(नम्र निवेदन: अमृतयात्री गटाच्या श्री सलील कुलकर्णी यांनी शुध्दलेखनातील बदल सुचवले आहेत .तसेच श्री प्रमोद देव यांनी मनोगत च्या शुध्दलेखन तपासण्याचा आधार घेवून थोडी मदत केली. या दोघांचेही आभार!)
दि. १२ जूनच्या दैनिक लोकसत्तेच्या चतुरंग पुरवणीमध्ये "घरीच शिक्षण किंवा होमस्कूलिंग" या संकल्पनेवर आधारित ‘घरात शाळा’ हा शुभदा चौकर यांचा, तसेच या संकल्पनेचं उदाहरण विस्ताराने सांगणारा प्रयोगाची ’पायवाट’ हा वंदना अत्रे यांचा आणि ’शिकतं घर’ हा अमरजा जोशी यांचा प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण या संकल्पनेवर आधारित एका शाळेची माहिती सांगणारा, असे तीनही लेख वाचनात आले. सर्व शिक्षण अभियानातील घोटाळे, विविध शालेय मंडळांचे अभ्यासक्रम त्यातून पुढे येणारे गुणांचे राजकारण, एकूणच महाग होत चाललेले शिक्षण आणि ढासळत चाललेला शैक्षणिक दर्जा या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर हे लेख आशादायकच वाटतात. पण लेख वाचताना माझ्या मनात काही प्रश्नांनी पिंगा घालायला सुरुवात केली. त्यांचाच थोडा उहापोह या लेखांच्या परीक्षणामध्ये करत आहे.
तशी होमस्कूलिंग ही संकल्पना आपल्याकडे नवीन नाही. रविंद्रनाथ टागोर आणि विक्रम साराभाई यांना त्या काळातील शालेय शिक्षण खूपच तोकडे वाटत असल्याने आणि त्यांनी विचारलेल्या शंकांचं निरसन करण्याऐवजी शिक्षक त्यांच्यावरच आगपाखड करत असल्याने दोघांनाही घरीच स्वतंत्रपणे शिकवण्यास शिक्षक येत असत. अमेरिकेत ही संकल्पना राबविणारे पालक सुद्धा एकेक विषय शिकवायला स्वतंत्र शिक्षक ठेवतात. इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांच्या नियतकालिकात असे ’होमस्कूलिंगसाठी शिक्षक पाहिजेत’ अशा भरपूर जाहिराती असतात. मला आठवतंय एका जाहिरातीत तर चक्क नमूद केलेलं होतं की “रोज जेवण करताना आमची मुलांबरोबर विविध विषयांवर चर्चा होते. तर इच्छुक उमेदवाराने आमच्याच बरोबर कुटुंबात राहावे आणि मुलांबरोबर त्या चर्चांमध्ये सहभाग घ्यावा.”
