Tuesday, 5 April 2011

डब डब डब २०११


डब डब डब म्हणजेच WWW. सर टिम बर्नर्स ली यांनी आंतर्जाल म्हणजेच ज्याला आपण वर्ल्ड वाईड वेब म्हणतो ते शोधून काढलं आणि त्यानंतर याच आंतर्जालाच्या अधिकाधिक सदुपयोगासाठी, जगातील विविध संशोधकांना त्यात  सहभागी करून घेण्यासाठी म्हणून टिम बर्नर्स ली आणि त्यांच्या इतर सहकार्‍यांनी डब डब डब आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स चालू केली. ह्या वर्षी या कॉन्फरन्सला २० वर्षं पूर्ण झाली. गेल्या १९ वर्षांत जगाच्या पाठीवरील अनेक लहान-मोठ्या देशांत ह्या कॉन्फरन्सचं आयोजन झालं. लवकरच या कॉन्फरन्स मध्ये इंडस्ट्री आणि ऍकॅडेमिया यांचं एक सुरेख कॉम्बो तयार झालं. २००३ पासूनच या कॉन्फरन्सच्या भारतातील आयोजनासाठी, ट्रीपल आय टी (बंगलोर आणि हैद्राबाद), आय आय टी मुंबई आणि भारतातील इतर निवडक तंत्रशिक्षण संस्था, बोली लावून होत्या. ह्या कॉन्फरन्सचं यजमानपद देण्यासाठी नेमके कोणते निकष लावले जातात ह्याची कल्पना नाही पण या यजमानपदाने सलग दोन वेळा हुलकावणी दिल्यावर तिसर्‍यांदा हैद्राबाद येथे २०११ साली ही कॉन्फरन्स आयोजित करण्यासाठी परवानगी मिळाली. तसं आपल्या भारतात अशा जागतिक कीर्तीच्या कॉन्फरन्सेस होणं हेच खूप अपरूप असतं. कारण अधिकाधिक भारतीय विद्यार्थ्यांना यात सहभागी होता येतं. तसे आय आय टी मधील विद्यार्थ्यांनी/संशोधकांनी  या कॉन्फरन्स मध्ये आपापले पेपर्स या आधीही वाचले असतील पण एखादा पेपर वाचणे हा अनुभव वेगळा आणि अशी कॉन्फरन्स आयोजित करणे हा अनुभव वेगळा. त्या दृष्टीने तसेच भारतासारख्या ७०% जनता खेड्यात राहणार्‍या विकसनशील देशांत या महाजालचा उपयोग विकास अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कसा करता येईल म्हणजेच "सगळ्यांसाठी वेब" ही थीम केंद्रस्थानी ठेवून ही कॉन्फरन्स २०११ साली भारतात आयोजित करण्याला खूप महत्त्व आहे. वेब टेक्नॉलॉजीशी संबंधीत अतिशय महत्त्वाचे असलेले विषय या कॉन्फरन्स मध्ये अभ्यासले जातात. आंतर्जाल म्हंटलं की त्याचा दुरूपयोग आणि मग ओघनेच त्याची सुरक्षा, त्यातील प्रायव्हसी जपणे हे ओघाने आलेच. वेब टेक्नॉलॉजीचा सर्च सिस्टीम्स आणि त्याची ऍप्लीकेशन्स हा एक अविभाज्य भाग. याच आंतर्जालावर अनेक प्रकारची माहीती विविध स्वरूपांत साठवलेली असते. त्या माहीतीचं सुयोग्य संकलन, त्याचा सुयोग्य वापर करण्यासाठी त्याची क्रमवारिता लावणे (रॅंकींग), स्ट्रक्चर्ड डेटा आणि अन्स्ट्रक्चर्ड डेटा यांना जोडणे, त्याचप्रमाणे यासगळ्याचा वापर करणारे म्हणजे आपण (युजर्स), आपल्याला त्याच अधिकाधिक वैयक्तीक दृष्ट्या (पर्सनलाईझ्ड) वापर कसा करता येईल, वेब टेक्नॉलॉजीचा मोबाईल सिस्टीम्स मधला वापर, सोशल नेटवर्कींग, त्यातून मिळणारी समजाच्या तसेच व्यक्तींच्या वर्तना विषयीची माहीती, त्याचा भविष्यात करून घेता येण्यासारखा उपयोग, मॉनेटायझेशन यांसारखे विषय जसे यात हाताळले गेले तसेच सीमॅन्टीक वेब टेक्नॉलॉजी की ज्याला वेब ३.० असे म्हणतात की जी भविष्यातील वेब टेक्नॉलॉजी कशी असेल आणि विकसनशील देशांसाठी वेब टेक्नॉलॉजी असे सुद्धा विषय चर्चिले गेले. एकूणच कोणत्याही ज्ञान शाखेतील माहीतीच्या विस्फोटामुळे त्या त्या शाखांची व्याप्तीही प्रचंड वाढली आहे त्यामुळे .....देता किती घेशील दो कराने........अशीच अवस्था होते. यामुळेच कॉन्फरन्स मधील संशोधनाविषयी या लेखात मी फारसं काही लिहीलेलं नाही. आवश्यक तिथे थोडीशी ओळख मात्र दिलेली आहे. 
