Saturday 19 June 2010

माझे शाकाहार पुराण - भाग १

 मांसाहाराशी ओळख

http://healthveda.com/wp-content/uploads/2012/01/vegetarian-food.jpg
मी जन्मापासूनच शाकाहारी आहे ती आजतागायत. मांसाहारी असलेले लोक म्हणतील ज्याची कधी आयुष्यात चव चाखली नाही त्याच्या चवदारपणाची कल्पना हिला काय असणार? मान्य. पण मला कधी अंडं सुध्दा खावंसं वाटलं नाही. कोणाचंही मांस खाणं ही कल्पना सुध्दा नको वाटते. मग भले दिसायला ती पाककृती कितीही चवदार दिसली तरीही. घरचे सगळे, नातेवाईक कोणीच मांसाहारी नसल्याने मला कधी त्यावर विचार करायची सुध्दा संधी मिळाली नव्हती.
माझा आणि मांसाहाराचा संबंध आला तो मी अरूणाचल प्रदेश-आसाम मध्ये काम करायला गेल्यावर. तिथे जवळ जवळ ९९% लोक मांसाहारी. शाकाहारी एक टक्का माझ्यासारखे. अरूणाचल प्रदेश किंवा आसाम मध्ये कार्यकर्त्यांच्या घरी गेलं की मांसाहाराने स्वागत असे. मग त्यांना मी शाकाहारी आहे हे सांगायला कसरत होत असे. खरंतर मांसाहार कसा दिसतो म्हणजे अगदीच प्राण्याच्या तंगड्या वगैरे बाहेर आलेल्या दिसल्या नाहीत तर हे सुध्दा मला माहीत नव्हते. मग तर त्याचे वेगवेगळे प्रकार माहीती असणं दूरच. असेच एकदा मी आसामला असताना एका कार्यकर्त्याच्या घरी गेले. आम्ही गप्पा मारत बसलेलो असताना चहा बरोबर त्यांनी ब्रेड पण आणला. मला पुसटशी कल्पना सुध्दा आली नाही की ते नॉनव्हेज आणतील. एव्हाना हे सुध्दा माहीती झाले होते की लोकांना आम्ही शाकाहारी आहोत हे सांगणं तितकंसं आवडत नसे. म्हणून तो पिवळसर दिसणारा ब्रेडचा स्लाईस मी उचलला. मला वाटलं बटर लावलं असेल. गप्पांच्या नादात एक घास तोडून तोंडात घातला. घास चावताना काहीतरी वेगळं वाटलं. पण दुर्लक्ष करून दुसरा घास घेतला. गिळताना खात्रीच पटली की गडबड झालेली आहे. तोंडातलं थुंकुन टाकणं वाईट दिसलं असतं म्हणून तो घास कसाबसा घशाखाली उतरवला आणि उरलेला स्लाईस तसाच ठेवून दिला. चहा पिऊन टाकला. थोड्यावेळाने त्यांनी मला विचारलं की ब्रेड्चा स्लाईस का नाही खात. मग मी त्यांना विचारलं की त्या स्लाईसवर ते पिवळं नक्की काय होतं? त्यांनी ते अंडं असल्याचं सांगीतल्यावर मी त्यांना म्हणाले पण मी शाकाहारी आहे. तर मला म्हणतात पण हे शाकाहारीच आहे. त्यांच्या दृष्टीने अंडं शाकाहारात मोडत होतं. पण माझी फारच वाईट अवस्था झालेली होती. तिकडून घरी आल्यावर दुसर्‍या दिवशी वमन धौती करून पोटातील कण अन कण काढून टाकला. त्यारात्री मला नीट झोप काही लागली नाही. हा सगळा मानसिकतेचा परिणाम आहे हे कळत होतं पण वळत नव्हतं. आता मला वासाने एखाद्या पाककृतीत अंडं आहे की नाही हे समजायला लागलं होतं. बंगाल मध्ये मासे हा शाकाहार समजतात हे सुध्दा समजलं. याबाबतीत माझी इतकी प्रगती होण्यात आसाम मधील वास्तव्याचा फार मोठा वाटा आहे.

