Tuesday, 27 July 2010

कॅनडा ट्रीप - भाग ३

कॉन्फरन्स:

 मी मुख्यत: ज्या कामासाठी कॅनडा मध्ये गेले होते त्यातील एक काम म्हणजे एड-मिडीया कॉन्फरन्स मध्ये पेपर प्रेझेंट करणे. कॉन्फरन्स टोरंटो मधील प्रसिध्द फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये (वेन्स्टीन हार्बर कॅसल) येथे भरली होती. त्या स्थानाचं महत्त्व म्हणजे आमची कॉन्फरन्स सुरू होण्याआधी तिथे जी-२० कॉन्फरन्स भरली होती आणि सगळ्या जी-२० देशांतील महत्त्वाच्या व्यक्ती त्याच हॉटेल मध्ये राहील्या होत्या. 

मी असं ऐकलं की टोरंटो मधील नागरीकांना जी-२० कॉन्फरन्स टोरंटो मध्ये नको होती कारण त्यात सगळ्या वादग्रस्त मुद्यांवर मानवी मुल्ये बाजूला ठेवून निर्णय घेतले जातात. त्याचाच निषेध म्हणून जी-२० दरम्यान तिथे खूप मोठी निदर्शने झाली. सुरक्षेचा भाग म्हणून टोरंटो डाऊन टाऊन भागात हवाई दलाची हेलीकॉप्टर्स फिरत होती. टोरंटो मधील नागरीकांनी कधीच न पाहीली इतकी सुरक्षाव्यवस्था तैनात होती. त्यामुळे त्याभागाला एका युध्दभूमीचंच स्वरूप आलेलं  होतं. आमची कॉन्फरन्स चालू झाली तेव्हा मात्रं आदल्याच दिवशी दुपारी ह्या सगळ्या गोष्टी संपल्या होत्या. 

अशा मोठ्या कॉन्फरन्स मध्ये जाण्याचा माझा पहीलाच प्रसंग. बर्‍याच देशांतून डेलीगेट्स आले होते. विषेषत: युरोपीय देश, अमेरिका, कॅनडा, चीन, जपान, कोरीया, तैवान आणि काही मध्य पूर्वेतील देशांतून आले होते. भारतातून बहुधा मी एकटीच होते. अशा मोठ्या कॉन्फरन्स मध्ये एकाच वेळी समांतर असे १२ पेक्षा जास्ती सेशन्स चालू होते. त्यात की-नोट स्पीकर्स, इन्व्हायटेड स्पीकर्स, ग्रॅड्युएट स्टुडंट्स साठीची लेक्चर्स असं सगळं एकाच वेळी ठेवलं होतं. त्यामुळे एकूण सहभागी सदस्य खूप असले तरी प्रत्येक प्रेझेंटेशन मध्ये ते विभागले जात. त्यामागील हेतू असा की प्रत्येक सदस्याला त्याला/तिला महत्त्वाचा वाटत असेल अशाच विषयाचं प्रेझेंटेशन बघता येईल. मला धास्तीच वाटत होती की माझ्या प्रेझेंटेशनला कोणी येतंय की नाही कारण माझं नाव कुणाला माहीती नाही, माझी इन्स्टीट्युशन कुणाला माहीती नाही. त्यामुळे आले तर फक्त विषय बघुनच येतील. त्यात मी पी एच डी स्टुडंट त्यामुळे स्टुडंट्च चं ऐकायला किती लोक उत्सुक असतील असं मला वाटलं. पण जेव्हा प्रेझेंटेशनची वेळ आली त्यावेळी त्या ठिकाणी १०-१५ लोक बघुन जरा हायसं वाटलं. काही काही प्रेझेंटेशन्स मध्ये फक्त २-३ लोकच होते, काही ठेकाणी फक्त प्रेझेंटर्सच होते. त्या तूलनेत मी मला भाग्यवान समजते. हे सगळे लोक विषयाचं नाव बघुन आले होते हे विशेष. प्रेझेंटेशन झालं आणि नंतर लोकांनी प्रश्न सुध्दा विचारले. जेव्हा एखाद्या प्रेझेंटेशन नंतर लोक प्रश्न विचारतात तेव्हा त्याचा अर्थ असा की लोकांना प्रेझेंटेशन समजलं आणि इंटरेस्टींग वाटलं. जर काही समजलंच नाही आणि इंटरेस्टींग वाटलं नाही तर प्रश्नच विचारले जात नाहीत. माझ्या आधी ज्या जपानी माणसाचं प्रेझेंटेशन होतं त्याचा विषय बहुधा कोणाला नीट कळला नाही किंवा इंटरेस्टींग वाटला नाही. म्हणून त्याला कोणीच प्रश्न विचारले नाहीत. 