जानेवारीत कॉन्फरन्सची वेबसाईट चाळत असताना एका महत्त्वाच्या गोष्टीने लक्ष वेधले आणि ते म्हणजे फेलोशीप्स. कॉन्फरन्सला जाण्यासाठी गुगलने पी एच डी किंवा मास्टर्स करणार्‍या मुली/स्त्रिया यांच्यासाठी फेलोशीप ठेवली होती. त्यासाठी मी अर्ज केला. १५ दिवसांनी मला ती फेलोशिप मिळल्याचं पत्र आलं आणि माझं डब्ल्यु ३ कॉन्फरन्सला जायचं नक्की झालं. कॉन्फरन्स रजिस्ट्रेशन फी, टू स्टार मध्ये राहण्याची सोय आणि जाण्यायेण्याचं विमान प्रवास असं सगळं त्या फेलोशिप मध्ये होतं. पी एच डी करताना अशा उत्तम कॉन्फरन्स अटेंड करणं, विविध कॉन्फरन्सेस मध्ये पेपर प्रेझेंट करणं हा अनुभव खूप महत्त्वाचा मानला जातो. त्या विषयातलं तसेच त्या क्षेत्रातलं ज्ञान अद्ययावत आणि वृद्धिंगत होण्यासाठी तसेच त्या क्षेत्रातील जगभरातील संशोधकांना भेटता येणं, त्यांच्याशी संपर्क प्रस्थापीत करणं यासाठी हे अनुभव खूप मोलाचे असतात.  कॉन्फरन्स २८ मार्च पासून चालू होणार असल्याने २७ तारखेलाच फ्लाईटने संध्याकाळी हैद्राबादला पोहोचले. इन्फोसीस गेस्ट हाऊस मध्ये सगळ्या फेलोशिप होल्डर्सची राहण्याची सोय केली होती. माझ्या रूम मध्ये राज्यक्रांतीमुळे नुकत्याच प्रकाश झोतात आलेल्या ट्युनिशीयाहून आलेली एक संशोधक होती. तिच्या बरोबर झालेल्या गप्पांवर  एक स्वतंत्र लेख लिहेनच.  सुरूवातीला म्हणजे २८ आणि २९ मार्च या दिवशी विविध विषयांवर कार्यशाळा आणि ट्युटोरियल्स होत्या. मला ही पद्धत आवडली. कारण त्यामध्ये इन्फॉर्मल कम्युनिकेशनला भरपूर वाव होता. तसेच विविध विषयांतले तज्ज्ञमंडळी तीथे असल्याने त्यांच्याशी मनमोकळी चर्चा करणं, त्यांची ओळख करून घेणं याला भरपूर वाव मिळाला. ३० मार्चला आपले माजी राष्ट्रपती रॉकेट सायन्टीस्ट डॉ ए पी जे अब्दुलकलाम उद्घाटन करण्यासाठी आले होते.  कॉन्फर्न्स उद्घाटनाची सुरूवात जपानमधील त्सुनामी मध्ये बळी गेलेल्या नागरिकांना श्रध्द्दांजली वाहून झाली. अब्दुल कलामांसारखी भविष्यवेधी व्यक्ती "सर्वांसाठी वेब" या थीमवरील कॉन्फरन्सचं उद्घाटन करायला मिळणं हा सुद्धा एक दुग्ध-शर्करा योगच म्हणायचा. वेब टेक्नॉलॉजीचा भारतात प्रसार होताना भारतीय संस्कृती जपून, स्थानिक लोकांच्या गरजांनुरूप त्या तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल यासंदर्भात डॉ. कलाम यांनी