Wednesday, 23 June 2010

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा!!



 (निवेदन: काही महिन्यांपूर्वी हा लेख लिहीला होता आणि तो इ-सकाळ मध्ये पैलतीर सदरात छापून आला होता. अर्थातच काही मजकूर वगळून. काहींना त्यावर प्रतिसाद लिहायचा आहे म्हणून त्यांनी मला तो लेख शतपावलीवर टाकण्याचा आग्रह झाला म्हणून टाकते आहे. त्यामुळे लेखाचा संदर्भ हा साधारणपणे सप्टेंबर २००९ ह्या कालखंडातील आहे. हे कृपया लेख वाचताना ध्यानात घ्यावे. त्यावेळी एका महाशयांनी प्रतिक्रीया लिहीली होती की उगाच आमचा वेळ कशाला वाया घालवता? आम्हाला (अमेरीकेतील भारतीयांना) भाजपं मध्ये काय चालू आहे याच्याशी काहीही देणंघेणं नाही. कशाला असले फाल्तू लेख पैलतीर वर छापून आम्हाला पकवता इ. आशय. त्यांना मी दिलेलं उत्तर मात्रं इ-सकाळच्या अतिशय दक्ष प्रतिक्रीया संपादकांनी छापलीच नाही. कारण त्यात त्यांचं पितळ उघडं पडणार होतं. मी लिहीलं होतं की मी लेख सकाळ कडे दिला होता. तो छापायचा की नाही आणि कोणत्या सदरात छापायचा हे त्यांनी ठरवलं ...मी नव्हे. तेव्हा या प्रश्नाचे उत्तर तेच देवू शकतील. चुकून जर त्या महाशयांनी पुन्हा एकदा हा लेख वाचला (शक्यताच आहे) तर त्यांनी माझं त्यावेळीचं न-छापलेलं पण मी लिहीलेलं उत्तर वाचावं. म्हणजे त्यांच्या शंकेचं समाधान होईल. )



