Thursday 30 June 2011

अजुन उजाडत नाही हो!!

महाजालावरून साभार
पर्वाच वर्तमानपत्रात दहावीचा निकाल लागण्या पाठोपाठ गणित अतिसामान्य केले ही बातमी वाचनात आली. आधीच गणितात कमी गुण मिळत असल्याने सामान्य आणि अवघड गणित असे दोन भाग केलेत म्हणे. त्या अवघड गणित हा विषय फक्त ३% विद्यार्थ्यांनीच घेतला. त्यांचा गणिताचा निकाल चांगला आहे. जे गणितात नापास झालेत किंवा ज्यांना कमी गुण मिळाले आहेत ते सगळे सामान्य गणित वाले आहेत. त्यामुळेच आता हे सामान्य गणित सुद्धा झेपत नाही म्हणून ते अतिसामान्य करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
सहा विषयातील बेस्ट फाईव्ह प्रकारामुळे सहाजिकच जो विषय अवघड वाटतो तसेच आवडत नाही तो विषय ऑप्शनला टाकणे हा प्रकार आहेच. त्यातून दहावीच्या परीक्षेला एटी केटी चालू केली आहे. म्हणजेच एखाद्या विषयात नापास आणि बाकी सगळ्या विषयात पास असतील तर त्यांना अकरावीला प्रवेश मिळेल आणि राहीलेला विषय त्यांनी पुढच्या वर्षभरात सोडवून घ्यायचा. अशी तयारीच असेल तर अतिसामान्य गणित सुद्धा कुणाला झेपेल असे वाटत नाही.
==================================
बी एड कॉलेजेस मध्ये गणित हा विषय पदवी पर्यंत किंवा पदव्युत्तर स्तरा पर्यंत शिकलेले विद्यार्थी जवळ जवळ नसतातच. त्यामुळे जे विद्यार्थी गणित अध्यापन पद्धती घेतात (म्हणजे गणित कसं शिकवायचं हा विषय) ते सगळे एकतर जीवशास्त्र किंवा रसायनशास्त्रवाले असतात. विज्ञान अध्यापन पद्धतीच्या जोडीला गणित घ्यावच लागतं म्हणून गणित घेणारे. स्वत:च्या विद्यार्थी जीवनात गणिताला घाबरणारे, गणिताच्या संकल्पना स्पष्ट नसणारे तसेच गणिताविषयी प्रेम, आस्था नसणारे असेच असतात. या बी एड कॉलेजेस मध्ये ज्यांनी आयुष्यात कधीही गणित शिकवलेलं नाही आणि ज्यांचा गणित विषय सुद्धा नव्हता असे अध्यापक गणित अध्यापन पद्धती शिकवतात. प्रश्न-विचारणे हा गणिताचा आत्मा आहे. प्रश्न पडल्या शिवाय आणि विचारल्या शिवाय गणित समजत नाही आणि समजावून देताही येत नाही. अचूक आणि योग्य प्रश्न विचारून एखादं उदाहरण कसं सोडवायचं ही अतिशय उपयुक्त आणि जुनी अध्यापन पद्धती आहे. पण सध्याच्या गणित अध्यापन पद्धती शिकवणार्‍या अध्यापकांना गणित शिकवताना काय प्रश्न विचारणार असाच प्रश्न पडलेला असतो आणि आपला हाच समज ते गणिताच्या भावी शिक्षकांपर्यंत पोहोचवतात. गणित आणि भौतिकशास्त्र पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमात घेणारे विद्यार्थी बी एड ला कधीच येत नाहीत कारण बी एड्च्या अभ्यासक्रमात डोकं बाजूला ठेवून सगळ्या गोष्टी करायच्या असतात. त्यामुळे गणित आणि भौतिकशास्त्र शिकलेले विद्यार्थी या ठीकाणी अत्यंत बोअर होतात (जर त्यांना स्वत:चं डोकं वापरायची सवय असेल तर). मग अशावेळी विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर तसेच ज्यु. कॉलेज स्तरावर गणित बर्‍यापैकी शिकवणारे शिक्षक कसे मिळणार? खरं तर विज्ञान शिकवण्याच्या बाबतीतही तीच गत आहे फक्त तिथे वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्याचाच बोर्‍या वाजलेला आहे पण घोकंपट्टीमुळे विद्यार्थी त्यात पास होतात. मूलभूत संकल्पना आणि वैज्ञानिक दृष्टिकोन कशाशी खातात हे माहीती नसतं.
====================