आपले विचार मांडले. याच विषयावरील विविध पॅनेल डीस्कशन्स मधुन याहू, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट यासारख्या मोठमोठ्या कंपन्या नक्की कोणतं संशोधन करतायत, काय काय नविन आणू पहात आहेत यावरही चर्चा झाली. विविध सोशल नेटवर्क साईट्सचा एकूणच मानवी आणि सामाजिक वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी उत्तम उपयोग करता येऊ शकतो आणि तसा तो करणं चालू आहे असंही याचर्चां मधून बाहेर आलं. माणसाची सामाजीकरणाची गरज भागवण्यासाठी तयार झालेल्या या सोशल नेटवर्कींग साईट्स हळूहळू ज्ञान संपादन, माहीतीची देवाणघेवाण याबरोबरच समाजातील राजकीय भान कसे जागृत करतेय याचीही जाणीव करून गेले. त्याअनुषंगाने विविध देशांतील इंटरनेट सेवा पाहीजे तेव्हा बंद करण्याच्या तेथील शासकीय कायद्यांचा जागतिक पातळीवर, युनो मध्ये पुनर्विचार व्हावा असाही विचार या चर्चांमध्ये व्यक्त करण्यात आला. एकूणच भारतातील दूरदर्शनचा प्रचंड वापर पाहता मायक्रोसॉफ्टने भारतातील खेडोपाड्यात जिथे इंटरनेट कनेक्टीव्हीटी मिळत नाही तिथे वेबवर उपल्ब्ध असलेले शैक्षणिक साहित्य एका हार्ड डीस्क मध्ये साठवुन टीव्हीच्या माध्यमातून घराघरात पोहोचवण्यासाठी सर्वसामान्यांना परवडेल असं सॉफ्टवेअर तयार केलं आहे त्याचीही माहीती दाखवण्यात आली. 
कॉन्फरन्सचं उद्घाटन झाल्या दिवसापासून दिवसभर विविध ठीकाणी संशोधन पेपर्स्चं वाचन, विविध ऍप्लीकेशन्सचे डेमोज आणि पोस्टर प्रेझेंटेशन्स चालू होती. पाच दिवस नुसता सगळी्कडे ज्ञान यज्ञच चालू होता. जगभरातील संशोधकांचा आपण केलेल्या संशोधनाविषयी सांगण्यात, त्याची माहीती इतर तज्ज्ञ तसेच आमच्या सारख्या नवख्या व्यक्तींसमोर मांडण्यात कस लागत होता. विविध प्रश्न विचारले जात होते आणि त्यांची तेवढीच समर्पक उत्तरंही दिली जात होती. अशातच एका मोठ्या हॉल मध्ये विविध कंपन्यांनी आपापले स्टॉल्स प्रदर्शनासाठी लावलेले होते. यातच गुगल आणि याहू या दोन कंपन्यांनी तर सगळ्या तरूण संशोधकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी तीन दिवस विविध स्पर्धा ठेवल्या होत्या. त्या स्पर्धेतील विजेत्यांसाठीतेवढीच आकर्षक बक्षीसंही ठेवली होती. गुगलने दहा वेब लिंक्स दिल्या होत्या. स्पर्धकांनी आपला इ-मेल आयडी वापरून स्पर्धेत सहभागी व्हायचं. प्रत्येक