![]() | |
http://madmikesamerica.com/2011/05/10-really-cool-things-about-the-human-brain/human-brain-map/ |
माणूस विविध माध्यमांतून शिकत असतो. जिभेच्या माध्यमातून चव, नाकाच्या माध्यमातून वास, त्वचेच्या स्पर्श, कानांच्या माध्यमातून ऐकणे आणि डोळ्यांच्या माध्यमातून पहाणे अशा पाचही इंद्रियांच्या माध्यमातून माणूस अर्भकावस्थेत असल्यापासून ज्ञान मिळवत असतो. हे ज्ञान साठवले जाण्याचे ठीकाण एकच आणि ते म्हणजे मेंदू. त्यामुळे आपल्या मेंदूचा, त्यातील विविध भागांचा, त्यात ज्या पद्धतीने माहीती साठवली जाते, त्या माहीतीवर प्रक्रिया करून त्याचे आपल्या दीर्घ स्मृतीत जतन कसे केले जाते हे शिक्षण देताना, शैक्षणिक अभ्यासक्रम ठरविताना लक्षात घेणे खूप महत्त्वाचे आहे. पूर्वी जेव्हा शिक्षणाचे औद्योगीकरण झालेले नव्हते तेव्हा काहीप्रमाणात माणसाच्या नैसर्गिक क्षमतांचा शिक्षण देण्यात विचार व्हायचा. पण जसे शिक्षण देणे हा शिक्षीत मानवी प्राणी तयार करण्याचा एक कारखानाच झाला तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी विस्मृतीत गेल्या. त्यातूनही काही तावून सुलाखून बाहेर पडून चमकले पण अधिकाधिक जनतेचे नुकसानच झाले. त्यातच विशिष्ट विषयांचे व्यावसायिक महत्त्व, जीवघेणी स्पर्धा या सगळ्यामुळे जे काही थोडेफार विद्यार्थ्यांच्या नैसर्गिक कलाशी जोडले गेलेले शिक्षणही संपुष्टात आले आणि उरला तो फक्त विशिष्ट साचा की ज्यातून घातल्यावर पदवीचा शिक्का मारला जाईल. कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी एक मंत्र आहे: "मूळात जाऊन त्या समस्येचा विचार करा". तोच काहीसा प्रयत्न मी इथे करणार आहे.
आपल्या मेंदूत नेमके काय आणि कसे घडते हे समजणे वाटते तितके सोपे नाही. मेंदूमधे घडत असलेल्या क्रियांच्या संदर्भात न्युरॉलॉजी असं सांगते की
आपला मेंदू कोणतीही माहीती छोट्या छोट्या तुकड्यांत जोडून ती साठवत असतो.
ते तुकडे पाच किंवा सात च्या गटात असतात. त्यालाच चंक असे म्हणतात.
प्रत्येक तुकडा हा एखादी माहीती त्रिकूटाद्वारे साठवत असतो. एका त्रिकूटात
कर्ता (सब्जेक्ट) क्रियापद (प्रेडीकेट) कर्म (ऑब्जेक्ट) असे बनलेले असते.
जगातील कोणत्याही दोन गोष्टी आपण पाच ते सात त्रिकुटांत जोडू शकतो असा एक सिद्धांत आहे. या त्रिकूटात कर्ता, कर्म आणि क्रियापद याची जागा कोणतीही गोष्ट
म्हणजेच चव, गंध, छायाचित्रं, आठवण इ. काहीही घेऊ शकते.
आता आपल्या
मेंदूच्या स्मृतीचे दोन भाग असतात. अल्पकालिन आणि दीर्घकालिन. आपण
कोणत्याही माध्यमातून जी माहीती आत्मसात करतो त्यातील काही माहीती छोट्या
त्रिकूटांच्या गटांच्या माध्यमातून अल्पकालिन स्मृतीत जाते आणि काही माहीती
गाळली जाते व लुप्त होते. अल्पकालिन स्मृतीमधे माहीती जाण्यास १० ते १००
मिली सेकंद इतका काळ लागतो. आधीच्या स्मृतीच्या आधारे (दीर्घकालिन) आपल्या
मेंदूने जे काही नियम तयार केलेले असतात किंवा जी काही माहीती साठवलेली
असते त्यानुसार या अल्पकालिन माहीतीतील स्मृतीची गाळणी होते. त्यातून काही
माहीती गाळली जाते आणि उरलेली थोडी माहीती दीर्घकालिन स्मृतीत जाते.