आता अनेक जणांच्या मनात हा प्रश्न उभा राहीला असेल की या सगळ्या कॉन्फरन्स आयोजन करणे आणि त्या अ‍ॅटेंड करणे याला इतकं महत्त्व का? मुख्यं म्हणजे त्या कॉन्फरन्स मध्ये आपला पेपर प्रेझेंट करणं याला इतकं महत्त्व का? याला अनेक कारणं आहेत. त्यातील मुख्य कारण म्हणजे आपल्याच विषयात जगभरात कुठे कुठे काय काम चालू आहे याची अद्ययावत माहीती मिळते. त्यावर काम करणार्‍या लोकांशी भेटीगाठी होवून माहीतीचे आदानप्रदान होत असते. आपल्याला जर एखादी उपटुडेट गोष्ट माहीती नसेल तर त्याची माहीती आपल्याला मिळू शकते. जगभरातील इतर युनीव्हर्सीटीज मध्ये काम करणार्‍या लोकांशी आपला संपर्क होतो. मुख्य म्हणजे अशा कॉन्फरन्स मध्ये एखादा पेपर प्रसिध्द झाला म्हणजे तुम्ही करत असलेल्या कामाला मान्यता मिळते. ते सुध्दा सध्याच्या जागतिक पातळीच्या रीसर्च आणि अ‍ॅकॅडमीक कामाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. नाहीतर काही लोक कुठल्याही कॉन्फरन्स किंवा जर्नल मध्ये आपलं झालेलं काम प्रसिध्द न करता तसंच चालू ठेवतात त्याला जागतिक पातळीवर फारसं महत्त्व नसतं. पण अशा कॉन्फरन्सला जाण्यासाठी पैसा सुध्दा खूप लागतो. ज्यांचं काम चांगलं असेल अशांना काही संस्था कॉन्फरन्स अटेंड करण्या करता ग्रॅन्टस देतात. माझा कॉन्फरन्सचा खर्च माझ्या एच पी लॅब्स इंडीयाच्या फेलोशिप मधून झाला. खरंतर पी एच डी करणे याविषयी अनेक लोकांमध्ये बरेच गैरसमज आहेत. अनेकांचं मत असं आहे की पी एच डी करण्याचा काही उपयोग नसतो. या संदर्भात माझं मत थोडं वेगळं आहे. यावर आधारित एक लेख मी लवकरच शतपावलीवर टाकेन आणि अनेकांचे गैरसमज ज्यामुळे झालेले आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न करेन. असो.
यासगळ्या दौर्‍या मध्ये तसेच माझ्या केंब्रीजमधील वास्तव्या मध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे इंग्रजी भाषा आपल्याला वाटते तितकी प्रचंड वापरली जात नाही. कॅनडामध्ये फिरताना तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळांवर तर हे खूपच जाणवले की इथे इंग्रजी पेक्षा इतर भाषिकच लोक जास्त आढळले. इतर भाषाच जास्त कानावर पडल्या. गंमत म्हणजे इतर भाषिक लोक त्यांच्या त्यांच्या भाषांत बोलतात पण भारतीय लोक एकमेकांशी इंग्रजीतूनच बोलतात. आपली अशी एक राष्ट्रभाषा असायला हवी. भाषिक प्रांतवादाचं राजकारण करून हिंदीला जी बगल दिली जात आहे ती योग्य नव्हे. याचा अर्थ मुंबईत सगळे व्यवहार हिंदीतून व्हावेत असं नाही. पण आपल्या देशाच्या बाहेर गेल्यावर आपल्या देशातील लोक एका सामायिक भाषेत बोलू शकले तर किती बरं होईल. मला आठवतंय, मागे एकदा बंगलोर मध्ये आम्ही आयोजित केलेल्या एका कॉन्फरन्स मध्ये आम्ही सगळे भारतीय एकमेकांशी इंग्रजीत बोलत होतो आणि एका चिली हून आलेल्या प्राध्यापकांनी मला हा