Friday 30 April 2010

गणितीय विचार पध्दती!

 वेगवेगळ्या जालनिश्या चाळतांना मला खालील गणितीय सूत्र एका जालनिशीत दिलेले आढळले.
जालनीशी नाव: माझ्या मना!
तिथेच उत्तर लिहायचे म्हणून चालू केले पण लक्षात आले की उत्तराचा आणि त्याअनुषंगाने काही गोष्टींचा उहापोह याचं एक पोस्ट होवु शकतं. म्हणून ते पोस्ट कॉपी करून त्याचा संदर्भ दिला आहे.




९ ने तयार होणाऱ्या संख्येला इतर संख्येने गुणने
बाल मित्रांनो ९ या अंकाने तयार होणाऱ्या कोणत्याही संख्येला इतर एक किंवा दोन अंकी संख्येने सोप्या पद्धतीने गुणाकार कसा करता येईल ते मी येथे दाखविणार आहे.
समजा ९९ ही संख्या आपण घेतली व तिला ८ ने गुणाकार करायचा आहे. तर काय करावे लागेल. सोपे आहे. तुम्ही फक्त एकच करायचे.  ९ x८ = ७२ होतात. य उत्तरातील ७ व २ हे अंक थोड्या अंतराने लिहायचे. म्हणजे ७     २ असे.
आता या  ७ आणि २ ची बेरीज करायची. ती येईल ९.  आता दिलेल्या संख्येत ९ किती वेळा आला आहे ते बघायचे. त्या संख्येत ९ हा फक्त २ वेळा आला आहे. म्हणून हा ९ अंक ७ व २ यांच्या मध्ये २ पेक्ष १ कमी म्हणजे १ वेळा लिहायचा. उत्तर येईल ७९२. हा आहे ९९ आणि ८ चा गुणाकार.
आता आपण दुसरे एक उदाहरण घेऊ. ९९९९९ ह्या संख्येला  ७ ने गुणाकार करणे.
येथे ९ x७ केले तर मिळतात ६३. हे ६ व ३ थोडे अंतर ठेऊन लिहायचे. ६      ३. असे.
आता ६ व ३ ची बेरीज करायची. ती येईल ९. आता दिलेल्या संख्येत ९ अंक किती वेळा आला आहे ते मोजायचे. तो ५ वेळा आला आहे. म्हणून ५ पेक्षा १ कमी म्हणजे ४ वेळा हा ९ अंक ६ व ३ च्या मधे लिहायचा. आता चित्र असे दिसेल. ६९९९९३. तपासून पहा हेच दिलेल्या प्रश्नाचे  उत्तर आहे.

Tuesday 27 April 2010

स्वयंपाकघरातील विज्ञान!!



स्वयंपाकघर ही एक मोठी प्रयोगशाळाच आहे असं मो. क. गांधींनी म्हंटल्याचं कुठेतरी वाचलेलं आठवतंय. ज्यांना स्वयंपाक घरात वैज्ञानिक नियम कसे वापरतात हे समजले म्हणजे दैनंदिन जीवनात विज्ञान समजल्या सारखे आहे. अगदी भात शिजविण्यासाठी तांदूळात किती पाणी घालायचं इथपासून ते साध्या फोडणी करताना तेलात हळद का टाकायची इथपर्यंत सगळीकडे वैज्ञानिक नियम दिसतात (पाहिले तर). स्वयंपाक करतानाचा वेळ हा माझा खास चिंतनाचा वेळ असतो. बर्‍याच विषयांवरचे चिंतन मी स्वयंपाक करताना आणि गाडी चालवताना करते. (म्हणजे खाणेबल असे जेवण मी बनवते आणि कोणताही अ‍ॅक्सीडेंट न करता गाडी चालवते........... नाहीतर लोक माझ्या हातचं खाण्याची आणि माझ्या मागे गाडीवर बसण्याची हिंमत करणार नाहीत. तशी हिंमत एका माणसाने केली आहे .........ऑफ कोर्स माझा नवरा! तसा त्याला पर्याय पण नाहीये : D) असो. तर ही माझी पहिल्यापासूनची सवय त्यामुळे शाळेत विज्ञानाचा तास झाला की घरी स्वयंपाक घरात प्रात्यक्षिकाचा दुसरा तास असे. मग त्यासाठी साखर २-४ वेळा लोखंडाच्या पळीत घालून जाळण्यापासून सगळे प्रकार (आईच्या नकळत) केले होते. पण स्वयंपाक घरातील खरं भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र मला मी स्वत: स्वयंपाक करायला सुरूवात केल्यावर कळायला लागले. अगदी कणिक भिजवताना जरा जास्त पाणी झालं तर पोळ्या कश्या चिवट होतात, तसेच जर पोळी लाटताना सगळी कडून सारखा दाब पडला नाही (म्हणजे थोडक्यात मध्ये पातळ आणि कडा जाड किंवा विविध नकाशे) तर पोळीचा पापड व्हायला वेळ लागत नाही. खाकर्‍यासाठी वेगळ्या पध्दतीने कणिक भिजवायला लागते, गुळाच्या पोळीसाठी खूप घट्ट कणिक तर पुरणाच्या पोळीला अतीशय सैल भिजवायला लागते. हे रसायनशास्त्रंच नाही का? भाकरी करताना सुध्द्दा हेच तत्व. भाकरी जर सगळीकडून व्यवस्थित प्रेशरने थापली गेली तरच ती मस्त टमटमीत फुगते नाहीतर अगदीच कडक, चिवट किंवा गिचका खायला लागतो. पोळी किंवा भाकरी करताना योग्य तो दाब देण्याचे समजणे म्हणजे ते पदार्थ चांगले जमणे. हेच त्यातले भौतिक शास्त्र नाही काय? पुरी करताना सुध्दा तेच तत्व. 

पुरणाच्या पोळीसाठी पुरण करताना जर ते व्यवस्थीत झाले नाही म्हणजे गूळ आणि चणाडाळ व्यवस्थीत पणे एक्जीव झाले नाहीत, गूळ जास्त झाला आणि तो जर जास्तच पातळ झाला तर पुरणाची पोळी लाटणं अशक्यच. म्हणजे एका विशीष्ट तापमाना पर्यंत ते वाफवायचं. आता ज्या सुगरणी असतात त्यांना हे अनुभवातून आणि कृतीतून समजतच.....जसं आपल्या शास्त्रज्ञांना अनुभवांतून आणि प्रयोगांतून विज्ञानाचे नियम कळतात. 

