Wednesday, 8 September 2010

गोंद्या गेला रे गेला.......

(छायाचित्र महाजालावरून साभार)
श्रावण कृष्ण अष्टमी जवळ आली की सगळीकडे ’गोविंदा आला रे आला’ चे नारे ऐकायला येतात. हिंदी चित्रपटांतील दहि-हंडी संदर्भातील गाणी वाजत असतात. विविध राजकीय पक्षांची छोट्या छोट्या गल्लीबोळातली गोविंदा पथकं उंचच उंच दहि-हंडी फोडायच्या तयारीला लागतात. मग पारंपारिक दहि-हंड्यांची बोली लावणं चालू होतं तर कुणी नविन दहि-हंडीची विक्रमी बोली लावून गोविंदा पथकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो. दहि-हंडीच्या बोलीच्या प्रमाणात तिची उंची म्हणजेच थरांची संख्याही वाढवली जाते. वर्तमानपत्रांत जाहिरातींचा ओघ सुरू होतो तर आंतर्जालावर दहि-हंडीसाठी स्पेशल संकेतस्थळं सुरू होतात. प्रत्यक्ष दहि-हंडीच्या दिवशीतर सगळ्यांचा उत्साह नुसता ओसंडून वहात असतो. हंडीतील दह्याच्या म्हणजेच बक्षिसाच्या आशेवर थरावर थर चढवले जातात. एक नाही दोन नाही तर शक्य असतील तेवढ्या दहि-हंड्या फोडण्याची जणू इर्ष्या पेटलेली असते. हंडीतील बक्षीसाची रक्कम ही कायम पाच किंवा सहा अकड्यातच असते. त्यामुळे दहि-हंडी उत्सव हे एक काळ्याचा-पांढरा करण्याचं एक साधन बनलेलं आहे. फार मोठी आर्थिक उलाढाल या उत्सवात होत असल्याने या उत्सवाला एक वेगळंच आर्थिक महत्त्वही आलेलं आहे. यासगळ्यातच काही थर कोसळतात, पुन्हा उभे राहतात. पडलेले गोविंदा स्वत:ला सावरत आपल्याला काहीही झालेलं नाही या उत्साहात बक्षिसाच्या आशेनं पुढे सरकतात. त्यांचेच सहकारी गोविंदा मोठ्या काळजीनं पडलेल्यांची विचारपूस करतात तर आयोजक तू नहीं तो कोई और सही च्या थाटात पुढच्या पथकाचे स्वागत करण्यात गुंग असतात. मग दुसर्‍या दिवशीच्या बातम्यांमध्ये किती रकमेची हंडी फोडली, सगळ्यात अधिक थर कोणी आणि कुठे लावले याच बरोबर किरकोळ आणि गंभीर जखमी झालेल्या गोविंदांची संख्याही असते. मग इ-मेल द्वारे काही घटना विस्ताराने लिहून पैशाच्या रूपात सहानुभूती/मदत गोळा करण्याचे प्रयत्न होतात. नाहीतर कोणा राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये आम्ही कशी त्या "गेलेल्या" गोविंदाच्या कुटुंबाची किंवा पूर्णपणे अपंग झालेल्या गोविंदाची काळजी कशी घेणार आहोत असे जाहिर करण्यासाठी अहमहमिका लागते.
मला आठवतंय दोन वर्षांपूर्वी सुद्धा दहि-हंडी झाल्यावर एक मेल सगळीकडे फिरत होती. एक १२-१३ वर्षा्चा गोविंदा सातव्या थरावरून पडल्याने खांद्याच्या खालचा सगळा भाग लुळा झाल्याने त्याच्या हॉस्पीटलायझेशन्साठी घरच्यांना आर्थिक मदत करा इ. इ. गेल्या वर्षी दहि-हंडीत एक २० वर्षांचा गोविंदा छातीत रक्त साकळल्याने मृत्यू पावला. तो सुद्धा दोनवेळा वरच्या थरांवरून पडला होता. पण आपल्याला काही झालंय/ त्रास होतंय याकडे लक्ष द्यायला त्याला फुरसत कुठे होती? त्याच वर्तमानपत्रांत चार गोविंदा लुळे झाल्याची बातमी आहे. वर्षा-गणिक जशी थरांची आणि हंड्यांच्या बक्षिसांची रक्कम वाढते आहे तशी जखमी, लुळे झालेले, गेलेले गोविंदा यांचीही संख्या वाढतेच आहे. यासर्व तरूण मुलांमध्ये ते गोविंदा आहेत हे जरी साम्य असले तरी अजुन एक साम्य आहे ते म्हणजे सर्वच जण निम्न आर्थिक स्तरातील मराठी आहेत. इतकं सगळं अधोरेखित करण्याचं कारण एकच की दहि-हंड्यांच्या आधी आणि दहि-हंडीच्या दिवशी जी गोविंदा आला रे ची धुन वाजते तीच दोन दिवसांनंतर गोंद्या गेला रे गेला मध्ये बदलून जाते. कित्येक कुटुंब उध्वस्त होतात.
