Tuesday 21 September 2010

|| गंगा ||

(छायाचित्र महाजालावरून साभार)
निवेदन: ह्या कथेतील पात्रं आणि घटना पूर्णपणे काल्पनिक आहेत. घटना आणि पात्रांचं कोणत्याही सत्यघटनेशी किंवा पात्रांशी साम्य आढळलं तर तो निव्वळ योगायोग समजावा. (ही कथा मी पावसाळी अंकात प्रकाशित केलेली आहे. तिच इथे पुर्नप्रकाशित करत आहे.)

जेव्हा सुमीने गुवाहाटीच्या बस स्थानकावरून शिवसागर साठी बस घेतली तेंव्हा पहाटेचा गार वारा सुटला होता. जवळ जवळ वीस-एक वर्षांनी ती शिवसागरला परत जात होती. शिवसागर हे आसाम मधील एक छोटंसं शहर. तिथेच आर जे व्ही ची एक शाळा आणि आता विस्तारित ज्युनिअर कॉलेजही होते. वीस वर्षांपूर्वी तिने याच शाळेपासून तिच्या यशस्वी कारकिर्दीला सुरूवात केली होती. आजूबाजूची हिरवाई बघून तर तिच्या मनात उमटलं, "किती सुंदर आहे नाही आसाम!! नाहीतर महाराष्ट्रातील ते बोडके डोंगर. अगदीच महाराष्ट्रगीता मधील वर्णना सारखाच दगडांचा देश आहे. त्याउलट आसाम मध्ये जिथे नजर जाईल तिथे गर्द हिरवी झाडी आणि मैलोनमैल पसरलेले चहाचे मळे". जसजशी गाडी घाट रस्त्यांची वळणं घेत पुन्हा सपाट रस्त्याला लागली तेंव्हा आजूबाजूचे विस्तीर्ण असे चहाचे मळे पहात सुमीचं मन वीस वर्षं मागे गेलं.

..............(२० वर्षांपूर्वी)

आईच्या विरोधाला न जुमानता मी कशी एवढ्या लांब परप्रांतात नोकरी स्विकारली याचं नवल होतंच. आईचा विरोध असला तरी बाबांच्या ठाम पाठींब्यामुळे हे सगळं शक्य झालं हे सुध्दा तितकंच सत्य होतं. फिजीक्स मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतल्यावर आव्हानात्मक असे काहीतरी करावे अशी माझी इच्छा. तशी मी स्वतंत्र विचारांची आणि स्वत:च्या क्षमता तपासण्यातच मला जास्त रस होता. आईने माझ्या मागे लग्नाचा धोशाच लावल्याने खूपच घुसमटल्यासारखं होत होतं. या सगळ्यापासून दूर जायचं असेल तर एकच पर्याय आणि तो म्हणजे लांब कुठेतरी नोकरी शोधणे. अश्या ठिकाणी की जिथे आई आणि तिचा तो लग्नाचा धोशा सहजासहजी पोहोचणार नाही. म्हणून मग टाईम्स ऑफ इंडियात आर जे व्ही ची जाहीरात पाहीली आणि अर्ज करून मोकळी देखिल झाले. नोकरी मिळाल्याचं पत्रं हातात पडून तिथे रूजू होण्याची तारीख समजल्यावरच मी आईला सगळं सांगीतलं. अपेक्षेप्रमाणे आईने घर डोक्यावर घेतलंच. याच कारणासाठी सगळं ठरल्यावरच आईला सांगायचं असं मी ठरवलं होतं नाहीतर मला कधीच बाहेर पडता आलं नसतं. बाबांनी आईची कशीबशी समजूत काढली आणि दोन वर्षांसाठी मी आसामला जाण्यास तयार झाले. बाबांना मनातून खूप आनंद आणि थोडी धास्ती वाटत होती. कधी हॉस्टेलवर सुध्दा न राहीलेली सुमी येवढ्या लांब राहील का? तिथले लोक कसे असतील? ते सुमीशी चांगलं वागतील नं? असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात डोकावत होते. तर आईच्या मनात या प्रश्नांबरोबरच माझ्या लग्नाची चिंता ठाण मांडून बसली होती. निघायच्या आदल्याच दिवशी बाबांनी मला एक कॅमेरा भेट म्हणून दिला. आसाम खूप सुंदर आहे हे त्यांनी सुध्दा ऐकले होतेच. त्यांची फोटोग्राफीची आवड माझ्यातही उतरली होती. त्यालाच अजुन वाव देण्यासाठी बांबांची ही कृती मला खूप उत्साहवर्धक वाटली. माझ्याही मनात थोडी धाकधूक होतीच पण माझ्या निर्धारावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही आणि मी शिवसागरला जायला निघाले.

