Saturday, 11 December 2010

नाईट अ‍ॅट द म्युझीयम (भाग २)!!

लॅरी डेली, की जो दोन वर्षांपूर्वीपर्यंत अमेरिकन नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी मध्ये सिक्युरिटी गार्ड असतो, आज डेली सर्विसेस या डायरेक्ट रिस्पॉन्स टेलिव्हिजन कंपनीचा सर्वेसर्वा झालेला असतो. या कंपनी मार्फत लॅरी त्याच्या सिक्युरीटी गार्ड असतानाच्या अनुभवांवर आधारित नाविन्यपूर्ण अशा गोष्टी बनवून विकत असे. दोन वर्षांत एक यशस्वी उद्योजक म्हणून नाव कमावण्यात आणि भरपूर पैसे कमावण्याच्या नादात, लॅरीला म्युझियम मध्ये जायला वेळच मिळालेला नसतो. एका लाईव्ह शोमध्ये त्याच्या म्युझियममधील सिक्युरिटी गार्डच्या नोकरीचा उल्लेख होतो आणि म्युझियमची तीव्रतेने आठवण झाल्याने तो तातडीने  म्युझियमला भेट द्यायला जातो. म्युझियममध्ये सिक्युरीटी गार्ड म्हणून काम करत असताना लॅरीची तिथल्या सगळ्या एक्झीबीट्सशी दोस्ती झालेली असते. तिथे गेल्यावर त्याला समजतं की म्युझियम डागडुजी आणि नाविन्यपूर्ण बदलांसाठी बंद होतं आहे आणि तिथल्या प्रदर्शनात मांडलेले लहान मोठे तसेच पूर्वीच्या विविध जातीजमातींचे पुतळे, प्राणी यांना वॉशिंग्टन येथील स्मिथोनियन इन्स्टीट्युट मध्ये हलवणार आहेत. संग्रहालयात नाविन्य आणण्यासाठी यातील बर्‍याच पुतळ्यांची जागा इंटरअ‍ॅक्टीव्ह हॉलोग्राम घेणार असल्याने अशा पुतळ्यांचं अस्तित्त्वच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे हेसुद्धा त्याला समजतं. यासगळ्यांत  इजीप्शीअन राज्यांतील फाराओह अखमेनरहाची एक सोन्याची टॅबलेट असते की जिच्यामधील जादूई शक्तीमुळे सूर्यास्तानंतर सर्व पुतळे जिवंत होऊन सकाळी सूर्योदयापर्यंत म्युझियम मध्येच जीवंतपणे वावरत असत. ती टॅबलेट आधीच्याच म्युझियममध्ये राहणार असल्याने जे पुतळे वॉशिंग्टनमधील संस्थेत हलवले जाणार ते कधीच पुन्हा जीवंत होऊ शकणार नाहीत याची त्यासगळ्यांना मोठी खंत असते. दुसर्‍या दिवशी जेव्हा हे सगळे पुतळे वॉशिंग्टनच्या स्मिथसोनिअन संस्थेत हलवले गेल्यावर लॅरीला त्यातील जेडेडीहचा फोन येतो की डेक्स्टरने अखमेनरहाची टॅबलेट चोरून आणली आणि अतिशय क्रूर म्हणून कुप्रसिद्ध असलेला फाराओह कहमुनराह (अखमेनरहाचा मोठा भाऊ) पुतळ्यांवर चाल करून आला आहे. काळजीपोटी लॅरी वॉशिंगटनला जातो आणि त्यासगळ्या पुतळ्यांना ज्या तळघरात ठेवलेलं असतं तिथे पोहोचतो. लॅरीच्या हातात टॅबलेट आल्यावर नेमका सूर्यास्त होतो आणि टॅबलेटच्या पॉवर मुळे त्याठीकाणी असलेले सगळे पुतळे जिवंत होतात. त्यातच नेपोलिअन, इव्हान टेरीबल आणि इतर दुष्टप्रवृत्तीच्या नेत्यांना सोन्याच्या टॅबलेट्च्या मदतीने जग जिंकण्याचं अमिष दाखवून फाराओह कहमुनराह लॅरीवर हल्ला करतो आणि टॅबलेट हस्तगत करतो. टॅबलेटचा आधीचा कोड वर्ड बदलेला असल्याने कहमुनराहला टॅबलेटचा उपयोग त्याची अंडवर्ल्डची सेना बाहेर काढंयासाठी होत नाही. त्यामुळे जेडेडीहला ओलीस ठेऊन लॅरीला त्याचा नवा कोडवर्ड शोधून काढण्यास सांगतो. हा कोड शोधत असताना लॅरीला एमिली एअरहार्ट, अब्राहम लिंकन, आईनस्टाईन्स, नील आर्मस्ट्रॉंग यांसारखे अनेक प्रसिद्ध व्यक्तीमत्त्व भेटतात आणि त्याला नवा कोड वर्ड शोधायला मदत करतात. एमिली एअरहार्ट लॅरीच्या मनातील मूलभूत गोंधळ नेमका पकडते आणि आपल्याला जे आवडतं, आपल्याला जे पॅशनेटली करावंसं वाटतं तेच करावं हा मंत्र नकळत देऊन जाते. नवा कोडवर्ड म्हणजे पाय या ग्रीक अक्षराची गणिती किंमत असते. जेडेडीहला वाचवण्यासाठी लॅरी ती सोन्याची टॅबलेट नव्या कोड वर्ड सकट फाराओह कहमुनराहकडे सूपूर्द करतो. फाराओह कहमुनराह आधी कबूल केल्याप्रमाणे जेडेडीहला न सोडता लॅरीलाच पकडतो. अंडरवर्ल्डची आर्मी आल्यावर नक्की काय होतं? लॅरी त्याच्या पुतळ्यांना वाचवण्यात  यशस्वी होतो का? लॅरी त्याच्या पॅशनचं काम करण्यात यशस्वि होतो का? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी नाईट इन द म्युझियम (भाग २) हा चित्रपट जरूर पहा. चित्रपटाच्या सुरूवातीपासून असं कुठेही जाणवत नाही की ह्या चित्रपट कथानकाचा पहिला भाग आधीच प्रदर्शित झाला आहे. फक्त या भागात मला एक दोन प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत की जी पहिल्या भागात असतील. पहिला म्हणजे त्या टॅबलेटचा जुना कोड वर्ड कसा बदलला? आणि अखमेनरहाची कथा की जी त्या टॅबलेटची पार्श्वभूमीपण सांगत असणार. त्यामुळे पूर्ण चित्रपट पाहील्यावर पहिला भागही किती मजेशीर असेल आणि त्या दोन प्रश्नांची उत्तरं काय असतील याची उत्सुकता लागून रहाते. नाईट इन द म्युझियम या चित्रपटाचे दोनही भाग अमेरिकन चित्रपट क्षेत्रातील साहसी विनोदी (अ‍ॅडव्हेन्चर कॉमेडी) यासदरात मोडतात. आपल्याला जे मनापासून करायला आवडतं तेच करावं म्हणजेच इंग्रजीत फॉलो युवर हार्ट)  त्याचप्रमाणे गोष्टी जुन्या झाल्या तरी त्यांचा योग्यअसा उपयोग आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कसा करता येऊ शकतो हे दोन संदेश देणारा हलका फुलका चित्रपट पाहताना जाम मजा येते. 