या राजकीय पुढार्‍यांचे काय जाते हंडीची उंची वाढवत रहायला. त्यांचा तर राजकीय फायदाच........एक प्रकारे हे सुद्धा शक्ती प्रदर्शनच आहे. राजकीय शक्तीचे प्रदर्शन पण या गरीब असहाय तरूणांच्या जिवावर. या दही हंड्यांची गरज काय? श्रीकृष्णाचे इतर गुण बघा की. एक मजा म्हणून छोटी दही हंडी फोडणं ठीक आहे. पण या राजकीय पुढार्‍यांचं म्हणजे आयजीच्या जीवावर बायजी उदार असाच प्रकार आहे. या सगळ्या गोविंदा पथकात एक तरी आर्थिक दृष्ट्या उत्तम स्थिती असलेला, राजकीय पुढारी गोविंदा बनलेला दिसतो का? मला तर एक आश्चर्य वाटतं की ह्या राजकारण्यांना........तथाकथित मानवी हक्क संघटनांना याचं काहीच वाटत नाही. खरंच गरीबी फार वाईट असते. त्याचप्रमाणे कमी वेळात, कमी श्रमात जास्त पैसे मिळवण्याची लालसाही चांगली नाही. कलीयुग आहे हेच खरं. वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की हे सगळं श्रीकृष्णाच्या नावाने चालू आहे.
आता असंही ऐकायला येतंय की या दहि-हंड्यांच्या थरांची तुलना परदेशातील मानवी मनोर्‍यांचे विक्रम मोडण्यासाठी केली जातेय. पण परदेशातील मानवी मनोर्‍याचे जागतिक पातळीवरील विक्रम मोडण्याची स्वप्ने दाखवताना हे सुद्धा लक्षात घेतले पाहीजे की तिथे प्रत्येक खेडाळूच्या जीवाची काळजी घेतली जाते. मनोर्‍यांच्या आजूबाजूला ठराविक अंतरापर्यंत स्प्रींगच्या गाद्या किंवा तत्सम सुरक्षा यंत्रणा सजग असते. त्या सगळ्या खेळाडुंना व्यवस्थित प्रशिक्षण दिलेले असते. कदाचित त्यांचा आरोग्य विमा पण उतरवला जात असेल. इथे तर पैशाचं आमीष दाखवून गोविंदांच्या आयुष्यांशी जुगार खेळला जातोय. या गोविंदांच्या जीवावर इतक्या लाखो रूपयांची लयलूट चालू असते पण एकालाही अशी इच्छा होत नाही की त्यांच्या सुरक्षेसाठी व्यवस्थित उपाययोजना आखल्या पाहीजेत. त्यांना व्यव्स्थित प्रशिक्षण, आरोग्य विमा आणि मानवी मनोरा करते वेळी बाजूला स्प्रींगच्या गाद्या किंवा पडलेल्यांना झेलण्यासाठी सुरक्षा जाळी या उपाय योजना तर असायलाच हव्यात. आणि बघ्यांना प्रत्यक्ष मानवी मनोर्‍यापासून ३०-५० फूट दूर उभं करायला हवं. जर एक उपनगर एक दहीहंडी असं ठेवलं तर सुरक्षा उपाय करण्यास योग्य होईल. आरोग्य विमा उतरवण्याची जबाबदारी गोविंदा पथकांना अनिवार्य हवी तर सुरक्षा पुरवण्याची हमी आयोजकांसाठी अनिवार्य हवी. हे सगळं तपासूनच पोलीसांनी दहीहंडी उत्सवाला परवानगी द्यावी.
पूर्वी नाही मुघल राजांच्या राज्यांत निव्वळ मनोरंजनासाठी कोंबडे, बैल यांच्या झुंजी लावल्या जात. त्या झुंजीतच त्यातल्याच एका कोंबड्याचा जीव गेल्याशिवाय झुंज थांबत नसे. तसंच काहीसं विकृत मनोवृत्तींचं दर्शन यासगळ्यातून होतंय. ह्या झुंजीत एकच काय अनेक गोविंदांचे बळी जातायत.......पण ही झुंज कधी थांबणार आणि कोण थांबवणार?........मनात राहून राहून एकच येतंय "गोंद्या गेला रे गेला", "गोंद्या गेला रे गेला"!!