प्रश्न विचारला की भारताची राष्ट्रभाषा इंग्रजी कशी काय? मला जरा ओशाळल्यासारखंच झालं. मग मी त्यांना आपल्याकडील दक्षिण आणि उत्तरेकडील भाषांचा वाद याविषयी थोडं सांगीतलं आणि हिंदी ही तशी राष्ट्रभाषा समजली जाते कारण जास्तीत जास्त लोकांना हिंदी समजतं आणि बोलता येतं. आपण युरोपीय देशांसारखं का नाही करत? कोणत्याही युरोपीय देशातील शिकलेल्या व्यक्तीला इंग्रजी शिवाय आणि त्यांच्या मातृभाषे शिवाय फ्रेंच, इटालियन, जर्मन इ. भाषा येत असतात. मग आपल्यालाच का आपल्या देशांतील भाषा शिकण्याचं वावडं असावं? असो.
म्हणजे अगदी अ‍ॅकॅडमीक रीसर्च जगतात सुध्दा चांगलं काम हे त्या त्या देशांच्या मातृभाषांतूनच होतं. मला कौतुक वाटतं ते चीन, जपान, कोरीया, तैवान, युरोपीय देश यांमध्ये काम करणार्‍या लोकांचं. त्यांचं सगळं काम हे मुख्यत: त्यांच्या देशाशी नाळ जोडणारं आणि त्यांच्या भाषां मध्ये असतं. याचा अर्थ क्वालीटी मध्ये कुठेही कॉम्प्रमाईझ नाही. त्यांच्या कामाची क्वालीटी ही इंग्लीश स्पीकिंग देशांसारखीच आहे. किंबहुना बर्‍याचवेळा क्वालीटी जास्त चांगली असते. त्यांची सगळी सॉफ्टवेअर्स सुध्दा त्यांच्या भाषां मधुनच असतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना आपल्या भाषांबध्दल, त्यांत बोलण्याबध्दल,  त्यांचा वापर करण्यबध्दल कमीपणा वाटत नाही. मला असं वाटतं की आपण हे सगळं यालोकां कडून शिकण्यासारखं आहे. आपल्या कडे टॅलंट आहे, बुध्दीमत्ता आहे. मग आपणच का आपल्या मातृभाषेतून क्वालीटीचं काम करायला कमीपणा मानतो. मातृभाषेतून शिक्षण घेण्यात कमीपणा मानतो?....हे अजुनही न उलगडणारं कोडं आहे. का अजुनही आपण गुलामगीरीच्या मानसिकतेतून बाहेरच पडलेलो नाही. आपल्याकडे मराठी माध्यमातून होणार्‍या कामाची क्वालीटी वाईट का असते? ह्या प्रश्नांची उत्तरं गांभीर्याने शोधायला हवीत.  मला असं वाटतं की नुसताच मातृभाषेचा वृथा अभिमान धरूनही उपयोग नाही. आपण सध्या तरी इंग्रजीचा वापर अद्ययावत ज्ञान शिकण्यासाठी करावा आणि शिकलेलं ज्ञान स्वत:पुरतंच मर्यादीत न ठेवता त्याचा मातृभाषेत वापर कसा करता येईल, ते ज्ञान मातृभाषेत कसं आणता येईल याचा प्रयत्न झाला पाहीजे. हे सगळं काम आजीबात सोपं नाही. काही दशकं जर हे काम केलं तर आपल्या पुढच्या ३ पीढ्यांनंतर त्याचे चांगले परिणाम दिसायला लागतील. मला तर असलं काम करण्याची खूप इच्छा आहे. पण आपल्याकडे लोकांनी गटबाजी, एकमेकांचे पाय ओढणे, स्वार्थीपणा, तुम्ही आम्हाला काय शिकवणार, आम्हाला सांगणारे तुम्ही कोण हे असले प्रकार बाजूला ठेवले तर असं काम करणं खरंच शक्य आहे. आणि मग तीन पीढ्यांनंतर आपल्याला पण अशा जागतिक दर्जाच्या कॉन्फरन्स मध्ये भारतीयांची संख्या अधिक दिसायला सुरूवात होईल. हा सगळा पोकळ आशावाद नाहीये. असं खरंच होवू शकतं. आपली इच्छा शक्ती पाहीजे.