लोकसभेच्या निवडणुकी नंतर भाजपमध्ये जी दुफळी दिसली त्यामुळे आणि सध्याच्या घडामोडींमुळे हे सत्य बाहेर आले कि भाजपमध्ये बरेच अजीर्ण झाले आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून कि काय हळूहळू एकएक गोष्टी बाहेर पडत आहेत. मला असं वाटतं कि हे जे काय अजीर्ण बाहेर पडणे आहे ते एकदाचे होऊन जावूदेत म्हणजे मग सगळ्यांनाच बरे वाटेल. अनेकांची मधूनच उफाळून येणारी मळमळ थांबेल. आता वसुंधराराजे या (अहम्पित्तावर) आम्लापित्तावर पण काहीतरी उपाय करायला हवा. कारण राजस्थान भाजपला त्याचा चांगलाच प्रसाद मिळाला आहे.
मला आपले एकच वाटते कि मा. अडवाणीन सकट सगळ्यांनी पुन्हा एकदा तीस वर्षांपूर्वीच्या भाजपच्या स्थापनेच्या उद्दिष्टाकडे मागे वळून त्याचा आढावा घेण्याची गरज आहे. त्याच प्रमाणे सर्वच ज्येष्ठांनी नुसतेच राममंदिर बांधण्याच्या घोषणा न देता श्रीरामामधील खरे खुरे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे नाहीतर भाजपवरच "राम" म्हणायची वेळ यायची. आपले राजकीय उत्तराधिकारी वेळेत तयार करणे हे एक दूरदृष्टीचे आणि मोठ्या मनाचे निदर्शक आहे. काही वेळा मला आसे जाणवते कि सोनिया गांधीना रामाचे काही गुण समजले आहेत. म्हणजे त्यांचा उद्देश काही रामासारखा उदात्त वगैरे नाही आहे पण भरताला अयोध्येचे राज्य जसे रामाने चालवायला दिले म्हणजेच भरताने प्रभू रामचंद्रांच्या पादुका नेल्या त्यांच्या नावाने राज्य चालवायला त्याप्रमाणे सोनियांनी आपल्यापाशी चालत आलेली सत्ता मनमोहनरूपी भरतासाठी सोडली आणि कोणत्याही पादुका वगैरे न देता सगळी अप्रत्यक्षपणे सत्ता आपल्याच हातात ठेवली. त्या दृष्टीने बघता सोनियांना राम थोडा तरी कळला (या भारतभूमीच्या मातीचा गुणधर्म दुसरा काय) पण पूर्णपणे नाही, नाहीतर त्या इटली मधील वनवासात नसत्या का निघून गेल्या. खरंतर या त्यांच्या कृतीला सध्याच्या भाषेत खरे राजकारण म्हणतात. जे रामाने काधीच केले नाही.
ग दि मांच्या गीत रामायणामधील "पराधीन आहे जगती...." हे गीत जेंव्हा जेंव्हा मी ऐकते तेंव्हा तेंव्हा मला एकच प्रश्न पडतो कि आपल्या रामाने म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रांनी इतक्या उच्च कोटीचे वैश्विक (ग्लोबल) तत्वज्ञान सांगितले आहे कि ते अखंड विश्वात सगळ्या भूतमात्रांना उपयोगी पडेल (अगदी सध्याच्या मायकल जॅक्सनच्या भूताला सुद्धा) तरी सुद्धा आपल्याच देशातील कॉंग्रेस आणि समाजवादी, साम्यवादी लोकांना प्रभू रामचंद्रांचे वावडे का? जर चुकूनमाकून येशू ख्रिस्ताने आणि पैगंबराने संस्कृत भाषा शिकण्याचा शहाणपणा (इतर जर्मन विद्वानान सारखा) पूर्वी केला असताच तर त्यांना दोघानाही हे पटले असते आणि त्यांनी या तत्वज्ञानाचा प्रसार करण्यास सुरुवात केली असती. ते त्या ख्रिस्त धर्मप्रसारक लोकांना सोपे सुद्धा गेले असते भारत देशामध्ये त्यांचे हात पाय फारसे कष्ट न घेता पसरता आले असते. त्याचप्रमाणे मुहामद पैगंबराच्या चेल्यांनी जगभरात जी काही कत्तल केली ती पण झ्हाली नसती. त्या बाबराने सुद्धा प्रभू श्रीरामांचे जन्मस्थान वरील मंदिरही फोडले नसते आणि गेली दोन दशके जे राजकारण या मंदिर बांधण्यावरून चालू आहे ते पण घडले नसते. या जगात सगळीकडे रामराज्यच आले असते. त्याचप्रमाणे ब्रिटीशांनी भरतीय उपखंडावर राज्यं केलं नसते आणि फाळणी पण झाली नसती. जिनांचा प्रश्न आला नसता आणि भाजप मध्ये पण फाळणी झाली नसती. केवढी मोठी साखळी आहे नाही.
