Monday, 11 June 2012

पॅन केक रेसीपी!!

पॅन केक्स बद्धल मी नुसतेच ऐकले होते. फारफारतर एखाद्या हॉलीवुडपटात ओझरते पाहीले असतील. पण इथे सासरी आल्यावर असं समजलं की पॅन केक्स हा पदार्थ साधारणत: आपल्याकडील पोहे, उपमा, थालीपीठाच्या धर्तीवर अतिशय मुख्य आणि प्रसिद्ध पदार्थ आहे. पहिल्यांदा आले तेव्हा कमी वेळ असल्याने पॅन केक्स शिकण्याचा योग आला नव्हता पण ह्यावेळी मी ठरवलं होतं की शक्य झाल्यास पॅन केक्स शिकायचे. सासर्‍यांना सांगीतल्यावर ते पॅन केक शिकवायला एका पायावर तयार झाले. उत्साहाने पॅन केक्सचे तयार पीठही आणले. आपल्याकडे गिट्स, एम टी आर या ब्रॅंड्सची जशी विविध पदार्थांची तयार पिठे मिळतात तशीच इथे पॅनकेक्सची तयार पीठे मिळतात. दूध पावडर मिक्स केलेलं आणि न केलेलं अशी दोन प्रकारची पीठे मिळतात. आम्ही दूध नसलेलं पीठ आणलं. हे पीठ घरी सुद्धा तयार करता येतं. गव्हाच्या पीठात चवीनुसार मीठ, साखर, थोडंसं यीस्ट असे जिन्नस टाकून कोरडं पीठ तयार करता येतं. प्रत्येकाच्या आवडीनुसार अंड, दूध वगैरे गोष्टी नंतर टाकता येतात.
आम्ही फक्त पाणी टाकून कोरड्या पीठाचं ओलं पीठ तयार करून घेतलं. पीठात गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घेतली. ओलं पीठ अधिक सारखं होण्यासाठी हलक्या हाताने फेटून घेतलं तरी चालतं. पॅन केक्स बनवण्यासाठी शक्यतो सगळीकडून सारखी उष्णता लागेल असे भांडे असावे. पॅन केक्स तयार करण्यासाठी विजेवर चालणारा स्वतंत्र पॅनही मिळतो. पॅन केक्सचा पॅन साधारण २५० ते २७० तापमानावर ठेवावा.
पॅनवर थोडेसे ऑलिव्ह तेल टाकावे म्हणजे केक्स बनवण्यासाठी टाकलेले ओले पीठ पॅनला चिकटून बसत नाही. आपल्याकडे ऑलिव्ह तेल नसेल तर आपल्या नेहमीच्या वापरातील तेल टाकलं तरी चालेल. हळूहळू तापलेल्या पॅनवर ओले पीठ अशा अंदाजाने टाकावे की त्याचे ११ मिमी जाडीचे गोल आकार तयार होतील. असे साधारण चार केक्स टाकावेत. दोन मिनीटांत त्या गोलाकार चकत्यांवर भोकं दिसायला लागली की केक्स उलटावेत.
दोन्ही बाजूंनी साधारण गुलाबीसर झालेले केक्स एकेक करून एखाद्या डिश मधे काढून घ्यावेत. लोक आपापल्या आवडीप्रमाणे त्यावर विविधप्रकारची टॉपींग्ज टाकतात. कॅनडात मुख्यत: मेपल सिरप, मध आणि त्यांवर ब्लॅक बेरी, रेड बेरी, चेरी यांसारखी फळे टाकण्याची पद्धत आहे. 
सोबतच्या चित्रातील ब्लू बेरी असलेले पॅनकेक्स अधिक जाडीचे आहेत कारण त्यात अंड आणि दूध हे दोनही जिन्नस घातलेले आहेत की ज्यामुळे केक्स अजुन फुलतात.  काहीजण स्पायसी पॅनकेक्स सुद्धा बनवतात. ही माझी पहिलीच वेळ असल्याने अतिशय साधे पॅनकेक्स बनवले होते. या पॅन केक्सवर सर्वप्रथम थोडं बटर लावून घेतलं आणि मग त्यावर मेपल सिरप टाकलं.  आहाहा.............काय सुंदर चव लागली म्हणून सांगू.


8 comments:

 1. आई गं... लई भारी !!!

  तोंडाला पाणी सुटले :) :)

  ReplyDelete
  Replies
  1. सुझे वाट कसली पाहतोस.....अतिशय सोप्पी रेसीपी आहे.

   Delete
 2. आई शप्पथ !!! मी करुन बघेन आता.

  ReplyDelete
  Replies
  1. माउताई, एकदम सोप्पी......तुमच्यासारख्या कुकींग एक्सपर्टस ना तर किस झाड की पत्ती!

   Delete
 3. हत्तेरेकी, पॅन केक्स म्हणजे आपली घावनं च की!!!

  ReplyDelete
  Replies
  1. श्रेता, पॅन केक्स म्हणजे घावन नाही. कारण घावनाला पीठ तुलनेनं पातळ लागतं आणि इथे थोडं जाड. घावन डोशासारखं पातळ असतं तर पॅन केक्स जाड असतात. कर्नाटकात सेट डोसा म्हणून एक प्रकार मिळतो. पॅन केक्स हे सेट डोशासारखेच असतात. फक्त डोशाच्या पीठात उडीदडाळ पीठ, तांदूळ पीठी वगैरे एकत्र करून फर्मेंट केलेलं असतं. ज्याप्रमाणे घावनासाठी आपण फर्मेंटेड पीठ घेत नाही अगदी तसंच पॅन केक्सचं पीठ फर्मेंटेड नसतं.

   Delete
 4. ह्यावेळेस मात्र मी पॅनकेक खाणार...

  ReplyDelete
  Replies
  1. अरे हो ना खूप सोप्पी रेसीपी आहे.

   Delete