शिवसागर बस स्थानकावर मला घ्यायला शाळेतून कुशल नावाचा एक शिपाई आला होता. "स्कूल तो बाजूमें हैं, हम पैदल ही जायेगा" असं बोलून तो सामान उचलून चालायलाच लागला. त्यांचं असमीज मिश्रीत हिंदी ऐकून मला जरा विचित्रं वाटलं. खरंतर पुण्याहून मुंबई, मुंबई ते गुवाहाटी असे चार दिवस ट्रेन चा प्रवास आणि गुवाहाटी ते शिवसागर बारा तासांचा प्रवास यामुळे हा "स्कूल तो बाजूमें हैं" चा काही मिनीटांचा प्रवास माझ्या अगदी जीवावर आला होता. पण सांगते कोणाला........सगळं आपणच तर ओढवून घेतलं होतं नं! शाळा तशी छोटीशीच. टुमदार इमारती समोरच लालमातीचं भलंमोठं मैदान आ वासून पसरलेलं होतं. शाळेच्या इमारतीमधील व्हरांड्यात शोभेच्या फुलांच्या कुंड्या ठेवलेल्या दिसत होत्या. कुशलने मला एका अंधार्‍या खोलीपाशी नेलं. एक पांढरी साडी नेसलेल्या बाई एका मोठ्या टेबलच्या मागे खुर्चीमध्ये बसलेल्या होत्या. त्या खोलीतील अंधार आणि त्या बाईंचा रंग इतका सारखा होता की त्यामुळे मला त्यांची पांढरी साडी अजुनच पांढरी शुभ्र वाटली. त्यांच्या कपाळावरचा मोठ्ठा लाल कुंकवाचा टीळा आणि त्यांचे मोठे काळेभोर डोळे, तसेच अस्ताव्यस्त केस पाहून मला त्यांची जरा भीतीच वाटली. थोडंसं स्मित करून त्यांनी माझं स्वागत केलं. त्या स्मित हास्यातूनही त्यांचे पिवळसर दात डोकावत होत. खूप थकवा आल्याने आणि त्यांच्या उच्चारां मुळे क्षणभर त्या काय बोलत आहेत हेच मला समजलं नाही. त्यामुळे मी फक्त थोडसं हसूनच प्रतिसाद दिला. "यू मस्ट बी फिलिंग टायर्ड" हे त्यांचे शब्द कानात शिरले आणि मला हायसं वाटलं. त्यांनी मला चहा विचारला आणि उत्तराची वाट न पाहताच त्या खोलीच्या दारापाशी गेल्या. अचानक "गंगा, गंगा........एक गेस्ट के लिये छाय बनाओ" असं दाक्षिणात्य हिंदी वाक्यं माझ्या कानावर पडलं. हाच माझा गंगाशी .......तिला न पाहताच झालेला पहिला परिचय.


थोड्याच वेळात एक बसकं नाक आणि पिचपिचे डोळे असलेली साधारण पाच फूट उंचीची गौरवर्णीय, नेटक्या अवतारातली बाई माझ्यापुढे चहा घेवून उभी राहीली. तिने त्या पांढर्‍या साडीतील बाईंना विचारले, "दिदी, ये वो नया दिदी है क्या?" एकूणच तिथल्या सगळ्यांचं हिंदी ऐकून माझी खात्रीच पटली की शाळेत असताना हिंदी भाषेवर राष्ट्रभाषा म्हणून घेतलेली मेहनत पूर्णपणे वाया जाणार. गंगाच्या बोलण्यावरून तरी असं जाणवत होतं की मी येणार हे तिथल्या सगळ्यांना माहीती होतं.

"छलो छलो अभी ये नया दिदी को उसका कमरा दिखाओ" या शब्दांनी माझी तंद्री भंग पावली. माझं सामान उचलून एव्हाना गंगा भराभर खोली बाहेर सुध्दा पडली. मी तिच्या मागे चालायला लागले. खरंतर आमच्या घरी नोकर चाकर असली भानगड नसल्याने आणि भांडी घासायला येणार्‍या बाईंना सुध्दा आदरार्थी संबोधण्याची सवय असल्याने मला गंगाला काय संबोधावे हेच लक्षात येईना.