या गीताच्या सुरुवातीलाच प्रभू रामचंद्रांनी झालेल्या सगळ्या घटनां मध्ये (रामायणातील) दोष कुणाचा नसून या भूतलावर मानव हा पराधीन आहे आणि जे विधिलिखित आहे ते होतच असते. आपण फक्त निमित्त मात्र असतो. मग दोष कैकयीमातेचा पण नाही की वडिलांचाही नाही. सगळं जे आहे ते आपल्या पूर्व कर्मानुसारच होते आहे. काय लाख मोलाचा विचार मांडला आहे. भाजपमध्ये सध्या सगळ्यांनी जरा असा विचार करून आपल्याच पूर्व कर्मांचा आढावा घेतला तर फारच बरे होईल. त्याचप्रमाणे सध्या जे सत्तेत आहेत त्यांनी देखील आपल्या सध्याच्या कृती करताना हे विसरू नये आणि स्वहिताच्या गोष्टी सोडून लोकहिताच्या गोष्टीच कराव्यात. नाहीतर पुन्हा पुढच्या निवडणुकांच्या वेळी त्यानाही हाच अनुभव येईल. त्यांनी सुद्धा हा कर्म सिद्धांत विसरू नये.
तसेच दुसऱ्या कडव्या मध्ये जे सांगितले आहे ते तर बावनकशी सोनेच. "अंत उन्नतीचा पतनी होई या जगात, सर्व संग्रहाचा वत्सा नाश हाच अंत". अमेरिकन राज्यकर्त्यांनी (विशेषतः दोघे बुश आणि त्यांचे चेले) त्याच प्रमाणे जे जे जगावर राज्य करण्याची स्वप्ने पाहत आहेत (सगळे धर्मांध मुस्लीम अतिरेकी, चीन, उत्तर कोरिया इत्यादी) त्या सगळ्यांनीच लक्षात घ्यायला हवे कि जिथे कळस होतो तिथेच पायापण रचला जातो. हेच तत्वज्ञान महाभारतातहि सांगितले आहे. त्यामुळे या सगळ्यांनी या गोष्टीचे वेळीच भान ठेवणे जरुरीचे आहे. नाहीतर तालिबान आणि अल कायदा हे जसे अमेरिकेवरच उलटले तसेच यांनी सत्तेच्या हव्यासापोटी तयार केलेले भस्मासुर त्यांनाच राख करतील. आपल्या भारत देशाच्या प्राचीन संस्कृती मध्ये इतके उच्च कोटीचे आणि सत्य सांगितले आहे तरी सुद्धा आपल्याकडच्या अनेक विद्वानांना (??) भिकेचे डोहाळे लागलेले असतात (रोमिला थापर सारख्या) ज्यामुळे ते भारतीय प्राचीन संस्कृतीमधील जे काही आहे ते सगळंच वाईट आणि पाश्चात्य संस्कृतीत जे काही आहे तेच फक्त चांगलं असा समज करून घेतात आणि आयुष्यभर भारतीय संस्कृतीच्या मागे हातधुवून लागतात.
पुढच्या कडव्या मध्ये तर आगदी या जीवनाचे सारच सांगितलं आहे. " जीवा बरोबरच त्याचा मृत्यू सुद्धा जन्मतो, जे जे दिसते ते सगळेच विश्व नाशवंत आहे, वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयाचा". आता मला असा प्रश्न पडतो कि २६/११ च्या हल्ल्यानंतर भारत सरकारने काहीच कशी कारवाई केली नाही?? याचे मूळ या तत्वात आहे. भारतीयांनी हे तत्व चांगलंच आत्मसात करायला हवं कि जे जे जन्माला आले आहे त्याचा मृत्यू अटळ आहे. त्यामुळे फारसं दुःख आणि कारवाईची अपेक्षा न करता आपले आयुष्य नियमितपणाने चालू ठेवावे. यातच सगळ्यांचे भले आहे. त्याच बरोबर या राजकारणी लोकांनी सुद्धा हे तत्व कधीच विसरू नये. कोणीच अमरत्व घेऊन आलेले नाही. आता भारतीय जनता दुःखात आणि हालाखीच्या परिस्थितीमध्ये राहते, बऱ्याच ठिकाणी लोक अन्नाअभावी भुकेने तडफडून मरणाला सामोरे जात आहेत पण प्रभू श्रीरामांनीच सांगितलं आहे " जरा मरण यांतून सुटला कोण प्राणी जात? दुःख मुक्त जगला का रे कुणी जीवनात? " त्यामुळे जरी जनता अर्धपोटी राहिली तरी जनतेने प्रभू रामचंद्रांचे सांगणे प्रमाण मानावे अशी राजकारणी लोकांची कृती असते. प्रभू रामचंद्रांनी सांगितलेले तत्वज्ञान तर हे लोक अप्रत्यक्षपणे पाळतात पण मग त्यांच्या मंदिराला या राजकारण्यांचा विरोध का हेच समजत नाही?
अटलबिहारी वाजपेयींचे निवृत्त होणे हे कधीतरी होणारच होते. त्याच प्रमाणे बऱ्याच ज्येष्ठांना लवकरच निवृत्त व्हावे लागणार आहे. तेंव्हा राष्ट्रहित आणि पक्षहित लक्षात घेवून अनेकांनी इतर नवीन व्यक्तीं साठी वाट मोकळी करावी असेच सुचवावेसे वाटते. शेवटी आपण सगळे पराधीन असलो तरी सुद्धा कर्म सिद्धांतानुसार आपले कर्म हे महत्वाचे आहेच. आणि ते डोळसपणाने करावे हीच सदिच्छा.
भाजपशी विशेष जवळीक असल्याने तसेच राष्ट्रप्रेम हे प्रथामिकतेने महत्वाचे असल्याने हे प्रेमाने चुचकारणे आहे. म्हणजेच घरचा आहेर. त्यामुळे राग मानू नये.