5 comments:

  1. अपर्णा, याचा पहिला भाग बघ. पहिला भाग दुसर्‍यापेक्षा खूप जास्त चांगला आहे. (माझं वैयक्तिक मत)

    ReplyDelete
  2. मस्त..मी पहिलाच भागच बघितलाय आणि तो आवडला..आता हा नक्की बघेन :)

    ReplyDelete
  3. हेरंब, मला देखिल तसंच वाटतंय म्हणूनतर आता पहिला भाग डालो करून पाहणार आहे. कारण या भागात मला एक दोन प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत की जी पहिल्या भागात असतील. पहिला म्हणजे त्या टॅबलेटचा जुना कोड वर्ड कसा बदलला? आणि अखमेनरहाची कथा की जी त्या टॅबलेटची पार्श्वभूमीपण सांगत असणार. म्हणूनच मला हा भाग पाहिल्यावर पहिला भाग पाहण्याची उत्सुकता लागली आहे.:-)

    ReplyDelete
  4. अलताई,
    नाईट ऍट द म्युझियमचे दोन्ही पार्ट्स मला प्रचंड आवडतात...
    खूपच भारी आहेत. आणि त्यातून बेन स्टिलरचा अफलातून अभिनय..

    ReplyDelete
  5. मलापण पहिला भाग खूप आवडला होता.. दुसरा भाग पण नक्की बघेन आता.

    ReplyDelete