Saturday, 14 August 2010

कॅनडा ट्रीप - भाग ५

 टोरंटो युनीव्हर्सीटी:  

कॉन्फरन्स झाल्यावर दुसर्‍याच दिवशी सकाळी आम्ही टोरंटो युनीव्हर्सीटी फिरायला गेलो. तसा युनिव्हर्सीटीचा कॅम्पस खूप मोठा असल्याने आणि तिथे पायीच फिरावे लागणार असल्याने बाबा काही आमच्या बरोबर आले नाहीत. त्याऐवजी त्यांनी राहत्या ठीकाणाच्या जवळचा परिसर पायी भटकणे पसंत केले.  
व्हिक्टोरीया कॉलेजच्या जवळपास आम्ही युनीव्हर्सीटी मध्ये प्रवेश केला. इंग्लंड मधील केंब्रीज युनीव्हर्सीटी मध्ये राहील्यामुळे युनीव्हर्सीटीमधील कॉलेज सिस्टीम काय असते हे चांगलंच माहीत होतं. ऑक्सब्रीज, युटो सारख्या युनिव्हर्सीटीज मध्ये कॉलेज म्हणजे विद्यार्थ्यांची राहण्याची सोय असलेले ठिकाण.  काही कॉलेजेस मध्ये  अंडरग्रॅज्युएट विद्यार्थ्यांचे क्लासेस होतात. पण प्रामुख्याने ती राहण्यसाठी, रेक्रीएशनल अ‍ॅक्टीव्हीटीज साठी असतात. तर डीपार्टमेंट्स ही वेगवेगळ्या विषयांच्या अभ्यासासाठी असतात. त्यामुळे एकाच कॉलेज  मधील बहुतेक विद्यार्थी हे वेगवेगळ्या डीपार्टमेंट मध्ये काम करणारे/अभ्यास करणारे असतात. 
छान मेनटेन केलेली लॉन्स आणि नव्या जुन्याचा उत्तम संगम असलेल्या इमारती युनीव्हर्सीटी परिसराची शोभाच वाढवत होत्या.जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीत विद्यार्थी घरी गेलेले असतात तेव्हा ही कॉलेजेस इतर लोकांसाठी उन्हाळ्यातील स्वस्त दरातील हॉटेल्स म्हणून वापरली जातात. आम्ही गेलो त्यावेळी व्हिक्टोरीया कॉलेज मध्ये चक्क एका चित्रपटाचं शुटींग चालू होतं. 
अशा जुन्या विद्यापीठां मध्ये आपल्याला काही वैशिष्ट्यपूर्ण इमारती आढळतात. अर्थात उत्तर अमेरिका, कॅनडा ह्या भागाचे अस्तित्त्वच मूळात युरोपच्या तुलनेत तसे खूप नविन आहे. त्यामुळे इंग्लंड युरोप मध्ये याहून जुन्या बांधकामाचे सुंदर नमुने असलेल्या इमारती बघायला मिळतात. म्हणजे जुने दगड वीटांचे बांधकाम हे इंग्लंड-युरोपचे वैशिष्ट्य तर मोठ मोठ्या गगनचुंबी इमारती हे उत्तर अमेरिका आणि कॅनडा या भागाचे वैशिष्ट्य असेही आपण म्हणू शकतो. खाली काही छायाचित्रे नमुन्यादाखल देत आहे.  
टोरंटो युनीव्हर्सीटी ही तशी उत्तर अमेरिकेतील नावाजलेल्या विद्यापीठांपैकी आहे. अशा विद्यापीठांचं वैशिष्ट्य म्हणजे तिथे होत असलेलं अ‍ॅकॅडमिक काम, तसेच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध रीसोर्सेस आणि फॅसीलीटीज. तिथली सुसज्ज ग्रंथालयं या विषयावर या लेखाच्या एका कोपर्‍यात लिहीण्यापेक्षा एक स्वतंत्र लेख लिहीणार आहे.  
या अशा जुन्या विद्यापीठांना एक पुरातन बाज असल्याने (विशेषत: इंग्लंड मधील केंब्रीज आणि ऑक्सफर्ड या विद्यापीठांना) आपल्याला तिथे शिकताना अगदी हॅरीपॉटरच्या चित्रपटातील इमारती आणि तशा प्रकारच्या व्यवस्थेत असल्याचं एक फिलींग येतं. खरंतर पुढे कधीतरी मी केंब्रीज विद्यापीठावर आधारित स्वतंत्र लेख लिहीणारच आहे त्यात अनेक गोष्टींचे उल्लेख विस्ताराने येतीलच. 
टोरंटो युनिव्हर्सीटीत एक "फिलॉसॉफर्स वॉक" म्हणून भाग पाहीला. अतिशय शांत आणि रम्य असा परिसर होता. त्या भागाला फिलॉसॉफर्स वॉक पडण्याचं कारणही लगेच तिथे लावलेल्या फलकावर लिहीलेलं होतं. त्याचाच फोटो सोबत जोडला आहे. तत्त्वज्ञान, उत्तम कथा, कविता आणि साहीत्य निर्मीतीसाठी ह्या शांत आणि रम्य परिसराचा उपयोग होतो यात नवल नाही. खरंतर आपल्या इथल्या विद्यापीठ परिसरांच्या तुलनेत त्यांच्या कॉलेजे्सचा परिसर सुध्दा खूप रम्य आहे. केंब्रीज मध्ये तर कॉलेजेस मध्ये मेन्टेन केलेल्या लॉन्स वरून फक्त कॅलेजच्या फेलोजना चालण्याची परवानगी असते. केंब्रीजवरील लेखात हे सगळं अधिक स्पष्ट करेनच. 
