Thursday, 19 July 2012

दिव्यांची आमावस्या!

http://www.flickr.com/photos/kshitijthakur/5993989684/
पूर्वी आषाढ आमवस्येपासून घराघरांत कहाण्यांची पुस्तकं बाहेर काढली जात आणि दिव्यांच्या अवसेच्या कहाणीपासून महिनाभर पुढे रोज संध्याकाळी देवाजवळ दिवा लावल्यावर, शुभंकरोती म्हंटल्यावर त्या त्या दिवसाची कहाणी वाचली जात असे. प्रत्येक वाराची किमान एक कहाणी तरी असेच. श्रावणातील प्रत्येक वारी कोणते ना कोणते व्रत करण्याची पद्धत त्यामुळे त्या व्रताचे महत्त्व किंवा ते व्रत कसे सुरू झाले, ते व्रत कसे करायचे, त्याव्रताने ने लोकांना कशाप्रकारे फायदा झाला, ज्यांनी ते व्रत मधेच सोडून दिले त्यांना कसा त्रास झाला इ. सर्व त्यात असे. पण दिव्यांची आमावस्या या दिवसाची कहाणी फक्त एकच दिवस वाचली जायची. दिव्यांच्या आमावस्येला घरातील सर्व दिवे (देव्हार्‍यातील चांदीच्या निरांजन-समई पासून ते कंदिला पर्यंत) घासून लख्ख केले जात. त्यांची पूजा केली जात असे. त्या दिवशीच फक्त कणकेचे गोड दिवे केले जायचे. संध्याकाळी घासून पुसून स्वच्छ झालेले दिवे लावल्यानंतर खूप सुंदर दिसायचे. मला दिव्याच्या आमावस्येची स्वच्छ घासलेले दिवे आणि कणकेचे गोड दिवे यांमुळे मजा वाटत असे. श्रावणातील पहिला दिवस जिवतीचा कागद देव्हार्‍यात लावून, तिची पूजा करून, कहाणी वाचून सुरू व्हायचा. मला त्या कहाण्या, कहाण्यांमधील विश्व खूप गंमतीशीर वाटायचे. मग इतर वेळी श्रावण नसतानाही कधी कधी मी त्या कहाण्या वाचत असे. 

http://www.flickr.com/photos/shree2much/3772798508/
त्यावेळीही आणि अत्तासुद्धा मी काही खूप कर्मकांड मानत नसे. पण मला त्या कहाण्या पंचतंत्रांतील गोष्टींसारख्या वाटायच्या. मी त्यातून माझं लॉजीक लावून काहीतरी शहाणपण उचलत असे. "आता दिव्याच्या आवसेचीच कहाणी बघा. राजाच्या सुनेने आपण चोरून खाल्ले त्याचा आळ उंदरांवर घेतल्याने उंदीर संतापले आणि त्यांनी तिची फजीती करण्यासाठी तिची चोळी पाहुण्यांच्या बिछान्यात टाकली. त्यामुळे दुसर्‍या दिवशी सकाळी तिला घरातील लोकांनी घराबाहेर काढले. राजाची सून घरातील साफ सफाई करत असे. दिव्यांच्या आमावस्येला दिव्यांची लख्ख घासून पुसून पूजा करत असे. त्यावर्षी राजाची सून घरात नसल्याने दिव्यांच्या आमावस्येला राजाच्या घरातील दिव्यांची सफाई झालीच नाही. त्या दिवशी राजा प्रवासातून घरी परतत होता आणि विश्रांतीसाठी गावाबाहेरच्या झाडाखाली बसतो. तेवढ्यात त्याला त्या झाडावर बसलेल्या दिव्यांचे बोलणे कानावर पडते. गावातील सर्व दिवे त्या झाडावर एकत्र जमून गप्पा मारत असतात. सगळे दिवे आपली कशी छान स्वच्छता आणि पूजा झाली याचं वर्णन करत असतात. पण राजाच्या घरचा दिवा मात्र हिरमुसलेला असतो. कारण त्याची सफाई आणि पूजा झालेली नसते. मग तो सगळी हकीकत सांगतो. राजा घरी आल्यावर घडला प्रकार कोणी प्रत्यक्षा पाहीला आहे का याची शहानीशा करतो. त्यातच त्याला सुनेची चूक नसल्याचे समजते आणि मग तिला मेणा पाठवून बोलावून घेतले जाते. मग सगळे सुखाने नांदतात." मला ही गोष्ट इतकी गोंडस वाटते. इथे उंदरापासून दिव्यापर्यंत सगळ्यांना व्यक्तीमत्त्व दिलेलं आहे. यातूनच आपल्या सभोवतालच्या वातावरणाशी अतिशय चांगल्या पद्धतीने कसे वागावे (अगदी निर्जीव वस्तू सुद्धा सजीव असल्यासारखे वागावे) हे अप्रत्यक्षपणे शिकवले गेलंय. अप्रत्यक्षपणे विश्वातील सर्व गोष्टींत चैतन्य असते हेच सांगीतलंय. पुन्हा खोटं बोलू नये, दुसर्‍यावर आळ ढकलू नये ही नितीमत्ता आलीच. त्याच बरोबर दिव्यांची सफाई म्हणजे साफसफाईचे महत्त्व आले. श्रावण महिना म्हणजे विविध व्रत वैकल्यांचा महिना. प्रत्येक दिवशी वाराप्रमाणे देवाची पूजा करून, देवाला विशिष्ट नैवेद्य दाखवून, त्या दिवसाची कहाणी वाचून साजरा करतात. मग या सुंदर अशा महिन्यांत घर देखिल स्वच्छ असायला हवं. श्रावण महिना पावसाचा महिना. दिव्यांची घासपूस करून ते देखिल स्वच्छ ठेवले तर छान पवित्र तर वाटतेच. पूर्वीच्या काळी अत्तासारखे विजेचे दिवे नसत. त्यामुळे तशी महिन्यातून एकदा दिव्यांची साफसफाई होत असेच. अगदी सध्याच्या विजेच्या दिव्यांच्या काळात विज कधी गायब होईल सांगता येत नाही तेव्हा दिवे तयार असलेले बरे. असा देखिल दुहेरी फायदा आहे. 