गेले महिनाभर जसा वेळ मिळेल तसं अच्युत गोडबोले यांनी लिहीलेलं किमयागार वाचत होते. पुन्हा एकदा विज्ञानाच्या प्रेमात पडले. गंमत म्हणजे या सगळ्या विज्ञान शाखांमध्ये गणितच वापरलेलं आहे. उगाच नाही गणिताला "सर्व विज्ञान विषयांची राणी" असं म्हणतात. सध्या बरर्टड रसेल यांच्या विषयी वाचते आहे. गणित शिकण्यात काय मजा आणि सुख आहे हे शब्दांत सांगता येणार नाही. गणितातील मूलभूत संकल्पना स्पष्ट केल्या, जर जिज्ञासू वृत्ती, समजलं नाही तर प्रश्न विचारून ते समजून घेण्याची प्रवृत्ती, जोपर्यंत ते समजत नाही तोपर्यंत त्याचा पिछा न सोडण्याची वृत्ती निर्माण केली तर गणिताची भिती वाटण्याचं कारणच नाही. त्याचप्रमाणे वर उल्लेखलेल्या गुणधर्मांपैकी सर्वच्या सर्व इतर विषयांच्या अभ्यासात तसेच पुढच्या आयुष्याच्या दृष्टिने आवश्यक असेच आहेत. हे न होता, जर घोकंपट्टी आणि झापडबंद पद्धतीने शिकवलं तर या राणीच्या प्रेमात पडण्या ऐवजी त्या राणीचा धसका घेऊन विद्दार्थी तिच्यापासून दूर जातील. त्यामुळे आपण गणित हा विषय सामान्य आणि मग अतिसामान्य करू. पण मूळ समस्या कधीच सूटणार नाही. कारण गणित विषय योग्य व्यक्तींनी शिकवण्या ऐवजी अयोग्य अशी पाऊलं समस्या निवारणासाठी उचलली जात आहेत.
==========================
एक प्रसिद्ध वक्ते आम्हाला शिकवायला होते. त्यांचा विषय इतिहास, तत्त्वज्ञान, इंग्रजी. एकदा वर्गात व्याख्यान देताना ते इतके सुसाट सुटले की खुद्द स्वामी विवेकानंदांच्या तोंडी (त्यांचा तो अभ्यासाचा विषय आणि ते त्यावर भरपूर व्याख्याने द्यायचे) स्वामींनी कधीच न उच्चारलेले वाक्य घातले. ते म्हणाले, "गणिताचा दैनंदिन आयुष्यात काहीच उपयोग नाही. एम एस्सी गणित झालेल्यांपेक्षा  भाजीवाली शाळेत सुद्धा न जाता भाजीवालीला गणित अधिक चांगलं येत असतं. भारतातील कोणत्याच महापुरूषांनी गणित शिका असं म्हंटलं नाही. कोणत्याही महापुरूषाला गणित आवडत नव्हतं. अगदी स्वामी विवेकानंद म्हणायचे ""घणित शिकून काहीच उपयोग नाही. म्हणून मला गणित आवडत नाही."" " आता याच महाशयांचं एक व्याख्यान ऐकताना त्यांनीच दिलेलं उदाहरण मी ऐकलं होतं. "साधारण १९१६ सालची घटना आहे. लोकमान्य टिळक सर्व भारतभर लोकप्रिय होते. त्यांच्या एकूणच चळवळीमुळे इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. इंग्रजही अगदी मेटाकुटीला आले होते. एकदा सहज एका इंग्रज अधिकार्‍याने टिळकांना विचारलं की आम्ही तुम्हाला आत्ता स्वातंत्र्य दिलंत तर तुम्ही स्वतंत्र भारताचे पंतप्रधान व्हाल ना? तर लो टिळकांनी उत्तर दिलं: मी राजकारणात शिरलो ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी. जळजळीत अग्रलेख लिहायला हाती घेतलेली लेखणी खाली ठेवून मी खडू हातात घेईन आणि गणिताचा शिक्षक होईन." लो. टिळकांचं गणितप्रेम जगजाहिर आहे. त्यांनी गणितावर एक-दोन ग्रंथही लिहीलेले आहेत.
=======================
रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण गणिताचाच वापर करत असतो. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगती गणिता शिवाय अशक्यच. गणिताशिवाय संगणक युग अस्तित्त्वात येणंच शक्य नव्हतं. इतिहासातील सनावळ्या, दैनंदिन जीवनातील आर्थिक व्यवहार, टिव्ही, संगणक, टेलीफोन, अत्याधुनिक उपकरणं, अगदी रोग्याला देण्यात येणारं औषध, मानवी अस्तित्त्वाचं रहस्य उलगडुन दाखवणारी डी एन ए रेणूची रचना आणि त्यातील गणितीय सूत्र त्यानुसार ठरणारे माणसाचे गुणधर्म, निसर्गातील विविध रचना यासारख्या अनेक गोष्टींत गणितच आहे. आपण जर विचार केला तर गणिता शिवाय आपण जगुच शकणार नाही अशी परिस्थीती आहे. इतकं महत्त्वाचं स्थान असलेला विषय केवळ आपल्याला आवडत नाही, आपल्याला शिकवता येत नाही म्हणून अतिसामान्य करायचा? रोगाच्या मूळापर्यंत शिरून तिथे उपचार करण्या ऐवजी वरवरची मलमपट्टी केली जाते. त्यामुळेच अजुनही गणिताचा प्रश्न सुटत नाही. कधी उजाडणार आहे समजत नाही!