माझा पहिला प्रश्न याच गोष्टीशी संबंधित आहे. वर उल्लेखलेल्या लेखांमधील उदाहरणांत आणि मी दिलेल्या उदाहरणांत घरीच शिक्षण या व्यतिरिक्त अजून एक साम्य आहे. ते म्हणजे त्यांची घरची पार्श्वभूमी. या सर्व उदाहरणांतील पालक धनिक आणि अत्यंत सुशिक्षित किंबहुना उच्चशिक्षित आहेत. रविंद्रनाथ टागोर आणि विक्रम साराभाई यांचे पालकांनी त्यांना स्वत: भले शिकवलं नाही पण स्वतंत्र शिक्षक ठेवले. सखी बोरकर, सहल कौशिक, प्रल्हाद यांच्याबाबतीत त्यांचे पालक त्यांना शिकवत होते. वेळप्रसंगी स्वतंत्र शिक्षकही नेमले. काहीं आई नाहीतर वडील यांनी स्वत:चा व्यवसाय, करिअर बाजूला ठेवून आपल्या मुलांना शिकवण्यासाठी खूपच वेळ दिला आहे. माझ्या परिचयातील पुण्यामधील जालनापूरकर नामक कुटुंबीयांनीसुद्धा आपल्या मुलांना असेच होमस्कूलिंग दिले आहे. या सर्व पालकांनी आपल्या ज्ञानाच्या उपयोगाबरोबरच इंटरनेटवर मोफत उपलब्ध असलेल्या दर्जेदार शैक्षणिक साहित्याचा, आणि संदर्भांचा उपयोग केला आहे असे दिसते. मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होवू नये यासाठी विशेष काळजी घेऊन त्यांच्याच आपल्याच घरात विविध उपक्रम राबवून, इतर मुलांना आपल्याच घरी बोलावून, मुलांचे समवयस्क मुलांमध्ये मिसळणे सुकर करणे, त्यांना विविध छंदवर्ग, खेळ यांसाठी पाठवणे अशाही पूरक गोष्टी केलेल्या दिसतात. हे सगळं शक्य झालं ते केवळ पालकांकडे असलेला पैसा आणि पालकांचे उच्चशिक्षित असणे या वस्तुस्थितीमुळे. याला अपवाद डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांचा. चतुरंग मध्येच त्यांच्या मुलाने, अमृत अभय बंग याने, त्यांच्याविषयी लिहिलेला लेख वाचनात आला. अमृतला सुध्दा होमस्कूलिंगच मिळालं. त्याच्यासाठी पण त्यांनी भरपूर कष्ट घेतले. त्याचे पालकही उच्चशिक्षित पण तरीही त्यांनी गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात वास्तव्य करून तेथील आदिवासींसाठी काम करून आपल्या मुलांमध्येसुध्दा समाजाचे ऋण फेडण्याची प्रेरणा निर्माण केली. पण जिथे ह्या गोष्टी नाहीत; म्हणजे पालक धनिक नाहीत, सुशिक्षित नाहीत किंवा अल्पशिक्षित आहेत; तिथे हे घरीच शिक्षण शक्य आहे का? या संकल्पनेचा मुलांवर शैक्षणिक दृष्ट्या जरी सकृद्दर्शनी चांगला परिणाम दिसत असला तरी इतर दूरगामी परिणामांचं काय? या मुलांना अगदी समवयस्क मुलांना घरी आणून सोशलाइज करण्याचा प्रयत्न केला तरी त्या मुलांमध्ये “मी कोणीतरी विशेष” ही भावना कशावरून वाढीस लागलेली नसेल? सध्याच्या परीक्षाकेंद्रित शिक्षणपद्धतीमध्ये मुलं शाळेत जातात ती ते फक्त परीक्षांमध्ये गुण मिळवण्यास असाच काहीसा अर्थ निर्माण झाला आहे. तसेच एकूणच शिक्षणाचा, शाळांचा दर्जा ढासळलेला आहे. त्यामुळे अमेरिकेतून भारतात स्थायिक होणार्या किंवा उच्चशिक्षित पालकांनाच काय पण सामान्य पालकांना सुद्धा मुलांच्या भवितव्याची चिंता असणं साहजिक आहे. पण होम स्कूलिंग हा पर्याय किती व्यवहार्य आहे याचाही विचार व्हायला हवा असं मला वाटतं.
