Thursday, 25 November 2010

पुन्हा एकदा "ऐ मेरे वतन के लोगों"!!

दिवाळीच्या सुट्टीत वाचण्यात आलेल्या पुस्तकांत एक पुस्तक श्रीमती विनीता कामटे यांचं "टू द लास्ट बुलेट" हे एक. ते वाचल्यानंतर पुन्हा एकदा सगळं २६/११ डोळ्यांसमोर उभं राहीलं. २७ नोव्हेंबरला सकाळी साडे सहा वाजता नेहमीच्या सवयी प्रमाणे चहा पीतांना आज तक चॅनल लॅपटॉपवर लावला. एक महिनाभर मालेगाव बॉंब स्फोट तपासा संदर्भात दरवेळी काही ना काही ब्रेकींग न्यूज शीळी आणि खर्‍या अर्थाने ब्रोकन होईपर्यंत आजतक वर दाखवत असत. त्यामुळे हेमंत करकरेंचा चेहरा एकदम ओळखीचा झाला होता. त्यांच्याच नावाची ब्रेकींग न्यूज होती. न्यूज सारखी हलती असल्याने आणि ढॅण ढॅण पार्श्वसंगीतामुळे माझं लक्ष सर्व प्रथम जॅकेट घालतानाचा करकरेंचा शॉट दाखवत होते त्यावरच गेले. मग पुढचा शॉट हॉटेल ताजचा की जिथे गोळ्यांचे आवाज आणि कॅमेर्‍यांच्या आडव्या फ्रेम्स. काही आकलन करण्याचा प्रयत्न चालू असतानाच ढॅण ढॅण मधून मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्याची बातमी ऐकायला आली आणि पाठोपाठ हेमंत करकरे आणि अजुन दोन पोलीस अधिकारी, तसेच काही पोलीस शिपाई शहीद झाल्याची बातमी! तेवढ्यात सी एस टी रेल्वे स्थानकाचा शॉट. रक्ताची थारोळी आणि कण्हण्याचे आवाज. पहिले घरी फोन करून बातमीच्या सत्यासत्यतेची शहानीशा करून घेतली, मुंबईतील ओळखीचे आणि नातेवाईक यांना फोन करून पुन्हा खात्रीकरून घेतली. त्यातच बातमी आली की एक अतिरेकी जीवंत पकडला गेलाय आणि त्याचा साथीदार मारला गेलाय. मग त्याच दोघांनी सी एस टी मध्ये कसा अंदाधुंद गोळीबार केला त्याची सीसी टीव्ही फुटेजेस दाखवणं चालू. युद्धभूमी कशी असते, काश्मीरमधील लोक नक्की कशा परिस्थितीला सामोरे जात असतील याचा ट्रेलरच बघायला मिळत होता......न्यूज चॅनल वाल्यांच्या कृपेने (?).   
येवढे उत्तम क्षमता आणि शौर्य असलेले पोलीस अधिकारी अचानकपणे हल्ल्याच्या सुरूवातीलाच एकत्रितपणे एकाच ठीकाणी मारले जातात हेच मूळात अतिशय अस्वस्थ करून टाकणारं होतं. मुंबई पोलीस आयुक्तांकडून चित्रं असंच रंगवलं गेलं की हे तिघेही त्यांच्या स्वत:च्या हलगर्जीपणामुळे मारले गेले. पण त्या रात्री कामा हॉस्पीटलच्या गल्लीत नेमकं काय झालं हे विनीता कामटे यांनी पुराव्यांसहित दिलं आहे. खरी चूक ही कंट्रोलरूम मध्ये बसलेल्या राकेश मारीया यांची आहे. आता त्यांनी तसं का केलं याला कोणीच उत्तर देत नाहीये. उलटपक्षी राकेश मारीयांना मामला थंडावल्यानंतर बढतीच दिली गेली. का? कशासाठी? तर २६/११ च्या अतिशय महत्त्वपूर्ण हल्ल्याच्यावेळी स्वत: कंट्रोलरूममध्ये सुरक्षीत बसून, अतिशय शूरपणाने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता परिस्थिती हाताळायला निघालेले ते बेडर अधिकारी आणि त्यांच्या हाताखालचे शिपाई यांना अतिशय चुकीची माहीती पुरवणे, तसेच जख्मी अधिकार्‍यांना, शिपायांना कोणतीही मदत वेळेवर न पोहोचवणे हे सगळं केल्यामुळेच त्यांना ही बढती दिली गेली. हेमंत करकरेयांनी घातलेलं बुलेटप्रुफ(?) जॅकेट अतिशय तत्पर असण्याचा लौकिक असलेल्या मुंबई पोलीसांकडून अचानक गायब होतं? आणि त्या क्रूरकर्मा कसाबला फाशीची शिक्षा होऊन सुद्धा त्याला अजुनही फाशी दिली गेली नाही. कदाचित अजुन एका अपहरण नाट्याची वाट बघणार म्हणजे एका बरोबर एक फ्री या स्कीमने अफजल गुरू बरोबर कसाब फ्री किंवा कसाब बरोबर अफजल गुरू फ्री. 
