Thursday 1 September 2011

गौरी-गणपती!!

महाजालावरून साभार
घरी पूर्वी पाच-सात दिवसांचे गौरी-गणपती असायचे. काय मजा आणि आनंदसोहळा असायचा तेव्हा!! गणपतींची सकाळ-संध्याकाळ आरती होत असे. मन आणि घर दोन्हीही प्रसन्नतेने भरून जायचं. घरी आठ-दहा दिवस आधीपासूनच गौरी-गणपतींची चाहूल लागायची. मग आजी-आजोबा रहायला येत असत. गौरी बसवण्यासाठी धान्याचे गोल डबे रंगवले जायचे. गौरींचे पितळी मुखवटे चिंच आणि रांगोळीने घासून चकचकीत केल्यावर त्यांचे नाक, डोळे, भुवया, ओठ सगळं रंगवताना खूप छान वाटायचं. मग गौरींसाठी नवीन साड्या-दागिने यांची खरेदी व्हायची. गौरी-गणपतींची आरास तयार व्हायची.  

गणपती बसल्यावर दोनच दिवसांनी रात्री उशीरा पर्यंत जागून गौरींच्या डब्यांत धान्य भरून, डब्यांना गौरींची धडं लावून त्यांना साड्या नेसवायच्या. गौरींच्या आरासीसाठी  घरातली एक खास जागा (शक्यतो बैठकीच्या खोलीतील) रिकामी केली जायची, सगळं घर चमचमत्या झिरमिळ्या आणि विविध रंगांच्या विजेच्या छोट्या दिव्यांच्या माळांनी प्रकाशमान होउन जायचं. पाच-सात दिवस गौरी-गणपती असेपर्यंत घरात आवडते पाहुणेच आल्याची भावना असायची.  दिवस-रात्र घर जागं असायचं. संपूर्ण घर अत्तर-उदबत्त्या यांच्या सुगंधाने भरून आणि भारून जायचं. 

आमची आई इतर वेळची (श्रावणी शुक्रवार, चैत्रगौर इ.) हळदी-कुंकू करायची नाही पण महालक्षमीचं हळदी-कुंकू न चुकता करत असे. गौरींच्या हळदी-कुंकवाला अगदी समोरच रहाणार्‍या ख्रिश्चन आणि मुस्लीम घरातील बायकांना सुद्धा बोलावलं जायचं. तेव्हा शेजारी टॉमी नावाचा कुत्रा असायचा की जो आमच्याकडेच जास्त असायचा. मग लाडू-करंज्या यांसारख्या फराळाच्या पदार्थांच्या वासाने तो सुद्धा गौरींचे दर्शन आत येऊन किमान एकवेळा तरी घेउन जायचा. 

तिसर्‍या दिवशी गौरी-गणपतींच्या जाण्याचे वेध लागायचे. मग सकाळीच आई हरभर्‍याची डाळ भिजत ठेवायची. संध्याकाळी विसर्जनाच्या प्रसादाला लिंबाची वाटलेली डाळ आणि पंचखाद्याची खिरापत असा बेत असायचा. गौरी-गणपतींच्या बरोबर शिदोरी म्हणून दही-पोहे आणि पंचाखाद्याचे कानवले दिले जायचे.  गणपती विसर्जन तर तळ्यावर होत असे पण गौरी विसर्जन म्हणजे फक्त मुखवटे हलवले जात. गौरींना आवाहन करून गौरी स्थानापन्न झाल्यावर जे तेज आणि जो जिवंतपणा त्या पितळी मुखवट्यात असायचा, तेच तेज मुखवटे हलवल्यावर गायब व्हायचं आणि गौरी विसर्जन झाल्याचे संकेत मिळायचे. अशावेळी डोळे भरून येत असत.
गौरी असतांना सगळं वातावरणच भारलेलं असे. ते पाच-सात दिवस घरातच मंदिर तयार होत असे. आता आई गेल्यापासून गौरी आणणं बंद केलंय आणि गणपतीही फक्त दीड दिवसासाठी आणतो. गणपती असेपर्यंत सकाळ-संध्याकाळ आरती प्रसाद असतो, विसर्जनाच्या दिवशी लिंबाची डाळही असते.....दही-पोहे आणि कानवले यांची शिदोरीही असते पण घराचं मंदिर होणं थांबलंय. त्या मंदिराच्या आता फक्त आठवणी आहेत.

1 comment:

  1. काही गोष्टी काळाच्या ओघात आपल्यासाठी अशा नामशेष होऊन जातात!

    ReplyDelete