आपण जे सांगू तेच करावं अशी अपेक्षा असते कारण त्यांच्याकडे विशिष्ट संशोधनासाठी फंडींग असतं, त्यांना संशोधनाचा अधिक अनुभव असतो आणि येणार्‍या विद्यार्थ्याला संशोधनाविषयी फारसं माहित नसण्याचीच शक्यता ९९% असते. त्यामुळे गाईड्स ने हे गृहीत धरलेलं असतं की पीएचडीचा विद्यार्थ्यी त्यांच्या आज्ञेबाहेर नसणार. इथेच खूप मोठी गोची होते. जर गाईड समजुतदार असेल तर विद्यार्थ्याच्या फायद्यासाठी विद्यार्थ्याला स्वतंत्रपणे विचार करण्याची मुभा दिली जाते आणि आवश्यक तिथेच गायडन्स दिला जातो. पण जिथे एखाद्या विद्यार्थ्याला संशोधन काय करायचंय आणि स्वतंत्रपणे स्वत:चा विचार करण्याची सवय असेल तर मात्रं गाईडशी बेबनाव होऊ शकतो. आणि मग त्या विद्यार्थ्याचे हाल कुत्रं खाणार नाही असे होतात. त्यामुळे शक्यतो सुवर्ण मध्य गाठण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे पूर्णपणे गाईड जे सांगेल त्यावरच अवलंबुन न राहता, स्वत: स्वतंत्रपणे काम आणि विचार करायचा पण गाईडला असं भासवायचं की आपण सगळं त्यांच्या संमतीनेच करतो आहोत. खूप जोखमीची गोष्ट असते ही. त्यामुळे ९६% विद्यार्थी गाईड जे सांगेल तेच आणि फक्त तेच करतात. त्यामुळे पीएचडीच्या प्रत्येक तोंडी परीक्षेत, प्रेझेंटेशन मधे अशा विद्यार्थ्यांचे गाईड्सच उत्तरं देतात. त्याचा परिणाम असा देखील होऊ शकतो की ती व्यक्ती पीएचडी नंतर सुद्धा गाईडवरच पूर्णपणे अवलंबुन राहते.  यामुळे पीएचडी गाईड आणि त्यांचा विद्यार्थी यामध्ये काहीवेळा गुरू-शिष्य, देव-भक्त यासारखे नाते तयार होताना दिसते की जे विद्यार्थ्याच्या स्वतंत्र संशोधक बनण्यास मारक ठरते. काहीवेळा गाईड वयस्कर असतील त्यामुळे देखील अडचणी येतात कारण ते त्या विषयाशी अपडेटेड नसू शकतात. काहीवेळा गाईडचा विषय पूर्णपणे वेगळा असतो आणि त्यांना विद्यार्थ्याच्या विषयाशी काहीही देणेघेणे नसते. त्यावेळी सुद्धा अडचणी येऊ शकतात.

या अडचणींवर मात करण्याचा एक उपाय असतो तो म्हणजे पिअर-रिव्ह्युड (आपल्या क्षेत्रातील इतर व्यक्तींनी वाचून मान्यता दिलेले) कॉन्फरन्सेस आणि जर्नल्स मधे आपले संशोधन पेपरच्या स्वरूपात पब्लीश करणं. पेपर पब्लीशींग हा खूप महत्त्वाचा आणि मोठा विषय असल्याने तो मी स्वतंत्रपणेच लिहीणार आहे. काही गाईड्स स्वत:च आपल्या विद्यार्थ्याच्या नावाने पेपर्स लिहीतात आणि पब्लीश करतात. काही गाईड्स कुठलंच योगदान न देता नुसतंच आपल्या विद्यार्थ्याच्या पब्लीशींग मधे स्वत:चं नाव घालतात. काही जण पूर्ण तयार झालेला पेपर वाचतात आणि ठरवतात की आपलं नाव त्यात घालायचं की नाही. गाईड लोकांची भाषा देखील विद्यार्थ्यांना कळायला वेळ लागतो. एखाद्या विद्यार्थ्याला एखादी गोष्ट ताबडतोब सबमीट करायला सांगणं याचा अर्थ "तू हे कालच करायला हवं होतंस" असा असतो तर गाईड स्वत: एखादी गोष्ट ताबडतोब करेन असं म्हणतो त्यावेळी "त्याला जितका हवा तितका वेळ तो घेणार" असा अर्थ असतो.
शक्य असल्यास पीएचडी गाईडशी पंगा न घेताच काम करावं. पण पीएचडी गाईड ही एक अशी व्यक्ती असते की जिच्याशी मैत्रीत राहून देखील चार हात दूर रहावं.