गेली कित्येक वर्षे रखडलेला अयोध्या वादग्रस्त भूमीचा निकाल रामाच्या बाजूने लागला आणि अखेर तो सोन्याचा दिवस उजाडलाच! बर्याच वर्षांपूर्वी मी अयोध्येत गेले असतानाचा काळ, रामलल्लाची बाहेर एका तंबुत चाललेली पूजा सगळं सगळं आठवलं. स्वत:चं पावित्र्य सिद्ध करण्यासाठी सीतामाईला जशी अग्निपरीक्षा द्यावी लागली तशीच कठोर परीक्षा रामलल्लाला स्वत:च्या जन्मभूमीचं अस्तित्त्व सिद्ध करण्यासाठी द्यावी लागली. अयोध्या-साकेत ही दोन जुळी शहरं, जुन्या काळातील. अयोध्येतील रामायण कालातील पाऊलखुणांमुळे आक्रमक त्याचं नाव नाही बदलू शकले. पण साकेतचं नाव मात्रं फैजाबाद ठेवलं गेलं आणि ते आजही तसंच आहे. आपण कधी जर अयोध्ये मध्ये गेलात तर फैजाबादला जरूर भेट द्यावीच लागते. कारण ते जिल्ह्याचं ठीकाण आहे. तिथे सगळीकडे दुकानांवर तुम्हाला साकेत हे नाव प्रकर्षाने दिसेल आणि मग लक्षात येईल साकेत या नावाचं रहस्य.....फैजाबाद या नावाखाली दडपलं गेलेलं. जरी बाबराने तिथलं श्रीरामजन्मभूमीचं मंदीर तोडून मुस्लीम धर्माच्या विरूद्ध पद्धतीने घाईघाईत डोंब उभे केले पण मूळ बांधकामाचे काही पॅटर्न्स तसेच ठेवले. उदा. घुमटांच्या कमानींवर कमळाच्या फुलांची नक्षी, डोंबांच्या पुढील भागात असलेली पुष्करणी. त्यामुळेच मुस्लीम धर्मिय लोक तिथे कधीच नमाज पढत नसत. कारण ती मशीद आहे हेच त्यांना मान्य नव्हतं. त्यामुळे ती वास्तू तशीच भकास पडून राहीली.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर अयोध्येतील लोकांच्या मनात आलं की आता रामलल्ला पुन्हा तिथे प्रस्थापित झाला पाहीजे. रामायणात अयोध्या पण अयोध्येत राम नाही हे कसं शक्य आहे. म्हणून साधारण १९४८ साली २२, २३ डिसेंबरच्या सुमारास काही महंतांनी गुपचुप रामलल्लाची मूर्ती तिथे प्रस्थापित केली. पण त्यांना रामलल्लाच्या मूर्तीची पूजा अर्चा करण्याची परवानगी नाकारली. त्यामुळे जवळ जवळ १९८९ पर्यंत राम लल्ला कुलुपात बंद होते आणि महंत लोक बाहेरच्या जागेत त्यांची पूजा करत असत. शहाबानो प्रकरणी जेव्हा राजीव गांधी सरकारने मुस्लीम पर्सनल लॉ च्या कायद्यातच सुधारणा करून मुस्लीम समाजाची मने जिंकायचा (मतांसाठी) प्रयत्न केला त्यावेळी हिंदू महासभा, विश्वहिंदू परीषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी यांच्या जागरूकते मुळे राजीव गांधी सरकारला हिंदूंना सुद्धा खुष करण्याची जाणीव झाली. म्हणून त्यांनी अयोध्येतील रामलल्लाला बंधन मुक्त केलं. हिंदूंना तिथे आत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेण्याची आणि त्याची तिन्ही त्रिकाळ पूजा करण्याची परवानगी देण्यात आली. पण हेच सय्यद बुखारी सारख्या धर्मांध मुल्लाला मानवलं नाही.....की ज्याने शहाबानो प्रकरणात सरकारला कायदा बदलण्यास भाग पाडलं होतं. सुन्नी वक्फ बोर्डाला हाताशी धरून विरोध करायला सुरूवात केली. बरं हा मुल्ला दिल्लीच्या जामा मशीदीत बसून अयोध्येतील मशीद नसलेल्या वास्तू मध्ये लोकांनी नमाज पढायला जावे असे तेथिल मुस्लीमांना सांगत होता. त्यांना चिथावत होता. एकीकडे १९९० साली हिंदू महासभेने आणि विश्वहिंदूने रामजन्मभूमीच्या ठीकाणी प्रभुरामाचे मंदीर बांधायचा संकल्प केला आणि वादाला ठीणगी पडली.