आता वेगवेगळ्या पदार्थांसाठी लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे पाक...(साखरेचे, गुळाचे). रवा, बेसन यांसारख्या लाडूंसाठी एकतारी पाक योग्य असतो. पाक बिघडला की लाडू बिघडले. हेच तिळगुळाच्या (चिक्कीच्या गुळाच्या) लाडूंसाठी गोळीबंद पाक लागतो. तिथे तो गोळीबंद नसेल तर लाडू बिघडतात. आता हा पाक बनवणे म्हणजे विशिष्ट मर्यादे पर्यंत साखर किंवा गुळाला तापवून, पातळ करून त्याचा वापर करणे. ह्यात रसायन शास्त्राचे नियम नाहीत? एखादा पदार्थ ठराविक तापमानापर्यंत तापवला तर त्याचे गुणधर्म वेगळे असतात. तोच पदार्थ जर अजुनच तापवला तर त्याचे गुणधर्म पुढे बदलतात. वेग वेगळे पाक प्रकरण (पाकीस्तान नाही) म्हणजे रसायन्शास्त्रचाच वापर आहे. 
तेलाच्या व्हीस्कॉसीटी (मला मराठी शब्द आठवत नाहीये) या गुणधर्माचा वापर हळद तेलात टाकून करून घेतात. म्हणजे ती सगळीकडे सारखी पसरते. बंगाली लोकांकडे हळद तेलात न टाकता वरून टाकण्याची प्रथा आहे. पण त्यामुळे ती सगळीकडे सारखी पसरत नाही. पण त्यांना बहुधा तसंच आवडतं असं माझं निरीक्षण आहे. फोडणी मध्ये मिरच्यांवर हळद टाकली तर हळदी मुळे मिरच्यांचा तिखट्पणा कमी होतो. आता मेथीची भाजी ही खूप पित्तकारक असते म्हणून त्यात लसूण घातला की ते एक्मेकांना पूरक असतं. बटाट्याच्या सालींमध्ये स्टार्च असतो तसेच तो साबुदाण्या मध्ये सुध्दा असतो. भात शिजवताना साली सकट बटाटा त्यात शिजवला (भाताबरोबर) तर ते खूपच पौष्टीक असते. विशेषत: जी लहान मुले भाज्या खात नाहीत त्यांना साजूक तुपाबरोबर असा साली सकट शिजवलेला बटाटा-भात खायला घातला तर त्यांचे पोषण होऊन वजन वाढते. बटाट्यातील स्टार्च शरीराला जास्त उपकारक असतो. पण साबुदाण्यातील स्टार्चचा त्रास होऊ शकतो. पण हाच साबुदाणा कॉटन साडीला स्टार्च करण्यासाठी पूर्वी (म्हणजे जेव्हा ते रिव्हाईव्ह वगैरे बाजारत नव्हतं तेव्हा) वापरत असत. आता सुध्द्दा काही लोक त्याचा वापर करत असतीलच. चिंच आणि आमसूल हे दोन्ही आम्लकारी गुणधर्माचे पण आपल्याला अ‍ॅसीडीटी झाली की आपण चिंचेचा कोळ न पिता अमसुलाचे सार पितो.

 प्रेशर कुकरचं तत्वच मुळात भौतिक शास्त्रावर आधारित आहे. जेम्स वॅट ची वाफेची शक्ती हा धडा आम्हाला शाळेत असताना कधीतरी होता. असं म्हणतात बरं का की....जर  एखाद्या व्यक्तीला प्रेशर कुकर शिवाय बुडी लागू न देता साध्या पातेल्यात भात करता येत असेल तर त्या व्यक्तीला स्वयंपाक येतो. :-) 
आता सगळ्याच स्वयंपक करणार्‍या व्यक्तींना एका पदार्थातून दुसरा पदार्थ शोधून काढायची हौस असतेच की म्हणजे ती त्यांची प्रयोगशील वृत्ती झाली की नाही. पुन्हा ज्या गृहीणींना कमी वेळ असतो स्वयंपाक करायला त्यातर काहीतरी शॉर्ट्कट शोधून काढतातच. उदा. पालक किंवा मेथीची भाजी आणि पोळ्या स्वतंत्रपणे करण्या पेक्षा मी ते एकत्र करून मेथीचे किंवा पालकाचे पराठे बनवते. पटापट पोळ्या लटायच्या असल्या की कणकेचे उंडे आधीच करून ठेवायचे म्हणजे लाटणे आणि भाजणे यांचं टायमिंग जमून मिनीटाला एक पोळी अश्या वेगाने पोळ्या होवु शकतात. असले फंडे यांचा शोध स्वयंपाक घरातच लागतो. फोडणीच्या पोळ्यांचे प्रकार (पोळ्या उरल्या असतील तर), इडल्या उरल्या असतील तर फ्राईड इडली इ. नवनविन पदार्थांचा शोध हा स्वयंपाक घरातच लागतो.  
खरंतर शास्त्रज्ञ होण्यासाठी आवश्यक सगळे गुण हे स्वयंपाक घरात आवश्यक आहेत. नव्हे ते स्वयंपाक करणार्‍या प्रत्येक गृहीणी कडे असतातच. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात पौष्टीक आणि चविने खाणे याला तर महत्व आहेच. किंबहुना लोकांच्या र्‍हदयात शिरायचा मार्ग हा पोटातूनच जातो. त्यामुळे या प्रयोगशाळेकडे दुर्लक्ष करणे म्हणजे केव्हढी मोठी किंमत मोजणं आहे. ज्याला स्वयंपाक घरातील विज्ञान कळले त्याला खरंच दैनंदिन जीवनातील विज्ञान समजले असे म्हणायला काहीच हरकत नाही..........नाही का?

Monday 19 April 2010

गणित आणि निसर्ग यांचं नातं (फिबोनासी नंबर्स च्या माध्यमातून)

http://vimeo.com/9953368

वर दिलेल्या दुव्यामधील व्हिडीओ मध्ये निसर्गाच्या मूलभूत रचनेत गणितीय नियम कसे दिसून येतात.......किंवा त्यापेक्षा आपण असे म्हणू की निसर्गामधूनच आपण गणिताचे नियम शोधून काढले आहेत हे दाखवले आहे. मला आत्ता आठावत नाही पण आपल्या कडच्या वैदिक कालातील एका मुनींनी निसर्गातील हेच निरीक्षण श्लोकबध्द केलेले आहे. कोणाला माहीती असेल तर त्यांनी संदर्भ टाकायला हरकत नाही. पण ज्यांना व्हिडीओ पाहून त्यातील गणित समजणार नाही त्यांच्या साठी खालील माहीती देत आहे. व्हिडीओ पाहताना या माहीतीचा उपयोग केल्यास आपल्याला निसर्ग रचना आणि गणित यांचा संबंध दिसून येइल.