"तो दिदी आपका घर कहॉं हैं?" या तिच्या सहज प्रश्नाने माझा गोंधळ थोडा कमी केला. तिला काही उत्तर देण्याच्या आतच आम्ही एका बर्‍यापैकी मोठ्या खोलीपाशी पोहोचलो. खोलीत दोन भिंतींच्या बाजूंना दोन शिसवी पलंग होते. खोलीत अजून एक मोठ्ठं व एक छोटं अशी दोन कपाटं, एक टेबल, एक कपड्यांचा जुन्या बंगाली चित्रपटांतून असतो तसा स्टॅंड आणि एक ड्रेसींग टेबल होतं. क्लॉथ स्टॅंड कडे पाहून तरी असंच वाटलं की त्या खोलीत अजून एकजण किंवा दोन व्यक्ती रहात असतील. हे सगळं न्याहाळत असतानाच मी गंगाला उत्तर दिलं, "मैं पुने से आयी हूं".

"दिदी आप के घरमें कौन कौन हैं?" अतिशय उत्साहात गंगाने टाकलेल्या दुसर्‍या प्रश्नावरून तिच्या बडबड्या स्वभावाचा अंदाज मला आला.

"मॉं और पिताजी" असं उत्तर देवून तिच्या पुढच्या प्रश्नाची वाट न पाहता मी सरळ फ्रेश होण्यासाठी बाथरूमकडे वळाले..

काही वेळ विश्रांती घेवून फ्रेश झाल्यावर मी शाळेच्या परिसरात फेरफटका मारायला गेले. व्हरांड्यामध्येच अजुन दोन बायका बसलेल्या दिसल्या. त्यातली एक अतिशय हाडकुळी आणि दुसरी बर्‍यापैकी बारीक होती. दोघींची तोंडं पानाने रंगलेली होती. त्या हाडकुळ्या बाईच्या कपाळाला कुंकू लावलेलं दिसत होतं तर दुसर्‍या बाईचं कपाळ रिकामंच होतं. माझ्याकडे पाहून ती हाडकुळी बाई म्हणाली, "क्या दिदी रेस्ट हो गया क्या?" आणि ती अंग घुसळवून आणि रंगलेले दात काढून हसायलाच लागली. मला जाणवत होतं की माझ्या आगमनाची वार्ता आणि प्रत्येक हालचालींची खबर सगळ्यांनाच होती. मी आपल्याच विचारांत गर्क असताना समोरून शाळेत जाण्याच्या वयाच्या दोन मुली येताना दिसल्या. त्यांच्याशी नजरानजर होत असतानाच माझ्या कानावर आलं, "ए देवी और गुड्डी ये देखो नया दिदी". दोघीही माझ्याकडे पहात म्हणाल्या, "नमस्ते दिदी".

मीही त्यांना नमस्ते केलं. घरात एकुलती एक असल्याने मला आदरार्थी संबोधन ऐकायची आणि ते सुध्दा "दिदी" सवयच नव्हती. मी त्या दोन मुलींमधली कोण देवी आणि कोण गुड्डी यांचा अंदाज बांधायला सुरूवात केली. तेव्हढ्यात त्यांच्यातील एकीनेच तो प्रश्न सोडवला.

त्या हाडकुळ्या बाईला उद्देशुन तिने बोलायला सुरूवात केली, "ओय मॉं, मोय भूख xxxxxxxx".

त्या बाईने लगेच उत्तर दिलं, "ओय देवी, xxxxxxxx.....".

माझ्या लक्षात आलं की त्या दोघींमधली जाडगेलीशी आणि तुलनेनं बुटकी मुलगी म्हणजे देवी आणि ती त्या हाडकुळ्या बाईची मुलगी होती.

तेव्हढ्यात माझ्या कानावर आलं, "ओ साधना दिदी , xxxxxxxx मॉं xxxxxxxx."