त्यावेळी केंद्रात पी व्ही नरसिंहराव यांचे सरकार होते तर उत्तर प्रदेशात मुलायम सिंगांचे. १९९० च्या नोव्हेंबर अंताला अयोध्येत कारसेवा करण्याचा संकल्प सोडला गेला. खरंतर कारसेवा हा शब्द नसून "करसेवा" हा खरा शब्द आहे. शिख गुरूद्वारांमध्ये ही संकल्पना मूलत: अस्तित्त्वात आहे. हाताने (कराने) केलेली सेवा ती करसेवा. मग बांधकाम, स्वयंपाक करणे अशा विविध प्रकारच्या सेवा या करसेवेत येतात. हिंदू महासभा, विश्वहिंदू परीषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा यांनी प्रभुरामाचे मंदीर बांधण्यासाठी अशीच करसेवा करण्याचं ठरवलं आणि तसं तरूणांना आवाहनही करण्यात आलं. पण प्रत्यक्ष करसेवेच्या दिवशी म्हणजे २९ आणि ३० नोव्हेंबर १९९० या दिवशी मुस्लीम व्होट बॅंक वाचवण्यासाठी उप्र मधील मुलायम सिंह सरकारने करसेवकांवर अक्षरश: बंदुकीच्या गोळ्यांचा वर्षाव केला. कित्येक हजार करसेवक जखमी झाले शेकडो करसेवकांना आपले प्राण गमवावे लागले. झालेला नरसंहार दडपण्यासाठी रेल्वेच्या मालगाड्या मृत आणि अत्यवस्थ करसेवकांच्या गाड्या भरून कुठेतरी पाठवण्यात आल्या. त्या दिवसां नंतर अनेक लोकांना आपली करसेवेला गेलेली मुलं परत दिसलीच नाहीत. यात विशेषत: उत्तर प्रदेश, पंजाब आणि राजस्थान मधील करसेवक होते. हा प्रकार खूपच संतापजनक होता. पंजाब मध्ये जलियानवाला बागेत जनरल डायरने ज्याप्रकारे हत्याकांड घडवले त्याच प्रकारे मुलायम सिंगने करसेवकांवर गोळीबार करवला होता. हिंदू लोकां मध्ये संतापाची प्रचंड लाट पसरली. त्यातच उत्तर प्रदेशात निवडणुका होवून मुलायम सिंगाच्या पार्टीचा दारूण पराभव झाला. उत्तर प्रदेशात भाजपाचं सरकार आलं आणि कल्याणसिंह मुख्यमंत्री झाले. दर्म्यान अयोध्येतील हत्याकांडावर प्रसारमाध्यमे आणि केंद्रसरकार सुद्धा आश्चर्यकारकरित्या गप्प राहीले. याचा राग हिंदूंच्या मनात सलत होताच. पुन्हा डिसेंबर १९९२ मध्ये ६ तारखेला करसेवा करण्याचे निश्चित करण्यात आले. लाखो हिंदूंना देशाच्या विविध भागांतून अयोध्येत गोळा केले गेले. त्यामध्ये सर्व वयोगटातील स्त्री-पुरूष होते. ह्यावेळी कल्याण सिंह सरकारने पोलीसांना आदेश दिलेले होते की काहीही झालं तरी लाठी हल्ला सुद्धा करायचा नाही. आणि अखेर ६ डिसेंबरला अनेक वर्षांचं ठसठसणारं गळू फुटलं. म्हणजे करसेवकांना आपल्यावर होत असलेला अन्याय सहन झाला नाही. प्रभुरामचंद्राचं त्याच्याच जन्मभूमीत मंदीर नाही आणि कोण परकिय आक्रमक बाबर त्याच्या नावाच्या इमारतीचं, त्याकाळी हिंदूंच्या झालेल्या अपमानाचं, त्यांच्या अस्मितेची लक्तरं करणार्या इमारतीचं दर्शन त्यांना राम लल्लाच्या दर्शनाच्या वेळी घ्यावं लागत होतं. त्यामुळे अखेर ६ डिसेंबर १९९२ साली त्या इमारतीचे तीनही घुमट कोसळले (पाडले) आणि त्याबरोबर रामलल्ला मुक्त झाले. मशीद नसलेल्या जागेचा उल्लेख पंतप्रधानांनी बाबरी मशीद असा केल्याने आणि प्रसार माध्यमांनी प्रचंड उत्साहाने अतिरंजीत बातम्या दिल्याने थोड्याच काळात सगळीकडे दंगली उसळल्या. महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये सर्वाधिक दंगली झाल्या. नंतर होतच राहील्या.