महाजालावरून साभार

Friday 17 June 2011

स्टॅनली का डिब्बा!!


एक शाळकरी मुलगा एका कॉन्व्हेंट शाळेत प्रवेश करतो, मदर मेरी आणि जिझस यांच्या पुतळ्यापुढे हात जोडून वर्गात जातो याने चित्रपटाची सुरूवात होते. त्या मुलाचं नाव असतं स्टॅनली. शाळा सुरू व्हायला बराच अवकाश असल्याने वर्गात कोणीच नसतं. मग स्टॅनली थोडा राहिलेला होमवर्क करतो आणि मग बाकावरच ताणून देतो. हळूहळू शाळेत मुलं यायला सुरूवात होते. स्टॅनली संपूर्ण वर्गात सगळ्यांचा आवडता असतो तो त्याच्या मधील गुणांमुळे. शाळेच्या मधल्या सुट्टीत स्टॅनली सोडून सगळी मुलं डबा आणत. स्टॅनली मात्र वडा-पाव खाऊन येतो असं सांगून भरपूर पाणी पिऊन यायचा. इंग्लीशची शिक्षीका रोझी टीचर मुलांवर प्रेमाने बोलून त्यांच्या प्रत्येक सर्जनशीलतेला दाद देऊन मुलांना प्रोत्साहन द्यायची. याउलट विज्ञान शिक्षिका मिसेस अय्यर मुलांच्या प्रत्येक कृतीवर डोळे वटारायची. हिंदी शिकवणारे आणि संधी मिळेल तेव्हा मुलांच्या तसेच सहकारी शिक्षकांच्या डब्यात हात घालणारे खादाड वर्मा सर, स्टॅनलीला डबा न आणण्यावरून आणि मित्रांचा डबा खाण्यावरून खूप बोलायचे. स्टॅनलीच्या वर्गातील मित्र वर्मासरांना चुकवुन डबे खायचं ठरवतात आणि हेच स्टॅनलीच्या मित्रांबरोबर डबा खाण्याच्या आनंदाच्या मुळावर येतं. एक दिवस वर्मासर स्टॅनली ला सांगतात डबा नसेल तर शाळेतही यायचं नाही. स्टॅनली मग शाळेत यायचं थांबवतो की डबा आणतो? चित्रपटाच्या सुरूवातीपासूनच स्टॅनलीच्या वैयक्तीक आयुष्याबद्धल एक गूढता निर्माण झालेली असते. त्याचं रहस्य उलगडतं का? हे समजण्यासाठी स्टॅनली का डिब्बा हा चित्रपट जरूर बघावा.