मांसाहाराची जास्त ओळख पण पूर्ण शाकाहारी राहूनच

जेव्हा केंब्रीजला गेले तेव्हा मांसाहाराशी माझी पुन्हा गाठ पडली. ह्यावेळी परदेशात असल्याने गायी, डुकरं या सगळ्यांच्या मांसाचे प्रकार पाह्यला मिळाले. काहीवेळा तर अनेक पाककृती इतक्या फसव्या दिसायच्या की नुसतं पाहून समजायचं नाही की शाकाहारी की मांसाहारी. इंडक्शन च्या दिवशी डिपार्टमेंट मध्ये एका सिंगापूरच्या मुलाची ओळख झाली आणि मी शाकाहारी आहे हे समजल्यावर लगेच विचारलं डु यु इट मिल्क प्रॉडक्ट्स? आर यु अ व्हीगन? मी आयुष्यात पहील्यांदाच व्हीगन हा शब्द ऐकत होते. त्याने व्हीगन ही संकल्पना स्पष्ट केल्यावर मी म्हणाले नाही, मी मिल्क प्रॉडक्ट्स खाते म्हणजे मी व्हीगन नाही. जेव्हा जेव्हा फॉर्मल हॉल ला किंवा एखाद्या पार्टीला जायचं असेल तर आपण शाकाहारी असल्याचं आधीच सांगायला लागायचं म्हणजे आपल्या टेबल पाशी फक्त शाकाहारीच जेवण येतं. पार्टी मध्ये तशी शाकाहार व मांसाहार अशी स्पष्ट विभागणी असायची. त्यामुळे मला खूप टेन्शन कधीच आलं नाही.
आमच्या डीपार्टमेंट मध्ये जेव्हा आमच्या कोर्सच्या शेवटच्या दिवशी एक छोटीशी पार्टी आयोजित केली होती तेव्हाची गोष्ट. आम्ही ५ वेगवेगळ्या देशांचे लोक होतो. मी एकटीच भारतीय. बाकी ग्रीस, सायप्रस, सिंगापूर, तैवान, ब्रिटीश असे इतर लोक होते. प्रत्येकाने आपापल्या देशातील मेनु बनवुन आणायचा असं ठरलं. मी मायक्रोवेव्ह मध्ये बनवलेला पुलाव घेवून गेले. माझ्या व्यतिरीक्त फक्त सिंगापूर वाल्या मुलाने एक व्हेज डीश स्वत: बनवुन आणली होती. बाकी सगळ्यांनी मांसाहारी पदार्थच ते ही विकतचे आणले होते. मला ते पदार्थ खाणं केवळ अशक्यच होतं. तसं मी त्यांना सांगीतलं. तर सायप्रस च्या चार मुलींना राग आला. त्यांना वाटलं की मी मुद्दाम तसं म्हणते आहे. कारण त्यांना पूर्ण शाकाहारी लोक असू शकतात ही संकल्पनाच पूर्णपणे नवीन. माझी तर पंचाईत झाली. त्या चार मुली सोडल्या तर बाकीच्या सगळ्यांनी मी नेलेला पुलाव अतिशय चविनं आणि आवडीनं खाल्ला. त्या सायप्रसच्या मुलींना कसं समजवावं हे मला समजत नव्हतं.
पहीले तीन महीने सेल्फ कंटेन्ड ब्लॉक मध्ये काढले ते याच शाकाहारी खाण्यासाठी. नंतर मग एका शेअर्ड कीचन असलेल्या ब्लॉक मध्ये मी रहायला गेले. आता माझी बरीच प्रगती झाली होती. म्हणजे एकाच शेगडीवर बाजूच्या बर्नरवर जर कोणी मांसाहार शिजवत असेल तर शेजारच्या बर्नरवर मी माझी शुध्द शाकाहारी भाजी शिजवून तिथेच बसून व्यवस्थित (पोटात न ढवळता आणि रात्री सुखाने झोपून) जेवत असे. माझ्या किचन मधील इतर देशांच्या मित्रमंडळींना आतापर्यंत माझं शुध्द शाकाहारी असणं माहीती झालं होतं आणि ते मला कधी आग्रह पण करत नसत. पण तेच मित्रमंडळी मी शिजवलेलं शाकाहारी अन्नं चवीने आणि आवडीने खात.
एकदा आमच्या किचन मध्ये एका झेक रिपब्लीकच्या मैत्रीणीचा मित्रं आला. तो पूर्ण शाकाहारी. तो तिला कायम शाकाहारी बनण्याविषयी आग्रह करत असे. आणि ती मात्रं तब्येत वीक होईल असं कारण पुढे करत असे. त्यांना मी पूर्ण शाकाहारी असल्याचं समजलं. तिच्या मित्राने मला किती वर्षं झाली शाकाहारी झाली आहेस? असं विचारलं. तो प्रश्न विचारण्या मागचं कारण न समजुन मी त्याला उत्तर दिलं बाय बर्थ. त्याला इतकं आश्चर्य वाटलं. तो येव्ह्ढं सुध्दा म्हणाला की माझ्या कडे पाहून (उंची, अ‍ॅथलॅटीक बिल्ट) विश्वास बसत नाही की मी जन्मा पासून शाकाहारी आहे. मध्ये भारतात आल्यावरही एका डॉक्टरांनी पण असंच म्हंटल्याचं आठवतंय की माझ्याकडे बघुन मी पूर्ण शाकाहारी असेन असं वाटत नाही. असो. मी शाकाहारी आहे हे समजल्यावर परदेशात काही लोकांचा हमखास प्रश्न असायचा बाय रीलीजन ऑर बाय एथिक्स?