यासगळ्या प्रक्रियेला काही सेकंद म्हणजे १० सेकंदांपेक्षाही कमी काळ लागतो.
दीर्घकालिन स्मृतीत जी माहीती जाते ती तीन भागात विभागलेली असते. एक
म्हणजे अर्थपूर्ण स्मृती (सीमॅन्टीक मेमरी) की ज्यात विविध संकल्पना
त्यांतील संबंधांसहित साठवलेल्या असतात. दुसरा भाग म्हणजे वैयक्तीक
अनुभवांची स्मृती (एपीसोडीक मेमरी) आणि तिसरा भाग म्हणजे प्रक्रियात्मक स्मृती (प्रोसीजरल मेमरी).
जेव्हा मूल पोटात असते तेव्हापासून त्याच्या मेंदूच्या पेशी
कार्यरत होत असतात आणि येणारे अनुभव विविध प्रकारे दीर्घकालिन स्मृतीत
साठवत असतात. यासाठीच विशिष्ट आठवड्यांचा गर्भ झाला की तो एक स्वतंत्र जीव
आहे असे मानून त्यानंतर गर्भपात करणे हे कायदेशीर दृष्ट्या अयोग्य आहे.
ज्या बाळांमधे मेंदूच्या पेशींना इजा झालेली असते त्या बाळांची प्रगती
खुंटते. त्या बाळांच्या कोणत्या प्रगतीवर परिणाम होईल हे मेंदूतील कोणत्या
पेशींना इजा झालेली आहे त्यावर अवलंबून असते. महाभारतात म्हणूनच
अभिमन्यू पोटात असतानाच त्याने चक्रव्युहात शिरायचे कसे हे आत्मसात केले पण
बाहेर कसे पडायचे हे ऐकत असतानाच सुभद्रेला झोप लागली आणि अभिमन्यु गर्भात
असल्याने त्याचे सर्व अनुभव हे आईच्या स्थितीवर अवलंबून होते. म्हणून
त्याला पुढचे काही ऐकता आले नाही.
माणूस हा अनुकरणप्रिय प्राणी
आहे असेच म्हणतात. अनुकरणातून माणसं खूप काही शिकतात म्हणूनच निरीक्षण हे
एक महत्त्वाचे कौशल्य आहे की जे प्रत्येकाने आत्मसात करावे. हे कौशल्य
कोणत्याही क्षेत्रात उपयोगी पडते. प्रत्येक माणसाच्या वेगवेगळ्या शिकण्याच्या शैली (लर्नींग स्टाईल्स) असतात. मेंदूच्या विविध भागांशी या शैली जोडलेल्या
असतात. सगळेच जण अमूर्त संकल्पना समजू शकत नाहीत. काही जणांची स्मृती ही
छायाचित्रांची असते तर काही जणांची सांगितीक असते. आपापल्या क्षमतेनुसार
प्रत्येकाचा मेंदू उपलब्ध माहीती साठवतो आणि त्यावर प्रक्रिया करतो, नियम
तयार करतो. प्रत्येकाच्या लर्निंग स्टाईल प्रमाणे हा प्रक्रिया करण्याचा
कालावधी अवलंबून असतो.
ज्या प्रकारची माहीती (माध्यमातून येणारी माहीती)
समोर येते, त्या प्रकारच्या माहीती नुसार (माध्यमानुसार)
जर शिकण्याची शैली असेल तर माहीती प्रक्रियेला लागणारा वेळ खूपच कमी असतो
आणि ती माहीती लगेचच दीर्घकालिन स्मृतीत जाते. पण हेच जर माहीतीचे माध्यम
आणि शिकण्याची शैली जुळत नसेल तर माहीती प्रक्रियेसाठी लागणारा वेळ जास्त
असतो आणि यामधे अधिकाधिक माहीती लुप्त होते. अधिकाधिक लोकांना
छायाचित्रांमधून किंवा चलचित्रांमधून मिळणारी माहीती लक्षात राहते. म्हणूनच
एखादा धडा वाचून जितकी माहीती लक्षात रहात नाही त्याच्यापेक्षाही कितीतरी
पटीने जास्त माहीती सिनेमाच्या माध्यमातून लक्षात राहते. कारण त्यात माहीती
एकत्रितपणे ध्वनी, चित्र आणि चलचित्रे या माध्यमातून येत असते. या सगळ्या
माहीतीला शास्त्रीय आधार आहे. यासाठीच सध्या शिक्षण देताना तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्यावर भर दिलेला असतो. पण त्याचाही उपयोग नीट आणि माफक प्रमाणात करून घेतला नाही तर त्याचे वेगळेच दुष्परीणाम समोर येतात.
