| http://danielgovar.com/gallery/womanhood-unfinished |
जगात फेमिनीझम म्हणजेच स्त्रीवादाचा उदय होऊन अनेक वर्षं झाली. पाश्चात्य देशांत स्त्रीमुक्ती चळवळी उभ्या राहिल्या, फोफावल्या, यशस्वी तसेच अयशस्वी सुद्धा ठरल्या. या चळवळींची यशस्विता नेमकी कशावरून ठरवली जाते आहे हे महत्त्वाचे. स्त्रिया शिकू लागल्या, त्यांना पुरूषांच्या बरोबरीने काम करण्याची संधी मिळाली, कायदेशीररित्या पुरूषांच्या बरोबरीचे हक्क मिळाले म्हणजे स्त्रीमुक्त झाली का? मुळात काही जणांना प्रश्न पडलेला असतो की स्त्री ही खरंच बंधनात आहे का? काही जणं म्हणतील अति मुक्त आहेत म्हणून मोकाट सुटलेल्या आहेत. प्राचार्य शिवाजीराव भोसल्यांनी त्यांच्या एका व्याख्यानात म्हंटल्याचं स्मरतंय की स्त्री आणि पुरूष हे संसाराच्या गाड्याची दोन चाकं आहेत. एक चाक निखळलं तरी गाडा पुढे चालणार नाही. त्यामुळे एकटी स्त्री मुक्त होऊ शकत नाही तसेच एकटा पुरूषही मुक्त होऊ शकत नाही. म्हणजे नक्की काय? या फेमिनीझम मधे फेमिनीटीचा म्हणजेच स्त्रीत्त्वाचा कितपत विचार होतो? हा उहापोह करण्याआधी आपल्याच आजूबाजूला घडलेली, घडत असलेली काही प्रसंगचित्रे उभी करून त्यातील स्त्रीत्त्वाच्या वेदना काय आहेत याचा शोध घेण्याचा प्रयत्न स्त्रीत्त्ववेणा मधून करते आहे.
------------------------------------------------------------------------------------------
१. वनवासी कल्याण आश्रमाच्या केंद्र. वेळ रात्रीची, बाहेर मुसळधार पाऊस कोसळतोय. आश्रमाच्या इमारतीला लागूनच असलेल्या माळरानावर दुपार पासूनच मेंढपाळांचं पाल पडलेलं आहे. संध्याकाळपासूनच पावसाने जोर धरलाय. रात्र जशी वाढतेय तसा पावसाचा तडाखा वाढलेलाच आहे. माळरानावरच्या पालातील खुडबुड आश्रमात स्पष्ट ऐकू येतेय. अचानक पालातील लगबग वाढते. पहाटेच्या सुमारास अचानक तान्ह्या बाळाचा रडण्याचा आवाज यायला सुरूवात होते. अगदी नुकत्याच जन्मलेल्या बाळाचा आवाज. तो आवाज ऐकून पालात आता ओली बाळंतीण असणार हे गृहीत. पावसाच्या धडाक्यामुळे बाळंतीणच कशाला सगळं पालच ओलं आहे. सकाळी पाऊस थांबलेला स्वच्छ उन्ह पडलेलं आणि दुपारपर्यंत माळरानावरचं पाल ओल्याबाळंतीणीसकट उठलेलं असतं.
***********************************
२. पुण्यातील भांडारकर रस्त्यामधील एक प्रथितयश मॅटर्निटी होम. दाराशीच थांबलेल्या मर्सीडीज बेंझ मधून एक तरूण स्त्री तिचा नवरा आणि सासू यांच्याबरोबर उतरते. आधीच फोन करून ठेवलेला असल्याने नर्सींगहोमच्या रिसेपशनीस्टला त्यांना नक्की कुठे जायला सांगायचंय हे माहीती असतं. तशी नेत्रपल्लवी होऊन त्यांना एका छोट्याशा खोलीकडे पाठवलं जातं. बंद दाराआड त्या तरूण स्त्रीची सोनोग्राफी केली जाते. गर्भ मुलीचा आहे हे समजल्यावर त्या तरूण स्त्रीला काय वाटतंय याचा जराही विचार न करता डॉक्टरांना तिचा गर्भपात करण्यास सांगीतलं जातं.
**************************************
३. एक मध्यमवर्गिय कुटुंब. घरात तीन मुलींचा चिवचिवाट. त्या चिमण्यांची आई सुद्धा अतिशय नाजूक पण चेहर्यावरून तिला काहीतरी होत असावं असं वाटावं इतकी मलूल झालेली. घरात चर्चा चालू आहे ती नातू आणण्याची. त्यासाठी तिच्यावर चौथं गर्भारपण लादलं जातंय. तिला नक्की काय वाटतंय याचा विचार न करता.
