Wednesday, 9 March 2011

उर्जावाद-धर्मवाद-दहशतवाद: एक अपशकुनी त्रिकोण!!

१८ व्या शतकातील यंत्रवादाची जागा १९ व्या शतकात साम्राज्यवाद आणि उर्जावादाने घेतली. या उर्जावादातीलच शह-काटशहाचं राजकारण करत २० व्या शतकात साम्राज्यवादी तसेच साम्यवादी शक्तींनी धर्मवादाचा भस्मासूर निर्माण केला. २१ व्या शतकाच्या अगदी तोंडाशीच या धर्मवादाने दहशतवादाला जन्माला घातलं. ह्या सगळ्या राजकारणाचा उलगडा आपल्याला लोकसत्ताचे नविन संपादक श्री गिरीश कुबेर यांच्या "हा तेल नावाचा इतिहास आहे", "एका तेलियाने" आणि "अधर्मयुद्ध" या ट्रायलॉजीमध्ये होतो. श्री गिरीश कुबेर यांची अभ्यासपूर्ण आणि वाचनीय अशी लेखन शैली आपल्याला त्या सगळ्या इतिहासात ओढत नेते आणि त्याचं वर्तमानात चालू असलेल्या घटनांशी असलेला सहसंबंध उलगडून दाखवते. सगळ्याच मानवताप्रेमी, देशप्रेमी, अभ्यासू वृत्तीच्या वाचकमित्रांकडे संग्राह्य असावीत अशी ही तीन पुस्तकं.

याच तीन पुस्तकांना पूरक अशी माहीती म्हणजे त्यावेळी अफगाणिस्तानात कशी परिस्थीती होती याची तपशीलवार माहीती आपल्याला श्रीमती प्रतिभा रानडे यांच्या "अफगाण डायरी काल आणि आज" या अभ्यासपूर्ण तसेच प्रत्यक्ष अनुभवसिद्ध पुस्तकातून होते. या पुस्तकातून आपल्याला तालीबान हा दुसर्‍या महायुद्धानंतर रशियाविरोधी शीत युद्धात अमेरिकेनेच निर्माण केलेला भस्मासूर असल्याचे स्पष्टीकरणही मिळते. मध्य-पूर्वेच्या देशांतील एकूणच इतिहास समजून त्यांच्या वर्तमानाशी अमेरिकादी पाश्चात्य देशच कसे कारणीभूत आहेत हे सुद्धा लक्षात येते. आवर्जून आपल्या संग्रही असावं असं अजुन एक पुस्तक.

जेव्हा धर्मवाद जन्माला आला त्याचाच एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे "पाकीस्तानची निर्मिती". मध्यपूर्वेकडील कोणत्याही मुस्लीम देशातील लोकांना विचारलं तर ते सर्वप्रथम आपण नक्की कोणत्या वंशाचे आहोत हे आणि मगच आपण मुस्लीम असल्याचे सांगतात. उदाहरणार्थ: अफगाणीस्तानातील लोक स्वत:ला अफगाणी म्हणवतात, इराण मधील लोक स्वत:ला इराणी म्हणवतात, इजिप्त मधली लोकं इजिप्शीअन आहेत असं म्हणवून घेतात. त्यामुळे त्यांचं अस्तित्त्व हे त्या त्या भौगोलिक भागाच्या पूर्व संस्कृतीशी अधिक जोडलं गेलेलं आहे. पाकीस्तानची निर्मितीच मुळात इस्लामच्या नावाखाली झाली आहे. ज्या भौगोलिक संस्कृतीशी (भारतीय) त्यांची खरी नाळ जोडलेली आहे त्याचा ते स्विकार करत नाहीत. त्यामुळे पाकिस्तान हे इस्लामिक धर्मांधता आणि अधुनिक प्रगती याच्या कात्रीत सापड्लं आहे. त्यामुळे याच धर्मांधतेने पाकीस्तानात अनेक दहशतवादी हल्ले होत आहेत, पाकीस्तानातील धर्मांध लोक जगात इतरत्र दहशतवाद पसरवत आहेत, दहशतवादी हल्ले करत आहेत. यामुळे पाकीस्तानातील सामान्य जनतेचे हाल होत आहेत. पण पाकीस्तान निर्मितीनंतर आत्तापर्यंत विविध राज्यकर्त्यांनी, लष्करशहांनी पाकीस्तानला स्वत:ची अशी ओळख देण्याचा प्रयत्न केला पण अजुनही पाकीस्तानची ओळख एक दहशतवादी देश, दहशतवाद्यांना मदत करणारा, दहशतवादी तयार करणारा देश अशीच निर्माण झाली आहे. या प्रगतीशील जगात एकूणच पाकीस्तानच्या स्वओळखीच्या मध्ये धर्मांधता, टोकाचं इस्लामिकरण येत आहे. जर पाकीस्तानने कट्टर धर्मवाद सोडला तर त्यांना स्वत:ची अशी ओळखच उरत नाही. श्रीमती प्रतिभा रानडे यांनी "पाकीस्तान अस्मितेच्या शोधात" आणि "फाळणी ते फाळणी" या दोन पुस्तकांतून छान मांडणी केली आहे. एकूणच जगाच्या पाठीवर सध्या जो काही अनागोंदी कारभार माजला आहे त्याचा इतिहासातील अनेक घटनांशी सुसंगती लागण्यासाठी, त्यांच्यातील सहसंबंध उलगडण्यासाठी, ही सहा पुस्तकं लागोपाठ वाचावीत.