Saturday 5 May 2012

॥उमरावजान॥

महाजालावरून साभार
जगाच्या पाठीवर कुठेही जा स्त्रीचं आयुष्य इतक्या नाट्यमय घटनांनी भरलेलं असतं की जगभरातील उत्तमोत्तम साहित्य निर्मितीसाठी या स्त्रीच्या आयुष्यानेच कधीही न आटणारा स्रोत दिला आहे. याची प्रचिती अगदी आपल्या रामायण-महाभारत या प्राचीन महाकाव्यांपासून ते सध्याच्या विविध भाषांमधील वाहिन्यांवरील टीव्ही सीरीअल्स मधून येतेच. ग्रीक मायथॉलॉजी मधील प्रसिद्ध महाकाव्य ओडीसी सुद्धा याचीच साक्ष देतं. स्त्रीच्या आयुष्यातील या नाट्यमयतेची बीजं ही तिच्या स्त्रीत्त्वातच आहेत. कारण स्त्री-पुरूष समानता फक्त या ठीकाणीच माघार घेते. तिथे समानता शक्यच नाहीये....निसर्गाने तिलाच हे पुननिर्मीतीचं गिफ्ट दिलेलं आहे. यासाठी तिचं स्त्रीत्त्व हे एका विशिष्ट कालमर्यादेचंच असतं. त्या विशिष्ट कालमर्यादेत तिला अनेक भूमिका वठवाव्या लागतात. म्हणूनच स्त्रीचं आयुष्य अधिक डायनॅमिक असतं. स्त्रीच्या आयुष्यातील अधिकाधिक नाट्यमय घटना या कालावधीतच घडत असतात. या घटनांची तीव्रता तिच्या स्त्रीत्त्वाभोवतीच गुंतलेली असते. तसं पहायला गेलं तर या स्त्रीत्त्वामुळेच पुरूषाच्या पुरूषत्त्वाला अर्थ, जगाला जगपण आणि घराला घरपण प्राप्त होते.

मिर्झा हादी रूसवा या उर्दु लेखकाची उमरावजान ही अशीच एक अजरामर साहित्यकृती. उमरावजान ही एक उर्दु कादंबरी असली तरी तिला उर्दु भाषा येत नसलेल्या रसीकांपर्यंत अत्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचं काम दिग्दर्शक मुझफ्फर अलींनी केलं. त्यासाठी त्यांचे आभारच मानले पाहीजेत. रेखा सारख्या अतिशय सुंदर अदाकाराने उमरावजानला प्रेक्षकांच्या मनात वेगळंच स्थान निर्माण करून दिलंय. गीतकार खय्याम यांनी तर प्रत्येक शेराच्या (कवितेच्या) माध्यमातून तिच्या जीवनाचं, भावनिक हल्लकल्लोळाचं सारच उत्तमरित्या पोहोचवलं आहे. एक स्त्री म्हणून मी जेव्हा उमरावजान हा चित्रपट बघते तेव्हा तेव्हा मी तिच्या तसेच एकूणच स्त्रीत्त्वाच्या अधिकाधिक प्रेमात पडते. हा चित्रपट मी कायम शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करत असते पण माझे डोळे अश्रुंनी डबडबलेले असतात आणि मन भरून आलेलं असतं. मग शेवट कधी होतो तेच समजत नाही. पर्यायाने शेवटचा सीन लक्षात रहात नाही आणि मग कथेच्या शेवटी काय झालं असेल हे कुतुहल मला पुन्हा त्या चि्त्रपटाकडे नेतं.

सुरूवातीपासूनच उमरावजानच्या आयुष्यातील (सुरूवातीची अमिरन) पुरूष एकप्रकारे तिच्या धैर्यापुढे, सहनशीलतेपुढे कमकुवत आहेत. तिचे अपयशी ठरलेले वडिल पूर्वीचे पोलीसपाटील असले तरी तसंच मुलीला कोणी पळवुन नेलंय हे माहीती असूनही ते तिला शोधू शकत नाहीत. हा तिच्या वडिलांचा कमकुवतपणा झाला.

तिला पळवुन नेलं जातं तेव्हा लहान असलेला भाऊ, ती मोठी झाल्यावर घरी परतते तेव्हा तिची मायेने विचारपूस करण्या ऐवजी तिची ओळख फक्त लखनौ मधील प्रसिद्ध कोठेवाली अशीच लक्षात ठेवतो. त्याची जाणीव दोघी मायलेकींना करून देतो. बहिणीपेक्षा समाज काय म्हणेल याची चिंता असलेला भाऊ देखिल म्हणूनच कमकुवत वाटतो.

