दहा एक महिन्यांपूर्वीची गोष्ट. आम्ही फ्रॅंकफर्टहून लुफ्तान्साच्या फ्लाईटने बंगलोरला येत होतो. माझ्या शेजारच्या सीटवर म्युनिकहून आलेली एक जर्मन बाई बसलेली होती. मी तिला सहज विचारलं की तुम्ही भारतात कुठे आणि कशासाठी चाललायत? तर तिने दिलेलं उत्तर ऐकून मला धक्काच बसला. ती पुट्ट्पूर्तीला चाललेली होती. सत्य साईबाबांच्या ८५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने जगातील वेगेवेगळ्या भाषांमध्ये त्यांची प्रार्थना गाण्याच्या आंतरराष्ट्रीय समुहातील ती एक होती. तिथे जाऊन महिनाभर राहून ते लोक त्या प्रार्थनांचा सराव करणार होते. म्युनिक मध्येच काय संपूर्ण जगभरात त्यांचे भक्तगण पसरलेले आहेत. मला खूपच आश्चर्य वाटलं. तसं पुट्टपूर्तीला सत्य साईबाबांनी विविध सेवा कार्य काढलेली आहेत, त्यांचे भक्तगण सर्वदूर पसरलेले आहेत असं ऐकीवात होतं आज प्रत्यक्ष पहायला मिळालं.
मी जेव्हा पुण्याच्या ज्ञान प्रबोधिनीत शिकवत होते तेव्हाची गोष्ट. एकदा अध्यापक कक्षात एक साडी नेसलेली आणि प्रचंड लांबलचक असं कपाळभर कुंकु लावलेली एक व्यक्ती आलेली पाहीली. सोलापूर ज्ञान प्रबोधिनीची कार्यकर्ती होती. पण एकूण अवतारावरून तर असंच वाटत होतं की कुठल्यातरी आश्रमातून आलेली किंवा चाललेली आहे. मी नंतर चौकशी केली तेव्हा समजलं की ती पुट्टपूर्तीला कायमची रहायला चाललेली होती. मला तेव्हा सुद्धा अधिक आश्चर्य वाटलं होतं.
महाविद्यालयात द्वितीय वर्षाला असताना मी महिन्याच्या सुट्टीत मी इगतपुरीला विपश्यना शिबीरासाठी गेले होते. दहा दिवसाचं शिबीर संपवून आल्यावर वर्तमानपत्रात एक ठळक बातमी पाहिली होती. सत्य साई बाबांवर त्यांच्याच दोन भक्तांनी गोळ्या झाडून प्राणघातक हल्ला केला. गोळ्या झाडणार याची कल्पना आल्यावर बाबांनी तिथून पळ काढला आणि थोडक्यात बचावले. नुकतंच विपश्यना शिबिरात प्रवाचानात ऐकलं होतं की आपल्या मनात प्रेम असेल तर अगदी वाघासारख्या हिंस्त्र पशुच देखील मत परिवर्तन आपण करू शकतो. मग मला प्रश्न पडला की सत्य साई बाबां सारखे चमत्कार करणारे अध्यात्मिक गुरू आणि त्यांचेच शिष्य असलेले ते हल्लेखोर मग बाबांच्या मनातील प्रेमाचा त्यांच्यावर प्रभाव कसा नाही पडला? असो.
या हल्ल्यांच्या घटनेच्याही आधी काही वर्षांपूर्वी इंडीया टुडेच्या मुखपृष्टावर सत्य साईबाबांचा मोठा फोटो आणि ते हातातून घड्याळ काढतायत असा काहीसा फोटो पाहील्याचं आठवतंय. मी त्यावेळी बरीच लहान असल्याने इंग्रजी फारसं समजत नव्हतं पण चित्रं मात्रं खूप इंटरेस्टिंग असायची.
पहिल्यापासूनच माझी देवावर किंवा परामात्मा या स्म्काल्पनेवर श्रद्धा आहे. पण मी अशा हातातून घड्याळे किंवा सोन्याच्या अंगठ्या, साखळ्या, अंगारे काढणार्या बुवांवर कधीच विश्वास ठेवला नाही. प्रत्येक माणसात देवत्व आहे हे सत्य साईबबांचं म्हणणं खरं असलं तरी मला मनापासून अशा एखाद्या व्यक्तीच्या भजनी लागणं कधी जमलंच नाही. मला प्रत्येकवेळी काही मूलभूत प्रश्न पडतात. १) जर सत्य साई बाबा हे शिर्डीच्या साईबाबांचा अवतार आहेत तर मग ते असे चमत्कार दाखवून इतकी सम्पत्ती कशी काय गोळा करू शकतात? कारण शिर्डीच्या साईबाबांनी चमत्कार दाखवले आणि लोकांना त्याचा प्रत्यय आला पण त्यांनी कधीच हातातून भौतिक गोष्टी काढल्यानाहीत. नरेंद्र दाभोळकर किंवा जादूगार रघुवीर यांना सुद्धा हातचलाखी दाखवून हातातून घड्याळ, सोन्याची साखळी, अंगारा, कुंकू काढता येतात. मग हीच त्यांची आध्यात्मिक शक्ती कशी?
२) स्वत:च्या मनातील प्रेमाने त्यांनी त्यांच्यावर हल्ला करणार्या भक्तांच्या मनात प्रेम का नाही भरले? मग त्यांच्यावर हल्ला झालाच कसा?
३) चमत्कारांनी जर इतरांची दुखणी बरी केली तर मग स्वत:चं आजारपण का नाही बरे करू शकले?
सत्य साईबाबांनी नंतरच्या काळात निर्माण केलेली सेवा कार्ये हे एक उल्लेखनीय कार्य नक्कीच आहे. पण मग त्याच बरोबर भोंदू पणा करून लोकांना फसवणे कितपत योग्य आहे? अगदी मोठमोठे राजकीय नेते , मोठमोठे उद्योगपती (की ज्यातील 95% हून अधिक भ्रष्टाचारी आहेत) असे सर्वच जन बाबांचे भक्त. मग या लोकांच्या भ्रष्ट मानसिकतेत का नाही फरक पडत? मग सत्य साई बाबांनी आपल्या हातातून सोन्याच्या साखळ्या काढून देशावरील कर्जाचा बोजा का नाही कमी केला?
माणसाला मानसिक आधार म्हणून परमेश्वर, देव अशा संकल्पना लागतात. परमेश्वर, त्याचं अस्तित्त्व हे मी सुद्धा मान्य करते पण त्या श्रद्धेत डोळसपणा आहे. उगाचच एखाद्याच्या मागे जनता धावतेय म्हणून आपणही धावा असं करू नये. जग जितकं आधुनिक बनत चालंय तितकीच या बुवाबाबांच्या भजनी लागलेल्यांची संख्या भरमसाठ वाढते आहे. सामान्य जनतेचं जाउदेत लोक शास्त्रज्ञ म्हणून काम करतात पण नवस बोलायला शिर्डीला जातात. हा काय प्रकार आहे मला सुद्धा समजलेलं नाही. मग त्या शास्त्रीय ज्ञानाला काय अर्थ? म्हणतात ना दुनिया झुकती है.....झुकाने वाला चाहिये