7 comments:

 1. अपर्णा ताइ अभिनंदन...

  >>गंमत म्हणजे इतर भाषिक लोक त्यांच्या त्यांच्या भाषांत बोलतात पण भारतीय लोक एकमेकांशी इंग्रजीतूनच बोलतात. आपली अशी एक राष्ट्रभाषा असायला हवी.

  सहमत...हे व्हायला हव.

  ReplyDelete
 2. मातृभाषेत शिक्षण मिळावे..ही संकल्पना तशी जुनीच आहे आणि योग्यही आहे...पण भारतासारख्या खंडप्राय देशात अठरापगड जाती आणि त्याहूनही जास्त भाषा आहेत...त्यामुळे निदान प्राथमिक शिक्षण वगळून बाकीचे शिक्षण हे कोणत्या तरी एकाच भाषेत द्यायला हवे...ते इंग्रजीत दिले जाते....दूर्दैवाने आपल्याकडे हिंदी वगळता अशी कोणतीच भाषा नाही जी भारतभर (निदान) बोलली जाते...त्यामुळे आपली राष्ट्रभाषा अशी कोणतीच नाहीये...त्यातून इंग्रजांनी आपल्यावर १५० वर्ष राज्य केलं, त्यामुळे इंग्रजीचं फावलं...
  आता मागे जाणे होईल असे वाटत नाहीये...इंग्रजी व्यतिरिक्त कोणत्याही एका भारतीय भाषेला राष्ट्रभाषा समजायला आपापला प्रांतिक भाषेचा अभिमान हा नेहमीच आडवा येईल....त्यामुळे आज जे काही चाललंय हे जरी कितीही न आवडणारं असलं तरी ते मान्य करण्यावाचून दुसरा पर्यायच नाहीये....संस्कृत भाषा हे काम करू शकली असती असं वाटतं...पण तिलाही आपण मृत घोषित केलंय. :(

  ReplyDelete
 3. कॉन्फरन्स यशस्वी झाल्याबद्दल अभिनंदन..!

  आपण इंग्रजी बोलतो हा एक चांगला गुण आहे असं म्हणता येईल. कारण त्यामुळेच भारतीयांनी व्यापारामध्ये सर्वांबरोबर संबध प्रस्थापित केले आहेत. आज आपल्याला राष्ट्रभाषा नाहीये.. इंग्रजी आणि हिंदी या राजमान्य भाषा आहेत, म्हणजे त्यांना कार्यालयीन कामासाठी प्राधान्य मिळते. काही जण म्हणतात तसं भारताची संस्कृती हि युरोपिअन संस्कृतीशी मिळतीजुळती आहे. वेगवेगळ्या भाषा आणि संस्कृती जपून आपण एकच चलन वापरतो.. एकमेकांशी बोलताना आपण कोणती भाषा वापरतो हे महत्वाचं आहे का? राष्ट्रभाषा एक असण्याचं महत्व उन्नती होण्याच्या दृष्टीने खूप आहे पण भारतात तशी व्यवस्था होणं खूप अवघड आहे..

