Thursday 14 June 2012

आयुष्याचा जोडीदार निवडणे: भारतीय आणि पाश्चिमात्य पद्धतीं मधील फरक!!



भारतीय आणि पाश्चात्य पद्धतींमधील फरक या विषयावर भरपूर चर्चा-चर्वीचराण झालेले आहे. तरी प्रत्येकाचा अनुभव वेगळा आणि त्यानुसार विविध मुद्द्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही वेगळा असतो. म्हणूनच माझं लग्नं झाल्यापासून भारतीय आणि पाश्चिमात्य पद्धती, चालीरीती यांचा अतिशय जवळून अनुभव घेतल्याने विविध विषयांवर मन आपोआपच तुलना करत रहातं. दोघांमधील कोणत्या गोष्टी चांगल्या-सोयीच्या आणि कोणत्या गोष्टी गैरसोयीच्या याचा मनोमन उहापोह चालू असतो. लग्न जमवणे हा सगळीकडेच अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. दोन्ही देशांतील सांस्कृतिक फरकाला इथुनच अधिक सुरूवात होते. 

भारतीय पद्धतीत अजुनही अधिकांश विवाह हे ठरवुन-पाहून कांदेपोहे खाऊन होतात. तरी सध्या प्रेमविवाह, परिचयोत्तर विवाह यांचे प्रमाणही आधीच्या तुलनेत आढळते. क्वचित कुठेतरी लिव्ह-इन-रिलेशनचे झेंडे पहायला मिळतात. म्हणजे भारतीय पद्धतीत सर्वप्रकारच्या व्यक्तींना आयुष्याचा जोडीदार मिळवून देण्याची सोय आहे. आता काहीजण असतात की जे स्वखुशीने वेगळा मार्ग स्विकारतात....म्हणजे अविवाहीत राहण्याचा निर्णय घेतात. भारतीय पद्धतीमधे अशी खूप कमी लोकं सापडतील की इतक्या सार्‍या पद्धती उपल्ब्ध असूनही त्यांना आयुष्याचा जोडीदार मिळत नाही. सर्वसाधारण भारतीय जनमानसात अजुनही कुटुंब पद्धती, त्याअनुषंगाने येणार्‍या जबाबदार्‍या यांचं महत्त्व कुठेतरी आहे. कदाचित काही केसेस मधे समाजाच्या भितीने किंवा एकटं राहण्याच्या भितीने, महिलांच्या बाबतीत मुख्यत: नवर्‍यावर सर्वदृष्टिंनी अवलंबून असणे, मुलांकडे पाहून लग्नं निभावणे या आणि अशा अनेक कारणांनी लोकांचे विवाह टिकून राहण्याचं प्रमाण अजुनही अधिक आहे. मग भले जोडीदाराचा कोंडमारा होत असला तरी निमूटपणे किंवा तणतणत तो स्विकारला जातो.

पाश्चात्य पद्धतीमधे ठरवून विवाह करणे हे अनेक वर्षांपूर्वी होतं पण आता त्याचा कुठेही मागमूस नाही. एकतर प्रेम विवाह, लिव्ह-इन-रिलेशन किंवा एकटं रहाणं हे तीनच पर्याय जोडीदार निवडीच्या बाबतीत उपल्ब्ध असलेले दिसतात. तसं अधिकाधिक घटस्फोट, पुर्नविवाह, कुमारी माता किंवा सिंगल पेरेंट अशा केसेस अधिकाधिक दिसतात. प्रत्येक पद्धतीचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेतच. पाश्चात्य पद्धतीमधे कुठेही जोर-जबरदस्ती नाही. सगळं अगदी तुमच्या मनाला जे पटेल तेच करणं आणि जोडीदार नाही पटला तर अतिशय सहजगत्या तो बदलता येणे हा एक फार मोठा फायदा या पद्धतीत आहे. पण जर एखादी व्यक्ती आकर्षक नसेल, बुजरी असेल तर त्या व्यक्तीला जोडीदार मिळणे केवळ अशक्य असते. अशांचे प्रमाणही पाश्चिमात्य देशांत भरपूर आहे. एकीकडे जोडीदार बदलणं खूपच सहजगत्या स्विकारलं जातं की त्यामुळे लोकांमधे पेशन्स, एखादं नातं टिकवण्यासाठी आवश्यक गोष्टी प्रसंगी तडजोड, जोडीदाराला समजून घेण्याची प्रक्रिया, त्यादृष्टिने स्वत:मधील समज वाढवणं ह्या सगळ्या गोष्टींना काट मिळते. लोक इतके पटापट घटस्फोट घ्यायला लागले म्हणून मग पाश्चात्य देशांत कायद्यानेच घटस्फोटाची प्रक्रिया किचकट करून ठेवली. घटस्फोट झाल्यावर द्याव्या लागणार्‍या पोटगीचं/फाईनचं प्रमाण अगदी ५०% संपत्ती इतकं सुद्धा असू शकतं, म्हणूनच की काय आता अधिकाधिक लोक लिव्ह-इन-रिलेशन कडे वळतात. म्हणजे घटस्फोटाचा प्रश्न नाही आणि पोटगीचाही नाही.

