(छायाचित्र महाजालावरून साभार)
अकरा सप्टेंबर आलं की मला नेहमी स्वामी विवेकानंदांनी १८९३ साली शिकागो येथील सर्वधर्म परिषदेत उद्गारलेले "माझ्या अमेरिकेतील भगीनी आणि बंधुंनो.........." हे उद्गार आठवतात. त्याच बरोबर याच अमेरिकेतील बंधु भगीनींवर "विश्वबंधुत्त्व दिनाच्या दिवशीच" २००१ साली झालेला भीषण हल्ला सुद्धा आठवतो. सगळं जगच विरोधाभासाने भरलेलं आहे. आता हेच बघा ना एखाद्या भिकारणीचं नाव लक्ष्मी तर एखाद्या चकण्या मुलीचं नाव सुनयना. जिथे लिहीलेलं असतं "येथे थुंकु नका" तिथल्याच भिंतींवर पानाच्या पिचकार्यांनी रंग भरलेले असतात. शिवाजी महाराजांच्या किंवा महात्मा गांधींच्या नावाखाली त्यांच्या शिकवणुकीच्या बरोबर विरूद्ध वर्तन करायचं. कलीयुग आहे........पण स्वामी विवेकानंदांना मात्र भारत सार्या जगाला अध्यात्माचं ज्ञान देईल याची खात्री वाटत होती......म्हणून तर त्यांनी भविष्यच वर्तवलं होतं की "भारत हा एक दिवस जगतगुरू होणार आणि सार्या विश्वाला बंधुत्त्व, अध्यात्म शिकवणार". तसं आपल्या भारतीय संस्कृतीत अध्यात्म इतर जगाच्या तुलनेत मुरलेलं आहे. म्हणूनच इथे निर्वासीतांना आसराही मिळतो आणि शरण आलेल्याला अभय. हे स्वामी विवेकानंदांचे शिकागोच्या भाषणातील उद्गारांमधील काही शब्द आहेत. आज त्याप्रसंगाला ११७ वर्षं पूर्ण झाली म्हणून मनात विचार आला की स्वामी विवेकानंदांनीच वेळोवेळी त्यांच्या पत्रांतून आपल्या शिष्यांना लिहीलेल्या काही निवडक विचारांचं संकलनच प्रसिद्ध करूया. म्हणून ही प्रस्तावना!
(खालील विचार हे स्वामी विवेकानंदांचे असून "विवेकानंदांची पत्रे" या पुस्तकातील मी काढलेल्या टिपणांवर आधारित आहे.)
१) भगिनी निवेदिता यांना: माझें ध्येय कांही थोड्याशा शब्दांत मांडले जाऊ शकते. मानवाला त्याच्या ठिकाणी वास करणार्या ईश्वरत्त्वाचा उपदेश देणे आणि जीवनांतील प्रत्येक कार्यांत हे ईश्वरत्त्व कसे प्रकट करावे यासंबंधीचा मार्ग दाखवून देणे हेच माझे ध्येय आहे.
२) जगातील सर्व दु:खांचे कारण म्हणजे अज्ञान होय. जो आत्मत्याग करेल तोच जगाला प्रकाश देईल. पृथ्वीवरील सर्वांत पराक्रमी आणि सर्वश्रेष्ठ लोकांना आत्मबलिदान करावेच लागेल.
३) अंत:करणात अनंत प्रेम आणि दया असलेले शेकडो बुद्ध आज हवे आहेत.
४) धर्म हे निर्जीव विडंबनाच्या रूपाचे बनले आहेत. जगाला आज चारित्र्याची नितांत गरज आहे.
५) संपूर्ण आयुष्य म्हणजे एक स्वप्न मालिका आहे. जाणीवपूर्वक ही स्वप्ने पहावीत इतकीच माझी आकांक्षा आहे.
६) प्रलय म्हणजे कार्याचे कारणांत विलीन होत जाणे होय आणि सृष्टी म्हणजे कारणांतून कार्य प्रकट होत जाणे होय.
७) वस्तुत: नातेवाईक म्हणजे माणसाच्या प्रगतीच्या मार्गांतील भयंकर अडथळेच असतात. असे असून देखील लग्न करून लोक नवी नाती जोडण्याच्या फंदात पडतात याचे खरोखरच नवल वाटते.