  ReplyDelete
 4. मनमौजी, देवकाका आणि चेतन प्रतिक्रीयांबध्दल धन्यवाद.

  देवकाका आणि चेतन,
  अधुनिक ज्ञान विशेषत: विज्ञान-तंत्रज्ञान (की ज्याचा भविष्यात फार मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे एकूणच प्रगतीसाठी) त्यातील संशोधन मातृभाषेत आणणे गरजेचे आहे. याचा गांभीर्याने विचार झाला पाहीजे म्हणजे पुढच्या ३ पीढ्यांनंतर फायदा दिसायला सुरूवात होईल. युरोप सुध्दा खंडप्रायच आहे. आणि विविध भाषा तिथे सुध्दा बोलल्या जातात. पण त्या देशांनी स्वभाषेचा अभिमान आधीपासूनच जपायला सुरूवात केली पण अधुनिक ज्ञानाला नाही म्हणाले नाहीत. त्यामुळेच आज युरोपातील अनेक विद्यापीठांत जागतिक पातळीचे पण उच्च दर्जाचे संशोधन होते. मग अशा विद्यापीठांत जेव्हा भारतीय विद्यार्थी शिकायला जातात तेव्हा ते आपसूकच तिथली भाषा सुध्दा शिकतात. चेतन तू स्वत:च सध्या घेत असलेल्या शिक्षणासाठी फ्रेंच भाषा शिकलास ना! मग हेच आपल्या देशांत का शक्य होणार नाही? कोणताही युरोपीय नागरीक भेटला तर त्याला त्याच्या देशाच्या शेजारील देशाची भाषा येत असते. मग आपल्यालाच का येत नाही? आपल्याला गुजराती, हिंदी, कन्नड, तेलुगु या भाषांचे जुजबी ज्ञान असायला हवे. तसेच गुजराती लोकांना मराठी, राजस्थानी, हिंदी, कोकणी इ भाषांचे जुजबी ज्ञान असायला हवे. कर्नाटकातील लोकांना तेलुगु, मल्यळम, तमीळ येते पण मराठी येत नाहीच उलट त्यांना मराठीचा इतका दुस्वास का? न उलगडणारं कोडं आहे.

  उगाचच भाषेचे राजकारण करून राजकीय नेते आपल्या पोळ्या भजून घेतात.........आणि त्यांच्या पीढ्यांची तरतूद करून ठेवतात. शिवसेनेच्या मराठी आंदोलनाचा किती खरा फायदा मराठीच्या वाढीसाठी आणि स्मृध्दीसाठी झाला? आणि किती शिवसेनेच्या वाढीसाठी झाला? सध्या मनसेचे पण तेच चालू आहे. अजुन काही वर्षांनी जर मराठी किंवा हिंदी माध्यमांत विज्ञान-तंत्रज्ञानात उत्तम संशोधन करणारी विद्यापीठे निघाली तर आपली हुशार जनता आयुष्यतील महत्त्वाची वर्षे इंग्रजीची घोकंपट्टी करण्यात घालवणार नाहीत. सध्या इंग्रजीची घोकंपट्टी करण्यातच विद्यार्थ्यांची शक्ती खर्च होते. स्वतंत्र विचार करून त्यातून पुढे चांगल्या कल्पना निर्माण करून त्यांची अंमल्बजावणी करणे सध्यातर शक्यच नाही. मग आपण फक्त इतर लोकांनी निर्माण केलेल्या कल्पना इंप्लीमेंट करत बसतो (कॉपी पेस्ट टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने). यालाच आपण सर्वीस बेस्ड इंडस्ट्री (सध्याच्या संगणक क्षेत्रातील प्रोग्रॅमींग करून देणार्‍या कंपनीज) की ज्या भारतात प्रचंड संख्येने आहेत. आपण फक्त मग हमालीच करत बसतो.......इंग्रजी अ‍ॅक्सेंट शिकून टेलीफोन ऑपरेटरची सर्व्हीस करत बसतो. हे कधीतरी बदलायलाच हवं. त्यची सुरूवात नुसतं "हे बदलायला हवं" असं म्हणून होणार नाही. त्याला कृती पाहीजे. अवघड कामं तर करायला सुरूवात केली पाहीजे नं. किती दिवस सोपं तेच करत बसणार?