०+१ =१ , १+१=२, १+२=३, २+३=५. ....इ.
०,१,१,२,३,५.८,१३,....... या नंबर्स ना फिबोनासी नंबर सिक्वेन्स असे म्हणतात. निसर्गातील अनेक कलाकृती या नियमानुसार तयार झाल्या आहेत. त्या व्हिडीओ मध्ये सुरूवातीला त्यांनी शिंपल्याचे कवच त्याने कसे तयार होते ते दाखवले आहे. त्याच शिंपल्याच्या कवचाला आयताकृती मध्ये घातले आणि तशीच (व्हिडीओ मध्ये दाखवली त्या पध्दतीने) दुसरी मोठी आयताकृती तयार केली तर ते सिमीलर म्हणजेच समान असतात. दोन आकृत्या समान आहेत हे ओळखण्याचं एक साधन म्हणजे त्यांच्या बाजूंचे गुणोत्तर समान असते. की जे त्या व्हिडीओ मध्ये दाखवले आहे. अ/ब = (अ+ब)/अ = १.६१८०३. ह्या गुणोत्तराचे कोनाच्या अंश या एककात रूपांतर म्हणजेच १३७.५ अंश. त्याच कोनात फिरून तयार झालेल्या बिंदूंपासून (तोच फिबोनासी नियम वापरून) सूर्यफुलाच्या पाकळ्यांच्या मधला भाग तयार होतो हे दाखवलं आहे. म्हणजेच सूर्यफूलाच्य मधल्या भागातील बिंदू हे सममिती मध्ये असतात. सूर्य फूलाच्या पाकळ्यांची संख्या सुध्दा आतून बाहेर हाच नियम दाखवते. ह्यातील कोणतेही तीन बिंदू जोडले तर आपल्याला समभूज त्रिकोण मिळतो. आणि त्रिकोणाला वळसा घालणारे वर्तुळ काढलं तर ते त्या तीन बिंदूं मधुन जातं. ह्याचा अर्थ त्या त्या त्रिकोणाच्या बाजूंच्या मध्यबिंदूंना जोडणार्‍या रेषा म्हणजेच लंबदुभाजक असतात. असे आपण सहा समभूज त्रिकोण घेतले तर त्यांच्या लंबदुभाजकांना जोडल्याने आपल्याला समान बाजू असलेला षटकोन मिळतो. अश्या षटकोनां पासून निसर्गातील कोणते घटक बनलेले असतात ते पुढे दाखवले आहे.

कालापव्यय - एक साक्षात्कार!!

ग्रंथालयाच्या भिंतीवरील घड्याळाच्या टोल्यांनी मला दचकुनच जाग आली. तशीच अर्धवट झोपेतच धपडत उठताना मी घड्याळाचे एकूण चार टोले ऐकले. खिडकीतून बाहेर पाहिल्यावर खूप अंधारलेलं वातावरण दिसलं आणि त्याच खिडकीतून दिसणार्‍या घड्याळात चार वाजलेले दिसले. युनिव्हर्सीटी लायब्ररी ऑक्टोबर पासूनच पाच वाजता बंद व्हायला सुरूवात झालेली त्यामुळे लक्षात आलं की आज आपलं लायब्ररीत जायचं राहून गेलं. एकदम पॉलने दिलेली पहिल्या निबंधाच्या पहिल्या ड्राफ्टची डेड लाईन आठवली. मणामणाचं ओझं एकदम माझ्या डोक्यावर कोणीतरी ठेवतंय असा भास झाला. मी तशीच मटकन बेड वर बसले. मला लक्षात आलं की आज गुरूवार (तो ही संपलेला) शुक्रवारची डेड लाईन आणि माझा ड्राफ्ट तयार नव्हता. मी गुरूवारी युनीव्हर्सीटी लायब्ररीतून काही इंटरनॅशनल जर्नल्स रेफर करायची आणि मग तो ड्राफ्ट लिहायचा असं ठरवलं होतं. काल, म्हणजे बुधवारी साराची रिसर्च मेथडॉलॉजीची लेक्चर्स एकदम हेवी झाल्या सारखी वाटली त्यामुळे रूम वर आल्यावर थोडंस दूध पिऊन पलंगावर पडले......कधी झोप लागली कळलंच नाही. काल रात्री झोपलेली मी डायरेक्ट आज संध्याकाळीच उठत होते. माझ्या आयुष्यातील एक दिवस वाया गेला होता. एरवी भारतात असताना काय मी असे कितीक दिवस वाया घालवले असतील पण हा दिवस खूप महत्वाचा होता. का? कारण मी एका जागतिक कीर्तीच्या (पहिल्या दोन क्रमांकां मध्ये असलेल्या केंब्रीज युनीव्हर्सीटी मध्ये शिकत होते आणि तिथे गेल्यावर दिवसा दिवसाचं महत्व तिथल्या कामाच्या प्रेशर मुळे कळायला सुरूवात झाली होती.)

मला काहीच सुचत नव्हतं. तेव्हड्यात शेजारच्या रूमचा दरवाजा उघडल्याचा आवाज झाला, ममता (माझी शेजारीण की जी फिजीक्स च्या कॅव्हेंडीश लॅब मध्ये पी एच डी करत होती) रूम वर आल्याचं लक्षात आलं. सध्या हिवाळ्यात सगळं लवकर बंद होत असल्याने ती सुध्दा संध्याकाळी चारच्या सुमारास परत येत असे. माझ्या जीवाची अजुनच घालमेल चालू झाली. अस्वस्थता दूर करण्यासाठी कोणाशी तरी बोलणं आवश्यक होतं. मैत्रिणींना फोन करायचा तर श्रीलक्ष्मी आणि मानसी दोघीही डिपार्ट्मेंट्मध्ये जाणार होत्या आणि उशीरा येणार होत्या त्यामुळे त्या कॉलेज मध्ये असण्याची शक्यता नव्हती. भारतातून कोणी चुकून ऑनलाईन असेल तर त्यांच्याशी बोलता येईल म्हणून मी चटकन लॅपटॉप चालू केला. सुदैवाने प्रिया ऑनलाईन दिसली. शक्यतो ती ऑफीस मध्ये असताना ऑनलाईनच असते म्हणजे साधारण पणे दुपारच्या वेळी. पण आज ही येवढ्या रात्री ऑनलाईन कशी हाच पहिला प्रश्न मी तिला विचारला. तर ती म्हणाली अगं मी ऑफीस मध्येच आहे आणि रात्र नाही तर दुपारचे पावणे दोन झालेत. मी लॅपटॉपच्या घड्याळात बघीतलं तर खरंच तो दुपारचे पावणे दोन दाखवत होता. (रूमच्या समोरच मोठ्ठं वॉल क्लॉक असल्याने मी लॅपटॉप मध्ये मी जाणूनबुजून भारतीय वेळ ठेवलेली होती) मी लगेचच खिडकीतून बाहेर पुन्हा घड्याळात पाहिलं तर सव्वा आठ वाजलेले दिसले आणि माझा जीव भांड्यात पडला. मग पाच मिनीटं प्रियाशी गप्पा मारून लॅपटॉप बंद केला आणि उत्साहाने आवरायला सुरूवात केली. मला दुप्पट उत्साह आला होता कारण माझ्या आयुष्यातील एक दिवस मला परत मिळाला होता. अत्यंत महत्वाचा दिवस!

