Friday, 17 June 2011

स्टॅनली का डिब्बा!!


एक शाळकरी मुलगा एका कॉन्व्हेंट शाळेत प्रवेश करतो, मदर मेरी आणि जिझस यांच्या पुतळ्यापुढे हात जोडून वर्गात जातो याने चित्रपटाची सुरूवात होते. त्या मुलाचं नाव असतं स्टॅनली. शाळा सुरू व्हायला बराच अवकाश असल्याने वर्गात कोणीच नसतं. मग स्टॅनली थोडा राहिलेला होमवर्क करतो आणि मग बाकावरच ताणून देतो. हळूहळू शाळेत मुलं यायला सुरूवात होते. स्टॅनली संपूर्ण वर्गात सगळ्यांचा आवडता असतो तो त्याच्या मधील गुणांमुळे. शाळेच्या मधल्या सुट्टीत स्टॅनली सोडून सगळी मुलं डबा आणत. स्टॅनली मात्र वडा-पाव खाऊन येतो असं सांगून भरपूर पाणी पिऊन यायचा. इंग्लीशची शिक्षीका रोझी टीचर मुलांवर प्रेमाने बोलून त्यांच्या प्रत्येक सर्जनशीलतेला दाद देऊन मुलांना प्रोत्साहन द्यायची. याउलट विज्ञान शिक्षिका मिसेस अय्यर मुलांच्या प्रत्येक कृतीवर डोळे वटारायची. हिंदी शिकवणारे आणि संधी मिळेल तेव्हा मुलांच्या तसेच सहकारी शिक्षकांच्या डब्यात हात घालणारे खादाड वर्मा सर, स्टॅनलीला डबा न आणण्यावरून आणि मित्रांचा डबा खाण्यावरून खूप बोलायचे. स्टॅनलीच्या वर्गातील मित्र वर्मासरांना चुकवुन डबे खायचं ठरवतात आणि हेच स्टॅनलीच्या मित्रांबरोबर डबा खाण्याच्या आनंदाच्या मुळावर येतं. एक दिवस वर्मासर स्टॅनली ला सांगतात डबा नसेल तर शाळेतही यायचं नाही. स्टॅनली मग शाळेत यायचं थांबवतो की डबा आणतो? चित्रपटाच्या सुरूवातीपासूनच स्टॅनलीच्या वैयक्तीक आयुष्याबद्धल एक गूढता निर्माण झालेली असते. त्याचं रहस्य उलगडतं का? हे समजण्यासाठी स्टॅनली का डिब्बा हा चित्रपट जरूर बघावा.