4 comments:

  1. जसे हाडाचा मॅनेजर असावा लागतो तसेच राज्य करणे तितकेच उपजत असावे लागते. पण राज्य करण्याला राजकारण हा सोयीस्कर शब्द रुळवला गेला. मुत्सद्दी धुर्त चालबाजीला राजकारण म्हटले गेले व आजही म्हणतात.

    लोकशाही हा पुस्तकी घोळ आहे. प्रत्त्यक्षात त्यातून कधी चांगले घडण्याची अपेक्षा करणे चुकिचे आहे. शेवटी ह्या भेसळ समाजातूनच नेते जमेल त्या मार्गाने पुढारी होत आहेत. भाजपचे बरेच नेते सामान्य घरातून आलेले आहेत. त्यांना मणूसकी आहे पण राज्य करण्याची शिस्त आवगत नाही. राज्य करण्याची कला नसून फार नियोजीत कार्यक्रम आहे. प्रत्येक प्रसंग त्या कर्यक्रमाला तपासूनच बघावा लागतो. ती तपासण्याची मात्र कला आहे व तिथे पाहिजे हाडाचे कलाकार. ह्या भेसळ समाजातून निष्ठावान शिस्तबध्द नेते मंडळी मिळणे फार अवघड आहे. म्हणून हे सगळे घोळ बघे बनून बघत बसणे हेच ह्या देशाचे नशीब.

    अहो जिथे चार हातांनी एक कुटूंब उभे करणे ही संकल्पनाच नाहीशी झालेली आहे तिथे ह्या देशाकरता निष्ठावान शिस्तबध्द नेते जन्माला कसे येणार?

    ReplyDelete
  2. भाजपला मी फार पूर्वीपासून 'आपला' पक्ष मानतो...
    त्यांनीही फार घोळ घातले...बाहेरच्यांना आत घेतलं, आतल्यांना बाहेर काढलं..अगदी कॉन्ग्रेसलाही लाजवतील असले घोटाळे केले..
    पण त्यांचा आत्मा आजही निष्ठा हाच आहे...सच्ची निष्ठा,मग भले ती फार थोड्या लोकांची का असेना..म्हणूनच सगळा मिडीया विरुद्ध असतानाही हा पक्ष तग धरून आहे...
    बाकी..आपल्या घरात कोणी गुन्हेगार निपजला, म्हणून आपण घर सोडत नाही...तसंच मी भाजपची साथ कधी सोडेनसं वाटत नाही..अगदीच अघोरी काही घडत नाही तोवर..
    अजून तरी ती वेळ आली नाही...आणि कधी येऊही नये ही इच्छा!
    तू अगदी समर्पक लिहिलंयस ताई!

    ReplyDelete
  3. खरं आहे रानडे काका तुमचं. भाजपा मध्ये अजुनतरी राष्ट्रनिष्ठा आहे. इतरांकडे फक्त स्वनिष्ठा आणि घराणे निष्ठा आहे (ती सुध्दा स्वनिष्ठेला तारत असेल तरच). त्यामुळेच स्वत: सत्तेवर येण्यासाठी हे लोक अल्पसंख्य, मागास वर्गीय, राखीव जागा या कल्पनांचा आधार घेतात.
    चूक आपलीच आहे. आपल्याकडे एक म्हण आहे "यथा राजा तथा प्रजा" पण मी म्हणते की खरं तर उलटं आहे "प्रजेला साजेसे असे राज्यकर्ते मिळतात"......कारण आपणच मतदान न करून अयोग्य लोकांना निवडुन आणतो.

    काय योगायोग आहे की हा लेख मी जसवंतसिंहांना भाजपा ने पक्षातून काढून टाकल्यावर लिहीला होता. शतपावलीवर टाकला तेव्हाच जसवंतसिंह स्वगृही परतले. मला आनंद होत आहे. भाजपा पर्यंत कोणी माझा लेख पोहोचवला वाटतं!! :-):-)

    ReplyDelete
  4. विभि, अजुनतरी कोणी सूर्याजी पिसाळ (म्हणजे शत्रुराष्ट्रांशी फितुरी करणारा) भाजपात निघालेला नाही. खरंतर नरेंद्रभाई मोदींची क्षमता आहे पंतप्रधान होण्याची. मला नक्कीच खात्री आहे की ते पंतप्रधान झाले तर आपल्या देशातील जनता सुरक्षीत राहील.....अगदी मुस्लीम आणि इतर अल्पसंख्य सुध्दा आनंदाने राहू शकतील. देश नक्कीच प्रगती पथावर जाईल.

    ReplyDelete