  ReplyDelete
 5. भारतात एक सामुदायिक भाषा असावी हे पटते परंतु हिंदी वि. इंग्रजी या वादामुळे ते शक्य होईल असे वाटत नाही.
  तुमचा पी एच डी बद्दलचा लेख वाचायला आवडेल.

  http://mipunekar.wordpress.com/

  ReplyDelete
 6. पुणेरी प्रतिक्रीया - एकटीच होती, मग जे सांगशील ते ऐकावे लागेल, विश्वास ठेवणे जरा अवघड आहे!
  माझी प्रतिक्रीया - मनापासून अभिनंदन! तुझा विषय त्या जागेत वाचून दाखवलास ह्या बद्दल! पण विषय काय होता हे समजायला फार उत्सुक आहे. एके काळी भारताने ह्या विश्वातील प्रत्येक प्रांताचा, देशाचा मार्गदर्शक म्हणून हजारो वर्ष मान मिळवला आहे. तो हरवलेला मान पुन्हा मिळणे अशक्य व्हावे म्हणूनच हाजरो वर्ष अक्रमण झाली. संस्कृतीचा, भाषांचा घोळ मुद्दाम घडवून आणला गेला, व स्वकीय धेंड त्याला खतपाणी घालण्यात पुढाकार घेतात. ज्ञानाला सोप्या भाषेत सांगणारे नव्हते, नाहीत, नसणार असे नसून ते नसावेत हाच प्रयत्न ही घोळकर मंडळी करीत आहेत. नशीब माझे, हे पटवून देणारा मी वेडा ठरतो.

  ReplyDelete
 7. आपण जरा विचार केला तर आपल्याजवळ इंग्रजी मध्ये जे तंत्रज्ञानाचे शब्द आहेत तसे आधुनिक ज्ञानाचे शब्द सर्वच आहेत असे नाही. आपण विज्ञान शिकवताना इंग्रजी शब्द मराठी मध्ये लिहितो. ते तयार करण्यासाठी एक विशेष विभाग हवा. मेयर साठी महापौर असं शब्द आला त्याप्रमाणे या शब्दांची एक 'डिक्शनरी' तयार करावयास हवी. मग पुस्तके लिहिण्यास लेखकांस तसदी घ्यावी लागणार नाही.

  मी तुम्च्यासाही सहमत आहे कि आपल्याला बाकीच्या भाषांचे ज्ञान असायला हवे. युरोप मध्ये शाळेत सर्व मुलांना २ भाषा वेगळ्या शिकवतात. आणि त्यांना ६ पर्याय असतात- (पोर्तुगीज, इंग्रजी, जर्मन, रशियन, स्पॅनिश, इटालियन) आपल्या इथे कोणत्याही शाळेत असे पर्याय ठेवायला शाळा राजकारणी लोकांना घाबरतात का? का असं नियम आहे कि कन्नड भाषा महाराष्ट्रात शिकवू नये? काही शाळांमध्ये फ्रेंच आणि जर्मन शिकवले जाते. पण इतर भारतीय भाषा अजिबात नाही. हे का??

  भाषेच्या वादातून भारताचा United states of India होऊ नये असं वाटतं.

  आणि ताई तुम्ही तिथे कॉन्फरन्स मध्ये काय विषय होता तो सांगा न थोडक्यात :)

  ReplyDelete