Sunday, 9 May 2010

माझे गरूडपुराण


बर्‍याच जणांना गरूडपुराण म्हणजे नक्की काय हे माहीती असण्याची शक्यताच आहे म्हणून ही प्रस्तावना: आपल्या पूर्वजांनी हिंदूधर्मात सर्व विषयांवर आधारित साहित्य (अगदी कामसूत्रा पासून ते गरूडपुराणा पर्यंत) लिहून ठेवलंय. गरूडपुराण हे माणूस मेल्यानंतर पुढे त्याचं म्हणजे आत्म्याचं काय होतं या विषयावर आधारित आहे. म्हणूनच गरूडपुराण हे अशुभ किंवा निषिध्द पण मानतात. त्यामुळेच ते पुराण कोणाला माहीती नसतं. आपल्याकडे सगळं गोड-गोड म्हणजेच गुडी-गुडी लागतं. अगदी एखाद्या चांगल्या बॉलीवूड पटाचा शेवट जरी दु:खी असेल तर तो पडतो किंवा दिग्दर्शकांना तो बदलून आनंदी-आनंद गडे करावा लागतो. पण मला हे पटत नाही. या लेखात आयुष्यातील जे अंतीम सत्य आहे तेच समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. मृत्यू पासून पळून जाण्यात काहीच अर्थ नाही. उलट त्याला आपण जेवढ्या प्रगल्भतेने सामोरे जाऊ तेवढे आपले जगणे सुखाचे होते.  मोठ मोठ्या लोकांना याची महती पटली आहे. अगदी आचार्य अत्रे, व पु काळे यांनी सुद्धा त्यावर त्यांच्या त्यांच्या स्टाईल ने विनोद केले आहेत. कोणाचा शेवट कसा होईल कोणीच सांगू शकत नाही. मी दहावीत असताना वर्गातील एका मैत्रीणीचे वडील अपघातात गेले. तिला त्या दिवशी आम्ही सगळे (मित्रं) भेटायला गेलो तो माझा अशा घटनेशी झालेला प्रत्यक्ष असा पहिला सामना. तोपर्यंत सगळं फक्त ऐकूनच. अगदी लहान असताना तर रस्त्यावरून कोणाची प्रेतयात्रा जरी दिसली तरी मला घरात बसून रडायला यायचे. हे सांगण्या मागचा हेतू हाच की माझा वयाच्या तिशीच्या अगदी उंबरठ्या पर्यंत (अगदी तिशीच्या आतच म्हणाकी) कुठुन कुठे प्रवास झाला ते लक्षात येईल.  तो प्रवास कसा आणि का झाला ह्यावरून इतरंना थोडं धैर्य मिळालं तर मिळेल म्हणून हा लेख. माझं गरूडपुराण हे माणूस मरताना काय होतं या अनुभवावर आधारित आहे.

परवाच आमचे एक लांबच्या नात्यातील पण जवळच्या संपर्कातील मामा कर्करोगाने निवर्तले. मी आपला काल सांत्वनासाठी मामींना फोन लावला. बोलता बोलता लक्षात आलं की सगळे डायलॉग तेच फक्त व्यक्ती बदलतात. एकदम २००३ साल आठवलं. आमची आई संधीवाताने आंथरूणाला खिळून होती. तब्बल साडे आठ वर्षे! बाबा आणि मी तिचे सगळं करायचो. कधी अडचण असेलच तर बहीणी येऊन-जाऊन असायच्याच. माणूस मरतो म्हणजे नक्की काय होतं ते अगदी जवळुन आणि स्लोमोशन मध्ये अनुभवलं. त्याच परिस्थितीत कोण खरंच आपले आणि कोण खरे परके हे सुद्धा कळून आलं. परमेश्वरसुद्धा सगळं व्यवस्थित दाखवत असतो. आपली समजायची आणि बघायची कुवत लागते.

