आमच्या लग्नाला नवर्याचे कॅनडातील मित्रं-नातेवाईक येऊ शकले नव्हते त्यामुळे एका मित्राने वेस्टर्न युनीयन मार्फत लग्नाचे गिफ्ट (टोरांटो मधील उत्तम हॉटेल मध्ये जेवण दिल्यावर जेवढी रक्कम होईल तेवढी साधारणपणे रू. १६,०००/-) पाठवून दिले. तसं माझ्या नवर्याचं पैसे हाताळणे, बॅंकींग, गणित, आकडे यांच्याशी ३६ चा आकडा आहे. (म्हणूनच कदाचित आमचे ३६ गुण जमले पत्रिका न पाहता! कारण हे सगळे माझे अत्यंत जिव्हाळ्याचे विषय आहेत. विशेषत: गणित. कदाचित परमेश्वर बरोबर एकमेकांना पूरक जोड्या ठरवतो......पुढच्या लिहिलेल्या अनुभवात ते सिध्द पण झालं आहे....असो) त्यामुळे तो या सगळ्या गोष्टींपासून खूपच अलिप्त असतो. अशुने (त्याने घेतलेल्या अश्वमित्र {त्याचे मूळ नाव फिलिप. फिलिप या नावाचा ग्रीक भाषेमध्ये अर्थ "The One Who Loves Horses"...........म्हणून अश्वमित्र} या संस्कृत नावाचा मी केलेला शॉर्टफॉर्म) मला त्याच्या मित्राच्या डेव्हच्या गिफ्टबध्दल सांगून सुध्द्दा २-३ दिवस उलटून गेले. मी सहजच त्याला त्याविषयी विचारलं तर मला सरळ सांगतो की ते पैसे चोरीला गेले. पहिल्यांदा मला वाटले की ते पैसे कॅनडा मध्येच गहाळ झाले. मग मी त्याला तपशील विचारला तर लक्षात आले की पैसे डेव्हने टोरंटोच्या वेस्टर्न युनीयन ऑफिस मध्ये त्यांच्या सगळ्या चार्जेस सकट पैसे भरले होते व आम्हाला भरलेली रक्कम जशीच्या तशी मिळणं अपेक्षित होतं. बरं या आधी मला वेस्टर्न युनीयन मार्फत व्यवहार करण्याची वेळ कधीच आली नव्हती त्यामुळे नक्की तिथे काय प्रोसेस होते हे माहीतच नव्हते. त्याने गणेशवाडीतील एका वेस्टर्न युनीयनच्या एजंट कडून तो व्यवहार केला होता. त्या एजंटने त्याला जवळच्याच युको बॅंकेचा चेक दिला आणि ठराविक वेळात पैसे घेऊन जायला सांगीतले होते. त्याप्रमाणे तो दुसर्या दिवशी त्या ब्रॅंचला जाऊन त्याने काऊंटरवरच्या बाईला तो चेक दाखवला. तिने चेक पाहून एकदा अशुकडे कटाक्ष टाकला आणि आपल्या सहकार्यांकडे (हे सुध्दा त्याने नोटीस केलं) आणि सरळ त्याला म्हणाली तुमच्या मित्राच्या खात्यात पैसे नाहीत. त्यांच्यावर विश्वास ठेवून (म्हणजे कॅनडा मध्ये शक्यतो बॅंकेतील लोक फसवत नाहीत खरेच बोलतात असा अनुभव असल्याने) तो परत आला. त्याला वाटले की डेव्हच्या खात्यातील पैसे कोणीतरी घेतले म्हणून आता त्याच्या खात्यात पैसे नाहीत. अशुने सुध्दा असा व्यवहार आधी कधीच केलेला नव्हता आणि ते ३६ चा आकडा प्रकरण त्यामुळे त्याला पण त्यातील फारसे काहीच माहीती नव्हते पण उगीच कॉम्प्लीकेशन्स नकोत म्हणून त्याने कोणालाच काहीच सांगीतलं नाही. मला त्यात काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय येण्यास आधीच सुरूवात झाली. त्यात एखाद्या बॅंकेत चेक सादर केल्यावर जर खात्यावर पैसे नसतील (चेक बाऊन्स झाला) तर ती केस फोर्जरी म्हणून बॅंकेने पोलीस कंप्लेंट करायला हवी. इथे तर बॅंकेने काहीच अॅक्शन घेतली नव्हती. मी त्याला सुचवलं आपण पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करूयात. पण हा मुळातच पोलीस प्रकरण, कायदा या सगळ्यां पासून चार हात लांब रहाणे पसंत करत असल्याने त्याने मला तसे करण्यास नकार दिला. मला काही स्वस्थ बसवेना. प्रश्न केवळ १६,००० रूपयांचा नव्हता तर बेमालूम पणे चाललेल्या लूटीचा होता. अश्या पध्दतीने परदेशी नागरीकांना भारतात सर्वच ठिकाणी लुटले जाते. मी या गोष्टीच्या मुळाशी जायचं ठरवलं.
