Sunday 4 April 2010

नॉट ओन्ली मिसेस राऊत :गरज सामाजिक आत्मपरिक्षणाची!

खूप दिवस झाले गजेंन्द्र अहिरे चा "नॉट ओन्ली मिसेस राऊत" पहायचा होता पण वेळच मिळत नव्हता. आज ठरवलंच की तो यू-ट्युब वर तरी पहायचाच. सिनेमा पाहून झाल्यावर मला पुन्हा त्याच प्रश्नांनी घेरले. या सिनेमाच्या निमित्ताने गजेंद्र अहिरे ने खूपच तरल पणे आपल्या समाजाचे, संस्कृतीचे सत्य स्वरूप डोळ्यासमोर आणले.
अगदी दंडवत्यांच्या घरापासूनच घ्या नं.....दादा दंडवत्यांना आणि त्यांच्या भावाला स्त्रियांविषयी थोडा सुध्दा आदर नाही. स्वातीला घरात ज्या प्रकारची वागणूक मिळताना दाखवली आहे ते. हे अगदी ९०% घरांमध्ये आढळणारे चित्र आहे. लहान पणापासूनच मुलींना अतिकाळजी आणि अतिसंरक्षण या नावा खाली दुबळं बनवुन ठेवलं जातं. काही घरांमध्ये दंडवत्यां सारखा फार्स चालू असतो. घरतील स्त्रियांना सोन्याच्या पिंजर्‍यात अथवा देव्हार्‍यात बसवले जाते. किंबहुना त्यांना ह्र्दय नावाचा अवयवच नाही असेच दाखवले आहे घरातील प्राणी आणि स्त्रिया यांना थोड्या फार फरकाने सारखीच वागणूक दिली गेली. मला असं वाटतं अजुनही दंडवते कुटुंबा मधील पुरूषांचं वागणं आणि मानसिकता सध्याच्या उच्चभ्रू समाजाचे ९९% प्रतिनिधित्व करतात.

मिसेस कारखानीसांचा नवर्‍यावर असलेला विश्वास हा सध्याच्या समाजातील ९९% स्त्रियांना असतोच नाहीतर दाखवावा तरी लागतो. माझ्या माहीती मध्ये एका कुटुंबात घडलेली घटना. दोघा नवरा बायकोंची एक अविवाहीत लहानपणा पासूनची मैत्रिण असते. या दोघांना एक मुलगा असतो आणि नंतर ते एक मुलगी दत्तक घेतात. दोन मुलांच करण्यात आणि घरचा नव्याने सुरू केलेला व्यवसाय सांभाळण्यात बायको व्यस्त. आणि नवरा एका कंपनीत मोठ्या हुद्यावर. पण बायकोशी प्रतारणा करण्याची घाणेरडी सवय या माणसाला. का? तर घरात बायको वाट्यालाच येत नाही. मग त्या अविवाहीत मैत्रिणीवर जाळे टकण्याचा प्रयत्न. तिने दिलेला स्पष्ट नकार. मग अजुन दोन-चार मैत्रिणी पकडल्या. बायकोशी धादांत खोटं बोलायचं की आपण मित्रांबरोबर आहोत. आणि बायकोचा पण खूप विश्वास त्याच्या वर. कारण बोलताना तरी स्त्री मुक्ती आणि स्तियांचं शोषण यावर लंब्या चौड्या गप्पा मारणार. कोणी बघीतलं त्या माणसाला तर सांगुनही कोणाचा विश्वास बसणार नाही की हा माणूस असा आहे. असे साळ्सूद पणाचा आव आणणारेच खूप आहेत आपल्या समाजात. त्यांना फक्त एखादी स्त्री एकटी दिसली की मग तिच्या रक्षणाची (?) आणि भवितव्याची आपल्यालाच काळजी (?) अशा थाटात ते वावरत असतात. चित्रपटातील मि. कारखानीस हे समाजातील अश्याच लोकांचं प्रतिनिधित्व करतात. अश्यांची संख्या सुध्दा ९०% च्या घरात आहे. त्यांना स्वत:ला सुध्दा ते माहीत नाही की संधी समोर आली तर मि कारखानीसांना मनातल्या मनात लाखोली वाहणारे आपण सुध्दा कसे वागु ते. एक स्त्री म्हणून मला या असल्या सगळ्या लोकांची माहीती आहे. माझ्या सारख्या स्वतंत्र पणे वावरणर्‍या तसेच काही एकट्या राहणार्‍या स्त्रियांना हे सगळे लोक वेगवेगळ्या स्वरूपात कुठे न कुठे तरी भेटलेले असतात. मी लहान असताना मला माझी आई आपल्या समाजात गळ्यात दिसणारं मंगळसूत्र किती महत्वाचं आहे हे सांगायची. पण ते मला आता कळतय. माझा नवरा परदेशी आहे. त्याचा काही आग्रह नाही मंगळसूत्र घालण्याचा. पण मी ते घालते. यामुळे लोकांची माझ्याकडे बघण्याची दृष्टी बदलते. हेच मी जर परदेशात राहीला गेले तर घलणार सुध्दा नाही. पण भारतात ते महत्वाचे. नाही तर लोक मला मित्रा बरोबर लग्ना शिवाय राहणारी इ. म्हणतील. आणि मग बर्‍याच जणांना काय वाटेल ते अधिक स्पष्ट सांगण्याची गरजच नाही. याच कारणासाठी माझ्या एका चुलत बही्णीने नवरा तिच्या ऐन पस्तीशीत गेला असून सुध्दा कुन्कु लावणे आणि मंगळसूत्र घालणे चालूच ठेवले.