आईला फेब्रुवारी २००३ मध्येच एक बेड सोर्स झाला होता. असं म्हणतात की अंथरूणाला खिळलेल्या व्यक्तीला बेडसोर्स झाले म्हणजे समजावे की त्या व्यक्तीचा शेवट जवळ आला. हे मला घरात झालेल्या घटनेमुळेच समजले. आई स्वत: आयुर्वेदाचार्य असल्याने (फारशी प्रॅक्टीस न केलेली) तिला तर हे सगळं उघडपणे समजत होतंच.म्हणूनच ती कदाचित माझं लग्नं पटापट कोणाशीतरी (म्हणजे सुयोग्य व्यक्तीशीच.......त्याचीच तर मारामार ना! त्यावर एक वेगळं "विवाह पुराण" लिहीता येईल. सध्या आपण माझ्या गरूडपुराणावरच कॉन्सनट्रेट करूयात. ) लावून द्यावं (स्वत:च्या डोळ्यासमोर) असा विचार करत असावी. असो.
बेडसोर्स मुळे हळूहळू ते इन्फेक्शन सगळ्या शरीरभर पसरत चाललेलं होतं. आम्ही रोज ती बेडसोर्स ची जखम धुवुन आणि जखम भरून येण्यासाठी असलेली पावडर त्यात भरून मलमपट्टीकरायचो. तरी ती जखम जास्तच खोल होत चालली होती. आईचा चेहरा तर कधी प्रचंड थकलेला तर कधी अतिशय उजळलेला दिसायचा. खाणं तर जवळ जवळ बंदच झाल्या सारखं होतं. कुठे २-३ चमचे पेज खाल्ली तर खायची. छातीत कफ वाढत होता. ही सगळी जाणार्‍या माणसाची लक्षणं आहेत हे मला नंतर समजलं. तिचं बोलणं पण खूप कमी झालं होतं. अगदी आवश्यक तेवढंच बोलायची नाहीतर सगळा संवाद हातवारे करून चालायचा. त्यादिवशी सुध्दा मी शाळेत निघाल्यावर तिने मला हात केला आणि मान डोलावून अच्छा केला.

दुसरा तास चालूच झाला होता आणि मी वर्गात पोहोचल्यावर मला घरून फोन आलाय आणि घरी ताबडतोब बोलावलंय असा निरोप मिळाला. माझ्या छातीत धस्स झालं. पण मी तशीच घरी पोहोचले. नाचणीची पेज पितांना तिला खोकल्याची उबळ येवून ती पेज तिच्या छातीत गेली असंच आम्हाला वाटलं. तिला बोलता येत नव्हतं, चेहरा आणि मान सारखी वळवुन ती काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतेय असं आम्हाला वाटत होतं. त्यावेळी आमच्या आईची आई जिवंत होती. आम्ही तिला निरोप दिला. पण मुंबईहून तिला यायला किमान ४ तास तरी लागणारच होते. आईच्या तोंडातून खूप विचित्रं आवाज येत होता. तिचा चेहरा पहावत नव्हता. मला तर सुरूवातीला उलटीच झाली ते सगळं पाहून पण मग मी स्वत:ला सावरलं. तोपर्यंत बहीणी पण घरी पोचल्या.
हळू्हळू ती थोडी नॉर्मल होते आहे असं वाटायला लागलं. त्यादिवशी रात्री मी तिच्या उशाशी बसून होते. ती फक्त एकच म्हणाली करूणाष्टकं वाच. मी रामरक्षा, करूणाष्टकं सगळं पुन्हा पुन्हा तिला झोप लागे पर्यंत म्हणत तिच्या उशाशी बसले होते. तिला झोप लागल्यावर मी पण पडले. पहाटे पहाटे मला अचानक एका विचित्रं अशा आवाजाने जाग आली. उठुन पहाते तो आईला पुन्हा त्रास चालू झाला होता. त्यानंतर ती जी कोमात गेली ती कधीच बाहेर आली नाही. पण तिच्या घशातून अतिशय विचित्रं आवाज येत होता आणि तिचे डोळे पण उघडे होते. त्यात काही ओळख नव्हती. हे असं अखंडपणे रात्रं दिवस चालू होतं.