ज्या तुकाराम ओंबाळेंनी स्वत:च्या छातीवर आणि अंगावर कसाबच्या गोळ्यांचा वर्षाव झेलत कसाबला पकडून ठेवलं केवळ लाठीच्या जोरावर. ........केवढी मोठी शौर्याची गोष्ट. त्या कसाबला ताबडतोब फाशीची शिक्षा अंमलात आणूनच तुकाराम ओंबाळे आणि बाकीचे शहीद अधिकारी आणि एन एस जी जवान यांना खरा न्याय मिळेल. पण सगळीच पोपटपंची चालू आहे. मेजर उन्नीकृष्णन संदर्भात अतिशय अपमानकारक असा उल्लेख  केलेल्या केरळच्या मुख्यमंत्र्यांचं विधान संतापजनक असलं तरी अजुनही ते केरळच्या मुख्यमंत्री पदावर आहेत. अशी विसंगती का? चोर सोडून सन्याशाला फाशी का? आपल्याकडच्या राजकारण्यांना हे कधी उमजणार? त्यांच्या स्वत:च्या घरात घुसून अतिरेक्यांनी त्यांना गोळ्या घालायला हव्यात म्हणजेच कदाचित जाग आली तर येईल. देशहित हेच सर्वप्रथम बाकी सगळं दुय्यम असं कधी होणार? आपण कमीत कमी या शहीदांच्या शौर्याची आठवण ठेवायला हवी आणि लगोलग कसाब, अफजल गुरू यांना फाशीची अंमलबजावणी केली जावी यासाठी सरकारवर दबाव टाकला जावा. एकवेळ दगडाला पाझर फुटेल, वाळू रगडल्यावर तेलही गळेल पण या राजकारणी लोकांचा भ्रष्टाचार आणि अल्पसंख्यांकांचं लांगूनचालन कधीच संपणार नाही असंच वाटतंय.
असा काही हल्ला झाला की सगळे अगदी आपापली भूमिका ठरवून दिल्यासारखे वागतात. अतिरेकी हल्ला झाला की राजकारणी "आम्ही हे सहन करणार नाही" च्या आरोळ्या उत्तर-पश्चिमेकडे बघून ठोकतात, तर संधीसाधू राजकारणी यासाठी हिंदूत्त्ववादी संघटनाच कशा जबाबदार आहेत याचा राग आळवतात. अतिशय थंड जनता आपल्या असमर्थतेचं प्रदर्शन ठीकठीकाणी मेणबत्त्या लावून करते......मग या मेणबत्ती लगाव कार्यक्रमात अगदी मोठमोठे बॉलीवुडचे तारे, उद्योगपती सहभागी होतात. ज्यांनी जीवन मृत्युचा थरार अनुभवलेला असतो ते सामान्य नागरीक आपापल्या रोजीरोटीच्या मागे लागतात.  हे म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यावर काही वर्षं पंधरा ऑगस्ट पांढरे शुभ्र किंवा खादीचे कपडे घालून तिरंगा हातात घेवून प्रभात फेर्‍या काढत निघणं, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर  प्रत्येक स्वातंत्र्य दिनाला ब्रिटीशांवर आगपाखड करून मोकळं व्हायचं, नंतर हळू हळू चौकांत रांगोळ्या आणि मोठा ध्वनीवर्धकांचा संच बडवणं, पुढे पुढे तर पंधरा ऑगस्ट म्हणजे प्रजासत्ताक दिन आणि सव्वीस जानेवारी म्हणजे स्वातंत्र्य दिन अशी दिवसांची आदलाबदल करणं....या स्वतंत्र भारताच्या प्रजेने आपल्याच सत्तेत (??) अजून एक-दोन सुट्ट्या उपभोगणं.........असंच काहीसं वाटतं.
सत्तापिपासू, भ्रष्ट राजकारणी; मदांध आणि पैशासाठी हपापलेले उद्योगपती विविध अधिकारी, तळहातावर प्राण ठेवून सीमेवर घुसखोर आणि सीमेच्या आत अतिरेक्यांशी लढणारे सामान्य जवान; स्वत:तच मशगुल असलेली जनता. खूप अस्वस्थ वाटतं. पूर्वी लता मंगेशकरांचं "ऐ मेरे वतन के लोगों" गाणं कुठुनही ऐकायला आलं की डोळ्यात पाणी उभं रहात असे. छाती एका वेगळ्याच अभिमानाने भरून येत असे. आता डोळ्यात पाणी उभं रहातं पण छातीत भिती आणि काळजी यांचं एक विचित्र मिश्रण असलेली भावना असते.  पुन्हा एकदा "ऐ मेरे वतन के लोगों" या गीताने काळजाला हात घालण्याची वेळ आली आहे. आहे का कोणी असं की जो/जी हे करू शकेल?
या सगळ्या निराशावादी पार्श्वभूमीवर शहीद तुकाराम ओंबाळे यांच्या कन्येने आणि कुटुंबीयांनी दाखवलेले दातृत्त्व थोर आहे. खालील बातमी वाचल्यावर उर अभिमानाने भरून आला. यातून भूखंडंचे श्रीखंड खाणार्‍या आणि सत्तेची मलई चाटणार्‍या राजकारणी लोकांना काही शिकता येईल?