टोरंटो युनीव्हर्सीटीचं अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा "ट्रान्झीशनल इयर प्रोग्रॅम". या कार्यक्रमा आंतर्गत ते ज्यांची शाळा काही कारणास्तव सुटली आहे अशा विद्यार्थ्यांना युनीव्हर्सीटीचा म्हणजे डीगरी घेण्यासाठीचा मार्ग खुला करण्यासाठी देत असलेला शैक्षणिक कार्यक्रम. तसं कॅनडा मध्ये स्कूल एज्युकेशन सगळ्यांना अनीवार्य आहे त्याची अंमलबजावणी काटेकोरपण होते आहे की नाही हे पाहण्यासाठी वेगवेगळे सोशल वर्कर्स तसेच समुपदेशक नेमलेले असतात. 
त्यांच्या मार्फतच या सगळ्याविषयी माहीती गोळा केली जाते. पण मग हा प्रश्न उरतोच की येव्हढं सगळं असताना या ट्रान्झीशनल प्रोग्रॅमची आवश्यकता का भासते? मला देखील हा प्रश्न पडलेला आहे पण त्या ठीकाणी मी कोणालाच भेटू न शकल्याने त्या प्रश्नाचे उत्तर पुढच्या ट्रीप मध्ये शोधेन असं ठरवलं. पण अशी सोय आहे हे ही नसे थोडके. आपल्याकडे अशा सोयींचा विचार करायला हरकत नाही. असो.
युनीव्हर्सीटी मध्ये फिरताना एका ठिकाणी मला एक लालसर रंगाचा खांब दिसला. सहज म्हणून मी चौकशी केली की हा खांब इथे कशासाठी तर तो खांब नसून सिक्युरीटी आलार्म होता हे समजलं. साधारणत: अंधार पडल्यावर युनीव्हर्सीटी कॅम्पस मधून फिरणं एकट्या दुकट्या व्यक्तीला तसेच विशेषत: मुली-स्त्रियांच्या दृष्टीने धोक्याचं असतं. हेच लक्षात घेऊन ती आलार्म सिस्टीम युनीव्हर्सीटी कॅम्पस मध्ये ठीक ठीकाणी बसवली आहे. काही धोका आहे असं आढळलं तर लाल बटन दाबून फोन वरून सिक्युरीटीशी बोलायचं. लाल बटन दाबलं की आलार्म वाजायला सुरूवात होते.
टोरंटो युनीव्हर्सीटीच्या बुक स्टोअर मध्येतर डोकवायलाच हवं. युऑफटो च्या दुमजली बुक स्टोअरने मला मोहीनीच घातली. तळ मजल्यावर युनीव्हर्सीटीचा लोगो असलेल्या वस्तु. लोक सोव्हेनीअर म्हणून घेतात किंवा युनीव्हर्सीटीचे विद्यार्थी त्या युनीव्हर्सीटीचे आपण विद्यार्थी आहोत हे मिरवण्यासाठी किंवा एक आठवण म्हणून घेतात. 
या स्टोअर मध्ये टी-शर्ट्स, स्पोर्ट्स जर्सीज, स्वेट शर्ट्स, मग्ज, डायरीज आणि इतर वस्तू तसेच इलेक्ट्रॉनीक वस्तू जसे अ‍ॅपल चा लॅपटॉप, आय पॅड, आय फोन इ. विद्यार्थांना सवलतीच्या दरात उपल्ब्ध करून दिलेल्या असतात. केंब्रीज युनीव्हर्सीटी चं पण स्टोअर होतं पण अगदीच छोटंसं म्हणजे लक्ष्मी रोडवरचं एखादं छोटसं दुकान असेल तेव्हढंच. पण युऑफटो चं स्टोअर पाहील्यावर त्याची भव्यता लगेचच नजरेत भरली. 
पहिल्या मजल्यावर पुस्तक भांडार होतं. हे म्हणजे मला क्रॉसवर्ड मध्ये वगैरे फिरत असल्यासारखं वाटलं. मंद संगीताची पार्श्वभूमी , वेगवेगळ्या विषयांवरची आद्ययावत पुस्तकं, ठिकठिकाणी फुलांची सजावट. या अशा वातावरणात मन तिथे बराच काळ रेंगाळलं नाही तरच नवल. स्टोअरच्या एका भागात तर चक्क मेडीकलची पुस्तकंच नाहीत तर औषधे पण मिळत होती पण कुठेही औषधांचा वास पसरलेला नव्हता.  युनीव्हर्सीटी ऑफ ब्रिटीश कोलंबीया, सायमन फ्रेझर युनीव्हर्सीटी, युनीव्हर्सीटी ऑफ अथाबास्का (कॅनडाची ओपन युनीव्हर्सीटी) यांविषयीची माहीती तसेच युनीव्हर्सीटी ऑफ टोरंटोची रोबॉर्ट्स लायब्ररी यांची माहीती पुढील वेगवेगळ्या लेखां मध्ये वाचायला मिळेल.

 

1 comment:

  1. "फिलॉसॉफर्स वॉक" ची कल्पना जाम आवडली. यावरून आपण घरात
    "फिलॉसॉफर्स रूम" तयार करू शकतो. (बहुतेकांच्या घरी असेल पण).

    पुस्तक भांडार ची माहिती मस्त.

    ReplyDelete