Tuesday 12 June 2012

भेट एका संगीतकाराची!

माझी संगीतातील रूची पाहून आयलीन (जी मला ऑटो-हार्प शिकवते आहे) आम्हाला कोबाल्ट मधे राहणार्‍या स्टीव्ह स्मीथ या संगीतकार व्यक्तीकडे घेऊन गेली.

त्याचं विशेष म्हणजे तो अधिकाधिक तंतुवाद्ये (सतार सुद्धा), ताल वाद्ये वाजवू शकतो तसेच इलेक्ट्रॉनीक्स फॉर्म मधील सर्वप्रकारचे संगीत तयार करतो. स्टीव्ह स्मीथ हा मुळात व्यापारी माणूस. जगाच्या विविध भागांत भटकंती तिथली संस्कृती (संगीत, कपडे, तत्त्वज्ञान) कॅनडात आणून विकणारा व्यापारी. या भटकंतीतच त्याला उत्खननाचे वेड लागले. बाली द्वीप, कॅनडा, अमेरिका, तिबेट, तैवान, कोरीया, चीन यांसारख्या देशांतून उत्खनन करून मिळालेल्या विविध प्रकारच्या खडकांना तासून स्टोन्स बनवून त्याचे दागिने विक्री करणे, त्या खडकांमधून विविध आकार तयार करून शोभेच्या वस्तू म्हणून विक्री करणे, या देशांतील आणलेले कपडे इ. ची विक्री करणे हा त्याचा एक व्यवसाय.
 लहानपणापासूनच घरात संगीताचे वातावरण असल्याने संगीतात आवड आणि गती होती. हेच त्यानं मनापासून जोपासलं. त्याच्याकडे असलेल्या आणि त्याला येत असलेल्या अधिकाधिक वाद्यांचं शिक्षण त्याने स्वत:च स्वत:ला शिकवून घेतलं. एखाद्या वाद्याची एखादी धुन किंवा तुकडा शिकायचा आणि त्याच्यात स्वत:च्या सृजनशीलतेची भर घालत नवनविन संगीताचे तुकडे (त्याला इंग्रजीत इम्प्रोव्हायझेशन असं म्हणतात) तयार करायचे ही त्याची आवड.

त्याची पहिली बायको एक म्युझीक थेरपीस्ट होती. त्याच्याकडे तिबेटीयन झांजा होत्या की ज्यांच्या उपयोग भुकेलेली भूते घालवण्यासाठी होतो असे त्याने सांगीतले. तिबेटीयन घंटा, आसाम मधून आणलेली विविध त्रिज्या असलेल्या गोलीय आकारांची, विविध जाडींची, विविध खोलींची कास्य धातू मधे तयार केलेली भांडी आणी यासगळ्यांच्या कडांना लाकडाची काठी गोलगोल फिरवून त्या स्पर्शाने निघणारे विविध आवाज याचं प्रात्यक्षीकच त्यानं दाखवलं.

ही सर्व वाद्ये म्युझीक थेरपी, रेकी आणि प्राणीक हिलींग वगैरेसाठी तो अजुनही वापरतो. त्याच्या घराचा एकही कोपरा किंवा भिंत रिकामी सापडणार नाही. सगळीकडे कापडी चित्रं आणि विविध वाद्ये लटकवलेली आहेत. स्टीव्ह स्वत: जरी जन्माने ख्रिस्ती असला तरी त्याला बुद्धीझम, कन्फुशिअनीझम यांसारख्या तत्वज्ञानांचे वेड आहे. कपडे आणि दागिने विक्री हा त्याचा फक्त उन्हाळ्यातील व्यवसाय आहे. आता मुख्य व्यवसाय म्हणून तो संगीताचे धडे देतो.

त्याचा ग्लोबटोन नावाचा यु-ट्युबवर चॅनल आहे. तिथे तुम्हाला गिटार, बॅन्जो, तबला, सतार, अनेक इलेक्ट्रॉनीक वाद्ये यांची इम्प्रोव्हायझेशन्स पहायला आणि ऐकायला मिळतील. त्याच्याकडे सगळी अत्याधुनिक इलेक्ट्रॉनीक, संगणकीय प्रणाली असलेली साधने आहेत की ज्यांच्या आधारे तो विविध वाद्यांचे, संगीतांचे मिश्रण करू शकतो. आपल्या विद्यार्थ्यांना संगीत शिकवताना त्याचा मुख्य भर हा विद्यार्थ्यांना एखाद्या वाद्याचं ज्ञान आत्मसात करायला शिकवणे आणि त्यातून स्वत:चं म्युझिक तयार करायला शिकवणे यावरच असतो. ज्यांना त्याच्या संगीताविषयी अधिक रूची वाटत असेल त्यांनी त्याच्या ग्लोबटोन या यु-ट्युब चॅनलवर जाऊन बघावे.मला अशा भन्नाट लोकांचं फारच कौतुक वाटतं.

12 comments:

  1. मस्त वाटलं वाचून. अशा माणसाला मला भेटायला आवडेल.

    ReplyDelete
    Replies
    1. देका, त्यासाठी तुम्हाला इथे कोबाल्टला यायला लागेल.

      Delete
  2. मस्तच. स्टीव्ह स्मीथची ओळख आवडली.

    ReplyDelete
  3. सही... एकदम सच्चा कलाकार आहे हा. त्याची मस्त ओळख करून दिलीस

    यू ट्यूब वर व्हिडिओ बघितले आणि आवडले :) :)

    ReplyDelete
  4. मस्त आहे ही व्यक्ती...आता व्हिडीओपण पाहाते....
    आमच्या लायब्ररीतला सगळा चमू इतकं सुरेख वाजवतात नं त्यामुळे त्यांचा स्टोरी टाइम पाहाणं ही मोठ्यांसाठी पण पर्वणी असते....
    थोडी वाद्य साथीला असली की गाण्याला बहार येते ....:)

    ReplyDelete
    Replies
    1. हो ना. अशी मंडळी फारच कमी प्रमाणात आढळतात.

      Delete
  5. मस्त ओळख करून दिली.
    अशीच बहुढंगी ,बहुरंगी व्यक्ती आणि वल्लींची ओळख करून घ्यायला आवडेल.

    ReplyDelete
  6. धन्यवाद निनाद. माझ्या इंग्रजी ब्लॉग मधे नुकतेच याचे इंग्रजी व्हर्जन लिहीले आहे. त्यात मी अधिक माहीती लिहू शकले आहे. पाहीजे असेल तर ते देखिल वाचू शकतोस. http://hopesoletude.blogspot.in/2012/07/meeting-with-musician.html

    ReplyDelete
  7. ग्लोबटोनवर क्लिक केल्यावर ४०४ नॉट फाऊंड अशी एरर आली. :(

    ReplyDelete
    Replies
    1. आता ग्लोबटोनची लिंक उघडत आहे.

      Delete