लिंक साठी गुगल सर्च इंजीन वापरून कमीतकमी की-वर्डस किंवा वर्ड स्ट्रींग्ज वापरून ती वेब लिंक क्रमवारीत अर्वात वर आणण्याचा प्रयत्न करायचा. स्कोअर ४०० पासून चालू होत असे. सगळ्यात कमी स्कोअर ज्याचा होईल त्याला बक्षीस. या सगळ्याला फक्त सहा मिनीटे वेळ होता. तीनही दिवशी ३-४ लोकांमध्ये टाय ब्रेकर करायला लागलं. बक्षीस म्हणून आयपॅड देण्यात आला. एका दिवशी प्रत्येक स्पर्धक एकदाच खेळू शकत होता. पण आपल्या कडच्या हुशार स्पर्धकांनी गटागटाने, वेगवेगळे आय डी वापरून बरेच वेळा स्पर्धा खेळली. टाय ब्रेक मध्ये मात्र खूपच कस लागत होता. स्पर्धा खूपच इंटरेस्टींग आणि गुगल सर्च संदर्भात बरंच काही शिकवणरी होती. याहू कंपनीनेही स्पर्धकांना आक्र्षीत करून घेण्यासाठी ट्रेझर हंट सारखी स्पर्धा ठेवली होती. काही प्रश्न विचारले होते तर काही वस्तू आणून दाखवायच्या होत्या. या सगळ्यालाही नॅनो आयपॉड किंवा ख्रिस्तोस पापाडीमीट्रीयु (Christos H. Papadimitriou) या गणिततज्ज्ञाने लिहीलेलं न्यु यॉर्क टाईम्सचं प्रसिद्ध गणित तज्ज्ञ बर्नार्ड रसेल याच्या आयुष्यावर आणि पॅराडॉक्सवर आधारित बेस्ट सेलर नॉव्हेल "लॉजीकॉमिक्स" (ख्रिस्तोसच्या स्वाक्षरीसहित) ठेवलं होतं. मला सुद्धा लॉजीकॉमीक्सची एक प्रत बक्षीस म्हणून मिळाली. दुसर्‍या दिवशी म्हणजे ३१ मार्चला सर टिम बर्नर्स ली यांचं Designing the Web for an Open Society या विषयावर व्याख्यान झालं. त्यांच्या व्याख्यानात मुख्यत: वेब डीझाईन करताना आपल्या समाजासाठी ओपननेस (सर्वांसाठी मोफत उपल्ब्धता), न्याय, पार्दर्शकता, जबाबदारी, सहभाग, नविन संशोधन, त्यातील शास्त्र आणि लोकशाही ह्या फीचर्सना कसं आंतर्भूत करता येईल यावर विचार मांडले.  तिसर्‍या दिवशी ख्रिस्तोस पापाडीमीट्रीयु या अमेरिकेतील बर्कले विद्यापीठातील इकॉनॉमीस्ट आणि गणिततज्ज्ञाचं Games, Algorithms and Internet या विषयावर व्याख्यान झालं. ह्या प्रो ख्रिस्तोस यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते बिल गेट्स यांचे अंडर ग्रॅज्युएट लेव्ललला ऍडव्हायझर होते. एकोणच गणितातील सिद्धांतांचा व्यवहारात, इंटरनेटमध्ये आपण कुठेकुठे वापर करू शकतो येवढं जरी विद्यार्थ्यांना सांगीतलं गेलं तरी त्यांची गणितातील रूची तसेच समज वाढण्यास नक्कीच उपयोग होईल यात शंका नाही.