तर झालं असं की युके, तसेच युरोपात हिवाळा चालू झाला की (तिथल्या हवामान आणि वातावरणामुळे) ऑक्टोबर पासूनच सगळी घड्याळे एक तास अलिकडे घेतात. हिवाळा असल्याने सूर्यप्रकाश अत्यंत कमी आणि खूप थंडी यामुळे बाहेरचं वातावरण सकाळी ७.०० वाजता सुध्दा संध्याकाळ सारखं, तसेच अतिशय डिप्रेस्ड वातावरण. सकाळचा फ्रेशनेस त्या वातावरणात नसे. मी जेव्हा अर्धवट झोपेतून उठताना चार टोले ऐकले होते ते शेवटचे चार होते. घड्याळात आठ वाजले होते पण अर्धवट झोपेत असल्याने तसेच ढगाळ, अंधारलेले वातावरण असल्याने मला ते काटे उलटया दिशेने दिसले म्हणजेच चार वाजलेले दिसले. आणि माझा गैरसमज झाला.

मला माझ्या आयुष्यातील एक मोठ्ठा साक्षात्कार झाला होता.........होय साक्षात्कारच! कारण आज पर्यंत मी खूप वेळा "टाईम इज मनी", "वेळेला खूप महत्व" "वेळेचा अपव्यय करू नये, गेलेला क्षण परत येत नसतो" इत्यादी वाचले --- ऐकले होते. पण मला आज प्रत्यक्षात त्याचे रिअलायझेशन झाले. मी वेळेची आपल्या आयुष्यातली किंमत प्रत्यक्ष अनुभवली होती. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आपल्याचसाठी कसा महत्वाचा असतो  त्याची प्रचितीच घेतली.  हे आपल्याला जो पर्यंत आपण त्या लॉस मधून जात नाही तो पर्यंत कळत नाही.हातात एखादी गोष्ट असे पर्यंत आपल्याला त्याची किंमत नसते ती हातातून निसटल्यावर कळते. परमेश्वराचे आभारच की मला फक्त डेमोच पहायला मिळाला.

Friday 16 April 2010

वेस्टर्न युनीयन चे एजंट्स!

आमच्या लग्नाला नवर्‍याचे कॅनडातील मित्रं-नातेवाईक येऊ शकले नव्हते त्यामुळे एका मित्राने वेस्टर्न युनीयन मार्फत लग्नाचे गिफ्ट (टोरांटो मधील उत्तम हॉटेल मध्ये जेवण दिल्यावर जेवढी रक्कम होईल तेवढी साधारणपणे रू. १६,०००/-) पाठवून दिले. तसं माझ्या नवर्‍याचं पैसे हाताळणे, बॅंकींग, गणित, आकडे यांच्याशी ३६ चा आकडा आहे. (म्हणूनच कदाचित आमचे ३६ गुण जमले पत्रिका न पाहता! कारण हे सगळे माझे अत्यंत जिव्हाळ्याचे विषय आहेत. विशेषत: गणित. कदाचित परमेश्वर बरोबर एकमेकांना पूरक जोड्या ठरवतो......पुढच्या लिहिलेल्या अनुभवात ते सिध्द पण झालं आहे....असो) त्यामुळे तो या सगळ्या गोष्टींपासून खूपच अलिप्त असतो. अशुने (त्याने घेतलेल्या अश्वमित्र {त्याचे मूळ नाव फिलिप. फिलिप या नावाचा ग्रीक भाषेमध्ये अर्थ "The One Who Loves Horses"...........म्हणून अश्वमित्र} या संस्कृत नावाचा मी केलेला शॉर्टफॉर्म) मला त्याच्या मित्राच्या डेव्हच्या गिफ्टबध्दल सांगून सुध्द्दा २-३ दिवस उलटून गेले. मी सहजच त्याला त्याविषयी विचारलं तर मला सरळ सांगतो की ते पैसे चोरीला गेले. पहिल्यांदा मला वाटले की ते पैसे कॅनडा मध्येच गहाळ झाले. मग मी त्याला तपशील विचारला तर लक्षात आले की पैसे डेव्हने टोरंटोच्या वेस्टर्न युनीयन ऑफिस मध्ये त्यांच्या सगळ्या चार्जेस सकट पैसे भरले होते व आम्हाला भरलेली रक्कम जशीच्या तशी मिळणं अपेक्षित होतं. बरं या आधी मला वेस्टर्न युनीयन मार्फत व्यवहार करण्याची वेळ कधीच आली नव्हती त्यामुळे नक्की तिथे काय प्रोसेस होते हे माहीतच नव्हते. त्याने गणेशवाडीतील एका वेस्टर्न युनीयनच्या एजंट कडून तो व्यवहार केला होता. त्या एजंटने त्याला जवळच्याच युको बॅंकेचा चेक दिला आणि ठराविक वेळात पैसे घेऊन जायला सांगीतले होते. त्याप्रमाणे तो दुसर्‍या दिवशी त्या ब्रॅंचला जाऊन त्याने काऊंटरवरच्या बाईला तो चेक दाखवला. तिने चेक पाहून एकदा अशुकडे कटाक्ष टाकला आणि आपल्या सहकार्‍यांकडे (हे सुध्दा त्याने नोटीस केलं) आणि सरळ त्याला म्हणाली तुमच्या मित्राच्या खात्यात पैसे नाहीत. त्यांच्यावर विश्वास ठेवून (म्हणजे कॅनडा मध्ये शक्यतो बॅंकेतील लोक फसवत नाहीत खरेच बोलतात असा अनुभव असल्याने) तो परत आला. त्याला वाटले की डेव्हच्या खात्यातील पैसे कोणीतरी घेतले म्हणून आता त्याच्या खात्यात पैसे नाहीत. अशुने सुध्दा असा व्यवहार आधी कधीच केलेला नव्हता आणि ते ३६ चा आकडा प्रकरण त्यामुळे त्याला पण त्यातील फारसे काहीच माहीती नव्हते पण उगीच कॉम्प्लीकेशन्स नकोत म्हणून त्याने कोणालाच काहीच सांगीतलं नाही. मला त्यात काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय येण्यास आधीच सुरूवात झाली. त्यात एखाद्या बॅंकेत चेक सादर केल्यावर जर खात्यावर पैसे नसतील (चेक बाऊन्स झाला) तर ती केस फोर्जरी म्हणून बॅंकेने पोलीस कंप्लेंट करायला हवी. इथे तर बॅंकेने काहीच अ‍ॅक्शन घेतली नव्हती. मी त्याला सुचवलं आपण पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करूयात. पण हा मुळातच पोलीस प्रकरण, कायदा या सगळ्यां पासून चार हात लांब रहाणे पसंत करत असल्याने त्याने मला तसे करण्यास नकार दिला. मला काही स्वस्थ बसवेना. प्रश्न केवळ १६,००० रूपयांचा नव्हता तर बेमालूम पणे चाललेल्या लूटीचा होता. अश्या पध्दतीने परदेशी नागरीकांना भारतात सर्वच ठिकाणी लुटले जाते. मी या गोष्टीच्या मुळाशी जायचं ठरवलं.