7 comments:

  1. खरच ग विकृत मनोवृत्तीचच दर्शन घडते आहे हयातुन...त्याला राजकारणाची झालरही आहे ...आणि दरवर्षी बळी पडत आहेत असंख्य गोविंदा...आणि आपण हयाकडे फ़क्त मनोरंजन म्ह्णुन पाहतो. :( हयात लवकरच फ़ेरबदल झाले पाहिजेत..त्यादिवशी वर्तमानपत्रात जखमींचे आकडे पाहुन मलाही कसतरीच वाटल होत...खरच हा सण अश्या पदधतीने नकोच..करायचाच असेल तर योग्य सुविधांसह..

    ReplyDelete
  2. हो ना. मला तर एक आश्चर्य वाटतं की ह्या राजकारण्यांना........तथाकथित मानवी हक्क संघटनांना याचं काहीच वाटत नाही. गरीबी फार वाईट असते. त्याचप्रमाणे कमी वेळात, कमी श्रमात जास्त पौसे मिळवण्याची लालसाही चांगली नाही. कलीयुग आहे हेच खरं. वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की हे सगळं श्रीकृष्णाच्या नावाने चालू आहे.

    ReplyDelete
  3. नेमके वर्मावर बोट ठेवलेस तू अपर्णा ! हे असंच घडत आलंय,घडतंय आणि पुढेही घडणार आहे....जरी थोडं फार बिघडत असलं तरी...मराठीत म्हण आहे ना एक..हुज फादर्स व्हॉट गोज....त्याप्रमाणे हे चक्र चालूच राहणार...ह्यातून ना गोविंदा मंडळं धडा घेणार ना राजकीय पक्ष. :(

    ReplyDelete
  4. ताई,
    ही खूप मोठी शोकांतिका आहे! आपल्या देशात माणसाच्या स्पेशली गरीब माणसाच्या जीवाला किंमतच राहिलेली नाही आहे! हेच कटू सत्य आहे!

    ReplyDelete
  5. शांतीसुधाजी,
    आपल्या लेखाच्या शिर्षका मध्येच सारे सार दडले आहे.उत्कृष्ट विचाराचा उत्कृष्ट लेख.धन्यवाद.

    ReplyDelete
  6. गरिबाच्या जिवाची किंमत नाही... इतकंच अजुन काय...

    ReplyDelete
  7. इतरांनी रचलेल्या मनोऱ्यांवर कोणीतरी भलताच चढून लोणी खातो. इथे वास्तव जरा वेगळं आहे. लोणी खाणारा वर दोरीला धरून ठेवून लोणी खातच राहातो, खालचे बिचारे गोविंदा कोसळून पडतात. पण लोणी खाणारे बोके वरचे वर अलगद स्वतःचा बचाव करतात. असा आधुनिक गोपाळकाला आहे. जय हो..!

    खूप नेमका लेख आहे ताई! आवडला!

    ReplyDelete