मला तर हे सगळे दिवस (म्हणजे नागपंचमी, बैलपोळा, दिव्याची आवस) म्हणजे त्या त्या प्राणी किंवा वस्तूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असलेले दिवस वाटतात. आपल्या हिंदू धर्मात वराहापासून सर्व प्राण्यांमधे देवत्त्व असल्याचे सांगीतले आहे. म्हणून ३३ कोटी देव आणि प्रत्येक देवाला आपापलं वाहन. म्हणजे त्या त्या देवा बरोबर त्या प्राण्याचीही पूजा होते. त्याचेही महत्त्व वाढते. सगळेच लोक हे पाळतात असं नाही पण आपली जीवनशैली, आपले सण (पूर्वीच्या स्वरूपातले) हे निसर्गाशी अधिकाधिक जवळीक साधणारे होते. सगळेच लोक काही बुद्धीमान नसतात. मग काही तात्वीक गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या असतील तर त्या अशा कहाण्या, देव, व्रत अशा माध्यमांतून पोहोचवणे उचित आहे असे वाटल्याने हे सगळे अस्तित्त्वात आले असावे असे मला वाटते. पण शेवटी मनुष्य स्वभावाचे दोष पूर्वीही होते आणि अत्तासुद्धा आहेतच. त्यामुळे कर्मकांडाचा विपर्यास केला जातो. साधारणत: श्रावण, भाद्रपद (गौ्री-गणपती), अश्विन (देविचे नवरात्र-दसरा), कार्तिक (दिवाळी) असे महिने आहेत. याच महिन्यांत अधिकाधिक महत्त्वाचे सण येतात. हे महिने पावसाळा आणि शेवटी थंडीची सुरूवात असे असतात. पावसाळ्यात वातूळ अन्न, जड पदार्थ नीट पचत नाही्त म्हणून वांगी, कांदा-लसूण (ह्यांचा वासही उग्र असतो) इत्यादी पदार्थ खाल्ले जात नव्हते. हे सर्व पाळणे यालाच चातुर्मास पाळणे असे म्हणतात. 