दिवसा लोकं भेटायला यायचे म्हणून बाबांना आम्ही रात्री झोपवायचो. रात्रीची वेळ मी, माझी मधली बहिण आणि धाकटा मामा अशी तिघांनी वाटून घेतलेली असायची. मोठ्या बहिणीकडे सगळी मुलं राहीली होती आणि दुसरी मधली बहीण तिला ४ महिन्यांचा मुलगा असल्याने त्याच्यात गुंतेली होती. रात्रीच्या वेळी त्या सगळ्या वातावरणात एकटं जागं रहाणं पण कठीण त्यामुळे आम्ही दोन दोन आलटून पालटून जागायचो. पण माझी तर झोपच उडाली होती. शरीराला विश्रांती हवी म्हणून मी पडायची कारण दिवसा मला स्वयंपाक घरात उभं रहायला लागायचं. अशावेळी लोकांना पण समजत नाही की कोणत्यावेळी भेटायला जावं, किती वेळ बसावं ते. माणसांचे वेगवेगळे नमुनेच बघायला मिळतात.
डॉक्टरांनी सांगीतलं होतं की हॉस्पीटल मध्ये ठेवून उपयोग नाही. त्यांना सगळी कडून नळ्या लावून आय सी यू त ठेवतील. कोमा मधला पेशंट अशाच अवस्थेत कितीही काळ राहू शकतो. तीन दिवसापासून ते तीस वर्षं कितीही काळ. याला फक्त वाट पहाणे येवढंच आपण करू शकतो. सकाळ संध्याकाळ येऊन डॉक्टर तिला झोपेचं इंजक्शन देत होते पण तिचं शरीर ते इंजक्शन सुद्धा स्विकारत नव्हतं. इंजक्शनची टोचलेली सुई जशी बाहेर काढली जाईल तसंच ते इंजक्शनचं द्रव कारंज्यासारखं बाहेर यायचं. कशाचाच उपयोग होत नव्हता.

मला एका ओळखीच्यांनी सांगीतलं तिला काहीतरी काळजी असणार म्हणून तिचा जीव अडकलाय. मला लक्षात आलं काय काळजी असेल ते. त्यांनी मला हे सुध्दा सांगीतलं की जर तुमच्या नातेवाईकांपैकी कोणी जर तिच्या कानात "मुलीच्या लग्नाची काळजी करू नकोस ते आम्ही बघु", तर कदाचित ती जाईल. उपस्थित सगळ्यांमध्ये ही बातमी पसरली. कोणीच पुढे येऊन बोलायला तयार नाही. मग मीच ठरवलं आणि मनाचा हिय्या करून तिच्या जवळ गेले आणि कानात बोलले, "माझी आणि बाबांची काळजी करू नकोस आम्ही सगळं व्यवस्थित करू. माझं लग्नं पण मी व्यवस्थित करेन". तरी तिच्या स्थितीत फरक नव्हता. मग वाटलं की बरीच वर्ष आंथरूणाला खिळल्याने तिला कुलदैवतांना जाता आलं नाही. मग मी तेसुद्धा तिला सांगीतलं की तुझ्या वतीनं मी सगळीकडे जाऊन येईन. पण तू आता नि:शंक मनाने पुढच्या प्रवासाला लाग.