कबुतरांचं आमीष दाखवून तिला पळवुन नेणारा कबुतरवाला शेजारी सुद्धा तिला पळवताना नेमकं तिचं काय करायचंय हे न ठरवताच तिला पळवतो आणि मग तिला लखनौमधे नेऊन विकतो. एका मुलीला किंवा स्त्रीला विकुन पैसे कमावणारा माणूस कमकुवतच असतो. 

अगदी सुरूवातीला तिच्या प्रेमात पडलेला गौहर खानही सर्वे प्रसंगांतून स्वत:च्या कमकुवत पणाचंच प्रदर्शन करतो. सुरूवातीला भावनिक कमकुवतपणा, मग कोठ्यातून बाहेर हाकलल्यावर देखिल उमरावजानचीच गझल इतरांना स्वत:ची म्हणून ऐकवणं, स्वत:चं ज्या मुलीवर प्रेम आहे असं ज्याला वाटत असतं त्याच मुलीसाठी नवाबाचा सौदा आणणं, सुरूवातीला त्याच्या आणि उमरावजानच्या प्रेमाला विरोध करणार्‍या खानम ने शेवटी तिला कोठयावर बांधून ठेवण्यासाठी गौहर खानबरोबर लग्नाचा बनाव रचणे, त्यातून सुटण्यासाठी उमरावजाननेच दिलेले पैसे घेऊन तिच्याच कानपूर मधल्या घरी जाऊन राहणे ह्या गोष्टी त्याचा कमकुवतपणा प्रकर्षाने दर्शवतात.
उमरावजान ज्या नवाब सुल्तानच्या प्रेमात पडलेली असते त्याची तर मला गंमतच वाटते. प्रेम करताना लक्षात आलं नाही की ती कोठेवाली आहे म्हणून. त्याचा स्वत:चा अपमान होतो म्हणून कोठ्यावर जाणं चालत नाही पण तिला बाहेर इतरत्र चोरून भेटलेलं चालतं. त्याच्या मि्त्राकडे तिचा अपमान होतो म्हणून त्या ठीकाणी त्याला भेटायला बाणेदारपणे नकार देणारी उमरावजान खूप मोठी झाल्यासारखी वाटते. एकूण परीस्थीती पाहता खरं तर नवाब सुल्तानला स्वत:च्या आईला उमरावजानशी लग्न करण्यासंदर्भात पटवता आलं असतं पण तिथेच त्याचा कमकुवतपणा दिसून येतो.

नाही म्हणायला उमरावजानचे मौलवी सहाब की ज्यांनी उमरावजानला शायरी करायला शिकवलेली असते, डाकू फैज अली की जो उमरावजानला कोठ्यातून बाहेर काढतो हे पुरूष कमकुवत वाटत नाहीत पण तिच्या आयुष्यातील त्यांचा प्रभाव अत्यंत अल्प असा वाटतो म्हणून त्या अर्थी ते काहीसे कमकुवत ठरतात.

या सगळ्या भावनिक प्रवासात अमिरनला भेटलेल्या स्त्रिया, त्यांच्यामधील आणि तिच्यातील बौद्धिक तफावत यांचं चित्रण उमरावजानला खूप वर उचलतं. तिचा एक अतिशय साधी कमकुवत अमिरन ते अत्यंत प्रगल्भ अशी उमरावजान हा प्रवास एकूणच खूप ग्रोथ असलेला वाटतो. कारण अमिरनला पळवुन नेलं जाणं, तिचं नेमकं रंगाने सावळी असल्याने नवाबाकडे न जाता कोठ्यावर जाणं, तिथला भावनिक संघर्ष, आयुष्यात हवेसे वाटणारे क्षण हातात येतायेता निसटून जाणं आणि मग शेवटी तिचं परत लखनौच्या कोठीत परत येणं यातील कोणतीच घटना तिच्या स्वत:च्या इच्छेने झालेली नाहीये. तरीही ती या सगळ्याचा कोणत्याही प्रकारची चिडचिड, तणतण न करता स्विकार करते हीच उमरा्वजानच्या स्त्रीत्त्वाची ताकद दाखवते आणि तिचं यशही.

No comments:

Post a Comment