पुढच्या भागात या बाय रीलीजन की बाय एथिक्स की आणखी काही या संदर्भातील विविध युक्तीवाद मांडेन.

18 comments:

  1. शाकाहाराबद्द्ल असं काही पहिल्यांदा वाचतेय...पण मी (बाय बर्थ) मांसाहारी आहे आणि अजुनतरी कधी संपुर्ण शाकाहारी व्हावंसं वाटलं नाही...
    ही पोस्ट मस्त झालीय.

    ReplyDelete
  2. वा.. अपर्णा.. शाकाहार असो नाहीतर मांसाहार... आपल्याला महत्वाचे ते खादाडी पुराण... :) पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत असलेला खवय्या रोहन...

    अवांतर प्रश्न : तुम्ही आसामला काय काम करायच्यात?

    ReplyDelete
  3. धन्यवाद अपर्णा (सं). शतपावलीवर स्वागत. मला तर मांसाहाराची मल्पना सुध्दा सहन होत नाही. त्यामुळे अरूणाचल प्रदेशात माझी खूपच गोची झाली होती. मला ते सोयाबीन चंक्स पण आवडत नाहीत. तिथे तर सारखं उकडलेला भात-बटाटा आणि त्याबरोबर सोयाचंक्स. नुसताच भात आणि बटाटा खाऊन मी खूपच बारीक झाले होते. पण त्याने एक गोष्ट घडली की मला जगाच्या पाठीवर केवळ भात-भाजी किंव भात आमटी असेल तर जीवंत राहण्याचा (सर्व्हाईव्ह होण्याचा) आत्मविश्वास दिला. मला त्या "कास्ट अवे" मधल्या माणसा सारखं एखाद्या नीर्जन बेटावर रहावं लागलं किंवा उरूग्वेच्या फेअरचाईल्ड विमान प्रवाशांसारख्या अवस्थेत सापडले तर जीवंत राहू शकेन की नाही सांगता येत नाही.

    ReplyDelete
  4. रोहन, आसाम मध्ये मी विवेकानंद केंद्राचं काम करत होते. पूर्ण लेख वाचल्यावर तुझ्या लक्षात आलंच असेल तुला अपेक्षित असं खादाडीचं वर्णन काही मी त्यात केलेलं नाही. :-)

    ReplyDelete
  5. लेख आवडला.हा इश्यू लहानपणापासून उगीचच आपल्या नशिबी आला आहे.
    आम्ही शाकाहारीच पण मांसाहारी खाण्याबद्दल एक glamour वाटत असे.
    आता भुकेची गोळी मिळावी असे वाटते.