आपल्याकडे ज्या पद्धतीच्या शाळा मिशनरी लोकांनी सुरू केल्या त्या पाश्चात्य शिक्षणपद्धतीवर आधारित होत्या. अमेरिका-युरोप मध्ये जसजशी औद्योगिक क्रांती होत गेली तसतसे त्यांचे शैक्षणिक धोरणही बदलत गेले. जशा आपल्याकडे सुधारणा होत गेल्या तशा अमेरिकन शैक्षणिक पद्धतीतील बदलाचे वारे काही वर्षांचे अंतर ठेवून आपल्याकडेही वाहू लागले. आता पूर्वीच्या तुलनेत जागतिकीकरणामुळे अमेरिकेत जाऊन राहणार्या भारतीयांचे प्रमाण तसेच अमेरिकेत काही वर्षं काढून भारतात स्थायिक होणार्याचं प्रमाण वाढत असल्याने आपल्याकडील काही सामाजिक स्तरांमध्ये हे बदलाचे वारे लगेचच येतात. अमेरिकेत सर्वांना समान शिक्षण देणे या संकल्पनेवर आधारिरीत पण औद्योगिक जगताशी जोडली गेलेली गोष्ट म्हणजे विविध वयोगटांप्रमाणे वर्गांची विभागणी आणि घाऊक पद्धतीने सगळ्यांना शिक्षण देणे. त्यात प्रत्येक मूल स्वतंत्र क्षमतेचं असतं ही संकल्पना लक्षातच घेतली नव्हती. ही संकल्पना आता खूपच जोर धरीत आहे. तसेच काही ठिकाणी ही विभागणी गुणांवर आधारित करण्यात आली. जसजसे या सगळ्यांचे तोटे लक्षात यायला लागले तसतसे अमेरिकन शिक्षणपद्धतीमध्ये आणि पर्यायाने सगळ्याच फर्स्ट वर्ल्ड देशांतील शिक्षण पद्धतींमध्ये बदल होत गेले. त्यात तंत्रज्ञानातील प्रगतीने अधिकच भर टाकली. पाश्चात्य देशांत काही शाळांमध्ये तर प्रत्येक विद्यार्थ्याला एक लॅपटॉप (उर्ध्वपट) वापरायला दिला जातो. कित्येक ठिकाणी दूरस्थ शिक्षणपद्धतीचे वेगवेगळे प्रयोग केले गेले आहेत. त्यातच मग एम आय टी सारख्या नामवंत विद्यापीठांनी आपल्या शिक्षकांना/प्राध्यापकांना ते वापरत असलेले किंवा त्यांनी स्वत: तयार केलेले शैक्षणिक साहित्य, मजकूर महाजालाच्या (इंटरनेटच्या) साहाय्याने जे विद्यार्थी प्रत्यक्ष तिथे प्रवेश घेऊ शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी खुला केला. शालेय पातळीवर सुद्धा मग शैक्षणिक संसाधनांचे साठे (लर्निंग ऑबजेक्ट रिपॉझीटरीज) तयार करण्यात आले. अशा साठ्यांची माहिती असलेले सर्वच जण म्हणजे विद्यार्थी, शिक्षक, पालक असे सगळेच त्यांचा वापर करू शकतात. प्रत्येक विद्यार्थ्याची गरज वेगळी, त्याला शिकावं असं वाटेल तो वेळ प्रत्येकाचा वेगळा या अशा संकल्पना अस्तित्वात आल्या. अमेरिकेत सगळी अंतरं खूप लांब आहेत. त्यामुळे एका विद्यार्थ्याचा शाळेत जाण्याचा खर्च आर्थिक आणि वेळ यादृष्टीने खूप. म्हणजे विद्यार्थ्याच्या स्वतंत्र गरजेनुसार शिक्षण द्यायचं असेल तर एका व्यक्तीसाठी एक शिक्षक शाळेत येणं हे सुद्धा परवडणारे नाही. ढासळलेली कुटुंबव्यवस्था. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून अमेरिकेत डी-स्कूलिंग म्हणजेच शाळेत न पाठवण्याची संकल्पना अस्तित्वात आली. यातूनच होमस्कूलिंग ही संकल्पना जन्माला आली आहे. एका विशिष्ट वयापर्यंत सगळ्याच मुलांना शाळेत शिकणं बंधनकारक असल्याने जे खूप श्रीमंत नाहीत अशांची मुलं सरकारी शाळांमध्ये जातात. होमस्कूलिंग ही संकल्पना तिथे सुद्धा धनिक आणि उच्चशिक्षित पालकांमध्ये अधिक प्रचलित आहे.