तसं मी आमच्या कुलदैवतांच्या पुण्यातील मंदिरांत जाऊन पण देवांना सांगीतलं. माझ्या मैत्रीणीच्या सासर्‍यांनी दिलेलं गंगाजल तिच्या तोंडात घातलं आणि अर्ध्यातासात तिची घर घर थांबली. तिचा चेहरा शांत दिसत होता. तशातच पुढे तीन दिवस तिने काढले आणि चौथ्या दिवशी तिचा प्राण गेला. "मरावे परी नेत्ररूपी उरावे" यासाठी म्हणून आम्ही पुण्यातील एका नेत्रंपेढीला आधीच संपर्क करून चौकशी करून ठेवली होती. पण तेथिल डॉकटरांनी दाखवलेल्या निश्काळजीपणा मुळे ते सुद्धा साध्य होवू शकलं नाही.
माणूस जातो म्हणजे नक्की काय होतं, त्या व्यक्तीचा आत्मा कुठे जातो हे सगळे प्रश्नं माझ्या मनात घर करून होते. कदाचित मी ते सगळं बोलायला आणि गंगाजळ टाकल्यावर आईची घरघर थांबायला - अगदी कावळा बसून फांदी तुटणे इतकाच जरी योगायोग धरला तरी मला कुठेतरी या सगळ्यावर विश्वास ठेवावा असंच वाटलं. कारण मी ते सगळं अनुभवलं आहे. आई गेल्याने आमच्या घरात आणि आयुष्यांत एक प्रचंड पोकळी निर्माण झाली होती. सगळीच कामं संपल्या सारखं रिकामं रिकामं वाटत होतं. दरम्यान आप-पर ओळखीने आपणच आपले सावरलेले बरे हे समजल्याने दुसर्‍यावर विसंबुन न राहता आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरूवात केली. यथावकाश मी आणि बाबा कुलदैवतांना बोलल्या प्रमाणे जावून आलो. मला एकच समाधान की आई पुढच्या प्रवासास जाताना नि:शंक आणि समाधानी होती.
कोण म्हणतं ......"सगळ्यांचं आयुष्यं सेम असतं?" प्रत्येकाचं आयुष्यं हा एक ग्रंथ असतो. आपण वाचायला शिकायची खोटी आहे तुलना न करता.

Monday, 3 May 2010

लॅरी पेज येती अत्यानंदबाबा मठा..........

[गुगलने बझ्झ सेवा चालू केल्या पासून आपल्या अत्यानंदबाबांनी त्यांचा बझ्झ आपला मठ उघडला. त्या मठात सगळ्यांना प्रवेश. त्यामुळे हळूहळू भक्त गण जमत गेले. त्याच मठात मी पण जायला सुरूवात केली. रोज काकडारती आणि शेजारती चुकवतच नाही. त्यामुळे काकडारती नंतर बुवांना (आणि उपस्थित भक्त गणांना) स्पेशल फिल्टर कॉफी पण मी द्यायला सुरूवात केली. तर काल माझ्या स्वप्नात अत्यानंदबाबा बझ्झ आपलं मठात गुगलचे खुद्द लॅरी पेज आले आणि मठात ..........लॅरी पेज ने येतानाच बहुधा डायरेक्ट ट्रान्स्लेशन इंग्रजी ते मराठी असं सॉफ्ट्वेअर मॅनेज केलेलं होतं त्यामुळे संभाषण मराठीच आहे. कदाचित त्यांना भाषांतर सोपं असेल पण संस्कृती ट्रान्सफॉरमेशन काही जमलेलं दिसत नाहीये म्हणून बरेच प्रश्न त्यांना पडलेत.]

{ताजा कलम: हे पोस्ट पूर्ण वाचल्यावर आपल्याला काहीही समजलं नाही आणि जर डोक्यात खूप गोंधळ निर्माण झाला तर त्याला लेखिका जबाबदार नाही. }