पहिल्यांदा वडिलांना फोन करून वेस्टर्न युनियनच्या व्यवहाराच्या प्रोसेस ची माहीती करून घेतली. आणि खरा प्रकार लक्षात आला. त्या एजंटची युको बॅंकेच्या त्या ब्रॅन्चला दोन खाती होती. एक खातं वेस्टर्न युनीयनशी जोडलेलं आणि दुसरं करंट. त्या एजंटने लबाडी अशी केली की त्याच्या वेस्टर्न युनीयनच्या खात्यात पैसे जमा करून घेतले आणि देताना स्वत:च्या करंट अकाऊंटचा चेक दिला की ज्या मध्ये पैसे नव्हते. मला सगळ्यात आश्चर्य वाटलं ते युको बॅंकेच्या कर्मचार्‍यांच्या वागण्याचं आणि त्यांचा रागही आला. ही ब्रॅन्च प्रभात रोडवर गिरीकंद ट्रॅव्हल्स च्या जवळ आहे. भारतीय लोकांच्या या वागण्याची लाज वाटली. मी तडक त्या एजंटच्या दुकानाकडे मोर्चा वळवला. माझा दुर्गावतार बघून अशुला त्या दुकानदाराची काळजीच वाटायला लागली आणि मला म्हणाला जाऊ देत ते पैसे. पण मला हे सगळं सहन होणं शक्यच नव्हतं. दुकानाचा मालक (म्हणजे तो एजंट) दुकानात नव्हता. अपेक्षेप्रमाणे दुकानातील माणसाने टाळाटाळ करायला सुरूवात केली. मी सुध्द्दा त्याला चांगला धारेवर धरला आणि दुकानाच्या मालकाला फोन लावण्यास सांगीतले. फोनवर सुध्दा तो एजंट टोलवाटोलवी करत होता. मग मी त्याला अर्ध्या तासाची मुदत दिली. अर्ध्या तासात जर ते पैसे आमच्या हातात पडले नाहीत तर मी प्रभात पोलीस स्टेशन मध्ये जाईन असेच त्याला सांगीतले. मग त्याची भाषा बदलली. मला विचारायला लागला, मॅडम तुम्ही कोणत्या ब्रॅन्चला असता? मी फक्त एकच पालूपद चालू ठेवलं, अर्ध्या तासात पैसे नाहीतर प्रभात पोलीस चौकी.........शेवटी अर्ध्या तासात आम्हाला आमचे पैसे मिळाले. मग मी सुध्दा (अर्थात आम्हाला पोलीस चौकीत फेर्‍या मारण्यासाठी वेळ नसल्याने) पोलीसात न जाण्याचा निर्णय घेतला आणि शांतपणाने घरी गेलो. नवर्‍याने माझा दुर्गा-काली यांचे सर्वप्रकारचे कॉम्बीनेश असलेला अवतार पहिल्यांदाच बघितल्याने तोही एकदम चकित झाला. त्याने जेव्हा डेव्हला हा सगळा प्रकार इ-मेल ने सांगीतला तेव्हा त्याने लगेचच भविष्यातील एक बिझनेस प्रपोझल पाठवलं. "कालीका एन्टरप्रायझेस" म्हणून आणि त्यात मला "चिफ ऑफ फायनान्स" ची पोस्ट ऑफर केली आणि लिहिले की मला खात्री आहे की माझे पैसे कधीच बुडणार नाहीत. मजेचा भाग सोडून देऊ. पण मला मात्र भारतामध्ये परदेशी लोकांची जी सर्रास लूट चालू असते त्याचा रागच आला. त्यामुळे आपल्या देशाचे नाव सगळीकडे बदनाम होते हे या लोकांच्या लक्षात कसं येत नाही याचं मला आश्चर्य वाटतं! काही जण तर या लूटीचं समर्थन असंही करतात की फिरंग्यांनी आपल्याला दिडशे वर्षे लुटलं आता आपण त्यांना लुटलं तर काय फरक पडतो? मला तरी हा युक्तिवाद पटत नाही. हा युक्तीवाद म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी असाच झाला. असो.

अजुनतरी डेव्हच्या प्रपोझल वर गांभिर्याने विचार करण्याची वेळ आमच्यावर सुदैवाने आलेली नाही. कारण त्यासाठी आम्हाला कॅनडा मध्ये जाऊन रहावे लागेल की जे आम्हाला दोघांनाही नको आहे. :-)

आमची पहीली ट्रीप!

आमचं लग्न ज्यावेळी झालं त्यावेळी आम्हि दोघेही खूप बिझी होतो. लग्न सुध्दा अगदी दोन तासाच्या वैदिक विधींमध्ये संपन्न झालं. नवर्‍याचं पी. एच. डी. चालू होतं आणि मला नुकतीच एका कॉलेज मध्ये लेक्चररशीप मिळाली होती. त्यामुळे सुट्टी मिळणं शक्यच नव्हतं. त्यामुळे लग्नानंतरचे फिरायला जाणे वगैरे झालेच नाही. साधारण ७-८ महिन्यांनी मला जून मध्ये उन्हाळ्याची सुट्टी (पावसाळ्याच्या सुरूवातीला) मिळाली. आम्ही त्र्यंबकेश्वरला जाण्याचं ठरवलं. त्याला दोन कारणं होती. पावसाळ्यात त्र्यंबकेश्वर आणि परिसर अतिशय सुंदर असतो. माझ्या नवर्‍याला ज्योतीर्लिंग म्हणजे काय हे नीट दाखवायचं होतं. अरे सांगायचंच राहीलं माझा नवरा एक परदेशी आहे. पण त्याला हिंदू धर्म- भारतीय संस्कृती याचं खूप आकर्षण आहे. त्यामुळे त्याला इतर टुरिस्ट जिथे जातात (उदा. गोवा) तिथे जायला आजीबात आवडत नाही. त्यामुळे हळूहळू त्याला आपल्या संस्कृतीची खरी ओळख करून देणे चालूच असते.