    ReplyDelete
  6. मी माणूस सोडून जीवंत राहण्या करता जे काही पोटात पचेल ते खातो. अर्थात आधी शाकाहाराला महत्व मग नसेल तर इतर काहिही. कारण अन्न हे जगण्याशी नीगडीत व महत्वाचे आहे. आणि हो उगीच वाद घालून कोणाचे डोके खाण्याचा मांसाहार टाळतो.
    पण तु छानच लिहीले आहेस, तुझे मत छान मांडले आहेस.

    ReplyDelete
  7. धन्यवाद रानडे काका! तुमच्या मताशी १००% सहमत आहे. पण उगीच कोणी कोणाला शाकाहारीचा मांसाहारी बन किंवा मांसाहारीचा शाकाहारी असं कन्व्हीन्स करायला गेले की सगळी गोची होते. मी तेच म्हणतेय की मला माहीत नाही की जर माझ्यावर त्या उरूग्वेदेशाच्या फुटबॉल टिम वर जशी वेळ आली तशी वेळ आली तर मी काय करेन माहीती नाही (अ‍ॅन्डीज पर्वत रांगां मधील विमान अपघातामुळे ७२ दिवस जीवंत राहण्यासाठी त्यांच्याच सहकार्‍यांचे मृतदेह खाण्याशिवाय पर्याय त्यांच्याकडे नव्हता). पण कदाचित मांसाहार कधीच न खाल्ल्याने माझ्या मानसिक आणि शारीरिक दोन्ही संस्थांना त्याची सवय नसल्याने त्या मांसाहार नाकारतात हा माझा अनुभव आहे.

    ReplyDelete
  8. खरंय जयंतराव, तुम्ही तर माझ्यापेक्षा बरेच मोठे दिसताय वयाने त्यामुळे तुम्हाला इतक्या वर्षांनंतर भुकेच्या गोळीचा झालेला साक्षात्कार मी समजु शकते. पण बरीच वर्षं झाली माझ्या मनात येतं की त्या बॅक टू द फ्युचर पार्ट थ्री सारख्या कॉम्पॅक्ट जेवण असतं तर. म्हणजे एका माणसाला पुरेल इतकी भाताची, वरणाची, विविध भाज्यांच्या वेग्वेगळ्या कॅप्सुल्स. त्या उघडल्या की गरमा गरम अन्न तयार. नुसत्या गोळ्याच घेतल्या तर आपली पचन शक्ती चालायची नाही. म्हणून हा सुचलेला स्वप्नवत उपाय. :-) पण तुमची भुकेच्या गोळीची कल्पना पण भारी आहे.

    ReplyDelete
  9. मी वयाने मोठा आहे आणि बहुतेक काळ कल्पनाविश्वातच
    राहिलो आहे.कदाचित त्यामुळे वास्तवातल्या रुटीनला
    shortcut द्यावासा वाटतो.आता जेवण हे celebration
    क्वचित वाटते.जेवताना कंपनी मात्र इंटरेस्टिंग हवी.

    ReplyDelete
  10. इथं हिंदुस्थानात लोक कुत्रा सुद्धा खातात...
    http://en.wikipedia.org/wiki/Dog_meat#India

    यकदा यक हिंग्रजी पीच्चर पायला व्हता...लयं वंगाळ बघा...म्हणजी माणसचं माणसांनी खात्यात... ते बी येगयेगळ्या हत्यारान मारुन कापुनशान...अगदी यक यक ब्वोट तोडुन पण खात्यात.
    ते बघुनशान आपली तर बोबडीच वळली ना च्यामारी !!!
    मायला त्याच्या ज्यानी क्वोनी त्यो पिच्चर बनिवला हाशील... ;)