विविध डेमोज आणि पोस्टर्स बघणे, काही पेपर्स ऐकणे आणि स्पर्धां मध्ये सहभागी होणे यातच विविध देशांच्या संशोधकांशी ओळख झाली. त्यातच आपल्याकडे वर्ल्ड कप सेमी फायनलचा आणि भारत-पाकीस्तान लढतीचा दुहेरी फीव्हर असल्याने ३० तारखेला संध्याकाळी ५ नंतर आम्ही मोठ्या स्क्रीनवर कॉन्फरन्सच्याच ठीकाणी मॅच पहात बसलो होतो. बर्‍याच परदेशी लोकांना क्रीकेट म्हणजे काय हे सुद्धा माहीती नव्हते. त्यामुळे मॅच पाहता पाहताच कोलोनियल राजवटीचे प्रतिक पण आता भारतात एक धर्म म्हणून उदयाला आलेल्या क्रिकेटची माहीती सांगणे हे आमचं आद्यकर्तव्य समजोन ती माहीती सांगणे देखिल चालू होते. आम्हा गुगल फेलोशिप धारकांसाठी ३० तारखेला रात्री गुगल तर्फे हॉटेल नोव्होटेलच्या लॉनवर मोठी पार्टी ठेवली होती. पार्टीत विविध गिफ्टस बरोबरच अनेक कोडी सोडवण्यासाठी ठेवली होती. पण मॅचमुळे कुणाचच फारसं पार्टीत लक्ष नव्हतं. शेवटच्या दिवशी म्हणजे एक तारखेला आम्हा गुगल फेलोजना हॉटेल नोव्होटेलमध्ये दुपारच्या जेवणाचं आमंत्रण होतं. तिथे जेवता जेवता गुगल मधल्या संशोधकांशी गप्पा असाही बेत होता. तिथे गेल्यावर समजलं की आम्ही सात जणी सीलेक्ट झालेलो होतो. त्यात आम्ही दोघी भारतीय (एक आय आय टी कानपूरची मुलगी), एक तैवानची, एक उरूग्वेची, एक स्पेनची, एक इराणी पण अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात शिकणारी आणि एक श्रीलंकन पण अमेरिकेतील एम आय टी विद्यापीठात शिकणारी होती. त्या श्रीलंकन स्कॉलरशी बोलताना लक्षात आलं की ती सर टिम बर्नर्स ली यांची एकमेव पी एच डी स्टुडंट आहे आणि सीमॅन्टीक वेब टेक्नॉलॉजीचं स्टॅंडर्ड (प्रोटोकॉल) तयार करण्याचं काम करते आहे. कॉन्फरन्सच्या पाच दिवसांत असे विलक्षण चमकुन जाण्याचे प्रसंग बरेच आले. म्हणजे याहू चे सी ई ओ श्री राघवन यांच्याशी बोलणं, डीबीपीडीया, यागो यांसारख्या डेटाबेसेस लिहीणार्‍या संशोधकांच्या बाजूला बसणे (चुकुन), त्यांच्याशी संवाद-मार्गदर्शन, सर टिम बर्नर्स ली यांच्या बरोबर उभं राहून चहा घेणं, त्यांच्याशी बोलणं, गुगल मधल्या संशोधकांच्या बाजूला बसून जेवण घेणं, त्यांच्याशी त्यांच्या संशोधन विषयी आपल्या कल्पनांविषयी चर्चा करणं यासारखे अनुभव शब्दात नाही व्यक्त करता येत. त्यासाठी अनुभवच घेतला पाहीजे. एकूणच माझा मार्च मध्यापासूनचा कालावधी दोन कॉन्फरन्सेस ऍटेंड करण्यात गेला. दोन्ही मध्ये अमेरिकेतील एमआयटी विद्यापीठातील संशोधकांचं काम पाहण्याची आणि त्यांना ऐकण्याची संधी मिळाली. मोठा ज्ञान यज्ज्ञच चालू होता. अशी संधी खूप कमी वेळा मिळते. त्यासाठी माझ्या इन्स्टीट्युट आणि फेलोशिपचेच आभार मानायला हवेत.

4 comments:

  1. खरंच ताई.. मस्त अनुभव असेल ना ही संपुर्ण कॉन्फरन्स..

    ReplyDelete
  2. हो ना आनंद. आता चार दिवस होत आले कॉन्फरन्स संपून तरी मी अजुनही त्याच विश्वात वावरते आहे. :-)

    ReplyDelete
  3. u have written ur experience very nicely. Good post.

    ReplyDelete
  4. छान आहेत अनुभव !
    बक्षीस मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

    ReplyDelete