***************************************
४. घरात चार मुली आहेत. मुलाची हौस भागावी म्हणून सगळ्यात धाकट्या मुलीला कायम मुलाचे कपडे घालायला दिले जातायत. ती मुलगी ओरडून सांगतेय मी मुलगी आहे, मुलगा नाही. त्यामुळे मला मुलाचे कपडे घालायचे नाहीत. तरीही तिला मुलाचे कपडेच घालायची जबरदस्ती केली जाते.
*****************************************
५. अफ्रिकेतील एका देशातील बातमी. मुलगी वयात येण्याच्या आधीच तिच्या योनीतील एक अतिशय नाजूक भाग की ज्यामुळे तिला आनंदाची अनुभूती मिळू शकते, काढून टाकून योनीला मोठे भोक पाडले जाते. म्हणजे तिचा उपयोग फक्त मुलं पैदा करण्यासाठी व्हावा आणि तिला लैंगिक सुखाची अनुभूती काय असते याची कल्पना सुद्धा न येवो.
******************************************
६. एका मध्यमवर्गीय घरात बारावीला मुलीला चांगले गुण मिळालेले असतात. मुलीला खूप इच्छा असते आपण आर्कीटेक्चरला जावं पण घरात आई सांगते तुझ्या शिक्षणावर पैसे खर्च करून आम्हाला काय फायदा. जे शिक्षण कमी खर्चाचं असेल तेच शिक्षण तुला घ्यावं लागेल. पुढे कर्मधर्म संयोगाने त्या मुलीवरच घरची जबाबदारी पडते. मुलाप्रमाणे ती ते सगळं निभावून नेते.
********************************************
७. एका नवपरिणीत विवहीतेला दिवस जातात. त्या गोड बातमीचं कन्फर्मेशन डॉक्टरांकडून मिळाल्यावर ती धावतच आपल्या नवर्याला ही गोष्ट सांगायला जाते. नवरा मूल होऊ देण्यास मानसिक दृष्ट्या तयार नसतो आणि म्हणून तिला ते मूल अॅबॉर्ट करायला लागतं. त्याला मूल नको म्हणून तिला आय यू डी सारखं काही बसवून घ्यायला लागतं की ज्याचा तिला भयंकर त्रास होतो.....शारीरीक तसेच मानसिक.
*********************************************************
८. पाश्चात्य देशातील एक जोडपं पस्तीशी जवळ आलेली. त्यातील स्त्रीला मूल हवंय पण पुरूषाला मूल नकोय. त्या स्त्रीला दिवस गेलेले असतात. नवरा अॅबॉर्शन करायला सांगतो पण ती त्याला डिव्होर्स देते आणि आपल्या बाळाला जन्म देते. पुढे एक नवा जोडीदार निवडते आणि नविन आयुष्य चालू करते. आधीचा जोडीदार पश्चात्ताप करत बसतो आणि नविन जोडीदार शोधतो.
*******************************************************
९. एका मध्यमवर्गीय घरात वयात येणार्या मुली आहेत. त्यांच्या आईवर तिच्या वडिलांच्या मानसिकतेचा जबरदस्त पगडा. त्यामुळे मुलींनी नटायचं नाही, अगदी पावडर सुद्धा लावायची नाही असा आईच्या वडिलांचा खाक्या आईनेही मुलींवर लादलय. मुलींना स्वत:च्या स्त्री असण्याचा वैताग येईल इतपत हे सगळं चालू आहे.
*****************************************************
१०. साधारण १०० वर्षांपूर्वीचा काळ. मुलगी वयात आली म्हणजे तिला न्हाणं आलं की तिचं स्त्रीत्त्व साजरं व्हायचं. त्या मुलीला दागदागीन्यांनी सजवलं जायचं. तिची पूजा केली जायची.
************************************************
११. जपान मधे मुलगी १५ वर्षांची झाल्यावर घरी तिच्या बरोबरीच्या किंवा तिच्या पेक्षा मोठ्या मुलांना आवर्जुन बोलावून एक पार्टी करतात आणि तिची ओळख अनेक समवयस्क भिन्नलिंगी व्यक्तींशी करून दिली जाते.
*****************************************************
१२. साधारणत: त्याच १०० वर्षांपूर्वीच्या काळी बालविधवेचे केशवपन केले जायचे. स्निग्ध पदार्थ खाणे, चांगले चुंगले खाणे तिला वर्ज्य असायचे. पण काहीवेळा घरातील किंवा अपवादानेच बाहेरील पुरूष अशा विधवेचा गैरफायदा घेत असत. मग त्या बिचारीलाच कुल्टा ठरवून शिक्षा दिली जायची.
