Wednesday, 2 June 2010

प्रत्यक्ष मृत्युशी सामना - एक अविस्मरणीय आठवण! लहानपणी शाळेत असताना निंबंध लेखनासाठी हमखास विषय असायचा "माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय आठवण" वगैरे. त्यावेळची गंमत अशी की तो पर्यंत माझ्या आयुष्यात अविस्मरणीय असा एकही प्रसंग घडलाच नव्हता. त्यामुळे तो विषय मी नेहमीच  टाळत असे. जर खरा अविस्मरणीय प्रसंग नसेलच तर काय बोडक्याचं लीहीणार?  पण पुढे एम एस्सी झाल्यावर तसा एक प्रसंग घडलाच.
काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एम एस्सी झाल्यावर लगेच नाशिक जिल्ह्यातील वनवासी भागात वनवासी कल्याण आश्रमाच्या कामाच्या निमित्ताने मी राहीले होते. त्याच सुमारास एका बैठकी साठी म्हणून गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील सुरगाणा तालुक्याच्या एका अति दुर्गम भागात जाण्याचा योग आला. बैठक होती सुरगाणा या तालुक्याच्या गावी होती. बैठक आटोपली की तिथुनच पुढे गुही ह्या केंद्रावर जाण्याचं अचानकच ठरलं. गुही हे ठिकाण अश्या जागी आहे की जिथे नाशिकहून दुपारी बारा वाजता दिवसातून फक्त एकच बर्डीपाडा ही बस जाते  आणि ती गुही ला पोहोचायला साधारणपणे संध्याकाळचे सात वाजतात. तिथून नाशिकला परत येण्यासाठी साधारणपणे सकाळी साडेसातला एकच बस असते.
२७ जून १९९६ ची गोष्ट आहे. बैठक संपून सुरगाण्याला बस पकडे  पर्यंतच दुपारचे दोन वाजले. थोडा थोडा पाऊस पडणं चालूच होतं. संध्याकाळी सहा च्या सुमारास बस गुही पासून साधारणपणे ३ किमी वरच थांबली. कारण पावसाने पुढचा रस्ता वाहून गेला होता आणि रस्त्याच्या जागी पाण्याचा प्रचंड लोंढा वहात होता. गाडी जाणं शक्य नसल्याने आम्हाला तिथंच उतरून पुढे तीन किमी चालत जावं लागलं. संध्याकाळची वेळ असल्याने आणि गर्द दाट जंगल असल्याने थोडी भितीच वाटत होती. पण गप्पा मारत मारत आम्ही ३-४ जण गुहीला अंधार पडे पर्यंत पोहोचून गेलो. त्यारात्री तिथे प्रचंड जोराचा पाऊस पडला. आमचा गुहीला येण्याचा कार्यक्रम अचानक ठरल्याने बरोबर तसे कपडे वगैरे पण आणले नव्हते. माझ्याकडे फक्त एक छोटी पर्स आणि रेनकोट येव्हढंच काय ते सामान होतं. रात्रीचा पावसाचा जोर पाहून तिथल्या लोकांनी सांगीतलं की आता इकडे बस येणारच नाही. तेव्हा इथेच रहा. नाहीतर परत जाण्यासाठी गुही पासून बारा किमी अंतरावर उंबरठाण या ठिकाणाहून बस पकडावी लागेल. ती सुध्दा सुरगाण्या पर्यंत. सुरगाण्यापासून बस मिळायला अडचण नव्हती. आम्ही उंबरठाण पर्यंत १२ किमी चालत जायचं ठरवलं.
त्यामुळे सकाळी सकाळी आठ वाजता मी आणि माझ्या बरोबर १७ वर्षांचा वनवासी मुलगा बाळू असे आम्ही उंबरठाण साठी निघालो. आकाश एकदम निरभ्र आणि हिरवाईतून डोकावणार्‍या सुंदर सोनेरी किरणांचा लपंडाव अश्या सुंदर वातावरणात आम्ही त्या घनदाट जंगलातून आमचा परतीचा प्रवास चालू केला. वातावरण खूपच अल्हाद दायक असल्याने आम्ही रमत गमत जंगलातील नागमोडी रस्त्याने चाललो होतो. बाळू जंगलातल्या मस्त गंमती-जमती सांगत होता. जंगलातून चालण्याचा अनुभव किती सुरेख असतो, तिथल्या वनस्पती, विविध पक्षी...