गुड्डी त्या हाडकुळ्या बाईला विचारत होती. आता माझी खात्री पटली की त्या हाडकुळ्या बाईचं नाव साधना होतं आणि गुड्डीची आई कोणीतरी दुसरीच बाई होती. देवी चेहर्‍यावरून तरी साधनादिदीची मुलगी वाटत होती. गुड्डीचे डोळे आणि कपाळ मोठ्ठं होतं. वाढत्या अंगाची असल्याने उंच वाटत होती. देवी चे केस कुरळे आणि दोन्ही गालांवर खळ्या पडायच्या. ती दिसायला चांगली असली तरी मरगळलेली वाटत होती. तिच्या चालण्यातून ते लक्षात येत होतं. याउलट गुड्डी रंगाने तशी सावळी पण स्मार्ट आणि तरतरीत दिसत होती. दोघीजणी माझ्या राहण्याच्या खोलीच्या मागच्याच बाजूला रहात होत्या. पण राहून राहून माझ्या मनात एकच प्रश्न येत होता की गुड्डी कोणाची मुलगी?

आमच्या राहण्याच्या ठिकाणीच मुख्याध्यापक बाईंच्या म्हणजेच कृष्णादिदींच्या खोलीत रोज सकाळ संध्याकाळ प्रार्थना असे आणि शाळेत राहणार्‍या सगळ्यांनी त्या दोन्ही प्रार्थनांना हजर राहण्याचा शिरस्ता होता. संध्याकाळी आम्ही सगळे (मी, गुड्डी, देवी, गंगा, साधना आणि अजुन दोन दिदी) कृष्णादिदींच्या खोलीत प्रार्थनेसाठी जमलो. कृष्णादिदी स्वत: चांगल्या गायच्या. त्यांच्या गायनाने प्रार्थनेला सुरूवात होत असे आणि मग हळूहळू एक एक करत बाकीचे सगळे काही प्रार्थना आणि भजनं गात असत. प्रार्थनेच्या वेळी माझ्या लक्षात आलं की गुड्डीचा आवाज छान होता आणि उच्चारही स्पष्ट होते. गंगा काही स्वतंत्रपणे गायली नव्हती पण सुरात मागोवा घेत होती. देवी स्वतंत्रपणे गायली पण तिचा आवाज थोडा किंनरा आणि नाकात होता. यथावकाश मला समजलं की गुड्डीचं नाव निवेदीता होतं आणि ती गंगादिदीची मुलगी होती. गंगा आणि साधना जरी आया म्हणून शाळेत काम करत असल्या तरी सगळे जण त्यांना दिदी म्हणूनच संबोधायचे. पण माझ्या मनात काही प्रश्न मात्रं ठाण मांडून बसले होते.......निवेदीता आणि गंगा मध्ये इतका जमीन आस्मानाचा फरक कसा काय?


नकळतच मी गंगा-साधना आणि निवेदीता-देवी यांची मनोमन तुलना करायला सुरूवात केली. गंगा एकदम साधी आणि सरळ-भोळ्या स्वभावाची तर साधना तशी नटवी आणि वस्ताद. तिच्या बोलण्यातून आणि चेहर्‍यावरून ते जाणवत होतं. मी असंही ऐकलं होतं की दोघींनाही नवर्‍याने सोडून दिलेलं. गंगादिदीला तर मी चांगली साडी नेसून, पावडर वगैरे लावून बाहेर जाताना क्वचितच पाहीलं होतं. पण साधना मात्रं दर रविवारी नटुनथटुन बाहेर जायची. मी तर असंही ऐकलं होतं की साधना कोणा माणसाबरोबर फिरते. तसं विधवा बाईने किंवा परित्यक्तेने पुन्हा कोणाबरोबर संसार उभा करावा या मताची मी होते. पण साधनाचं वागणं थोडं खटकण्यासारखं होतं. कृष्णादिदींना सुध्दा ते आवडायचं नाही. पदरात वयात येणारी मुलगी असताना तिने आपलं वागणं आटोक्यात ठेवायला पाहीजे असं त्यांचं मत होतं. निवेदीता आर जे व्ही च्याच शाळेत म्हणजे इंग्रजी माध्यमात सहाव्या इयत्तेत शिकत होती. त्यामुळे तिच्या वागण्या बोलण्यात जाणवण्या इतपत फरक होता. देवी एका असमीज माध्यमाच्या शाळेत नवव्या इयत्तेत शिकत होती. निवेदीता तिच्या पेक्षा लहान असून सुध्दा तिचं वागणं एकदम वेगळं आणि समज जास्त होती. मला वाटलं म्हणूनच तर कृष्णादिदींनी निवेदीताला त्याच शाळेत इंग्रजी माध्यमात शिकण्याची संधी दिली असेल.

