मला काहीच सुचत नव्हतं. तेव्हड्यात शेजारच्या रूमचा दरवाजा उघडल्याचा आवाज झाला, ममता (माझी शेजारीण की जी फिजीक्स च्या कॅव्हेंडीश लॅब मध्ये पी एच डी करत होती) रूम वर आल्याचं लक्षात आलं. सध्या हिवाळ्यात सगळं लवकर बंद होत असल्याने ती सुध्दा संध्याकाळी चारच्या सुमारास परत येत असे. माझ्या जीवाची अजुनच घालमेल चालू झाली. अस्वस्थता दूर करण्यासाठी कोणाशी तरी बोलणं आवश्यक होतं. मैत्रिणींना फोन करायचा तर श्रीलक्ष्मी आणि मानसी दोघीही डिपार्ट्मेंट्मध्ये जाणार होत्या आणि उशीरा येणार होत्या त्यामुळे त्या कॉलेज मध्ये असण्याची शक्यता नव्हती. भारतातून कोणी चुकून ऑनलाईन असेल तर त्यांच्याशी बोलता येईल म्हणून मी चटकन लॅपटॉप चालू केला. सुदैवाने प्रिया ऑनलाईन दिसली. शक्यतो ती ऑफीस मध्ये असताना ऑनलाईनच असते म्हणजे साधारण पणे दुपारच्या वेळी. पण आज ही येवढ्या रात्री ऑनलाईन कशी हाच पहिला प्रश्न मी तिला विचारला. तर ती म्हणाली अगं मी ऑफीस मध्येच आहे आणि रात्र नाही तर दुपारचे पावणे दोन झालेत. मी लॅपटॉपच्या घड्याळात बघीतलं तर खरंच तो दुपारचे पावणे दोन दाखवत होता. (रूमच्या समोरच मोठ्ठं वॉल क्लॉक असल्याने मी लॅपटॉप मध्ये मी जाणूनबुजून भारतीय वेळ ठेवलेली होती) मी लगेचच खिडकीतून बाहेर पुन्हा घड्याळात पाहिलं तर सव्वा आठ वाजलेले दिसले आणि माझा जीव भांड्यात पडला. मग पाच मिनीटं प्रियाशी गप्पा मारून लॅपटॉप बंद केला आणि उत्साहाने आवरायला सुरूवात केली. मला दुप्पट उत्साह आला होता कारण माझ्या आयुष्यातील एक दिवस मला परत मिळाला होता. अत्यंत महत्वाचा दिवस!
तर झालं असं की युके, तसेच युरोपात हिवाळा चालू झाला की (तिथल्या हवामान आणि वातावरणामुळे) ऑक्टोबर पासूनच सगळी घड्याळे एक तास अलिकडे घेतात. हिवाळा असल्याने सूर्यप्रकाश अत्यंत कमी आणि खूप थंडी यामुळे बाहेरचं वातावरण सकाळी ७.०० वाजता सुध्दा संध्याकाळ सारखं, तसेच अतिशय डिप्रेस्ड वातावरण. सकाळचा फ्रेशनेस त्या वातावरणात नसे. मी जेव्हा अर्धवट झोपेतून उठताना चार टोले ऐकले होते ते शेवटचे चार होते. घड्याळात आठ वाजले होते पण अर्धवट झोपेत असल्याने तसेच ढगाळ, अंधारलेले वातावरण असल्याने मला ते काटे उलटया दिशेने दिसले म्हणजेच चार वाजलेले दिसले. आणि माझा गैरसमज झाला.
मला माझ्या आयुष्यातील एक मोठ्ठा साक्षात्कार झाला होता.........होय साक्षात्कारच! कारण आज पर्यंत मी खूप वेळा "टाईम इज मनी", "वेळेला खूप महत्व" "वेळेचा अपव्यय करू नये, गेलेला क्षण परत येत नसतो" इत्यादी वाचले --- ऐकले होते. पण मला आज प्रत्यक्षात त्याचे रिअलायझेशन झाले. मी वेळेची आपल्या आयुष्यातली किंमत प्रत्यक्ष अनुभवली होती. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आपल्याचसाठी कसा महत्वाचा असतो त्याची प्रचितीच घेतली. हे आपल्याला जो पर्यंत आपण त्या लॉस मधून जात नाही तो पर्यंत कळत नाही.हातात एखादी गोष्ट असे पर्यंत आपल्याला त्याची किंमत नसते ती हातातून निसटल्यावर कळते. परमेश्वराचे आभारच की मला फक्त डेमोच पहायला मिळाला.
No comments:
Post a Comment