*****************************************************
१३. पूर्वी काही खेडेगावांत जर एखाद्या मुलीच्या केसात जटा झाल्या तर तिला देवाला सोडलं जायचं. म्हणजे जर एखाद्या मुलीकडे काही कारणाने दुर्लक्ष झालं आणि केस स्वच्छ नाही राहू शकले तर केसात धूळ अडकून जट तयार झाली की त्यामुलीला घरापासून तोडून देवळात रहायला सांगायचे आणि मग ती वयात आल्यावर किंवा त्याही आधीपासून सगळ्या गावातील पुरूषांच्या वेळीअवेळीच्या गरजा भागवायला मोकळी ठेवलेली असे. यालाच देवाला सोडणं असे म्हणत.
**************************************************************
१४. एक कलिग तिची व्यथा सांगत असते. सेक्स च्या बाबतीत माझा विचार कधीच हो नसतो. नवर्याला पाहिजे तेव्हा त्याने उचलायचं आणि बेडवर पटकायचं. माझा भयंकर संताप होत असतो. पण काही करू शकत नाही. हे ऐकताना मला सुद्धा भयंकर चीड येते.
************************************************************
खर्या अर्थाने स्त्रीत्त्वाचा सन्मान करायचा असल्यास आपल्याकडे अजुनतरी खर्या अर्थाने स्त्रीमुक्ती वगैरे येणं याला काही शतकं लागतील. आपल्याकडे अजुनही नोकरी करणार्या स्त्रीला बाळंतपणाची सुट्टी तीन महिने मिळते. तीन महिन्यांत काय काय होतं? जर एखादीला बेड-रेस्ट सांगीतली तर तिने नोकरी सोडून द्यायची का? नोकरी सोडून देणं भविष्याच्या दृष्टीने परवडणारं नाही म्हणून मग तिने आई बनण्याचं स्वप्न बाळगायचंच नाही. एकप्रकारे हा सुद्धा स्त्रीचं स्त्रीत्त्व नाकारण्याचा प्रकार आहे. स्वीडन, नॉर्वे यासारख्या देशांत, त्या देशात जन्माला येणारं प्रत्येक मूल, मग ते कोणत्याही रेसचं, नॅशनॅलीटीचं असो, एक राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित केलेलं असतं. त्यामुळे नोकरी करणार्या आईला त्यागोष्टीसाठी दोन वर्षं पेड लिव्ह देण्याची सोय आहे. नवर्याने त्यातील कमीत कमी सहा महिने पेरेंटल लिव्ह घेणं अनिवार्य आहे. सरकार तर्फे नोकरी करणार्या आई-वडिलांच्या मुलांसाठी पाळणाघरही चालवलं जातं. हे एका अर्थाने स्त्रीचं स्त्रीत्त्व जपणंच आहे. त्याचा आदर करणं आहे. आजकाल स्त्रीमुक्ती ही कन्सेप्ट जबाबदारी टाळण्यासाठी वापरली जाते. म्हणजे स्त्रीचं शरीर हवं असेल तेव्हा तिच्यातलं स्त्रीत्त्व छान आहे. पण त्यातून मूल नको असतं, कारण जबाबदारी नको असते. मग त्यावेळी सोयीस्कररित्या तिचं स्त्रीत्त्व नाकारलं जातं तिचा मूल जन्माला घालायचा जन्मसिद्ध अधिकार डावलून.
**************************************************************
असे किंवा यापेक्षा वेगळे अनेक प्रसंग सांगता येतील. या सगळ्यात एकच गोष्ट कॉमन आहे आणि ते म्हणजे स्त्रीचं स्त्रीत्त्व! या प्रसंगांवरूनच लक्षात येतं की स्त्रीचं स्त्रीत्त्व समाजाने, कुटुंबाने आणि स्वत: स्त्री ने स्विकारलेलं आहे की नाही. मला असं वाटतं की एखाद्या समाजात स्त्रीमुक्ती चळवळ यशस्वी झाली की नाही याचं मोजमाप त्या समाजात स्त्रीच्या स्त्रीत्त्वाला किती किंमत आहे यावर ठरवता येईल. स्त्रीत्त्व नाकारलं गेल्याचीच अधिकाधिक उदाहरणं या प्रसंगांतून समोर येत आहेत. स्त्रीच्या स्त्रीत्त्वाचा आदर करणे म्हणजेच स्त्रीमुक्ती....आणि पुरूषाच्या पुरूषत्त्वाचा आदर म्हणजे पुरूष मुक्ती. या दोन्ही मुक्ती एकमेकांच्या सहकार्या शिवाय होणारच नाहीत. स्त्रीत्त्वाच्या वेणा समजल्याशिवाय हे होणार नाही.