Wednesday, 9 March 2011

उर्जावाद-धर्मवाद-दहशतवाद: एक अपशकुनी त्रिकोण!!

१८ व्या शतकातील यंत्रवादाची जागा १९ व्या शतकात साम्राज्यवाद आणि उर्जावादाने घेतली. या उर्जावादातीलच शह-काटशहाचं राजकारण करत २० व्या शतकात साम्राज्यवादी तसेच साम्यवादी शक्तींनी धर्मवादाचा भस्मासूर निर्माण केला. २१ व्या शतकाच्या अगदी तोंडाशीच या धर्मवादाने दहशतवादाला जन्माला घातलं. ह्या सगळ्या राजकारणाचा उलगडा आपल्याला लोकसत्ताचे नविन संपादक श्री गिरीश कुबेर यांच्या "हा तेल नावाचा इतिहास आहे", "एका तेलियाने" आणि "अधर्मयुद्ध" या ट्रायलॉजीमध्ये होतो. श्री गिरीश कुबेर यांची अभ्यासपूर्ण आणि वाचनीय अशी लेखन शैली आपल्याला त्या सगळ्या इतिहासात ओढत नेते आणि त्याचं वर्तमानात चालू असलेल्या घटनांशी असलेला सहसंबंध उलगडून दाखवते. सगळ्याच मानवताप्रेमी, देशप्रेमी, अभ्यासू वृत्तीच्या वाचकमित्रांकडे संग्राह्य असावीत अशी ही तीन पुस्तकं.

याच तीन पुस्तकांना पूरक अशी माहीती म्हणजे त्यावेळी अफगाणिस्तानात कशी परिस्थीती होती याची तपशीलवार माहीती आपल्याला श्रीमती प्रतिभा रानडे यांच्या "अफगाण डायरी काल आणि आज" या अभ्यासपूर्ण तसेच प्रत्यक्ष अनुभवसिद्ध पुस्तकातून होते. या पुस्तकातून आपल्याला तालीबान हा दुसर्‍या महायुद्धानंतर रशियाविरोधी शीत युद्धात अमेरिकेनेच निर्माण केलेला भस्मासूर असल्याचे स्पष्टीकरणही मिळते. मध्य-पूर्वेच्या देशांतील एकूणच इतिहास समजून त्यांच्या वर्तमानाशी अमेरिकादी पाश्चात्य देशच कसे कारणीभूत आहेत हे सुद्धा लक्षात येते. आवर्जून आपल्या संग्रही असावं असं अजुन एक पुस्तक.

जेव्हा धर्मवाद जन्माला आला त्याचाच एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे "पाकीस्तानची निर्मिती". मध्यपूर्वेकडील कोणत्याही मुस्लीम देशातील लोकांना विचारलं तर ते सर्वप्रथम आपण नक्की कोणत्या वंशाचे आहोत हे आणि मगच आपण मुस्लीम असल्याचे सांगतात. उदाहरणार्थ: अफगाणीस्तानातील लोक स्वत:ला अफगाणी म्हणवतात, इराण मधील लोक स्वत:ला इराणी म्हणवतात, इजिप्त मधली लोकं इजिप्शीअन आहेत असं म्हणवून घेतात. त्यामुळे त्यांचं अस्तित्त्व हे त्या त्या भौगोलिक भागाच्या पूर्व संस्कृतीशी अधिक जोडलं गेलेलं आहे. पाकीस्तानची निर्मितीच मुळात इस्लामच्या नावाखाली झाली आहे. ज्या भौगोलिक संस्कृतीशी (भारतीय) त्यांची खरी नाळ जोडलेली आहे त्याचा ते स्विकार करत नाहीत. त्यामुळे पाकिस्तान हे इस्लामिक धर्मांधता आणि अधुनिक प्रगती याच्या कात्रीत सापड्लं आहे. त्यामुळे याच धर्मांधतेने पाकीस्तानात अनेक दहशतवादी हल्ले होत आहेत, पाकीस्तानातील धर्मांध लोक जगात इतरत्र दहशतवाद पसरवत आहेत, दहशतवादी हल्ले करत आहेत. यामुळे पाकीस्तानातील सामान्य जनतेचे हाल होत आहेत. पण पाकीस्तान निर्मितीनंतर आत्तापर्यंत विविध राज्यकर्त्यांनी, लष्करशहांनी पाकीस्तानला स्वत:ची अशी ओळख देण्याचा प्रयत्न केला पण अजुनही पाकीस्तानची ओळख एक दहशतवादी देश, दहशतवाद्यांना मदत करणारा, दहशतवादी तयार करणारा देश अशीच निर्माण झाली आहे. या प्रगतीशील जगात एकूणच पाकीस्तानच्या स्वओळखीच्या मध्ये धर्मांधता, टोकाचं इस्लामिकरण येत आहे. जर पाकीस्तानने कट्टर धर्मवाद सोडला तर त्यांना स्वत:ची अशी ओळखच उरत नाही. श्रीमती प्रतिभा रानडे यांनी "पाकीस्तान अस्मितेच्या शोधात" आणि "फाळणी ते फाळणी" या दोन पुस्तकांतून छान मांडणी केली आहे. एकूणच जगाच्या पाठीवर सध्या जो काही अनागोंदी कारभार माजला आहे त्याचा इतिहासातील अनेक घटनांशी सुसंगती लागण्यासाठी, त्यांच्यातील सहसंबंध उलगडण्यासाठी, ही सहा पुस्तकं लागोपाठ वाचावीत.