यामुळे कुटुंब व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. कुटुंबाशिवाय वाढलेल्या मुला-मुलींमधे असुरक्षितता, डीप्रेशन, अशा गोष्टींचं प्रमाण अधिक आढळतं. पाश्चात्य देशांतील कॅनडा सारख्या देशांचे सरासरी वय ५५-६० आहे. म्हणजे अजुन काही वर्षांनी कॅनडा मधे फारच कमी लोकसंख्या असेल आणि त्यातील तरूणांचे प्रमाण खूपच कमी असेल. कारण कुटुंबव्यवस्थेचा बोर्‍या उडाल्याने नविन मूलं जन्माला येण्याचं प्रमाणही अत्यल्प आहे. याचा विपरीत परिणाम देशातील एकूणच क्रयशक्ती, उपल्ब्ध मनुष्यबळ यांची कमतरता डायरेक्ट देशातील जॉब्झ आणि उत्पादनक्षमता यावर होतो. याउलट सध्यातरी भारत-चीन यांसारख्या देशांचे सरासरी वय २४-२७ आहे. म्हणजेच हे देश तारूण्यात आहेत. त्यांच्याकडे क्रयशक्ती वाढवीण्यास मनुष्यबळ उपल्ब्ध आहे. गेल्या काही वर्षांत कॅनडा सारख्या देशात चीन, जपान, तैवान, कोरीया, इराण, बांग्लादेश, पाकीस्तान, भारत, श्रीलंका यांसारख्या देशांतील लोकांचं प्रमाण वाढलं आहे. अगदी न्यु-लिस्कर्ड सारख्या टुंड्रा प्रदेशापासून फक्त २५० किमी दूर असलेल्या छोट्या शहरात सबवे स्टोअर, दोन पेट्रोल पंप आणि एक सिनेमा थिएटर यांची मालकी एका भारतीय मूळाच्या पंजाबी कुटुंबाकडे आहे.

इथे कोणी कुठे स्थलांतर करावं हा मुद्दा नाही पण लग्न पद्धतींचे काय काय दूरगामी परिणाम होऊ शकतात याचा उहापोह चालू आहे. भारतामधे अजुनही कौटुंबिक हिंसा हा प्रकार भरपूर प्रमाणात आहे. मारून मुटकुन अनेकींना एखाद्या मारकुट्या नवर्‍या बरोबर रहावं लागतं. हे भारतीय लग्न जमवण्याच्या पद्धतीचे तोटे झाले.
इथे एक पद्धत चांगली आणि दुसरी वाईट असा कोणताच निष्कर्ष काढायचा नाहीये. तरी सुद्धा जर दोन्ही मधील अधिक सोयीच्या आणि चांगल्या गोष्टींचा सुवर्णमध्य काढला तर मला असं वाटतं की दोन्ही संस्कृतींचा फायदा होईल. पण असं होणं खूपच अवघड आहे. तरी जेव्हा मी पाश्चात्य जगतातील मनमोकळं वातावरण पहाते पण त्याचबरोबर अनेक जोडीदारा शिवाय जगत असलेली लोकं पहाते तेव्हा थोडं वाईट वाटतं. असं वाटतं की जर यांच्याकडे सुद्धा अशा लोकांसाठी पाहून, ठरवून, बोलणीकरून जोडीदार निवडता आला असता तर किती बरं झालं असतं!

4 comments:

  1. एखाद्या मुलाला कधी कोण्या मुलीनं पसंतच केलं नाही किंवा उलट असं काही झालं तर ? :P इकडे मायबाप, नातेवाईकांची फ़ौज आमचे हात पिवळे करवून द्यायला नेहमीच हजर असते बुवा ! :)

    "चांगल्या गोष्टींचा सुवर्णमध्य काढला तर मला असं वाटतं की दोन्ही संस्कृतींचा फायदा होईल " पटेश !!

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्याकडे असतात ना तशा केसेस की एखाद्या मुलाला मुली पसंत पडत नाहीत किंवा एखाद्या मुलीला कोणताच मुलगा पसंत करत नाही म्हणून लग्न व्हायचं राहून जातं. या दोन केसेस च्या विरूद्ध फारच कमी आढळतं म्हणजे मुलाला कोणत्याच मुलीने नापसंत करणं आणि मुलीने कोणत्याच मुलाला पसंती न दर्शवणं. आपल्याकडे मुलाचं खातंपितं घर बघून किंवा मुलीचा रंग-रूप बघून (गुण नसले तरी) लग्न जमतात.......म्हणजे तसे चान्सेस असतात. पण पाश्चिमात्य देशांत तसं नसतंच. बरं आपल्याकडे बिन लग्नाची मुलं-मुली आपापल्य कुटुंबातच (म्हणजे आई-वडिलांबरोबर किंवा भाऊ-भावजयी बरोबर) राहताना दिसतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात तितका एकटेपणा नसतो. पण तिथे तसंही नसतं. त्यामुळे येणारं एकटेपण हे महाभयंकर असतं. असं आपलं माझं मत.

      Delete
  2. समतोल लेख झाला आहे.
    सर्व वाईट व चांगल्या मुद्यांच्या उहापोह येथे करण्यात आला आहे.
    प्रत्येक देशातील समाज व्यवस्थेत काही चांगले तर काही वाईट गुण , दोष असतात.

    ReplyDelete
    Replies
    1. निनाद, आपण सुद्धा माझ्यासारखे निरीक्षण आणि तुलना करत असाल. आपला ब्लॉग वाचला. :-)

      Delete