Sunday, 9 May 2010

माझे गरूडपुराण


बर्‍याच जणांना गरूडपुराण म्हणजे नक्की काय हे माहीती असण्याची शक्यताच आहे म्हणून ही प्रस्तावना: आपल्या पूर्वजांनी हिंदूधर्मात सर्व विषयांवर आधारित साहित्य (अगदी कामसूत्रा पासून ते गरूडपुराणा पर्यंत) लिहून ठेवलंय. गरूडपुराण हे माणूस मेल्यानंतर पुढे त्याचं म्हणजे आत्म्याचं काय होतं या विषयावर आधारित आहे. म्हणूनच गरूडपुराण हे अशुभ किंवा निषिध्द पण मानतात. त्यामुळेच ते पुराण कोणाला माहीती नसतं. आपल्याकडे सगळं गोड-गोड म्हणजेच गुडी-गुडी लागतं. अगदी एखाद्या चांगल्या बॉलीवूड पटाचा शेवट जरी दु:खी असेल तर तो पडतो किंवा दिग्दर्शकांना तो बदलून आनंदी-आनंद गडे करावा लागतो. पण मला हे पटत नाही. या लेखात आयुष्यातील जे अंतीम सत्य आहे तेच समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. मृत्यू पासून पळून जाण्यात काहीच अर्थ नाही. उलट त्याला आपण जेवढ्या प्रगल्भतेने सामोरे जाऊ तेवढे आपले जगणे सुखाचे होते.  मोठ मोठ्या लोकांना याची महती पटली आहे. अगदी आचार्य अत्रे, व पु काळे यांनी सुद्धा त्यावर त्यांच्या त्यांच्या स्टाईल ने विनोद केले आहेत. कोणाचा शेवट कसा होईल कोणीच सांगू शकत नाही. मी दहावीत असताना वर्गातील एका मैत्रीणीचे वडील अपघातात गेले. तिला त्या दिवशी आम्ही सगळे (मित्रं) भेटायला गेलो तो माझा अशा घटनेशी झालेला प्रत्यक्ष असा पहिला सामना. तोपर्यंत सगळं फक्त ऐकूनच. अगदी लहान असताना तर रस्त्यावरून कोणाची प्रेतयात्रा जरी दिसली तरी मला घरात बसून रडायला यायचे. हे सांगण्या मागचा हेतू हाच की माझा वयाच्या तिशीच्या अगदी उंबरठ्या पर्यंत (अगदी तिशीच्या आतच म्हणाकी) कुठुन कुठे प्रवास झाला ते लक्षात येईल.  तो प्रवास कसा आणि का झाला ह्यावरून इतरंना थोडं धैर्य मिळालं तर मिळेल म्हणून हा लेख. माझं गरूडपुराण हे माणूस मरताना काय होतं या अनुभवावर आधारित आहे.

परवाच आमचे एक लांबच्या नात्यातील पण जवळच्या संपर्कातील मामा कर्करोगाने निवर्तले. मी आपला काल सांत्वनासाठी मामींना फोन लावला. बोलता बोलता लक्षात आलं की सगळे डायलॉग तेच फक्त व्यक्ती बदलतात. एकदम २००३ साल आठवलं. आमची आई संधीवाताने आंथरूणाला खिळून होती. तब्बल साडे आठ वर्षे! बाबा आणि मी तिचे सगळं करायचो. कधी अडचण असेलच तर बहीणी येऊन-जाऊन असायच्याच. माणूस मरतो म्हणजे नक्की काय होतं ते अगदी जवळुन आणि स्लोमोशन मध्ये अनुभवलं. त्याच परिस्थितीत कोण खरंच आपले आणि कोण खरे परके हे सुद्धा कळून आलं. परमेश्वरसुद्धा सगळं व्यवस्थित दाखवत असतो. आपली समजायची आणि बघायची कुवत लागते.