आता संगणकीय स्मृतीची (मेमरीची) संकल्पना
आणि आपली स्मृतीची संकल्पना सारखी आहे असे कितीही वाटत असले तरी तो एक
आभास आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेच्या अनेक संकल्पना (मशीन लर्नींग, न्यूरल
नेटवर्क) वापरूनही अजुनही मानवाला मानवी मेंदूच्या आत ज्या प्रक्रिया
पूर्णपणे घडतात त्याचे प्रतिरूप बनवता आलेले नाही. गेल्याच महिन्यात गुगलने मानवी मेंदूचे प्रतिरूप बनवले आहे आणि ते मांजराच्या प्रतिमा गुगल सर्च इंजीनमधून शोधून काढू शकते अशी बातमी वाचण्यात आली होती. पण जेव्हा त्यासंदर्भात अधिक माहीती वाचली तेव्हा त्यात असेही नमूद केले होते की हा काही मानवी मेंदूचे प्रतिरूप नाही. त्यापासून अजुनही आपण लाखो मैल दूर आहोत. त्यामुळे संगणकाच्या स्मृतीत जशी माहीती भरून तिचा वापर करता येतो तशी माहीती मानवी मेंदूत भरता येत नाही. मानवी मेंदू म्हणजे संगणक नाही तर संगणकापेक्षाही अधिक आहे. त्यामुळे शिक्षण म्हणजे माहीतीचा मारा आणि माहीतीची घोकंपट्टी हे आजीबात नाही.
खरं तर शिक्षक हे शिकवत नसतातच
तर विद्यार्थ्याला शिकण्यासाठी सहाय्य करत असतात. स्वामी विवेकानंदांनी
शिक्षणाची व्याख्या फार छान केली आहे. "Education is the manifestation of
the potential already existing within a person". प्लेटो च्या मते
शिक्षणाची व्याख्या अशी आहे: "education is any process by which an
individual gains knowledge or insight, or develops attitudes or skill". म्हणजे माणसाला नैसर्गिक क्षमता वापरून शिकण्यासाठी वातावरण उपलब्ध करून देणे, तसे वातावरण निर्माण करणे म्हणजे शिक्षण देणे. त्यासाठी आपली शिक्षणपद्धती नैसर्गिक असली पाहीजे. एकाच वयोगटातील विद्यार्थ्यांनी एकाच प्रकारचा अभ्यासक्रम एका विशिष्ट पद्धतीनेच शिकला पाहिजे आणि त्यांचे मूल्यमापनही एकाच प्रकारे केलं पाहीजे असे म्हणणे आणि त्याप्रमाणे करणे म्हणजे शिक्षण अनैसर्गिक दृष्ट्या देणे. असं कारखान्यातील साचेबद्ध पद्धतीमुळे आपण फक्त साचेबद्ध शिक्षीत तयार करतो. माणूस (कितीही हुशार अणि
शिकलेला असला तरी) त्याच्या मेंदूच्या क्षमतेच्या फक्त १०% पेक्षाही कमी
क्षमता वापरतो. आईनस्टाईन हा एकच असा मनुष्य होता की ज्याने आपल्या एकूण
क्षमतेच्या १०% मेंदू वापरला होता. आपण आपल्या विद्यार्थ्यांना मेंदू नैसर्गिकरित्या वापरूच देत नाही. हीच खरी सध्याच्या शिक्षण पद्धतीची शोकांतिका आहे.