तर आम्ही भर दुपारी एक वाजतची एशीयाड पकडून नासिक मार्गे रात्री अकराच्या पंधरा मिनिटे आधी त्र्यंबकेश्वरला पोहोचलो. गावाच्या वेशीवरच शेगाव येथील गजानन महाराज संस्थानचे भक्तनिवास आहे तिथेच सामान घेऊन गेलो. रात्री अकराच्या सुमारास त्यांच्या स्वागत कक्षामध्ये एक तरूण स्त्री एका परदेशी माणसा बरोबर बघुन तिथल्या व्यवस्थापकांचे तसेच आजूबाजूच्या भक्तांचे (जे कक्ष मिळवण्यासाठीच्या प्रतिक्षेत होते, निवांतपणे रात्रीची हवा खायला बसलेले) डोळे आश्चर्याने मोठे झाले. मी अगदी सहजपणे काऊंटरपाशी जाऊन एक डबल रूम मिळेल कां असे विचारले? मला लग्नानंतर एका परदेशी- गोर्‍या माणसा बरोबर वावरायची इतकी सवय झाली होती की त्या लोकांच्या मनात काय चालू असेल ही कल्पना सुध्दा मनाला शिवली नाही. त्या काऊंटर वरील माणसाने मला पुन्हा विचारले की कोणासाठी डबल रूम? मी सहजपणे म्हणाले मी आणि माझ्या मिस्टरांसाठी. त्याने मला लगेच मॅरेज सर्टीफीकेट मागीतले. मला क्षणभर कळेच ना की तो माझ्याकडे मॅरेज सर्टीफीकेट का मागतोय ते. मी त्याला लगेचच कारण विचारलं. तो जेव्हा हे म्हणाला की तुमचं दोघांचं लग्न झालं आहे याला पुरावा काय? तेव्हा कुठे सगळा प्रकार लक्षात आला. नेमकी निघताना खूपच घाई झाल्याने (नेहमीप्रमाणे) बाबांनी आधीच आठवण करून देऊन सुध्दा आम्ही दोघेही मॅरेज सर्टीफीकेट बरोबर घ्यायला विसरलो. मी त्याला पुष्कळ सांगायचा प्रयत्न केला, लग्नाचे फोटो (डिजीटल कॉपीज) दाखवते, वडिलांशी फोन वर बोलून खात्री करून घ्या वगैरे सगळे प्रकार सुचवुन झाले. पण हा मॅरेज सर्टीफीकेट वरच अडून राहिलेला. शेवटी त्याला सांगीतलं की आम्ही ते आणायला विसरलो आहोत. आता काय करायचं? तो पर्यंत रात्रीचे ११.१५ झालेले. गावात इतर कुठे जायचे तर खूपच उशीर झालेला. शेवटी त्याच्या कडे पुण्याला घरी फोन करायची परवानगी मागीतली. बाबांशी बोलल्यावर त्याला विचारले इथे फॅक्स मशीन आहे का? ते नाही म्हंटल्यावर बाबांनी घरून इ-मेल ने स्कॅन केलेली कॉपी पाठवण्याचा पर्यायपण बंद झाला. तो पर्यंत ११.३० होत आलेले. मी त्यांना इतक्या रात्रीचे आम्ही कुठे जाणार म्हंटल्यावर तुम्हाला आजच्या पुरती सार्वजनिक खोलीत (एका खोलीत १५-२० जण) जागा देतो असे म्हणाले. आमची तोंडं अगदी इवलीशी झाली होती. माझाही हा पहिलाच अनुभव त्यामुळे आता काय करावे याचा एकमेकांत विचार विनीमय करत असताना (कारण नक्की काय चालू आहे हे माझ्या नवर्‍याला मराठी त्यावेळेस येत नसल्याने समजलं नव्हतं, तसेच जर सार्वजनिक खोलीत रहायची वेळ आलीच तर त्याची मानसिक तयारी करण्यासाठी..........मी एकटीच खिंड लढवत होते.....अजुनही ९९% मलाच खिंड लढवावी लागते...असो) एकदम त्यांच्यातील एक माणूस म्हणाला की त्यांच्या कडे अजुन एक उपाय आहे. मग त्याने मला तो उपाय सांगीतला.


उपाय भन्नाटच होता. म्हणजे त्यावेळी तरी मला तसच वाटलं. त्यांनी आम्हाला दोघांना दोन वेगवेगळे फॉर्म्स दिले. एक नवर्‍याने भरायचा (त्याची स्वत:ची तसेच बायकोची पूर्ण माहीती म्हणजे अगदी बहीण-भावंडे, घरातील इतर सगळे यांची नावे, व्यवसाय, त्यांची असलेली नाती इ. ) आणि तसाच फॉर्म बायकोने भरायचा. फॉर्म भरताना दोघांनाही वेगवेगळ्या खोलीत नेले म्हणजे आम्ही कॉपी करणार नाही. मला जरा हा प्रकार धोकादायकच वाटला. कारण बर्‍याच वेळा नवरे लोकांच्या बायकोच्या माहेरच्यांची नावे लक्षातच नसतात. आणि त्यातून माझा नवरा तर परदेशी. जरी तो संस्कॄत पंडित असला तरी माझ्या तीन बहीणी त्यांचे नवरे आणि मुले या सगळ्यांची नावे, त्यांचे व्यवसाय कसे लक्षात राहतील, तसेच माझी आई माझ्या लग्ना आधीच निवर्तल्याने तिचे नाव तर याच्या लक्षात रहाणे शक्यच नाही. मी तसे लगेच त्यांना सांगून टाकले. आमच्या दोघांचेही प्रश्नपत्रिका सोडवुन झाल्यावर त्यांनी आमच्या उत्तरपत्रिका मॅच करून पाहील्या. जस जशी सगळी उत्तरं मॅच व्हायला लागली तसतसे त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव बदलायला लागले. मला एक महत्दाश्चर्याचा धक्का म्हणजे माझ्या नवर्‍याने सगळी माहीती (सगळ्यांच्या नावांसकट अगदी माझ्या आईच्या नावासहित) व्यवस्थित लिहीली होती. मला जास्त काळजी कारण माझ्या कडची नावं आणि माणसं यांची संख्या त्याच्याकडच्या तुलनेत खूपच जास्त होती. जेव्हा सगळीच माहीती बरोबर आणि अचूक निघाली तेव्हा मात्र त्यांनी आमची माफी मागीतली आणि हे सुध्द्दा सांगीतलं की आम्हाला इतकं कठोर व्हावच लागतं नाहीतर आम्ही क्षेत्राचं पावित्र्यं कसं राखणार? आणि तुमच्या कडे पाहून वाटलं की जर तुम्ही खरंच लग्न झालेले असाल तर तुम्हाला एकमेकांची पूर्ण माहीती असेलच. तेव्हा आम्ही तुम्हाला ते फॉर्म्स भरून देण्यास सांगण्याचं ठरवलं. पुढे आमचा तिथला निवास अतिशय छान झाला हे वेगळं सांगायलाच नको. अगदी आम्ही आमचा निवास एक दिवसाने वाढवण्या इतपत आम्हाला त्या सगळ्या परिसरात छान वाटलं. गंमत म्हणजे, भक्तनिवास मधील व्यवस्थापक स्वयंसेवकांना एक परदेशी गोरा माणूस आपल्या सारखाच, भोजनगृहात सगळ्यांबरोबर हाताने जेवतो (चमचा न वापरता) याचं अपरूप वाटत होतं.  अगदी नाही म्हणायला पहिल्या दिवशी मंदिराच्या बाहेर असलेल्या पाटीने "फक्त हिंदू धर्मियांनाच परवानगी" या फलकाने थोडं नाराज व्हायला झालं. पण नंतर काही जणांनी सांगीतलं की आत जायला काहीच हरकत नाही फक्त गाभर्‍यात सोवळे नेसलेल्यांनाच किंवा ओलेत्यानेच प्रवेश आहे. आमच्या गाभार्‍यात जाणे महत्वाचे नसून देवाचे लांबून दर्शन घेणे व मंदिराचे प्राचीन हेमाडपंथीय कोरीवकाम पहाणे यालाच अधिक प्राधान्य होते.