आईला फेब्रुवारी २००३ मध्येच एक बेड सोर्स झाला होता. असं म्हणतात की अंथरूणाला खिळलेल्या व्यक्तीला बेडसोर्स झाले म्हणजे समजावे की त्या व्यक्तीचा शेवट जवळ आला. हे मला घरात झालेल्या घटनेमुळेच समजले. आई स्वत: आयुर्वेदाचार्य असल्याने (फारशी प्रॅक्टीस न केलेली) तिला तर हे सगळं उघडपणे समजत होतंच.म्हणूनच ती कदाचित माझं लग्नं पटापट कोणाशीतरी (म्हणजे सुयोग्य व्यक्तीशीच.......त्याचीच तर मारामार ना! त्यावर एक वेगळं "विवाह पुराण" लिहीता येईल. सध्या आपण माझ्या गरूडपुराणावरच कॉन्सनट्रेट करूयात. ) लावून द्यावं (स्वत:च्या डोळ्यासमोर) असा विचार करत असावी. असो.
बेडसोर्स मुळे हळूहळू ते इन्फेक्शन सगळ्या शरीरभर पसरत चाललेलं होतं. आम्ही रोज ती बेडसोर्स ची जखम धुवुन आणि जखम भरून येण्यासाठी असलेली पावडर त्यात भरून मलमपट्टीकरायचो. तरी ती जखम जास्तच खोल होत चालली होती. आईचा चेहरा तर कधी प्रचंड थकलेला तर कधी अतिशय उजळलेला दिसायचा. खाणं तर जवळ जवळ बंदच झाल्या सारखं होतं. कुठे २-३ चमचे पेज खाल्ली तर खायची. छातीत कफ वाढत होता. ही सगळी जाणार्‍या माणसाची लक्षणं आहेत हे मला नंतर समजलं. तिचं बोलणं पण खूप कमी झालं होतं. अगदी आवश्यक तेवढंच बोलायची नाहीतर सगळा संवाद हातवारे करून चालायचा. त्यादिवशी सुध्दा मी शाळेत निघाल्यावर तिने मला हात केला आणि मान डोलावून अच्छा केला.

दुसरा तास चालूच झाला होता आणि मी वर्गात पोहोचल्यावर मला घरून फोन आलाय आणि घरी ताबडतोब बोलावलंय असा निरोप मिळाला. माझ्या छातीत धस्स झालं. पण मी तशीच घरी पोहोचले. नाचणीची पेज पितांना तिला खोकल्याची उबळ येवून ती पेज तिच्या छातीत गेली असंच आम्हाला वाटलं. तिला बोलता येत नव्हतं, चेहरा आणि मान सारखी वळवुन ती काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतेय असं आम्हाला वाटत होतं. त्यावेळी आमच्या आईची आई जिवंत होती. आम्ही तिला निरोप दिला. पण मुंबईहून तिला यायला किमान ४ तास तरी लागणारच होते. आईच्या तोंडातून खूप विचित्रं आवाज येत होता. तिचा चेहरा पहावत नव्हता. मला तर सुरूवातीला उलटीच झाली ते सगळं पाहून पण मग मी स्वत:ला सावरलं. तोपर्यंत बहीणी पण घरी पोचल्या.
हळू्हळू ती थोडी नॉर्मल होते आहे असं वाटायला लागलं. त्यादिवशी रात्री मी तिच्या उशाशी बसून होते. ती फक्त एकच म्हणाली करूणाष्टकं वाच. मी रामरक्षा, करूणाष्टकं सगळं पुन्हा पुन्हा तिला झोप लागे पर्यंत म्हणत तिच्या उशाशी बसले होते. तिला झोप लागल्यावर मी पण पडले. पहाटे पहाटे मला अचानक एका विचित्रं अशा आवाजाने जाग आली. उठुन पहाते तो आईला पुन्हा त्रास चालू झाला होता. त्यानंतर ती जी कोमात गेली ती कधीच बाहेर आली नाही. पण तिच्या घशातून अतिशय विचित्रं आवाज येत होता आणि तिचे डोळे पण उघडे होते. त्यात काही ओळख नव्हती. हे असं अखंडपणे रात्रं दिवस चालू होतं.

दिवसा लोकं भेटायला यायचे म्हणून बाबांना आम्ही रात्री झोपवायचो. रात्रीची वेळ मी, माझी मधली बहिण आणि धाकटा मामा अशी तिघांनी वाटून घेतलेली असायची. मोठ्या बहिणीकडे सगळी मुलं राहीली होती आणि दुसरी मधली बहीण तिला ४ महिन्यांचा मुलगा असल्याने त्याच्यात गुंतेली होती. रात्रीच्या वेळी त्या सगळ्या वातावरणात एकटं जागं रहाणं पण कठीण त्यामुळे आम्ही दोन दोन आलटून पालटून जागायचो. पण माझी तर झोपच उडाली होती. शरीराला विश्रांती हवी म्हणून मी पडायची कारण दिवसा मला स्वयंपाक घरात उभं रहायला लागायचं. अशावेळी लोकांना पण समजत नाही की कोणत्यावेळी भेटायला जावं, किती वेळ बसावं ते. माणसांचे वेगवेगळे नमुनेच बघायला मिळतात.
डॉक्टरांनी सांगीतलं होतं की हॉस्पीटल मध्ये ठेवून उपयोग नाही. त्यांना सगळी कडून नळ्या लावून आय सी यू त ठेवतील. कोमा मधला पेशंट अशाच अवस्थेत कितीही काळ राहू शकतो. तीन दिवसापासून ते तीस वर्षं कितीही काळ. याला फक्त वाट पहाणे येवढंच आपण करू शकतो. सकाळ संध्याकाळ येऊन डॉक्टर तिला झोपेचं इंजक्शन देत होते पण तिचं शरीर ते इंजक्शन सुद्धा स्विकारत नव्हतं. इंजक्शनची टोचलेली सुई जशी बाहेर काढली जाईल तसंच ते इंजक्शनचं द्रव कारंज्यासारखं बाहेर यायचं. कशाचाच उपयोग होत नव्हता.