पर्वाच पुण्यामध्ये एक बलात्काराची घटना घडली. मिश्र प्रतिक्रीया उमटल्या. एक प्रतिक्रीया स्त्रियांच्या वेषभूषेवर होती. मला अश्या लोकांना एक प्रश्न विचारावासा वाटतो की चित्रपटातील नेहाची काय चूक होती? तिची चूक येवढीच की ती एकटी रहायला तयार झाली....निरागसपणे त्या नराधमाला घरात घेतलं. मेलेल्या बापाच्या अस्तित्वावर तिचा नको एतका विश्वास. भारता मध्ये किति टक्के स्त्रिया तोकडे कपडे घालून फिरत असतात? त्यातील किती टक्के स्त्रियांवर अत्याचार होतात? एक स्त्री म्हणून माझा अनुभव सांगते. स्त्रियांनी अगदी व्यवस्थीत कपडे जरी घातले असतील तरी पुरूषांची नजर स्कॅनर लवल्या सारखी स्त्रियांकडे बघत असते.........त्याचे काय? स्वत:च्या भावनांना आवर घालणे, कोणावरही अत्याचार, अन्याय न करणे ्हीच तर पूरूषार्थाची लक्षणे सांगीतली आहेत. मग हेच पुरूष जेंव्हा स्त्रियांना सितेचा आदर्श ठेवण्यास सांगतात तेंव्हा ह्यांना एक पत्नि, एक वचनी प्रभूरामचंद्राचा आदर्श दिसत नाही हे एक कोडंच आहे!
एखादी अविवाहेत मुलगी परदेशात शिकायला गेली तर तिच्या चारित्र्याविषयी सगळ्या सो कॉल्ड हीतचिंतकांना प्रश्न पडतात.....आणि तसे बोलूनही दाखवतात...........तर त्यांना अविवाहीत मुलांच्या चारित्र्याविषयी प्रश्नच नसतात........मग ते भारतात असोत किंवा भारता बाहेर.

जो पर्यंत समाजाची विचार करण्याची पध्दत बदलत नाही तो पर्यंत काहीच होणार नाही. कायद्याचा जर जबरदस्त बडगा असेल तरच हे शक्य होईल. पण या कायद्याच्या बडग्या बरोबरच आपली चांगूलपणाची शक्ती, विवेक बुध्दीची सुध्द्दा साथ असली पाहीजे. कालच एका व्यक्तीशी माझं या विषयाशी संबंधीत बोलणं चालू होतं. मी जेंव्हा समाजाची मानसिकता बदलण्या विषयी म्हणाले तेव्हा ते सदगृहस्थ म्हणाले पण मी समाजात जाऊन असले काही काम करण्याची शक्यताच नाही. मला त्यांच्या वैचारिक मजली विषयी वाईट वाटले. समाज हा शेवटी आपल्या पासून, आपल्या कुटुंबा पासून सुरु होतो. त्यामुळे समाजातील चांगल्या बदलांची अपेक्षा स्वत: पासून करावी. आपल्या कुटुंबात ती अंमलात आणावी. जे लोक महिला सबलीकरणाची जोराने चर्चा करत फिरतात, किंवा महिलां वरील अत्याचाराचा निषेध करतात त्यांनी स्वत:च्या पत्नी, बहीण, मुलगी यांना सबला करावे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करावा. मग अत्याचार होणारच नाही.....आणि जर का चुकून तसा प्रसंग ओढवलाच तर त्याला धैर्याने तोंड देण्याची ताकद त्यांच्या मध्ये असेल.

बघा विचार करून पटतय का ते. आपल्याच सामाजाचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. सामाजिक आत्मपरिक्षणाची गरज आहे.

3 comments:

  1. याला जबाबदार टिव्ही,विडीओ,आणि हा गलिच्छ मिडीया असं मला वाटतं.याला दुसरी पण एक बाजू आहे.सावधान येथे वाचा

    ReplyDelete
  2. मला नाही असं वाटत की टिव्ही आणि व्हिडीओ मुळे माणसं बिघडतात. एखादं साधन असलं की त्याचा वापर कसा करायचा हे साधन ठरवत नाही तर साधन वापरणारा ठरवत असतो. तुम्ही वर उल्लेख केलेल्या साधनाचंही तसच आहे. ते जे दाखवतात ते पहायचं की नाही आणि त्याचा नक्की काय परिणाम करून घ्यायचा हे आपण ठरवायचं. शेवटी दोरीने झेंडा वंदना साठी झेंडा त्या काठीवर चढवायचा की दोरीने स्वत:ला गळफास लावून घ्यायचा हे आपण ठरवायचं. स्वत:च्या भावना जर काबूत ठेवायला येत नसतील किंवा स्त्रिय़ांवरील अतिप्रसंगा सारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असेल तर कायद्यांची कडक अंमलबजावणी करणे, समाजामध्ये काही चुकीच्या कल्पना रूजलेल्या असतील तर त्यांचा शोध घेऊन त्या सुधारणे असे करता येऊ शकते. माध्यमांना दोश देऊन काय उपयोग? लोकांना जे हवं ते माध्यमं दाखवतात. नाही तर त्यांचा धंदा कस चलणार? तीच गोष्ट सिनेमा क्षेत्राची. काय पहावं, काय पाहू नये, काही पाहिलंच तर त्यातून चांगलं तेवढं कसं घ्यावं ह्या गोष्टी आपण सांगी शकतो.

    ReplyDelete
  3. श्री सावधान: आपले त्यासंबंधीचे पोस्ट वाचले आहे. प्रतिक्रीये दाखल वेगळं असं लिहिण्याची गरज वाटली नाही. हे पोस्टच पुरेसे बोलके आहे.

    ReplyDelete