लग्नानंतरच्या या पहिल्याच ट्रीपने आम्हाला बरेच धडे दिले की जे आम्हाला आमच्या पुढच्या वैवाहिक आयुष्यात खूपच उपयोगी पडले आहेत.

Sunday 4 April 2010

नॉट ओन्ली मिसेस राऊत :गरज सामाजिक आत्मपरिक्षणाची!

खूप दिवस झाले गजेंन्द्र अहिरे चा "नॉट ओन्ली मिसेस राऊत" पहायचा होता पण वेळच मिळत नव्हता. आज ठरवलंच की तो यू-ट्युब वर तरी पहायचाच. सिनेमा पाहून झाल्यावर मला पुन्हा त्याच प्रश्नांनी घेरले. या सिनेमाच्या निमित्ताने गजेंद्र अहिरे ने खूपच तरल पणे आपल्या समाजाचे, संस्कृतीचे सत्य स्वरूप डोळ्यासमोर आणले.
अगदी दंडवत्यांच्या घरापासूनच घ्या नं.....दादा दंडवत्यांना आणि त्यांच्या भावाला स्त्रियांविषयी थोडा सुध्दा आदर नाही. स्वातीला घरात ज्या प्रकारची वागणूक मिळताना दाखवली आहे ते. हे अगदी ९०% घरांमध्ये आढळणारे चित्र आहे. लहान पणापासूनच मुलींना अतिकाळजी आणि अतिसंरक्षण या नावा खाली दुबळं बनवुन ठेवलं जातं. काही घरांमध्ये दंडवत्यां सारखा फार्स चालू असतो. घरतील स्त्रियांना सोन्याच्या पिंजर्‍यात अथवा देव्हार्‍यात बसवले जाते. किंबहुना त्यांना ह्र्दय नावाचा अवयवच नाही असेच दाखवले आहे घरातील प्राणी आणि स्त्रिया यांना थोड्या फार फरकाने सारखीच वागणूक दिली गेली. मला असं वाटतं अजुनही दंडवते कुटुंबा मधील पुरूषांचं वागणं आणि मानसिकता सध्याच्या उच्चभ्रू समाजाचे ९९% प्रतिनिधित्व करतात.

मिसेस कारखानीसांचा नवर्‍यावर असलेला विश्वास हा सध्याच्या समाजातील ९९% स्त्रियांना असतोच नाहीतर दाखवावा तरी लागतो. माझ्या माहीती मध्ये एका कुटुंबात घडलेली घटना. दोघा नवरा बायकोंची एक अविवाहीत लहानपणा पासूनची मैत्रिण असते. या दोघांना एक मुलगा असतो आणि नंतर ते एक मुलगी दत्तक घेतात. दोन मुलांच करण्यात आणि घरचा नव्याने सुरू केलेला व्यवसाय सांभाळण्यात बायको व्यस्त. आणि नवरा एका कंपनीत मोठ्या हुद्यावर. पण बायकोशी प्रतारणा करण्याची घाणेरडी सवय या माणसाला. का? तर घरात बायको वाट्यालाच येत नाही. मग त्या अविवाहीत मैत्रिणीवर जाळे टकण्याचा प्रयत्न. तिने दिलेला स्पष्ट नकार. मग अजुन दोन-चार मैत्रिणी पकडल्या. बायकोशी धादांत खोटं बोलायचं की आपण मित्रांबरोबर आहोत. आणि बायकोचा पण खूप विश्वास त्याच्या वर. कारण बोलताना तरी स्त्री मुक्ती आणि स्तियांचं शोषण यावर लंब्या चौड्या गप्पा मारणार. कोणी बघीतलं त्या माणसाला तर सांगुनही कोणाचा विश्वास बसणार नाही की हा माणूस असा आहे. असे साळ्सूद पणाचा आव आणणारेच खूप आहेत आपल्या समाजात. त्यांना फक्त एखादी स्त्री एकटी दिसली की मग तिच्या रक्षणाची (?) आणि भवितव्याची आपल्यालाच काळजी (?) अशा थाटात ते वावरत असतात. चित्रपटातील मि. कारखानीस हे समाजातील अश्याच लोकांचं प्रतिनिधित्व करतात. अश्यांची संख्या सुध्दा ९०% च्या घरात आहे. त्यांना स्वत:ला सुध्दा ते माहीत नाही की संधी समोर आली तर मि कारखानीसांना मनातल्या मनात लाखोली वाहणारे आपण सुध्दा कसे वागु ते. एक स्त्री म्हणून मला या असल्या सगळ्या लोकांची माहीती आहे. माझ्या सारख्या स्वतंत्र पणे वावरणर्‍या तसेच काही एकट्या राहणार्‍या स्त्रियांना हे सगळे लोक वेगवेगळ्या स्वरूपात कुठे न कुठे तरी भेटलेले असतात. मी लहान असताना मला माझी आई आपल्या समाजात गळ्यात दिसणारं मंगळसूत्र किती महत्वाचं आहे हे सांगायची. पण ते मला आता कळतय. माझा नवरा परदेशी आहे. त्याचा काही आग्रह नाही मंगळसूत्र घालण्याचा. पण मी ते घालते. यामुळे लोकांची माझ्याकडे बघण्याची दृष्टी बदलते. हेच मी जर परदेशात राहीला गेले तर घलणार सुध्दा नाही. पण भारतात ते महत्वाचे. नाही तर लोक मला मित्रा बरोबर लग्ना शिवाय राहणारी इ. म्हणतील. आणि मग बर्‍याच जणांना काय वाटेल ते अधिक स्पष्ट सांगण्याची गरजच नाही. याच कारणासाठी माझ्या एका चुलत बही्णीने नवरा तिच्या ऐन पस्तीशीत गेला असून सुध्दा कुन्कु लावणे आणि मंगळसूत्र घालणे चालूच ठेवले.