मला एका ओळखीच्यांनी सांगीतलं तिला काहीतरी काळजी असणार म्हणून तिचा जीव अडकलाय. मला लक्षात आलं काय काळजी असेल ते. त्यांनी मला हे सुध्दा सांगीतलं की जर तुमच्या नातेवाईकांपैकी कोणी जर तिच्या कानात "मुलीच्या लग्नाची काळजी करू नकोस ते आम्ही बघु", तर कदाचित ती जाईल. उपस्थित सगळ्यांमध्ये ही बातमी पसरली. कोणीच पुढे येऊन बोलायला तयार नाही. मग मीच ठरवलं आणि मनाचा हिय्या करून तिच्या जवळ गेले आणि कानात बोलले, "माझी आणि बाबांची काळजी करू नकोस आम्ही सगळं व्यवस्थित करू. माझं लग्नं पण मी व्यवस्थित करेन". तरी तिच्या स्थितीत फरक नव्हता. मग वाटलं की बरीच वर्ष आंथरूणाला खिळल्याने तिला कुलदैवतांना जाता आलं नाही. मग मी तेसुद्धा तिला सांगीतलं की तुझ्या वतीनं मी सगळीकडे जाऊन येईन. पण तू आता नि:शंक मनाने पुढच्या प्रवासाला लाग.

तसं मी आमच्या कुलदैवतांच्या पुण्यातील मंदिरांत जाऊन पण देवांना सांगीतलं. माझ्या मैत्रीणीच्या सासर्‍यांनी दिलेलं गंगाजल तिच्या तोंडात घातलं आणि अर्ध्यातासात तिची घर घर थांबली. तिचा चेहरा शांत दिसत होता. तशातच पुढे तीन दिवस तिने काढले आणि चौथ्या दिवशी तिचा प्राण गेला. "मरावे परी नेत्ररूपी उरावे" यासाठी म्हणून आम्ही पुण्यातील एका नेत्रंपेढीला आधीच संपर्क करून चौकशी करून ठेवली होती. पण तेथिल डॉकटरांनी दाखवलेल्या निश्काळजीपणा मुळे ते सुद्धा साध्य होवू शकलं नाही.
माणूस जातो म्हणजे नक्की काय होतं, त्या व्यक्तीचा आत्मा कुठे जातो हे सगळे प्रश्नं माझ्या मनात घर करून होते. कदाचित मी ते सगळं बोलायला आणि गंगाजळ टाकल्यावर आईची घरघर थांबायला - अगदी कावळा बसून फांदी तुटणे इतकाच जरी योगायोग धरला तरी मला कुठेतरी या सगळ्यावर विश्वास ठेवावा असंच वाटलं. कारण मी ते सगळं अनुभवलं आहे. आई गेल्याने आमच्या घरात आणि आयुष्यांत एक प्रचंड पोकळी निर्माण झाली होती. सगळीच कामं संपल्या सारखं रिकामं रिकामं वाटत होतं. दरम्यान आप-पर ओळखीने आपणच आपले सावरलेले बरे हे समजल्याने दुसर्‍यावर विसंबुन न राहता आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरूवात केली. यथावकाश मी आणि बाबा कुलदैवतांना बोलल्या प्रमाणे जावून आलो. मला एकच समाधान की आई पुढच्या प्रवासास जाताना नि:शंक आणि समाधानी होती.
कोण म्हणतं ......"सगळ्यांचं आयुष्यं सेम असतं?" प्रत्येकाचं आयुष्यं हा एक ग्रंथ असतो. आपण वाचायला शिकायची खोटी आहे तुलना न करता.