देका: नमस्कार मंडळी या गप्पा मारायला.
अल: नमस्कार बुवा ही घ्या फिल्टर कॉफी (_)० (_)०
लॅरी: हाय फोक्स, मी लॅरी पेज. धन्स फॉर कॉफी. अगदी गरज होती मला.
अल: ओह लॅरी, आज इकडे कसे काय तुम्ही?
लॅरी: काय आहे की आम्ही बझ्झ चालू केल्यावर आमच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे बझ्झ ची प्रसिध्दी चेक करण्यासाठी आमच्या मेन ऑफीसच्या (अमेरीकेत) एका रूम मध्ये आम्ही सर्व भिंतींवर मोठा वर्ल्ड मॅप लावला आहे. त्या मॅपला दिवे जोडले आहेत. जस जसा बझ्झ वापरला जाईल तसतसे दिवे लागत जातात. आणि आम्हाला ऑन द फ्लाय कोण कोठून बझ्झ वापरतंय हे समजतं.
कांक, आप, हेओ: पण मग आज तुम्ही इथे कसे काय?
लॉरी: तर त्या मॅप वर गेले बरेच दिवस आम्हाला सारखे दिवे लुकलुकताना दि्सायला लागले. कुठुन कुठुन दिवे लागायचे. पहिला दिवा मुंबईच्या पश्चिमेला लागायचा. मग एकदम दोन साऊथ मध्ये. त्यानंतर अमेरिकेत, पुन्हा मधुनच मुंबई, पुणे आणि जास्तीत जास्त महाराष्ट्र, कर्नाटक, हैद्राबाद, अमेरिका, नॉर्वे, इटली असे वेगवेगळ्या ठिकाणांहून दिवे लुकलुकायला लागले. सुरूवातीला आम्ही दुर्लक्ष केलं. पण नंतर आम्हाला अल-कायदा च्या दहशतवादी कट शिजण्याची शंका यायला लागली.
आप: एकदम अल-कायदा?
लॅरी: हो, कारण तुमच्या बझ्झ मध्ये बर्‍याच वेळा अल, अल असं दिसायला लागलं. मग आम्ही आमचे अननोन आयडेंटीटी वाले काही कर्मचारी तुमच्यातील बर्‍याच जणांच्या बझ्झ वर सोडले.
कांक: ओह म्हणजे ते करमचंद तुमचे आहेत तर.
अल: हो ना, मी तर रोज सकाळी त्यांना घालवून द्यायची पण ते आपले पुन्हा दुसर्‍या दिवशी हजर असायचे.
लॅरी: आम्ही त्यांना तशी सक्त ताकीदच दिली होती. अल-कायदा चा प्रश्न होता ना.
आप, आका, सपा, विपि, कांक, देका: हंम, आमच्या अल-चा प्रश्न आला का!
देका: पण नंतर नंतर तर त्यांना कितीही घालवून देण्याचा प्रयत्न केला तरी ते जात नव्ह्ते की नाही अल?
अल: हो ना.
आप, विपि: मग आम्हीच अल ला सांगीतलं की दुर्लक्ष कर म्हणून आणि काही पर्सनल लिहू नको.
लॅरी: बरोबरे कसे जातील? आम्ही त्यांना तुमच्या बझ्झ मध्ये डीफॉल्ट सेटींग करून दिले ना. मग त्यांनी तुमच्या बझ्झ चा माग काढायला सुरूवात केली.
श्रेर: इथे सुध्दा आपला मूळ स्वभाव सोडू नका.
लॅरी: आपण काही म्हणालात?  तर आमच्या अननोन आयडेंटीटींना काही समजेचना काय चाललेले असायचे. कधीपण कोणी येउन "मी दात घासायला चाललोय, थोड्यावेळाने येइन." "मी आत्ताच आलोय ऑफीस मधून आता सितारात खादाडी करायला जातोय". मधुनच शॉर्ट फॉर्म्स सुसं, सुप्र, शुरा, शुत्री, सुरा. आमचं ग्रामरचं सॉफ्टवेअर पूर्णपणे फाफललं. हा शब्द सुध्दा आम्ही इथेच शिकलोय.
सोबा: लॉरीबाबा आपलं साहेब मी तुम्हाला याचा एक मन तयार करून देवू का म्हणजे तुमचा घोळ होणार नाही.
लॅरी: आता हे मन काय? तुमच्या कडे काही ग्रामरचे नियम वगैरे पाळतच नाहीत. किती ती होमोनिम्स?
देका: होमोनिम्स म्हणजे काय?
लॅरी: आहो म्हणजे एकच उच्चार असलेले पण वेगवेगळे अर्थ असलेले शब्द. उदा: सुरा हा शब्द. आमच्या सॉफ्टवेअर मध्ये सुरा चे तीन अर्थ आहेत. पण ते कुठलेच तुमच्या बझ्झ मधील सुरा ला जुळत नाहीत. आता आम्हाला एकच मन माहीत आहे आणि ते तयार करता येत नाही. पण हे काय मन तयार करून देतो?
रको: अरे व्वा, इथे रोज काही तरी नविन शिकायला मिळतं. म्हणजे आलंच पाहेजे रोज.
लॅरी: काय हे दिलीपजी तुम्ही तरी काही कंट्रोल करा. तुम्ही मराठीचे प्राध्यापक आहात ना.
दिबी: काय आहे लॉरी साहेब, आमच्या कॉलेज मधल्या मुलांना मराठीचं ग्रामर शिकवुन मी थकलोय. काहीच उपयोग नाही हो. सगळेच बिर्याणी आणि भेळ भाषा वापरतात. इथे सगळे नविन नियम तयार करायला मुभा दिली आहे.
रोचौ, तंबोरबुवा: काय बिर्याणी आणि भेळ कोण देतंय? चला पटापटा पोस्टा.
विपि: मी पण आहे इथं.
देका: हा लॅर्‍या सगळ्यांना ओळखतोय की.
लॅरी: बस का आता, उगाच का आम्ही करमचंद गीरी केली इतके दिवस. आम्हाला माहीती आहे तुमचं इतिहास प्रेम रोचौ आणि विपि.
रोचौ: माझ्या त्या दिवशीच्या पोस्ट ची कॉफीत पटापट पेस्ट टाकायची का?