लहान मुलांची बाल सुलभ मैत्री आणि आपण लहानपणापासून पहात आलेल्या विविध व्यक्तीमत्त्व असलेले शिक्षक यांचं प्रभावी चित्रण यात आहे. त्याचप्रमाणे अत्यंत नैसर्गिकरित्या सर्व चित्रिकरण केलेलं आहे. तारे जमीन पर या चित्रपटाचे लेखक अमोल गुप्ते यांनीच लिहीलेला आणि दिग्दर्शित केलेला स्टॅनली का डिब्बा समाजातील एका महत्त्वाच्या विषयावर भाष्य करून जातो. कोणत्याही संवेदनशील मनाच्या डोळ्यात हा चित्रपट पाणी उभं करतो. मागे एकदा खुपते तिथे गुप्तेमधे अमोल गुप्तेंच्या मुलाखतीत त्यांनी स्टॅनली का डिब्बा विषयी सांगीतलं होतं. एक महत्त्वाचा विषय हाताळतानाच त्यांनी एन्टरटेनमेंट इंडस्ट्रीला एक महत्त्वाचा संदेशही दिला आहे. सध्या जिथे जिथे लहान मुलं एन्टरटेनमेंट इंडस्ट्री मध्ये काहीना काही कारणाने (म्हणजे विविध स्पर्धा, रिअ‍ॅलीटी शोज, दैनंदिन मालिका, विविध जाहिराती) काम करत असतात त्यांच्या शाळा प्रचंड बुडतात. एका एका एपिसोडचं काम ७-८ तास चाललं तर बाल कलाकारांना अक्षरश: ताटकळत बसावं लागतं. मग सेट हेच त्यांचं घर आणि खेळण्याचं ठीकाण होतं. हे सुद्धा एक प्रकारचे "बाल कामगार" च आहेत. स्टॅनली का डिब्बा मध्ये अमोल गुप्ते यांनी बाल कामगारांची समस्या अतिशय तरल आणि प्रभावीपणे मांडण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. पण हे करताना चित्रपटात काम करणार्‍या बाल कलाकारांना त्यांची शाळा, अभ्यास आणि इतर उपक्रम बुडवायला नाही लागले. या बाल कलाकारांच्या नेहमीच्या आयुष्याला जराही धक्का न पोहोचवता अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात, त्या मुलांना कळु न देता अमोल गुप्ते यांनी या चित्रपटाचं शुटींग प्रत्येक आठवड्याचे फक्त शनि-रवि असे दोन दिवस कार्यशाळेला बोलावून १२-१३ आठवड्यात चित्रिकरण पूर्ण केलं. कोणत्याही प्रकारचा भव्य दिव्य सेट यात वापरलेला नाही. तरीही चित्रपटाच्या काही तांत्रिक बाबतीत प्रश्न पडतात. एक शिक्षक जर मधल्या सुट्टीत मुलांचे तसेच सहकारी शिक्षकांचे डबे विचारून किंवा चोरून खात असेल तर त्याविषयी प्रिंसीपलना काहीच कल्पना नसणे आणि शाळेमार्फत त्यावर काहीच कारवाई न होणे हे अतिशय कृत्रिम वाटते. एक शिक्षक शाळेतल्या मुलाला डबा आणला नाहीस तर शाळेत येऊ नकोस असं सांगू शकतो का? आणि जर एखाद्याने सांगीतलंच तर याचा पत्ता शाळेच्या मुख्याध्यापकांना नसावा (इतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांना माहिती असूनही) हे जरा अतिरंजीत वाटतं. शाळेत येणार्‍या प्रत्येक मुलाच्या घरची पार्श्वभूमी ही वर्ग शिक्षक तसेच मुख्याध्यापक यांना माहिती असतेच. ह्या चित्रपटात ते जाणून घेण्याची कोणी तसदी सुद्धा घेत नाही अगदी शेवटपर्यंत हे खटकतं.
बाल कामगारांचा प्रश्न जरी प्रभावीपणे पोहोचवण्याचा एक चांगला प्रयत्न असला तरी शेवट कुठेतरी अर्धवट वाटतो. अमोल गुप्ते हे एक चांगले लेखक तर आहेतच पण त्याहूनही अधिक एक मानसशास्त्रज्ञ वाटतात. मुलांचं मानसशास्त्र त्यांना अगदी चांगलं उमगलेलं आहे हे चित्रपटात दिसून येतं. त्यांच्याकडून यापेक्षाही अधिक उत्तम आणि दर्जेदार चित्रपटांची अपेक्षा आहे की जे लहान मुलांचे विविध प्रश्न प्रभावीपणे मांडू शकतील. त्यांना त्यासाठी शुभेच्छा!!

2 comments:

  1. स्टॅनली का डिब्बा बघितलाय. एक उत्कृष्ट कलाकृती, असे विषय हाताळले जात आहेत ही खरंच कौतुकाची बाब आहे.

    अमोल गुप्ते हे एक चांगले लेखक तर आहेतच पण त्याहूनही अधिक एक मानसशास्त्रज्ञ वाटतात. मुलांचं मानसशास्त्र त्यांना अगदी चांगलं उमगलेलं आहे हे चित्रपटात दिसून येतं. +१

    ReplyDelete
  2. >>एक शिक्षक जर मधल्या सुट्टीत मुलांचे तसेच सहकारी शिक्षकांचे डबे विचारून किंवा चोरून खात असेल तर त्याविषयी प्रिंसीपलना काहीच कल्पना नसणे आणि शाळेमार्फत त्यावर काहीच कारवाई न होणे हे अतिशय कृत्रिम वाटते. >>

    असे प्रश्न अनेक चित्रपट पाहताना पडतात. एका अर्थी अतिरंजितता हे चित्रपटांचे सामर्थ्य असते आणि काही अंशी मर्यादाही!

    ReplyDelete