त्यांचे मंजुळ स्वर, नागमोडी ओहळ , प्रचंड उंच आणि घनदाट झाडी यांचं सौंदर्य या सगळ्याचा आस्वाद न घेता रूक्षपणे किंवा अतिशय नेहमीचा रस्ता असल्यासारखं भासवुन चालणं मला तरी शक्य नव्हतं. आमच्या रमत गमत चालण्याने आम्हाला चांगलाच उशीर झाला. म्हणजे उंबरठाणला आम्ही ११ वाजेपर्यंत पोहोचायचं असा बेत होता तरी साडे अकरा वाजले तरी आम्ही उंबरठाणच्या आसपास पण पोहोचलो नव्हतो. साधारणत: पावणे बाराच्या आसपास आम्ही एका खिंड सदृष्य जागी येवून पोहोचलो. बाळू आधीच गंमतीने म्हणाला, "ताई इथे जंगलात भर दुपारी बाराच्या सुमाराला बिबटे दिसतात". मी पण गंमतीने म्हणाले, "मग येवू देत की आपण काय घाबरतो का काय?" बाळूने सांगीतलं की उंबरठाण आता फक्त ३ किमी अंतरावर आहे. आम्ही जवळ जवळ ९ किमी अंतर गप्पा मारत मारत चाललो होतो. शहरातील असल्याने मला चालायची सवयच नव्ही. त्यामुळे हे ९ किमी मला खूपच वाटले. थोडा वेळ बसण्यासाठी म्हणून आम्ही खिंडीतल्या एका मोठ्या शीळेची निवड केली. आणि त्यावर एकमेकां समोर तोंडं करून बसलो. साधारण बारा वाजलेच होते. आम्ही अश्याच गप्पा मारत त्या खिंडीचं निरीक्षण करत बसलो. खिंड साधारण पणे ३००-४०० मीटर लांब असेल आणि खिंडीच्या उंबरठाण कडच्या दिशेच्या टोकाला एक दरी होती आणि दरीच्या समोरच मोठा डोंगर आवासून उभा होता. त्या दरी आणि डोंगर यांच्या मधुनच उंबरठाण कडे जाणारा रस्ता पुढे जात होता. मी गुही च्या दिशेला म्हणजे आम्ही ज्या दिशेने आलो त्या दिशेला तोंड करून तर बाळू उंबरठाणच्या रस्त्याच्या म्हणजेच दरी-डोंगराच्या मधुन जाणर्‍या रस्त्याच्या दिशेला तोंड करून असे बसलो.
अचानक बाळू मला म्हणातो, "ताई, तुमच्या मागे बघा". मी पण सहज मान वळवली आणि बघते तो काय एक बिबट्या त्या दरीतून सावकाश पण दमदार पावलं टाकत रस्त्यावर येत होता. माझ्या आयुष्यात पहील्यांदाच मी असलं जंगली जनावर प्रत्यक्ष (म्हणजे पिंजर्‍यात नसलेलं....पूर्णपणे मोकळं) पहात होते. बिबळ्या दृष्टीस पडताच माझ्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली आणि मी शीळेवरून मोठी उडी मारून रस्त्यावर उभी राहीले. हे सगळं माझी बिबळ्या पाहील्यावरची प्रतिक्षीप्त क्रीया घडल्या सारखं घडलं. बाळूने मला लगेच बजावलं," ताई ओरडू नका आणि आजीबात हालचाल करू नका". बाळूचे शब्द नुसतेच माझ्या कानावर आदळत होते. माझं सगळं लक्ष बिबट्याकडेच होतं आणि मी स्तब्द झाले. निवांतपणे दरी चढणारा बीबळ्या माझ्या किंचाळण्याच्या आवाजाने रस्त्याच्या मध्येच थांबून आमच्याकडे पहायला लागला. तो आमच्या कडे पहात होता आणि आम्ही तो काय करतोय याची वाट बघत त्याच्या कडे पहात होतो. आमच्या कडे बाळू कडच्या एका छत्री शिवाय आणि माझ्या रेनकोट शिवाय दुसरं काहीच नव्हतं. प्रतिकार करायचा तरी तो करण्यासाठी काहीच नव्हतं. बरं पळून जायचं तर तो आमच्या मागे पळत येवून दोन मिनीटात आमचा फडशा पाडला असता. त्या दोन मिनीटात माझ्या मनाची निर्वीचार अवस्था झाली होती. तो काय करतोय या कडेच आमचं लक्ष होतं. दोन मिनीटं आमचा अंदाज घेतल्यावर बिबळ्याच्या बहुधा लक्षात आलं की त्याला आमच्यापासून काहीच धोका नाहीये. म्हणून त्याने त्याची डोंगराची वाट धरली आणि तो डोंगरात दिसेनासा झाला.