शाळेत मुलांनी एकत्रं शिकणे हे त्यांच्या निकोप वाढीसाठी अत्यावश्यक मानलं गेलं आहे. मुलं ही समवयस्क मुलांकडून खूप काही शिकत असतात. पूर्वीच्या काळी घरांमध्ये एकत्र कुटुंबपद्धतीमुळे अनेक भावंडं असायची त्यामुळे जरी घरी शिक्षक शिकवायला आले तरी मुलांना मिळून-मिसळून राहण्याचं शिक्षण मिळत असे. अगदी पूर्वी आपल्याकडच्या गुरुकुल पद्धतीमध्ये सुद्धा या सगळ्याचा सखोल विचार झालेला आढळतो. त्यामध्ये अगदी राजपुत्रांपासून ते गरीब ब्राह्मणांची मुलं गुरूगृही राहून एकत्रितपणे शिक्षण घेत असत. गुरुजी प्रत्येक शिष्याच्या क्षमतेनुसार त्याला शिक्षण देत. त्यामुळे राजपुत्रांचे पायही जमिनीवर राहण्यास मदत होत असे. सर्वांना सर्व प्रकारची कामं करायला लागत असत. वयाने मोठे असलेले विद्यार्थी आपल्यापेक्षा लहान विद्यार्थ्यांना मदत करत असत.
त्याच्या बरोबर उलट सध्याची परिस्थिती आहे. संयुक्त कुटुंबपद्धतीमुळे तसेच लोकसंख्या विस्फोट, आर्थिक विवंचना या सगळ्या कारणांमुळे प्रत्येक घरात एक ते दोन मुलं असतात. पण हे सुद्धा मध्यमवर्गीय सुशिक्षित घरांतील चित्रं आहे. मग विद्यार्थ्यांना जर समवयस्कांकडून शिकायची, त्यांच्यात मिळून-मिसळून राहायची संधीच मिळाली नाही तर त्याचे दूरगामी परिणाम त्या विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वावर होतील असं नाही का वाटत? अशा पद्धतीने शिक्षण घेतल्याने ती मुलं स्वत:विषयीच्या तयार झालेल्या अवास्तव संकल्पना बाजूला ठेवून पुढे समाजात मिसळतील का इथपासून शंका येते. बरं, भारताच्या तुलनेने अमेरिका हा श्रीमंत देश आहे. तिथली पाश्चात्य संस्कृती ही मुळातच व्यक्तिकेंद्रित आहे. त्यामुळे तिथे अशा संकल्पनांनी जोर धरला तरी त्यांच्या संस्कृतीच्या दृष्टीने तसा फरक पडत नाही; उलट ते पोषकच ठरते. पण भारतासारख्या पदोपदी विषमतेच्या दर्यांचं दर्शन होत असलेल्या कुटुंबकेंद्रित, समाजकेंद्रित संस्कृतीमध्ये अशा प्रकारे सामाजिक विषमतेमध्ये वाढीस भर घालणारी आणि व्यक्तिकेंद्रित संस्कृतीकडे नेणारी पद्धत कितपत सयुक्तिक आहे? होमस्कूलिंग ही संकल्पना जरी चांगली आणि परिणामकारक वाटत असली तरी आपल्या देशातील एकूण परिस्थिती बघता तिचा आपल्या देशात विस्तार होणं अवघडच आहे. काही मोजकी धनिक आणि उच्चशिक्षित कुटुंबच हे करू शकतील. तंत्रज्ञानातील प्रगतीने आणि त्या अनुषंगाने उपलब्ध व्यावसायिक संधींमुळे आय.टी. आणि इतर अशी एक मोठी दरी निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस त्याचे प्रमाणही वाढते आहे. आय.टी. मधील पालकच आपल्या मुलांना इंटरनॅशनल स्कूल्स मध्ये घालत आहेत. त्यातील काही जणांना होमस्कूलिंग हा पर्यायही चांगला वाटेल आणि शक्यही असेल. पण इतर मुलांचं काय?