अतिशय सुरेख पद्धतीने विष्लेशण केले आहे. लेख खुपच आवडला. हा विषय माझ्याही आवडीचा आहे.
ReplyDelete- ब्रिजेश
brijeshmarathe.wordpress.com
धन्यवाद ब्रिजेशजी, शतपावलीवर स्वागत. अजुनही बरेच बारकावे त्यात आहेत. सगळ्या गोष्टी मराठीत लिहीणं अवघड जातं.
Deleteलेख उत्कृष्ट झाला आहे. सध्याच्या "शिक्षणा" मुळे मुलांचे आणि समाजाचेही नुकसानच जास्त होत आहे हे एकदम मान्य! मुलाला प्रश्न पडणे/कुतूहल वाटणे आणि मग त्याने त्यावर खोलात जाऊन, माहिती काढून स्वतःचे समाधान करून घेणे (Investigation) ही शिक्षणाची सर्वात उत्तम पद्धती आपण जवळजवळ नष्ट केली आहे. आशा फक्त इतकीच आहे, की इंटरनेट या माध्यमातून परत ही प्रक्रिया सुरू होईल!
ReplyDelete"Short term memory" सुधारायला काही उपाय आहेत का?
धन्यवाद मिलींदजी. इंटरनेट मुळे एकदम जादू झाल्यासारखी सगळ्या समस्यांचे निराकरण होईल असे नाही. त्याचा देखिल उपयोग अतिशय विचारपूर्वक करायला हवा. मी तर असं ऐकलं आहे की सध्याच्या माहीतीचा विस्फोट झालेल्या युगात इंटरनेटच्या अधिक वापराचा आपल्या शॉर्टटर्म मेमरीवर विेपरीत परिणाम होतो आणि पर्यायाने लॉंगटर्म मेमरीवर देखिल.
Deleteआपापल्या लर्निंग स्टाईल ओळखुन ज्ञान तरग्रहणाचे माध्यम निवडले तर नक्कीच उपयोग होऊ शकतो. त्याचप्रमाणे सगळ्यांनी झापडं लावून एकाच प्रकारचा अभ्यासक्रम न शिकता आपला कल ओळखून त्याप्रमाणे अभ्यासक्रम निवडावा. याबाबतीत मानसशात्रीय चाचण्यांवर भर देण्यापेक्षा मुलांना विविध गोष्टींचे एक्सपोजर द्यावे आणि त्यातूनच त्यांना स्वत:ला निवडकरू द्यावी. कारण सध्या मानसशास्त्रीय चाचण्यांचे इतके पेव फुटले आहे की जो उठतो तो त्या चाचण्या करायला जातो. लहान असल्यापासूनच एका विशिष्ट पद्धतीचीच माहीती मुलांना दिली जाते आणि मग चाचण्यांमधे त्याच्याशी संबंधीतच गोष्ट बाहेर येते. हा अजुन एक स्वत:लाच फसवण्याचा गेम चालू आहे. मुलांना विविध गोष्टींचं एक्स्पोजर मिळाल्याशिवाय, अनुभव मिळाल्याशिवाय त्यांना काहीच ठरवता येणार नाही.
आमच्या चित्रकला सराव वर्गावर नव्याने येणारा नेहमी विचारत असतो, " तुम्ही चित्र काढायला शिकवता का ?" .
ReplyDeleteमी जेव्हा " नाही " म्हणतो तेव्हा आश्चर्यानेच बघू लागतो.
मी तेव्हा समजावतो व माझ्या अनुभवातून सांगतो की , " चित्रकला ही तशी शिकवता येत नाही. तिची अनुभूति, निरिक्षण,स्वत;चा त्यावरील विचार ,प्रयत्न , आणि सततचा सराव ह्या पंचसुत्रीने ते तुम्हीच शिकत जाता. आम्ही फक्त त्याचे प्रेक्षक असतो ! "
तुमच्या ह्या मेंदू विश्लेषणात ते कुठे बसते का पहा.