८) प्रत्येकाने आपापला उद्धार करून घ्यावा. सर्व बाबतीत स्वाधीनता असणे म्हणजेच मुक्तीच्या रोखाने प्रगती होणे. हाच खरा पुरूषार्थ होय. शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक स्वाधीनता प्राप्त करून घेण्याच्या दिशेने स्वत: प्रगती करणे आणि इतरांनाही तशी प्रगती करून घेण्यास साह्य करणे हाच परम पूरूषार्थ होय.
९) अनुभवानेच आपण सर्व शिकत जातो. दुर्दैव एवढेच की या ज्ञानाचा उपयोग मात्र या जगात करता येत नाही; कारण ज्या क्षणी आपण शिकून तयार झालो असे आपल्याला वाटते त्याच क्षणी जगाच्या या रंगभूमीवरून आपल्याला अदृष्य व्हावे लागते आणि हीच खरी माया आहे.
१०) या जगात दोन प्रकारचे लोक आढळतात. पहिल्या प्रकारचे लोक खंबीर मनाचे, शांत, निसर्गापुढे मान तुकविणारे व कल्पनेच्या आहारी फारसे न जाणारे, परंतु चांगले, सज्जन, दयाळू व मधुर स्वभावाचे असतात. जग हे अशा लोकांसाठीच आहे. हे लोक सुखी होण्यासाठी जन्माला आलेले असतात. याच्या उलट दुसर्या प्रकारचे लोक अत्यंत संवेदनक्षम मनाचे असतात, ते कल्पनाप्रधान असतात व त्यांच्या भावना अतिशय तीव्र असतात. हे लोक एका क्षणात आकाशांत भरारी मारतील, तर दुसर्या क्षणी एकदम खाली येतील. या लोकांच्या नशिबी सुख नसते. पहिल्या प्रकारच्या लोकांचे आयुष्य साधारणपणे सुखाच्या सम पातळीवरून जात असते, तर दुसर्या प्रकारच्या लोकांच्या जीवनाचा ओघ कधीच सम नसतो; कधी कधी हे लोक अत्युच्च आनंदाचा अनुभव घेतात तर दुसर्याच क्षणी ते दु:खी होताना दिसतात. परंतु आपण ज्यांना असाधारण प्रतिभाशाली म्हणतो अशा व्यक्ती ह्या लोकांमधूनच उद्भवतात हे मात्र सत्य आहे. ’असाधारण प्रतिभा असणे म्हणजे एक तर्हेचा वेडेपणा’ या सध्याच्या प्रचलित सिद्धांतात काही सत्यांश आहे यात शंकाच नाही.
आता उपर्युक्त प्रकारात मोडणार्या लोकांना जर खरोखरच मोठे व्हायचे असेल तर त्यांनी अगदी शेवट पर्यंत लढत राहीले पाहीजे, संघर्षासाठी मैदान नेहमी मोकळे ठेवले पाहीजे. त्यांच्या पाठीशी कोणतेही व्यवधान असता कामा नये. विवाह नको, संतान नको; स्वत:च्या डोळ्यांसमोर ठेवलेल्या आदर्शांशिवाय दुसर्या कोणत्याही वस्तूबद्धल अनावश्यक आकर्षणही अशा व्यक्तीने ठेवता कामा नये; स्वत:च्या आदर्शासाठी जगण्याची व प्रसंगी प्राणाहुती देण्याचीही तिने तयारी ठेवणे आवश्यक आहे.
आता उपर्युक्त प्रकारात मोडणार्या लोकांना जर खरोखरच मोठे व्हायचे असेल तर त्यांनी अगदी शेवट पर्यंत लढत राहीले पाहीजे, संघर्षासाठी मैदान नेहमी मोकळे ठेवले पाहीजे. त्यांच्या पाठीशी कोणतेही व्यवधान असता कामा नये. विवाह नको, संतान नको; स्वत:च्या डोळ्यांसमोर ठेवलेल्या आदर्शांशिवाय दुसर्या कोणत्याही वस्तूबद्धल अनावश्यक आकर्षणही अशा व्यक्तीने ठेवता कामा नये; स्वत:च्या आदर्शासाठी जगण्याची व प्रसंगी प्राणाहुती देण्याचीही तिने तयारी ठेवणे आवश्यक आहे.