त्या दृष्टीने विचार करता मला ’शिकतं घर’ ही संकल्पना आपल्या देशाच्या नाळेशी घट्ट नाते सांगणारी वाटली. ह्यात सुद्धा जागरूक आणि सुशिक्षित पालक यांचाच सहभाग आहे. मग इतर मुलांना चांगलं शिक्षण देण्यासाठी आपल्याला काय करता येईल? आपल्या देशात सुद्धा महाजालाचा (इंटरनेटचा) वापर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मग प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या शाळांनीच या तंत्रज्ञानाचा वापर का करून घेऊ नये? तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यामागचा एक मोठा उद्देश आहे जगातील विविध समाजांत, देशांत जी विषमतेची दरी आहे ती कमी करणे. याचा उपयोग आपल्याला महाकाय लोकसंख्या आणि प्रचंड विषमता असलेल्या देशात करता आला तर खूप चांगले होईल. तंत्रज्ञान, संगणक यांचा वापर शालेय स्तरावर करणे याचा अर्थ शिक्षकांची जबाबदारी किंवा काम कमी करणे असा होत नाही. उलट शिक्षकांनी पूरक म्हणून त्याचा विचार करावा आणि स्वत:चा अधिक विकास घडवून आणावा असे वाटते. संगणक आणि महाजाल याचा सयुक्तिक वापर खरंतर आपल्या देशातील शहरी-ग्रामीण, गरीब- श्रीमंत यांमधल्या शैक्षणिक दर्जातील दरी कमी करण्यास मदतगार ठरू शकते. शैक्षणिक दर्जा सुधारणे हे सर्वस्वी आपल्या हातात (जनतेच्या) आहे. आपण जर उत्तमतेचा ध्यास घेतला आणि उत्तमतेची कास धरली तर दर्जा घसरण्याऐवजी वाढेलच यात शंका नाही. डी-स्कूलिंग, होम स्कूलिंग सारख्या संकल्पना जरी चांगल्या आणि परिणामकारक वाटल्या तरी त्याचे दूरगामी आणि आपल्या संस्कृतीवर होणारे परिणाम आणि आपल्या विषमतेने भरलेल्या समाजात त्याचा परिणामकारक विस्तार कितपत होवू शकतो यांची चर्चा व्हायलाच हवी असे वाटते.
छान आहे लेख. आवडला.
ReplyDeleteधन्यवाद महेंद्रजी.
ReplyDeleteVery good article.we really need to rethink on it.
ReplyDeleteरेखा ब्लॉगवर स्वागत. खरंय, सगळ्याच गोष्टी तपासून पहाव्यात ......आपल्या संस्कृती आणि सामाजिक गरजांनुसार. एक छान पुस्तक आहे "डिसरप्टींग क्लास" क्लेटन एम ख्रीस्तेन्सन (Clayton M. Christensen) यांनी लिहीलेलं. संगणकाचा वापर वैयक्तिक दृष्ट्या शिक्षण देण्यासाठी अधिक प्रभावीपणे करता येईल. सवड मिळाली की त्यावर आधारित एक स्वतंत्र लेख लिहीणार आहे.
ReplyDeleteसप्रेम नमस्कार.
ReplyDeleteशांतिसुधा (अपर्णा लळिंगकर) यांचा मुद्दा पटण्यासारखा आहे. त्या स्वतः शिक्षणक्षेत्रातच संशोधन करतात.