बिबळ्या तर निघून गेला. आम्हाला काही क्षण हायसं वाटलं. मग लक्षात आलं, की त्याने तर आपल्याला पाहीलं आहे मग आपण उंबरठाण कडे चालायला लागल्यावर डोंगरावरून बिबळ्याने आपल्या अंगावर उडी घेतली तर? बिबळ्या समोर असताना जेव्हढी भीती वाटली नाही तेव्हढी तो गेल्यावर वाटायला लागली. बिबळ्या समोर असताना निदान माझ्यात तरी कुठुन बळ आलं होतं त्याच्या कडे पहात राहण्याचं हे मला आजतागायत न उलगडलेलं कोडं आहे. कदाचित आता आपण वाचणार नाही ही ९९% खात्री असल्याने शेवटंचं आपल्या मृत्युला डोळेभरून पाहूया असं वाटून आणि मग ती मनाची निर्वीचार अवस्था यांमुळे समजलंच नाही. पुन्हा गुहीच्या दिशेने उलट जायचं तर ९ किमी ची पायपीट होती. शेवटी आम्ही दोघांनीही ठरवलं जर आपलं मरण बिबळ्याकडून तेही इथेच लिहीलेलं असेल तर ब्रह्मदेव सुध्दा आपल्याला वाचवु शकणार नाही. आणि हेच जर आपलं मरण आत्ता नसेलच तर काही झालं तरी ते बदलणार नाही. मनाचा हिय्या करून आम्ही उंबरठाणच्या दिशेने चालायला सुरूवात केली. साधारण १ किमी अंतर चालून गेल्यावर आम्हाला डोंगराच्या कपारीत एक गुहा दिसली. कदाचित ती गुहा त्या बिबळ्याचीच असावी असा अंदाज बांधून आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. बाळू कडुन त्यावेळी समजले की बिबळे किंवा वाघ जर भुकेले असतील किंवा त्यांना त्यांच्या जीवाला धोका आहे असे वाटले तरच आपल्यावर हल्ला करतात. किंवा मादी बिबळ्या, वाघीण असेल तर पील्लांसाठी म्हणून भूक नसताना आणि त्यांच्या जीवाला धोका नसला तरी आपल्यावर प्राणघातक हल्ला करतात. उंबरठाणमध्ये आल्यावर आम्हाला असं समजलं की त्याच खिंडीत एक महीन्यापूर्वी एका माणसाला बिबळ्याने फाडला होता. तो माणूस जखमी अवस्थेत हॉस्पीटल मध्ये दाखल होता. अजुनही बर्‍याच खर्‍या खोट्या कथा उंबरठाण मधील गावकर्‍यां कडून ऐकायला मिळाल्या.
तिथुनच सुरगाणा आणि सुरगाण्याहून कळवण अश्या गाड्या पकडुन आम्ही कनाशीला सुखरूप पोहोचलो. उंबरठाण ते कनाशी या प्रवासात आम्ही एकमेकांशी एकही शब्द बोललो नाही. त्या बिबळ्या भेटीने मला तरी खूपच आंतर्मुख केलं होतं. त्याच बरोबर जर बिबळ्याने हल्ला केला असता तर काय झालं असतं हा विचार मनात घर करून बसला होता. कनाशीला आल्यावर रात्री मला प्रचंड थंडी वाजून ताप भरला......हे सगळं "बिबळ्याने हल्ला केला असता तर....." च्या भीतीचा परिणाम होता. त्या रात्री मी अंगावर ६ कांबळी घेवून आणि ३ ब्रुफेन्च्या गोळ्या घेवून झोपले ती डायरेक्ट दुसर्‍या दिवशी रात्रीच उठले. मी त्यावेळी अत्यंत बारीक असल्याने माझे वडील अजुनही गंमतीने म्हणतात की बिबळ्याने विचार केला ह्या वाळकुडीला खाऊन मला हाडंच चघळायला मिळतील. मग काय उपयोग? म्हणून त्याने आमच्यावर हल्ला केला नाही.  :-)