4 comments:

 1. Mast aahe lekh!! Fakh samanya ganatelach vichar karaila lavel aasa....

  ReplyDelete
 2. अपर्णाजी, आपला लेख मी वाचला. त्यात आपण जवानांचं कौतुक केलंय. अर्थात सैन्यातील निदान काही जण तर हलगर्जी आहेत हे आपणही मान्य करालच ना कारण आपणच म्हंटल्याप्रमाणे अवघड जागचं दुखणं होऊन बसलेला कसाब तिथवर पोचलाच कसा? सैन्यातील कुणाचं तरी ईमान विकत घेऊनच ना?

  असो. तुमच्या लेखाच्या शीर्षकात ज्या गाण्याचं नाव तुम्ही टाकलंय त्या गाण्याच्या जन्माची मूळ हकीकत देखील तुम्ही इथे वाचा म्हणजे आपण भारतीय किती संवेदनाशून्य आहोत आणि तेही फार पूर्वीपासूनच हे तुमच्या लक्षात येईल.

  http://beftiac.blogspot.com/2010/09/blog-post_633.html

  ReplyDelete
 3. आपलं काय झालंय ना...आपल्याला 'ठेविले अनंते तैसेचि रहावे..' ह्या तत्वावर फार विश्वास आहे... त्यामुळे जसं चालू आहे, तसंच चालू ठेवावं असा प्रकार आपण आणि आपलेच प्रतिनिधी असलेले राजकारणी करत राहतो..आपल्यातलं स्फुल्लिंग केव्हाच विझलंय..फक्त ते कधीतरी असल्यामुळे निर्माण झालेली थोडीशी धग अजून शिल्लक आहे..ती थोडी बोचत राहते बस.. :(

  ReplyDelete
 4. शेवटी, रोज मरे त्याला कोण रडे अशी परिस्थीती होणार आहे. लोक यापरिस्थीतीला सुद्धा स्विकारतील. त्यांच्याकडे पर्यायच नाहीये. स्वत:ची जगण्याची लढाई सोडून तर कोणी हे सगळं सुधारायला यात पडेल असे वाटत नाही. टिळक, आगरकर, सावरकर यांसारखे देशाच्या केवळ हितासाठी काम करणारे (वैयक्तिक आयुष्य बाजूला ठेवून लष्करच्या भाकर्‍या भाजणारे) आता मिळणे अवघडच. म्हणजे तसे काही लोक आहेत रास्वसंचे प्रचारक आणि काही एन जे ओचे काम करणारे कार्यकर्ते पण त्यांचा या सगळ्या व्यवस्थेवर प्रभाव पडणं अवघडच नाही अशक्य आहे.

  ReplyDelete