भारतीय शिक्षणपद्धतीत नक्कीच काहीतरी मूलभूत दोष आहेत हे नक्की. इंग्रजांकडून मिळालेल्या शिक्षणपद्धती, शासनव्यवस्था, न्यायव्यवस्था, संसदपद्धती हे सर्व आपण जसेच्या तसे घेतले पण त्यातील दोष कमी करण्याचा किंवा काही चांगल्या गोष्टी नव्याने त्यात आणण्याचा फारच प्रयत्न केला. खरं म्हणजे आपल्या राज्यघटनेने बर्याच सुधारणांसाठी पाया तयार केलेला आहे. पण अशा उत्तम राज्यघटनेच्या पायावर अंमलबजावणीचे मजले चढवताना आपण घटनेला अभिप्रेत असलेल्या बर्याच मूलभूत तत्त्वांकडेच दुर्लक्ष केले व राजकारण्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी घटनेचा उपयोग करून घेतला. अनेक वेळा घटनेतील योग्य तरतूदी बदलून तिचे विडंबनच केले. (उदा० राजीव गांधींनी प्रसिद्ध शहाबानो खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय दडपून टाकण्यासाठी केलेली घटनादुरुस्ती.) स्वतः इंग्लंडनेही आपल्या कायद्यात, शासनववस्थेत व शिक्षण पद्धतीत बर्याच सुधारणा केल्या. पण आपण पुरेशा सुधारणा न केल्यामुळे किंवा अयोग्य सुधारणा केल्यामुळे आपली अधोगतीच झाली आहे. आपल्या देशात कुठलीही चांगली गोष्ट परिणामकारक न ठरण्याला असलेले मूलभूत कारण म्हणजे भ्रष्टाचार. पण कुठल्याही पक्षाचे सरकार आले तरी त्यांनी भ्रष्टाचारावर मूलभूत व कठोर उपाय करणे टाळलेच आहे. शिक्षणक्षेत्रातही अधोगतीच होत आहे. त्यामुळेच १०० कोटीच्या भारताने इस्रायल, जपान व इतर अनेक लहान देशांच्या मानाने काहीही मूलभूत संशोधन केलेले नाही. सॉफ्टवेयर मधील body shopping म्हणजे कंत्राटी मजूर-पुरवठा करण्याचे थोडे उदात्त-सुधारित स्वरूप. बिहारी लोक ज्या कारणांसाठी मुंबई व इतर ठिकाणी जातात, किंवा केरळी मजूर मध्यपूर्वेच्या देशांत जातात; त्याच कारणांसाठी आपले सॉफ्टवेयर अभियंते परदेशात स्वस्तात कामे करून इथल्या मानाने अधिक पैसे कमावतात व मग इथल्या सामान्य माणसांहून रूबाब दाखवतात. त्यात फार अभिमानास्पद असे जेवढे वाटते तेवढे काही नक्कीच नाही.
हा सर्व आपल्या शिक्षणपद्धतीचाच पराभव आहे. अर्थात त्यावर उपाय काय हा विषय वेगळा. त्याबाबतीतही शिक्ष्णतज्ज्ञांची मते आपल्या राजकारण्यांना व सामान्य जनतेला पटत नाहीत. तेव्हा हे दुष्टचक्र असेच चालू राहणार असे दिसते.
क०लो०अ०
- अमृतयात्री गट
धन्यवाद अमृतयात्री गट आणि शतपावलीवर स्वागत. सध्या खूपच घाईत असल्याने सविस्तर उत्तर लिहू शकत नाहीये. जेव्हावेळ मिळेल तेव्हा नक्कीच लिहेन.
ReplyDeleteशी क्षणीक वगैरे असे काहींसे माझे मत झाले आहे. म्हणून मला असे वाटले . . . . .
ReplyDeleteशिक्षण आणि ज्ञानाची गोष्ट तर अगदी साधी आहे. घोळकरांचे अस्तित्व, सुखसोयी व गरजा ज्याने साध्य होते ते शिक्षण, त्याचा उगम, अंत व मालकी हक्क सांगता येतो, मोजता येतो. फार साधे सोपे आहे हो हे. पण ज्ञानाला ना उगम ना अंत ना मर्यादा ना मालक ना मोजमाप, छे म्हणूनच घोळकरांना मान्य नाही. गोष्ट बघा ही साधी सोपी आहे.
Read more: विनायक उवाच http://vkthink.blogspot.com/#ixzz0uzRHQoRY