16 comments:

  1. > इराण मधील लोक स्वत:ला इराणी म्हणवतात
    >----
    पाकिस्तानातले लोकही स्वत:ला पंजाबी वा सिंधी म्हणवतात. दहशतवाद, धर्मांधता त्या सर्व टापूत पसरली असता इतर देशांतल्या अनागोंदीकडे डोळेझाक करून सर्व दोष पाकिस्तानवर का ढकलायचा?

    > जर पाकीस्तानने कट्टर धर्मवाद सोडला तर त्यांना स्वत:ची अशी ओळखच उरत नाही.
    >---
    पश्चिम पंजाब भारतातच राहिला असता तर हेच मत तुम्ही मांडलं असतं का? 'त्यांनी वेगळा देश केला' यापलिकडे काय बदल झाला आहे? भारतात ऐहिक प्रगती कितीही झाली असो, भारत अत्यंत असंस्कृत देश बनत चालला आहे. भ्रष्टाचार आहे. संस्कृतीचे पाइक बालगंधर्व, प्रभात-सिनेमा असण्याचे दिवस कधीच गेलेत. आताची भारतीय संस्कृती म्हणजे आर डी बर्मन आणि अमिताभ बच्चन. पाकिस्तानात परिस्थिती यापेक्षा जास्त बिघडलेली नसावी. सवंग पाश्चात्य संस्कृतीला भारतीय लोक फक्त तोंडानी शिव्या देतात. त्या संस्कृतीचं आक्रमण थोपवण्यात इस्लामची इच्छा आणि यश हे हिन्दुस्थान दाखवू शकलेला नाही. नैतिकतेच्या अनेक निकषांत आज़ पाकिस्तान आपल्यापेक्षा उज़वा असल्यास आश्चर्य वाटू नये. टिळक ज़र आज़ गणेशोत्सवात पुण्यात फिरले तर कदाचित दहशतवादी लोकांनी काही ठिकाणी गोंधळ घालून उत्सव बन्द पाडावा, म्हणून देवाला गार्‍हाणं घालतील.

    १९४०-कडे लाहोरमधे राहिलेले लोक त्या दिवसांविषयी प्रेमाने बोलतात. पाकिस्तानात संस्कृतीची पिछेहाट झाली असेलही, पण भारतातही चित्र विशेष वेगळं नाही.