पर्वाच पुण्यामध्ये एक बलात्काराची घटना घडली. मिश्र प्रतिक्रीया उमटल्या. एक प्रतिक्रीया स्त्रियांच्या वेषभूषेवर होती. मला अश्या लोकांना एक प्रश्न विचारावासा वाटतो की चित्रपटातील नेहाची काय चूक होती? तिची चूक येवढीच की ती एकटी रहायला तयार झाली....निरागसपणे त्या नराधमाला घरात घेतलं. मेलेल्या बापाच्या अस्तित्वावर तिचा नको एतका विश्वास. भारता मध्ये किति टक्के स्त्रिया तोकडे कपडे घालून फिरत असतात? त्यातील किती टक्के स्त्रियांवर अत्याचार होतात? एक स्त्री म्हणून माझा अनुभव सांगते. स्त्रियांनी अगदी व्यवस्थीत कपडे जरी घातले असतील तरी पुरूषांची नजर स्कॅनर लवल्या सारखी स्त्रियांकडे बघत असते.........त्याचे काय? स्वत:च्या भावनांना आवर घालणे, कोणावरही अत्याचार, अन्याय न करणे ्हीच तर पूरूषार्थाची लक्षणे सांगीतली आहेत. मग हेच पुरूष जेंव्हा स्त्रियांना सितेचा आदर्श ठेवण्यास सांगतात तेंव्हा ह्यांना एक पत्नि, एक वचनी प्रभूरामचंद्राचा आदर्श दिसत नाही हे एक कोडंच आहे!
एखादी अविवाहेत मुलगी परदेशात शिकायला गेली तर तिच्या चारित्र्याविषयी सगळ्या सो कॉल्ड हीतचिंतकांना प्रश्न पडतात.....आणि तसे बोलूनही दाखवतात...........तर त्यांना अविवाहीत मुलांच्या चारित्र्याविषयी प्रश्नच नसतात........मग ते भारतात असोत किंवा भारता बाहेर.

जो पर्यंत समाजाची विचार करण्याची पध्दत बदलत नाही तो पर्यंत काहीच होणार नाही. कायद्याचा जर जबरदस्त बडगा असेल तरच हे शक्य होईल. पण या कायद्याच्या बडग्या बरोबरच आपली चांगूलपणाची शक्ती, विवेक बुध्दीची सुध्द्दा साथ असली पाहीजे. कालच एका व्यक्तीशी माझं या विषयाशी संबंधीत बोलणं चालू होतं. मी जेंव्हा समाजाची मानसिकता बदलण्या विषयी म्हणाले तेव्हा ते सदगृहस्थ म्हणाले पण मी समाजात जाऊन असले काही काम करण्याची शक्यताच नाही. मला त्यांच्या वैचारिक मजली विषयी वाईट वाटले. समाज हा शेवटी आपल्या पासून, आपल्या कुटुंबा पासून सुरु होतो. त्यामुळे समाजातील चांगल्या बदलांची अपेक्षा स्वत: पासून करावी. आपल्या कुटुंबात ती अंमलात आणावी. जे लोक महिला सबलीकरणाची जोराने चर्चा करत फिरतात, किंवा महिलां वरील अत्याचाराचा निषेध करतात त्यांनी स्वत:च्या पत्नी, बहीण, मुलगी यांना सबला करावे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करावा. मग अत्याचार होणारच नाही.....आणि जर का चुकून तसा प्रसंग ओढवलाच तर त्याला धैर्याने तोंड देण्याची ताकद त्यांच्या मध्ये असेल.

बघा विचार करून पटतय का ते. आपल्याच सामाजाचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. सामाजिक आत्मपरिक्षणाची गरज आहे.

Friday 2 April 2010

फेकून द्या तो गाऊन... वदली 'जयरामवाणी'!

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5755929.cms

खरंच मला सुध्दा हा प्रश्न नेहमी पडतो की आपल्याला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली तरी अनेक बाबतीत वसाहतवादी मानसिकता आपण टाकून देवू शकलेलो नाही. त्यातीलच एक म्हणजे विद्यापीठातील दीक्षांत समारंभ आणि त्यातील ती गाऊन घालून पदवी स्विकारण्याची पध्दत. त्यानंतर समारंभ संपल्यावर सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित पणे त्या तिरक्या चौकोनी टोप्या हवेत उडवणे. या सगळ्याचा अर्थ काय आणि याची दिक्षांत समारंभात गरज काय? हे सगळं मी केंब्रिज विद्यापीठात पाहिलं आहे. त्या विद्यापीठात शिकले आणि जेव्हा तिथली पदवी घेतली त्यावेळी त्यांच्या पध्दतीने ती स्विकारण्यात काहीच गैर नाही. या गाऊन ल तिकडे रोब असे म्हणतात. पूर्वीच्या काळी त्यांच्या कडे ख्रिश्चन चर्च चे लोक शिक्षण देत असत. त्यांच्या कडे त्यांचे धर्मगुरू (वेगवेगळ्या स्तराचे) वेगवेगळया रंगाचे गाऊन्स घालत असत. तिच पध्दत पुढे रूढ झाली. पण आपण स्वातंत्र्य मिळाल्यावर तरी या सगळ्याचा विचार करून आपल्या संस्कृतीला साजेशा अश्या पध्दती, पोषाख का शोधूनयेत याचेच आश्चर्य वाटते. आजूनही आपले लोक अनुकरण आणि अंधानुकरण यातील फरक समजू शकत नाहीत हीच खरी शोकांतिका!!