हळूहळू माझी आणि निवेदीताची गट्टी जमली. मी जरी तिला प्रत्यक्षात शिकवत नसले तरी शाळेतच रहात असल्याने तिला अभ्यासात थोडीफार मदत करत असे. त्याचप्रमाणे शाळा सुटल्यानंतर संध्याकाळच्या प्रार्थनेत दोन तास असत. त्यावेळी मी काहीतरी वाचन करत असे किंवा शाळेच्या परिसरात फिरून गंगा-साधना आणि इतर मंडळी यांच्याशी संवाद साधत असे. शाळेच्या भूतकाळाची (निवेदीताला आठवत होतं तोपर्यंतची) इथ्यंभूत माहीती मला निवेदीताशी गप्पांमधून समजत होती. कृष्णादिदींसकट इतर शिक्षक आणि बाकी सगळे यांच्या स्वभावची माहीतीही मला त्यांतून मिळत असे. निवेदीता बर्‍याचवेळी तिच्या वर्गातील गमती-जमती सांगत असे. निवेदीता आणि गंगादिदीच्या बोलण्यातून मला अजून एक गोष्ट समजली की त्यांचे कोणीतरी नातेवाईक दिब्रुगढला रहात होते आणि सुट्टीत कधी कधी त्या दोघी दिब्रुगढला जायच्या. निवेदीताला खेळाची खूप आवड होती. तिच्या म्हणण्यानुसार ती धावण्यात तरबेज होती आणि तिला अ‍ॅथलेटीक्स मध्ये अधिक रस होता. मला तर तिचे मोठे मोठे डोळेच खूप आवडायचे. नाही म्हणायला मायलेकीं मध्ये एक साम्यं होतं. गंगाला आणि निवेदीताला दोन्ही गालांवर छान खळ्या पडायच्या.

साधना थोडी कामचुकार असल्याने कृष्णादिदी तिला खूपच कमी कामं सांगत. गंगा तर त्यांचे कपडे धुण्यापासून ते कपडे वाळवून घड्या करून आणे पर्यंत सगळीच कामं करत असे. शाळेत कोणी पाहूणे आलेच तर त्यांच्या साठी चहा बनवण्याचं काम, कृष्णादिदींचं जेवण बनवणे अश्या बर्‍याच गोष्टी ती हसत मुखाने करत असे. गंगा आणि साधनाला शाळा चालू असताना मध्येच नर्सरी आणि ज्युकेजी च्या मुलांना शू-शी ला नेवून आणणे, त्यांची काळजी घेणे अशी कामे तर शाळा सुटल्यानंतर सगळ्या वर्गखोल्या झाडून, व्हरांडा झाडून-धुणे ही सुद्धा कामे असत. बर्‍याच वेळेला त्यांचे ते कष्ट पाहून माझा जीव हेलावून जायचा. वाटायचं की असं काय घडलं असेल म्हणून या दोघींच्या नवर्‍यांनी त्यांना सोडून दिलं असेल? साधनाकडे पाहून वाटायचं की तिच्या वागण्यामुळे तिच्या नवर्‍याने तिला सोडून दिलं असेल. पण गंगा चं काय? ती तर खूपच चांगली होती. आम्ही एकाच ठिकाणी फक्त वेगळ्या इमारतींमध्ये रहात असल्याने आणि साधना-देवी पेक्षा गंगा-निवेदीता बरोबर माझे सूर जुळल्याने मी बर्‍याच वेळा गंगापाशी मन मोकळं करत असे. तसंच गंगा आणि निवेदीता सुध्दा त्यांचं मन माझ्यापाशी मोकळं करत.

एक दिवस अश्याच मी आणि गंगादिदी बोलत बसलो होतो. आणि गुड्डीचा म्हणजेच निवेदीताचा विषय निघाला. मी म्हणाले, "गंगादिदी आप कितनी भाग्यवान हो की आपको गुड्डी जैसी बेटी मिली। लेकिन आपके कष्ट बहुत है। अच्छा हैं आप यहॉं स्कूल में काम करती हो। नहीं तो बाहर की दुनीया में बहुन परेशानी होती। यहॉं आपलोग सुरक्षित है। निवेदिता के पिताजी कहॉं हैं?

अश्रू भरल्या डोळ्यांनी गंगा उत्तरली, "दिदी आपको क्या बताउं? निवेदीता के पिताजी तो दिब्रुगढ में हैं। वो एक पुलिस अफसर है और बंगाली है। दिदी निवेदीता तो बंगाली है और मैं एक नेपाली।"

मला ती काय म्हणतेय हे समजायलाच थोडा वेळ लागला. कारण ते सगळं माझ्या कल्पनेच्या पलिकडील होतं. गंगा सांगत होती आणि मी सुन्न मनाने ऐकत होते.