    - नानिवडेकर

    ReplyDelete
  2. पाकीस्तानमधले लोक स्वत:ला काही सिंधी काही पंजाबी म्हणवून घेत असले तरी त्याची तुलना स्वत:ला इराणी आणि अफगाणी म्हणवून घेणार्‍यांशी होत नाही. कारण हे लोक स्वत:च्या कम्युनीटीशिवाय इतरांना शुद्ध मुसलमान समजत नाहीत. म्हणूनच तर पाकीस्तानपासून बांग्लादेश वेगळा झाला. मी प्रगतीची तुलना करत नाहीच आहे. आजही आपल्या देशात कोणत्याही भारतीयाला अस्मीतेचा प्रश्न नाहीये. जरी प्रांतवाद बोकाळला असला तरी विशिष्ट प्रांतातील लोक आम्हीच शुद्ध भारतीय किंवा हिंदू म्हणून दुसर्‍या प्रांतातील लोकांची कत्तल करत नाहीयेत. पाकीस्तानने मूळातच असंच स्वप्न पाहीलं की सगळ्या जगातील इस्लामिक साम्राज्याचं नेतृत्त्व करायचं. पण नेतृत्त्व करण्यासाठी क्षमता लागते. क्षमता येण्यासाठी तेवढी स्वयंपूर्णता आणि ताकद लागते. जो देश सर्वच गोष्टींसाठी अमेरिकेवर अवलंबुन आहे तो देश काय नेतृत्त्व करणार? सध्या पाकीस्तान फक्त एक दलाल बनला आहे. अमेरिका आणि इस्लामिक दहशतवाद्यांमधील. अशा वाईट चक्रात अडकला आहे की सुटण्याची शक्यताच नाही.
    पाकीस्तानमधील कित्येक लोकांना वाटतं की भारतातच रहायला जावं. खुद्द जिनांना तशी उपरती पाकीस्तान निर्मितीनंतर ताबडतोब झाली होती. कारण त्यांना मुस्लीमराष्ट्र नको होते. पण नेहरूंची आणि जिनांची राजकीय महत्त्वाकांक्षा एकमेकांसमोर उभी ठाकल्याने आणि गांधींनी जीनांना दुर्लक्षीत केल्याने पाकीस्तानची निर्मिती झाली. मला नक्की काय म्हणायचं आहे हे तुम्ही जर प्रतिभा रानड्यांची पुस्तकं वाचलीत आणि त्याच बरोबर गंगाधर गाडगीळ लिखित दुर्दम्य वाचलंत तर लक्षात येईल. सगळं इथं लिहीत बसले तर एक पुस्तकच तयार होईल. मला अकारण पुनरावृत्त्या टाळायच्या आहेत.

    ReplyDelete
  3. > हे लोक स्वत:च्या कम्युनीटीशिवाय इतरांना शुद्ध मुसलमान समजत नाहीत.
    >---
    मुख्य वंश सोडून इतरांना त्रास/कत्तल हे प्रकार सौदी अरेबिया, इराक़, इराण, बांगला देश इथेही झाले आहेत. जर्मनीतही. जर्मनी आणि फ़्रान्स मधे सद्‌ध्या इस्लामविरोध वाढतो आहे. पुढे कत्तलीही होऊ शकतील.

    पाकिस्तान धर्मवेडं राष्ट्र होण्यापासून टाळण्याविषयी भ्रम बाळगण्याइतके जिन्ना भोळे नव्हते. काश्मीर टिकवताना भारताला नाकी नऊ येताहेत. अगदी सावरकर पन्तप्रधान असते आणि जिना भारतवादी राहिले असते तरी मुसलमानांनी त्यांच्याकडून पाकिस्तान सहज़ बळकावला असता. (हा माझा कयास; पुरावा काही नाही.)

    नैतिक आचरणाबद्दल इस्लाम जितका आग्रही, आणि यशस्वीरित्या आग्रही, आहे तितका इतर कुठलाही धर्म नसावा.

    अमुक एक पुस्तक वाचून अमुक मत होत असेल तर त्याच्या पूर्ण विरुद्‌ध मत माण्डणारं पुस्तक सहज़ दाखवता येतं, असं माझं निरीक्षण आहे. इस्लाममधल्या त्रुटीच चघळायच्या, त्या धर्माच्या श्रेष्ठ तत्त्वांकडे लक्षच द्‌यायचं नाही, त्यांची बलस्थानं समज़ून घ्यायची नाहीत, ही भारताला संवय आहे. आपण राणा प्रतापाच्या फक्त गोष्टी सांगतो. इस्लाममधे स्वत: गुहांमधे राहून, सुखसोयींचा त्याग करून न आवडणार्‍या अमेरिकेला आह्‌वान देणारा, 'जीवित तृणवत मानावे' हा रामदासांचा सल्ला आचरणारा बिन लादेन १०-२० वर्षांपूर्वी निर्माण झाला आहे. तेव्हा सावरकर गांधींसमोर हरले असले तरी त्याबाबत एक आकर्षक वलय आहे, त्याप्रमाणे इस्लाम अमेरिकेकडून बरीच पीछेहाट सहन करत असला तरी त्या पराभवालाही आकर्षक वलय आहे. याबाबत वर्षा भोसलेनी इराक़ी किती थोर आहेत असा लेख ८-९ वर्षांपूर्वी लिहिला होता, तो ही प्रतिभा रानड्यांच्या पुस्तकाबरोबर वाचला ज़ावा. मुसलमानांवरची टीका वाचली ज़ाते, त्याप्रमाणे एकदा रेल्वे डब्यात एका मुसलमानानी दहा हिन्दुंना दमदाटी केली याबाबतचा हेडगेवारांच्या पत्रातला विषादपूर्ण पण आदरयुक्त उल्लेखही वाचला ज़ावा. सध्या या विषयावर एकांगी वर्णनाचा सुळसुळाट आहे. एक म्हणतो: 'पाकिस्तान फुटणारच.' इतर म्हणतात: 'नक्कीच'. त्याआधी काश्मीर भारतापासून फुटून निघणारच नाही, याची खात्री काय?