पहिल्यांदा वडिलांना फोन करून वेस्टर्न युनियनच्या व्यवहाराच्या प्रोसेस ची माहीती करून घेतली. आणि खरा प्रकार लक्षात आला. त्या एजंटची युको बॅंकेच्या त्या ब्रॅन्चला दोन खाती होती. एक खातं वेस्टर्न युनीयनशी जोडलेलं आणि दुसरं करंट. त्या एजंटने लबाडी अशी केली की त्याच्या वेस्टर्न युनीयनच्या खात्यात पैसे जमा करून घेतले आणि देताना स्वत:च्या करंट अकाऊंटचा चेक दिला की ज्या मध्ये पैसे नव्हते. मला सगळ्यात आश्चर्य वाटलं ते युको बॅंकेच्या कर्मचार्यांच्या वागण्याचं आणि त्यांचा रागही आला. ही ब्रॅन्च प्रभात रोडवर गिरीकंद ट्रॅव्हल्स च्या जवळ आहे. भारतीय लोकांच्या या वागण्याची लाज वाटली. मी तडक त्या एजंटच्या दुकानाकडे मोर्चा वळवला. माझा दुर्गावतार बघून अशुला त्या दुकानदाराची काळजीच वाटायला लागली आणि मला म्हणाला जाऊ देत ते पैसे. पण मला हे सगळं सहन होणं शक्यच नव्हतं. दुकानाचा मालक (म्हणजे तो एजंट) दुकानात नव्हता. अपेक्षेप्रमाणे दुकानातील माणसाने टाळाटाळ करायला सुरूवात केली. मी सुध्द्दा त्याला चांगला धारेवर धरला आणि दुकानाच्या मालकाला फोन लावण्यास सांगीतले. फोनवर सुध्दा तो एजंट टोलवाटोलवी करत होता. मग मी त्याला अर्ध्या तासाची मुदत दिली. अर्ध्या तासात जर ते पैसे आमच्या हातात पडले नाहीत तर मी प्रभात पोलीस स्टेशन मध्ये जाईन असेच त्याला सांगीतले. मग त्याची भाषा बदलली. मला विचारायला लागला, मॅडम तुम्ही कोणत्या ब्रॅन्चला असता? मी फक्त एकच पालूपद चालू ठेवलं, अर्ध्या तासात पैसे नाहीतर प्रभात पोलीस चौकी.........शेवटी अर्ध्या तासात आम्हाला आमचे पैसे मिळाले. मग मी सुध्दा (अर्थात आम्हाला पोलीस चौकीत फेर्या मारण्यासाठी वेळ नसल्याने) पोलीसात न जाण्याचा निर्णय घेतला आणि शांतपणाने घरी गेलो. नवर्याने माझा दुर्गा-काली यांचे सर्वप्रकारचे कॉम्बीनेश असलेला अवतार पहिल्यांदाच बघितल्याने तोही एकदम चकित झाला. त्याने जेव्हा डेव्हला हा सगळा प्रकार इ-मेल ने सांगीतला तेव्हा त्याने लगेचच भविष्यातील एक बिझनेस प्रपोझल पाठवलं. "कालीका एन्टरप्रायझेस" म्हणून आणि त्यात मला "चिफ ऑफ फायनान्स" ची पोस्ट ऑफर केली आणि लिहिले की मला खात्री आहे की माझे पैसे कधीच बुडणार नाहीत. मजेचा भाग सोडून देऊ. पण मला मात्र भारतामध्ये परदेशी लोकांची जी सर्रास लूट चालू असते त्याचा रागच आला. त्यामुळे आपल्या देशाचे नाव सगळीकडे बदनाम होते हे या लोकांच्या लक्षात कसं येत नाही याचं मला आश्चर्य वाटतं! काही जण तर या लूटीचं समर्थन असंही करतात की फिरंग्यांनी आपल्याला दिडशे वर्षे लुटलं आता आपण त्यांना लुटलं तर काय फरक पडतो? मला तरी हा युक्तिवाद पटत नाही. हा युक्तीवाद म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी असाच झाला. असो.
