(छायाचित्र महाजालावरून साभार)
आजच पहाटे सुधीर फडक्यांचं अपूर्ण आत्मचरित्रं "जगाच्या पाठीवर" वाचून पूर्ण झालं आणि अपर्णा वेलणकर भावानुवादित "शांताराम" वाचायला सुरूवात केली. कोणतही पुस्तक वाचताना अगदी प्रस्तावनेपासून ते परिशिष्टाच्या पानांपर्यंत सगळं पूर्ण वाचल्या शिवाय पुस्तक पूर्ण वाचल्याचं समाधान मला मिळतच नाही. याच सवयीने मी शांताराम च्या मुखपृष्ठ, पार्श्वपृष्ठ यांपासून सुरूवात केली (शांता्रामची कहाणी या दोनही पानांवर थोडक्यात दिली आहे). ग्रेगरी डेव्हीड रॉबर्ट्स या ऑस्ट्रेलियन लेखकाची "शांताराम" ही आयुष्याचं सत्य अतिशय उत्कट पणे सांगणारी भावपूर्ण कादंबरी की जिच्यामुळे मुंबई आणि मुंबईतील आयुष्य आज पाश्चात्य जगतात पॉप्युलर आहे. सहा सात वर्षांपूर्वी ही कादंबरी इंग्रजी मध्ये सर्वप्रथम प्रकाशीत झाल्यावर सहाच महिन्यांच्या आत मुंबईकडे येणारा पर्यटक वर्ग झपाट्याने बदलला. धारावी सारख्या संपूर्ण अशिया खंडातील सगळ्यात मोठ्या झोपडपट्टीला एका पर्यटन केंद्राचे स्वरूप प्राप्त झाले आणि धारावी दर्शनच्या दोन दिवसाच्या पॅकेज टुर्स पाश्चात्य पर्यटकां मध्ये अत्यंत लोकप्रिय झाल्या त्या याच कादंबरी मुळे. अतिशयोक्ती नाही पण मुंबईच्या कुलाबा भागात बर्याच वेळा शांताराम मध्ये संदर्भ असलेल्या अनेक ठिकाणांचा शोध घेत (हातात शांताराम घेवून) असलेले पर्यटक दृष्टीस पडत असत. या कादंबरीची कथाच खूप भावपूर्ण आणि आयुअष्याच्या अनुभवांनी ओथंबलेली आहे. एखादं रोपटं आपल्या मूळ जागेतून उपटून टाकल्यावर त्याला एखाद्या दलदलीच्या ठीकाणी रूजण्यास वाव मिळावा आणि मग ते फोफवावं असंच काहीसं ग्रेगरी डेव्हीड रॉबर्टस आणि मुंबई यांचं नातं. हे नातं तर मला आधीच माहीती होतं. पण अपर्णा वेलणकर अनुवादित "शांताराम" वाचायला सुरूवात केली आणि श्री रॉबर्टस यांच्या मराठी भाषे विषयीच्या भावना आणि त्यासुद्धा महाराष्ट्राची राजधानी मुंबईत राहून निर्माण झालेल्या आहेत हे पाहून भरून आलं. श्री रॉबर्ट्स यांच्या भावना अपर्णा वेलणकर यांनी इतक्या समर्थपणे पोहोचवल्या आहेत की त्यांनी मला ही पोस्ट लिहायला भाग पाडलं. आतापर्यंत आपल्या महाराष्ट्राच्या अत्यंत लाडक्या ज्ञानेश्वर माऊलींनी मराठीची गोडवी "अमृतातेही पैजा जिंके........" अशा शब्दांत वर्णन केलेली वाचली होती. श्री सुरेश भट यांनी त्याची महती मराठी अभिमान गीता मधून साकारली. हे दोघेही आपलेच, महाराष्ट्रातच जन्मलेले पण एखाद्या परदेशी माणसाने मराठीची गोडवी गावी, तिच्या प्रत्येक बाजाला संगिताच्या विविध पैलूंची उपमा द्यावी हे माझ्यासाठी तरी नविनच आणि सध्याच्या "महाराष्ट्रात मुंबई पण मुंबईत मराठी नाही" या पार्श्वभूमीवर खूपच आशादायक आणि अभिमानास्पद वाटली म्हणून हा लेख. कॉपी राईटचं पान मला खुणावत असल्याने मी काही मजकूर इथे देवू शकत नाही. जर मला मेहता पब्लिशिंग किंवा अपर्णा वेलणकर यांची परवानगी मिळाली असती तर काही भाग इथे जसाच्या तसा टाकला असता. पण कॉपी राईट चा भंग न कराता आवश्यक तेवढा भाग माझ्या लेखाच्या संदर्भासाठी खाली देत आहे
"भारतात पऊल ठेवल्याक्षणी माझ्या कानावर पडलेली पहीली स्थानिक भाषा होती मराठी. त्या डौलदार भाषेमध्ये गुंफलेल्या लयीने पहिल्या भेटीतच एक अजब गारूड घातलं. मुंबईत रूजता रूजता मराठी ऐकत राहिलो आणि शिकलो." अत्यंत साधेपणाने मराठी विषयीची ओढ यात व्यक्त झाली आहे. सार्याच भारतीय भाषा अत्यंत सुस्वर. त्यात मराठीचा गोडवा काकणभर वरचढच. माझ्या वैराण, नीरस आयुष्यात मराठीने पहिल्या प्रेमाचा पाऊस आणला. त्या कृतज्ञतेपोटी मी मराठी शिकलो........आणि बघता बघता या रूणुझुणुत्या भाषेच्या प्रेमात पडलो." ह्या वाक्यांतून मुंबईत वर्षांनुवर्षे राहणार्या आणि ज्यांना मुंबईने जीवन दिलं आहे, स्वत:ची अशी ओळख दिली आहे त्यांनी खूप काही शिकण्यासारखं आहे. " प्रत्येक शब्दाच्या मुळाशी एकेक गाणं पुरलेलं असावं; इतकं अंगभूत, अत्युत्कट सुरेलपण हा महाराष्ट्राच्या मराठीचा प्राण! ही गाणी मला आजही हाका घालतात. मुंबईत असलो की त्या सवयीच्या सुरेल लकेरी चोहोबाजूंनी अखंड ऐकू येतात." ह्यातील प्रत्येक शब्द न शब्द श्री रॉबर्ट्स यांचं मराठी विषयी, मराठीच्या विविधते विषयी असलेलं प्रेमच व्यक्त करतंय. यातून पुणेकर, मुंबईकर, नागपूरकर, नाशिककर, कोल्हापूरकर, सातारकर, सांगलीकर, सोलापूरकर, लातूरकर, औरंगाबादकर इ. इ. मराठी बांधवांनी आपापला मराठीचा बाज जपत आपल्या माय मराठी विषयी आत्मियता बाळगावी ना की कोणती भाषा किती शुद्ध आणि चांगली यावरून काथ्याकूट करावा. येवढं जरी या पुस्तकाने साधलं तरी ते या पुस्तकाचं महाराष्ट्राच्या दृष्टीकोनातून १००% यश असेल यात शंकाच नाही.