मला वाटलेल्या भीतीचा भाग सोडता त्या प्रसंगाने मला आयुष्याच्या क्षणभंगुरतेची साक्षच पटवुन दिली. त्यामुळे आयुष्याकडे अधिक गांभिर्याने पहाण्याचा आणि ते अधिकाधिक समृध्द कसं करता येईल याचा नवा दृष्टीकोन मिळाला.

13 comments:

 1. एकदम थरारक अलताई,
  कधीच न विसरता येण्याजोगा, मनावर पर्मनंट मार्करनी लिहिला गेलेला प्रसंग असणार हा. खरंच मृत्यूशी जवळूनची भेट बर्‍याच माणसांचा आयुष्याविषयीचा दृष्टीकोन बदलून टाकते.

  ReplyDelete
 2. अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद,
  - जयंत.

  ReplyDelete
 3. मस्त कथन केलाय अनुभव.

  ReplyDelete
 4. छान अनुभव आहे. खरच थरारक.

  ReplyDelete
 5. खर सांगू तुम्ही नशीबवान आहात. असे अनुभव सगळ्यांच्या वाटेला येत नाहीत. आमच काय तेच तेच रोजच रटाळ जगण. आमच्याकडे तर अनुभव सुद्धा नाहीत काही सांगण्यासारखे.

  ReplyDelete
 6. अतिशय थरारक अनुभव.. माझ्याने तर कल्पनाच करवत नाही..

  ReplyDelete
 7. जिवनिका, हे मात्रं अगदी खरं आहे. माझं आयुष्य वेगवेगळ्या विविधतेने नटलेल्या अनुभावांनी समृध्द आहे म्हणून ते बोअरींग वाटत नाही. काही अंशी हे सगळे अनुभव मळलेली पायवाट न स्विकारल्यामुळे आहे. सतत नविन काही करणे आणि शिकणे तसेच धाडसी निर्णय घेवून त्यात झोकून देणे या प्रवृतीं मुळे असे वेगळे अनुभव येण्यास कारणीभूत आहेत. केवळ नशीबावर नाही अवलंबुन. काही प्रमाणात आपण घेतलेले निर्णय आपलं नशीब घडवत असतात. :-)

  ReplyDelete
 8. अतिशय थरारक अनुभव..

  ReplyDelete
 9. hi Aparna,
  ha anubhav tu aamhaalaa kadheetari saangitalaa asasheel pan ithe vachataanaa khoop thararak vaatalaa. Blogkarataa shubhechha.
  shashank

  ReplyDelete
 10. धन्यवाद शशांक,
  आणि ब्लॉगवर स्वागत. आपल्या घरच्यांपैकी तुम्ही पहीलेच असाल माझा ब्लॉग वाचणारे. म्हणजे अश्वमित्र वगळून कारण तो पूर्ण वाचत नसला तरी प्रत्येक लेख पहात असतो. :-)

  ReplyDelete
 11. भयानक ग एकदम..
  मला कल्पनाच करवत नाही तुझी काय अवस्था झाली असेल त्याच्या नजरेला नजर देताना...

  ReplyDelete
 12. This comment has been removed by a blog administrator.

  ReplyDelete
 13. सूरगाणा भागात घडलेली घटना आहे हे वाचून थोडी भीती पण वाटली मी पण त्या भागात बराच वेळा गेलेलो आहे.अनूभव छान

  ReplyDelete