अजुनतरी डेव्हच्या प्रपोझल वर गांभिर्याने विचार करण्याची वेळ आमच्यावर सुदैवाने आलेली नाही. कारण त्यासाठी आम्हाला कॅनडा मध्ये जाऊन रहावे लागेल की जे आम्हाला दोघांनाही नको आहे. :-)
असंही होतं?? बापरे. या लोकांना सोडायला नको. जे काही झालं ते सगळं इ मेल करुन त्या वेस्टर्न युनियनच्या एमडी ला लिहून कळवायला हवे.. काही तरी ऍक्शन होईलच..
ReplyDeleteखरंतर त्यावेळी मला आजीबात वेळ नव्हता. त्यामुळे तसे केले नाही. थोडा जरी वेळ असताना तर मी हे प्रकरण निदान प्रभात पोलीस स्टेशन मध्ये तरी नेलं असतं. अजुनही जर कळवता येत असेल तर प्रयत्न करायला हरकत नाही. पण मला त्या एजंटचं नाव माहीती नाही. फक्त दुकान माहीती आहे.
ReplyDeleteकाय फालतूपणा आहे हा !! या असल्या एजंट्सनी कित्येक पैसे लुटले असतील आतापर्यंत.. :-( .. आणि त्या बॅंकेची पण कमालच आहे.
ReplyDeleteमहेंद्र काकांशी सहमत. वेस्टर्न युनियनच्या एमडी ला संपर्क केला पाहिजे.. आणि त्या बॅंकेच्याही...
परदेशी लोकांची अश्या प्रकारे खूप लूट चालते भारतात. हे एम डी ला तक्रार वगैरे त्याच वेळी म्हणजे २००७ साली झालं असतं तर शक्य होतं आता जरा अवघडच आहे.
ReplyDeleteमलाही असंच वाटतं की आता...त्याचा काही उपयोग नाही...काही गोष्टी ह्या वेळच्या वेळीच कराव्या लागतात.
ReplyDeleteपण अपर्णा तुझं खरच कौतुक वाटतं...तू अशी घट्ट राहिलीस म्हणून काम झालं..एरवी काही खरं नव्हतं.
अपर्णाचा अर्थ पार्वती...म्हणजेच दूर्गा...काली वगैरे...नाव सार्थ केलंस.
:)
:-):-)
ReplyDeleteमला खरोखर तुमचे कौतुक वाटते.
ReplyDeleteपण इतके काही करण्यासारखी वेळ यावी
ही काही चांगली गोष्ट नाही.
पुणेरी भामटे आजही आहेत.पुण्यात
white collar crime भारतात सगळ्यात जास्त आहे.
हेच तर आहे नं आपण वेळ नसतो म्हणून गप्प बसतो. परदेशी लोक वेगवेगळ्या कारणांनी गप्प बसतात. त्यामुळे अश्या लोकांचं फावतं. मला वाईट याचंच वाटतं की सगळ्या देशांत असे भामटे असतात. पण आपल्या कडे ते अधिक उठुन दिसतं.....आपल्या कडच्या गरीबी मुळे.
ReplyDeleteपण वर उल्लेख केलेले भामटे खूपच पांढरपेशे आहेत हे विशेष :-):-)
ReplyDeleteदुर्गा माता कि जय हो....
ReplyDelete