http://www.smsblaze.com/smstext/gatari-amavasya-sms/
आता जे लोक मांसाहारी आहेत ते सुद्धा चातुर्मासात मांसाहार तसेच मद्यपान करत नाहीत. पण जे मांसाहार करतात, मद्यपान करतात त्यांना ते आवडते फक्त एक पद्धत म्हणून चार महिने ते करायचं नाही. मग चार महिने मांसाहार करायला मिळणार नाही दारू ढोसायला मिळणार नाही म्हणून चातुर्मास चालू होण्याच्या एकच दिवस आधी हे सगळं वारेमाप खाऊन-पिऊन घ्यायचं. नेमका तो दिवस म्हणजे दिव्याची आमावस्या येतो. कित्येक वर्षं मला दिव्याच्या आमावस्येला "गटारी आमावस्या" देखिल म्हणतात हे माहीत नव्हते. ८-१० वर्षांपूर्वी समजले. तसे म्हणण्याचे कारणही समजले कारण जे लोक मांसाहार करतात, मद्यपान करातात ते लोक त्या दिवशी भरपूर खाऊन-पिऊन अक्षरश: गटारात देखिल लोळतील इतके देहभानही त्यांना रहात नाही. फेसबुक सारख्या सोशल नेटवर्कींग साईटवर आल्यानंतर "गटा्री" हा प्रकार लोकांमधे किती पॉप्युलर आहे याचा प्रत्यय येतो. म्हणजे लोक एकमेकांना गटारीच्या शुभेच्छा देतात. काल दिवसभरात "गटारीच्या शुभेच्छा" असे कित्येक स्टेट्स बघीतले. म्हणजे आपला हिंदू समाज कुठुन कुठे चालला आहे त्याचं हे एक उदाहरण आहे. ज्यांना मांसाहाराशिवाय होत नाही, मद्यपान आवडते त्यांनी ते सरळ सरळ करावे १२ महिने करावे. उगाचच आपल्या सणांना बदनाम करू नये असं वाटतं.

याचं प्रमाण इतकं वाढलं आहे की नविन पीढीला हिंदूंच्या सणांची, साजर्‍या केल्या जाणार्‍या दिवसांची किळस यावी. मग हेच का आहे हिंदू धर्मात मग जर दारू पिणं वाईट आहे तर मग आपण आपले सण कशाला साजरे करायचे? असे प्रश्न अनेक पालकांना त्यांच्या मुला-मुलींनी विचारले असतील. गणेशोत्सवाचे, नवरात्रोत्सवाचे, दहिहंडीचे, दिवाळीचे, होळी-धुळवड-रंगपंचमी, संक्रांतीचे देखिल तेच झाले आहे. गणेशोत्सवात गणपतीच्या मूर्तीपुढे अश्लील गाणी लावून, लाऊड स्पीकरच्या भिंती लावून मद्यपान करून लोक हिडीस नाचतात. नवरात्रातही तोरण महोत्सवाच्या नावाखाली तेच चालू असतं. दिवाळीला इतके प्रचंड फटाके उडवायचे की सगळीकडे हवेचे आणि आवाजाचे प्रदूषण करून ठेवायचे. मकर संक्रांतीला पतंगबाजी करण्यासाठी मांजांना काचेचे आवरण लावून पक्ष्यांचे जीव घ्यायचे. तसं पाहिलं तर गणपती उत्सव, नवरात्र हे घरच्या घरी साजरे केले जाणारे सण. देश पारतंत्र्यात असताना लोकमान्य टिळकांनी जनतेला इंग्रज सरकार विरूद्ध एकत्र आणण्यासाठी, त्यांच्यात जागृती घडवण्यासाठी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. ते स्वरूप देखिल खूप विधायक होते. दिवाळीतही पूर्वी पणत्या, आकाश दिवे, सुगंधी तेल-उटणं लावून अभ्यंग स्नान इ. गोष्टी होत्या. फटाके उडविणे हा प्रकार नव्हताच. सध्या जरी मकर संक्रांतीला पतंगबाजी चालू असली तरी हे आपल्या मूळ संस्कृतीत सांगीतलेलंच नाही. पतंग उडविणे, काचेच्या आवरणापासून मांजा बनवून पतंगांची काटा-काटी हे सगळं अरब देशांतून मुघलांबरोबर आलेलं आहे. कोणतीही गोष्ट थोडक्यात केली तर ठीक आहे. त्याचा अतिरेक झाला की त्रास होतो. सध्याच्या हिंदू सणांचं एकूणच स्वरूप बघता आपण आपल्या मूळ संस्कृतीपासून किती दूर भरकटत चाललो आहोत याची कल्पना येईल. पुढच्या पिढीकडे आपण नक्की कोणता सांस्कृतिक ठेवा देऊन जाणार आहोत याचाही विचार आपण केला पाहीजे असं वाटतं.