लहान मुलांची बाल सुलभ मैत्री आणि आपण लहानपणापासून पहात आलेल्या विविध व्यक्तीमत्त्व असलेले शिक्षक यांचं प्रभावी चित्रण यात आहे. त्याचप्रमाणे अत्यंत नैसर्गिकरित्या सर्व चित्रिकरण केलेलं आहे. तारे जमीन पर या चित्रपटाचे लेखक अमोल गुप्ते यांनीच लिहीलेला आणि दिग्दर्शित केलेला स्टॅनली का डिब्बा समाजातील एका महत्त्वाच्या विषयावर भाष्य करून जातो. कोणत्याही संवेदनशील मनाच्या डोळ्यात हा चित्रपट पाणी उभं करतो. मागे एकदा खुपते तिथे गुप्तेमधे अमोल गुप्तेंच्या मुलाखतीत त्यांनी स्टॅनली का डिब्बा विषयी सांगीतलं होतं. एक महत्त्वाचा विषय हाताळतानाच त्यांनी एन्टरटेनमेंट इंडस्ट्रीला एक महत्त्वाचा संदेशही दिला आहे. सध्या जिथे जिथे लहान मुलं एन्टरटेनमेंट इंडस्ट्री मध्ये काहीना काही कारणाने (म्हणजे विविध स्पर्धा, रिअ‍ॅलीटी शोज, दैनंदिन मालिका, विविध जाहिराती) काम करत असतात त्यांच्या शाळा प्रचंड बुडतात. एका एका एपिसोडचं काम ७-८ तास चाललं तर बाल कलाकारांना अक्षरश: ताटकळत बसावं लागतं. मग सेट हेच त्यांचं घर आणि खेळण्याचं ठीकाण होतं. हे सुद्धा एक प्रकारचे "बाल कामगार" च आहेत. स्टॅनली का डिब्बा मध्ये अमोल गुप्ते यांनी बाल कामगारांची समस्या अतिशय तरल आणि प्रभावीपणे मांडण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. पण हे करताना चित्रपटात काम करणार्‍या बाल कलाकारांना त्यांची शाळा, अभ्यास आणि इतर उपक्रम बुडवायला नाही लागले. या बाल कलाकारांच्या नेहमीच्या आयुष्याला जराही धक्का न पोहोचवता अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात, त्या मुलांना कळु न देता अमोल गुप्ते यांनी या चित्रपटाचं शुटींग प्रत्येक आठवड्याचे फक्त शनि-रवि असे दोन दिवस कार्यशाळेला बोलावून १२-१३ आठवड्यात चित्रिकरण पूर्ण केलं. कोणत्याही प्रकारचा भव्य दिव्य सेट यात वापरलेला नाही. तरीही चित्रपटाच्या काही तांत्रिक बाबतीत प्रश्न पडतात. एक शिक्षक जर मधल्या सुट्टीत मुलांचे तसेच सहकारी शिक्षकांचे डबे विचारून किंवा चोरून खात असेल तर त्याविषयी प्रिंसीपलना काहीच कल्पना नसणे आणि शाळेमार्फत त्यावर काहीच कारवाई न होणे हे अतिशय कृत्रिम वाटते. एक शिक्षक शाळेतल्या मुलाला डबा आणला नाहीस तर शाळेत येऊ नकोस असं सांगू शकतो का? आणि जर एखाद्याने सांगीतलंच तर याचा पत्ता शाळेच्या मुख्याध्यापकांना नसावा (इतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांना माहिती असूनही) हे जरा अतिरंजीत वाटतं. शाळेत येणार्‍या प्रत्येक मुलाच्या घरची पार्श्वभूमी ही वर्ग शिक्षक तसेच मुख्याध्यापक यांना माहिती असतेच. ह्या चित्रपटात ते जाणून घेण्याची कोणी तसदी सुद्धा घेत नाही अगदी शेवटपर्यंत हे खटकतं.
बाल कामगारांचा प्रश्न जरी प्रभावीपणे पोहोचवण्याचा एक चांगला प्रयत्न असला तरी शेवट कुठेतरी अर्धवट वाटतो. अमोल गुप्ते हे एक चांगले लेखक तर आहेतच पण त्याहूनही अधिक एक मानसशास्त्रज्ञ वाटतात. मुलांचं मानसशास्त्र त्यांना अगदी चांगलं उमगलेलं आहे हे चित्रपटात दिसून येतं. त्यांच्याकडून यापेक्षाही अधिक उत्तम आणि दर्जेदार चित्रपटांची अपेक्षा आहे की जे लहान मुलांचे विविध प्रश्न प्रभावीपणे मांडू शकतील. त्यांना त्यासाठी शुभेच्छा!!