"यहॉं आने से पहले मैं दिब्रुगढ में मेरी दिदी और जीजा के साथ रहती थी। वहीं पर मुझे गुड्डी के पिताजी मिले. उन्होंने मुझसे शादी की। लेकिन उनके घरवालों को पता नहीं था। गुड्डी के जनम के साथही वो मुझे और गुड्डी को छोडकर चले गये। अभी इन्होंने दुसरी शादी बनायी है। एक बंगाली के साथ। मैं तो नेपाली हूं लेकिन उनकी बेटी तो बंगाली हैं। निवेदीता अपने पिताजी का चेहरा लेके आयी हैं।"

गंगादिदीचे पाणावलेले डोळे  बदलले आणि तिचा चेहरा एकदम प्रसन्न झालेला दिसला.

"वो एक अच्छे घर से है, और इसलिये मुझे उसे पढाना हैं। अगर वो अपने पिताके साथ होती तो अछ्छे अंग्रेजी स्कूल में जाती। मैं उसे पुलिस अफसर बनाना चाहती हूं। इसलिये मैं ये आर जे व्ही स्कूल में आया का काम करती हूं। मैं तो पढीलिखी नहीं हूं इसलिये आया का काम ही कर सकती हूं। मुझे इतनी ही आशा है की जब निवेदीता बडी पुलिस अफसर बन जायेगी तो उसके पिताजी उसे अपना लेंगे।"

मी फक्त गंगा दिदीच्या चेहर्‍याकडे पहात होते. तिच्या चेहर्‍यावर वेगळाच तजेला दिसत होता. मला त्याक्षणी तिच्या पाया पडावसं वाटलं. मला ती नावाप्रमाणेच गंगा वाटली आणि ज्या माणसाच्या नावाने कुंकु लावलं अशा पापी माणसाचं पाप ती धूत होती. एका शाळेत आयाचं काम करून, अपार कष्ट करून आपल्या मुलीला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून धडपडत होती. आणि तरीही मुलीचं शाळेतील आडनांव "देब" म्हणजे बंगालीच लावलं होतं. एका माणसाच्या चुकीसाठी आपलं उभं आयुष्यं तिने पणाला लावलं होतं. नाहीतर एखादी साधना सारखी असती तर कधीच दुसर्‍या माणसा बरोबर लग्नं करून मोकळी झाली असती. रोज प्रार्थने नंतर कर्मयोग आणि अध्यात्माच्या गप्पा ऐकणार्‍या मला ती खरी कर्मयोगी वाटली. पुढच्या आयुष्यात निवेदीताने किती प्रगती केली हे बघायला मी तिथे नव्हते कारण मला दुसरी कडे बदलून जावं लागलं होतं. तिथून निघताना आणि नंतर सुध्दा मी अशीच प्रार्थना करत होते की या वेड्या गंगेच्या तपश्चर्येला फळ येवू दे.

.................................................


सगळा वीस वर्षांपूर्वीचा चित्रपट सुमीच्या नजरेसमोरून अगदी कालच घडल्यासारखा सरकला. एव्हाना बस शिवसागरला पोहोचली होती. सुमी एक नविन मुख्याध्यापिका म्हणून त्या शाळेत पुन्हा जात होती. ह्यावेळी तिला जवळच्या जवळच गाडी पाठवली होती. पण सुमीने "स्कूल तो नजदीक हैं" असं म्हणत चालायला सुरूवात देखिल केली. तिचं सामान घेवून गाडी परत शाळेकडे निघाली. सुमीची पावलं शाळेकडे झपझप चालत होती तर मन मात्र गंगादिदी कडे धाव घेत होतं. तिच्या पवित्र अश्या मार्गाच्या पाउलखुणा धुंडाळत. सुमीचे कान आसुसले होते गुड्डीच्या यशाची कथा ऐकण्यासाठी.........कारण तेच तर गंगेच्या तपश्चर्येचं, आराधनेचं फळ होतं.

1 comment:

  1. सहज,हळुवार मस्त जमली आहे कथा...

    (अंकात मी दिलेली प्रतिक्रियाच चिकटवतो आहे)

    ReplyDelete