लॅरी: आता हेच बघाना हे लोक काय बोलतील याचा नेम नाही. खादाडी हा शब्द तर इथे जादूच करतो. खादाडी काढायचा अवकाश की इथलं वातावरणच बदलतं. आता चार दिवसा पूर्वीची गोष्ट. काय खाल्लं कोण जाणे सगळेच सुटले होते. आणि कोण नविन लोक त्यांना प्रत्येक वेळी नविन पदार्थ घेऊन जॉईन होत होते समजतच नव्हतं. म्हणे "नावात काय असतं हे महाभारतात अत्यानंदबाबांनी म्हंटलंय". तुम्हाला सांगतो दिलीपजी, या लोकांनी आमच्या शेक्सपीअरने ते वाक्य काय संदर्भात म्हंटलंय ते काहीच लक्षात न घेता त्याची पार वाट लावली.
श्रेर: आता आम्ही तुला वाटेला लावू का?
लॅरी: तुम्ही मघाशी सुध्दा काहीतरी पुटपुटत होतात. जाऊ देत. तर आम्ही आमच्या अननोन आयडेंटीटींना सांगेतलं होतं की तुमचा बझ्झ ४०० च्या वर जाऊ द्यायचा नाही. तसं त्यांनी इमाने इतबारे २-३ आठवडे केलं पण नंतर ते पण रमले हो इतके की त्यांना डायरेक्ट ४९२-४९३ लाच जाग यायची. मग मीच सगळं हातात घ्यायचं ठरवलं.
तंबोरबुवा: मग काही फरक पडला का? आमचा खरड फलक हालताच राहीला ना.
लॅरी: तेच तर सांगतोय ना मी. आहो तुम्ही तो २०१२ पाहीलाय का जगबुडीचा सिनेमा. त्यात तो मुख्य लामा त्याच्या शिष्याला सांगतो नं की आधीच एखादं भांडं भरलेलं असेल तर ते रिकामं झाल्या शिवाय त्यात नविन कसं जाईल?
हेओ: काय बोअर आणि फाल्तू सिनेमा
आप: हो ना. सगळंच अ‍ॅनिमेशन आणि किती बॉलीवुड चा फिल्मीपणा? ह्या लॅर्‍याने तरी काय बोअर लावलंय.
अल: पण मला त्याने विचार करायला लावला.
आप: त्या हाउस फुल्ल ने मला सुध्दा विचार करायला लावला की हा सिनेमा मी का पाहीला? :-)
लॅरी: तर मी इकडे तातडीने येण्याचं कारण थोडं वेगळं आहे.
हेओ, आहो मग सांगा की ते पटापट. कशाला उगीच पाल्हाळ लावलंय. इथे ऑफीस मध्ये आम्हाला काम असतं. नाहीतर इथे उद्या पासून साहेब माझ्या मागे करमचंद लावतील.
लॅरी: तर ते बझ्झ मीच हातात घेतलं तर मी सुध्दा हारलो. काय एकेक चविष्ट पदार्थांचे फोटो आणि काय त्या कधीही न ऐकलेल्या न पाहीलेल्या रेसीपीज.
आणि आता परवा पासून तर दिवसातून दोन दोन बझ्झ काढायची वेळ येते आहे. गप्पांना काही तोटा नाही.
 मग आपण मानलं बुवा आपल्या या बझ्झ ला.
आप: (म्हणजे आता हा खलनायकाचा चरित्र नायक होतोय तर काही हरकत नाही)
लॅरी: म्हणून तर आपण स्वत: प्रत्यक्षच तुमचं अभिनंदन करायला आलो.
देका, रको: टाळ्या
श्रेर: आता अभिनंदन कशाचं?
तंबोरबुवा: आगं आज्जे जरा थांब की लॅरीबाबा आपलं साहेब काय सांगतायत ते ऐक ना.
लॅरी: तर मि देव, तुमच्या अत्यानंदबाबा बझ्झ चं आपलं कट्टयाचं आपलं मठाचं नाव आम्ही गिनीज बुकात नोंदवायचं ठरवलंय.
सोबा: मंडळी एका ट्रेनिंगला जायचय .. रात्रौ भेटू !!
शुत्री !!