या सगळ्याच्या मागे पाकीस्तानचे हस्तक असलेल्या दहशतवादी संघटना होत्या हे आता जाहीर आहे. गंमत म्हणजे आपण जर प्रतिभा रानडे यांचं "पाकीस्तान अस्मितेच्या शोधात" हे पुस्तक वाचलं तर याचं मूळ पाकीस्तानातच आहे हे लक्षात येतं. पाकीस्तान निर्मिती झाल्यावर जाणून बुजुन पाकीस्तानचा खोटा इतिहास लिहीण्याचं काम चालू झालं. त्यात बाबराचा उल्लेख अत्यंत मानाने घेतला गेलेला आहे. पाकीस्तान मध्ये कायमच हिंदू विरोधी आणि भारत विरोधी कारवायांना पाठींबा आणि खतपाणीच मिळालं आहे. याचाच परिपाक म्हणजे काश्मीर मधील हिंदू वरील वाढते हल्ले आणि काश्मीर मधील दहशतवाद. खरंतर ६ डिसेंबरला फक्त एक वादग्रस्त इमारत जमीनदोस्त झाली होती (मशीद नाही) आणि एकही मुस्लीम मारला गेला नव्हता तरी बांग्लादेशात, पाकीस्तानात बरीच मंदीरे जाळली अनेक हिंदूंना मारलं. ह्या सगळ्याची माहीती तस्लीमा नसरीन यांच्या लज्जा या कादंबरीत वाचायला मिळते. पाकीस्तान पुरस्कृत हा दहशतवाद काश्मीरपर्यंत सीमीत होता तो एकदम मुंबईत पसरला दाउद इब्राहीम या अंडरवर्ल्ड डॉनच्या रूपाने. पुढच्या घटना सर्वांनाच माहीत असतील. प्रयत्न पूर्वक अयोध्यावाद चिघळवत ठेवला गेला. यात भाजपा सारख्या हिंदूत्त्ववादी पक्षांचा सुद्धा काहीप्रमाणात दोष आहे. पण त्यांनाच फक्त दोष देवून उपयोग नाही कारण विशिष्ट धर्माचं लांगूलचालन करून सत्ता मिळवायचा खेळ कॉंग्रेस फार आधीपासून खेळत आहे. ज्यांना १९४७ नंतरच्या भारतीय राजकारणातील घडामोडींचं ज्ञान आहे त्यांना ते सहज लक्षात येईल. पण भाजपा काय किंवा रास्वसं काय यांनी गोध्रा सारख्या भयंकर हत्याकांडाची आणि त्यानंतरच्या गुजरात मधील दंगलींची अपेक्षाच केली नव्हती.जर आपण एम व्ही कामत आणि कालिंदी रणधेरी लिखित "नरेंद्र मोदी :आर्कीटेक्ट ऑफ मॉडर्न स्टेट" हे पुस्तक वाचलंत तर दोन आयोगांपैकी एका आयोगाच्या रीपोर्ट मध्ये हे स्पष्ट होतं की गोध्रा मध्ये १९९२ नंतर सीमा ओलांडून अनेक पाकीस्तानी लोक अनधिकृतरित्या आलेले होते, त्यांचे पाकीस्तानातील दहशतवादी संघटनांशी संबंध होते. गोध्राला साबरमती एक्स्प्रेसचा (जी अयोध्येहून येत होती) एस ६ डबा जाळण्याचा प्रकार हा पूर्व नियोजित कट होता. प्लॅटफॉर्मवरच्या फेरीवाल्याशी झालेल्या बाचाबाचीचं निमित्त दाखवलं गेलं पण जर हे पूर्व नियोजित नव्हतं तर संपूर्ण डबा जाळण्यास ज्या मात्रेत पेट्रोल लागतं तेव्ह्ढं अचानक कुठुन आलं? तिथला पोलीस अधिकारी उप्र मधील मुस्लीम होता आणि त्या घटनेच्या एकच दिवस आधी त्यानं महीन्याभराची सुट्टी मागून उप्र मधील गावी पलायन केलें होतं.त्यानंतर च्या दंगलींचं भडक कव्हरेज सगळ्या वाहीन्यांनी दाखवल्याने दंगलींमध्ये अजुनच भर पडली. आपल्या बरखा दत्त बाईंचं आतताई रीपोर्टींग तर सगळ्यांच्या परिचयाचं आहेच. नरंद्र मोदींना खूनी, मुस्लीम द्वेषी अशी बिरूदावली जोडली गेली. त्यांना बदनाम करण्याचा चंगच बांधला. पण आज त्याच गुजरात मध्ये नरेंद्र मोदींनी जी शांतता प्रस्थापित केली आहे, गुजरातची जी प्रगती केली आहे त्यावर हे सगळे एकदम चिडी चुप. असो.