एक शंका विचारतो: मूळ पुस्तकात आणि ह्या भाषांतरित पुस्तकात कुठेही शांतारामाच्या तोंडी ही मराठी भाषा येते काय? की त्यांनी मराठीचे गायलेले गोडवे इंगजीतच आहेत?
ReplyDeleteमी काही मूळ इंग्रजी शांताराम वाचलेलं नाहीये पण अश्वमित्रने दोन-तीन वेळा वाचलं आहे. मराठी अनुवाद मी वाचायला सुरूवात केली आहे. पूर्ण झाल्यावर समजेल. पण अश्वमित्रच्या सांगण्यावरून तरी असे चित्र आहे की तो गावाकडची मराठी भाषा त्याच्या प्रभाकर नावाच्या मित्राच्या गावी राहीला असताना शिकला. कारण त्या लोकांना इंग्रजी किंवा हिंदी येत नव्हते. त्यामुळे गावाकडची मराठी व रस्त्यावर-झोपडपट्टीत वापरली जाणारी "स्ट्रीट मराठी" भाषा त्याला बोलता येत असे. तसं २-३ ठीकाणी मूळ शांताराम मध्ये त्याने नमूद केलं आहे. मी वर उल्लेखलेलं त्याचं मनोगत हे शांताराम च्या मराठी भाषांतराला प्रस्तावना लिहीली त्यातील आहे. म्हणजे ते अतिशय अलिकडचे वक्तव्य असणार. जरी हे गोडवे त्यांनी आपल्या सारख्या मराठीत (कारण मी आधीच म्हंटल्या प्रमाणे अपर्णा वेलणकरांच्या भाषेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या भावना पोहोचवल्या आहेत) गायले नसतील पण त्यांच्या उत्तम इंग्रजी मध्ये गायले तरी फरक काय पडतो? त्यांना मराठी भाषा येते आणि त्यांना मराठी भाषे विषयी वाटणारं प्रेम हेच महत्त्वाचं आहे. त्यांना मराठीचे गोडवे इतक्या शुद्ध भाषे मध्ये गाता येणं अवघडच आहे. आपण तशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. शेवटी भावना महत्त्वाच्या. मला त्यांच्या या भावना "हम तो युपी के है और हिंदी मेंही बात करेंगे" यासारखी वक्तव्यांच्या (आपलं अधिक आयुष्य मुंबईत घालवल्यानंतर व्यक्त केलं जातं) पार्श्वभूमीवर खूपच कौतुकास्पद वाटतं. त्यामुळे तुम्ही उपस्थित करत असलेला प्रश्न फारसा महत्त्वाचा आहे असं मला वाटत नाही.
ReplyDeleteवाचायला हवं हे पुस्तक, शांताराम लेखक ग्रेगरी डेविड रॉबर्टस्
ReplyDeleteआशाताई, शतपावलीवर स्वागत.
ReplyDeleteतुम्ही म्हणताय ते खरंय. खूपच छान पुस्तक आहे. आयुष्याचा एक वेगळाच दृष्टीकोन देवून जातं.
हे पुस्तक वाचायला जरूर आवडेल, अपर्णा वेलणकर अनुवादक म्हणजे सुंदर असणारच.. धन्यवाद अपर्णाताई.
ReplyDeleteI liked it.
ReplyDeleteमी ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट्सचा बीबीसी वरचा इंटरव्ह्यू पाहिलाय..
ReplyDeleteअंजली राव ह्या भारतीय वंशाच्या ऑस्ट्रेलियन बाईबरोबर तो धारावीत सहज फिरत होता...
"अरे बाप रे!" "कसं चाललंय?" वगैरे मराठी वाक्यही तो सहज बोलत होता..त्याची ऍक्सेंट जाणवते...पण मराठी उद्गार योग्य ठिकाणी वापरतो तो...!
मस्त वाटलं वाचून..मी अजून शांताराम वाचली नाहीये!
आप, प्रथमेश शक्य झाल्यास शांताराम जरूर वाचा.
ReplyDeleteबाबा, अरे बरं झालं तू त्याची मुलाखत ऐकलीस ते आणि त्याला मराठी बोलताना ऐकलंस. आता अत्यानंदबाबांची खात्री पटेल असे वाटते. :-))
धन्स!