    बाबांनो ज्याला खायचे त्यांनी खा, ज्यांना नाही खायचे त्याने खाउ नये...शिंपल !!! ;)

    ReplyDelete
  11. अरे मदनबाणा, आपल्याकडे नागालॅन्ड मध्ये कुत्रा खातात. डीमापूर मध्ये डॉगमार्केट असतात. मधे काही वर्षांपूर्वी पुण्यात गंमत झाली होती. नागालॅन्ड मधील काही विद्यार्थी लॉ कॉलेज रोड ला रहात होते. कदाचित सिंबायोसिस, लॉ कॉलेज किंवा पुणे युनीव्हर्सीटी मध्ये शिकत असतील. काही महीन्यांनी त्या भागातील बंगलेवाल्यांची कुत्री रात्रीतून गायब व्हायला लागली. पोलीसात तक्रार नोंदवुन पण काही उपयोग होत नव्हता. म्हणजे कुत्र्यांचे मृतदेह सुध्दा सापडत नव्हते. मग या प्रकरणाचा शोध लागला आणि काही नागा विद्यार्थ्यांना पकडले.
    अरूणाचल प्रदेशातील काही भागांत लोक जळवांचं लोणचं करून खातात. जळवा पकडण्यासाठी त्यांच्या गुरांना चरण्यासाठी म्हणून घनदाट जंगलात सोडतात. संध्याकाळी गुरं परत आल्यावर त्यांच्या अंगाला जळवा चिकटलेल्या असतात. गुरांचं रक्त पिऊन चांगल्याच टमटमीत फुगलेल्या त्या जळवा मीठ टाकून काढतात. आणि मग त्यांचं लोणचं करतात. बस्तर भागातील आदीवासी भागात मुंग्यांची चटणी करून खातात.

    ReplyDelete
  12. शाकाहार हा तर सगळ्यात बेस्ट परंतु प्रत्येकाची आवड निवड असते त्याला पर्याय नसतो. डीसकव्हरी वर काही वेळेस मांसाहारी पदार्थाची रेसीपी शो पाहताना डोळे मिटुन घ्यावेसे वाटतात,

    असो प्रत्येकाला त्याचा त्याचा चोईस असतो. लेख छान आहे.

    ReplyDelete
  13. धन्यवाद श्री सुधीर केसकर.
    शतपावलीवर स्वागत.

    ReplyDelete
  14. मी जन्मापासूनच शाकाहारी आहे ती आजतागायत. मांसाहारी असलेले लोक म्हणतील ज्याची कधी आयुष्यात चव चाखली नाही त्याच्या चवदारपणाची कल्पना हिला काय असणार? मान्य. पण मला कधी अंडं सुध्दा खावंसं वाटलं नाही. कोणाचंही मांस खाणं ही कल्पना सुध्दा नको वाटते. मग भले दिसायला ती पाककृती कितीही चवदार दिसली तरीही. घरचे सगळे, नातेवाईक कोणीच मांसाहारी नसल्याने मला कधी त्यावर विचार करायची सुध्दा संधी मिळाली नव्हती - same copy paste for me as well :-) so true for me as well - chan aahe blog - aavadala

    ReplyDelete
  15. धन्यवाद शिवा,
    शतपावलीवर स्वागत.

    ReplyDelete
  16. some people say eating vegetables is not shakahari baecuse vegetales are also living beings . how do you define shakahar ?
    suresh deodhar

    ReplyDelete
  17. सुरेश,
    शतपावलीवर स्वागत. शाकाहार हा एक संस्कृत शब्द आहे. त्याची फोड अशी: शाकाहार = शाक + आहार; शाक म्हणजे संस्कृत मध्ये भाज्या, वनस्पती. त्यामुळे शाकाहार म्हणजेच भाज्या किंवा वनस्पती जन्य पदार्थ खाणे.
    तुम्ही माझे शाकाहार पुराण भाग २ http://shatapavali.blogspot.com/2010/06/blog-post_5823.html वाचलात तर त्यात तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे.

    ReplyDelete