आज घडीला (२६/११, २३/१२, १२/३, गोध्रा, गुजरात दंगली) असे सगळे अनुभव घेतल्यावर दोन्ही धर्मांचे लोक शहाणे झालेत. सरकारने सुद्धा सावधानता बाळगली आणि मुख्य म्हणजे प्रसारमाध्यमांना काबूत ठेवलंय (नाहीतर असं काही असलं की त्यांना खूप चेव चढतो आणि मोकाट सुटलेल्या जनावरासारखे रीपोर्टींग करत फिरत असतात). त्यामूळे सगळीकडे या निकाला नंतर शांतता आहे. लोकांना पाकीस्तानचा अंतस्थ हेतू समजलेला आहे त्यामुळे कदाचित लोकांनीच आपणहून ठरवलं असणार की शांतता राखली पाहीजे. हा सुद्धा एक सोन्याचा दिवसच म्हंटला पाहीजे. पण ह्या सोन्याच्या दिवसाला गालबोट लागणार नाही याची खबरदारी घेणं आता आपल्याच हातात आहे. हा निकाल काही एका धर्माच्या बाजूने लागलेला नाही. पण हिंदूंना एक समाधान की रामजन्मभूमीचं अस्तित्त्व मान्य केलं गेलं. हे ही नसे थोडके. कालांतराने अर्जदार पुन्हा सर्वोच्च न्यायालयात अपिल करतील तेव्हा सुद्धा कदाचित असाच तणाव वातावरणात असेल. राहून राहून हेच वाटतं की बाबराने अनेक वर्षांपूर्वी आक्रमण करून प्रभुश्रीरामाचं मंदीर तोडणं आणि २३/१२ ला पाकीस्तानी दहशतवाद्यांनी भारतीय संसदेवर हल्ला करणं, तसेच २६/११ ला मुंबईवर हल्ला करणं ह्या मध्ये साम्य एकच, हे सगळे आपल्या राष्ट्रीय अस्मितेवरचे हल्ले आहेत. कारण यांमध्ये आक्रमणकर्ते हे परकीय होते आणि त्यांची मानसिकता दहशत पसरवणे हीच होती. मग प्रभुश्रीरामाच्या जन्मभुमीच्या जागेवर आक्रमक बाबराचं स्मारक उभं करायचं (की जो पाकीस्तानचा राष्ट्रपुरूष म्हणून खोट्या इतिहासात मानला जातो) म्हणजे अफजल गुरूच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी न करणं आणि कसाबला जावई म्हणून वागवत तुरूंगात ठेवणं आहे. मला आनंद याच गोष्टीचा होतो की आलाहाबाद उच्च न्यायालयाने आपल्या राष्ट्रीयअस्मितेचा विचार केला आणि निर्णय दिला. आता लवकर अफजल गुरू आणि कसाब यांच्या फाशी्च्या शिक्षेची अंमलबजावणी करण्याची बुद्धी आपल्या न्यायव्यवस्थेला लवकर मिळो हीच प्रभुरामचंद्राच्या चरणी प्रार्थना.
काही जणांना घडल्या गोष्टीं मध्ये काहीच रस उरलेला नाही, आजच्या मटा मध्ये तर चक्क एका कारसेवकाचे पश्चाताप दग्ध असे पत्रं ही छापून आले आहे, खूप काळ गेल्याने अनेकांना अयोध्यावाद काय आहे हेच माहीती नाही तर काही जणांना एकदम भारतातील भ्रष्टाचार, महागाई, दारिद्र्य, शेतकरी अत्महत्त्या, रस्त्यांवरील खड्डे, झपाट्याने पसरत चाललेली रोगराई यांसारखे मुद्दे अचानक महत्त्वाचे वाटू लागले आणि या वादापेक्षा याच मुद्द्यांकडे लक्ष द्यावे असाही प्रचार केला गेला. मला असं वाटतं की हे सगळे मुद्दे हे घरचे मुद्दे आहेत आणि अयोध्या वाद हा परकिय आक्रमणाशी निगडीत असून राष्ट्रीय अस्मितेचा मुद्दा आहे. हे मुद्दे महत्त्वाचे आहेत पण अयोध्या वादाचा निकाल काहीही लागला असता तरी ह्या घरच्या मुद्द्यांवर कृती करणं हे सरकारचं काम आहे. बहुतांशी या घरातील मुद्द्यांना सरकार आणि निष्प्रभ विरोधी पक्ष जबाबदार आहेत. त्यामुळे या मुद्द्यांची आणि अयोध्या वादाची कोणी तुलना सुद्धा करू नये. दोन्ही धर्माच्या समाजातील लोकांनी तसेच देशाने त्याची जबर किंमत मोजली आहे हे श्री अन्सारी यांच्या वक्तव्या वरून दिसून येतेच. त्यामुळे हा सोन्याचा दिवस आपल्याला दिसला आहे त्याची झळाळी तशीच ठेवून पुढे पाऊल टाकायला हवे येवढीच प्रभुश्रीरामचंद्रांच्या चरणी प्रार्थना.