पेठेकाका तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे " चित्रकला ही तशी शिकवता येत नाही. तिची अनुभूति, निरिक्षण,स्वत;चा त्यावरील विचार ,प्रयत्न , आणि सततचा सराव ह्या पंचसुत्रीने ते तुम्हीच शिकत जाता. आम्ही फक्त त्याचे प्रेक्षक असतो ! " हे मेंदू विश्लेषणात नक्कीच बसते. माणूस निरीक्षणातून अनेक गोष्टी शिकत असतो. ते निरीक्षण किती बारकाईने केले आहे यावर एखादी गोष्ट शिकण्याचा दर्जा ठरतो. सगळ्यांनाच चित्रकलेचे कौशल्य नैसर्गिकरित्या अवगत असेल असे नाही. त्यामुळे ज्यांना ते नैसर्गिकरित्या उपलब्ध आहे त्यांना इतरांपेक्षा कमी वेळ लागतो. तसंच इतरही विषयातील आहे. सरावामुळे दृढीकरण होते. सराव, अभ्यास तर असायलाच लागतो पण फक्त घोकंपट्टी नसावी. माझं हे निरीक्षण आहे की अनेक पालक पैसे आहेत म्हणून आणि कोणत्यातरी क्लासला पाठवायचं म्हणून तसेच इंजीनीअरींग, आर्कीटेक्चरला चित्रकलेच्या परीक्षांचा उपयोग होतो म्हणून आपल्या मुलांना चित्रकलेचा क्लास लावतात. मग ती मुलं शाळेत जसे अनिच्छेने जातात तसेच चित्रकलेच्या क्लासचे ही होते. चित्रकला शिकणं दूरची गोष्ट.
Deleteजेव्हा आपण एखाद्या गोष्टीचं निरीक्षण करतो, एखाद्या गोष्टीची अनुभूती घेतो आणि त्यावर स्वत:चा असा विचार करतो, त्याचा सराव करतो हे सगळं अल्पकालिन स्मृतीतून माहीती दीर्घकालीन स्मृतीत जाण्यास उपयुक्त असेच आहे.
Deleteमस्तच .. सध्या माझ्या किन्डलवर मी 'ब्रेन रूलस्' हे पुस्तक वाचतोय. तू मांडलेल्या विषयावरच ते पुस्तक असल्याने तुझा लेख वाचून विशेष आनंद झाला. ब्रेन रूलस वाचताना कुठेतरी हे जाणवतं की पातंजली / बुद्धदेवांनी ते मार्ग शोधले ते सर्व एका प्रकारे 'ब्रेन रुल' च होते आणि .. मन करा रे प्रसन्न .. सांगणारे 'ब्रेन नरिशमेन्ट' विषयीच सांगत होते .. (कदाचित माझा गैरसमजहीअसू शकतो ..) .. पण हा सबजेक्ट झ्याक आहे. मी 'माईन्ड मॅप' मुळे याविशयातली पुस्तके चाळू लागलो .. मजा वाटतेय.
Deleteखरंय सोमेश, मी पी एच डी ला प्रवेश घेतल्यानंतर माझे सर आर्टीफिशीअल इंटॅलीजन्स मधले असल्याने ते याविषयी आणि इतरही अनेक विषयांवर बोलायचे. मग माझ्या अभ्यासादर्म्यान याविषयातील विशेषत: मेंदू आणि शिक्षण विशेषत: ब्रेन मधील इन्फरमेशन प्रोसेसींग विषयी वाचनात आलं. माझ्या सध्याच्या अभ्यासाचा भाग आहे हा सगळा मजकूर.
DeleteHyach vishayashi jarasa doorun sambandhit lekh -
ReplyDeleteपण आधुनिक शिक्षणशास्त्र म्हणते की सर्व मुले सारखीच बुद्धिमान आहेत. किंबहूना समान बुद्धिमत्ता सूत्र हाच आधुनिक शिक्षणशास्त्राचा पाया आहे.
मुलांच्या बुद्धिमत्तेला ओळखा.
थोर शिक्षण मानसशास्त्रज्ञ हॉवेल गार्डनरच्या मते मुलांच्यात एकूण आठ प्रकारची बुद्धिमत्ता असते आणि प्रत्येक पालकाने / शिक्षकाने मुलाच्यातील विविक्षित बुद्धिमत्ता ओळखून त्याला योग्य ते प्रोत्साहन दिले पाहिजे.
http://mrudulat.blogspot.in/2008/08/blog-post_505.html