    ReplyDelete
  4. आपल्या धर्मश्रद्धेपेक्षा वेगळ्या धर्मश्रद्धांचा नायनाट करा असे सांगणारा धर्म श्रेष्ठ कसा ठरू शकतो?

    ReplyDelete
  5. इस्लामबाबतच्या सर्वच गोष्टींचं मी समर्थन करणार नाही, पण अमुक एक गोष्ट का म्हटल्या गेली याबाबत माझ्या परीनी विचार करू शकतो. 'माझ्या प्रतिभेला दिसणार्‍या (वा मला साक्षात्कारानी ऐकू आलेल्या) धर्माच्या चौकटीबाहेर आचरण झाल्यास तो मार्ग अध:पाताकडे नेईल, तेव्हा इतर धर्मियांची इच्छा असो वा नसो, त्यांना माझ्या मार्गात ओढा. ते तसे न आल्यास त्यांना अधर्माला चिकटून राहणारे समज़ून नष्ट करा.' असा विचार त्यामागे असू शकेल, ज़ो मला काही प्रमाणात पटू शकतो. इतके उग्र नियम दिले, ते उग्रपणे पाळल्याही ज़ाताहेत, मग इस्लामिक देशांत भ्रष्टाचार कसा? मुसलमानांत गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात का? या प्रश्नांची उत्तरं माझ्याज़वळ नाहीत. पण नैतिक आचरणाबाबत मुसलमान फार ज़ागरूक असतात, आणि गोर्‍यांना १००-१५० वर्षांपासून आणि हिन्दुंना निदान २५-३० वर्षांपासून त्याबाबत विधिनिषेध नसतो हे माझं निरीक्षण आहे.

    ReplyDelete
  6. श्री नानिवडेकर, माझ्या वरील लेखात मी अफगाणीस्तानातील मुसलमान वाईट इ. असं प्रतिभा रानडे यांनी लिहीलं आहे किंवा त्यांचं पुस्तक वाचून मला तसं वाटलं असं सुद्धा म्हंटलेलं नाही. त्यामुळे कृपाकरून चर्चा दुसरीकडेच भरकटवु नका. त्यांच्याच अफगाण डायरी या पुस्तकात त्यांनी अतिशय वस्तुनिष्ठपणे सर्व परिस्थीतीचे वर्णन केलं आहे. तेव्हा माझं लेखन किंवा व्यक्त करण्याची समज चुकीची आहे असं वाटलं तर म्हणा म्हणजे ते वाचून तुमचा चांगलाच गैरसमज झालाय म्हणून सांगीतलं. पण प्रतिभा रानड्यांच्या पुस्तकाला तुम्ही स्वत: न वाचताच एकांगी ठरवु नका ही कळकळीची विनंती.

    या लेखाचा उद्देश हा फक्त लेखात उल्लेखलेल्या पुस्तकांची ओळख करून देणे हा आहे. त्यामुळे या लेखावरील चर्चा मी उगाच मुसलमान धर्म चांगला की वाईट इकडे नेणार नाही. त्यामुळे जे संदर्भ अनावश्यक आहेत त्यांना मी प्रतिसाद लिहीलेला नाही. क्षमस्व.

    ReplyDelete
  7. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  8. कोणताही धर्मांधपणा वाईटच आहे. वरील पुस्तकांमध्ये ज्या ऊर्जावाद, धर्मवाद आणि दहशतवादाची सांगड घातलेली आहे तो फक्त इस्लामिक धर्मांधतेशीच निगडीत आहे. कारण ऊर्जावादामध्ये प्रामुख्याने तेल आणि तेल उपल्ब्ध असलेले देश की जे कर्मधर्म संयोगाने मुस्लीम आहेत. जगभर आज जो दहशतवाद पसरलेला आहे तो इस्लामिक दहशतवादच आहे कारण सगळेच दहशतवादी इस्लामी आहेत. तुम्ही तुमच्या प्र्तिसादात एस्लाम वाईट आणि पाकीस्तान वाईट असं प्रोजेक्ट करत आहात की जो तुमचा माझ्या लेखनाविषयी असलेला पूर्वग्रह आहे. तुमच्या या पूर्वग्रहाशी संबंधीत तुम्ही रास्वसंघ आणि इतर असा काही संबंध माझ्या लेखनाशी जोडता आहात तो पूर्णत: चुकीचा आहे.
    माझं ब्लॉगलेखक म्ह्णून असलेलं नाव "शांतीसुधा" हे आहे. तेव्हा आपल्याला जर दिलेल्या प्रतिक्रीयेत माझ्या नवाचा उल्लेख करायचा असल्यास त्याच नावाचा उल्लेख करावा ही नम्र विनंती. अन्यथा नावाचा उल्लेख न केलेलाच बरा.

    ReplyDelete
  9. 'सगळेच दहशतवादी इस्लामी आहेत', 'पाकिस्तानला प्रयोजनच नाही' ही विधाने ज़बरदस्त ग्रह सुचवत नाहीत? ज़मेल तितका दहशतवाद अनेक लोक करतात. शिवसेना करते, कोलंबस मेक्सिको भागात करतो, हिटलर करतो, स्टालिन स्वत:च्या लोकांवर करतो, ब्राह्‌मण ज्ञानेश्वरांवर दहशत घालतात आणि आम्बेडकरांवरही करतात, फ़्रेंच अल्जीरियात करतात. शीख हिन्दुंची कत्तल करतात, आणि कॉग्रेसचे गुंड शीखांना मारतात. आपण मुम्बईत २०-३० लोक मेले की बोम्ब मारतो, युनोला धाब्यावर बसवणार्‍या अमेरिकेमुळे होणार्‍या दहशतवादामुळे इराक़मधे रोज़ अनेक लोक मरताहेत. ज़र एखाद्‌या हिन्दु-कसाबनी पाकिस्तानी हॉटेलात लोक मारले तर पाकिस्तान क्रिकेटमधे हरल्यावरही नाचणारे भारतीय कमालीचे खूश होतील. पण तसा माणूस घडवण्याची क्षमता हिन्दुंमधे आहे कुठे? हिंसा करणार्‍या नथूराम गोडसे आणि नरेन्द्र मोदींना हिन्दु किती भक्कम पाठिंबा देतात, हे इंटरनेटवर २ मिनिटांत कळेल. 'आपण केलेली हिंसा मस्त, आपल्यावर शेकलेली हिंसा वाईट' अशी ही भारतीयांची (व्यक्तिश: तुमची माहीत नाही) केविलवाणी, दुटप्पी भूमिका आहे.

    "माझं ब्लॉगलेखक म्ह्णून असलेलं नाव "शांतीसुधा" हे आहे." --> कमाल आहे. मी इथे तुमच्या आद्‌याक्षरांचा उल्लेख 'अल', 'अल-ताई' असा नेहमी पाहतो. आपली दोघांची ज़ुज़बी ओळख असल्यामुळे मी तसला लाडिकपणा केला असता तर तो अयोग्य ठरला असता. पण माझ्यासाठी भलताच नियम असेल हे मला कळण्याचा मार्ग नव्हता. आडनावाचा उल्लेख करणं ज़ुनाट वाटू शकेल, पण मी दुसर्‍याला कीव वाटावी इतका ज़ुनाट आहे हा माझ्यावर अनेकदा झालेला आरोप मी मान्य करतो. तरीही एकाही प्रतिक्रियेत तुम्हाला दुखवण्याचा माझा हेतू नव्हता, याची मी तुम्हाला खात्री देतो. फक्त प्रतिपक्षाची बाज़ू सदयतेनी वा निदान डोळे उघडे ठेऊन, आपल्यासारखेच त्यांचेही पूर्वग्रह असू शकतात हे स्वीकारून, मग पहा आणि तपासा, ही माझी तुम्हाला काल विनन्ती होती, आणि आताही आहे.

    ReplyDelete
  10. हे बघा श्री नानिवडेकर, मला अल किंवा अलताई म्हणणारे प्रत्यक्षात ओळखतात. ओळख असलेल्या लोकांनी ते मला आधीपासून म्हणत असलेल्या नावाने संबोधले तर त्यात काहीही वाटत नाही. त्यात काहीही लाडीकपणा वगैरे नाही. पण आपली ओळख सुद्धा नाही. १-२ वेळा तुम्ही ब्लॉगवर प्रतिक्रीया दिल्याचे स्मरते आहे आणि एकात श्री विश्वासजी लापालकर यांचं नाव घेतलं होतंत. माझ्या ब्लॉगवर मला माझं आडनाव लिहायचं असतं तर मी ते आधीच लिहून ठेवलं असतं. कुणाकडून तरी तुम्हाला माझं आडनाव कळलं म्हणून त्याच्या पुढे बाई चिकटवुन मला संबोधणे हे अयोग्य आहे. तुम्ही माझ्या ब्लॉगवर प्रतिक्रीया देत आहात तेव्हा माझ्या ब्लॉगवर जे नाव मी वापरते त्याच नावाने माझा उल्लेख ब्लॉगवर व्हावा अशी अनोळखी लोकांकडून किंवा जुजबी ओळख झालेल्या किंवा ब्लॉगवरच ओळख झालेल्यां कडून अपेक्षा आहे. इतकेच मला सुचवायचे आहे.

    ReplyDelete
  11. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  12. तुम्ही माझ्या मूळ मुद्द्यालाच बगल दिलीयत. तुम्ही शांतीसुधाबाई म्हणाला असता तरी चाललं असतं. माझं आडनाव लिहीण्याची गरज नाही. मला माझं आडनाव ब्लॉगवर द्यायचं असतं तर ते मी कधीच दिलं असतं.

    ReplyDelete
  13. "तुम्ही शांतीसुधाबाई म्हणाला असता तरी चाललं असतं."

    -- ठीक आहे.

    - नानिवडेकर

    ReplyDelete
  14. श्री नानिवडेकर, ब्लॉग लेखकाने काय नावाने ब्लॉग लिहावा याचे काही नियम नाहीत. पण सुरक्षेच्या कारणास्तव नेटचा किंवा ब्लॉगचा वापर कसा करावा याचे काही नियम-सूचना आहेत. आता बब्ली नावाने एखादे आजोबा सुद्धा ब्लॉग लिहू शकतात त्याला तुमचा आक्षेप का? तुम्ही फक्त लेखन वचायचं काम करा. जास्तीत जास्त लेखनावर (लेखनत नमूद केलेल्या विषयावर) प्रतिक्रीया द्या. उगाच लेखकाने काय नाव ब्लॉगवर लिहावं असले प्रश्न उपस्थित करू नका. कुसुमाग्रजांनी टोपण नावाने लेखन का केलं असेल? बरेच जण टोपण नावाने लेखन करतात. तुम्हाला ब्लॉगलेखकाचं नाव (जे लेखकानं वापरलं आहे ते) ब्लॉगवर दिसत असताना प्रतिक्रीया लिहीताना तेच नाव वापरावं यासाठी आंतरज्ञानाची गरज नसते.

    ReplyDelete
  15. मला तुमची पोस्ट आवडली.अनेक पुस्तकांसंबंधीची माहिती नजरेखालून जाते आणि आपण ती उगाचच विसरून जातो.खरं तर प्रतिभा रानडे आणि गिरीश कुबेर यांना एकत्र एका व्यासपिठावर बघायचाही अलिकडे योग आला होता.पण पुस्तकं स्मरणातून गेली.आता ही सहा पुस्तकं तुम्ही एकत्रित दिली आहेत नक्कीच नोंदवून ठेवतो.ती खरंच वाचली पाहिजेत.आभार!

    ReplyDelete
  16. धन्यवाद विनायकराव. श्री गिरीश कुबेरांचे अजुन एक पुस्तक आहे, "शस्त्रांविना युद्ध" (बहुतेक नाव नक्की लक्षात नाही कारण मी ते अजुन वाचलं नाहीये) की जे रासायनिक अस्त्रांची कथा सांगतं.

    ReplyDelete