लॉरी: आत्ता रात्रच आहे नं?आहो सोबा जरा क्लायमॅक्स तर ऐकून जा.
सोबा: नाही ओ साहेब, मी क्लायमॅक्स प्लेबॅक करून ऐकेल.
लॉरी: हो गिनीज बुकात कारण तुमच्या एवढा अवघ्या भूमंडळात या बझ्झ चा वापर कोणी केला नाही आणि भविष्यात एक आव्हान लोकांना असू द्यावे म्हणून आम्ही हा निर्णय एक मताने घेतला आहे.
देका: अरे वा...वाजवा रे वाजवा!
सगळेच: अरे वा...वाजवा रे वाजवा!
लॅरी: तसेच तुम्हाला अजुन ५०० खरडी एक्स्ट्रा मिळतील जेव्हा तुम्ही एका बझ्झ च्या ५०० खरडी पूर्ण कराल तेव्हाच. 
देका: अरे वा..बोनस? की सानुग्रह अनुदान...काय म्हणायचं हे.
अल: देका, बहुधा ते सअट अनुदान आहे.
लॅरी: हो आणि अजुन एक. देका स्पेशल. मि देव तुम्हाला आम्ही एक खास सर्व्हर स्पेस देतो आहोत बझ्झ वर तुमच्या आवाजातील गाणी अप्लोड करायला. तसेच केवळ तुमच्या बझ्झ ला स्मायली टाकायची फॅसीलीटी पण देत आहोत. 
अत्यानंदबाबा आणि भक्तमंडळी: झकाऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽस.
बोले तो एकदम झऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽकाऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽस.