Saturday, 21 August 2010

कॅनडा ट्रीप - भाग ७

चायनीज ड्रॅगनचा विळखा!

डंडास वेस्ट, चायना टाऊन, टोरंटो
मागे कधीतरी इ-मेल मधून जगातील सर्वाधिक बोलल्या जाणार्‍या पहील्या १०-१५ क्रमांकांच्या भाषांची यादी आली होती. त्यात चायनीज भाषा्‍ बोलणार्‍यांची संख्या जगात सर्वाधिक आहे. म्हणजेच चायनीज भाषा ही जगा्तील सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे असं वाचण्यात आलं होतं. खरं पहायला गेलं तर चायनीज लोकसंख्या जगात सगळ्यात जास्त असल्याने तसं असेल असं मला वाटलं होतं. पण टोरंटो, एड्मंटन, व्हॅन्कुव्हर या ठीकाणांना भेट दिल्यावर जाणवलं की कॅनडाच्या सध्या्च्या अधिकृत भाषा इंग्रजी आणि फ्रेंच या  असल्या तरी (कारण सगळीकडे सूचना फलक, विविध उत्पादनांवरील सूचना ह्या सगळ्या मुख्यत: इंग्रजी आणि फ्रेंच मध्ये असतात) चायनीज लोकांची तिथली वाढत जाणारी संख्या बघून असं वाटतंय की पुढील १०-१२ वर्षांत चायनीज ही कॅनडाची सेकंड लॅंग्वेज होईल. टोरंटो मधील दोन मोठ्ठी चायना टाऊन्स बघीतली की त्याचा प्रत्यय येईल. 
रस्त्यावर भाजी विक्री, चायना टाऊन
चायना टाऊन्स मध्ये सगळी दुकानं चायनीज लोकांची. उत्पादनं सुध्दा (म्हणजे अन्नापासून ते विविध कपडे, मसाज पार्लर्स पर्यंत) "मेड इन चायना". सगळीकडे सूचना फलक चायनीज मध्ये, अगदी तिथल्या चायनीज उपहारगृहां मध्ये असलेली व्यवस्था चायनीज वळणावर म्हणजे एखाद्या चीन मधल्याच शहरातल्या छोट्या भागात आलो असल्याचा भास होतो. हाईट म्हणजे एअर कॅनडाच्या विमानात सुध्दा काही वस्तू "मेड इन चायना" चं लेबल झळकवत होत्या. एकूणच चीनी वस्तू, माणसं आणि जीवन पध्दती यांचं जगभरात वाढत जाणारं प्रस्थ पाहीलं की चायनीज ड्रॅगनचा विळखा पूर्ण जगाला बसतोय याची खात्रीच पटते. 
लिटील इंडीया!
लिटील इंडीया
टोरंटो मध्ये "लिटील इंडीया" म्हणून एक भाग आहे. म्हणजे एक रस्ताच म्हणा ना. त्या रस्त्यावर भारतीय वस्तुंची दुकानं, कपडे, उपहारगृह आहेत. पण आपण जर त्याच्या छायाचित्रांवर नजर टाकली तर त्या दुकानां मधील वस्तु आणि दुकानांची नावं यापलीकडे त्यात भारतीय असं काहीच दिसत नाही. म्हणजे चायना टाऊनच्या तुलनेत आजीबात भारतीय भाग आहे असं वाटत नाही. 
केवळ तिथे मिळणारे भारतीय खाद्यपदार्थ आणि साड्या नेसवलेले पाश्चिमात्य पुतळे, दुकानांच्या बाहेर अडकवलेले भारतीय वेष यापलीकडे कुठेही भारतीय वातावरणाचा भास झाला नाही. म्हणजे तिथल्या वातावरणात सुध्दा ती एनर्जी वाटत नाही. याउलट चायना टाऊन मध्ये चायनीज लोकांची वर्दळ, चायनीज दुकानदार, चायनीज फेरीवाले, चायनीज भाषेतील फलक हे वातावरण निर्मीती करून  जातात. त्याच बरोबर अजुन एक मोठा फरक म्हणजे चायना टाऊनच्या आसपास चायनीज लोकांचीच वस्ती आहे. पण लिटील इंडीयाच्या आसपास भारतीय लोकांची वस्ती असल्याचं जाणवलं नाही.
खलिस्तानवादी शिख समुदाय!
टोरंटो, एडमींटन, व्हॅन्कुव्हर या तीनही शहरां मध्ये शिख समुदायाचं अस्तित्त्व सुध्दा जास्त प्रमाणात जाणवलं. टोरंटो आणि व्हॅन्कुव्हरला विशेषत: टॅक्सी ड्रायव्हर्स शिख आढळले. तसा भारतातून परदेशात स्थलांतर करणार्‍यां मध्ये शिख समुदाय अग्रेसरच आहे. तशातच १९८४ साली इंदीरा गांधी यांच्या हत्ये नंतर दिल्ली मध्ये ज्या शिख विरोधी दंगली उसळल्या आणि तिथे जो कत्लेआम झाला त्याचे घाव घेवून बरेच जण कॅनडा, इंग्लंड यादेशांमध्ये स्थलांतरीत झाले. त्यामुळे खलिस्तान वाद जरी भारतातून गेलाय असं वाटत असलं तरी या भारताबाहेर स्थायिक झालेल्या शिख समुदाया मध्ये अजुनही तो जिवंत आहे. मुख्यत: त्यांच्या मनात १९८४ साली त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबध्दल चीड आहे. त्याच्या पाउलखुणा जर एखाद्या गुरूद्वारामध्ये गेलात तर झेंडे, फलक, मृत अतिरेक्यांचे हार घातलेले ’शहीद’ म्हणून गणले जाणारे फोटो याद्वारे दिसतील. बर्‍याच जणांना "कनिष्क" विमान दुर्घटना आठवत असेल. काही खलिस्तानवादी अतिरेक्यांनी एअर इंडीयाचे कॅनडाहून भारतात जाणारे बोईंग विमान पॅसीफिक ओशन मध्येच हवेत उडवुन दिले. त्यात जे गेले ते मुख्यत: भारतीय नागरिक आणि कॅनडीयन नागरिक असलेले भारतीय होते. नुकत्याच पूर्ण झालेल्या चौकशी आंतर्गत हेच बाहेर आलं की त्यावेळी कॅनेडीअन गुप्तचर यंत्रणेला असा काही हल्ला होईल याची माहीती मिळाली होती पण पोलीस यंत्रणेने ती माहीती फारशी गांभिर्याने घेतली नाही. त्यासाठी सध्याच्या कॅनडाच्या पंतप्रधानांनी त्या हल्ल्यात मारले गेलेल्या लोकांच्या नातेवाईकांची क्षमा सुध्दा मागीतली. तसेच कॅनडातील एका उपनगरात "कनिष्क" विमान दुर्घटनेतील लोकांच्या स्मरणार्थ एक पार्क स्मारक म्हणून उभारले आहे. त्याचे उद्घाटनही नुकतेच झाले.

इस्कॉन: हरे कृष्णा मुव्हमेंट!!
टोरंटो मधील भारताशी आणि हिंदू धर्माशी निगडीत अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे इस्कॉन मंदिर. हे इस्कॉन मंदिर बाहेरून पाहीलं तर एका जुन्या चर्चची दगडी इमारत आहे. पण आतून सगळंच नविन बांधलं आहे. मी असं ऐकलं की इस्कॉन ने ती जागा विकत घेण्याआधी तिथे एक रोमन कॅथलीक चर्च होतं. पश्चिमेकडील सगळ्याच देशां मध्ये ख्रिश्चन धर्माला उतरती कळा लागलेली असल्याने त्या चर्चने सुध्दा ती जागा विकायचं ठरवलं.
गंमत म्हणजे ती जागा कुणा व्यावसायिक व्यक्तीला किंवा गव्हर्नमेंटला न विकता त्यांनी ती त्यांच्या सारख्याच धार्मिक संघटनेला विकली. ती संघटना म्हणजे इस्कॉन- कृष्णभक्तीची चळवळ. आम्ही जेव्हा तिथे गेलो तेव्हा दरवाजातच एक कृष्ण्वर्णिय साधक (अंगात भगवी कफनी, कपाळावर हरे कृष्णा वाल्या लोकांप्रमाणे गंध लावलेलं) हातात जपाची माळ घेवून बसलेला दिसला.
आम्हाला बघुन त्याने स्मित हास्य करून आमचं स्वागत केलं. दरवाजातून आत गेल्यावर पादत्राणे काढून ठेवण्यास एक स्टॅंड दिसला. पादत्राणे काढून आत प्रवेश केल्यावर एका मोठ्या पॅसेज मध्ये एक छोटासा स्वागत कक्ष होता. तिथे सगळी माहीती आणि पुस्तकं विक्रीसाठी एक साधक बसला होता. आत मध्ये शिरल्यावर आपण चर्चच्या इमारतीमध्ये आहोत असं कुठेही जाणवलं नाही. त्या पॅसेज मधुनच मुख्य मंदिरात जाण्यास प्रवेशद्वार होते. मुख्य मंदिर म्हणजेएक मोठा हॉलच होता.
मला काहीशी मुंबईला खार येथे असलेल्या इस्कॉन मंदिराची आठवण झाली. खारच्या मंदिरात सगळीकडे श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित मूर्ती, चित्रं सगळीकडे दिसतात. तर इथे सगळ्या भिंतींवर महाभारताची चित्रं रंगवली होती. अश्वमित्र पूर्वी इथे दर रविवारी महाप्रसाद घेण्यास आणि कधी कधी त्यांच्या "गोविंदा" या शाकाहारी उपहारगृहात जेवण्यासाठी जात असे.
 त्याने पुरवलेल्या माहीती नुसार ही महाभारतावर आधारित चित्रं नविनच काढलेली आहेत. त्याच हॉल मध्ये एका बाजूला स्वामी प्रभूपाद (इस्कॉनचे संस्थापक) यांची मूर्ती आणि त्यांच्या मूर्ती समोरच्याच बाजूला मोठ्या देव्हार्‍यात राधा-श्रीकृष्ण यांच्या मूर्ती. दुपारची वेळ असल्याने राधा-कृष्णाच्या मूर्तींचा गाभारा बंद होता. इस्कॉन मधील श्वेतेवर्णीयांची वाढती संख्या आणि एका कृष्णवर्णियाचे अस्तित्त्व पाहून हरे कृष्णा मुव्हमेंटची तिथली वाढती लोकप्रीयता लक्षात येते.
गंमत म्हणजे मला आम्ही एकदा यंग आणि डंडास या दोन रस्त्यांच्या मधोमध चौकात रस्ता ओलांडत असताना पाहीलेला प्रसंग आठवला. दोन-तीन तरूण कशावरून तरी मोठयाने वाद घालत होते आणि ते पाहण्यासाठी आपल्याकडच्या सारखी बघ्यांची गर्दी पण झालेली होती. तिथून जाताजाता जे कानावर पडले त्यातून अधिक कुतुहल जागृत झालं म्हणून आम्ही पण तिथं दोन मिनीटं थांबलो. एक श्वेतवर्णीय आणि एक कृष्णवर्णीय तरूण हातात बायबल घेवून रस्त्यावर येणार्‍या जाणार्‍या लोकांना बायबल मधले काही संदेश बळच सांगून ख्रिश्चन धर्मच कसा चांगला आहे, येशू ख्रिस्ताशिवाय तुम्हाला कोणी वाचवू शकणार नाही इ. इ. बोलून इतरांना कन्वीन्स करण्याचा प्रयत्न करत होते. सभोवताली जमलेल्यांपैकी दोघे जण (श्वेतवर्णीय) त्यांना आव्हान देत होते आणि त्यांचा वाद चालू होता की ते सांगताहेत ते कसं खोटंय ते. हे आत्ता आठवण्याचं कारण असं की इस्कॉन ही सुध्दा तसं पाहीलं तर मिशनरी संघटना आहे.  इस्कॉनच्या लोकांना सुध्दा मी रस्त्यावरून जाताना (भारतात) पुस्तकं विकताना पाहीलं आहे. जर कधी तुम्ही इस्कॉनच्या कुठल्याही मंदिरात गेलात तर तिथले काही साधक सुध्दा तुम्हाला असंच कन्व्हीन्स करण्याचा प्रयत्न करतात की कृष्णभक्ती शिवाय पर्याय नाही. तसं पाहीलं तर हिंदू धर्मातील लोक अशाप्रकारे कुणाला हिंदू धर्मच कसा श्रेष्ट आहे हे कन्व्हीन्स करायला गेल्याचं माझ्यातरी पाहण्यात नाही. इस्कॉन ही संघटना जरी हिंदू धर्माशी आणि कृष्णभक्तीशी निगडीत असली तरी तिची स्थापना, वाढ हे सगळं पाश्चात्य देशांत झालेलं आहे. म्हणूनच तर इस्कॉन चे साधक आणि ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणारे यांच्यात "आपल्या धर्माविषयी, पंथाविषयी इतरांना कन्व्हीन्स करणे" ह्यात साम्य नसेल? हा एक संशोधनाचा विषय होईल.

8 comments:

  1. अलताय,
    भाग ६ व ७ मस्त.

    ReplyDelete
  2. छान ग अलताय...सचित्र कॅनडा दर्शन घडवलयस तुझ्या लेखणीतुन...

    ReplyDelete
  3. जशी "भारतीय" नावाची कोणतिही भाषा नाही त्याच प्रमाणे "चायनिज" ही पण भाषा नाहीये.
    चिनी लोक "मान्डेरीन" (९०%) किंवा "केन्टोनीज" (१०%) भाषक असतात.

    ReplyDelete
  4. अपर्णा.. तुझे लिखाण अतिशय डिटेलमध्ये मस्त सुरु आहे... अनेक गोष्टींची माहिती तिकडे न जाता मिळते आहे...

    पण बरेचदा अश्या पोस्ट्सवर प्रतिक्रिया काय द्यावी असा प्रश्न वाचकांना पडतो. वा, छान मस्त, उत्तम पोस्ट.. हे असे काहीसे कमेंट्स मला स्वतःला द्यायला रुचत नाहीत.
    तुझे लिखाण वाचले जायेत ह्याची खात्री ठेव.. अगदी कमेंट पडत नसल्या तरी.. :)
    तू लिहित रहा... :)

    ReplyDelete
  5. नमस्कार दीप नसरे,
    प्रतिसादा बध्दल धन्यवाद आणि शतपावलीवर स्वागत.
    तुम्ही म्हणालात ते अगदी खरं आहे. पण साधारणपणे आपण भारतात सुध्दा बोलताना असमीज लोकांची भाषा असमीज, बंगाली लोकांची भाषा बंगाली, महाराष्ट्री लोकांची भाषा मराठी (खरंतर मराठी लोक असं म्हणतात पण ते योग्य नाही पण जे लोक मराठी भाषा बोलतात ते मराठी) असं म्हणतो त्याच प्रमाणे सामान्यत: बोलताना चायनीज लोकांची भाषा चायनीज म्हणजे चायनीज लोक जी भाषा बोलतात ती भाषा अशा अर्थाने लिहीला आहे. आपल्या तपशीलातील माहीतीचा वाचकांना फायदाच होईल (जर माहीती नसेल तर). धन्यवाद.

    ReplyDelete
  6. रोहन, माझे लिखाण वाचले जातेय हे मला फीड जेट वरून समजतेच. त्यामुळे मला त्याची खात्री आहे. त्यावेळी मी जे लिहीलं होतं ते सामान्यत: वाचकांच्या प्रवृत्तीवरील भाष्य होतं. बर्‍याचदा लोकांना प्रतिक्रीया काय लिहावी हेच समजत नाही. म्हणून ते फक्त छान, मस्त असल्या प्रतिक्रीया देवून मोकळे होतात. पण कधीकधी मला काही मुद्यांवर थोडी चर्चा अपेक्षित असते. ते सुध्दा होत नाही. मी तर माझ्यासाठी लिहीते आहे. ज्यांना वाचायचं त्यांनी वाचावं. :-)

    ReplyDelete
  7. नमस्कार. तुमच लिखाण आवडल आणि हेतू सुद्धा. स्वतः साठीच लिहिण्याचा. थोडी चर्चा करविसी वाटते एका विषयावर म्हणून लिहितो. इस्कॉन बद्दल जे आपल म्हणण पडल कि त्या संस्थेचा विस्तार हा फक्त पाश्च्यात्य देशातच झालेला आढळतो. पण मला अस मांडावास वाटते कि "या संस्थेच्या विस्तार पर्यंत हिंदू धर्मात हिंदू धर्मप्रसार असा काही विषयच नव्हता, मुख्यता देशाबाहेर, असे मला वाटते. पण निदान या संस्थेनी तो प्रयत्न केला आणि हिंदू धर्म विस्ताराची पाश्च्यात्य देशांमध्ये मुहूर्तमेढ रोवली. कोणी आधी प्रयत्नच केले नाही असे मी म्हणणार नाही पण एवढे यशस्वी कोण कडूनच झाले नाही असे म्हणावे लागेल."

    ReplyDelete
  8. नमस्कार वियुष! शतपावलीवर स्वागत आणि प्रतिक्रीये बद्धल धन्यवाद. मला माहीती आहे की इस्कॉनची स्थापना परदेशातच झालीय तिथे कृष्ण भक्तीचा प्रसार करण्यासाठी. आपल्या देशात ही चळवळ नंतर परदेशी भक्तांनी अधिक आणली. त्या चळवळीचा हेतो हिंदू धर्म प्रसार हा नाहीये पण कृष्णभक्तीचा प्रसार हा नक्की आहे. एकूणच मी जेवढ्या म्हणून इस्कॉनवाल्यांना भेटले आहे मला ते अधिक करून वेडे वाटले. म्हणजे त्यांची समोर सापडेल त्याला, ट्रेनमध्ये, रस्त्यांवर, बगिचांमध्ये जाणार्‍या-येणार्‍या व्यक्तींना पकडून कृष्णभक्तीचा डोस पाजणे आणि कृष्ण्भक्तीच तारू शकेल हे जरा त्या ख्रिश्चन तरूणांच्या येशूच फक्त तारेल याच्याशी साधर्म्य सांगणारं वाटतं. मूळातच भक्तीपरंपरा हीच विश्वासावर आधारित आहे. त्याला कोणताही बौद्धिक आधार नाही. त्यामुळेच कोणाचीही भक्ती करण्यासाठी वेडंच व्हायला लागतं. पण भक्तीपरंपरा म्हणजेच हिंदू धर्म नाही. इस्कॉनचे संस्थापक स्वामी प्रभुपादांची गोष्ट वाचलीत तर चक्रावुन जाल. त्यांना इंग्रजीचे आजीबात ज्ञान नव्हते. ते स्वत: बंगाली गृहस्थ. खूप धार्मिक वाचन वगैरे पण करत नसत. त्यांचा स्वत:चा व्यवसाय होता. एक दिवस त्यांना साक्षात्कार झाला (असं त्यांना वाटतं) अमेरिकेत जाण्याचा आणि कृष्णभक्ती प्सरवण्याचा. म्हणून ते अमेरिकेत खिशात फारसे पैसे नसताना गेले. स्वामी विवेकानंदही खिशात कमी पैसे असताना अमेरिकेत गेले होते. त्यांनीही हिंदू धर्मच्या अध्यात्मिकतेचा प्रसार इंग्लंड अमेरिकेत केला. तसेच दोघेही बंगाली. ही तीन साम्य स्थळे सोडली तर दोघांत अर्था अर्थी काहीही तुलना करण्यासारखं नाही. स्वामी विवेकानंद हे अतिशय ज्ञानी आणि सन्यासी होते. भारतातील हिंदूंचे प्रतिनीधीत्व करण्यासाठी अमेरिकेत गेले होते. त्यांनी त्यांच्या शिष्यगणांना आंधळी भक्ती कधीच शिकवली नाही. डोळसपणाने सर्व गोष्टी तपासून घ्याव्यात हेच शिकवले. रामकृष्ण मठाची स्थापना केली. रामकृष्ण मठ आणि इस्कॉन यांची तुलना करून पाहीली तर वरील लेखात मी जे निरीक्षण नोंदवलंय त्याची प्रचिती येईल. रामकृष्ण मठात कधीच कोणी केवळ रामकृष्ण परमहंसच तारणार बाकी सगळे खोटे असं शिकवत नाहीत. कोणी तुमच्या मागे हात धुवोन लागत नाही. पण इस्कॉन मध्ये गेल्यावर फरक ताबडतोब जाणवतो. का? तर त्याची जडण घडण आणि वाढ ही ख्रिश्चन धर्मिय अधिक असलेल्या देशात झाल्यामुळे त्या धर्माच्या काही तत्त्वांचा प्रभाव पडलेला आढळतो. त्यातीलच एक म्हणजे इतरांच्या मागे लागून त्यांना कृष्णभक्तीचाठी कन्व्हिन्स करत बसणे.

    ReplyDelete